“जो माणूस ‘हज’ अगर ‘उमरा’ अगर ‘जिहाद’ करण्याच्या इराद्याने घरातून निघाला आणि वाटेत त्याला मृत्यू आला तर सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून त्याला तेच पुण्य व फळ लाभेल, जे हाजी, गाजी व उमरा करणाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे.”
(मिश्कात)
माननीय अबू दर्दा (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“जो माणूस तहज्जुद’ ची नमाज अदा करण्याचा संकल्प करून झोपला, परंतु त्याला गाढ झोप लागली व पहाट झाली तरी तो उठू शकला नाही. अशा माणसाच्या कर्मपत्रामध्ये त्या रात्रीची तहज्जुदची नमाज लिहिली जाईल आणि त्याला लागलेली झोप ही त्याला त्याच्या पालनकर्त्याकडून लाभलेली देणगी समजली जाईल.”
(इब्ने माजा, नसाई) पवित्र कुरआनचे स्मरण ताजे ठेवा ___ माननीय उबैदा मुलैकिई (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“हे कुरआनला मानणाऱ्या लोकांनो! कुरआनला उशी बनवू नका. रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा. त्याच्या अध्ययन, अध्यापन नियमीत करा त्याच्या शब्दांना योग्य प्रकारे वाचा. जे काही कुरआनमध्ये निवेदन केले गेले आहे त्यावर मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने चिंतन व मनन करा, म्हणजे तुम्हाला यश लाभू शकेल आणि त्याचे पठन ऐहिक जीवनासाठी नव्हे तर अल्लाहची प्रसन्नता लाभावी म्हणून करा.” (मिश्कात)
कुरआनला उशी बनवू नका. म्हणजे कुरआनबद्दल निष्काळजी राहू नका. पवित्र कुरआन हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ, कुरआनला मानणारे लोक म्हणजे मुस्लिम. मुस्लिमांनी नेहमी पवित्र कुरआनचे पठण केले पाहिजे. पवित्र कुरआनची शिकवण समजावून घेणे, ती दुसऱ्याना समजावून सांगणे व त्या शिकवणीनुसार स्वत: आचरण करणे व दुसऱ्याना त्यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहन देणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. हे सर्व अल्लाहची प्रसन्नता लाभावी या एकमेव उद्देशाने झाले पाहिजे.
सदाचाराची व्याप्ती माननीय अबू हुरैरह (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“दोघांमध्ये समझोता घडवून आणा. हा सदाचार आहे. तुम्ही तुमच्या वाहनावर कोणाला बसवून घेतले वा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवून घेतले तर तोही सदाचार आहे. चांगली गोष्ट सांगणे हाही सदाचार आहे. तुमचे प्रत्येक पाऊल जे नमाजासाठी उठते, तो सदाचार आहे. रस्त्यामधून दगड, काटे दूर करणे हासुद्धा सदाचार आहे.” १ तहज्जुद-रात्रीच्या शेवटच्या प्रहरी प्रात:कालापूर्वी एकांतवासात अदा केली जाणारी नमाज. हिचे महत्त्व फार आहे व फळही मोठे आहे.
0 Comments