भावार्थ
ही ‘हदीस’ ‘वाअतसिमु बि हब्लिल्लाही जमीआ’ (ईश्वराच्या दोरीस मजबूतीने पकडा) चे उत्तम वर्णन आहे. अल्लाहने त्याच्या ग्रंथास ‘हब्लिल्लाह’ म्हंटले आहे, म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचणे, त्याची प्रसन्नता मिळविणे आणि वर्तमान जग व परलोक, दोन्हीमध्ये त्याची कृपा मिळविण्याचे एकमेव साधन कुरआन हेच आहे.
रमजानचे रोजे आणि तराविह
माननिय अबु हुरैरा (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने रमजान महिन्याचे रोजे (उपवास) फर्ज (अनिवार्य) केलेत, आणि मी स्वत: तुमच्याकरीता ‘तरावीह’च्या नमाजची तजवीज केली. अर्थात जे लोक रमजानचे रोजे धरतील आणि तरावीहची नमाज श्रद्धापूर्वक आणि पारलौकीक मोबदल्याच्या उद्देश्याने पढतील, ते लोक त्यांच्या पापापासून असे पवित्र होतील जणू ते आजच जन्मलेत व त्यांच्यावर कोणतेही पाप नाही.’’ (संदर्भ : तरगीब)
भावार्थ
उपरोक्त हदीसमध्ये ‘कयाम’चा शब्दप्रयोग झाला ज्यापासून तरावीहची नमाज अभिप्रेत आहे. जो कोणी मोमीन (श्रद्धावंत) असेल व पुण्यकर्माच्या उद्देश्याने रोजा आणि तरावीह नमाज, हे दोन्ही कर्म रमजानमध्ये करेल, त्याचे सर्व पाप (गुन्हे) धुतले जातील. मात्र मानवांचे व इतरांचे जे आपणांवर अधिकार आहेत (हुकुकूल इबाद) ज्याची आपणाकडून पायमल्ली होण्याचे पातक घडले असेल, ते मात्र अधिकार दिल्याशिवाय, हे पातक माफ होणार नाही. कमीत कमी ज्याचा हक्क आपण गिळंकृत केला आहे, त्याने स्वखुषीने तो माफ करावा.
रमजानचे महत्त्व
ह. सलमान फारसी (रजी.) द्वारे उल्लेखित आहे की शाबान महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी प्रवचन दिलं. प्रेषित म्हणाले, ‘‘हे लोकांनो! एक मोठा महान समृद्धशाली महिना (रमजान) जवळ येऊन ठेपला आहे. तो असा महिना आहे की, ज्यामध्ये एक रात्र हजार महिन्यापेक्षा उत्तम आहे सर्वश्रेष्ठ अल्लाहने या रमजानमध्ये रोजा राखणे फर्ज कर्तव्य ठरविले आहे. तसेच या रमजानच्या रात्रीमध्ये तरावीह नमाज पढणे नफ्ल (अनिवार्य नसलेले) ठरविले आहे. (अर्थात ‘सुन्नत’ आहे, ज्यास अल्लाह पसंत फर्मावितो). जो मनुष्य या महिन्यात एखादे सत्कर्म आपल्या राजीखुषीने करेल तर रमजानव्यतिरिक्त इतर महिन्यातील फर्ज अदा केल्याप्रमाणे आहे. जो या महिन्यात फर्ज अदा करेल तर रमजान व्यतिरिक्त इतर महिन्यातील फर्जपेक्षा सत्तरपट फर्ज अदा केल्याचे पूण्य लाभेल. रमजान हा धीर, संयमाचा महीना आहे. सब्र (सबूर) चा मोबदला जन्नत आहे. हा महिना गोरगरीब व गरजवंत लोकांशी सहानुभूती दाखवण्याचा महिना आहे. (हदीस – मिश्कात)
भावार्थ
‘धीर संयमाचा महिना’ म्हणजे श्रद्धावंतांला अल्लाहच्या मार्गात अढळ राहण्याचे व आपल्या इच्छा अभिलाषांवर काबू प्राप्त करण्याचे प्रशिक्षण या महिन्यात दिले जाते. मनुष्य ठराविक वेळेपासून, दुसऱ्या ठराविक वेळेपर्यंत सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या आदेशानुसार न खातो, न पितो, ना आपल्या पत्नीशी सहवास करतो. अशाने त्याच्या अंगी अल्लाहची आज्ञापालनाची सवय निर्माण होते. अशाने मनुष्य अभ्यस्त होतो की प्रसंग पडल्यास तो आपल्या भावना, इच्छा, तहान व भुकेवर किती नियंत्रण राखू शकतो. जगात श्रद्धावंताचे उदाहरण युद्धभूमीवरील सैनिकासमान आहे. ज्याला सैतानी इच्छा, अभिलाषा (अपप्रवृत्ती) आणि दुराचारी शक्तीशी लढावयाचे आहे. जर त्याच्या अंगी संयमाचा गुण नसेल तर हल्ल्याच्या सुरूवातीलाच तो स्वत:ला शत्रुच्या हवाली करील.
0 Comments