
mp3मानव-जीवनाला कल्याण व सदाचाराच्या मार्गावर चालविण्यासाठी एखाद्या आदर्शाची आवश्यकता असते. आदर्श खरे पाहता मापदंडाचे काम करतो. यावर मापून तोलून हे कळते की एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा किती भाग खरा व किती भाग खोटा आहे. मापदंड अथवा आदर्श काल्पनिक देखील असतात, जे कथा-गोष्टीच्या रूपाने उपदेशांत सांगितले जातात व ते ऐकून लोक आनंदित होतात. परंतु त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक किवा सामाजिक जीवनात होत नाही. आदर्श बनण्यासाठी केवळ इतकेच आवश्यक नाही की ते शक्य व व्यावहारिक असावे, तर हे देखील गरजेचे आहे की तो आदर्श एखाद्याचे जीवन बनलेले असावे व त्याने त्यावर चालून आदर्शाचा प्रत्यक्ष नमुना प्रस्तुत केला असावा. त्या माणसाच्या हृदयात मानवासाठी इतके प्रेम असावे की कोणीही त्याला आपला हितचितक मानावे. त्याच्या प्रेमात निमग्र होऊन त्याचे आदर्श आत्मसात करण्यासाठी त्याला नेऊ लागावे. यासाठी त्याने केवळ धनसंपत्तीची लयलूट करण्याचीच तयारी ठेवावी असे नव्हे, तर त्याने आपल्या प्राणाचे बलिदान करण्याची देखील तयारी ठेवावी.
इतिहासात अशा अगणित महापुरुषांचा उल्लेख आहे, ज्यांनी आपल्या सर्वस्वाची मानवतेच्या उत्थान व मुक्तीसाठी होळी केली. मानवाला योग्य मार्गदर्शन केले. त्या सर्वांवर ईश्वराची अपार कृपा असो! जगाच्या कोणत्याही कोपर्यात, इतिहासात कोणत्याही काळात आणि मानवांच्या कोणत्याही जातीत त्यांचा जन्म झालेला असो; आम्ही त्यांना प्रणाम करतो व आपले हार्दिक श्रध्दा-सुमन त्यांना अर्पित करतो. ते सर्वजण आमच्यासाठी आदर्श पुरुष होत.
असे असले तरी ही गोष्ट नाकारता येत नाही की कालांतराने त्यांचे जीवन-चरित्र व त्यांच्या शिकवणी सुरक्षित राहू शकली नाहीत. काही असले पुरावे उपलब्ध आहेत ज्यावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांच्या जीवनप्रणाली व त्यांच्या शिकवणीसंबंधी विस्ताराने माहिती मिळविण्यासाठी आमच्याजवळ कोणतेही प्रामाणिक साधन नाही. ईश्वराची ही मोठी कृपा होय की त्या महान विभूतींपैकी एका महान व्यक्तीचे संपूर्ण जीवन इतिहासाच्या प्रकाशझोतात आहे. त्यांच्या जीवन आणि शिकवणीसंबंधी जी काही माहिती आम्हाला हवी ती मिळू शकते. त्यात अंदाज लावण्याची गरज नाही. त्यांचे व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन व राजकीय जीवन सर्वकाही प्रकाशासारखे स्पष्ट आहे. हा प्रकाश-पुंज संपूर्ण मानवजातीची अमुल्य ठेव आहे. हे व्यक्तित्व आहे हजरत मुहम्मद(स.) यांचे.
जीवनाची एक झलक
हजरत मुहम्मद(स.) यांचा इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील ‘मक्का’ या शहरात जन्म झाला. त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे वडील परलोकवासी झाले. त्यांच्या बालपणांतच त्यांची आई व आजोबा थोड्या-थोड्या अंतराने हे जग सोडून गेले. त्यांच्या चुलत्याने त्यांचे पालन-पोषण केले. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात अशी नम्रता होती की संपूर्ण कुटूंब व शहरातील लोक त्यांचा आदर करीत असत. त्यांच्या खरेपणा व पुण्यशीलतेची चर्चा सर्वत्र होऊ लागली. बालपणी ते शेळ्या-मेंढ्या चारीत असत. तारुण्यात त्यांनी व्यापार सुरू केला. खदीजा(रजि.) नावाच्या एका धनाढ्य विधवेचा व्यापारिक माल लाटून नेत व बाजारपेठेत ते विकत असत. त्यांचा प्रामाणिकपणा व सदगुण पाहून त्या विधवेने त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव केला व तो त्यांनी मान्य केला. ते त्या काळातील सामाजिक कुरीती व लोकांच्या दुःखाने अत्यंत दुःखी होत होते. ते एका गुहेत बसून ईश्वराने चितन व समाजाच्या उद्धारासाठी प्रार्थना करीत असत. त्याच गुहेत त्यांना ईश्वरी आदेश येत असत. त्यांच्यावर ईश्वराकडून मानवजातीला मार्गदर्शन करण्याची मोठी कठीण जबाबदारी घातली गेली होती. ईश्वराने मानवकल्याणासाठी त्यांच्यावर ‘पवित्र कुरआन’ हा ग्रंथ उतरविला. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते मानवजातीला मार्गदर्शन करीत असत. समाजातील स्वार्थी व सत्ताधारी लोकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सज्जन आणि उपेक्षित लोकांनी त्यांची शिकवण आत्मसात केली. त्यांना व त्यांच्या साथीदारांना मक्का येथील दुष्ट लोकांनी घोर यातना दिल्या. त्यांना मक्का सोडून जाण्यास भाग पाडले. त्यांनी सुदूर मदीना शहरात आश्रय घेतला. मक्का वासियांनी तेथे सुध्दा आक्रमण केले. अनेक युद्धे झाली, तरीदेखील हजरत मुहम्मद(स.) यांनी त्यांच्याशी दयापूर्ण व्यवहार केला. जेव्हा मक्का शहरात दुष्काळ पडला तेव्हा, त्यांनी मदीना शहरात उंटावर धान्य लादून पाठविले. इस्लामी शिकवणींचा प्रचार चालूच राहिला. जेव्हा अरबस्तानात इस्लामचा सर्वत्र प्रसार झाला आणि अधिकांश मक्कावासियांनी इस्लामचा स्वीकार केला तेव्हा मक्का शहरावर हजरत मुहम्मद(स.) यांना विजय प्राप्त झाले व ते परत मक्का शहरी परतले. ही अशी वेळ होती जेव्हा त्यांना विरोधकांवर भरपूर सूड उगवता आला असता, परंतु त्यांनी त्या दुष्ट व अत्याचारी मंडळींना क्षमा केली. इतकेच नव्हे तर त्यांना सन्मान व श्रेष्ठत्व दिले. विजेत्याच्या या व्यवहाराने लोक अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी मान्य केले की सत्य हजरत मुहम्मद(स.) यांच्या बाजूने आहे आणि त्यांनी सुद्धा सत्याच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले.
त्यांच्या जीवनकाळातच एका मोठ्या प्रदेशावर सत्याचे राज्य स्थापित झाले. या राज्यात गरीब, अनाथ आणि पीडित व उपेक्षितांना संपूर्ण सन्मान मिळाला. माणसामाणसांतील सर्व प्रकारचे भेद-भाव संपले. हजरत मुहम्मद(स.) यांनी शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. ते स्वतः अत्यंत साधे जीवन जगत राहिले. दुसर्यांच्या सेवेकडे त्यांचे इतके लक्ष होते की स्वतः न खाता दुसर्यांना ते खाऊ घालीत असत. त्यांच्या घरी कित्येक दिवस चूल पेटत नसे. काही खजूर खाऊन पाणी पीत असत. असे होते राज्याच्या सर्वोच्च अधिकार्याचे जीवन.
आपल्या अनुयायांत सुद्धा त्यांनी असेच गुम रूजविले की ते निःस्वार्थीपणे ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सेवा-कार्यात निमग्र राहत असत. स्वार्थ व भोगविलापासून ते दूर पलायन करीत. त्या सर्व लोकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे पाहता पाहता आशिया, युरोप व आफ्रिका खंडांच्या मोठ्या भू-भागात इस्लामचा प्रसार झाला. काळे-गोरे, उच्च-नीच, सबल-निर्बल यासारखे भेदभाव संपुष्टात आले. अज्ञान व अंधःकार नाहीसा होऊ लागला. बुद्धी व विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. इस्लामचा आदर्श संपूर्ण जगात पसरला. मानवाधिकार, न्यायाधिष्ठित राज्य शांती-स्थापना, सहानुभूति, स्वातंत्र्य व संपूर्ण मानवजातीशी बंधुत्वाची वागणूक यासारख्या तत्त्वांचा त्यांना स्वीकार करावा लागला, ज्यांनी प्रत्यक्षपणे इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता. हे सिद्धांत अस्तित्वात असून देखील जगात सध्या अन्याय व अराजकता पसरलेली आहे. याचे मूळ कारण असेच आहे की या शिकवणींचा स्वीकार मनापासून केला गेला नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी या आदर्शांचे प्रदर्शन केले जाते आणि त्यांच्या आडून स्वतःच्या स्वार्थाची पूर्तता केली जाते.
हजरत मुहम्मद(स.) यांच्या जीवन-व्यवस्थेचा सार असा आहे की सत्य मार्गावर चालण्याची प्रेरक शक्ती ईश्वरावर विश्वास आणि त्याच्याशी प्रेम व त्याचे भय होय. तो न्यायपूर्ण रीतीने माणसांच्या कर्माचे फळ देणारा आहे. कोणताही चांगुलपणा अथवा वाईटपणा त्याच्यापासून लपविणे शक्य नाही. ईश्वर-प्रेमात मग्न होऊन त्याची प्रसन्नता व बक्षीस मिळविण्याची इच्छा मानवाला सत्य-मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते. त्याच्या कठोर यातनांपासून स्वतःचा बचाव करण्याची चिता त्याला दुष्कृत्यापासून अलिप्त ठेवते. खरी गोष्ट अशी आहे की ईश्वरात आस्था व परलोकातील जीवनाची कल्पना स्वीकारल्याशिवाय माणसांत टिकाऊ उत्तम गुणांचा अविर्भाव शक्य नाही.
आज सर्वात मोठी आवश्यकता अशी आहे की पुन्हा त्या शिकवणी आत्मसात केल्या जाव्यात ज्या जीवनाला सत्य-मार्गावर नेऊ शकतात. असे न केल्यास मानवता वेदना व दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही.
शिकवणींची एक झलक (हदीस व कुरआनवरून संकलित)