Home A blog A ईदुल फित्रची वैशिष्ट्ये

ईदुल फित्रची वैशिष्ट्ये

ईद म्हणजे उत्सव फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईदुल फित्र म्हणजे दान देण्याचा उत्सव. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लामध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद उल फित्र दूसरी ईद उल अजहा. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर जी ईद येते तिला ईदुल फित्र असे म्हणतात. अल्लाहने या दोन्ही ईदच्या दिवशी श्रीमंतांवर गरीबांना दान देऊन ईद साजरी करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ईदला जाण्यापूर्वी फित्रा अर्थात गहू, खजूर, किशमिश किंवा नगदी रूपये गरीबांना दान दिल्याशिवाय ईदच्या नमाजला जाता येत नाही. रमजानच्या महिन्यात महिनाभर दान, पुण्य केले जाते. तेवढ्यावरही न थांबता परत ईदच्या दिवशी दान देण्यासाठी अल्लाहने श्रीमंतांना प्रोत्साहित केलेले आहे.
    कुठल्याही प्रकारचा कर्कश संगीत, डीजेचा आवाज, टुकार चित्रपटातील गीतावर केला जाणारा अश्‍लिल नाच, पैशाचा किंवा विजेचा अपव्यय किंवा हुल्लडबाजी ईदच्या दिवशी करता येत नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदुषण ईदच्या दिवशी होत नाही. कुठल्याही प्रकारचा नशापाणी ईदच्या दिवशी कोणी करत नाही, कुठलीही घोषणाबाजी होत नाही. गटागटाने लोक अल्लाहचे नामस्मरण करत ईदगाह मैदानावर शांतपणे जमा होतात. तेवढ्याच शांतपणे दोन रकात नमाज अदा करून घरी परत येतात आणि मित्र परिवारासह शिरखुर्म्याचा आस्वाद घेतात. ईदचा जो मुख्य कार्यक्रम असतो तो ईदगाहवरील नमाजचा असतो. तो साधारणत: एक ते दीड तासात संपतो. महिनाभर उन्हा-तान्हात उपाशीपोटी राहिलेल्या जिवांवरील खाण्यापिण्याची बंधने ईदच्या दिवशी उठलेली असतात. त्यामुळे त्या दिवशी थकलेल्या जीवांना दिलासा मिळतो आणि कळते की खाणे आणि पाणी पिणे याचे महत्त्व मानवी जीवनात किती असते?
    ईदच्या पूर्वी ईदच्या तयारीसाठी म्हणून बाजार फुललेले असतात. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक मुस्लिम नवीन कपडे, चप्पल, बूट, कॉस्मेटिक्स, सुकामेवा, साखर, सुगंध इत्यादी खरेदी करत असतो. त्यामुळे मार्केटमध्ये नवचैतन्य निर्माण होते.
    महिनाभर केलेल्या उपवासातून आणि अतिरिक्त ईबादतीतून मुस्लिमांच्या चारित्र्याचा ग्राफ उंचावलेला असतो. मोह, माया, काम, क्रोध यावर मात करून येत्या 11 महिन्यात सदाचाराने वागण्याचा प्रत्येकाने आपल्या परीने निर्णय केलेला असतो. ज्यांनी जाणीवपूर्वक रोजे केले आणि 11 महिने आपले चारित्र्य जपण्याचा प्रण केला. ते त्यामध्ये यशस्वीही होतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी भांडवल ठरते.     लौकिक अर्थाने ईदचा अर्थ एवढाच जरी असला तरी ईदचे महत्त्व यापलिकडेही आहे. ते कोणते हे समजून घेऊ.
    आज समाजामध्ये चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई आहे.  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, महिला आणि मुलांचे शोषण होत आहे, वाईट चारित्र्याच्या लोकांनी प्रत्येक क्षेत्र व्यापल्यामुळे असे घडत आहे. अशावेळी चांगल्या लोकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी इतर समाजाप्रमाणे मुस्लिम समाजावरही आहे. त्यासाठी दरवर्षी इस्लाम महिनाभर लोकांना चारित्र्यसंवर्धनाचे प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण अनिवार्य असल्यामुळे प्रत्येकजण ह्या प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जातो. महिनाभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याला समाजामधील वंचित लोकांच्या भूकेची व तहानलेल्या लोकांच्या वाईट परिस्थितीची आपोआप जाणीव होते. रमजान नंतर तो आपल्या मगदूरीप्रमाणे दानपुण्य करत राहतो. समाजातून गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो. हे फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच शक्य आहे की, श्रीमंतांकडून जकात, फित्रा, सदका, घेऊन तो गरीबांना दिला जातो. अन्यथा इतर व्यवस्थांमध्ये तर व्याजाच्या व्यवस्थेतून गरजूंचे आर्थिक शोषण केले जाते. गरीबांना अधिक गरीब तर श्रीमंतना अधिक  श्रीमंत बनविण्याकडे व्यवस्थेचा कल असतो. गरीब लोक कायम गरीबीत राहिल्यास स्वस्तात मजूर उपलब्ध होत राहतील व त्यामुळे कारखानदारी भरभराटीला येते व देशाची आर्थिक प्रगती होते, असा विचार भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने केला जातो. हा विचार एवढा प्रबळ आहे की, साम्यवादाला सुद्धा यावर उपाय सुचवूनसुद्धा काही साध्य करता आलेले नाही.
    समाजातील काही घटकांना ठरवून सातत्याने गरीब ठेवले गेल्यामुळे समाजामध्ये विषमता वाढत चाललेली आहे. आपल्या देशामध्ये तर विषमतेने तर एवढा कळस गाठलेला आहे की, गरीबीमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यात आता शहरी भागातील गरीबांच्या आत्महत्येंचीही भर पडत चाललेली आहे. गरीबीमुळे येणारे अनेक रोग उदा. टी.बी., दमा, अ‍ॅनिमिया, मानसिक आजार वाढलेले आहेत. सार्वजनिक स्वास्थ्य व्यवस्था बकाल असल्यामुळे या आजारांना बळी पडणार्‍या गरीबांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मतदान ग्रामीण भागामध्ये होत आहे, विकास शहरी भागाचा होत आहे. अनुत्पादक गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढत आहे, अत्यावश्यक कृषी उत्पादनामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. अशा या विषम परिस्थितीशी लढण्याची शक्ती इस्लामच्या समाजवादी वैचारिक शक्तीतून मिळू शकते. इतर कुठल्याही व्यवस्थेमध्ये या विषमतेला नष्ट करण्याची क्षमता राहिलेली नाही, याची खात्री झालेली आहे. रमजान आणि ईदच्या पार्श्‍वभूमीवर चारित्र्यवान नागरिक देशाला मिळत राहोत. एवढीच प्रार्थना. आमीन. सर्व देशबांधवांना ईदच्या शुभेच्छा.

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *