Islam Darshan

इस्लाम : मुक्तीचा एकमेव मार्ग

Published : Thursday, Feb 04, 2016

ही सृष्टी अतिविशाल आहे. त्यातील दूरवरच्या तार्यांचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचण्यासाठी करोडो वर्षांचा कालावधी लागतो. प्रकाशाचा वेग जरी सेंकदाला तीन लाख कि. मि. चा आहे तरी अवकाशातील तार्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहचवण्यासाठी करोडो वर्ष लागतात. अशी ही महानतम सृष्टी आपोआप बनलेली नाही. तसेच सृष्टीतील कोणतीच गोष्ट आपोआप बनत नाही. ह्या सृष्टीला आणि त्यातील सर्व वस्तूंना एका शक्तीने बनविलेले आहे. आणि ती महानतम व श्रेष्ठतम शक्ती अल्लाह आहे.

ह्या सृष्टीची अवर्णनीय अशी व्यवस्था आहे. सृष्टीतील एका कणापासून ते महान ग्रहापर्यंत सर्व एका नियमात आणि व्यवस्थेत बध्द आहेत. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत आपणास एक सुनियोजितता दिसते. हे ह्या गोष्टीचा सज्जड पुरावा आहे की ह्या सृष्टीचा एक शासनकर्ता आहे. जो ह्या सृष्टीची व्यवस्था सुनियोजितपणे आणि बुध्दीविवेकाने करीत आहे. तो सृष्टीचा शासक आणि मालक एकमेव अल्लाह आहे. वास्तविकता ही आहे की ही महानतम सृष्टी ईश्वर विरहित नाही की तिचे अनेकानेक ईश्वर सुध्दा नाहीत. एकच एक अल्लाह ह्या महानतम सृष्टीचा मालक,पालक, चालक आणि शासक आहे आणि सृष्टीतील कणाकणावर त्याचाच हुकूम आहे.

हाच ईश्वर सर्व मानवजातीचा सुध्दा मालक, पालक, नियंता आणि शासक आहे. तोच आम्हा सर्वांवर कृपाप्रसादांचा वर्षाव करणारा आहे. आमचे शरीर आमच्या शरीराचे अवयव, आमची कुवत आणि पात्रता तसेच जमिनीतील आणि जमिनी बाहेरील, समुद्र तळातील आणि वातावरणातील उपलब्ध तमाम कृपा प्रसाद अल्लाहचे निर्मित आहेत. तोच सूर्योदय करतो, हवा चालवतो आणि पाऊस पाडणारा तोच आहे. त्याने जर पाऊस पाडला नाही तर आम्हाला एकबुंद पाणी सुध्दा मिळणार नाही. त्याने ठरविले तर अमाप पाऊस पाडून पाणीच पाणी चहुकडे करून टाकतो आणि अशा स्थितीत आम्हाला जगणे कठीण होवून बसते. आम्ही पाण्याचे एक एक थेंब आणि धान्याचा एक एक कण तसेच जीवनावश्यक प्रत्येक वस्तुंसाठी आणि आपल्या प्रत्येक स्वासासाठी अल्लाहचे आश्रित आहोत. ज्या कुणाला व राष्टाला जे काही मिळते त्याच्या देण्यामुळेच मिळते आणि त्याच्या न देण्यामुळे काहीच मिळत नाही.

वस्तुस्थिती ही आहे की अल्लाहने मनुष्याच्या प्रत्येक आवश्यकतेची निकड ओळखून त्याची व्यवस्था करून ठेवली आहे. परंतु मनुष्याची सर्वात मोठी आणि अत्यावश्यक गरज ही आहे की त्याला जीवनाचा सरळ मार्ग प्राप्त व्हावा. आणि असफल जीवनापासून मनुष्याची सुटका व्हावी. जीवनाच्या सरळमार्गावर चालून मनुष्याने आपले जीवन सफल बनवावे. अल्लाहने ज्या असंख्य देणग्या जीवनात मनुष्याला बहाल केलेल्या आहेत त्यांचा योग्य वापराच्या पध्दतीने मनुष्य अवगत व्हावा आणि त्याने जाणून घ्यावे की त्यांच्या अस्तित्वाचा मुळ हेतू कोणता आहे. मनुष्याने आपल्या जीवन ध्येयाला पूर्ण जाणून घ्यावे. मनुष्याला अशी जीवन शैली अपेक्षित आहे की ज्यामध्ये प्रत्येक जाति वंश प्रत्येक देशासाठी प्रत्येक वर्गासाठी समान संधि उपलब्ध असतील आणि प्रत्येकाच्या वित्त, जीव आणि इज्जतीची रक्षा केली जाईल. त्या आदर्श जीवन पध्दतीने मानवी जीवनाच्या संपूर्ण समस्यांचे निराकरण होत असावे. त्या जीवनपध्दतीमध्ये प्रत्येकासाठी न्याय व समान संधी उपलब्ध असतील. अशा आदर्श आणि परिपूर्ण जीवन पध्दतीमध्ये मनुष्याला ईशपरायण आणि चारित्र्यवान बनविण्याची क्षमता आणि प्रशिक्षणाची शाश्वत व्यवस्था असेल. त्यात धनसंपत्तीची आणि जीवनावश्यक वस्तुंचे समान व न्याय वाटपाची शाश्वत व्यवस्था असेल. अशा सरळ जीवन मार्गावर चालून मनुष्य एक जबाबदार आदर्श नागरिक, ईश परायण मनुष्य बनतो. तसेच आदर्श शासन व्यवस्था आणि आंतराष्ट्रिय सलोखा आणि बंधुभाव निर्माण होवून विश्व शांती नांदू लागते. ह्या जीवनाच्या सरळ मार्गावर चालुन मनुष्य ईश्वराला प्रसन्न करतो. ज्याच्या हातात आमचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन अवलंबून आहेत. तोच ईश्वर आमचा मालक, पालक, चालक आणि शासक आहे.

जीवनाचा सरळ मार्ग प्राप्त करणे मनुष्याची अत्यावश्यक निकड आहे. ही मूलभूत गरज पूर्ण झाली नाही तर मनुष्याने कितीही भौतिक प्रगति केली तरी त्याचा सर्वनाश ठरलेलाच आहे. आज जगात ह्याची प्रचिती येत आहे. जगात मनुष्य निर्मित दुसरा कोणताही जीवन मार्ग ह्या मूलभूत गरजेला पूर्ण करू शकलेला नाही. जगात असा जीवन मार्ग अथवा जीवन पध्दती उपलब्ध नाही ज्यामुळे जीवनाच्या समस्त समस्यांचे निराकरण होऊ शकेल. कम्युनिझम फक्त पोटा पुरते पाहतो आणि आज कम्युनिझम असफल ठरला आहे. लोकशाही एक राजकीय व्यवस्था आहे आणि असफल राजकीय व्यवस्था आहे. संपूर्ण जीवन व्यवस्था लोकशाही देवू शकत नाही. जगातील कोणतीच व्यवस्था अथवा जीवन शैली मनुष्याच्या जीवनाच्या संपूर्ण समस्यांचे निराकरण करू शकतच नाही. साम्यवाद आणि साम्राज्यवाद दोन्ही मानवी समस्यांची परिपूर्ण उकल मुळीच सिध्द झालेले नाहीत. साम्यवाद, लोकशाहीवाद, साम्राज्यवाद, भांडवलशाहीवाद हे सर्व वाद आज निष्फळ ठरलेले आहेत.

ईश्वराने मनुष्याच्या सर्व गरजांची पुर्तता केलेली आहे आणि त्यानेच मनुष्याच्या ह्या अति महत्वाच्या आवश्यकतेची(ईशमार्गदर्शन) सुध्दा पुर्तता केलेली आहे. ईश्वराने प्रत्येक काळात आणि प्रत्येक राष्ट्रात आपले प्रेषित जे उत्कृष्ठ मानव होते त्यांना मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी पाठविले. ह्या प्रेषितांवर ईश्वराने आपले मार्गदर्शन अवतरित केलेले आहे. प्रेषितांकरवी ईश्वराने मानवासाठी आदर्श व परिपूर्ण जीवन प्रणाली अवतरित केली आहे. ईश्वराच्या सर्व प्रेषितांनी समस्त मानवजातीला फक्त आणि फक्त एकच ईश्वराची म्हणजे अल्लाहची भक्ती करण्याची आणि अल्लाहचेच आज्ञापालन करण्याची शिकवण दिली. त्याने प्रेषितांद्वारे अवतरित केलेल्या जीवनपध्दतीला स्वीकारून त्यानुसार आचरण करण्याची शिकवण दिली. तसेच जगात इतर दुसर्या जीवन पध्दतीला न स्वीकारण्याची व त्यानुसार आज्ञापालन न करण्याची ताकिद दिली. ईश्वराच्या सर्व प्रेषितांनी समस्त मानवजातीला दाखवून दिले की अल्लाहने अवतरित केलेल्या परिपूर्ण मार्गदर्शनाचा मनुष्याने पूर्णतः स्वीकार केला आणि त्यानुसार आपले जीवनाचरण केले तर मनुष्य ह्या लौकिक जगात सफल तर होणारच परंतु पारलौकिक जीवनाचे शाश्वत साफल्य आणि मुक्ती त्याला प्राप्त होईल.

दुष्ट, अत्याचारी आणि दुराचारी लोकांनी अल्लाहच्या सर्व प्रेषितांची अवज्ञा आणि प्रखर अवहेलना केली. ह्या व्यतिरिक्त अल्लाहची ही परिपूर्ण व आदर्श जीवन पध्दती(इस्लाम) चा प्रसार जगात होत राहिला आहे. ह्या दुष्ट व दुराचारी लोकांनी अल्लाहच्या प्रेषित गमना नंतर अल्लाहच्या ह्या आदर्श जीवन पध्दतीत(मार्गदर्शनात) ढवळाढवळ केली. त्या अत्याचारी लोकांनी प्रेषितांनंतर अल्लाहच्या मार्गदर्शनाला विद्रुप स्वरूप देवून टाकले आणि त्यात बिघाड निर्माण केला. परिणामतः आज जगात अनेकानेक मानव निर्मित धर्म बोकाळले आहेत आणि ते सर्व आपापसात संघर्षरत आहेत. आज जगात धर्माच्या नावाने चहुकडे अत्याचार व अन्याय माजला आहे. अल्लाहने ह्या व्यतिरिक्त काळानुरूप जगात बिघाड दूर करून त्याजागी निर्माण कार्य करण्यासाठी आपले प्रेषित पाठविले होते. सर्व प्रेषित त्या काळापुरते आणि देशा व वंशापुरतेच असत. त्या सर्व प्रेषितांचे मार्गदर्शन मर्यादित स्वरुपाचे होते. परंतु शेवटी अल्लाहने आदरणीय मुहम्मद(स.) यांना आपला अंतिम प्रेषित नियुक्त केले. प्रेषित(स.) अरब देशातील मक्का ह्या शहरात जरी जन्माला आले तरी अल्लाहने प्रलयापर्यंत समस्त मानवजातीसाठी प्रेषित(स.) यांना मार्गदर्शक बनविले. अल्लाहने आपल्या मूळमार्गदर्शनाला(ज्याला इतिहासांत दुराचारी आणि दुष्टलोकांनी विद्रुप केले होते) अंतिमतः परिपुर्ण स्थितीत प्रेषित(स.) यांच्यावर अवतरित केले. इतिहासात ह्याच परिपूर्ण ईश मार्गदर्शनाला(जीवनपध्दतीला) सर्व प्रेषितांकरवी अल्लाहने जगात अवतरित केले होते. आता अल्लाहचा हाच परिपूर्ण धर्म इस्लाम(जीवनपध्दती) समस्त मानवांसाठी प्रलयापर्यंत राहणार आहे.

