Home A प्रेषित A इस्लामी शक्तीचा मक्केवर विजय

इस्लामी शक्तीचा मक्केवर विजय

हुदैबियाच्या समझोत्यामुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा पूर्णतः लाभ उचलत प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘मदीना’ या इस्लामी सत्ताकेंद्रास अत्याचार्यांच्या उपद्रवापासून मुक्त केले, तर दुसरीकडे उत्तरेत ज्युडिशियांच्या कटकारस्थानांची सर्व केंद्रे उद्ध्वस्त केली. तिसरे कार्य असे केले की, छोट्याछोट्या कबिल्यांच्या उपद्रवी आणि आंतकवादी कारवायांवर अंकुश ठेवून इस्लामी शासनाची दूरपर्यंत धाक पसरली आणि खंदकच्या युद्धानंतर इस्लामी शासनाचे अगदी निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. सर्वांना हे कळून चुकले की, सत्य आणि न्यायाची ही नवीन शक्ती क्षणभंगुर नसून स्थायी स्वरुपाची आहे.
आता मदीनाच्या इस्लामी आंदोलनासमोर सर्वांत मोठे सामरिक पर्व एवढेच बाकी राहिले होते की शत्रूच्या शक्तीचे मूळ केंद्र नष्ट करण्यात यावे. अन्यथा लढायांची शृंखला कधीच थांबणार नाही. कुरैशजणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की, ही शृंखला त्यांनीच सुरु केली होती.
या शृंखलेची पार्श्वभूमी अशी की, मक्का शहराच्या आसपास ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ नावाच्या दोन मोठ्या कबिल्यांदरम्यान दीर्घ काळापासून तंटेबखेडे चालू होते. तात्पुरत्या प्रमाणात एवढेच घडले की, ज्या वेळी इस्लामी शक्ती एका प्रतिस्पर्धी शक्तीच्या स्वरुपात प्रकट झाली, तेव्हा कुरैश कबिल्याने इस्लामविरोधी मोर्चास ‘बक्र’ आणि ‘खुजाहा’ या एकमेकांचे शत्रू असलेल्या कबिल्यांना सामील करून घेतले. म्हणून या दोन्ही कबिल्यांतील कायमस्वरूपी वैर काही काळापुरते थंडावले. परंतु जेव्हा हुदैबिया समझोता झाला आणि पूर्ण दहा वर्षांपर्यंत मक्का आणि मदीनादरम्यान युद्धबंदी झाली, तेव्हा ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ यांच्यातील हाडवैर परत उफाळून आले व समझोत्याच्या एका अटीनुसार ‘बक्र’ कबिल्याने कुरैश कबिल्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि हे पाहून ‘खुजाआ’ परिवाराने ‘बक्र’ परिवारास संतप्त करण्यासाठी प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या इस्लामी शासनाशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित केले. काही दिवस दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांत तनावपूर्ण शांतता राहिली आणि एके दिवशी अचानक ‘कुरैश’जणांचा मित्रकबिला असलेल्या ‘बक्र’ कबिल्याने ‘खुजाआ’ परिवारावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ज्या लोकांनी काबागृहात आश्रय घेतला, त्यांनादेखील सोडले गेले नाही. त्यातल्यात्यात कुरैशजणांनी हल्ला करण्यात ‘बक्र’ परिवाराची मदत केली. ‘खुजाआ’ कबिल्याचे प्रतिनिधी ‘अम्र बिन सालिम’ यांनी आदरणीय प्रेषितांच्या दरबारी मदतीची विनंती केली. प्रेषितांनी दूताच्या माध्यमाने कुरैशजणांसमोर तीन अटी मांडल्या.

  1. खुजाआ कबिल्याच्या ठार करण्यात आलेल्या लोकांचा ‘कसास’ (बदला) द्यावा. (अर्थात, ज्यांनी खुजाआ परिवाराच्या लोकांच्या हत्या केल्या त्यांच्याकडून बदला घेण्यात यावा.)
  2. ‘बक्र’ च्या समर्थनातून वेगळे व्हावे किवा
  3. हुदैबिया समझोता संपुष्टात आणण्याची घोषणा करावी. (अर्थात युद्धास तयार व्हावे.)

कुरैशजणांचे आधीच संतुलन बिघडले होते. त्यांनी दूताकरवी प्रेषितांना निरोप पाठविला की, केवळ तिसरी अट मान्य आहे. रागाच्या भरात युद्धाची घोषणा केली खरी, परंतु या अविवेकी निर्णयाचा त्यांना खूप पश्चात्ताप झाला. ते चितातूर झाले होते. कारण त्यांची सैनिकशक्ती नष्ट झाली होती आणि अर्थव्यवस्थासुद्धा खिळखिळी झाली होती. त्यांचे जोरदार समर्थक आणि सहकारी ‘ज्यूडिश’ पराभूताचे जीवन व्यतीत करीत होते. मदीना शासन मजबूत आणि स्थीर झाले होते आणि खूप दूरपर्यंत या शासनाची जबरदस्त धाक बसली होती. केवळ हुदैबियाच्या समझोत्यावर अंमलबजावणी करूनच स्वतःस सुरक्षित ठेवणे शक्य होते आणि तरी देखील स्वतःच समझोता मोडण्याचा मूर्खपणा त्यांनी केला.
शेवटी ‘मक्का’ शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या, ‘अबू सुफियान’ हा ‘हुदैबिया समझोत्याचे’ नूतनीकरण करण्यासाठी मदीना शहराकडे रवाना झाला. या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरुवातीस तो आपली कन्या ‘माननीय उम्मे हबीबा(र)’ (या प्रेषितांच्या भार्या होत) यांच्याकडे पोहोचला, परंतु त्यांच्याकडे काही जमले नाही. मग त्यांनी माननीय अबू बक्र(र), उमर(र), अली(र) यांची भेट घेऊन समझोता नूतनीकरण करण्याची शिफारस केली. परंतु काहीही साध्य झाले नाही. शेवटी तो रिकाम्याहाती मक्का पोहोचला.
इकडे मानवतेचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना दैवी संकेत मिळाले की, ‘सत्यावर आपल्या प्राणांचे बलिदान देणार्यांनी बलिदनासाठी तयार राहावे.
हा मोठा विचित्र संयोग आहे की, सत्य-असत्याची लढाईसुद्धा (ब्रदची लढाई) रमजान’ महिन्यातच झाली आणि आता अंतिम लक्ष्य पूर्ण करणारी लढाईसुद्धा रमजान महिन्यातच होणार होती.
रमजान महिन्याच्या दहा तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे दहा हजार सैन्य घेऊन मदीनाहून ‘मक्का’कडे निघाले आणि प्राचीन धर्मग्रंथातील भविष्यवाणी सत्य सिद्ध झाली. कुरैशजणांचे लोक ज्या मार्गावर गस्त घालीत होते, तो मार्ग सोडून दुसर्याच मार्गाने प्रेषित आपले सैन्य घेऊन निघाले आणि अचानक मक्का शहरासमोर पडाव टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘जुहफा’ या ठिकाणी पोहोचल्यावर आपले काका माननीय अब्बास(र) हे आपल्या मुलांबाळांसह तेथे पोहोचले आणि प्रेषितांबरोबर सल्लामसलत झाली. त्यांच्या रवानगीच्या वेळी प्रेषितांनी त्यांना आपली स्वारी सोबत देऊन पाठविताना ‘अबू सुफियान’ला सोबत घेऊन येण्यास सांगितले.
यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मर्रज्जहान’ या ठिकाणी लष्करी तळ लावून सैनिकांना सूचना दिली की सर्व सैनिकांनी आपापल्यासाठी स्वतंत्र चुली पेटवाव्या. रात्रीच्या वेळी मक्का शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या ‘अबू सुफियान’ आणि त्यांच्यासोबत बडया नेत्यांनी पर्वतावरून हजारोंच्या संख्येत सैन्यांच्या चुली पाहून पार घाबरून गेले. तेवढ्यात ‘माननीय अब्बास(र)’ हे तेथे येऊन त्यांना म्हणाले की, प्रेषित मुहम्मद(स) हे मोठी फौज घेऊन आले आहेत व आता कुरैशजणांचे काही खरे नाही. ‘अबू सुफयान’ने त्यांना विचारले की, ‘आता काय करावे? कसा मार्ग काढावा?’ माननीय अब्बास(र) यांनी म्हटले, ‘‘तुम्ही माझ्यासोबत प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे चला. आपण त्यांच्याशी बोलणी करून काही मार्ग निघतो काय ते पाहू या’ अबू सुफियान हा प्रेषितांनी पाठविलेल्या स्वारीवर स्वार होऊन माननीय अब्बास(र) सोबत प्रेषितांकडे आला. त्याला पाहताच माननीय उमर(र) यांचे रक्त खवळले. त्याला ठार करण्याची त्यांनी प्रेषितांना परवागनी मागितली. परंतु माननीय अब्बास(र) यांनी प्रेषिातंना म्हटले, ‘‘हे प्रेषिता! मी ‘अबू सुफयान’ ला जीवदान देण्याचे वचन देऊन आपल्यासमोर हजर केले आहे.’’
दुसर्या दिवशी सकाळी ‘अबू सुफियान’ याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर इस्लाम धर्म स्वीकारला. माननीय अब्बास(र) यांनी प्रेषितांच्या सूचनेनुसार एका उंच टेकडीवर अबू सुफियान(र) यांना इस्लामी सैन्याच्या दर्शनास्तव उभे केले. सैन्याने ‘कदा’च्या मार्गाने प्रस्थान केले. वेगवेगळ्या कबिल्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. ‘अबू सुफियान(र)’ हे प्रत्येक तुकडीच्या बाबतीत काही ना काही विचारत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी जोरदार घोषणा केली, ‘‘आजचा दिवस हा ‘काबा’ मुक्तीसाठी युद्धाचा दिवस आहे. आजचा दिवस नेकी आणि भलाईचा दिवस आहे.’’ सैन्याच्या प्रस्थानाच्या प्रसंगी प्रेषितांनी घोषणा केली की, ‘‘जी व्यक्ती काबागृहात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती अबू सुफियान(र) यांच्या घरात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती स्वतःच्याच घराचे दरवाजे बंद करून घरातच बसेल तिला देखील अभय! केवळ गुन्हेगारांनाच त्यांना आपल्या गुन्ह्यांची फळे चाखावी लागतील!’’ माननीय अबूसुफयान(र) यांनी प्रेषितांची ही घोषणा शहरात प्रसारित केली.
रमजान महिन्याच्या २० तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपले इस्लामी लष्कर घेऊन कोणतेही विजयी नारे न लावता, ढोल ताशे न वाजवता आणि कोणत्याही प्रकारे आपल्या विजयाचे सूर न काढता अत्यंत नम्रपणे मक्का शहरात दाखल झाले. जगातील सर्वांत महान मानव आदरणीय प्रेषित हे आपल्या स्वारीवर बसून ईश्वरासमोर नतमस्तक झालेले होते. ईश्वराच्या कृतज्ञतेचे भाव त्यांच्या अंतःकरणात होते. ओठांवर दिव्य कुरआनच्या ‘अलफतह’ या सूरहचे पठण चालू होते.
या प्रसंगी कुरैशच्या काही सरदारांनी काही टवाळ तरुणांना फूस लावली आणि त्यात इस्लामी सैन्याचे दोन योद्धे ठार झाले. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना खबर मिळताच त्यांनी शत्रूपक्षाच्या काहीजणांना कंठस्नान घालविले. अशाच प्रकारचे एक टोळके शहरात उपद्रव करण्यास निघाले. प्रेषितांनी ‘अन्सार’च्या एका तुकडीस बोलावून हे दृष्य दाखविले की, एकीकडे विजयी मुस्लिम शक्ती शत्रुच्या रक्ताचा एक थेंबही सांडू देत नाही तर दुसरीकडे हे उपद्रवी लोक आपल्या म्यानात असलेल्या तलवारी बाहेर काढण्याची चेतावणी देत आहेत. मग प्रेषितांनी आपल्या सैनिकांना उपद्रव्यांचा सफाया करण्याचा आदेश दिला. तेवढ्यात अबू सुफयान(र) हे धावत प्रेषितांजवळ आले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषित! कुरैशजण अगोदरच खूप उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सोडून द्यावे.’’ मग प्रेषितांनी त्यांची विनंती मान्य केली. थोडीशी झडप झाल्यावर उपद्रव्यांनी तेथून पळ काढला.
लोकांनी प्रेषितांना विचारले की, ‘‘आपण आपल्या वडिलोपार्जित घरावर थांबाल काय?’’
‘‘येथील लोकांनी माझे घर ठेवलेच कुठे?’’ प्रेषित म्हणाले, मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी निवासासाठी एक स्थान निवडले. नंतर ते त्यांना ‘नजरबंद’ करण्यात आलेल्या स्थळावर गेले आणि मग काबागृहात पोहोचले. माननीय बिलाल(र) यांनी काबागृहाच्या उंचीवरून ‘अजान’ पुकारली. आदरणीय प्रेषितांनी काबागृहाच्या ‘अस्वद’ चा मुखस्पर्ष केला आणि मग ते हातात धनुष्य घेऊन एकेका विभूतींजवळ जाऊन हाक देत होते, ‘‘सत्य आले आणि असत्य मिटले. निश्चितच ‘असत्य’ हे मिटणारच होते.’’ धनुष्याच्या इशार्यानेच काबागृहातील मूर्ती तोंडावर पडत होत्या. मग काबागृहाची चावी मागवून प्रवेशद्वार उघडले. आंतमध्ये प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या मूर्ती लावलेल्या होत्या. त्या मूर्तींच्या हातात धनुष्यबान होते. मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर जनसमुदाय जमलेला होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अफाट जनसमुदायास संबोधित करताना म्हटले,
‘‘केवळ एकमेव ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नाही. त्याचा कोणीच भागीदार नाही. त्याने केलेला वादा सिद्ध झाला. त्यानेच एकट्याने संपूर्ण शत्रूसैन्यास पराभूत केले. आज दंभ, अहं, खुनाचे व हत्यांचे सर्व दावे आणि संपत्तीच्या मागण्या माझ्या पायाखाली आहेत. मात्र हरम (काबागृह) च्या ‘मुतवल्ली’ (विश्वस्त) आणि ‘हज यात्रेकरूंना’ पाणी पाजण्याची जवाबदारी आणि हुद्दे यास अपवाद आहेत.
हे कुरैश आज ईश्वराने तुमचा अज्ञानी अहंकार आणि वंशाभिमान नष्ट केला आहे. संपूर्ण मानवजात ही आदमचीच संतती आहे आणि आदमची निर्मिती मातीपासून करण्यात आली आहे. सर्व मानव एकच आहेत. कोणताच मानव हा वंशाने श्रेष्ठ नसून तो केवळ ईशपरायणतेमुळेच श्रेष्ठ आहे. ईश्वराने मद्य आणि त्याची खरेदी-विक्री निषिद्ध ठरविली आहे.
तुम्हाला माहीत आहे काय की, मी तुमच्याशी कसा व्यवहार करणार?’’
प्रेषितांचे हे शब्द कानी पडताच कुरैशजणांनी प्रेषितांशी केलेल्या धोकेबाजी, अमानुष यातना आणि मानवी हत्यांचे पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आले. कारण कुरैशजणांनी या वीस वर्षांत मुस्लिमांवर जे अमानुष अत्याचार केले होते, जी कत्तल केली होती आणि ज्या सामरिक कारवाया केल्या होत्या, त्या आठवून त्यांचे काळीज फाटत होते. त्यांना वाटत होते की, आता प्रेषित या यातनांचा बदला घेतील. थरथरत्या आत्म्याने त्यांनी प्रेषितांना हाक दिली,
‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही प्रामाणिक व दयाळू व्यक्तीची प्रामाणिक व दयाळू संतती आहात. आम्हास क्षमादान द्यावे!’’
दयाळू प्रेषित मुहम्मद(स) उत्तरले, ‘‘आज तुम्हा सर्वांना क्षमादान देण्यात येत आहे. आज कोणाचीही पकड होणार नाही. जा! तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात!!!’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या सोबत्यांवर कुरैशजणांनी जे अमानुष अन्याय व अत्याचार घडवून आणले होते, ते पाहता जगातील कोणत्याही माणसास असे वाटल्याशिवाय राहणार नाही की, विजय प्राप्त झाल्यावर विजयी पक्ष पराभूत पक्षाकडून बदला घेईल. एकेका छळाचा आणि एकेका रक्ताच्या थेंबाचा बदला घेतला जाईल. कारण क्षमा करण्यासारखा कोणाचाच गुन्हा नव्हता. त्यांच्या अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने रक्ताळळेली होती. परंतु प्रेषितांचे अंतःकरण किती प्रेमळ आणि दयाळू होते. ते केवळ एक विजयी शासक नव्हते, तर ते परम दयाळू आणि कृपाळू ईश्वराचे प्रेषित होते. केवळ मानवावर विजय मिळवून शासन हस्तगत करण्याचा हेतु मुळीच नव्हता, तर सर्व मानवजातीचे नवनिर्माण करण्याचा त्यांचा हेतु होता.
प्रेषितांची ही महीम शान होती की, त्यांनी मुहाजिरीन (ज्यांनी कुरैशजणांच्या अत्याचारांमुळे विवश होऊन वतनत्याग केला होता.) यांना आदेश दिले की, त्यांच्या ज्या जमिनी आणि संपत्तींवर स्थलांतराच्या वेळी ज्यांनी ताब्यात घेतल्या होत्या, त्या त्यांनाच राहू द्या. मग काबागृहाची मागवून घेतलेली चावी ‘उस्मान बिन तलहा’ नावाच्या त्याच माणसाच्या स्वाधीन केली, ज्याने मागे एकदा द्वार उघडण्याची प्रेषितांची विनंती धुडकावली होती. त्यावेळी प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले होते,
‘‘हे उस्मान! निश्चितच एक दिवस असा येईल की चाबी माझ्या ताब्यात येईल आणि मला योग्य वाटेल त्यास मी ही चावी देईन!’’
प्रेषितांच्या ठिकाणी दुसरा विजेता असता तर त्याने ही चावी मागच्या घटनेचा वचपा काढण्यासाठी कोणाच्याही स्वाधीन केली असती आणि ‘उस्मान बिन तलहाची मान त्याच्या तलवारी खाली आली असती.
परंतु प्रेषितांनी म्हटले, ‘‘आजचा दिवस चांगुलपणा भलाईचा व क्षमेचा आहे!’’
मग प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या घरी गेले आणि स्नान करून आठ रकअत नमाज अदा करून ईश्वराची कृतज्ञता व्यक्त केली. विजयाच्या दुसर्या दिवशी ‘सफा’ टेकडीवरून संबोधित करताना काबागृहाचे प्रतिष्ठा बहाल केली. सार्वजनिक माफीतून केवळ ‘अब्दुल उज्जा बिन मक्तल’ नावाचा अपराधी वगळण्यात आला होता. त्यास मृत्यूदंड देण्यात आला.
मक्का विजयाशी संबंधित घटनांची एक मोठी शृंखला आहे. बर्याच घटनांना कात्री देण्यात आली. सर्वांत महत्त्वाची बाब जी या विजयाशी संबंधित आहे ती अशी की, जगातील कोणत्याही इतर शक्तीने मागील चौदा शतकादरम्यान विजयाचे असे आदर्श उदाहरण सादर केलेले नाही की, कोणाकडूनही बदला घेतला गेला नाही व कोणाच्याही सन्मानात बाधा येऊ दिली नाही. कोणत्याही महिलेच्या इभ्रतीस हात लावण्यात आला नाही. हे आदर्श उदाहरण केवळ त्याच व्यक्तिमत्त्वाचे (अर्थात प्रेषित मुहम्मद(स) यांनीच) सादर केले जे संपूर्ण मानवतेवर परमोपकारी होय. मग परत समता व न्यायाची ही घोषणा की, ‘‘संपूर्ण मानवजात ‘आदम’चीच संतती असून कोणीही कोणत्याच परिने श्रेष्ठ व नीच नाही. श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, ज्याचे आचरण श्रेष्ठ आहे,’’ ही घोषणा संपूर्ण मानवजगताच्या कल्याणासाठीच होती.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *