स्पष्टीकरण
‘सदका’ हा शब्द ‘जकात’ (ऐपतीप्रमाणे अनिवार्य दान) साठीही वापरला जातो, जी देणे आवश्यक आहे आणि येथे हाच अर्थबोध होतो. एखाद्या मनुष्याने स्वखुशीने अल्लाहच्या मार्गात खर्च केलेल्या संपत्तीवरदेखील जारी होत असतो. या हदीसमधील ‘तुरद्दु’ (परतविला जाईल) या शब्दाने स्पष्ट होते की श्रीमंतांकडून वसूल करण्यात आलेली ‘जकात’वर खरे तर समाजातील गरीब आणि गरजवंतांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळवून दिला जाईल. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला अल्लाहने संपत्ती प्रदान केली आणि मग त्याने त्या संपत्तीची ‘जकात’ अदा केली नाही, त्याची संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामत) डोक्यावर दोन काळे ठिपके असलेल्या (हा अतिशय विषारी होणाचा संकेत आहे) अत्यंत विषारी सापाचे रूप धारण करील आणि तो त्याच्या गळ्यातील जोखड बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना हा साप पकडेल आणि म्हणेल, मी तुझी संपत्ती आहे, मी तुझा खजिना आहे.’’ (हदीस : सहीह बुखारी)
मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या या आयतीचे पठण केले, ‘‘वला यहसबन्नल ल़जीना यब़खलूना.’’
स्पष्टीकरण
आपली संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यात कंजूषी करणारे लोकांनी असे समजू नये की त्यांची ही कंजूषी त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल, मात्र ती त्याच्यासाठी वाईट सिद्ध होईल. त्यांची ही संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्या गळ्यातील जोखड बनेल. म्हणजे ती त्यांच्यासाठी विध्वंस वविनाशाचे कारण ठरेल.
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणता ऐकले की, ‘‘ज्या संपत्तीतून ‘जकात’ काढण्यात आली नाही आणि ती त्यातच मिसळली गेली तर ती त्या संपत्तीचा विनाश करून टाकते.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण
‘विनाश करणे’ म्हणजे असे नाही की एखाद्या मनुष्याने ‘जकात’ दिली नाही आणि स्वत:च खाल्ली तर कोणत्याही स्थितीत त्याची सर्व संपत्ती नष्ट होईल, असे नाही तर ‘विनाश’ म्हणजे ज्या संपत्तीपासून लाभ घेण्याचा त्याला अधिकार नव्हता आणि तो गरिबांचा हिस्सा होता, ती संपत्ती खाऊन त्याने आपल्या ‘दीन’ (जीवनधर्म) आणि ईमानचा विनाश केला. इमाम अहमद बिन हंबल यांनी हेच स्पष्टीकरण दिले आहे आणि असेही आढळून आले आहे की ‘जकात’ खाणाऱ्याची संपूर्ण संपत्ती अचानक नष्ट झाली आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘फितरा’च्या ‘जकात’ला लोकसमुदायावर अनिवार्य केले जेणेकरून ती उपवासाच्या (रोजाच्या) स्थितीत रोजादारद्वारा घडणाऱ्या व्यर्थ आणि निर्लज्जपणाच्या गोष्टींचे (पापांचे) प्रायश्चित्त बनावी आणि गरिबांच्या आणि गरजवंतांच्या भोजनाचे नियोजन व्हावे. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
‘सदका-ए-फित्र’ला ‘शरियत’ (इस्लामी धर्मशास्त्र) मध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत दोन वैशिष्ट्ये कार्यरत आहेत. एक रोजादाराकडून उपवासाच्या स्थितीत प्रयत्न करूनसुद्धा घडलेल्या त्रुटी व चुकाची त्या (सदका-ए-फित्र) द्वारे नुकसानभरपाई होते; आणि दुसरा उद्देश असा आहे की ज्या दिवशी सर्व मुस्लिम ईदचा आनंदोत्सव साजरा करीत असतील त्या दिवशी समाजातील गरीब लोक त्या आनंदापासून वंचित न राहता त्यांच्या भोजनाचे थोड्या-फार प्रमाणात का होईना नियोजन व्हावे. कदाचित याच कारणास्तव मुस्लिमांच्या घरातील सर्वच लोकांवर ‘फित्रा’ (धर्मदान) अनिवार्य करण्यात आले आहे आणि ईदच्या नमाजपूर्वी त्याचे वितरण करण्यास सांगितले गेले आहे.
0 Comments