Home A स्त्री आणि इस्लाम A घराला घरपण स्त्रीच बहाल करते..!

घराला घरपण स्त्रीच बहाल करते..!

आपण ज्या घरात वास्तव्य करतो त्या घराला घरपण स्त्रीच बहाल करते. एखाद्या व्यक्तीची साधी झोपडी आहे, तिला घरपण एक सुशील सुसंस्कृत स्त्री निर्माण करून देते, तर एखाद्या महालरूपी घराला संस्कारहीन स्त्री ’घर’ राहू देत नाही. म्हणून घराचे घरपण निर्माण होते ते स्त्रीमुळे आणि घरपणाचे अस्तित्व संपुष्टात येते तेदेखील स्त्रीमुळेच. पण इस्लाम सांगतो की स्त्रीने घराला घरपण बहाल केलेच पाहिजे आणि ते तिचे कर्तव्य आहे. एखादे घर बाहेरून प्रचंड शोभिवंत असेल, पण आतमध्ये वास्तव्य करणारे जर सैतानी वृत्तीचे असतील तर त्याला घर म्हणता येत नाही. म्हणून घर म्हणजे नेमके काय आणि ते कोणामुळे निर्माण होते याविषयी थोडे पाहू या.
    ”घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
    तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.”
    या काव्यपंक्तीवरून चार भिंतीचे घर होत नाही तर त्याच घराची माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह यांचा वावर असायला पाहिजे. पोकळ नाती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्या नात्यांमध्ये प्रेमाची उब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची उब मिळत नाही, वात्सल्याची शितलता सुखावत नाही, नात्यांतील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा सुखवत नाही, त्याला घर कसे म्हणायचे? घर भिंती बांधल्याने तयार होत नाही, तर घर त्या घरातील स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांशी असणार्‍या सद्वर्तनाने तयार होते. कारण पूर्णवेळ घराची देखभाल करणारी मुख्य स्त्री घराच्या संसाराचा कणा असते. जसा माणूस त्याच्या पाठीच्या कण्यावर उभा असतो, तसा संसाराचा कणा स्त्री आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याचा आजार झाला तर ती व्यक्ती खाली वाकून चालते अगदी, तसेच स्त्री जर दुबळी, अज्ञानी, अशिक्षित असेल तर प्रपंचही तसाच चालतो. म्हणूनच म्हटले आहे, ”शिकलेली आई घराला पुढे नेई.” इस्लामने तर शिक्षण अनिवार्य केले आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. कसलाही भेदभाव न करता शिक्षण देणे हे अनिवार्य केले आहे. मुलींसाठी शिक्षण व स्त्रीचा फार मोठा सन्मान इस्लामने हजारो वर्षांपूर्वी केला आहे.  अशा अनेक प्रकारे स्त्रियांचा इस्लामने सन्मान केला.
    स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरूद्ध व स्त्रियांच्या गुलामीविरोधात सर्वप्रथम इस्लामने आवाज उठविला. जगात स्त्रियांना उच्च स्थान देणारा अरबस्थान हा सर्वप्रथम देश ठरला. इस्लामच्या तत्वज्ञानात स्त्री-पुरूष दोघांमध्ये थोडाही फरक केला नाही. पुण्य करणारे सर्वच स्वर्गात जातील त्यात कोणताही भेदभाव होणार नाही किंवा अन्याय होणार नाही, मग ती स्त्री असो वा पुरूष. इस्लामने दानधर्म (जकात)  याला महत्त्व दिले आहे. इस्लाममध्ये जी व्यक्ती आपली विधवा व घटस्फोटित मुलीचा सांभाळ करते ते सर्वात मोठे दान आहे. कारण विधवा व घटस्फोटित स्त्रीला आपल्या पित्याशिवाय कोणीही दूसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत तर त्या विधवा, घटस्फोटित सत्रीचा (मुलीचा) सांभळ केल्यास ते सर्वात मोठे दान (पुण्य) ठरते. घटस्फोटित स्त्री वडिलाशिवाय दुसर्‍या कोणाकडे जाऊच शकत नाही. अशा वेळी तिला आधार देण्यासाठी व तिचा सांभाळ करण्यासाठीच या कार्याला पुण्यकार्य म्हटले आहे.
