जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)
या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.
“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)
0 Comments