Islam Darshan

उपवासाची (रोजाची) आवड

Published : Thursday, Feb 04, 2016

उपवास धर्माचा एक आधारभूत स्तंभ आहे. अल्लाहचे भय व शुचिर्भूतता आणि अल्लाहशी संबंध जोडण्यात नमाजप्रमाणेच उपवासाचे (रोजा) सुद्धा फार महत्व आहे. याच कारणामुळे फर्ज रोजांच्या (अनिवार्य उपवास) शिवाय नफल (जे केले नाही तरी चालते) रोजांचीसुद्धा महत्ता सांगितली गेली आहे आणि त्यांची प्रेरणा दिली गेली आहे. हदीस आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या चरित्राच्या पुस्तकावरून ज्ञात होते की, महिलासहाबी नफल रोजे मोठ्या प्रमाणात ठेवीत असत.

उम्मुलमोमिनीन माननीय आयेशा (र) यांच्यासंबंधी साद बिन इब्राहीम म्हणतात -

‘‘त्या सदैव रोजे ठेवीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ६८)

त्यांचे पुतणे कासिम बिन मुहम्मद म्हणतात -

‘‘त्या निरंतर उपवास (रोजे) करीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ७५)

उम्मुलमोमिनीन माननीय हफ्सादेखील फार अधिक नफिल रोजे ठेवीत असत. माननीय नाफे (र) म्हणतात -

‘‘माननीय हफ्सा (र) यांचे निधन तेव्हा झाले जेव्हा त्या निरंतर उपवास करू लागल्या होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ८६)

असे एक कथन आहे की, एकदा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना घटस्फोट देण्याची इच्छा केली, तेव्हा ईश्वरसंदेश (वही) अवतरली आणि माननीय जिब्रईल (अ) यांनी सांगितले,

‘‘हफ्सा (र) यांना परत रूजू करून घ्या. ते अशासाठी की त्या फार उपवास करणाऱ्या व रात्री नमाज पढणाऱ्या आहेत आणि त्या स्वर्गातसुद्धा आपल्या पत्नी राहतील.’’ (अलइस्ती आब - ४ : २६९)

महिला सहाबींच्या नफिल रोजासंबंधी अनेक विखुरलेले प्रसंग हदीसच्या पुस्तकांत आढळतात. यावरून रोज्यासंबंधी त्यांच्या आवडीची कल्पना येते. माननीय आयेशा (र) वर्णन करतात की, त्या आणि माननीय हफ्सा (र) या दोघींनी रोजा ठेवलेला होता. इतक्यात जेवण समोर आले, तेव्हा त्या जेवल्या. माननीय हफ्सा (र) यांनी ही गोष्ट प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितली, तेव्हा दुसऱ्या दिवशी तो पुरा करण्याची (कजा) प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना आज्ञा दिली. (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)

प्रेषित मुहम्मद (स) उम्मुलमोमिनीन माननीय जुवैरिया (र) यांच्या घरी गेले. शुक्रवारचा दिवस होता. त्यांनी रोजा ठेवलेला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘तुम्ही काल रोजा ठेवलेला होता काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी परत विचारले, ‘‘उद्या रोजा ठेवण्याची इच्छा आहे काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘रोजा तोडा (सोडा)’’ एका कथनात उल्लेख आहे की, त्यांनी रोजा तोडला. (बुखारी (किताबुस्सौम))

माननीय उम्मे हानी (र) मक्का विजयाच्या दिवशीच्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) बसलेले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या डाव्या बाजूला आणि त्या उजवीकडे बसल्या होत्या. एक दासी एक पेय घेऊन आली. प्रेषित मुहम्मद (स) यांनी ते प्यायल्यानंतर माननीय उम्मे हानीकडे दिले. त्या ते (प्रसाद म्हणून लगेच) प्यायल्या आणि म्हणाल्या, ‘‘हुजूर ! माझा उपवास होता. परंतु मी (आपले उष्टे) प्याले.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘कजा (नंतर पुरा करण्याचा) चा रोजा तर ठेवला नव्हता ना ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही, नफल होता.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की, ‘‘नाफल रोजा ठेवणाऱ्याला हा अधिकार आहे की, त्याने इच्छिले तर रोजा पूर्ण करावा अथवा मध्येच तोडावा.’’ (मिश्कातुलमसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी.)

उम्मे अम्मारा म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) एके दिवशी त्यांच्या घरी आले. त्यांनी जेवण वाढले. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुम्हीही खा.’’ त्या म्हणाल्या, ‘‘माझा रोजा आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘रोजेदराच्या घरी जेव्हा जेवले जाते तेव्हा जेवण पूर्ण होईपर्यंत फरिश्ते (देवदूत) घर मालकासाठी प्रार्थना करीत राहतात.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) अहमद, तिर्मिजी, इब्ने माजाचे प्रमाण.)

रूबीअ बिन्ते मुअव्वज (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आशूरा (मुहर्रम महिन्याची दहा तारीख) च्या दिवशी अन्सारांच्या मोहल्ल्यात घोषणा करविली की, ‘‘ज्या लोकांनी जेवण-खाण केले असेल, त्यांनी संध्याकाळपर्यंत काही खाऊ नये व ज्यांनी रोजा ठेवला असेल, त्यांनी आपला रोजा पूर्ण करावा. यानंतर आम्ही स्वतःदेखील रोजा ठेवीत होतो आणि आपल्या मुलांनासुद्धा ठेवावयास सांगत होतो. जेव्हा ते भुकेने रडत असत, तेव्हा आम्ही लोकरीची खेळणी बनवून संध्याकाळपर्यंत त्यांना त्यात रमवीत असू.’’ (बुखारी (किताबुस्सौम) मुस्लिम (किताबुस्सियाम)

दुसऱ्याकडून रोजे ठेवण्याचादेखील उल्लेख आढळतो. एका महिलेने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझ्या आईचे निधन झाले आहे. तिच्यावर पंधरा रोजे फर्ज (अनिवार्य) आहेत. एका कथनात आहे की, तिच्यावर एक महिन्याचे रोजे फर्ज आहेत. अन्य एका कथनात दोन महिन्यांचे रोजे फर्ज आहेत. काय मी तिच्याकडून रोजे ठेऊ शकते ? प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘जर तिच्यावर कोणाचे कर्ज असते तर तुम्ही अदा केले नसते का ?’’ ती म्हणाली, ‘‘होय.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘अल्लाहचे कर्ज तर या गोष्टीचे अधिक हक्कदार आहे की ते अदा केले जावे.’’

एका कथनावरून असे कळते की, प्रश्नकर्ता पुरुष होता. (बुखारी (किताबुलहज्ज) किताबुस्सौम, मुस्लिम (किताबुस्सियाम) येथे हा प्रश्न धर्म विधानाच्या रूपात विवाद्य नाही, केवळ इतका संकेत पुरेसा आहे की, हनफी पंथानुसार मृत माणसातर्फे रोज्यांची पूर्तता केली जात नाही.) असेही शक्य आहे की, हे वेगवेगळे प्रसंग असतील. याचे समर्थन यावरूनदेखील होते की, प्रश्न विभिन्न प्रकारचे आहेत.

संबंधित लेख

  • इस्लामी उपासनांसंबंधी एक लक्षणीय बाब

    इस्लामी उपासनांसंबंधी एक बाब येथे लक्षणीय होय की ‘नमाज‘ ही अश्लीलता आणि दुष्कर्मांपासून रोखते, रोजासंबंधी म्हटले गेले की त्यामुळे ईशपरायणता येते व आत्मशुद्धी होते. जकात दिल्याने पावित्र्य तसेच हजमुळे मोक्ष प्राप्त होतो. अर्थात सर्व पाप धुतले जातात. यावरून स्पष्ट होते की या सर्वच बाबी गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यास सहाय्यक ठरतात. येथे ही बाबसुद्धा लक्षणीय आहे की, नमाज ज्या बाबींपासून रोखते, इतर माध्यमांनी त्यापासून मानवास रोखता येत नाही, रोजामुळे जी ईशपरायणता येते, ती इतर कोणत्याही गोष्टीमुळे येत नाही. जकातमुळे जे पावित्र्य लाभते, ते इतर कशानेच शक्य नाही.
  • लोकशाही पद्धतीने शासकांची निवड व इस्लाम

    पुष्कळशा राष्ट्रांत सध्याच्या काळात आपल्या शासकांची निवड खुल्या सार्वत्रिक निवडणुकीने केली जाते. तसेच आपण निवडलेल्या प्रतिनिधींना त्यांची कर्तव्ये व्यवस्थित रितीने पार पाडण्यात जर अपयश आले तर त्यांना पदच्युत करण्याचा किवा अधिकारापासून दूर करण्याचा अधिकार लोकांना असतो. खरे तर हे इस्लामी पद्धतीच्याच एका वैशिष्ट्याचे नवीन प्रदर्शन आहे. हेच वैशिष्ट्य इस्लामने तेरा शतकांपूर्वी जगासमोर सादर केले होते. माननीय अबू बक्र (र) व माननीय उमर (र) यांच्या काळात हा नियम लागू करणे हा चमत्कार होता, पण आज तो चमत्कार राहिला नसून, एक वास्तवता बनली आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]