अल्लाहचा हा दीन(जीवनप्रणाली) म्हणजेच इस्लाम आपल्या मूळ स्वरूपात दिव्य कुरआन आणि प्रेषित(स.) यांच्या हदीस संग्रहामध्ये सुरक्षित आहे. परंतु जगातील दुसर्या सर्व धर्म ग्रंथामध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे पवित्र जीवन व पवित्र जीवनाचे पूर्ण व्यवहार तपशीलवार आज मूळस्वरुपात सुरक्षित आहे. प्रेषित(स.) यांचे जीवन आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रेषित(स.) यांचे आचरण समस्त मानवांसाठी प्रलयापर्यंत आदर्श आहे. परंतु जगातील इतर कोणत्याही श्रेष्ठ पुरुष अथवा संत पुरुषाचे जीवन चरित्र पूर्णतः सुरक्षित राहिलेले नाही. प्रेषित(स.) यांनी ज्याप्रकारे दुराचारी आणि मार्गभ्रष्ट लोकांमध्ये सुधारणा केली आणि त्यांच्यातूनच एक आदर्श समाज निर्मिती केली. तसेच एक आदर्श राज्य निर्मिती करून अजोड क्रांती घडविली. प्रेषित(स.) यांचा ह्या सर्व जीवन व्यवहाराचा पूर्ण तपशील सुरक्षित आहे आणि प्रेषित(स.) कुरआन प्रकाशात निर्मित आदर्श समाज, आदर्श राज्य आणि आदर्श क्रांति समस्त मानवजातीसाठी जगाच्या अंतापर्यंत आदर्श प्रमाण आहे. मानवी इतिहासात अशा प्रकारचा आदर्श समाज, आदर्श राज्य आणि आदर्श क्रांति आणि त्यांचा पूर्ण तपशील दुसरीकडे उपलब्ध नाही. मानवजातीवर अल्लाहचे अमाप उपकार आहेत की आज आमच्याजवळ अल्लाहचा दीन(इस्लाम) त्याच्या मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. इस्लाम मानवी जीवन व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रासाठी पूर्ण मार्गदर्शन आहे. मनुष्य जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, आंतरराष्ट्रीय इ. सर्वक्षेत्रात योग्य मार्गदर्शन फक्त इस्लाम करू शकतो. जीवनाच्या ह्या निरनिराळ्या क्षेत्रातील समस्यांना सोडविण्यासाठी आज तागायत साम्यवाद, लोक शाहीवाद, साम्राज्यवाद, भांडवलशाहीवाद इ. सर्व वाद निष्फळ ठरले आहेत. इस्लाम मानवी जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण सहजतेने करतो. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे पवित्र जीवन तसेच त्यांच्या साथीदारांचे(सहाबी) जीवन, चार आदर्श खलिफांचे राजकीय व्यवस्थापन एक आदर्श नमुना म्हणून जगापुढे आहे. आम्ही ह्या सर्व प्रकाशात प्रकाशमान होऊन स्वतःला प्रशिक्षित करून आणि आपल्या समाजाची सुधारणा करून मानवी समस्यांची सोडवणुक सहजतेने करू शकतो. आम्ही हा अल्लाहचा दीन इस्लामचा पूर्ण स्वीकार करून आजच्या प्रगत विश्वात जलदगतीने पुढे जाऊ शकतो. कारण इस्लाम बुध्दी विवेकावर आधारित अशी एक परिपूर्ण जीवन शैली आहे. इस्लाम जवळ बुध्दी कौशल्य मौलिक महत्वाचे आहे आणि बुध्दीविवेकाच्या विरुध्द कोणतीही गोष्ट इस्लामला स्वीकार्य नाही.

संबंधित लेख

  • महिला सहाबी

    उम्मुद्दरदा अल हुजैमा (माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते. त्यांच्यापैकी ज्या थोरल्या होत्या त्या (महिला) सहाबी होत्या आणि धाकट्या सहाबींच्या शिष्या. थोरल्या पत्नीचे नाव खैरा व धाकट्या पत्नीचे हुजैमा होते. तहजीबुल असमाइवल्लुगात - २ : ३५९-३६०.) उस्मान बिन अबुल आतिका आणि उम्मे जाबिर म्हणतात की, उम्मे दरदांचे संगोपन अबू दरदांनी केले होते. त्या लहानशा होत्या तेव्हा बुर्नस (लांब सदरा, ज्याने डोकेदेखील झाकले जाते.) परिधान करून माननीय अबू दरदांच्या समवेत येत-जात असत. पुरुषांच्य रांगेत नमाज अदा करण्यासाठी उभ्या राहत असत. पवित्र कुरआनचे पठन करणाऱ्या मंडळीत बसत. जेव्हा वयात आल्या तेव्हा माननीय अबू दरदां त्यांना म्हणाले की, ‘‘तुम्ही स्त्रियांच्या रांगेत सामील व्हा.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६६)
  • इस्लाम हे नामकरण व या शब्दाचा अर्थ

    जगात जितके धर्म आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामकरण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे. अथवा ज्या जातीत व ज्या राष्ट्रात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ धर्माचे नाव, येशू ख्रिस्तांशी निगडीत असलेल्या कारणाने ‘ख्रिश्चन’ धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते, म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव ‘बौद्ध’ धर्म असे ठेवले गेले. झरतुष्ट्र धर्माचे नाव, त्याचे संस्थापक ‘झरतुष्ट्र’ यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी (ज्यू) धर्म हा ‘यहुदा’ नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]