    ”एखाद्या सद्वर्तनी, सुशील (पतिव्रता) स्त्रीवर व्याभिचाराचा तसेच चारित्रहीनतेचा आरोप करणे म्हणजे माणसाला संपविणार्‍या सात गुन्ह्यांपैकी एक आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणार्‍या इसमास कोणत्याही प्रकारची साक्ष गृहीत न धरता 80 फटके मारावेत.” वरील विवेचनावरून हे लक्षात येते की आपल्या स्वार्थासाठी अथवा राग-मत्सरासाठी एखादी व्यक्ती स्त्रीची बदनामी करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करील अथवा आपली मनिषा (इच्छा) पूर्ण करण्यासाठी स्त्रीची बदनामी करून आपला स्वार्थ साधेल, अशा प्रकारचे किस्से होऊ शकतात व एखाद्या चारित्र्य संपन्न, सुशील, सुसंस्कृत निरपराधी स्त्रीची अवहेलना, बदनामी, चारित्र्यहीनता होत असेल किंवा एखादी व्यक्ती तसे भासवत असेल तर त्याला त्याने सादर केेलेली कोणतीही साक्ष मान्य न करता 80 फटके (चाबकाने) मारावेत. ही शिक्षा फर्मावत असताना ज्या स्त्रीवर आरोप कला आहे ती स्त्री सद्वर्तनी (पतिव्रता) आहे का, ते पाहणे जरूरीचे आहे. इस्लामने स्त्री व पुरूषाचे कार्यक्षेत्र जरी वेगवेगळे ठेवले असले तरी स्त्रीला कार्य करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. धर्माच्या मर्यादेत राहून कार्य करणे म्हणजे आपले कार्य नीतीमत्तेला धरून असावे, तसेच ते आपल्या चारित्र्यात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलेे आहे. म्हणून स्त्रियांना कुरआनने शिक्षण अनिवार्य केले आहे. जर एखाद्या स्त्रीने कुरआनचे शिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केले आणि ती म्हातारी होऊन मरण पावली तर ती स्वर्गात गेल्यानंतर तरूण होईल, असे प्रतिपादन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आहे. याच्याच उलट जी स्त्री आपल्या मिळालेल्या आयुष्यात (मृत्यू पश्‍चाताच्या जीवनाची परीक्षा) दांभिकपणे वागेल, बदवर्तन करेल, तिला अंतिम महाप्रलयाच्या दिनी (न्यायनिवाड्याच्या दिवशी) शिक्षा होणारच, यात सुतभरदेखील शंका नाही. एवढेच नाही तर अनेक देवांची उपासना करणे हेदेखील नरकयातनेचे आमंत्रण ठरविले आहे. म्हणून इस्लामने (स्त्री-पुरूष) फक्त आणि फक्त इस्लाम धर्मास मानावे, इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना मानावे, तसेच त्यांचे धर्मांचे आणि मानवजातीस योग्य असणारे सर्व विचार सर्व लोकांपर्यंत पोहचवावेत (फक्त मुस्लिम लोकांपर्यंत नाही), असे करणे पुण्यकर्म समजले जाते. याशिवाय इतर देवांची आराधना करणे, अनेकेश्‍वरत्व जोपासने हेदेखील दांभिक कृत्याच्या बरोबरीचे कृत्य आहे. इस्लाम जसा स्त्रीचा सन्मान करतो तसाच तो त्यांना काही मर्यादादेखील घालतो. सर्व बाबतीत इस्लामने स्त्री-पुरूषांना समान दर्जा देऊनसुद्धा दोघांत स्त्रीचे स्थान उच्च समजावले आहे. आणि जो पुरूष स्त्रीशी अत्यंत आदराने वागतो तो उत्तमोत्तम पुरूष होय. जसे पुरूषांना स्त्रियांशी आदराने वागावयास सांगतो, तसेच स्त्रीलाही दुसर्‍या स्त्रीशी सन्मानाने वागण्याची ताकीद केली आहे. मग ती स्त्री कितीही गरीब वा कितीही श्रीमंत असो, तिने इतर स्त्रियांची टिंगल (चेष्टा) करू नये. आपसात बोलताना टोमने मारू नयेत. एकमेकींचा वाईट नावाने उल्लेख करू नये (शिव्या-शाप), तसेच एकमेकीचीं चहाडी-चुगली करू नये, असे वागणार्‍या स्त्रीचा इस्लाम विरोध करतो. इस्लामने स्त्रीला बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या व वृद्धापकाळात पुत्राच्या संरक्षणात राहण्यास सांगून त्यांच्यासमोर आपली मते मांडण्यास मुभा दिली, तर त्यास पुरूषांनी स्वातंत्र दिले. तसेच तिला गृहकार्यात मुबलक प्रमाणात अधिकार दिले. सर्वच स्त्रिया कपटी, पापी, दोषी, दुर्गुणी असतात असे नाही. त्याचबरोबर विवाह करताना स्त्रीचे वय पुरूषापेक्षा कमीच असले पाहिजे असाही धर्माचा काही संकेत नाही. याचे उदाहरण म्हणजे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे पहिल्या विवाहाच्या वेळी वय 25 वर्षे तर त्यांची पत्नी माननीय खदीजा यांचे वय 40 वर्षे होते. या विवाहामध्ये वधू वरापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठी होती. त्या विवाहास गैर समजले नाही. सारांश, सध्या मुस्लिमांमध्ये (फक्त भारतात) वधू वरापेक्षा लहानच असायला पाहिजे असा जो गैरसमज पसरला आहे तो साफ चुकीचा आहे. कारण वय कमी अधिक असले तरी चालते, मात्र ते संबंध विवाहाच्या माध्यमातून मान्य झालेले असावेत.
    विवाहाने दोघांना (पती पत्नींना) काही अधिकार प्राप्त होतात व ते बजावणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. म्हणजेच स्त्री-पुरूषांचे एकमेकांवर अधिकार आहेत. तसेच वैवाहिक संबंधातूनच झालेली संतती इस्लाम वैध समजतो. संततीचे संगोपन करीत असताना त्या संततीत ईशपरायणता आणि परलोकीचे सृष्टीच्या प्रति शुभचिंतक बनून वृद्धींगत व्हावी. मुलाचे पालनपोषण, संगोपन मुलांशी संवाद करा, त्यांना सदाचार शिकवा, मुलांना रागाऊ नका, त्यांना ताकीद आहे की प्राण्यांनादेखील अपशब्द वापरू नका. मुलांच्या खोट्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करू नका, मुलांना खोटे बोलू देऊ नका, स्वतःही कोणाशी खोटे बोलू नका, मुलांना मारू-झोडू नका, त्यांना शिक्षा करू नका, मुलांवर आरोप करू नका, असे वर्तन आपण आपल्या मुलांशी केले तर ती बिघडणार नाहीत तर चांगलीच घडतील. हे सर्व मुलांना अगदी लहान वयापासून शिकवावे लागते व लहान मुल जास्त काळ आईजवळ असतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियांची आहे. म्हणजे पुरूषांनी काहीही जबाबदारी स्वीकारायची नाही असे नाही.
    सुशील स्त्रीच्या चारित्र्यावर (व्यभिचाराचा) जसा आरोप करायचा नाही याची सूचना इस्लामने केली तसेच स्त्रीने आपले चारित्र्य सांभाळावे. व्याभिचाराचा विचारदेखील मनात यायला नको. व्याभिचार म्हणजे स्त्री-पुरूष यांनी विवाह न करता वैवाहिक जीवन (शारीरिक संबंधासह) जगणे म्हणजेच व्याभिचार होय. व्यभिचार ही अत्यंत वाईट बाब आहे. ती धार्मिकदृष्ट्या पापाची व दुष्कृत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या बाबीला समाजाची मान्यता नाही. उलट ही बाब लज्जास्पद आहे. म्हणून इस्लामने समाजाला व्याभिचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामने विवाह एक धार्मिक विधी जरी समजले असले तरी तो एक करार असून दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. याची सुरूवात सर्वात अगोदर इस्लामने केली आहे.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *