मुस्लिमास मुस्लिम असण्यास सर्वप्रथम ज्याची आवश्यकता आहे ते म्हणजे इस्लामचे ज्ञान. प्रत्येक मुस्लिमाला हे माहीत असणे आवश्यक आहे की पवित्र कुरआनची शिकवण काय आहे?प्रेषित मुहम्मद (स.) यांची पद्धत काय आहे? इस्लाम कशाला म्हणतात आणि अनेकेश्वरवाद व इस्लाममध्ये मौलिक फरक कोणत्या गोष्टीमुळे आहे?याचे ज्ञाान असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मुस्लिम असू शकत नाही. परंतु खेदाची गोष्ट अशी की आम्हाला सत्य ज्ञानप्राप्तीची चिंता राहिली नाही, तसेच आम्हाला या गोष्टीची जाणीव नाही की आम्ही केवढ्या मोठ्या देणगीपासून वंचित राहिलो आहोत. माझ्या बंधुनो, आईसुद्धा आपल्या बाळाला तोपर्यंत दूध पाजत नाही जोपर्यंत ते रडून त्याची मागणी करीत नाही. तहानलेल्यास जेव्हा तहान लागते तेव्हा तो स्वत: पाण्याचा शोध करतो. अल्लाह त्याच्यासाठी पाणी उपलब्ध करतो. तुम्हाला स्वत:लाच तहान नसेल तर पाण्याने भरलेली विहीर जरी तुमच्याजवळ आली तरी व्यर्थ आहे. प्रथमत: तुम्हाला स्वत:ला कळले पाहिजे की धर्मापासून अनभिज्ञ राहणे तुमच्यासाठी किती हानिकारक आहे. अल्लाहचा ग्रंथ तुमच्यापाशी आहे परंतु तुम्हाला कल्पना नाही की त्यात काय लिहिले आहे. याच्यापेक्षा अधिक हानिकारक अन्य कोणती गोष्ट असू शकेल? तुम्ही नमाज अदा करता, परंतु तुम्हाला कळत नाही की या नमाजमध्ये तुम्ही आपल्या ईश्वरापुढे काय विनवणी करता. यापेक्षा मोठे नुकसान काय असू शकेल? ज्या कलम्याच्याद्वारे (पवित्र वचन) तुमचा प्रवेश इस्लाममध्ये होतो त्याचा अर्थदेखील तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला याचीदेखील कल्पना नाही की या कलम्याचे (कलमा म्हणजे इस्लाम स्वीकारण्याचे वचन) पठण केल्याने तुमच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या येतात. काय एखाद्या मुस्लिमाच्या दृष्टीने याच्यापेक्षाही एखादी मोठी हानी असू शकते? शेती वाळून गेल्याने होणाऱ्या हानीची तुम्हाला कल्पना आहे. रोजगार न मिळाल्याने होणाऱ्या नुकसानीची तुम्हाला कल्पना आहे, तुमच्या स्वत:चा व्यापारी माल नष्ट होण्याच्या नुकसानीची तुम्हाला कल्पना आहे. परंतु इस्लामचे ज्ञान नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची तुम्हाला कल्पना नाही. जेव्हा तुम्हाला या हानीची जाणीव होईल तेव्हा तुम्ही स्वत: येऊन म्हणाल की आम्हाला या हानीपासून वाचवा. जेव्हा तुम्ही असे सांगाल तेव्हा तुम्हाला या नुकासनीपासून वाचविण्याचीदेखील व्यवस्था होईल.
0 Comments