Islam Darshan

पारलौकिक जीवनावर श्रध्दा

Published : Thursday, Feb 04, 2016

पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणाऱ्या व्यक्तीला खालील गोष्टींना अंतःकरणाने स्वीकारावे लागते.

१) मनुष्याची निर्मिती विशिष्ट हेतुसाठी (सकारण) केली गेली आहे. माणूस एक जबाबदार व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या निर्माणकर्त्याने (अल्लाहने) त्याला एक परिपूर्ण जीवनसिध्दान्त (मार्गदर्शन) दिला आहे. या मार्गदर्शनानुसार जीवन कंठने सदाचार आहे, पुण्य आहे. परंतु एखाद्याचा मनपसंत मार्ग स्वीकारणे की ज्याचा दिव्य प्रकटनाशी (मार्गदर्शनाशी) काहीएक संबंध नाही आणि असे जीवन कंठने हे दुराचार आणि पाप आहे.

२) माणसाचे जीवन त्याच्या मृत्युमुळे समाप्त होत नाही तर मृत्युपश्चातसुध्दा निरंतर एक जीवन आहे. त्याच्या जीवनकाळात मनुष्याचे जीवनव्यवहार भौतिकदृष्ट्या संपुष्टात येतात जेव्हा मनुष्य मरतो. परंतु त्याच्या जीवनव्यवहाराचे नैतिक परिणाम निरंतर असतात. तो अंतिम दिवस अल्लाहच्या इच्छेनुसार येणारच आहे जेव्हा ही सर्व सृष्टीव्यवस्था नाश पावेल आणि एकही सजीव जीवंत राहणार नाही. सर्वांनाच मृत्यू येणार आहे. दिव्य कुरआनच्या पारिभाषिक शब्दावलीत यास ‘‘प्रलय’’ (कयामत) म्हटले आहे.

३) प्रलय (कयामत) नंतर समस्त सजीवांना की ज्यांनी जन्म घेतला आणि मृत्यू पावले आहेत असे सृष्टीनिर्माणापासूनच्या सर्व सजीवांना पुन्हा जीवन प्रदान केले जाईल. (आत्मा आणि शरीर दिले जातील) यालाच पुनरुज्जीवन असे म्हणतात.

४) या पुनरुज्जीवनानंतर मनुष्याच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू होतो. आपणा सर्वांना अल्लाहच्या दरबारात हजर केले जाईल आणि तेथे आपल्या जीवनांच्या प्रथम सत्र (अध्याय) विषयी विचारणा होईल. आपल्या प्रथमसत्र जीवनाचा तंतोतंत हिशेब की ज्यात सदगुणांचा तथा दुर्गुणांचा एक एक कणसुध्दा नमूद केलेला असेल, अल्लाहसमोर ठेवला जाईल. हा प्रत्येकाचा हिशेब सर्वांसमक्ष ठेवला जाईल. न्यायदानाचे माप निश्चित असेल आणि प्रत्येक कार्य मोजले जाईल. ते नशीबवान ज्यांचे सदाचाराचे पारडे जड होईल त्यांना द्वितीय सत्र जीवनात बक्षीस देऊन उफत केले जाईल. ही ईशकृपा अमर्याद अशी असेल, निरंतर आणि मानवी कल्पनेपलिकडील अशी असेल. ही स्थिती प्राप्त केल्यानंतर माणसाला दुसरी कशाचीच इच्छा राहणार नाही. या स्थितीला स्वर्ग (जन्नत) असे दिव्य कुरआन संबोधन करीत आहे.

दुर्दैवी लोक ते आहेत ज्यांची स्थिती वर नमूद केलेल्या स्थितीविरुध्द असेल आणि ज्यांचे रेकार्ड पापी कृत्यांनी भरलेले असेल आणि अल्लाहसमोर जो अल्लाहचा द्रोही म्हणून उभा ठाकेल अशा माणसाला त्याजागी फेकून दिले जाईल जिथे त्याला अमर्याद आणि निरंतर वेदना, कष्ट दिले जाईल. दिव्य कुरआन या जागेला नरक (जहन्नम) असे नाव देतो.

५) जेव्हा हा हिशेब करणे पूर्ण होईल आणि त्यांचा निर्णय होईल तेव्हाच आपणा सर्वांच्या जीवनाचे द्वितीय सत्र आरंभ होईल. हा काळ (द्वितीय सत्र) निरंतर असा न संपणारा असेल. तेथील जीवन चिरंजीव असेल. तेथे मृत्यु हे नाव अनभिज्ञ असेल.

पारलौकिक जीवनाचे महत्त्व: हे मुस्लिमांसाठी (श्रध्दावंतासाठी) निर्विवाद आहे की त्यांची श्रध्दा आणि विश्वास अल्लाहवर जितका आहे तितकाच पारलौकिक जीवनावर असतो. याव्यतिरिक्त तो सच्चा श्रध्दावंत (सच्चा मुस्लिम) बनू शकतच नाही. पारलौकिक जीवनावरील श्रध्देविना अल्लाहवरील विश्वास आणि ईमान हे कुचकामी ठरते. कारण पारलौकिक जीवन हे अल्लाहच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचे परिणामस्थळ आहे. उदा. न्याय, ज्ञानी, दयाळु, प्रभुत्वशाली आणि चांगुलपणाची जाण असलेला इ. पारलौकिक जीवन आणि न्यायदिनाव्यतिरिक्त आपली श्रध्दा की अल्लाह जो या सृष्टीचा निर्माता आहे तो न्यायप्रिय आहे, ज्ञानी आहे, दयाळु आणि कृपाळु आहे आणि प्रभुत्वशाली असा आहे इत्यादी सर्व त्याचे गुण निरर्थक ठरतात.

या जगात कधी कधी आपल्या नेक कार्याचे (सत्कार्य) फळ हवेतसे मिळत नाही. येथे दुराचारी सुखसमृध्दीत ऐशआरामात आणि सदाचारी मात्र काबाडकष्ट आणि गरीबीत जीवन कंठीत राहतो.

पारलौकिक जीवनात अशी संधी जर मिळाली नाही की प्रत्येकाला त्याच्या करणीचा योग्य मोबदला मिळेल, तर अल्लाहचे वरील नमूद केलेले सर्व गुण नाकारणारी स्थिती तयार होईल. अशा स्थितीत अल्लाहवरील विश्वास आणि पारलौकिक जीवन व न्यायदिनावरील अविश्वास हे दोन्ही या जगात एकत्र नांदत आहेत. म्हणजेच श्रध्दाळु आणि विद्रोही हे दोन्ही या जगात नांदत आहेत, परंतु पारलौकिक जीवनात मात्र हे दोघे वेगवेगळे राहतील. त्यांचे तेथे एकत्र राहाणे अशक्य आहे. सदाचारी मुस्लिम जन्नतमध्ये आणि दुराचारी असा विद्रोही श्रध्दाहीन जहन्नममध्ये राहील.

मध्यस्थीची कल्पना ज्याने या जगात सदाचारी मुस्लिमाचे जीवन कंठले असेल त्याला पारलौकिक जीवनात जन्नतमध्ये प्रवेश देऊन उफत करणे हे अल्लाहच्याच फक्त हातात आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘नाकारणारे तर शंकेतच पडलेले राहतील येथपावेतो की त्यांच्यावर पुनरुत्थानाची घटका अकस्मात येईल, अथवा एक अशुभ दिनाचा प्रकोप कोसळेल. त्या दिवशी राज्य अल्लाहचेच असेल, आणि तो त्यांच्या दरम्यान निर्णय करील.’’ (कुरआन २२: ५५-५६)

आपण वरील संकेत वचनांवर बौध्दिक आणि तार्किक विचार केला तर आपणास खालील निष्कर्षच स्वीकारणे भाग पडते.

१) अल्लाह या समस्त सृष्टीचा मालक आणि शासक आहे. म्हणून अल्लाहव्यतिरिक्त इतरांच्या हातात निर्णय देण्याचा अधिकार असू शकतच नाही.

२) फक्त अल्लाहच ज्ञानी (सर्वज्ञ) आहे. प्रारंभापासून ते अंतापर्यंतचे सर्व ज्ञान त्यालाच आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाताने कोणते कृत्य घडले आहे, त्याच्या मनात काय विचार येत आहेत आणि कोणती इच्छा तो बाळगून आहे, तसेच तो रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात काय करतो हे सर्व काही अल्लाहपुढे उघडे होणारच आहेत. हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. या दृष्टिकोनातून पाहता अल्लाहसाठी निर्णय देण्याच्या प्रक्रियेत कुण्या इतरांवर अवलंबून राहाणे अशक्य प्राय आहे. त्याला कुणाच्या उपदेशाची अथवा मार्गदर्शनाची आवश्यकता मुळीच भासणार नाही. अशा वेळी हा ‘‘इतर कुणी’’ तर असा आहे की त्याला आपल्या भूत आणि भविष्याचेसुध्दा पूर्ण ज्ञान नाही. मग हे कसे शक्य आहे की या अल्प ज्ञानाने तथा अज्ञानापोटी तो अल्लाहचा सहाय्यक आणि मदतनीस बनेल? अल्लाह जो सर्वज्ञ आहे त्याला हा अज्ञानी योग्य निर्णय घेण्यासाठी काय साह्य करील?

३) अल्लाह न्यायप्रिय आहे. अशा स्थितीत अल्लाहने कुण्या इतरांच्या मध्यस्थीने अशा व्यक्तीला माफी द्यावी जी व्यक्ती आपल्या श्रध्दाहीनतेमुळे आणि कर्तृत्वामुळे माफी देण्याच्या लायक नाही. हे अल्लाहच्या न्यायप्रियतेविरुध्द आहे, हे अशक्य आहे.

थोडक्यात म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी हे अगदी अशक्यप्राय आहे की पारलौकिक जीवनातील यश हे कुण्या बाबा, वली, फकीर यांच्या मध्यस्थीने आणि शिफारशीमुळे प्राप्त होते आणि अशा दलालांच्या शिफारशींमुळे अल्लाह पापी लोकांना माफ करील. हे कृत्य अल्लाहच्या न्यायदान प्रक्रियेत दबाव आणि हस्तक्षेप आहे. ते मध्यस्थ स्वतः माफ करण्याच्या लायकीचे नसले तरी त्यांना शिफारशीचा अधिकार बहाल करणे म्हणजे मूर्खपणा आहे. दिव्य कुरआनने या कपोलकल्पित कल्पनाविलास जे आधारहीन आहेत, अशा सर्वांचे मुळासकट खंडन केले आहे आणि स्पष्ट केले आहे की पारलौकिक जीवनात मध्यस्थ (दलाल) काहीएक उपयोगी पडणार नाहीत. खरे तर असे मध्यस्थ आणि दलाल यांची काहीच गरज भासणार नाही. मध्यस्थी तेथे अशक्य आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो, जी काही धनदौलत आम्ही तुम्हाला बहाल केली आहे. त्यातून खर्च करा यापूर्वी की तो दिवस येईल ज्यामध्ये खरेदी विक्री होणार नाही, मित्रताही उपयोगी पडणार नाही आणि शिफारसदेखील चालणार नाही. आणि खरे अत्याचारी तेच आहेत जे द्रोहाचा मार्ग अवलंबितात.’’ (कुरआन २ : २५४)

म्हणून शिफारस करण्याचे, मध्यस्थीचे हे तत्त्व आधारहीन आहे. यावर जर गंभीरतेने विचार केला तर हे तथ्य उजेडात येते ही की योजना आणि युक्ती श्रध्दाहीनांची आणि द्रोही लोकांची आहे. ही योजना स्वीकार तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा अल्लाहची गुणवैशिष्ट्यें - न्यायप्रियता, सर्वज्ञता, प्रभुत्वशाली आणि निर्णय घेण्यास तत्पर अशा सर्व गुणांना नाकारले जाईल. स्वाभाविकतः हे कृत्य फक्त श्रध्दाहीन आणि द्रोही लोकच करतील, श्रध्दावंत मुस्लिम कधीच करू शकणार नाहीत.

संबंधित लेख

  • शरीअतमध्ये गुन्हेगारीवरील उपायाची स्वरुपे

    शरीअत अर्थात इस्लामी कायद्याने गुन्हेगारीवरील उपायाची तीन स्वरुपे दाखविली आहेत. पहिले स्वरुप हे अपराधाची ‘हद‘ लागू करणे होय. अर्थातच गुन्हेगाराने पूर्ण शर्तीने गुन्हा केलेला असेल तर स्वतः ईश्वराने ही शिक्षा निश्चित केलेली आहे. यात मुळीच बदल करता येत नाही. म्हणूनच या प्रकारच्या शिक्षा-उपायास शरीअतच्या परिभाषेत ‘हद‘ जारी करणे असे म्हणतात. दुसर्या उपायाचे स्वरुप म्हणजे ‘कसास‘ होय. कसास म्हणजे बदल्याची शिक्षा होय. अर्थात गुन्हेगाराने कोणास शारीरिक हानी पोचविली असेल तर जेवढी हानी पोचविली तेवढाच बदला घेण्याची शिक्षा देणे होय.
  • श्रध्दा आणि विचारसरणींचा अभ्यास

    कोणत्याही लोकसमूहाच्या विचारसरणी व त्यांच्या श्रध्देचे निरीक्षण करून त्यांचे समीक्षण व विश्लेषणाद्वारे त्यांच्यातील सत्य व असत्य वेगवेगळे करणे अत्यंत कठीण काम आहे. अशा प्रकारच्या कार्यात एकतर माणसाच्या वैयक्तिक आवडी आणि स्वजातीय पक्षपातीपणा अडथळे आणीत असतो तर दुसरीकडे वस्तुस्थितीची माहिती नसल्याने माणूस चुकीच्या दिशेने वळत असतो. परिणाम असा होतो की या संबंधाने माणसाचे सर्व परिश्रम निरर्थक ठरत असतात. आपण घेतलेल्या परिश्रमाचे एखादे असे फळ प्रस्तुत करण्यात तो अयशस्वी ठरत असतो. जेणेकरून मानवी मनातील गुंतागुंतीची उकल होऊ शकेल. आणि सत्य व असत्याला निःसंदिग्धपणे पाहिले जाऊ शकेल. किबहुना बहुधा अशा प्रकारचे प्रयत्न उलट आणखीनच गुतागुंती वाढविण्यास कारणीभूत ठरत असतात.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]