Home A स्त्री आणि इस्लाम A दान-धर्म व अल्लाहच्या मार्गात खर्च

दान-धर्म व अल्लाहच्या मार्गात खर्च

पवित्र कुरआन व हदीसमध्ये नमाजनंतर सर्वांत अधिक महत्त्व अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास दिलेले आहे. जकात (अडीच टक्केप्रमाणे दान-धर्म) त्याचेच एक कायदेशीर रूप आहे. नमाजद्वारे मनुष्य ही भावना प्रकट करतो की, त्याने हृदय व मेंदू आणि अवयव व त्याचे अंगप्रत्यांग सर्वकाही अल्लाहसमोर नतमस्तक आहेत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे, या गोष्टीचे चिन्ह आहे की, तो संपत्तीला आपली मालमत्ता समजत नाही आणि ती त्या प्रत्येक ठिकाणी खर्च करण्यास तयार आहे, जेथे अल्लाहने खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मागणी पुरुषाकडेही आहे आणि स्त्रियांकडेदेखील. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे –
‘‘निःसंशय दानधर्म करणारे पुरुष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांनी अल्लाहला चांगले ऋृण दिले त्यांना वाढवून दिले जाईल व त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे.’’ (सूरतुल हदीद : १८)
हदीसमध्ये महिलांना विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. यात त्यांच्या स्वभाव, मानसशास्त्र व वातावरणाचेसुद्धा औचित्य पाहिले गेले आहे.
माननीय जाबिर (र) आणि माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (स) कथन करतात की, एका ईदच्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना उद्देशून वेगळे भाषण दिले. त्यात त्यांना दानधर्म पुण्याईचीसुद्धा प्रेरणा दिली. यावर महिलांनी आपले दागिने व अन्य वस्तू सादर केल्या. माननीय बिलाल (र) त्या वस्तू आपल्या चादरीत गोळा करीत होते. (बुखारी (किताबुल ईदैन), मुस्लिम (किताबुल ईदैन)
माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री माननीय अस्मा (र) यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उपदेश केला.
‘‘खर्च करा. गणना करू नका. (की काय द्यावे आणि काय देऊ नये). नाहीतर अल्लाहसुद्धा मोजूनच देईल. आणि वाचवून सुरक्षित ठेऊ नका. अल्लाहसुद्धा त्याप्रमाणेच देईल.’’ (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात)
माननीय आयेशा (र) म्हणतात की, आम्ही एकदा बकरी कापली (आणि ती वाटून टाकली). प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारणा केली, ‘‘त्यापैकी काही शिल्लक आहे का ?’’ आम्ही सांगितले, ‘‘केवळ फरा उरलेला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘असे म्हणा फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुज्जकात), तिर्मिजीचे प्रमाण.
अशा प्रकारे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ही कल्पना समजाऊन दिली की, मनुष्य जे काही दान पुण्य करतो ते वाया जात नाही, तर वाया तर ते जाते तो खाऊन पिऊन समाप्त करतो. दानधर्म, पुण्यच वास्तविकतः शिल्लक उरतात. ते अशासाठी की, त्यांचा मोबदला व पुण्य अल्लाहजवळ सुरक्षित आहे.
काही वेळा मनुष्य अशा स्थितीत नसतो की, एखाद्याला त्याने मोठे सहाय्य करावे आणि थोडीशी मदत करताना संकोच होतो. ही स्थिती विशेषतः स्त्रियांची होते. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले, ‘‘दान लहानात लहान वस्तूचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की, गरजूची खरी गरज पुरी होत नसेल. प्रसंगी आधार त्याला मिळू शकतो.’’
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्म्द (स) म्हणाले, ‘‘खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. हा पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’ (मंजुरीच्या कथनानुसार अहमदने ते कथन केले. अत्तर्गीब वत्तरहीब पृष्ठ – १७८.)
उम्मे बुजैद (र) म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाले की, याचक माझ्या दारावर येतो. कधी कधी घरात एखादी वस्तू अशी नसते जी त्याला देता यावी, म्हणून लाज वाटते. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, (याचकाला मोकळ्या हाताने पाठवू नका) ‘‘काही नसेल तर जळलेले खूर का असेना देऊन पाठवा.’’ जळलेले खूर एक निरुपयोगी वस्तू आहे. यात याचकाला मोकळ्या हाताने पाठविण्याची सक्त मनाई आणि त्याला काही न काही देण्याची ताकीद आहे.
स्त्रियांचे संबंध विशेषतः नातेवाईक व शेजाऱ्यांशी असतात. त्यांचा हक्कसुद्धा जास्त असतो. हदीसमध्ये स्त्रियांना हा हक्क देण्याची प्रेरणा दिली गेली आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र) यांच्या पत्नी व एका अन्सारी महिलेने माननीय बिलाल (र) यांच्यामार्फत प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, त्या आपले पति व मुलांवरसुद्धा दानधर्म करू शकतात काय ? प्रेषित म्हणाले, ‘‘होय, त्या त्यांच्यावरसुद्धा दानधर्म करू शकतात.’’
‘‘त्यांना तर दुप्पट मोबदला मिळेल – जवळिकीचा मोबदलासुद्धा व दानधर्माचा मोबदलासुद्धा.’’ (बुखारी (किताबुन्नफकात), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय उम्मे सलमा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘जर मी आपले पति अबू सलमा यांच्या मुलावर खर्च केले, जी माझीच मुले आहेत आणि ज्यांना मी सोडूही शकत नाही, तर महान अल्लाह त्याचे पुण्य देईल का?’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘त्यांच्यावर खर्च करा. तुम्ही जे काही त्यांच्यावर खर्च कराल तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल.’’ (प्रमाण मागीलप्रमाणे)
माननीय मैमूना (र) यांनी एका दासीला मुक्त केले. त्यांनी याचा उल्लेख प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर केला. प्रेषित म्हणाले, ‘‘जर तुम्ही तिला आपल्या मामांना दिले असते तर अधिक पुण्य मिळाले असते.’’ (बहुतेक त्यांना गरज होती.) (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘हे मुस्लिम स्त्रियांनो! तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये. जरी शेळीची खूर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’ (बुखारी (किताबुल हिबा))
याचे दोन अर्थ संभव आहेत. एक असा की, प्रत्येक मुस्लिम स्त्रीने यथाशक्ती आपल्या शेजारणीला नजराणा भेट देत राहिले पाहिजे. जर एखादी मोठी वस्तू देता येणे शक्य नसेल, तर लहानशी वस्तू द्यावी. असा विचार करू नये की, लहानशी वस्तू कशी काय द्यावी. दुसरा अर्थ असा आहे की, ज्याला भेटवस्तू दिली जाईल त्याने हे पाहू नये की कोणती वस्तू दिली आहे आणि त्याची किमत काय आहे. तर त्या भावना, प्रेमाची किमत करावी, जी त्याच्या पाठीमागे आहे आणि लहानात लहान वस्तूसुद्धा रद्द करू नये.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझे दोन शेजारी आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या घरी भेटवस्तू पाठवू ? ते म्हणाले, ‘‘ज्याचा दरवाजा तुमच्या जवळ असेल, त्याला पाठवा.’’ (बुखारी (किताबुल हिबा))
यावरून ज्ञात होते की, माननीय आयेशा (र) शेजाऱ्यांचे हक्क जाणत होत्या. तथापि त्या हे समजू इच्छित होत्या की, एकापेक्षा अधिक शेजारी असतील तर कोणाचा अधिकार जास्त आहे ?
या सैध्दांतिक शिक्षणानंतर आता प्रारंभिक काळातील मुस्लिम महिलांच्या अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा अल्पसा परिचय दिला जात आहे.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब (र) यांच्यात अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची असीम भावना होती आणि त्या फार दानधर्म व पुण्य करीत असत. इमाम जहबी त्यांच्या वर्णनात म्हणतात –
‘‘धर्म, अल्लाहचे भय, दान-पुण्य व नेकी आणि कल्याणाच्या दृष्टीने त्यांची गणना उत्तम महिलांमध्ये होत असे.’’ (सियरु अअलामिन्नुबलाइ – २ : १४९)
त्यांची स्थिती अशी होती की, परिश्रम करून जे काही कमवीत असत ते गरीब व दीन-दुःखी लोकांना वाटून टाकीत असत.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आपल्या पत्नींना सांगितले,
‘‘तुमच्यापैकी मला सर्वप्रथम ती भेटेल जिचे हात सर्वांत लांब आहेत.’’
आम्ही आपले हात मापत असू जेणेकरून हे पहावे की, कोणाला मृत्यू प्रथम येईल. माननीय जैनब (र) बुटक्या बांध्याच्या होत्या; परंतु सर्वांत प्रथम त्यांना मृत्यू आला. यावरून आम्हाला कळले की, प्रेषित मुहम्मद (स) यांचा हेतु असा होता की, दानधर्म व पुण्यात जी सर्वांत पुढे आहे, तिला प्रथम मृत्यू येईल. त्या स्वतःच्या हाताने काम करीत असत आणि जे प्राप्त होत असे त्याचे दानधर्म करीत असत. (मुस्लिम (किताबुल फजाइल)
बरजा बिन्ते राफिअ म्हणतात की, माननीय उमर (र) यांनी बारा हजार दिरहम बैतुलमाल (राज्यकोष) मधून माननीय जैनबसाठी पाठवून दिले. जेव्हा ही मोठी रक्कम त्यांच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी या रकमेचे काय करू ? माझ्या अन्य भगिणी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नीं) ही रक्कम गोरगरिबांत वाटण्यास अधिक सक्षम आहेत.’’ त्यांना म्हटले गेले की, ही रक्कम आपल्यासाठीच आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सुबहान अल्लाह ! ही ठेऊन द्या आणि एका कापडाने झाका.’’ मग माननीय जैनब (र) मला म्हणाल्या, ‘‘यात हात घाला आणि एक मूठ अमुकच्या घरी व एक मूठ अमुकच्या घरी पोचवून या.’’ अशा प्रकारे आपल्या नातेवाईकांत व अनाथ लोकांत वाटावयास लावीत राहिल्या. जेव्हा अल्पशी रक्कम उरली, तेव्हा मी म्हणाले, ‘‘यात आमचासुद्धा हक्क आहे ना ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘बरे, आता कापडाखाली जे काही उरले आहे ते तुमचे आहे.’’ हे पस्तीस दिरहम होते. एका कथनात आहे की, जेव्हा ही गोष्ट माननीय उमर (र) यांना कळली की, त्यांनी सर्व रक्कम अशा प्रकारे वाटून टाकली आहे, तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडून पुण्याचीच अपेक्षा आहे.’’ मग माननीय उमर (र) स्वतः त्यांच्या घरी आले. दारावर उभे राहून सलाम (अभिवादन) केला. नंतर आणखी एक हजार दिरहम पाठविले आणि विनंती केली की, ही रक्कम स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी खर्च करा. परंतु ती रक्कमसुद्धा त्यांनी वाटून टाकली.
त्या इतक्या स्वाभिमानी होत्या की, राज्यकोषातून मिळालेल्या या अनुदानानंतर आकाशाकडे हात उचलून त्यांनी प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! माननीय उमर (र) यांचे अनुदान घेण्यासाठी आता मला जिवंत ठेऊ नकोस.’’ त्यांचे त्याच वर्षी निधन झाले. (तबकाते इब्ने साद – ८ : १०९, ११०.)
त्यांनी आपल्या प्रेतावर पांघरण्यासाठी कापड (कफन) स्वतः तयार करून ठेवले होते. इकडे माननीय उमर (र) यांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूसमयी राज्यकोषातून पाच कपडे स्वतः निवडून पाठविले. त्याच कपड्यांत त्यांना दफन केले गेले आणि त्यांच्या भगिनी हिमना बिन्ते जहश यांनी ते कापड जे माननीय जैनब यांनी तयार केले होते, दान म्हणून देऊन टाकले. (तबकाते इब्ने साद – ८ : ११०)
माननीय जैनब (र) यांच्या निधनानंतर माननीय आयेशा (र) यांनी उद्गार काढले,
‘‘त्या गेल्या, ज्या प्रशंसनीय, अनुपम, अनाथ व विधवांच्या आश्रयस्थान होत्या.’’ (तबकाते इब्ने साद – ८ : ११०)
उस्मान बिन अब्दुल्लाह जहशी म्हणतात,
‘‘जैनब बिन्ते जहश यांनी एकही दिरहम अथवा दीनार मागे ठेवला नाही. जे काही हाती येई त्याचे दान करीत. त्या गरीब अनाथांचे आश्रयस्थान होत्या.’’
म्हणतात, त्या ज्या घरात राहात होत्या ते घर वलीद बिन अब्दुल मलिक यांनी मस्जिदे नबवीच्या विस्तारासाठी ते पन्नास हजार दिरहममध्ये खरेदी केले होते. (तबकाते इब्ने साद – ८ : ११४)
प्रेषित मुहम्मद (स) माननीय आयेशा (र) यांच्यावर सर्वांत अधिक प्रेम करीत असत. या कारणास्तव माननीय उमर (र) यांनी त्यांचे अनुदानसुद्धा जास्त ठेवले होते. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी प्रत्येकीला दहा हजार दिरहम व माननीय आयेशा (र) यांना बारा हजार दिरहम नेमुन दिले. (तबकाते इब्ने साद – ८ : ६)
परंतु माननीय आयेशा (र) फार दानी होत्या. जे काही मिळत असे ते दान करण्यात खर्च करीत असत. त्यांच्या दानी वृत्तीचे व अल्लाहच्या खर्च करण्याची कल्पना खालील प्रसंगावरून करता येईल.
उम्मे जराह म्हणतात की, माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर (र) यांनी दोन पिशव्या रक्कम ज्यात एक लक्ष दिरहम असतील, माननीय आयेशा (र) यांच्याकडे पाठविली. त्यांनी थाळी मागितली आणि त्याच्यातूनच रक्कम लोकांत वाटून टाकली. त्या दिवशी त्यांचा रोजा होता. संध्याकाळ झाली तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘हे मुली ! रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) काही खावयास आण.’’ मी म्हणाले, ‘‘आज आपण एवढी मोठी रक्कम वाटून टाकली. काय हे शक्य नव्हते की इफ्तारसाठी मटण मागविले असते ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘जाऊ दे, बरे-वाईट बोलू नकोस. जर अगोदर तू सांगितले असते, तर मटणसुद्धा मागविले असते. (तबकाते इब्ने साद – ८ : ६७)
अता बिन अबी रिबाह म्हणतात की, एकदा माननीय मुआविया (र) यांनी माननीय आयेशा (र) यांना एक लाख दिरहम पाठवून दिले. त्यांनी ती रक्कम उम्महातुलमोमिनीन (प्रेषितांच्या पवित्र पत्नी) यांच्यामध्ये वाटली. (सियरु आलामिन्नुबलाइ – २ : १४१)
उर्वा बिन जुबैर (र) म्हणतात की, मी पाहिले की, माननीय आयेशा (र) यांनी सत्तर हजार दिरहम दानधर्मामध्ये घातले आणि स्वतः त्यांची स्थिती अशी होती की, त्या आपल्या कपड्यांना ठिगळे लावीत असत. (तबकाते इब्ने साद – ८ : ६६)
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते खुजैमा (र) इस्लाम स्वीकारण्यापूर्वीसुद्धा गरीब याचक व दरिद्री लोकांना खूप मदत करीत असत. याच कारणामुळे त्यांना ‘उम्मुलमसाकीन’ (अर्थात-गरीब याचकांची आई) म्हटले जात असे. (तबकाते इब्ने साद – ८ : ११५, अल इस्तीहआब)
उम्मुलमोमिनीन माननीय सौदा बिन्ते जमआ (र) यांना माननीय उमर (र) यांनी दिरहमने भरलेली पिशवी पाठविली. जेव्हा त्यांच्यापर्यंत ही पिशवी पोचली तेव्हा विचारले, ‘‘यात काय आहे ?’’ उत्तर मिळाले, ‘‘दिरहम आहेत’’. त्यांनी विचारले, ‘‘खजुराप्रमाणे दिरहम भरले आहेत काय ?’’ मग एका मुलीला सांगितले, ‘‘एक थाळी घेऊन ये.’’ त्याच थाळीने सर्व रक्कम वाटावयास लावली. (तबकाते इब्ने साद – ८ : ५६)
माननीय अस्मा (र) ह्या माननीय अबू बकर (र) यांची कन्या व माननीय आयेशा (र) यांची सख्खी भगिनी होत्या. मुहम्मद बिन मुनकदिर त्यांच्या बाबतीत म्हणतात –
‘‘त्या स्वभावाने उदार होत्या.’’ (तबकाते इब्ने साद – ८ : २५२)
आपल्या मुलींना व घरातील मंडळींना उपदेश करीत असत की, ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि दानधर्म करा. असा विचार करीत बसू नका की, स्वखर्चानंतर जे काही उरेल ते पुण्यकार्यात खर्च करू, शिल्लक राहण्याची वाट पाहत राहाल तर कोणतीच वस्तू शिल्लक राहणार नाही आणि खर्च कराल तर काही तुटवडाही पडणार नाही.’’ (तबकाते इब्ने साद – ८ : २५२)
माननीय उमर (र) यांनी एक हजार दिरहम माननीय अस्मासाठी अनुदान मुकरर केले होते. (तबकाते इब्ने साद – ८ : २५३)
परंतु अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची त्यांची रीत अजब होती. अबुज्जुबैर म्हणतात की, मी माननीय आयेशा (र) आणि माननीय अस्मा (र) पेक्षा अधिक दानशूर कोणालाही पाहिले नाही. परंतु दोघींची पद्धत वेगळी होती. माननीय आयेशा (र) एक-एक वस्तू जमा करीत आणि नंतर जेथे गरज असे तेथे खर्च करीत असत. परंतु माननीय अस्मा (र) उद्यासाठी काहीही शिल्लक ठेवीत नसत. जे काही हाती येत असे ते सर्व खर्च करून टाकीत असत. (अल अदबुल मुफर्रद – १ : ३७७, सियरु आलामिन्नबलाइ – २ : २११)
फातिमा बिन्ते मुंजिर म्हणतात की, जर कधी माननीय अस्मा (र) आजारी होत, तेव्हा त्यांच्यापाशी असलेल्या गुलामांना त्या मुक्त करीत असत. (तबकाते इब्ने साद – ८ : २५२)
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *