अता महंमद, कन्नड
मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा शक्तीस्रोत : एकेश्वारवाद आहे.
अल्लाह हा या संपूर्ण विश्वाचा, विश्वातील चराचर सृष्टीचा पालनकर्ता, शासक, मालक, व्यवस्थापक, सार्वभौम, सत्तेचा स्वामी , स्वयंपूर्ण, सर्वज्ञ, एकमेवाद्वितीय व अविभाज्य असल्याचे इस्लाम मानतो.
हे चंद्र, सूर्य, तारे व धरती अब्जो वर्षांपासून भ्रमण करताहेत. सर्व अल्लाहच्या आदेशाला बांधलेले आहेत. आकाशाला त्याने छत बनविले. जीवितासाठी हवा, पाणी, वर्षा, अन्नधान्य, फलोपहार व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू निर्मिल्या. जगातील प्रत्येक वस्तू त्या अल्लाहवर विसंबून आहेत. परंतु तो कोणावर विसंबून नाही. म्हणून पवित्र कुरआनमध्ये असा उल्लेख आहे की या सृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर साम्राज्य विस्तारासाठी त्यांच्यात भांडणे झाली असती व ही प्रचलित व्यवस्था केव्हाची कोलमडून पडली असती.
मानवाने ईश्वरी व्यवस्थेला बाजूला ठेवून जी धोरणे व व्यवस्था अमलात आणल्या त्या सर्व निरर्थक, निष्प्रभ व असफल ठरल्या. मग ती व्यवस्था सेक्युलर असो, जातीयवादी फासिस्ट असो, कम्युनिस्ट असो कोणतीही असो. केवळ पोकळ नारेबाजी आणि आंधळ्या-बहिऱ्या इच्छेतून लोकांना भाषणांच्या आहारी नेऊन सत्तेचा लाभ घेत राहण्यापलीकडे यांच्याजवळ दुसरे कोणतेही उपाय नाहीत, हे कटु सत्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी साडेचौदाशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ व सर्व प्रकारच्या विषमतेची सर्व भिंताडे पाडली. प्राचीन इतिहास आरंभापासून लाखो दासदासींनी भरलेला आहे. त्या प्रथेला संपुष्टात आणून जगभर प्रेम, दया करुणा व सहिष्णुतेचा संदेश पोहचविला व त्याला प्रत्यक्षात प्रस्थापित केले.’इस्लाम’ हा अरबी शब्द आहे व त्याचा अर्थ होतो- शांती. आत्मसमर्पण, आज्ञापालन, शिर नमविणे. ’मुस्लिम’चा अर्थ होतो- आज्ञाधारक, आत्मसमर्पण करणारा, शिर नमविणारा व शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारा. पवित्र कुरआनच्या अनुसार मर्यादा सांभाळून वागणारा म्हणजे विशिष्ट प्रकारे वागण्याची प्रक्रिया अवलंबविणारा म्हणजेच कर्तव्यदक्ष व्यक्तिलाच मुस्लिम म्हटले गेले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ”लोकांच्या कामी येऊन मनाला आनंद मिळत असेल व दुसऱ्याला आपणाकडून त्रास झाला तर मनात वेदना उठत असतील तर तुम्ही मुस्लिम आहात.” ज्याच्या छळापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल, जो पोट भरून जेवत असेल व शेजारी उपाशी झोपला असेल तर तो मुस्लिम नाही.”असे शेकडो आदेश आहेत की ज्यांचे पालन प्रत्येक मुस्लिमाला अत्यावश्यक आहेत.
0 Comments