“उजाड, वैराण, वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद”
कवीवर्य – सुरेश भट.
वरील ओळींवरून प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांची महती लक्षात येते. जगातील कुठल्याही जाती – धर्माच्या विचारी माणसांना प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) भुरळ पाडली होती. ज्यानी इस्लाम स्विकारला केवळ त्यांच्याच मनात मुहम्मदांविषयी (स.अ.व.स) आदर भाव होता असे नव्हे – तर आपल्या स्वत:च्या धर्माशी थोडीही प्रतारणा न करता जगातील बहुतेक साऱ्याच सुशिक्षित आणि विचारी माणसांनी त्यांचे मोठेपण मान्य केलेले आहे. मायकल हार्ट या ख्रिश्चन लेखकाने जगाच्या जडणघडणीवर ज्यांचा विषेश प्रभाव पडला अशा आजपर्यंतच्या 100 महान व्यक्तींवर एक पुसतक लिहले आहे. – ‘द हंड्रेड’ (The Hundred). त्यात त्यांनी या व्यक्तींच्या प्रभावानुसार त्यांची क्रमावारी लावलेली आहे. या क्रमवारीत प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. आपल्या पुस्तकात पैगंबरांना सर्वप्रथम क्रमांक देण्यामागचे कारण सांगतांना मायकल हार्ट म्हणतात की, मुहम्मद (स.अ.व.स) हे धार्मिक व संसारिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये समान रुपाने यशस्वी आहेत. त्यांनी आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या अतिशय मागासलेल्या व दरिद्री समाजामध्ये इस्लामच्या शिकवणीला प्रारंभ करून त्याला एका जागतिक पातळीवरील महान धर्मामध्ये रुपांतरीत केले. त्यांचं व्यक्तीत्व डबक्यासारखं मर्यादित न राहता एखा़द्या खळाळणाऱ्या झऱ्यासारखं होतं. म्हणूनच कवीवर्य सुरेश भट त्यांचा उल्लेख “खळाळणारा झरा मुहम्मद” असा करतात.
प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) तत्कालीन वर्तमानाशी तर झुंजलेच पण त्यांनी दिलेल्या तात्विक व नैतिक बळावर इस्लाम आजही अज्ञान व अत्याचाराच्या अंधाराशी झुंजतो आहे. ज्या मरुक्षेत्रातील सृष्टी पुर्णत: पराभूत होती आणि अंतरआत्मे हारलेले होते. तेथेसुध्दा प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) जिंकले. जन्मत: ज्यांच्या नशीबी मरण केवळ नोंदलेले होते अशा मुलींसाठी ते मुक्तीदाता जाहले. ह्या जगात चांगल्यांना तर सारेच मान देतात पण मुहम्मद (स.अ.व.स) उद्धटांशीसुध्दा नम्रतेने वागले. म्हणूनच ते साऱ्या जगाला भावले. परंतु अंधश्रध्दांवर आधारीत ज्यांची धर्मविक्रीची दुकाने बंद झाली होती, अशांना ते झोंबले सुध्दा !
प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) इस्लामचा प्रसार तात्विक आणि नैतिक बळावर केला. एक गैरसमज नेहमीच इस्लामबद्दल पसरवला जातो की हा धर्म तलवारीच्या बळावर पसरवल्या गेला. कुराण अध्याय २: वचन २५६ मध्ये स्पष्ट बजावतो, “धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही.” याच गोष्टीला अधिक स्पष्ट करतांना कुराण अध्याय १० : वचन ९९ मध्ये सांगतो, “धर्म स्विकारण्याकरीता कोणालाही भाग पाडल्या जाऊ शकत नाही.” त्याच अध्यायात सांगितले आहे, “आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही इमानधारकांना वाचवावे.” त्यासाठी म्हणून प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) हाती खडग धरले होते. त्यांनी तर इतर धर्मीय व इतर उपास्यांना मानणाऱ्यांबद्दल सुद्धा सन्मान ठेवण्यासाठी आपल्या अनुयायांना आज्ञा केली होती. अध्याय ६: वचन १०८ मध्ये स्पष्ट केलेले आहे, “(हे मुस्लीमांनो), हे लोक अल्लाह शिवाय ज्यांचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका.” परंतु दुर्देवाने सध्याच्या काळात सहिष्णुतेची परंपरा असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रात सुद्धा इस्लाम बद्दल गैरसमज निर्माण करून हेतुपुरस्सररित्या द्वेष पासवल्या जात आहे.
प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांनी आयुष्यभर जगाला शांतीचा संदेश दिला. अरबी भाषेत ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘शांती’ असा आहे. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद सारख्या द्वेषाधारित गोष्टींना प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) ठायी मुळीच थारा नाही. कुराण आपल्या अध्याय २: वचन ८४ मध्ये म्हणतो “आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. तुमच्यापैकी जे लोक असे करतील त्यांना ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे नेले जाईल आणि निवाड्याच्या दिवशी त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षेच्या दिशेने नेण्यात येईल.” कुराण अध्याय ५: वचन ३२ मध्ये असे म्हणतो, “ज्याने एखाद्या माणसाला विनाकारण ठार केले तर त्याने जणु काही सर्व मानवांना ठार केले.”
भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरीकांना, मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असोत आपल्या कर्तव्याचे पालन करत असतांनाच आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आजकाल असं करणं म्हणजे जणुकाही देशद्रोहच आहे, असं जाणीव पूर्वक सर्वसामन्य जनतेच्या मनावर बिंबवण्याचा य्रयत्न केल्या जात आहे. विशेषत: हक्कांसाठी संघर्ष करणारी व्यक्ती जर मुस्लीम असेल तर तिच्याकडे ती व्यक्ती देशद्रोहीच आहे की काय अशा नजरेने पाहिल्या जाते. वस्तुस्थिती तर ही आहे की प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) देशद्रोहापासून मुस्लीमांना दूर राहण्याबद्दल सक्त ताकीद दिलेली आहे. ज्या देशात ते राहतात तो देश व तेथील प्रशासन यांच्याशी निष्ठा बाळगण्याचे आदेश त्यांनी दिलेत, मग तो देश इस्लामीक असो की नसो. कुराण अध्याय ४: वचन ५९ मध्ये म्हणतो, “हे मुस्लीमांनो, आज्ञापालन करा त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी असतील.” याचा अर्थ असा नव्हे की नागरीकांनी गुलामांप्रमाणे रहावे. याच वचनात पुढे म्हटल्या गेले आहे, “लोकांना शासक व शासन यांच्याशी मतभेद करण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि आम्ही संवैधानिक पद्धतीने आपल्या हक्कांसाठी लढू शकतो.”
प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) आवश्यकता पडल्यास लढण्याचा जरी आदेश केला असला तरी दोन देशांमधील तहाला फार महत्व दिले आहे. दोन देशांमध्ये जर तह झालेला असेल तर इस्लामिक देशाला कुराण म्हणतो, “संधीचा करार असतांना तुम्ही गैरइस्लामिक देशात राहणाऱ्या मुसलमानांना त्यांनी मागीतल्यावर सुद्धा त्यांची सहाय्यता करू शकत नाही.” (८ : ७२). इस्लाम पुढं कुराणच्या माध्यमातून असं म्हणतो, “जे तुमच्याशी लढतात आणि तुमच्या शत्रूंची मदत करतात त्यांच्या सेाबत मित्रता होऊच शकत नाही.” (६० : ९). ह्या कुराण वचनांवर एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की कोणताही खरा मुसलमान अशा कुठल्याही मुस्लीम देशाशी (मग तो पाकिस्तान असो की दुसरा कोणताही) केवळ तो देश मुस्लीम आहे म्हणून आपल्या देशाशी गद्दारी करून मैत्री करूच शकत नाही. भारतीय मुस्लीमांवर कोणीही त्यांच्याबद्दल भय निर्माण करून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करूच शकत नाही. देशद्रोह प्रेषित मुहम्मदाच्या (स.अ.व.स) शिकवणीत बसतच नाही.
प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) हे खरे स्त्रिवादी होते. इस्लाम हा जगातील पहिला धर्म आहे, ज्याने स्त्रियांना शिक्षण आणि वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार दिला. प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) आधी अरबस्तानात मुलीने जन्म घेताच तिला जमिनीत जीवंत पुरण्याची क्रूर प्रथा होती. या अमानवीय प्रथेच्या विरोधात प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) बंड पुकारून ही प्रथा बंद पाडली आणि तेथील लोकांना भृणहत्या करण्यापासून परावृत केले, कुराण म्हणतो, “गरीबीच्या कारणास्तव आपल्या संततीला मारून टाकू नका.” प्रेषित मुहम्मदांच्याच (स.अ.व.स) प्रेरणेने संपूर्ण इस्लामी जगतात स्त्रिशिक्षणाचा प्रसार झाला. एकच उदाहरण पुरेसे होईल: जगातील पहिले महिला विद्यालय इ. स. ८५९ मध्ये मोरोक्को येथे फातिमा अल फीहरी या मुस्लीम महिलेने स्थापन केले. विधवा-विवाहाची परवानगी देणारा इस्लाम हा जगातील बहुतेक पहिला धर्म असावा. प्रेषित मुहम्मदांनी वयाच्या २५ व्या वर्षी एका ४० वर्षाच्या विधवेशी लग्न करून आपल्या अनुयायांच्या समोर एक उदाहरण ठेवले. समाजातील गरीब, विधवा, परित्यक्ता, गुलाम, स्त्रियांच्या भरणपोषणाची जबाबदारी प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) तत्काली शासन कर्त्यांवर टाकली होती.
साडे चौदाशे वर्षे लोटलेली असली तरीही मुहम्मद (स.अ.व.स) नावाचा ‘खळाळणारा झरा’ अजूनही कोट्यावधी लोकांच्या हृदयात खळाळतो आहे. म्हणूनच कवीवर्य कलीम खान सर्वशक्तीमानाला एक मागणी मागतात.
“बुद्धीस दे विज्ञान पण हृदयामध्ये कुरआन दे
माझा मुहम्मद वेगळा, त्याची फकीरी शान दे.”
– समीना खालीक शेख (यवतमाळ)
७३५०२४८२३८
0 Comments