Home A परीचय A ईशग्रंथावर ईमान वा दृढ श्रद्धा

ईशग्रंथावर ईमान वा दृढ श्रद्धा

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार इस्लामचे तिसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ईश्वराने त्याच्या प्रेषितांवर वेळोवेळी अवतरित ग्रंथावर ईमान (दृढश्रद्धा) धारण करण्यास सांगितले आहे.
सर्वश्रेष्ठ अल्लाहने ज्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआन अवतरित केला त्याचप्रमाणे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांवरही आपले ग्रंथ अवतरले होते. त्या ग्रंथांपैकी काहींची नावे आम्हाला सांगण्यात आली आहेत. उदा. ‘सुहुफे इब्राहीम’ म्हणजे आदरणीय इब्राहीम (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘तौरात’ म्हणजे प्रेषित मूसा (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘झबूर’ म्हणजे आदरणीय दाऊद (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘इंजील’ म्हणजे आदरणीय ईसा (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, याशिवाय प्रेषितांकडे जे अन्य ग्रंथ पाठविले गेले होते त्यांच्या नावाची माहिती आम्हाला दिली गेली नाही. म्हणूनच अन्य कोणत्याही धर्मग्रंथाबाबत ते ईश धर्मग्रंथ आहेत अथवा नाहीत हे आम्ही विश्वासपूर्वक सांगू शकत नाही. अर्थातच आम्ही विश्वासपूर्वक मानतो की, ईश्वराकडून जे काही ग्रंथ अवतरले होते ते सर्व सत्य व वास्तव होते.
ईशग्रंथांची जी नावे आम्हाला सांगण्यात आली त्यापैकी ‘सुहुफे इब्राहीम’ तर आता पृथ्वीवर अस्तित्वात नाही. उरलेले ‘तौरात’, ‘इंजील’ व ‘झबूर’ हे ग्रंथ आज रोजी ज्यू लोकांजवळ आणि ख्रिश्चन लोकांजवळ उपलब्ध आहेत. परंतु पवित्र कुरआनमध्ये आम्हाला असे दाखवून दिले गेले आहे की, त्या सर्व ग्रंथांतील ईशवचनांत लोकांनी फेरबदल करून टाकले आहेत. आपल्यातर्फे त्यांत अनेक गोष्टी समाविष्ट करून टाकल्या आहेत. खुद्द ख्रिश्चन लोक व यहुदी लोकसुद्धा मान्य करतात की मूळ ग्रंथ त्यांच्याजवळ उपलब्ध नाही; केवळ त्यांच्या भाषांतरित प्रतीच उपलब्ध आहेत. त्या प्रतीमध्ये शतकानुशतकापासून फेरबदल होत आले आहेत. आजसुद्धा तसे फेरबदल होत आहेत. आणखी ते ग्रंथ वाचल्यानंतर त्यामध्ये काही स्पष्टपणे आढळून येते ज्यावरून ते सर्व ईश्वराकडून असूच शकत नाही याबद्दल खात्री पटते. यासाठीच जे ग्रंथ उपलब्ध आहेत ते तंतोतंत व परिपूर्ण ईशग्रंथ नाहीत. त्यामध्ये ईशवाणी व मानवी वचने यांची सरमिसळ झालेली आहे. त्यामधील ईशवाणी नेमकी कोणती आहे व मानवी वचने कोणती आहेत हे जाणण्याचे साधनही उपलब्ध नाही. तात्पर्य असे की पूर्वीच्या ग्रंथावर ईमान बाळगण्याचा जो आदेश आम्हाला दिला गेला आहे त्याची वास्तवता केवळ इतकीच की, ईश्वराने कुरआन अवतरित करण्यापूर्वीसुद्धा प्रत्येक जाती-वंशासाठी आपले आदेश, त्याच्या प्रेषितांद्वारा दिले होते. ते सर्व आदेश केवळ त्या एकमेव ईश्वराकडून देण्यात आले होते ज्याच्याकडून पवित्र कुरआन अवतरित करण्यात आले आहे. तसेच कुरआन काही एखादा नवीन व अद्भूत ग्रंथ नाही. त्याची शिकवण पूर्वीच्या काळातील लोकांना दिली गेली होती व नंतरच्या काळात त्यांना त्या शिकवणीचे विस्मरण झाले हते. तिच्यात त्यांनी फेरबदल घडवून आणले होते. ईशवाणीत मानवी वचनांची सरमिसळ करून टाकली होती. त्या सर्व चुकांची दुरूस्ती करून मूळ शिकवणीची उजळणी करण्यासाठीच हा पवित्र ग्रंथ ‘‘कुरआन’’ अवतरित करण्यात आला आहे.
दिव्य कुरआन हा ईश्वराने अवतरित शेवटचा ग्रंथ असून त्याच्यात व त्या अगोदरच्या ग्रंथांत अनेक दृष्टीने फरक आहे.
(१) कुरआनच्या आधी जे ग्रंथ अवतरित झाले होते त्यापैकी बहुतेकांच्या मूळ प्रती नाहीशा झालेल्या असून केवळ त्यांच्या अनुवादित प्रतीच आज उपलब्ध आहेत. परंतु पवित्र कुरआन ज्या ज्या शब्दानिशी अवतरले त्या सर्वच्या सर्व वचनांनिशी तंतोतंतपणे आजही उपलब्ध आहे. त्याच्यात एका अक्षराचा किंबहुना एखाद्या विरामचिन्हाचाही फेरबदल झालेला नाही.
(२) आधीच्या ग्रंथामध्ये माणसांनी ईशवाणीत मानवी वचनाची सरमिसळ करून सोडली आहे. एकाच ग्रंथात ईशवाणीही आढळते व त्याचबरोबर राष्ट्राचा इतिहास, महापुरूषांचे वृत्तान्त, टीका व समीक्षण तसेच धर्ममार्तंडांनी सांगितलेल्या समस्या व त्यांच्या सोडवणुकीचे मार्गसुद्धा आहेत. त्यात असे काही प्रदूषण व सरमिसळ झाली आहे की, केवळ ईशवाणी त्यातून वेगळी करणे अशक्य आहे. परंतु पवित्र कुरआनमध्ये शुद्ध ईशवाणीच आम्हाला आढळते. त्यामध्ये अन्य कसल्याही वचनांचा लवलेशही आढळत नाही. टीकाग्रंथ विवरण व विश्लेषण प्रेषित मुहम्मद (स.) यांची उक्ती व कृती दर्शविणारे त्यांचे जीवनचरित्र, धर्मशास्त्र, प्रेषितांच्या सोबत्यांची जीवनचरित्रे, तसेच इस्लामी इतिहास इ. विषयांवर स्वतंत्र लिखाण झाले आहे. या सर्व विषयांवर मुस्लिम लोकांनी जे काही लिखाण केले आहे ते सर्व कुरआनहून अगदी वेगळ्या अशा इतर पुस्तकांत लिहिलेले असून प्रत्यक्ष कुरआनमध्ये त्यातील एक अक्षरही आढळत नाही.
(३) जगातील विविध जातींमध्ये जितके धर्मग्रंथ आज उपलब्ध आहेत, त्यातील एखाद्याच्याही बाबतीत ऐतिहासिक पुराव्यानिशी हे सिद्ध होऊ शकत नाही की, ज्या प्रेषितांकडे तो ग्रंथ धाडला गेला होता तोच तो मूळग्रंथ आहे. या विपरित काही असेही धर्मग्रंथ आढळतात की ते कोणत्या काळात अवतरले व कोणत्या प्रेषितांवर ते अवतरले हेसुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु पवित्र कुरआनच्या संदर्भात इतका भक्कम ऐतिहासिक पुरावा व आधार उपलब्ध आहे की त्याचा संबंध व संपर्क प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी नाही, अशी शंकाही कोणी घेऊ शकत नाही. त्यातील कोणत्या आयती (वचने) केव्हा व कोणत्या स्थळी अवतरित झाल्या यांचीही अगदी स्पष्ट माहिती उपलब्ध आहे.
(४) यापूर्वीचे धर्मग्रंथ ज्या भाषांमध्ये अवतरले होते, त्या सर्व भाषा बऱ्याच काळापासून मृत झालेल्या आहेत. जगभर आज त्या भाषा बोलणारे कोठेही आढळत नाहीत. तसेच त्या भाषा जाणणारेही क्वचितच आढळतात. असे ग्रंथ त्यांच्या खऱ्या मूळ अवस्थेत उपलब्धही झाले तरी त्यातील आदेश नीट समजणे व त्यांचे पालन करणे हे अशक्य आहे. परंतु ज्या भाषेत कुरआन उपलब्ध आहे ती एक जिवंत भाषा असून जगातील कोट्यवधी लोकांत ती बोलली व समजली जात आहे. तिच्या शिक्षणाची तरतूद जगात सर्वत्र आढळते. प्रत्येक मनुष्य ती भाषा शिकू शकतो. ज्याला ती शिकता येत नसेल त्याला पृथ्वीवर चहूकडे अशी माणसे भेटतील ज्यांच्यामध्ये कुरआनच्या वचनांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करून सांगण्याची पात्रता आहे.
(५) जगात निरनिराळ्या मानव जातींजवळ जितके धर्मग्रंथ आज उपलब्ध आहेत, त्यातील प्रत्येक ग्रंथात त्यापैकी कोणा एकाच विशिष्ट जातीवंशाला संबोधित केले गेले आहे. त्यातील प्रत्येक ग्रंथात अशा आज्ञा व आदेश आढळतात जे त्या ठराविक काळापुरते व त्याकाळच्या विशिष्ट गरजांपुरतेच मर्यादित होते. हे आम्हाला कळून चुकते. परंतु आता तशी अवस्था व आवश्यकताही उरली नाही, तसेच ते आदेश आता अनुसरलेही जाऊ शकत नाहीत. यावरून ही गोष्ट स्फटिकासारखी स्वच्छ व स्पष्ट आहे की, ते सर्व ग्रंथ वेगवेगळ्या जातीवंशापुरतेच मर्यादित होते. त्यापैकी एकही ग्रंथ संपूर्ण जगासाठी अवतरला नव्हता. तसेच ज्या जातीवंशासाठी जे ग्रंथ अवतरले होते त्यांच्यासाठीसुद्धा ते कायमचे म्हणून नव्हते तर ते एका ठराविक काळापुरतेच होते. आता कुरआनवर दृष्टिक्षेप टाकू या. या ग्रंथात प्रत्येक ठिकाणी अखिल मानवजातीला संबोधित केले गेले आहे. त्यातील एका ओळीनेही अशी शंका निघत नाही की तो ग्रंथ कोणा एका विशिष्ट जातीसाठीच अवतरला आहे. म्हणून या ग्रंथात जे काही आदेश दिले गेले आहेत ते सर्व असे आहेत की प्रत्येक काळी व प्रत्येक स्थळी ते आचरणात आणले जाऊ शकतात. यावरून हे सिद्ध होते की, पवित्र कुरआन हे संपूर्ण जगासाठी चिरकालीन आहे.
(६) आधीच्या प्रत्येक ग्रंथात सत्यनिष्ठा व सदाचाराच्या गोष्टींचे वर्णन केले गेले होते. चारित्र्य व न्यायीपणाची शिकवण दिली गेली होती. ईश्वरेच्छेनुसार जीवनक्रम आचरण्याच्या पद्धती दर्शविण्यात आल्या होत्या. परंतु त्यापैकी एकही ग्रंथ असा नव्हता की त्यात वरील सर्व गोष्टी एकवटल्या असून त्यात कसलीही उणीव राहिलेली नाही. केवळ कुरआनचेच हे वैशिष्ट्य आहे की ज्या काही चांगल्या बाबी पूर्वीच्या ग्रंथात वेगवेगळ्या होत्या त्या सर्व यामध्ये एकवटल्या गेल्या आहेत. तसेच जी गुणवैशिष्ट्यें आधीच्या ग्रंथात राहून गेली होती ती सर्व कुरआनमध्ये समाविष्ट केली गेली आहेत.
(७) सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळेच अशा गोष्टींची भेसळ झाली आहे जे वास्तविकतेच्या अगदी विरुद्ध आहे, तसेच बुद्धिविरुद्ध आहेत आणि अन्यायावर आधारित आहेत. मानवांची श्रद्धा व त्यांची कर्मे दोन्हीही गोष्टी या कारणाने दूषित होतात. इतकेच नव्हे तर कित्येक ग्रंथात अश्लील व लैंगिक गोष्टी तसेच व्यभिचाराच्या गोष्टीसुद्धा आढळतात. पवित्र कुरआन अशा सर्व गोष्टींपासून स्वच्छ व निर्मळ आहे. बुद्धीविरुद्ध एकही उल्लेख त्यात आढळत नाही. युक्तिवादाने वा अनुभवाने खोटी ठरविली जाऊ शकते असा एकही उल्लेख नाही. त्यातील कोणताही आदेश अन्यायपूर्ण नाही, त्यातील कोणतीही गोष्ट माणसाला पथभ्रष्ट करणारी नाही. त्यात अश्लीलतेचा व व्यभिचाराचा लवलेशही नाही. आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण कुरआन म्हणजे उच्च कोटीचे ज्ञान, न्यायाची शिकवण, सरळ मार्गदर्शन, सर्वोत्तम नियम व आदेश यांचा समूह आहे.
हीच ती वैशिष्ट्ये होत ज्यांच्या आधारे जगातील समस्त जातीवंशांना असा उपदेश केला गेला आहे की त्यांनी कुरआनवर ईमान धारण करावे व अन्य सर्व ग्रंथांचा त्याग करून या एकमेव ग्रंथानुसारच आचरण व अनुकरण करावे. माणसाला ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्यासाठी उपदेश व मार्गदर्शनाची जेवढी आवश्यकता आहे ती सर्व या ग्रंथात उपलब्ध आहे. या ग्रंथाचे पृथ्वीवर आगमन झाल्यानंतर अन्य कोणत्याही ग्रंथाची गरजच उरलेली नाही.
कुरआन व इतर धर्मग्रंथ यामध्ये काय फरक आहे हे जेव्हा आपणास कळून चुकले आहे तर आता आपण स्वतःच हे समजू शकता की, अन्य ग्रंथांवरील ईमान (श्रद्धा) व कुरआनवरील ईमान यामध्ये काय फरक आहे. आधीच्या ग्रंथांवरील ईमान ते ईशग्रंथ होते व सत्य होते आणि ज्या हेतूसाठी कुरआन अवतरले आहे त्याच हेतूच्या सिद्धीसाठी ते ग्रंथही अवतरले होते; हे सत्य आहे. कुरआनवरील ईमानची वास्तवता व दर्जा असा आहे की ती शुद्ध ईशवाणी आहे, निखालस सत्य आहे, त्यातील प्रत्येक शब्द न शब्द सुरक्षित आहे, त्यातील प्रत्येक वचन खरे आहे, त्यातील प्रत्येक आदेशाचे पालन अनिवार्य आहे व त्याच्याविरुद्ध असणारी कोणतीही गोष्ट खंडनीय व रद्दबातल ठरण्यास पात्र आहे.
ईश्वराच्या प्रेषितांवरील ईमान
धर्मग्रंथानंतर आम्हाला ईश्वराच्या सर्व प्रेषितांवरही ईमान (दृढश्रद्धा) धारण करण्याचा आदेश दिला गेला आहे.
मागील प्रकरणात आपण पाहिले आहे की, ईश्वराने आपले प्रेषित जगातील सर्व जातीवंशांमध्ये पाठविले होते. त्या सर्वांनी त्याच इस्लामची शिकवण दिली होती जी अखिल मानवजातीला देण्यासाठी सरतेशेवटी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन पृथ्वीवर झाले. या अर्थाने पाहिल्यास ईश्वराने पाठविलेले एकूण एक सर्व प्रेषित एकाच पक्षाचे होते. त्यापैकी एकालाही खोटे ठरविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याने सर्व प्रेषितांना खोटे ठरविण्यासारखे आहे. प्रेषितांपैकी एकाची वास्तवता जर कोणी स्वीकारली तर एकूण सर्व प्रेषितांची वास्तवता स्वीकारणे त्याच्यावर आपोआपच अनिवार्य होते. अशी कल्पना करा की, दहाजणांनी एकच विधान केलेले आहे. त्यापैकी एकाला जर तुम्ही सत्य मानले तर आपोआपच उरलेल्या नऊ जणांनाही सत्य मानल्यासारखेच आहे. याउलट जर एकाला तुम्ही खोटे म्हटले तर त्याचा अर्थ असा निघतो की, त्याने केलेले विधानच खोटे आहे. त्या अनुषंगाने सर्व दहाजणही खोटे ठरतील. इस्लाममध्ये ज्यासाठी सर्व प्रेषितांवर ईमान धारण करणे अनिवार्य व आवश्यक आहे, त्याचे हेच कारण आहे. एखादी व्यक्ती कोणा एका प्रेषितावरही ईमान धारण करीत नाही, तर बाकीच्या प्रेषितांवर ईमान धारण करीत असली तरी ती ‘विद्रोही’ (श्रद्धाहीन) काफिरच ठरते.
काही उल्लेखांनुसार जगातील विविध जातीवंशांमध्ये जे प्रेषित पाठविले गेले आहेत त्यांची एकूण संख्या एक लक्ष चोवीस हजार आहे. जगात मानव कधी काळापासून आहे व किती जातीवंश आजपर्यंत होऊन गेले आहेत, याचा जर तुम्ही विचार केलात, तर ती संख्या फार मोठी असल्याचे वाटणार नाही. या सव्वालाख प्रेषितांपैकी ज्यांच्या नावांचा कुरआनमध्ये उल्लेख आहे त्यांच्यावर तर स्पष्टपणे ईमान धारण करणे अगत्याचे आहे. उरलेल्या इतर प्रेषितांबाबत आम्हास केवळ अशी श्रद्धा बाळगण्याची शिकवण दिली गेली आहे की, जे कोणी ईश्वराकडून त्याच्या दासांच्या मार्गदर्शनार्थ व उपदेश करण्यासाठी पाठविले गेले होते, ते सर्व सत्य होते. हिंदुस्थान, चीन, इराण, इजिप्त, आफ्रिका, युरोप व जगातील अन्य देशांमध्ये ज्या प्रेषितांचे आगमन झाले असेल, त्या सर्वांवर आम्ही ईमान (दृढ श्रद्धा) बाळगतो, परंतु एखाद्या विशिष्ठ व्यक्तीसंबंधी ती प्रेषित होती असे आम्ही म्हणू शकत नाही. तसेच ते प्रेषित नव्हते असेही आम्ही म्हणू शकत नाही. कारण त्यासंबंधी आम्हाला काहीही सांगितले गेलेले नाही. खरेतर निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ज्यांना आपले प्रेषित व मार्गदर्शक मानतात, त्यांच्याविरुद्ध काही सांगणे आम्हाला उचित व इष्ट नाही. वास्तविकपणे ते प्रेषितच असावेत अशी दाट शक्यता आहे व त्यांच्या अनुयायांनी नंतरच्या काळात त्यांच्या शिकवणीत अनेक दोष निर्माण केले असतील. जसा आदरणीय मूसा (अ.) यांच्या व आदरणीय ईसा (अ.) यांच्या अनुयायांनी बिघाड निर्माण केला. म्हणून आम्ही जे काही मतप्रदर्शन करू ते त्यांच्या धर्मासंबंधी त्यांच्या रूढी-परंपरासंबंधीच करु. परंतु प्रेषितांबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही, जेणेकरून न जाणता, न समजता, एखाद्या प्रेषिताचा अनादर व अवमान आमच्या हातून घडू नये.
या अर्थाने तर पूर्वीच्या प्रेषितांमध्ये व प्रेषित मुहम्मद (स.) मध्ये कसलाही फरक नसून त्यांच्याइतकेच पूर्वीचे प्रेषितसुद्धा वास्तवच हते. ईश्वराकडूनच पाठविले गेलेले होते; ते सर्व इस्लामचा सरळमार्ग दाखविणारेच होते आणि त्या सर्वांवर दृढ श्रद्धा (ईमान) धारण करण्याचा आम्हाला आदेश दिला गेला आहे. परंतु या सर्व बाबतीत सारखेपणा असूनसुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) मध्ये व अन्य प्रेषितांमध्ये तीन गोष्टींचा स्पष्ट फरकही आहे, तो खालीलप्रमाणे :
(१) पहिला फरक असा की, आधीचे सर्व प्रेषित विशिष्ट काळासाठी व विशिष्ट जातीवंशापुरतेच होते, परंतु प्रेषित मुहम्मद (स.) हे संपूर्ण जगासाठी सार्वकालिक तसेच अखिल मानवजातीसाठी प्रेषित बनवून पाठविले गेले आहेत. मागच्या प्रकरणात आम्ही विवरणासहित याविषयी वर्णन केले आहे.
(२) दुसरा फरक असा आहे की, आधीच्या प्रेषितांनी दिलेली शिकवण जगातून पूर्णतः नष्ट झालेली आहे. अथवा थोड्याफार प्रमाणात शिल्लक असली तरी तिचे निर्भेळ स्वरुप मुळीच उरलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनासंबंधी खरीखुरी माहितीसुद्धा आज जगात कोठेच सापडत नाही. उलट त्या माहितीवर कथानकांचे थरावर-थर चढले आहेत. या स्थितीत जर एखाद्याने त्यांचे अनुकरण करण्याचे ठरविले तरीही त्याला तसे करणे आज शक्य नाही. याउलट प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेली शिकवण, त्यांचे पवित्र जीवनचरित्र, त्यांचे तोंडी आदेश व उपदेश, त्यांच्या आचारांच्या पद्धती, त्यांचे संस्कार, सवयी व गुणवैशिष्ट्यें किंबहुना त्यांच्यासंबंधीची सर्व माहितीची साधने आज जगामध्ये सुरक्षित आहेत. म्हणूनच वास्तविकपणे सर्व प्रेषितांमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या शिकवणुकीच्या रुपाने अमर आहेत. केवळ त्यांचेच अनुयायीत्व व अनुकरण करणे शक्य आहे.
(३) तिसरा फरक असा आहे की, आधीच्या प्रेषितांकरवी इस्लामची जी शिकवण दिली गेली होती, ती काही परिपूर्ण नव्हती. प्रत्येक प्रेषितानंतर दुसरा प्रेषित येऊन त्याने आधीच्या आदेश, उपदेशात, नियमात फेरबदल व कमी-जास्तपणा केला आणि अशाप्रकारे प्रगती व सुधारणेचे कार्य सतत पुढे चालू राहिले होते. म्हणूनच तो काळ निघून गेल्यानंतर त्या प्रेषितांची शिकवण ईश्वराने सुरक्षितपणे टिकवून ठेवली नाही. कारण प्रत्येक परिपूर्ण शिकवणीनंतर त्याआधीच्या अपूर्ण व अर्धवट शिकवणीची गरज उरलेली नव्हती. शेवटी प्रेषित मुहम्मद (स.) द्वारा इस्लामची अशी शिकवण देण्यात आली. जी सर्वच दृष्टीने परिपूर्ण होती. त्यानंतर आधीच्या सर्व प्रेषितांच्या शिकवणी आपोआपच रद्दबातल झाल्या. कारण परिपूर्ण शिकवण सोडून देऊन अपूर्ण शिकवणीनुसार आचरण करणे हे बुद्धिविरुद्ध ठरते. ज्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायीत्व पत्करले त्याने आधीच्या सर्व प्रेषितांचे अनुयायीत्व केल्यासारखेच आहे. कारण त्या सर्व प्रेषितांच्या शिकवणीत जो काही चांगुलपणा होता तो प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत एकवटलेला आहे. तसेच जो कोणी प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण सोडून आधीच्या एखाद्या प्रेषिताचे अनुयायीत्व करील तर तो पुष्कळशा चांगुलपणापासून वंचित राहतो, कारण नंतरच्या शिकवणीत समाविष्ट असलेला भलेपणा (कल्याणकारकता) आधीच्या जुन्या शिकवणुकीत नव्हता.
या सर्व कारणांमुळे जगातील समस्त मानवजातीला प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायीत्व पत्करणे अगत्याचे ठरते. मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठी, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर तीन दृष्टीने ईमान (दृढ श्रद्धा) धारण करणे आवश्यक आहे.
(१) पहिले असे की, ते ईश्वराचे सच्चे प्रेषित आहेत.
(२) त्यांनी दिलेली शिकवण परिपूर्ण आहे, कोणताही दोष वा उणीव यापासून ती निर्मळ आहे.
(३) ते ईश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर कोणाही प्रेषितांचे कोणत्याही जातीवंशासाठी कयामत (निवाड्याचा दिवस) पर्यंत आता पृथ्वीवर आगमन होणार नाही. तसेच मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठी ज्याच्यावर ईमान धारण करणे आवश्यक असेल; अशा एखाद्या व्यक्तीचेही आता आगमन होणार नाही की त्याला न मानल्याने एखादा मनुष्य श्रद्धाहीन (काफिर) ठरेल.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *