- प्रा.डॉ.महबुब सय्यद
विषमता ही कोणत्याही समाजाला लागलेली कीड असते. ही विषमता गरीब-श्रीमंत, मालक-गुलाम, स्पृश्य-अपृश्य, उच्च-नीच आदी विविध प्रकारची असते. या विषमतेमुळे समाजात सुख शांती नांदू शकत नाही किंवा समाजाचा विकास होऊ शकत नाही. उलट असा समाज अंतर्गत यादवी आणि कलहामुळे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता असते. इतिहासाच्या पानापानावर त्याची अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो.
माणसामाणसामध्ये भेदभाव करणे, कोणाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजणे हे गैर आहे. कारण ईश्वराच्या दृष्टीने सर्व समान आहेत, सर्वांना परमेश्वराने एका पुरुषापासून आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आहे. परमेश्वराजवळ भेदभाव नाही. हवा, पाणी, चंद्र, सूर्य, तारे सर्वांसाठी आहेत. सर्व माणसांच्या जन्माची आणि मरणाची पद्धत एकच आहे. सर्वांच्या शरीरात लाल रंगाचेच रक्त असते. ते हिरवे, निळे किंवा भगवे नसते. मग असे असतानाही एक माणूस दुसर्या माणसापासून वरच्या दर्जाचा कसा असू शकतो. हे हजरत मुहम्मद पैगंबरसाहेबांना साफ नामंजूर होते.
किंबहुना समता, न्याय आणि हक्क ही पैगंबरसाहेबांचीच देणगी आहे. त्यांनी गुलामांना आणि स्त्रियांना माणूसपणाचे अधिकार दिले. स्त्रिया शुद्र नाहीत, त्यांनाही मुक्तीचा अधिकार आहे हे सर्वप्रथम त्यांनीच स्पष्ट केले. चौदाशे वर्षापूर्वी त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा, दिव्य कुराणच्या अध्ययन आणि अध्यापणाचा अधिकार दिला. संपत्तीचा हक्क दिला. वारसा हक्क प्रदान केला. खुलाअच्या माध्यमातून स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार दिला.
विधवांना पुनर्विवाहाचा हक्क प्रदान केला. हुंड्याची प्रथा हराम केली. मुलगा-मुलगी असा भेद करू नका तसेच मुलींना जिवंत गाडू नका अशी सक्त ताकीद पैगंबरसाहेबांनी दिली.
कष्ट करणार्यांच्या संदर्भात तर ते म्हणतात की मजुराचा घाम जमिनीवर पडण्यापूर्वी त्याची मजुरी अदा करा. मजुराच्या क्षमतेपेक्षा अधिक भार त्याच्यावर टाकू नका. पूर्वीच्या काळी गुलाम ही माणसे नव्हेत अशी भूमिका होती. किंबहुना गुलाम म्हणजे दोन पायाचा पशु मानला जात होता. रोमन साम्राज्यात तर स्वतंत्र नागरिकांच्या मनोरंजनासाठी जिवंत गुलामांना वखवखलेल्या वाघसिंहाच्या जबड्यात फेकले जात असे.
दोन गुलामांना एकमेकांच्या विरोधात हाती शस्त्र घेऊन किंवा न घेता मरेपर्यंत लढविले जाई. रोमन सम्राटाच्या रात्रीच्या शाही खान्याच्यावेळी प्रकाश पडावा म्हणून गुलामाच्या अंगाला तेल चोपडून त्यांना पेटविले जाई आणि त्यांच्या भेसूर किंकाळ्या आणि जळणार्या प्रकाशात सम्राटाची मेजवानी पार पडत. गुलामांना खास लढण्यासाठी तयार केले जाई.
त्यासाठी उत्तमोत्तम खुराक आणि धारधार शस्त्रास्त्रे दिली जात. त्यांचे रक्त सांडत असताना रोमन ललना आपले इवलसे रुमाल आणि डोक्यावरील हॅट हवेत उंचावून आनंदाने चित्कारत असत. आजच्या बॉक्सिंगचा उगम रोमनांच्या या खेळात आहे हे ध्यानात घेतले म्हणजे त्यातील हिंस्त्रता आणि अमानुषता आपल्या लक्षात येईल. या योद्धे गुलामांना म्हणजे ग्लॅडिटियरला माणूसपणाचे कोणतेही हक्क नसत. एखाद्या बकर्याला मांसासाठी जसे पोसले जाते तसे या गुलामांना पोसले जाई. या गुलामांच्या जीवावरच रोमन राजेरजवाडे चैन करीत, ऐषाआरामात राहत. सगळी कष्टाची आणि धोक्याची कामे गुलामांकडून करवून घेत. गुलामगिरीचा हा काळ म्हणजे मानवी समाजाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे.
अशा या गुलामांना पैगंबरसाहेबांनी माणूस बनविले. या हिन, दीन, माणूसपण नाकारलेल्या सामान्य गुलामांना प्रतिष्ठा बहाल केली. तेही आपल्यासारखेच मानव आहेत. ही भावना निर्माण केली. गुलामांना मुक्त केले आणि त्यांचा विकासाचे मार्ग खुले केले म्हणूनच हे गुलाम राजे बनले. मानवी इतिहासात गुलाम राजे बनले हे केवळ पैगंबरसाहेबांमुळेच शक्य झाले. आपल्याच देशाचा इतिहास पाहिला तर दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून आलेले कुतुबुद्दीन ऐबक, शमशुद्दीन, अल्तमश, गियासुद्दीन बलबन हे पुर्वार्शमीचे गुलाम होते.
दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली आणि अखेरची महिला राजिया सुलतान ही एका सामान्य गुलामाची मुलगी होती. जवळपास इ.स. 1206 ते 1287 या काळात जवळपास नऊ गुलामांनी दिल्लीचे सुलतानपद भूषविले हे आपल्या लक्षात येईल, तसेच शेतजमिनीच्या सारा वसुलीचे नवीन नियम शोधणारा आणि गनिमी युद्धपद्धतीचा जनक निजामशाहीचा सेनापती असलेला मलिक अंबर हा एकेकाळचा हबशी गुलाम होता.
अशी अनेक उदाहरणे आपणाला इतिहासाच्या पानापानावर आढळतील. या गुलामांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार केवळ पैगंबर साहेबांच्या दिव्य शिकवणीमुळेच प्राप्त झाले, यात काहीच शंका नाही. स्वत: पैगंबरसाहेबांनी अनेक गुलामांना मुक्त केले किंवा इतरांकडून मुक्त करविले. गुलामगिरीची प्रथा नष्ट केली. सारे मानव समान आहेत.
कुणी र्शेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्व मानव आपआपसात भाऊ-बहिण आहे ही पवित्र कुराणाची शिकवण पैगंबरसाहेबांनी आपल्या अनुयायांमध्ये निर्माण केली. समतेवर आधारित नवा समाज निर्माण केला.
सर्व प्रकारच्या विषमतेला पैगंबरसाहेबांनी कडाडून विरोध केला. सदाचार आणि दुराचार हाच एक फरक आहे बाकी काही नाही ही पैगंबरसाहेबांची शिकवण आहे. एका हदीसमध्ये पैगंबरसाहेबांनी फर्माविले. कयामतच्या (प्रलयकाळ) दिवशी अल्लाह तुमचे गोत्र, वंश विचारणार नाही. अल्लाहपाशी सर्वात प्रतिष्ठित माणूस तोच असेल, जो सर्वांपेक्षा जास्त ईशभय बाळगणारा आहे. समता हे तत्व प्रत्यक्ष आचरणात आणून पैगंबर साहेबांनी ज्या समाजात वंशभेद, रंगभेद, वर्णभेद, भाषाभेद, गरीब-र्शीमंत भेद, उच्च नीच भेद असा कोणताही भेदभाव नाही असा एक विश्वव्यापी समाज निर्माण करून दाखविला म्हणूनच त्यांना समतेचे उद्गाते असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.
|
|||


