Home A blog A जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिमेतरांबाबतचा दृष्टीकोण

जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिमेतरांबाबतचा दृष्टीकोण

एक ही धुन है के इस रात को ढलता देखूं, 
अपनी आँखों से सूरज को निकलता देखूं
जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशी संघटना आहे की, जिचा सरळ संपर्क देशबांधवांशी आहे. कोणत्याही कार्यक्रमात सर्व समाजाला सोबत घेण्याकडे जमाअतचा कल असतो. मुस्लिम्मेतरांकडे उदार दृष्टीने पाहण्याची जमाअतची शिकवण आहे. यासंदर्भात जमाअतचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचे विचार नक्कीच उद्बोधक ठरतील. ते म्हणतात, ”मुस्लिमांमधून साधारणतः जी आंदोलने उदयास येतात ती दोनपैकी एका कारणासाठी केली जातात. 1. इस्लामच्या एखाद्या विषयाला घेऊन. किंवा 2. मुस्लिमांच्या जीवनाशी निगडित एखाद्या विषयाला घेऊन. परंतु, आम्ही जमाअतच्या माध्यमाने समग्र इस्लामला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जमाअते इस्लामी आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये दूसरा फरक असा आहे की, दुसर्‍या कुठल्याही मुस्लिम संघटनांची आंदोलने इतर समाजाच्या संघटनांच्या आंदोलनासारखीच असतात. मात्र आम्ही ठीक त्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, जी पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठरवून दिलेली आहे. 
इतर मुस्लिम संघटनांमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला सामील करून घेतले जाते जो जन्माने मुस्लिम असेल. त्यांची अशी धारणा असते की, जो मुस्लिम वंशात जन्मला तो चारित्र्यानेही मुस्लिम असणार. परिणामतः अशा संघटनांमध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांचा शिरकाव होतो. असे लोक जे विश्‍वासू नसतात, कोणतीही जबाबदारी पेलण्यास लायक नसतात. मात्र आम्ही जमाअतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला या गृहितकावर घेत नाही की, आमुक एक जण मुस्लिम घरात जन्माला आहे म्हणून त्याचे वर्तनही इस्लामीच असेल. इस्लामचा कलमा, त्याचा अर्थ यांचा समजून उमजून स्विकार केल्यानंतर त्याच्यावर येणार्‍या जबाबदार्‍यांची चांगल्या प्रकारे जाण निर्माण झाल्यावरच आम्ही कोणत्याही व्यक्तीला जमाअतमध्ये घेतो. संघटनेत आल्यानंतरही ईमान (श्रद्धा) मध्ये टिकून राहण्यासाठी ज्या आवश्यक शर्ती आहेत त्याचे पालन त्याच्याकडून केले जाते किंवा नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. येणेप्रमाणे मुस्लिम समाजातील चांगल्या चारित्र्यातील लोकांनाच वेचून-वेचून जमाअतमध्ये घेतले जाते.  म्हणजे चांगल्या चारित्र्याचे लोकच जमाअतमध्ये येतील याकडे लक्ष दिले जाते. 
अन्य मुस्लिम संघटनांची दृष्टी भारत आणि भारतात राहणार्‍या मुस्लिम समाजापर्यंतच सीमित असते. कोणाची नजर गेलीच तरी जास्तीत जास्त  जागतिक मुस्लिम समाजांच्या प्रश्‍नापर्यंत जाते. या संघटनांना मुस्लिम समाजातील प्रश्‍नांमध्येच रस असतो. त्यांच्या उपक्रमांमध्ये असे काहीच नसते जे देशबांधवांना आकर्षित करेल. उलट कधी-कधी त्यांचे उपक्रम असे असतात की, बिगर मुस्लिमांना इस्लामकडे आकर्षित होण्यामध्ये बाधाच निर्माण होते. मात्र जमाअतमध्ये समग्र इस्लाम हाच उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याने याकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो. इस्लाम समग्र मानवजातीसाठी आहे. म्हणून आमची दृष्टी कुठल्याही विशिष्ट अशा समाज, देश किंवा त्यांच्या तात्कालीक प्रश्‍नांमध्ये गुरफटलेली नाही. उलट आमची दृष्टी समग्र मानवजाती व जगावर पसरलेली आहे. आमची अशी धारणा आहे की, मानवजातीचे प्रश्‍न हे आमचे प्रश्‍न आहेत. कुरआन आणि हदीसमध्ये त्या प्रत्येक प्रश्‍नाचे समाधान आहे व तेच समाधान आम्ही सर्वांसमक्ष ठेवतो. त्यातच सर्वांचे यश व कल्याण नीहित आहे. आमच्या या अजेंड्यामुळे मला विश्‍वास आहे की, फक्त मुस्लिमांमधीलच नव्हे तर मुस्लिम्मेतरांमधील सद्प्रवृत्तीचे लोक सुद्धा जमाअते इस्लामीकडे आकर्षित होतील.” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 8-9).
जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मानवतावादी दृष्टीकोण कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ती शिकवण म्हणजे, 
1. ” लोकहो! आम्ही तुम्हाला एक पुरूष व एक स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले. जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकपणे अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान (ईशपरायण) आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात ः आयत नं.13).
2. ”ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मळ पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्‍याचशा निर्मितींवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.” (सुरह बनी इसराईल आयत नं. 70)
कुरआनच्या वरील दोन्ही संदेशांमध्ये जात आणि धर्मावरून कुठलाही फरक केलेला नाही. समतेची एवढी मोठी शिकवण दुसरी असू शकत नाही. हीच शिकवण जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. हीच शिकवण परिणामकारकरित्या जगासमोर मांडण्याचे कार्य जमाअत गेल्या 77 वर्षांपासून करत आहे.
जगण्याचा हा स्वच्छ, सरळ आणि तणावरहित मार्ग त्या लोकांना मुळीच आवडत नाही ज्यांचे व्यवसाय हरामचे आहेत. दारू, व्याज, जुगार, अश्‍लिलता म्हणजेच समाजाला नुकसान पोहोचविणार्‍या वस्तूंच्या निर्मितीत जो वर्ग गुंतलेला आहे त्याला जमाअतचे हे कार्य आवडत नाही, हे ओघानेच आले. दुर्दैवाने सत्तेत आणि मीडियात याच वर्गाचे प्राबल्य आहे.  म्हणूनच जमाअतचा संदेश खरा असूनही बहुसंख्य लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचत नाही. उलट माध्यमांमधून इस्लाम विरूद्धचा प्रचार सातत्याने व आक्रमक पद्धतीने होत असल्यामुळे देशबांधवांमध्ये मुख्यत्वाने इस्लाम व पर्यायाने मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज खोलवर रूजलेले आहेत. 
या दुष्प्रचाराच्या वाईट परिणामापासून देशबांधवांना वाचवून त्यांच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्याचे मोठे आवाहन जमाअत समोर आहे. त्यासाठी जमाअतच्या सदस्यांना अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत. 
वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान म्हणजे काय?
एक सफ मे खडे हो गए महेमूद व अयाज
न कोई बंदा रहा न कोई बंदानवाज
जमाअते इस्लामी हिंद वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान या संकल्पनेवर ठामपणे विश्‍वास ठेवते. अरबी भाषेमध्ये ’वहदत’ या शब्दाचा अर्थ ’एक’ असा आहे आणि ’इलाह’ म्हणजे पूजनीय. येणेप्रमाणे वहदत-ए-इलाह म्हणजे अल्लाह एक होय व तोच पूजनीय आहे, या विश्‍वाचा निर्माता आहे, शासक व मालक आहे. म्हणून त्याचे आदेश सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव मुकाट्याने मानतात. सूर्य, चंद्र, तारे लाखों वर्षांपासून अल्लाहने ठरवून दिलेल्या कक्षेमध्ये ठरवून दिलेले काम करत आहेत. निसर्गाची दिनचर्या ठरवून दिल्याप्रमाणे चालू आहे. कोणी अल्लाहला मानो किंवा न मानो, अल्लाहची कृपा सर्वांवर सारखीच आहे. ही संकल्पना म्हणजे वहदत-ए-इलाह. 
आता पाहूया, वहदत-ए-इन्सान म्हणजे काय? आपण आताच पाहिले आहे की, सुरह हुजरात आयत नं. 13 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, समस्त मानव समाज हा एकाच आई-वडिलांचा विस्तार आहे. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या जवळ-जवळ आठ अब्ज मानवांचे आई-वडिल एकच आहेत. म्हणजे समस्त मानवसमाज हा एकच आहे. या सत्याचा ठाम विश्‍वास मनाशी बाळगणे म्हणजेच वहदत-ए-इन्सान. 
सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. सर्वांचे अवयव सारखेच आहेत. सर्वांचे रक्त सर्वांना अर्थात रक्त गटाप्रमाणे चालते. फक्त वर्ण व चेहरेपट्टी वेगवेगळी आहे व तीही या कारणाने आहे की त्यांना ओळखता यावे. थोडक्यात जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीचा रक्ताचा नातेवाईक आहे. समस्त मानवजात रक्ताच्या नात्याने बांधलेली आहे. वहदत-ए-इन्सान या संकल्पनेबद्दल बोलताना जमाअतचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदाभेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.
मतभेद कोणामध्ये होत नाहीत? एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्‍चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही. 
आपल्याला आश्‍चर्य वाटायला हवे की, असे विचार आणि दृष्टीकोण माणसांमध्ये कसे काय उपजले? अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला? माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले? नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली? साधारण बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकतो की, काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीयांमध्ये तशी भिन्नता तर आढळून येत नाही जशी बैल आणि घोड्यामध्ये, बकरी आणि उंटामध्ये आढळून येते व ज्या कारणांने त्यांना वेगवेगळे समजता येईल. हे काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीय हे सर्व एकाच हाडामांसाचे बनले आहेत. शरीर, बुद्धी, मन, अवयव व त्यांच्या क्षमता सर्व सारख्याच आहेत. या सर्वांची मानसिकता, भावना एक सारख्याच आहेत. यांची बलस्थाने व यांच्यातील त्रुटी यासुद्धा एकसारख्याच आहेत. यांच्यात अशी कोणतीही गोष्ट वेगळी नाही की ज्या आधारे आपण यांना ’वेगळे’ घोषित करू शकू. यांच्यातील सर्व गोष्टी समान आहेत. म्हणूनच ते सर्व एक आहेत. येथे कुरआनचा तो आदेश लागू होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत. मग ते काळे असो का गोरे, अरबी असो का अरबेत्तर त्यांच्यातील वंश, कबिले आणि राष्ट्रीयत्वात्वर आधारित विभाजन फक्त त्यांना ओळखण्यापुरते आहे त्यापेक्षा अधिक नाही. 
या दोन मुलभूत शिकवणी वहदत-ए-इलाह आणि वहदत-ए-इन्सानचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगात अनेक प्रेषित आले. इस्लाम कुठलाही नवीन धर्म नाही. कुरआन हा नवीन ग्रंथ नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही अशी नवीन शिकवण जगाला दिलेली नाही, जी की, त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांपेक्षा वेगळी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची शिकवण ही ईतर प्रेषितांची शिकवणच आहे. फक्त त्याचे आधुनिक नाव इस्लाम आहे. आणि या शिकवणीच्या शेवटच्या ग्रंथाचे नाव कुरआन आहे. जगातील प्रत्येक बुद्धीवादी ज्याने हा ग्रंथ समजून वाचला तो या सत्यावर ठाम आहे की, हा ग्रंथ माणसां-माणसांमध्ये भेद करत नाही. समस्त मानवजात एक आहे. हाच दृष्टीकोण जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांसंबंधी आहे. (संदर्भ ः रूदाद भाग क्र. 5 पान क्र. 21 – 22 वर आधारित)
– एम.आय. शेख 
9764000737
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *