Home A इस्लामी व्यवस्था A दंडविधानाची काही इतर स्वरुपे

दंडविधानाची काही इतर स्वरुपे

शरीअतमध्ये दंडविधानाच्या स्वरुपात शारीरिक आणि आर्थिक शिक्षांव्यतिरिक्त काही हलक्याफुलक्या स्वरुपाच्या शिक्षासुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. त्या आपण थोडक्यात अभ्यासू.
विचारपूस करणे
इस्लामी शासक अथवा न्यायाधीशाला या गोष्टीचा अधिकार आहे की गुन्हेगारास न्यायालयात हजर राहण्याची नोटिस बजावावी अगर त्याची कसून विचारपूस करावी.(संदर्भ : बदायुन नसाया)
तंबी करणे
ईश्वराने पुरुषास आदेश दिला आहे की त्याने आपल्या पत्नीस तिच्याकडून चूक घडल्यास तंबी करावी. यावरूनच विधीतज्ञांनी ही भूमिका घेतली की चूक अगर छोटा अपराध केल्यास गुन्हेगारास तंबी करावी, अर्थात गुन्हेगारास दमदाटी करावी. तंबी करण्याच्या विविध पद्धती असू शकतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशाने अपराध्यास धिक्कारावे, दमदाटी करून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन द्यावी, वगैरे.(संदर्भ : अस् सियासतुल शरीआ)
सामाजिक बहिष्कार
समाजाचे हित जोपासण्याकरिता गुन्हेगारावर सामाजिक बहिष्कार टाकता येतो. त्याच्याशी देवाण-घेवाण, इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार न करता त्याच्याशी संबंध-विच्छेद करण्याचा निवाडा न्यायाधीश अगर इस्लामी शासक देऊ शकतो.(संदर्भ : अस् सियासतुल शरीआ)
अधिकार अगर हुद्यावरून कमी करणे
त्याचप्रमाणे गुन्हेगार हा शासकीय अधिकारी, कर्मचारी अगर हुद्देदार असेल तर त्याला न्यायाधीश त्याच्या हुद्यावरून कमी करू शकतो. दारू पिल्यास, लाच मागितल्यास, भ्रष्टाचाराचा प्रयत्न केल्यास, अन्याय केल्यास, कामात दिरंगाई केल्यास प्रत्यक्षरित्या अशा अधिकार्यास निलंबित करण्याचा आदेश न्यायाधीश देऊ शकतो.(संदर्भ : अस् सियासतुल शरीआ)
समाजात बदनामी करणे
हीसुद्धा इस्लामी दंड विधानाची एक शिक्षा आहे. गुन्हेगारास सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बाजार-हाटसारख्या ठिकाणी आणून किंवा वृत्तपत्रात त्याची बातमी देऊन लोकांना दक्ष करण्यात येईल की ही व्यक्ती गुन्हेगार आहे. एवढेच नव्हे तर अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगाराच्या तोंडाला काळे फासण्याचा आदेशसुद्धा न्यायाधीश देऊ शकतो. ही शिक्षा खोटी साक्ष देणार्या, चोरी करणार्या, उपद्रव माजविणार्या, अनैतिकतेस खतपाणी घालणार्यास आणि मृत प्राण्याचे मांस विकणार्या गुन्हेगारास देण्यात येईल.(संदर्भ : इब्ने आबेदीन)
इस्लामी दंडविधान लागू करणे आणि न्यायाधीशाचा निवाडा
उपरोक्त मजकुरात दंडविधानात्मक शिक्षांचे विविध स्वरुप वर्णण करण्यात आले असून यावरून हे स्पष्ट करण्यात आले आहे की ‘शरीअत‘मध्ये याबाबतीत बराच वाव आहे. मात्र प्रश्न असा उठतो की, या शिक्षा कशाप्रकारे लागू करणे शक्य होईल? त्याचप्रमाणे गुन्हेगारावर कशा प्रकारची शिक्षा लागू करण्यात येईल? याबाबतीत प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करण्यात आली आहे. प्रथम अशी की, न्यायाधीशाला या गोष्टीचा अधिकार देण्यात आला आहे की गुन्ह्याचे गांभीर्य आणि समाजाचे हित पाहून तो गरजेनुसार कोणतीही शिक्षा देऊ शकतो. दुसरे असे की न्यायाधीशाला शिक्षा तजवीज करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा अर्थ असा मुळीच नाही की वाटेल ती आणि वाटेल तशी शिक्षा तजवीज करावी. तर यासाठी ही अनिवार्य अट आहे की न्यायाधीश हा शरीअत अर्थात इस्लामी कायद्याचा गाढा अभ्यासक आणि प्रगल्भ विद्वान असावा, शिवाय त्याच्यात परिपूर्ण साकल्यबुद्धी असावी.(संदर्भ : अल फतावा हिंदिया)
दंड विधान लागू करण्याचे स्वरुप
मागेच आपण पाहिले आहे की गुन्हेगारावर त्याच्या अपराधाची ‘हद‘ आणि ‘प्रायश्चित्त‘ स्वरुपाची शिक्षा निश्चित अटी आणि शर्ती पूर्ण होत नसल्याने देता येत नसल्यास गुन्हेगारास इस्लामी दंड विधानानुसार शिक्षा देण्यात येईल. म्हणूनच अनिवार्य असलेले इस्लामी आदेश, उदाहरणार्थ, नमाज, रोजा, जकात वगैरे तर्क करणार्या गुन्हेगाराससुद्धा दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल. याव्यतिरिक्त चोरी, व्यभिचार मादक पदार्थांचा वापर करणार्या गुन्हेगाराससुद्धा दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल. पुढील मजकुरात आपण थोडक्यात या गोष्टींचा वेध घेऊ या.
हत्या करण्याच्या अपराधात दंडविधात्मक शिक्षेची स्वरुपे
शरीअतमध्ये हत्या करण्याची शिक्षा ‘किसास‘(जशास तसा बदला अर्थात हत्येचा बदला हत्या) तजवीज करण्यात आली आहे. मात्र ही शिक्षा लागू करण्यासाठी असलेल्या अटी व शतर्चिी पूर्तता न झाल्यास अगर समस्त अटींपैकी एकही अटीची कमतरता आढळून आल्यास खुन्यावर दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. अर्थातच गुन्हेगारास शंभर कोरडे मारण्याची आणि एक वर्ष कैदेची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय चोप देणे, कोरड्याने अथवा लाठीने मारणे वगैरेसारख्या गुन्ह्यात हल्ला झालेल्या व्यक्तीचा एखादा अवयव निकामी जर झाला नसेल, जखम झालेली नसेल, तर दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. मात्र जर जखम पूर्ण भरून निघत असेल आणि जखम झाल्याचे चिन्ह मिटले असेल तर दंडात्मक कार्यवाही होणार नाही. त्याचप्रमाणे चुकून आणि विनाहेतू झालेल्या हत्येवर अपराध्यास दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येणार नाही.
व्यभिचाराच्या अपराधात दंडविधानात्मक शिक्षेची स्वरुपे
व्यभिचार करण्याची शिक्षा शंभर कोरडे आणि ‘रजम‘(अर्थात दगडाने ठेचून मारणे) होय. मात्र यासाठीसुद्धा अटी आणि शतर्चिी पूर्तता न झाल्यास अथवा एखाद्या अटीची पूर्तता न झाल्यास अगर व्यभिचार करण्यात शंका उत्पन्न झाल्यास या दोन्ही प्रकारच्या शिक्षांमध्ये कमतरता अगर शिथिलता होऊ शकते. यावर आपण थोडक्यात चर्चा करू या. प्रथम आपण शंका असण्याच्या अवस्थेवर चर्चा करु या.
व्यभिचारकर्मात शंका उत्पन्न होणे, उदाहरणार्थ, तीन वेळेस अगर दोन वेळेस तलाक देण्यात आलेल्या स्त्रीशी संभोग करणे, तेही अशा अवस्थेत की पत्नीशी अशा अवस्थेत संभोग करणे निषिद्ध असल्याचे पतीला ज्ञान नसताना, पती म्हणजेच अपराध्यास व्यभिचार करण्याची ‘रजम‘ची शिक्षा देता येणार नाही. मात्र जर पतीला हे माहीत असेल की, दोन अथवा तीन तलाक देण्यात आलेल्या पत्नीबरोबर संभोग करणे निषिद्ध आहे आणि हे माहीत असूनदेखील त्याने जर पत्नीशी संभोग केला तर हा संभोग मात्र व्यभिचार ठरेल आणि व्यभिचार्यास ‘रजम‘ची शिक्षा देण्यात येईल.
त्याचप्रमाणे अटी आणि शर्ती पूर्ण होत नसल्यास अथवा एखादी अटी पूर्ण होत नसल्यास ‘हद‘ ची शिक्षा शिथिल होऊन दंडविधिनात्मक शिक्षेत ती परावर्तीत होते. उदाहरणार्थ, व्यभिचार सिद्ध होण्यासाठी स्त्री-पुरुष जीवंत असावे लागतात. मात्र पुरुषाने जर एखाद्या मृत स्त्रीशी संभोग केला असेल तर, येथे व्यभिचाराचा गुन्हा सिद्ध होणार नाही. म्हणून ‘हद‘च्या स्वरुपाची शिक्षा लागू न होता पुरुषावर दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल. कारण त्याचे हे दुष्कर्म अत्यंत मोठे पाप आहे.(संदर्भ : बदायुन नसाया)
त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने व्यभिचार केला. मात्र पुरुषाशी लैंगिक वासना न भागविता कुत्र्याकरवी अथवा वानराकरवी संभोग केला. या ठिकाणीसुद्धा एक अट अशी आहे की व्यभिचार सिद्ध होण्यासाठी पुरुष-स्त्रीमध्ये संभोग व्हावा. मात्र ही अट या ठिकाणी पूर्ण होत नसल्याने व्यभिचाराची शिक्षा न देता दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल. एखाद्या वयात न आलेल्या मुला-मुलीच्या जोडप्यात संभोग झाला तरी हा ‘हद‘च्या स्वरुपाच्या शिक्षेस पात्र अपराध ठरणार नाही. कारण दोघेही अल्पवयीन असल्याने व्यभिचार सिद्ध होत नाही. व्यभिचार सिद्ध होण्यासाठी स्त्री-पुरुष वयात आलेले असण्याची अट लावण्यात आली आहे. म्हणून या प्रकारच्या अपराधास्तव ‘रजम‘ऐवजी दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : अल फतावा हिंदिया)
व्यभिचारापेक्षा कमी स्वरुपाच्या अपराधावर ‘हृद‘ स्वरुपाची शिक्षा लागू होणार नाही. मात्र हेसुद्धा व्यभिचाराकडे नेणारे कृत्य असल्याने घोर पाप समजले गेले. म्हणूनच त्यावर दंडविधानाची कार्यवाही होईल. त्याचप्रमाणे अश्लील चाळे करणे, निर्लज्ज वर्तन करणे, स्त्रीला तिच्या पतीच्या अनदेखत इतर ठिकाणी घेऊन जाणे, स्त्रियांशी वाह्यात व अश्लील चाळे करणे वा अश्लील बोलणे वगैरेसारख्या अपराधांवर दंडविधीनात्मक कार्यवाही करण्यात येईल.
खोटा आरोप लावण्यावर दंडविधानात्मक शिक्षेचे स्वरुप
इस्लामी कायद्यात खोटा आरोप लावण्याच्या अपराध सिद्धीस्तव ज्या अटी व शर्तीवर ‘कजफ‘ची शिक्षा देण्यात आली आहे, त्या अटींपैकी एकही अट बाकी राहिल्यास अपराध्याला शिक्षा न देता दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीवर व्यभिचाराचा अगर निषिद्ध संतती असल्याचा आरोप लावण्यात आला असेल आणि अटी व शर्तीच्या अभावामुळे गुन्हा सिद्ध होत नसेल तर ‘कजफ‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही. उदाहरणार्थ, तो मानसिक सुदृढ असलेला, चारित्र्यशील, मुस्लिम व सबळ असेल तर आरोप लावणार्यावर शिक्षा लागू होणार नसून दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीवर खोटा आरोप लावण्यात येत आहे, ती व्यक्ती नेमकी कोणती, ही गोष्ट स्पष्ट होत नसेल. उदाहरणार्थ, एखाद्याने आरोप लावला की अमक्याचा भाऊ व्यभिचारी आहे, मात्र त्या अमक्यास बरेच भाऊ असतील तर नेमक्या कोणत्या व्यक्तीवर आरोप लावण्यात आला, हे स्पष्ट होत नसेल तर खोटा आरोप लावण्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक अटीचा अभाव आहे. म्हणून या अपराध्यास दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : बदाया वननसाया)
शिवीगाळ करण्यावर दंडविधानात्मक शिक्षा
शिवीगाळ केल्यामुळे माणसाचा अहं दुखावतो, आत्मप्रतिष्ठेस धक्का पोचतो, पानउतारा होतो. म्हणूनच कोणास जर शिवीगाळ केली अथवा तू यहूदी आहेस, ख्रिस्ती आहेस, ‘ज्यू‘ ची अवलाद आहेस, काफिराची औलाद आहेस अथवा दांभिक, दारुड्या, चोर, हरामखोर आहेस तर या अपराधास्तव गुन्हेगारास दंडविधात्मक शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : शरह-ए-फतहुल कदीर)
चोरी करण्याची दंडविधानात्मक शिक्षा
इस्लामी कायद्यात चोरी करण्याची शिक्षा हात कापण्याची तजवीज केली आहे. मात्र हा अपराध सिद्ध करण्यासाठी निम्नलिखित अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत.
  1. चोरी ही गुपितरित्या करण्यात आलेली असावी. पाकिटमारी, भुरटेचोरी यासारख्या छोट्या-मोठ्या चोर्यांवर हात कापण्याची शिक्षा होणार नाही.
  2. कुत्रा, मृत प्राणी, चिमणी, कावळा, क्रीडा-साहित्य, ढोलबाजा व संगीत-वाद्याचे साहित्य तसेच निषिद्ध वस्तु उदाहरणार्थ, दारू, डुक्कर व इतर बाबींची चोरी केल्यास हात कापण्याची शिक्षा होणार नाही. म्हणून या गुन्हेगारास दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल. पुस्तके, ग्रंथ वगैरेसारख्या अभ्यासाच्या साहित्यांची चोरी केल्याससुद्धा हातकापण्याची शिक्षा न देता दंडविधानाची शिक्षा देण्यात येईल. फळे, भाजीपाला अगर खाण्याच्या वस्तु ज्या नासत असतात, त्यांची चोरी केल्यास शिक्षा न होता दंडविधानात्मक शिक्षा करण्यात येईल.
  3. चोराच्या मालाची चोरी केल्यास, युद्धलुटीचा आणि बैतुल माल(सरकारी जनकल्याण निधी) चा माल चोरी केल्यास शिक्षा न होता दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल.
  4. सुरक्षित नसलेल्या संपत्तीतून चोरी झाल्यास हात कापण्याची शिक्षा होणार नाही. यासाठीसुद्धा दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल.
या अटीची पूर्तता न झाल्यास गुन्हेगारास हात कापण्याची शिक्षा देण्याऐवजी दंडविधानात्मक शिक्षा देण्यात येईल.
इतर अपराधांवर दंडविधानात्मक शिक्षांचे स्वरुप
याशिवाय खोटी साक्ष देणे, खोट्या अफवा फैलावणे, कोणाच्या घरात विनापरवानगी दाखल होणे, इतरांच्या घरात विनापरवानगी डोकावून व चोरून पाहणे, इतरांचे गुपित पत्र वाचणे, लाच मागणे, लाच खाणे, कर्मचारी अथवा अधिकार्याने आपल्या कर्तव्य बजावणीत हलगर्जीपणा करणे, कामात दिरंगाई करणे, अधिकार्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे, प्रत्येक असे कृत्य ज्यामुळे सामाजिक हितास बाधा पोचत असेल, गुन्हेगार कैद्यास पळवून नेणे, नकली नोटा छापणे, सरकारी स्टँप पेपरचा शासनाच्या परवानगीशिवाय गैरवापर करणे, रमजान महिन्यात कोणतेही वैध कारण नसताना रोजा(इस्लामी पद्धतीचा उपवास) तर्क करणे, ‘शरीअत‘च्या नियमांची खिल्ली उडविणे, अनैतिक वर्तन करणे, बाजारभावापेक्षा जास्त भावाने वस्तु विकणे, जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करणे, निषिद्ध वस्तुंचा वापर करणे, मोजमापात गडबड करणे, भ्रष्टाचार माजविणे व यासारख्या अपराधांवर गरजेनुसार दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल.(संदर्भ : अस् सियासतुल शरीआ)
कधीकधी समाजाचे हित जोपासण्यासाठी अपराध करण्याचा ज्या व्यक्तीकडून संभव आहे, त्यांच्यावरसुद्धा दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. ज्या लोकांविषयी समाजास विश्वास नसेल आणि काही जणांना काही लोकांविषयी असुरक्षिततेची भावना असेल, अशा साशंक व्यक्तीमत्वाच्या लोकांवर दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल.(संदर्भ : अल-मुग्नी)
दंडविधानात्मक कार्यवाहीत गुन्हेगाराचा मृत्यूदंडविधानात्मक शिक्षा देत असताना उदाहरणार्थ, गुन्हेगारास कोरडे लगावताना, कैदेची शिक्षा भोगत असताना, शहरातून तडीपार झाल्यास जीवघेणा त्रास होत असताना गुन्हेगाराचा मृत्यू झाल्यास त्यावर शासनास अगर न्यायाधीशास जवाबदार ठरविण्यात येणार नाही.(संदर्भ : अलमुग्नी)
संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *