Home A blog A चौथे खलीफा हजरत अली रजि.

चौथे खलीफा हजरत अली रजि.

हजरत अली बिन अबु तालीब यांचा जन्म इ.स.599/600 मध्ये झाला. त्यांच्या आई हजरत फातेमा ह्या काबागृहाचा तवाफ करत असतांनाच त्यांची प्रसुती झाली व त्यांनी एका बाळाला जन्म दिला. काबागृह म्हणजे अल्लाहचे घर व अल्लाहच्या घरी जन्मलेल्या बाळाचे नाव अल्लाहची सातत्याने आठवण देणारे असावे, यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या बाळाचे नाव अली ठेवले. ज्याचा शब्दकोशीय अर्थ उदार / उदात्त असा होतो.
    अबु तालीब हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वडील अब्दुल्लाह यांचे सख्खे भाऊ होते व अब्दुल्लाह हे प्रेषित सल्ल. यांच्या जन्माअगोदरच वारल्याने अबु तालीब यांनीच प्रेषित (सल्ल)यांचा प्रतीपाळ केला होता. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. आणि अली रजि. हे चुलतभाऊ होत. हजरत अली रजि. हे प्रेषित सल्ल. पेक्षा 30 वर्षांनी धाकटे होते. मात्र इस्लाम स्वीकारण्यामध्ये जगात त्यांचा चौथा तर मुलात पहिला क्रमांक होता. इस्लाम स्विकारतांना ते अवघे 8 वर्षांचे होते. हजरत अली हे प्रेषित सल्ल. यांचे विश्‍वासू साथीदार व जावाई होते. प्रेषित सल्ल. यांच्या कन्या फातीमा ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत. प्रेषित सल्ल. यांचा त्यांच्यावर एवढा विश्‍वास होता की, मदीनाला हिजरत करताना आपल्या स्थानी त्यांनी अंथरूनावर हजरत अली रजि. यांना झोपविले होते.

हजरत अली रजि. यांचे शौर्य
    शौर्याच्या बाबतीत हजरत अली रजि. व हजरत खालीद इब्ने वलीद रजि. हे इस्लामी इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. त्यातही हजरत अली रजि. यांचे शौर्य अतुलनीय असे होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण अशी दुधारी तलवार होती, जिचे नाव ’जुल्फेखार’ होते. त्या तलवारीपुढे भले-भले गुडघे टेकत. आजकाल प्रसिद्धीच्या झोतात असलेली तुर्की मालिका अर्तुर्गुल गाजी मधील प्रमुख पात्र असलेल्या नायकाच्या तोंडी जो संवाद आहे, त्याबाबतीत अशी अख्यायिका आहे की, ह. अली रजि. संबंधी तो संवाद जन्नतमधील फरिश्ते एकमेकांना बोलताना करत. तो संवाद म्हणजे, ’हजरत अलीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जुल्फेखारपेक्षा चांगली तलवार कोणतीच नाही’ याच तलवारीने हजरत अली यांनी इ.स.624 मध्ये बदरच्या युद्धात कुरैशच्या 30 लोकांना कंठस्थान घातले होते. त्यांच्या या शौर्यामुळेच प्रेषित सल्ल. यांनी त्यांना ’हैदर’ (न हरनारा) ही पदवी प्रदान केली होती. मुस्लिमांच्या सोबत राहून मुस्लिमांविरूद्धच कागाळ्या करणार्‍या मदिना येथील ज्यूंच्या दोन टोळ्या बनू कैनुका यांना इ.स. 625 व बनू कुरैजा यांना 626 मध्ये मदिनाबाहेर घालविण्याची कामगिरीही हजरत अली रजि. यांचीच.
    इ.स.625 मध्ये झालेल्या ओहदच्या लढाईत जरी मुस्लिमांना यश आले नव्हते तरी एकट्या अली रजि. यांनी आपल्या झुल्फेखारने 200 कुरैशींचा खात्मा केला होता. हे ऐतिहासिक सत्य अनेक इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. त्या दरम्यान त्यांच्या शरीरावर 16 जखमा झाल्या होत्या. मदिनातून पिटाळून लावलेल्या ज्यूंनी खैबरमध्ये वस्ती करून तेथील भक्कम असा किल्ला ताब्यात घेऊन मुस्लिमांविरूद्ध पुन्हा कागाळ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. हजरत अबुबकर रजि. व हजरत उमर रजि. यांनासुद्धा तो किल्ला सर करण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्यांनाही तो किल्ला सर करता आली नाही. उलट अनेक बिनीचे शिलेदार त्या मोहिमांमध्ये मृत्युमुखी पडले होते. शेवटी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना या मोहिमेसाठी बोलाविलेे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दोन्ही डोळे सुजून लाल झाले होते. अंगात ताप होता. तशाही परिस्थितीत ते हजर झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांची स्थिती पाहून आपल्या तोंड्यातील लाळ त्यांच्या डोळ्यांत लावली आणि मोहिमेवर रवाना केले. हजरत अली रजि. यांचे डोळे बरे झाले व ते मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी संपूर्ण ताकदीशी खैबरवर हल्ला चढविला. अनेक धडका देऊन खैबरचे मुख्य दारच उखडून टाकले. यात अली रजि. यांनी तीन पराक्रमी ज्यूंना आपल्या जुल्फेखारने कंठस्थान घातले. येणेप्रमाणे खैबर किंण्याची अशक्यप्राय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे खैबर जवळील ’फिदक’ येथील सुपीक जमीन लढाई न करता अली रजि. यांच्या ताब्यात आली. लढाई न करता किंल्यामुळे ही जमीन शरीयतच्या नियमाप्रमाणे प्रेषित सल्ल. यांची मालमत्ता बनली.
    इ.स.630 मध्ये मक्का विजयानंतर काबागृहात ज्या 360 मुर्त्या होत्या त्या फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांची मदत घेतली होती. उंचस्थानी विराजमान मुर्त्यांना तोडण्यासाठी विशेषत: हुबल नावाची मुर्ती फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना आपल्या खांद्यावर उभे करून ती मूर्ती फोडून टाकली होती. इतिहासामध्ये प्रेषितांच्या खांद्यावर पाय ठेवण्याचे सौभाग्य फक्त दोन लोकांच्या वाट्याला आले आहे. उपरोक्त प्रसंगी हजरत अली रजि. यांच्या वाट्याला व काबागृह किंल्यानंतर काबागृहाच्या वर चढून अजान देण्यासाठी हजरत बिलाल यांना आपल्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढण्याचा आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी चढून काबागृहावर उभे राहून अजान दिली होती. इ.स.631 पर्यंत अरबस्थानातील बहुतेक लोकांनी इस्लाम स्विकारलेला होता. न स्विकारणारे जे मुठभर लोक होते त्यांना त्या पवित्र भूमीतून निघून जाण्याचा आदेश कुरआनमध्ये आला होता. ते घोषणापत्र वाचण्याची जबाबदारीही हजरत अली रजि. यांनी पूर्ण केली होती.

हजरत अली रजि. व प्रेषित सल्ल. यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड
    इ.स. 632 मध्ये हज आटोपून मदिनेला परत येतांना खुम-ए-़गदीर येथे प्रेषित सल्ल. यांनी बोलताना सर्वांसमक्ष असे उद्गार काढले होते की, ”अली हे माझ्यासाठी तसे आहेत जसे हजरत हारून अलै. हे प्रेषित मुसा अलै. साठी होते. जो कोणी मला, ”मौला” (मार्गदर्शक) म्हणून स्विकारत आहे त्याने हजरत अली रजि. यांना सुद्धा, ” मौला” म्हणून स्विकारले पाहिजे. हे अल्लाह ! हजरत अलींच्या मित्राचा तू मित्र बन आणि शत्रूंचा शत्रू. ते ज्याला मदत करतील तू त्यांना मदत कर आणि जे त्यांना कमी लेखतील त्यांच्या आशा निष्फळ बनव”. प्रेषित सल्ल. यांच्या या म्हणण्यामुळे मुसलमानांमध्ये एक सामान्य विचार असा दृढ झाला होता की, हजरत अली रजि. हेच प्रेषित सल्ल. यांचे उत्तराधिकारी असतील. शिवाय ते प्रेषित सल्ल. यांचे जावाई असल्यामुळे व प्रेषितांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा दावा हा दावा नसून हक्क आहे, असाही लोकांचा समज होता. त्यातूनच प्रथम खलीफा म्हणून हजरत अबुबकर रजि. यांच्या निवडीला काही लोकांनी विरोध केला होता. नव्हे हजरत अबुबकर रजि. यांच्याविरूद्ध बंड करण्यासाठी उम्मैय्या कुळ गटातील अबु सुफियान सारख्या सरदारांनी हजरत अली रजि. यांना प्रोत्साहित केले होते. पण हजरत अली रजि. हे अत्यंत संयमी व्यक्तीमत्व होते. त्यांनी अशा सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर खलीफा पदाने तीन वेळेस हुलकावणी दिल्यावरही ते शांत राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हजरत फातीमा रजि. यांचा ठाम विश्‍वास होता की जनता हीच त्यांना खलीफा म्हणून निवडेल. तीन्ही वेळेस खलीफा निवडताना हजरत अली रजि. यांचे नाव हे प्रामुख्याने विचारात घेतले गेले होते. तरी परंतु, खलीफा पदाने तीन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली होती. तरी सुद्धा हजरत अली रजि. हे विचलित झालेले नव्हते. तिन्ही खलीफांनी त्यांचा उचित सन्मानसुद्धा राखला होता. पहिल्या दोन खलीफांनी तर त्यांना देशाचे प्रमुख काझी (न्यायाधिश) आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमले होते. तथापि, हजरत उस्मान रजि. यांनी त्यांचे काझी पद कायम ठेऊन सल्लागारपदी दुसर्‍याची नेमणूक केली होती.

चौथ्या खलीफा निवडीची प्रक्रिया
    हजरत उस्मान रजि. यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कुफा, बसरा आणि सिरीयाच्या दोन हजार मुस्लिमांनी मदिनामध्ये घुसून खलीफा उस्मान रजि. यांची हत्या करून मदिना शहर ताब्यात घेतले होते. मदिना मस्जिदीमधील सामुहिक प्रार्थनेचे नेतृत्वही तेच करू लागले. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. लोक आपापल्या घरात बसून होते. त्यांचा सामना करता येत नसल्या कारणाने हजरत उस्मान रजि. यांचे नातलग उमय्यी लोक सिरीयातील अमीर मुआविया रजि. यांच्याकडे निघून गेले होते. अराजक माजल्यामुळे मदिना शहराबाहेरच्या टोळ्यांनी सुद्धा मदिनेत येऊन लुटमार करण्यास सुरूवात केली होती. त्यात पर्शियन व रोमन साम्राज्यातून आलेल्या गुलामांची संख्या मोठी होती. इस्लामी साम्राज्याला राज्यप्रमुखच उरला नव्हता. तीन दिवस झाले तरी खलीफाचे नाव जाहीर झालेले नव्हते. बंडखोरांना परत जावयाचे होते. हजरत अली रजि., हजरत तल्हा रजि. व हजरत जुबेर रजि. यांच्यापैकी एक त्यांना खलीफा म्हणून पाहिजे होता. कारण बंडखोरांमध्येही तीन गट होते. इजिप्तचे, कुफाचे आणि बसराचे तीन गट होते. कुफाच्या बंडखोरांना हजरत जुबेर रजि. तर बसराच्या बंडखोरांना हजरत तल्हा रजि. हवे होते. मात्र इजिप्तच्या बंडखोरांना हजरत अली रजि. हवे होते. चौथ्या दिवशी बंडखोरांचा नेता मलिक बिन अश्तर याने खलीफा निवडीच्या प्रक्रियेची सुत्रे आपल्या हातात घेतली. हजरत अली रजि. यांना त्याने राजकीयदृष्ट्या तुम्हीच खलीफा होणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत अली रजि. यांनी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी पाचव्या दिवशी मलिक बिन अश्तर याने मदिनातील लोकांना मस्जिद-ए-नबवीमध्ये बोलावून खलीफा निवडा नसता अधिक रक्तपात होईल व त्यात तुमच्या सरदारांना उदा. हजरत अली, हजरत तल्हा, हजरत जुबेर रजि. सह अनेक प्रतिष्ठांना ठार केले जाईल, अशी धमकी दिली. तेव्हा लोकांनी मस्जिद-ए-नबवीमध्ये जमा होऊन अली रजि. यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या नावाच्या जयघोष ऐकूण हजरत अली रजि. हे स्वत: मस्जिद-ए-नबवीमध्ये हजर राहिले. हजर लोकांपैकी सर्वांनी त्यांना खलीफा म्हणून जबाबदारी उचलण्याची गळ घातली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मला क्षमा करा, जर तुम्ही अन्य व्यक्तीला खलीफा म्हणून निवडले तर. एकनिष्ठ नागरिक म्हणून मी त्यांच्या आज्ञा पाळण्यास बांधिल आहे. पण जर तुम्हाला मीच हवा असेल तर मी अधीच सांगून ठेवतो की, मी कोणाचे ऐकणार नाही. अल्लाहच्या ग्रंथानुसार व माझ्या न्याय बुद्धीनुसार प्रशासन करेन. सर्वांनी ही अट मान्य केली. तेव्हा हजरत अली रजि. यांनी खलीफा बनण्यास होकार दिला.
हजरत उस्मान रजि. यांच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजे 24 जून 656 रोजी हजरत अली रजि. यांनी सार्वजनिक रित्या झालेल्या एका कार्यक्रमात खलीफा म्हणून सुत्रे स्विकारली. शपथविधी पार पडल्यानंतर हजरत अली रजि. यांनी सर्वांना उद्देशून जे छोटेखानी भाषण केले ते खालीलप्रमाणे – ,” अल्लाहने आपल्याला एक असा ग्रंथ दिलेला आहे की, ज्यात लोकांना मार्गदर्शन व सर्व चांगला व वाईट गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. अल्लाहने बेकायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत, हे ही त्यात नमूद केलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वात मोठी बेकायदेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिमांचे रक्त सांडणे ही होय. अल्लाहने मुस्लिमांना बंधू म्हणून राहण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिम तोच होय जो की इतर मुस्लिमांना हाताने व जिभेने हानी पोहोचवत नाही. अल्लाहच्या आज्ञा पाळा. (संदर्भ : चार आदर्श खलीफा, शेषेराव मोरे, पान क्र. 485. )

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *