वाचकाने सर्वप्रथम कुरआनची वास्तवता जाणून घेतली पाहिजे. वाचकाने, या ग्रंथावर आपले इमान आपली श्रद्धा ठेवो अथवा न ठेवो, परंतु हा ग्रंथ समजून घेण्यासाठी, त्याला या ग्रंथाची वास्तवता स्वीकारावी लागेल. या ग्रंथाला प्रस्तुत करणाऱ्याने (अर्थात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी) ती सांगितलेली आहे. ती वास्तवता अशी आहे,
(१) विश्वस्वामी, जो सबंध सृष्टीचा निर्माणकर्ता आणि मालक व शासकही आहे. त्याने अनंत व असीम अशा त्याच्या राज्यातील या विभागात त्याला पृथ्वी म्हणतात, मानवाला निर्माण केले आहे. त्याला जाणण्याच्या, विचार करण्याच्या व समजून घेण्याच्या शक्ती दिल्या आहेत. मानवाला त्याने भल्या व बुऱ्यातील ओळख दिली आहे. त्याला निवडीचे व इराद्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विनियोगाचे अधिकारही त्याला दिलेले आहेत. असे एकंदरीतपणे मानवाला त्याने एकप्रकारची स्वायत्तता देऊन पृथ्वीवर आपला खलीफा (नायब) बनविलेला आहे.
(२) मानवाला सदरहू पदावर नियुक्त करताना विश्वस्वामीने चांगल्या प्रकारे त्याची कानउघाडणी केली व त्याच्या लक्षात आणून दिले की तुमचा व सर्व जगाचा मालक, उपास्य आणि शासक मीच आहे. माझ्या या राज्यात तुम्ही स्वतंत्रही नाही व इतर कुणाचे दासही नाही. तसेच माझ्याव्यतिरिक्त इतर कोणीही आज्ञापालनास, बंदगी आणि पूजा, उपासनेस पात्रही नाही. जगातील हे सर्व जीवन ज्यात अधिकार देऊन तुम्हाला पाठविले जात आहे, वास्तविकपणे तुमच्यासाठी परीक्षेचा कालावधी आहे. त्यानंतर तुम्हाला माझ्याकडे परत यावे लागेल व मी तुमच्या कामाची तपासणी करून निर्णय देईन की तुमच्यापैकी कोण परीक्षेत यशस्वी झाला आहे व कोण अयशस्वी ठरला आहे. तुमच्यासाठी योग्य वर्तन हेच आहे की आपला एकमेव उपास्य आणि शासक तुम्ही मलाच माना. जे मार्गदर्शन मी पाठवीन त्यानुसार जगात काम करा आणि जगाला परीक्षाक्षेत्र समजून विवेकानिशी जीवन व्यतीत करा. तुमचे खरे उद्दिष्ट, माझ्या अंतिम निर्णयात यशस्वी ठरणे आहे. याउलट तुमच्याकरिता ते प्रत्येक वर्तन चुकीचे व अयोग्य आहे जे याविरूद्ध असेल. जर पहिल्या वर्तनाचा तुम्ही अवलंब कराल (ज्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे) तर तुम्हाला जगात शांती व समाधान प्राप्त होईल. जेव्हा परतून तुम्ही माझ्याजवळ याल तेव्हा मी तुम्हाला चिरसुखाचे व आनंदाचे ते घर देईन ज्याचे नाव जन्नत (स्वर्ग) आहे. परंतु जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने चालाल (ज्यावर चालण्याचेही तुम्हाला स्वातंत्र्य आहे) तर जगात तुम्हाला उपद्रव आणि अशांततेचा आस्वाद घ्यावा लागेल. जेव्हा जगातून निघून तुम्ही परलोकात याल तेव्हा चिरदु:ख व संकटांच्या त्या खाईत तुम्ही लोटले जाल जिचे नाव दोजख (नरक) आहे.
(३) अशा प्रकारे समजावून सृष्टीच्या स्वामीने मानवजातीला भूतलावर जागा दिली. मानवजातीच्या प्रथम व्यक्तींना (आदम व हव्वा) ते मार्गदर्शनही देऊन टाकले ज्यानुसार त्यांना व त्यांच्या संततीला पृथ्वीतलावर काम करावयाचे होते. ही प्रथम माणसे अज्ञान आणि अंधकाराच्या स्थितीत निर्माण झाली होती असे नाही तर ईश्वराने जमिनीवरील त्यांच्या जीवनाचा प्रारंभ पूर्ण प्रकाशात केलेला होता. वस्तुस्थितीही त्यांना माहीत होती. त्या माणसांना त्यांचा जीवनकायदा सांगितलेला होता. ईशआज्ञापालन (अर्थात इस्लाम) हीच त्याची जीवनपद्धती होती. आपल्या संततीलाही त्यांनी शिकविले होते की त्याने ईश्वराचे आज्ञाधीन (मुस्लिम) बनून राहावे. परंतु नंतरच्या शतकात हळूहळू त्या खऱ्या जीवनपद्धतीपासून (दीन-धर्मापासून) विमुख होऊन माणसे निरनिराळ्या प्रकारच्या चुकीच्या वर्तनाकडे निघाली. त्यांनी गाफील होऊन त्या खऱ्या जीवनपद्धतीला हरवूनही टाकले आणि खोडसाळपणा करून तिला विकृतही केले. त्या माणसांनी ईश्वराबरोबर पृथ्वी व आकाशातील विभिन्न मानवी व अमानवी, काल्पनिक आणि भौतिक अस्तित्वांना ईशत्वात भागीदार ठरवून घेतले. ईश्वराने दिलेल्या सत्य ज्ञानात (अलइल्म) नाना तNहेच्या भ्रामक कल्पनांची आणि दृष्टिकोनांची व तत्त्वज्ञानाचीही भेसळ करून त्यांनी असंख्य धर्म घडवून आणले. त्या लोकांनी, ईश्वराने ठरवून दिलेल्या न्यायपूर्ण नैतिक नियमांना व संस्कृतीला (शरियतला) सोडून दिले. त्यांना विकृत करून आपल्या मनोवासनांनुसार आणि आपल्या पूर्वग्रहदोषानुसार जीवनाचे असे कायदे रचून घेतले. त्यामुळे ईश्वराच्या भूमीवर सर्वत्र अन्याय व अत्याचार माजला.
(४) ईश्वराने मानवाला मर्यादित स्वरूपाची स्वायत्तता दिली आहे तिच्याशी हे सुसंगत नाही की त्याने आपल्या सर्जनात्मक हस्तक्षेपाचा उपयोग करून त्या बिघडलेल्या माणसांना जबरदस्तीने योग्य वर्तनाकडे आणावे. जगात काम करण्यासाठी जी सवड मानवजातीला व विविध राष्ट्रांना जो कालावधी त्याने ठरवून दिलेला होता त्याच्याशीदेखील हे सुसंगत नव्हते की अशा प्रकारची बंडाळी उत्पन्न होताक्षणीच त्याने माणसांना नष्ट करून टाकावे. याशिवाय निर्मितीच्या प्रारंभापासून ईश्वराने माणसांच्या स्वायत्ततेला अबाधित ठेवले. त्यांच्यासाठी ठरलेल्या कार्यकालावधी दरम्यान तो त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था करीत राहिला आहे. तद्नुसार स्वत: होऊन घेतलेली आपली सदरहू जबाबदारी पार पाडण्यासाठी ईश्वराने मानवांपैकीच अशा माणसांना उपयोगात आणणे सुरू केले जे त्याच्यावर इमान बाळगणारे व त्याच्या इच्छेचे अनसुरण करणारे होते. ईश्वराने अशा माणसांना आपले प्रतिनिधी बनविले.
आपला संदेश त्यांच्याजवळ पाठविला, त्यांना वास्तवतेचे ज्ञान दिले. त्यांना खरा जीवनकायदा प्रदान केला व अशा प्रतिनिधींना या कामासाठी त्याने नियुक्त केले की त्यांनी आदमच्या संततीला त्याच सरळ मार्गाकडे परतण्याचे आवाहन करावे ज्यापासून ती भरकटली होती.
(५) असे पैगंबर निरनिराळ्या समाजांत व देशांत येत राहिले. हजारो वर्षांपर्यंत त्यांच्या आगमनाचा क्रम सुरू होता. हजारोंच्या संख्येत त्यांची नियुक्ती झाली. त्या सर्वांचा धर्म एकच होता, अर्थात तीच खरी जीवनपद्धती जी प्रथमदिनीच मानवाला सांगितलेली होती. ते सर्व पैगंबर एकाच मार्गदर्शनाचे अनुयायी होते. अर्थात नीती, सदाचार आणि उद्दिष्टही तेच अनादी व अनंत. नियम व तेच तत्त्वज्ञान जे प्रारंभीच माणसासाठी योजलेले होते. त्या सर्व पैगंबरांचे ध्येय व उद्दिष्टही एकच होते. म्हणजे त्याच एका धर्माकडे व मार्गदर्शनाकडे मानवजातीस आवाहन करावे. जे आवाहन स्वीकारतील त्यांना संघटित करून एक असे राष्ट्र (उम्मत) बनवावे जे स्वत:ही अल्लाहचे कायदे पाळणारे असतील आणि जगातही ईशकायद्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व त्या कायद्यांची अवज्ञा रोखण्यासाठी झटणारे असतील. सदरहू पैगंबरांनी आपापल्या कारकिर्दीत आपले उद्दिष्ट पूर्ण क्षमतेनिशी पार पाडले. परंतु नेहमी असेच घडले की माणसांची एक मोठी संख्या तर त्यांचे आवाहन स्वीकारण्यास तयारच झाली नाही. ज्यांनी ते आवाहन स्वीकारून ‘उम्मते मुस्लिम’ (मुस्लिम राष्ट्र) चे स्वरूप धारण केले तेही स्वत: हळूहळू बिघडत गेले. इथपावेतो की त्यांच्यापैकी काही राष्ट्रांनी ईशमार्गदर्शन पूर्णपणे हरवून टाकले, तर काहींनी ईशवचनांत व आदेशात स्वहस्ते फेरफार आणि भेसळ करून त्यांना विकृत करून टाकले.
(६) सरतेशेवटी विश्वस्वामीने (अल्लाहने) अरबभूमीत पैगंबर मुहम्मद (स.) यांना त्याच कामासाठी नियुक्त केले ज्यासाठी पूर्वीचे पैगंबर येत असत. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन सर्व मानवजातीला होते त्यात पूर्वीच्या पैगंबरांचे मार्गभ्रष्ट अनुयायीही होते. सर्वांना खऱ्या व योग्य जीवनपद्धतीचे आवाहन करणे, सर्वांना पुनरपि ईशमार्गदर्शन पोहोचविणे व जे सदरहू आवाहनाचा व मार्गदर्शनाचा स्वीकार करतील त्यांचे एक असे राष्ट्र बनविणे हे त्यांचे काम होते. त्या राष्ट्राने एकीकडे स्वत:च्या जीवनाची व्यवस्था ईशमार्गदर्शनानुसार उभी करावी तर दुसरीकडे जगाच्या सुधारणेसाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. याच आवाहनाचा व मार्गदर्शनाचा ग्रंथ, हा कुरआन आहे. अल्लाहने तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित केला आहे.
कुरआनची वास्तवता
संबंधित पोस्ट
0 Comments