Home A प्रेषित A ‘उहुद’च्या युद्धानंतरची परिस्थिती

‘उहुद’च्या युद्धानंतरची परिस्थिती

‘बद्र’च्या विजयाच्या प्रभावात कमी येणे आणि काही रूढीवादी कबिल्यांचे इस्लामद्रोही कबिल्यांकडे आकर्षित होणे हे ‘उहुद’च्या युद्धानंतर स्वाभाविक होते. अपराधी वृत्ती आणि उपद्रवी तत्त्वांत वाढ होऊ लागली. ‘उहुद’ युद्धानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीस ‘मदीना’ शहरास आवर घालणे केवळ यामुळे शक्य झाले की, मुस्लिम समुदाय आणि आंदोलनाचे नेतृत्व अतिशय खंबीर होते. प्रत्येक उपद्रव सक्तीने निपटून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली.
सर्वप्रथम ‘खुवैलद’ याची दोन मुले ‘तलहा’ आणि ‘सलमा’ यांनी ‘असद बिन खुजैमा’ यास ‘मदीना’ शहरावर डाका टाकण्यासाठी प्रेरित केले. हिजरी सन चारच्या ‘मोहर्रम’ महिन्याची पहिली तारीख उजाडली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘माननीय अबू सलमा मखजुमी(र)’ यांच्या नेतृत्वात दिडशे जणाची टोळी तयार करून उपद्रवग्रस्त भागात रवाना केली. या तुकडीस पाहताच उपद्रव्यांनी पळ काढला. तुकडीप्रमुखाने उपद्रव्यांनी लुटलेला सर्व माल शासकीय खजिण्यात जमा केला.
चार आठवड्यांनंतर एक भयानक घटना घडली. सफर महिन्याच्या सुरुवातीस ‘अज्ल’ आणि ‘कारा’ कबिल्याचे लोक एक भयानक गुप्त कारस्थान रचून मदीना शहरी आले. त्यांनी प्रेषितांना विनंती केली की, आमच्या भागातील काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणाच्या बंदोबस्तासाठी काही शिक्षक पाठविण्यात यावेत. प्रेषितांनी दहा शिक्षकांना ‘माननीय अमीर मरसद(र)’ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत पाठविले. शिक्षकवर्गाचा हा काफिला ‘रजीअ’ या स्थळावर पोहोचताच कारस्थान्यांनी या दहा शिक्षकांपैकी आठ जणांना ठार कलेआणि दोन शिक्षकांना ‘कुरैश’जणांना विकले की, जेणेकरून त्यांनी त्यांचा बदला घ्यावा आणि त्यांची हत्या करावी.
ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक घटना होती. कमी संख्येत असलेल्या मुस्लिम समुदायापैकी असलेल्या काही ज्ञानी वृत्तीच्या लोकांची निवड करून प्रेषित मुहम्मद(स) लोकांच्या शिक्षण-प्रशिक्षणांची व्यवस्था करीत असत आणि याच महत्त्वाच्या असलेल्या शिक्षकजणांना ठार केल्यावर प्रेषितांवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल!
मागील एका घटनेत ‘अबू सुफियान’ ने ‘तनमीअ’ च्या युद्धभूमीवर ‘माननीय जैद(र)’ यांना शहीद केले. ठार करण्यापूर्वी त्यांना ‘अबू सुफियान’ ने विचारले होते, ‘‘हे जैद(र)! तुम्हाला हे आवडेल काय की, तुम्हाला आम्ही सोडून देऊ आणि तुमच्या ठिकाणी मुहम्मद(स) यांचा गळा कापू?’’ आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे ‘माननीय जैद(र)’ यांनी आपल्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले,
‘‘ईश्वराची शपथ! मला तर हे देखील आवडणार नाही की, आमच्या प्राणांच्या बदल्यात आदरणीय प्रेषितांच्या पायात केवळ काटा सुद्धा रुतावा!’’ अर्थात त्यांच्या पायात काटा रुतणेसुद्धा आम्हास मुळीच आवडणार नाही. त्यासाठी आम्हाला आमच्या प्राणाचे बळी गेलेलेसुद्धा चालेल! हे ऐकून ‘अबू सुफियान’ म्हणाला, ‘‘मी कोणालाच एवढे प्रेम करताना पाहिले नाही, जेवढे प्रेम मुहम्मद(स) यांचे अनुयायी त्यांच्यावर करतात!’’
माननीय खब्बाब(र) यांना सुळावर लटकाविण्यात आले. सुळावर चढण्यापूर्वी त्यांनी दोन रकअत नमाज अदा करण्याची आपली इच्छा व्यक्त केली, जी त्यांना मिळाली. त्यांची हीच दोन रकअत नमाज नंतरच्या काळात अत्याचारपीडितांची परंपरा ठरली.
‘रजीअ’ येथील शिक्षकांच्या भयानक हत्याकांडाची घटना ताजी होती आणि त्याचा घावसुद्धा ताजाच होता की, ‘नज्द’च्या भागातून ‘अबू बरा बिन मालिक’ मदीना शहरी आला. त्याने अतिशय निष्ठापूर्वक पद्धतीने प्रेषितांना सल्ला दिला की, ‘काही अनुयायांना ‘नज्द’च्या प्रदेशात इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी पाठवावे.’ आदरणीय प्रेषितांनी होकार दिला. त्या प्रदेशात इस्लाम प्रचाराची प्रेषितांची मनःपूर्वक इच्छा होती. त्याची बरीच कारणे होती. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्तर शिक्षकांची टोळी प्रचारकार्यासाठी रवाना केली. या टोळीत कुरआन जाणणारे विद्वान आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षक होते. ‘नज्द’ हा प्रदेश मोठा असल्याने त्यानुसार प्रशिक्षकांची मोठी टोळी रवाना करण्यात आली. ‘बरे मनुआ’ ठिकाणी या शिक्षकवर्गावर अचानक हल्ला चढवून त्यांना शहीद करण्यात आले. परंतु या सत्तर शिक्षकांपैकी ‘माननीय काब बिन जैद(र)’ यांना शहीद झाल्याचे समजून सोडून देण्यात आले. ते बेशुद्धावस्थेत पडलेले होते. शुद्धीवर आल्यावर ते जखमी आवस्थेत मदीना परतले आणि दुःखी अंतःकरणाने प्रेषितांना संपूर्ण वृत्तांत कळविला.
या हत्याकांडाचे वृत्त कळताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे दुःख अनावर झाले. सतत दोन वेळा अशा प्रकारचे धोक्याने हत्याकांड घडले. अतिशय असह्य दुःखाने विचलित होऊन प्रेषितांनी आपल्या लाडक्या अनुयायांच्या खुन्यांना फज्रच्या (सकाळच्या) नमाजमध्ये श्राप दिला. याच श्रापाला ‘कुनूत-ए-नाजला’ म्हटले जाते.
परंतु ईश्वराने प्रेषितांना श्राप देण्याची मनाई केली. कोणाचेही शुभचितन आणि अनिष्ट चितनाची इच्छा पूर्ण करण्याचा अंतिम अधिकार शेवटी ईश्वरालाच आहे. ईश्वराची मर्जी अशी असावी की कदाचित पुढे चालून याच खुनी कबिल्यात इस्लामचा स्वीकार होईल.
अशा हृदयविदारक घटना घडूनही प्रेषित किचितही निराश झाले नाहीत. त्यांनी आपले आंदोलनकार्य जोमाने सुरु ठेवले. इकडे मदीना शहरातसुद्धा उपद्रव माजविणार्यांची कमतरता नव्हती. अर्थशक्ती, शेतीवाडी आणि तटबंदीच्या बळावर हे लोक उपद्रव माजवित असत. आदरणीय प्रेषितांचा विरोध करणार्यांपैकी ‘नजीर’ परिवार जास्त मस्तीत होता. त्यांनी प्रेषितांची हत्या करण्याचा कट रचण्याइतकी मजल मारली होती. या उघडउघड बंडखोरीमुळे ‘मदीना समझोता’ कराराच्या नियमानुसार प्रेषितांनी त्यांना दहा दिवसाच्या आत मदीना सोडण्याची सुचना देऊन टाकली. परंतु दांभिकांचा सरदार ‘इब्ने उबै’ याने ‘नजीर’ परिवारजणांना मोठे लष्करी सहाय्य देण्याचे वचन देऊन प्रेषितांविरुद्ध उत्तेजित केले. त्यांनी प्रेषितांना आव्हान देण्याच्या स्वरुपात प्रेषितांची मदीना सोडण्याची सूचना धुडकावली. आदरणीय प्रेषितांनी त्यांना धडा शिकविण्यासाठी चौथ्या हिजरी सनातील रबीऊल अव्वलच्या महिन्यात ‘नजीर’ कबिल्याचा घेराव केला. ‘इब्ने उबै’ या दांभिकाने कोणतेच लष्करी सहाय्य ‘नजीर’ कबिल्याच्या रक्षणार्थ पाठविले नाही आणि शेवटी विवश होऊन ते शहर रिकामे करून ‘खैबर’ या ठिकाणी निघून गेले. आदरणीय प्रेषितांनी कोणासही इजा दिली नाही. उपद्रवी लोकांना आपापल्या घरातील सर्व संपत्ती घेऊन जाण्याची परवानगी देण्याचा प्रेषितांनी दयाळूपणा दाखविला. प्रेषितांचा हाच दयापूर्ण स्वभाव आणि कृपाळू वर्तन पाहून त्या कबिल्यातील ‘यामीन बिन उमैर’ आणि ‘अबू सईद बिन वहब’ यांनी इस्लामचा स्वीकार केला.
‘नजीर’ परिवाराचे प्रकरण मिटविल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) काही दिवस मदीनातच राहिले. ‘जमादिल उला’ महीन्याच्या सुरुवातीस खबर मिळाली की, ‘गतफान’ येथील ‘मुहारिब’ आणि ‘सालबा’ कबिले मदीनावर हल्ल्याची तयारी करीत आहेत. प्रेषित मुहम्मद(स) यांनी तत्काळ आपले लष्कर घेऊन निघाले. ‘नज्द’पर्यंत पोहोचल्यावर शत्रूपक्षाने लढाई न करताच आत्मसमर्पण केले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या युद्धानीतीचा हा आदर्श नमुना आहे की, अतिशय कठीण परिस्थितीतही अगदी लहानसहान प्रकारच्या युद्धाच्या चेतावणीवरसुद्धा ते तयार राहिले. याच्याच परिणामस्वरुप विद्रोही शक्तींना आत्मसमर्पण करावे लागले. त्यांना थोडी जरी विद्रोहाची संधी मिळाली असती तर प्रत्येक बाजूने उठणार्या या बंडास ठेचून काढणे कठीण झाले असते.
‘अबू सुफियान’ या मक्काच्या सरदाराने ‘उहुद’च्या युद्धप्रसंगीच चेतावणी दिली होती की, ‘तुमचा आमचा पुढील सामना ‘बद्र’च्या मैदानावर पुढील वर्षी होईल. त्याने प्रेषितांना आव्हान दिलेले होते. तरीदेखील त्याला युद्धाची हिमत होत नव्हती. प्रेषितांचा मुकाबला केल्यावर युद्ध जिकण्याची शाश्वती तर नव्हतीच, उलट त्याच्या मनात भीतीचे काहूर माजलेले होते. त्याला मनापासून वाटत होते की, प्रेषितांचे लष्कर ‘बद्र’च्या युद्धभूमीवर आपल्याशी युद्ध करण्यास न आलेलेच बरे. याकरिता त्याने योजना आखली व त्याप्रमाणे काही संपत्ती देऊन ‘नईम बिन मसऊद’ यास मदीना रवाना करून खोटा प्रचार करविला की, ‘कुरैश’ अतिशय प्रचंड लष्करासह प्रेषितांच्या मुकाबल्यासाठी येत आहे. म्हणून मदीनावासीयांनी प्रेषितांच्या समर्थनार्थ घराबाहेर निघू नये. ‘अबू सुफियान’ने करविलेल्या प्रचाराचा परिणाम अगदी उलटा झाला. मुस्लिम समुदायाने युद्धासाठी कंबर कसली. आदरणीय प्रेषितांनी १५०० योद्धे सोबत घेतले आणि ‘बद्र’च्या युद्धभूमीकडे कूच केले. लष्कराचा झेंडा ‘माननीय अली(र)’ यांच्या हातात होता. दुसरीकडे ‘अबू सुफियान’ हा दोन हजारांचे लष्कर घेऊन आला, परंतु लढण्याचे धैर्य नसल्याने ‘अस्फहान’ या ठिकाणाहून दुष्काळाचे निमित्त करून लष्करासह परत गेला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) एक आठवडाभर ‘बद्र’च्या युद्धभूमीवर त्याची वाट पाहात थांबले आणि आपल्या लष्करासोबत मदीनास परतले. अशा प्रकारच्या या लष्करी कारवाया करणे आवश्यकच होत्या. कारण नवजात असलेले इस्लामी राज्य आणि इस्लामी समाजव्यवस्था टिकविणे याशिवाय शक्य नव्हते. शिवाय सामरिक कार्याबरोबरच रचनात्मक आणि सुधारात्मक कार्यसुद्धा चालूच होते.
याच कार्यकाळात दारू आणि जुगार निषिद्ध असण्याचा ईश्वरी आदेश अवतरला. दारू आणि जुगार या कर्मांना अपराध घोषित करण्यात आले. कारण या दोन्ही बाबीं समाजात उपद्रव निर्माण करण्याची कारणे होत. हीच कारणे पुढे करून ईश्वराने आपल्या प्रेषितांकरवी दिव्य कुरआनात मुस्लिम समुदायास हाक दिली की, ‘‘तुम्ही या कुकर्मांचा त्याग करणार नाही काय?’’ ईश्वराच्या या हाकेवर संपूर्ण मुस्लिम समुदायाने एकाच वेळी या दोन्ही कर्मांचा त्याग केला. दारू निषिद्ध होण्याचा आदेश अवतरित होताच मदीना शहरात दवंडी देऊन सूचना देण्यात आली. ‘माननीय अबू तलहा(र)’ यांच्या घरी मद्यपान सभा चालू होती. मित्रमंडळी दारूचे प्याले गळ्यात रिचवित होते. परंतु दारु निषिद्ध होण्याच्या दवंडीचे स्वर कानावर पडताक्षणी… ज्यांच्या हातात दारूचे प्याले होते, त्यांनी हातातून फेकून दिले. घरात असलेल्या विविध प्रकारचा दारूचा साठा फेकून देण्यात आला. अशा प्रकारे मदीना शहरातील प्रत्येक घरातून दारू फेकून देण्यात आली. दारूचे अक्षरशः नाले वाहू लागले. दारूचा एकही थेंब घरात कोणीही ठेवला नाही.
खरे पाहता अरब समाजात मद्यपान हे एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे. पाहुणाचारामध्ये दारु सादर करण्यास उत्तम पाहुणाचाराचे लक्षण समजले जायचे. दारू हे सर्वांचेच अतिशय प्रिय पेय होते. परंतु इस्लामी आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्या अतिप्रिय असलेल्या सर्वच बाबी त्यागण्याची वृत्ती इस्लामी समुदायात होती व हेच इस्लामला अभिप्रेत आहे. कारण इस्लामचा मुळात अर्थच असा आहे की ईश्वरी आदेशावर आपले सर्वस्वी अर्पण करावे. आपल्या संपूर्ण इच्छाआकांक्षा ईश्वरी आदेशाच्या ताब्यात द्याव्या. केवळ ईश्वरासाठीच जगावे, ईश्वरासाठीच मरावे. आपला आनंद, दुःख हे ईश्वरासाठीच असावे आणि यातच संपूर्ण मानवजगताचे कल्याण आणि रक्षण आहे.
आपण या दारूबंदीच्या इस्लामी कायद्याची जर सध्याच्या अमेरिकेच्या दारुबंदीच्या कायद्याशी तुलणा केली, तर एक कटू सत्य आपल्यासमोर येते. अमेरिकेत जेव्हा दारूबंदीचा कायदा लाग करण्यात आला, तेव्हा जनतेने या कायद्याची पायमल्ली करून शासनाची जोरदार खिल्ली उडविली. बिनधास्तपणे मद्यपान करून आपल्या बंडाचे उदाहरण सादर केले. हातात दारूच्या बाटल्या घेऊन स्त्री-पुरुष रस्त्यावर आले. आज अमेरिकाच नव्हे तर इतर सर्वच देशांमध्ये शासनाने प्रयत्न करूनही लोकांनी मद्यपानाचा त्याग केला नाही. कारण हे कार्य केवळ कायदा करून बंद करणे शक्य नसते. त्याला इस्लामी विचारसरणीची जोड आवश्यक असते.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *