Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामची नैतिक व्यवस्था

इस्लामची नैतिक व्यवस्था

माणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक संवेदना आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे. स्वार्थ, निष्ठुरता, कंजूषपणा, संकुचित दृष्टी यांना कधीही मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही. धैर्य व सहनशीलता, दृढनिश्चय, गंभीरता, धाडस व हिंमत व शौर्य हे ते गुण आहेत, ज्यांना सदैव प्रशंसा लाभली आहे. उतावळेपणा, पोरकटपणा, चंचलता, उत्साहीनता व भ्याडपणा यांना कधीही चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. आत्मसंयम, स्वाभिमान, सौजन्य व मनमिळाऊपणा यांची गणना सद्‌गुणात होत आली आहे. विकारादीनता, क्षुद्रपणा, असभ्यता व उद्धटपणा यांचा कधीही चांगल्या गुणांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. कर्तव्यतत्परता, एकनिष्ठता, दक्षता आणि जबाबदारपणा यांचा नेहमी आदर केला गेला. कर्तव्य पराड्‌मुख, अप्रामाणिक, कामचुकार व बेजबाबदार यांना कधी चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. याचप्रमाणे सामूहिक जीवनाच्या चांगल्या व वाईट गुणांच्या बाबतीतसुद्धा मानवतेचा निर्णय एकमुखीच झालेला आहे.
ज्यामध्ये शिस्त व नियमबद्धता असते, परस्पर सहकार्य व सहयोग असतो, आपापसात प्रेम व सद्‌भाव असतो, सामूहिक न्याय व सामाजिक समता असत, प्रशंसेस पात्र नेहमी तो समाज झाला आहे. भेदभाव, गोंधळ बेशिस्त, अव्यवस्था, दुही, परस्पराबद्दल दुर्भाव, अत्याचार, असभ्यता यांची सामूहिक जीवनाच्या कल्याणकारक गोष्टीमध्ये कधी गणना झालेली नाही. असाच प्रकार चारिÍयाच्या सदाचार व दुराचाराबद्दलसुद्धा आहे. चोरी, व्यभिचार, खून, दरोडा, फसवेगिरी, लाच लुचपत यांना कधी चांगले आचरण मानले गेले नाही. शिवीगाळ, अत्याचार, कुचाळी, चहाडी, हेवा, मत्सर, आळ, बदनामी, दंगेखोरी यांना कधी सदाचार मानला गेला नाही. लबाड, अहंकारी, दंगलबाज, ढोंगी, हटधर्म व आधाशी लोकांचा कधी चांगल्या लोकांमध्ये समावेश करण्यात आला नाही. याउलट आईवडिलांची सेवा, नातलगांचे साहाय्य, शेजारपाजाऱ्यांशी चांगली वागणूक, मित्रांच्याबरोबर निष्ठा, दुर्बलांचे समर्थन, अनाथ व निराधारांची देखभाल, रोग्यांची शुश्रूषा आणि आपदग्रस्त लोकांचे साहाय्य यांना नेहमी सदाचार मानला गेला आहे. सुशील मधुरभाषी, सौम्य वृत्तीच्या व शुभचिंतक लोकांना नेहमी आदराने पाहिले गेले आहे. सरळमार्ग व शुभचिंतक लोकांनाच मानवता आपला चांगला घटक मानत आलेली आहे. प्रत्येक बाबतीत ज्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, ज्यांचे बाह्यरूप व अंतरंग सारखे आहे, ज्यांच्या उक्ती व कृतीमध्ये मेळ व सुसंगती आहे, जे आपल्या हक्काच्या बाबतीत अल्पसंतुष्ट व इतरांच्या हक्काच्या बाबतीत उदार आहेत, जे स्वत: शांततेचे जीवन जगतात व इतरांना शांततामय जीवन जगू देतात, ज्यांच्याकडून प्रत्येकजण चांगल्याची आशा करतो व कोणालाही त्यांच्याकडून वाईट होण्याचे भय नसते, अशा लोकांचासुद्धा मानवतेने आपल्या चांगल्या घटकात समावेश केलेला आहे.
यावरून स्पष्ट होते की मानवी नैतिक तत्वे वस्तुत: अशी जागतिक सत्ये आहेत ज्यांना सर्व लोक नेहमी परिचित झालेले आहेत. सदाचार व दुराचार यांना शोधण्याची आवश्यकता नाही. त्या काही लपलेल्या गोष्टी नसून मानवाच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. यांची जाणीव माणसाला स्वाभाविकरीत्या व्हावी अशी योजना केली गेली आहे आणि म्हणूनच पवित्र कुरआन आपल्या भाषेत सदाचाराला “”मअरुफ” (चांगले) व दुराचाला “मुनकर” (वाईट) या शब्दांनी संबोधितो, म्हणजे सदाचार तो आहे जो सर्वांना आवडतो आणि दुराचार तो ज्याला कोणीही पसंत करीत नाही. याच वस्तुस्थितीला पवित्र कुरआनने माणसाला अल्लाहने चांगले व वाईट ओळखण्याचे ज्ञान व विवेकशक्ती अंत:प्रेरणेने दिले आहे, असे म्हटले आहे.
प्रश्न हा आहे की नीतीचा चांगला व वाईटपणा सुपरिचित असताना आणि गुण सद्‌गुण व काही दुर्गुण असल्याबद्दल लोकांचे नेहमी एकमत असताना जगामध्ये निरनिराळ्या नैतिक व्यवस्था का अस्तित्वात आहेत? त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कोणत्या आधारावर आहे? आणि आम्ही जेव्हा इस्लामची स्वतंत्र अशी एक जीवन व्यवस्था आहे असे म्हणतो ते कोणत्या आधारावर आणि नीतीच्या प्रश्नात इस्लामची ती खास वैशिष्टयपूर्ण देणगी कोणती?
हा प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण जेव्हा जगातील निरनिराळ्या नैतिक व्यवस्थेची पाहणी करतो तेव्हा प्रथम नजरेस एक फरक आपल्याला आढळून येतो. निरनिराळ्या नैतिक गुणांना जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आणि त्यांची मर्यादा, त्यांचे स्थान व त्यांचे कार्य ठरविणे आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता कायम करणे या बाबीमध्ये या सर्व व्यवस्था एकदुसऱ्याहून भिन्न आहेत. अधिक विचार केल्यास या फरकाचे कारणही स्पष्ट होते. वस्तुत: नैतिक उच्चनीचतेचे प्रमाण ठरविणे आणि चांगल्या व वाईटाच्या ज्ञानाचे साधन निश्चित करणे याबाबतीत त्याच्यामधील विभिन्नता हे त्या फरकाचे कारण आहे आणि त्यांच्यामध्ये या बाबतीतही मतभेद आहेत की नैतिक कायद्याच्या मागे अंमलबजावणीची शक्ती कोणती असावी की जिच्या सामथ्र्याद्वारे त्याची अंमलबजावणी व्हावी? आणि माणसाला या कायद्यानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? परंतु जेव्हा आपण या मतभेदाच्या कारणाचा शोध घेतो तेव्हा शेवटी ही वस्तुस्थिती उघड होते की या सर्व नैतिक व्यवस्थेचे मार्ग ज्या मूळ गोष्टीने वेगवेगळे केले आहेत ती ही आहे की त्याच्यामध्ये विश्वाची कल्पना, विश्वामधील माणसाचे स्थान व मानवी जीवनाचा उद्देश याबद्दल मतभेद आहेत आणि याच मतभेदाचे अथपासून इतिपर्यंत त्यांचा आत्मा, त्यांची वृत्ती व त्यांचे स्वरूप यांना एक दुसऱ्यापासून अगदी भिन्न करून टाकले आहे.
मानवी जीवनात खरे निर्णयात्मक प्रश्न हे आहेत की या विश्वाचा कोणी ईश्वर आहे किंवा नाही? आहे तर मग तो एक आहे की अनेक? ज्याचे ईशत्व मानावयाचे त्याचे गुण काय आहेत? मनुष्याशी त्याचा संबंध काय आहे? त्याने मनुष्याच्या मार्गदर्शनाची काही व्यवस्था केली आहे किंवा कसे? मनुष्य त्यांच्यासमोर उत्तरदायी आहोत किंवा नाही? उत्तरदायी आहे तर कोणत्या प्रकारचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे? आणि ज्याला समोर ठेवून आपण कार्य करतो तो आमच्या जीवनाचा उद्देश व शेवट काय आहे? या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप जसे असेल त्यानुसारच जीवनाची व्यवस्था ठरेल आणि त्याला अनुरूप अशी नैतिक व्यवस्था तयार होईल.
या छोट्याशा भाषणात जगातील निरनिराळ्या जीवनव्यवस्थेचा परामर्श घेऊन कोणत्या व्यवस्थेने या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचा, त्याचे स्वरूप व मार्गाच्या निश्चितीवर काय प्रभाव पडला आहे हे दाखवून देणे कठीण आहे. येथे फक्त इस्लामसंबंधी निवेदन आहे की तो या प्रश्नांचे काय उत्तर देतो आणि त्या आधारावर कोणत्या विशिष्ट प्रकारची नैतिक व्यवस्था अस्तित्वात येते.
इस्लामचे उत्तर हे आहे की या विश्वाचा स्वामी अल्लाह आहे आणि तो अल्लाह एकटाच आहे. त्यानेच या विश्वाला निर्माण केले आहे. तोच याचा एकमात्र स्वामी, शासक व पालनकर्ता आहे आणि त्याच्या आज्ञापालनावरच ही सारी व्यवस्था कार्य करत आहे. तो बुद्धिमान आहे, सर्व शक्तिमान आहे, दृश्य व अदृश्य गोष्टी जाणणारा आहे, तो सर्व दोषापासून व सर्व वैगुण्यापासून पवित्र आहे आणि त्याचे ईशत्व अशा पद्धतीवर कायम आहे ज्यामध्ये कसलीही वक्रता अगर गोंधळ नाही. माणूस त्याचा जन्मजात गुलाम आहे. त्याचे काम हेच आहे की त्याने आपल्या निर्मात्याची गुलामी व आज्ञापालन करावे. त्याचे जीवन म्हणजे अल्लाहची संपूर्ण गुलामी दुसरी कोणतीही पद्धत त्याच्यासाठी योग्य नाही आणि या गुलामीची – आज्ञापालनाची – पद्धत ठरविणे हे माणसाचे काम नसून तो ज्याचा गुलाम आहे त्या अल्लाहचे काम आहे. अल्लाहने त्याच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठविले आहेत आणि ग्रंथ उतरविले आहेत. माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या जीवनाची व्यवस्था याच मूळ शिकवणीच्या आधारावर बनवावी. माणूस आपल्या जीवनाच्या सर्व कामाबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे आणि हे उत्तरदायित्व त्याला या जगात नव्हे तर आखिरतमध्ये करावयाचे आहे. जगातील सध्याचे जीवन हा परीक्षेचा अवधी आहे आणि येथे माणसाची सारी धावपळ या ध्येयावर केंद्रित झाली पाहिजे की परलोकाच्या उत्तरदायित्वात अल्लाहसमोर त्याने यशस्वी व्हावे. या परीक्षेत माणूस आपल्या संपूर्ण अस्तित्वासह सामील आहे. त्याच्या सर्व शक्तीची व योग्यतेची परीक्षा आहे. माणसाचा साऱ्या विश्वात ज्या ज्या वस्तूशी जसा जसा संबंध येतो, त्याची निस्पृह चौकशी केली जाईल की त्याने त्यांच्याशी कसा कसा व्यवहार केला आणि ही चौकशी ती शक्ती करणार आहे. तिने जमिनीचा कणन्‌-कण, हवा, पाणी, सृष्टीच्या लहरी आणि खुद्द माणसाचे अंत:करण व मेंदू आणि त्याचे हात व पाय यावरील त्याच्या हालचाली व स्तब्धता यांनाच नव्हे तर त्याच्या विचारांचा व संकल्पांचा खराखुरा पुरावा तयार ठेविला आहे.
हे ते उत्तर आहे जे इस्लामने जीवनाच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी दिलेले आहे. ही विश्वाबद्दलची व मानवाबद्दची कल्पना त्या खऱ्या व परम कल्याणाला निश्चित करते, ज्यापर्यंत पोहोचणे हा माणसाच्या आचरणाचा, प्रयत्नांचा व त्याच्या धावपळीचा उद्देश असला पाहिजे आणि हे कल्याण म्हणजे ईशप्रसन्नता. इस्लामच्या नैतिक व्यवस्थेत याच प्रमाणाधारे एखाद्या आचरण पद्धतीची पारख करून हा निर्णय केला जातो की ही पद्धत चांगली आहे की वाईट. हे ठरविल्याने नीतीला तो कणा प्राप्त होतो ज्याच्याभोवती नैतिक जीवन फिरत असते आणि त्याची स्थिती नांगर नसलेल्या, जोराच्या वाऱ्यांनी, समुद्राच्या लाटांनी सैरावैरा हिंदोकळणाऱ्या जहाजासारखी होत नाही. ही निश्चिती एक केंद्रिय उद्देश समोर ठेविते. त्यानुसार जीवनामधील साऱ्या नैतिक गुणाची योग्य मर्यादा, योग्य स्थान व योग्य व्यावहारिक स्वरूप ठरविले जाते आणि आपल्याला ती कायमस्वरूपाची नैतिक मूल्ये लाभतात जी बदलत्या परिस्थितीतदेखील आपल्या जागी स्थिर व कायम राहू शकतात आणि सर्वांत मोठी गोष्ट ही आहे की ईशप्रसन्नता हे उद्दिष्ट ठरल्यानंतर नीतीला एक उच्चतम उद्देश प्राप्त होतो, ज्याआधारे नैतिक उन्नतीच्या संभावना अनंत होऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या स्वार्थपणाच्या घाणीने मलीन होत नाहीत.
प्रमाणाबरोबरच इस्लाम आपल्या विश्वाबद्दलच्या व माणसाबद्दलच्या दृष्टिकोनाद्वारे नैतिक उच्चनीचतेच्या ज्ञानाचे एक कायमचे साधनसुद्धा उपलब्ध करून देतो. त्याने आपल्या नैतिक ज्ञानाला निव्वळ बुद्धी, इच्छा, अनुभव वा मानवी विद्येवर अवलंबून ठेवलेले नाही. तसे असते तर, त्याच्या सतत बदलणाऱ्या निर्णयाने आपले नैतिक आदेशसुद्धा बदलत गेले असते व त्यांना कधीच स्थिरता लाभली नसती. याउलट त्याने आपल्या एक निश्चित ज्ञानाचा झरा दिलेला आहे, म्हणजे ईशग्रंथ आणि त्याच्या पैगंबराची सुन्नत (पद्धत), याद्वारे आम्हाला प्रत्येक काळात नैतिक शिकवण लाभते आणि ही शिकवण वैयक्तिक जीवनाला लहान सहान प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मोठमोठ्या समस्यांपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व पैलूमध्ये आमचे मार्गदर्शन करते. त्यांच्यामध्ये जीवनाच्या व्यवहारावर नैतिक तत्वांचा अतिव्यापक असा वापर केला गेल्याचे आढळून येते. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता भासत नाही.
विश्वाबद्दलच्या व मानवाबद्दच्या इस्लामच्या याच कल्पनेमध्ये ती अंमलबजावणीची शक्तीसुद्धा आहे जी नैतिक कायद्याच्या पाठीशी असणे आवश्यक असते आणि ती शक्ती म्हणजे अल्लाहचे भय. आखिरतच्या (पारलौकिक) चौकशीची काळजी आणि कायमचे भवितव्य खराब होण्याचा धोका. इस्लाम जरी अशी एक शक्ती व लोकमत तयार करू इच्छितो जी सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्ती¨ना व गटांना नीतीनियमाचे पालन करण्यावर विवश करणारी असेल आणि इस्लाम अशी एक राजकीय व्यवस्थादेखील प्रस्थापित करू इच्छितो जिच्या शासनाद्वारे नैतिक कायद्याला सक्तीने लागू केले जाईल, परंतु त्याचा खरा विश्वास या बाह्य दबावावर नाही तर त्या आंतरिक दबावावर आहे, ज्याचा अल्लाहवरील व आखिरतवरील (परलोकावरील) ईमान(श्रद्धा) मध्ये समावेश आहे. नैतिक आदेश देण्यापूर्व इस्लाम माणसाच्या मनात ही गोष्ट वसवितो की, तुझा व्यवहार “वस्तुत: त्या अल्लाहबरोबर आहे, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागी तुला पाहात आहे. तू साऱ्या जगापासून स्वत:स लपवू शकतोस, परंतु त्याच्यापासून स्वत:स लपवू शकत नाहीस. साऱ्या जगाला धोका देऊ शकतोस, परंतु त्याला धोका देऊ शकत नाहीस. जगापासून पळून जाऊ शकतोस, परंतु त्याच्या पकडीपासून वाचून कोठे जाऊ शकत नाहीस. जग फक्त तुझ्या बाह्य रूपाला पाहू शकते, परंतु अल्लाह तुझ्या संकल्पांना व तुझ्या हेतूंनासुद्धा जाणतो. जगामधील या अल्पशा जीवनात तू जे वाटेल ते कर. परंतु तुला शेवटी एके दिवशी मरावयाचे आहे आणि त्या न्यायालयात तुला हजर व्हावयाचे आहे जेथे वकिली, लाचलुचपत, शिफारस, खोटी साक्ष, धोकेबाजी व फसवेगिरी हे काही चालू शकणार नाही आणि तुझ्या भविष्याचा निस्पृह निवाडा केला जाईल.” ही निष्ठा निर्माण करून इस्लाम प्रत्येक माणसाच्या मनात एक पोलिस चौकीच बसवित आहे, जी आतून त्याला आदेशांचे पालन करण्यास विवश करीत असते, मग बाहेरून या आदेशांचे पालन करावयास लावणारे एखादे फौजदारी न्यायालय वा तुरूंग असो वा नसो. इस्लामच्या नैतिक कायद्यामागे खरी शक्ती हीच आहे जी त्याला अंमलात आणते. लोकमत व शासनाची शक्ती याच्या समर्थनार्थ असल्यास दुधात साखरच. नाहीपेक्षा फक्त ही श्रद्धा मुस्लिम व्यक्ती¨ना व मुस्लिम समाजाला सरळमार्ग लावू शकते, फक्त ही श्रद्धा माणसाच्या मनात रूजणे आवश्यक आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *