माननिय मआज बिन जबल (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहचा हक्क दासांवर हा आहे की, दासांनी फक्त त्याचीच उपासना व आज्ञापालन करावे, आणि या बाबत दुसऱ्या कुणाला तिळमात्र सहभागी ठरवू नये. तसेच प्रेषितांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहची उपासना व आज्ञापालन करणाऱ्या दासांचा अल्लाहवर हा हक्क आहे की त्याने (अल्लाहने) दासांना शिक्षा, यातना देऊ नये. (संदर्भ – हदीस – बुखारी व मुस्लीम)
भावार्थ
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या आदेशान्वये, एकेश्वरवादाचे महत्व समजून येते. केवळ अल्लाहच्या उपासना व आज्ञापालनामुळे नरकाच्या शिक्षेपासून बचाव होईल. एकेश्वरवाद ही गोष्ट ईशप्रकोपापासून वाचविणारी आहे आणि स्वर्गाचे हक्कदार बनविणारी आहे. याहून अधिक मौल्यवान गोष्ट दासाच्या नजरेत आणखी कोणती असेल? ‘अल्लाह’च्या अस्तित्वासंबंधी वास्तवतेचा ठाव घेणे मानवी विचारशक्तिला शक्य नाही. म्हणून अल्लाहला केवळ त्याच्या त्या गुणांद्वारेच ओळखले जाऊ शकते, ज्याच्या तेजोवलयांनी हे संपूर्ण सृष्टीजीवन व्यापून आहे. सृष्टीमध्ये जे जे आहे, ते सर्वचे सर्व अल्लाहच्या कोणत्या ना कोणत्या गुणांचे प्रदर्शन आहे. म्हणूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे. ‘‘अल्लाहच्या निर्मितीवर विचार व चिंतन करीत रहा. परंतु खुद्द त्याच्या अस्तित्वासंबंधी तसे प्रयत्न करू नका.’’ ईश्वरी अस्तित्वाची वास्तवता मानवी दृष्टीच्या व विचारशक्तिच्या अवाक्या बाहेरची गोष्ट आहे हे उघड सत्य आहे. निर्मितीपैकी अगदी सामान्यातील सामान्य गोष्टीची स्थिती अशी आहे की आमचे ज्ञान तिच्या गुणांपर्यंतच पोहचून थांबते. त्याच्या अस्तित्वाची काय हकीकत आहे, ही गोष्ट बव्हंशी आमच्यासाठी एक रहस्यच राहते. मग त्या अस्तित्वाचा ठाव घेणे आमच्यासाठी कसे शक्य आहे? जे इतर सर्व निर्मितीपासून मुलत:च वेगळे आहे. जे सर्वंकषपणे अनुपम आहे, ज्याला इतर कोणत्याही वस्तूशी कसलीही सदृश्यता (समानता) नाही. जो निर्माता आहे व त्याच्या व्यतिरिक्त समस्त सृष्टी व सृष्टीतील समस्त घटक त्याची निर्मिती आहे. जे अस्तित्व स्वयंभू आहे तर प्रत्येक घटक ऱ्हास पावणारी, नष्ट होणारे आहे. ज्याचा प्रत्येक गुण परमोच्च बिंदूला पोहोचलेला, अनादी व अनश्वर आहे, जेव्हा की या चिंतनाच्या कक्षेत तर कोणती गोष्ट येऊ शकते तर ती सर्वोच्च अल्लाहच्या केवळ गुणांचे ज्ञान होय. त्याच्या अस्तित्वाच्या वास्तवतेचा ठाव घेणे मानवी बौद्धिकदृष्टीने केवळ अशक्य गोष्ट आहे म्हणूनच महान कुरआनने आपला संवाद केवळ अल्लाहच्या गुणांपुरताच, चर्चेपुरताच मर्यादित ठेवला आहे. अल्लाहच्या परमोच्च गुणांची ही मोठी संख्या, अस्तित्वाची अनेकता दर्शविणारी आहे, असे कदापी नाही. (जसे की काही धर्माच्या अनुयायांनी कल्पना करून घेतली आहे) किंबहुना हे गुण वा हे शक्ती सर्वच्या सर्व त्याच एका असितत्वात, ‘अल्लाह’मध्येच केंद्रित आहेत. म्हणून महान कुरआनने हे उघड सत्य असे फर्मावून मध्यान्हींच्या सूर्यासमान स्पष्ट केले आहे. हवे तर तुम्ही ‘अल्लाह’ म्हणून पुकारा, हवे तर ‘रहमान’ (मेहेरबान) म्हणून. जे कोणते चांगले नाव तुम्ही घ्याल (तर (त्याच्याने अभिप्रेत अल्लाहचे अस्तित्वच असेल) कारण सर्व चांगली नावे त्याच्यासाठीच आहेत. (सुरह – बनीइस्राईल) म्हणजे तुम्ही ईशत्वाचा जो गुण व ज्या शक्तीला दृष्टीसमोर ईश अस्तित्वाचे ध्यान कराल, त्याच्याने अभिप्रेत नेहमी तेच एक अस्तित्व असेल, ज्याचे नाव अल्लाह आहे. उदा. जर तुम्ही कृपा व मेहेरबानीची कल्पना मनात बाळगून ‘रहमान’ म्हणाल तर त्याच्याने अभिप्रेत दुसरे एखादे अस्तित्व असेल, आणि जर काही इतर गोष्टी आणि गुणाच्या दृष्टीने ‘अल्लाह’ असे म्हंटले तर त्याच्याने अभिप्रेत अन्य एखादे अस्तित्व असेल, असे कदापी समजू नका.
0 Comments