खुरिम बिन फातिक (रजी.) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फजरची नमाज पढविली, आणि लोकांकडे रोख फिरविला तर बसून राहण्याऐवजी प्रेषित (स.) सरळ उभे राहिले आणि तीनदा सांगितले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि शिर्क (अल्लाहसोबत इतरांना- उपासना व आज्ञापालनायोग्य) करणे, दोन्ही कृत्ये समान दर्जाचे अपराध आहेत.’’ नंतर प्रेषित (स.) यांनी पठण केले, ‘‘तर तुम्ही नापाकी (अस्वच्छता, अशुद्धता) अर्थात मूर्ती वगैरेपासून दूर रहा, आणि असत्य (खोटे) बोलण्यापासून दूर रहा, आणि ईश्वरांशी एकचित्त व्हा. अनेक ईश्वरोपासना सोडून एकेश्वरवादाचा अंगीकार करा.’’ (हदीस – अबू दाऊद)
भावार्थ- वरील हदीस कथन करताना, प्रेषितांनी ‘सूरह हज’च्या आयातीचे पठण केले, ज्याचा अर्थ – असत्य कथन सर्वत्र सदैव वाईट आहे असा होतो. असत्य कथन, मग न्यायालयात ‘साक्ष’ देताना असो वा अन्य एखाद्या ठिकाणी. यावरून लक्षात येते की, खोटी साक्ष किती मोठा अपराध, गुन्हा आहे. परंतु मुस्लीमांच्या दृष्टीने हा गुन्हा आता गुन्हा राहिला नाही, किंबहूना एक कलानैपुण्य बनला आहे. त्यांच्या मते ते लोक मूर्ख ठरतात जे न्यायालयात आपल्या जागृत ईमानामूळे खरी साक्ष देतात.
पृथ्वीची साक्ष- माननीय अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी एके दिवशी कुरआनची ही आयत पठण केली, ‘‘यौ मइ़िजन तु हद्दिसु अखबाराहा’’ व नंतर लोकांना विचारले की, ‘‘पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ काय?’’ लोक म्हणालेत की, ‘‘ईश्वर व त्याचे प्रेषितच (स.) जाणतात.’’ प्रेषित (स.) यांनी सांगितले की, ‘‘कयामतच्या दिवशी पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ असा की, ईश्वरासमोर पृथ्वी, स्त्री आणि पुरुषांच्या संपूर्ण कर्माची साक्ष देईल.’’ (हदीस – तऱगीब व तरहीब)
शारिरिक अवयवांची माणसांविरूद्ध साक्ष- माननिय अनस (र.) सांगतात की, आम्ही सगळे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याजवळ बसलो होतो की, प्रेषितांना (स.) हसु फुटले, आणि
आम्हांस प्रश्न केला की, ‘‘तुम्हाला माहित आहे काय, मी का हसलो?’’ आम्ही म्हणालो की ईश्वर आणि प्रेषित (स.) यांनाच माहीत. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘मला हसु यामुळे आले की, कयामतच्या दिवशी एक अपराधी मनुष्य ईश्वरांस म्हणेल की ‘‘हे ईश्वरा! आज माझ्यावर अन्याय तर होणार नाहीना?’’ ईश्वर म्हणेल की, ‘‘होय! आज तुझ्यावर कुठलाच अन्याय होणार नाही.’’ यावर तो म्हणेल की, आज मी कोणालाही आपल्याविषयी साक्ष देण्याची परवानगी देणार नाही. मी स्वत:च माझी साक्ष देईन. ईश्वर सांगेल की, ‘‘आज तू स्वत: आपला हिशोब चुकता करण्यासाठी आणि तुझे कर्म-पत्र तयार करणारे फरिश्ते (देवदूत) साक्षीसाठी पुरेसे आहेत.’’ यानंतर त्याची वाचा बंद करून शरिराच्या संपूर्ण अवयवांना आदेश देण्यात येईल की, तुम्ही याच्या कर्माची साक्ष द्या. यावर त्याचे अवयव त्याच्या एकूण- एक कर्माची साक्ष देतील. नंतर त्याची वाचा उघडून बोलण्याची शक्ती परत करण्यात येईल. यावर ती व्यक्ती आपल्या अवयवांना धिक्कारत म्हणेल की, ‘‘तुमच्यावर ईश्वराचा धिक्कार असो, फटकार असो. जीवनामध्ये मी तुमचा कैवार घेत असे. आणि तुमच्या खातर मी सर्वकाही करीत असे, आणि आज तुम्ही माझ्याच विरूद्ध साक्ष दिली.’’ अर्थात तो म्हणेल, जगांमध्ये अवयवांना सशक्त करण्यासाठी, आराम व मनोरंजनासाठी वाटेल तसे वागलो. हराम, हलाल, बरे, वाईटाची पर्वा केली नाही. व तुम्ही ऐन वेळेवर दगाबाजी करून माझी साथ सोडली.
0 Comments