Islam Darshan

‘एकेश्वरत्व’ परिपूर्ण जीवन व्यवस्थेचा पाया आहे

Published : Thursday, Feb 04, 2016

उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईश-आराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.

मग सत्याचा इन्कार का?

ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला ईश्वराने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न- विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. ईश्वराच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.

असे घडण्याचे कारण काय?

बऱ्याच लोकांनी एकेश्वरत्व, दीन (जीवनशैली) व ईश्वरीय आदेशानुसार अस्तित्वात आलेल्या कायदा व नियमांमध्ये नवनवे विचार समाविष्ट केले आहेत. इस्लामच्या तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला गेला आहे, तर काही नियमांची काटछाट करण्यात आली आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या, त्यांना अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे व ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या, त्यांना गौण स्थान देण्यात आले आहे. याच फेरबदलास (म्हणजे वाढ व काटछाटेस) सत्य मानण्यात येत आहे. याच कारणामुळे मुस्लिम समाज अनेक विरोधी गटांत विभागला गेला आहे. इस्लामी ज्ञानापासून वंचित असलेल्यांना इस्लामचा संदेश देण्याचे काम तर बाजूस राहिले, खुद्द मुसलमानांना दिशाहीन करण्याच्या कामास पुण्यकार्य समजण्यात येत आहे. या विचित्र स्थितीने मुस्लिमांची अवस्था हास्यास्पद झाली आहे व इस्लामवर टीका करणाऱ्यांना नामी संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या मतानुसार मुस्लिमांचा स्वतंत्र समाज मुळी अस्तित्वातच नाही. मुस्लिमांची वर उल्लेखित सद्यस्थिती इस्लामच्या प्रसाराच्या मार्गातील सर्वांत मोठा अडसर आहे. ईश्वर दया करो व आम्हास सरळ मार्गाचा अवलंब करण्याची बुध्दी प्राप्त होवो.

संबंधित लेख

  • व्याज निषिद्ध असण्याचे काय कारण आहे?

    ‘व्याज’ ही इतकी वाईट बाब व महापाप आहे की, अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी त्या महापापीविरुद्ध युद्ध पुकारले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले की, व्याजाचा व्यवहार करणे हे छत्तीस वेळा व्यभिचार करण्यासम पाप आहे. प्रश्न हा आहे की, इस्लाम धर्मास व्याजव्यवहाराचा एवढा तिरस्कार व घृणा असण्याचे मूळ कारण काय आहे? इतर पापांविषयी एवढा तिरस्कार नसून शेवटी याच पातककर्माशी एवढी तेढ असण्याचे काय कारण आहे? या प्रकरणात याच प्रश्नाचे समाधान करण्यात आले आहे.
  • ‘उहुद’चे ऐतिहासिक युद्ध

    ‘सवीक’च्या युद्धानंतर मक्का सरदार ‘अबू सुफियान’ची मुस्लिमांचा वचपा काढण्याची शपथदेखील वरवर पूर्ण होताना दिसत असली तरी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या हातून व्यापारी काफिल्याशी लढाई होऊन एक लाख दिरहमचे जे नुकसान झालेले होते आणि ‘बद्र’च्या युद्धात कैदी सोडविण्यासाठी जे अडीच लाख दिरहम मोजावे लागले होते, त्यामुळे मक्का शहरात प्रेषित मुहम्मद(स) आणि मुस्लिमांविरुद्ध संताप धुमसत होता. अबू सुफियानवर मदीनावर हल्ला करण्यासाठी सतत दबाव येत होता. त्यामुळे अबू सुफियानने मदीनावर हल्ला करण्याची घोषणा केली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]