Islam Darshan

इस्लाम पहिल्या चार खलीफांच्या कारकिर्दीबरोबरच समाप्त झाला नाही

Published : Saturday, Apr 16, 2016

इस्लामी पद्धतीबाबत आणखी एक गैरसमज आढळून येतो, आरंभीच्या चार खलीफांच्या कारकिर्दीचा काळ व माननीय उमर बीन अब्दुल अजीज (र) यांच्या अल्पशा कारकिर्दीचा काळ सोडला तर इस्लामी पद्धत कधी पूर्णपणे स्थापन झालीच नाही, असही म्हटले जाते. पण असे म्हणणारे लोक ही गोष्ट विसरतात की पहिल्या चार खलीफानंतर व माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांच्या नंतर धर्म किवा जीवनपद्धतीच्या रुपाने इस्लामचा संपूर्ण लोप झाला नव्हता, उलट तो तशाचा तसाच होता. इस्लामी दृष्टिकोनातून पहिल्या चार खलीफांच्या कालानंतर त्या शासन पद्धतीत काही अंशाने अगर पूर्णपणे एक विमनस्क व रोगट परिवर्तन घडून आले होते. परंतु समाज अध्यात्माच्या दृष्टीने अजूनही इस्लामी समाज होता. म्हणूनच त्या समाजाने ‘धनवान’ व निर्धन किवा ‘स्वामी’ व ‘दास’ यासारखे वर्गवारी विभाजन कधीही पसंत केले नाही. याचे कारण असे की सर्व व्यक्ती बंधुत्वाच्या बंधनात गुंफलेल्या आहेत असा इस्लामी समाज होता. परिश्रमाच्या व त्याच्या फलाच्या वाटपात ते सर्व समान हक्काने सहभागी होते.

त्याचप्रमाणे इस्लामी जगताच्या विविध भागात इस्लामच्याच नागरी व दिवाणी कायद्याचा अमल होता व त्याने युरोपसारखे, जहागीरदारांच्या दयेकृपेवर कधी जनतेला सोडले नव्हते. मुस्लिमांच्या इतिहासातील प्रत्येक काळ इस्लामी परंपरांनी प्रकाशमान झालेला दिसून येतो. मुस्लिमांना वेळोवेळी आपल्या शत्रूबरोबर जी युद्धे करावी लागली, त्या युद्धकाळांत अशा परंपरांची झलक सहज दिसून येते. या संदर्भात सलाहुद्दीन अय्युबीने केलेले धर्मयुद्ध मुख्यत्वेकरून उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तडजोडी पार पाडण्याच्या व तडीस नेण्याच्या बाबतीत मुस्लिमांचा मागील इतिहासही फार उज्ज्वल आहे. ज्ञानार्जनाची ओढ व संस्कृती व सभ्यतेबद्दल त्यांची अभिरुचि अशी होती की इस्लामी जगात हे त्या काळचे ज्ञान व कलेचे कोठार होते. इस्लामने प्रज्वलित केलेल्या या मशालीनेच शेवटी समस्त युरोप उजळून गेला व प्रगती-विकासाच्या मार्गाने पुढे जाण्यायोग्य बनला.

सारांश असा की इस्लाम त्या गलिच्छ अर्थाने आदर्शवाद नाही, जो अर्थ पश्चिमेत साधारणतः समजला जातो. उलट ती एक परिपूर्ण व व्यवहार्य जीवनपद्धत असून, एकदा तिचा यशस्वीरीतीने प्रयोग व अमल झाला आहे. आजसुद्धा त्यावर अधिक सुलभतेने अमल केला

जाऊ शकतो. कारण गेल्या तेरा शतकांच्या काळात मानवाला जे अनुभव प्राप्त झाले त्याने मानवाला इस्लामच्या आणखी जवळ आणले आहे. या युगात ज्या पद्धतीला खऱ्या अर्थाने भोंगळ व पोकळ सिद्धान्त व तत्त्वाचे प्रतीक म्हटले जाऊ शकते, ती कम्युनिझम असून तिचा आजपर्यंत यशस्वीरितीने अंगीकार केला जाऊ शकला नाही. खुद्द कम्युनिस्टच ही गोष्ट मान्य करतात की खऱ्या कम्युनिझमचा टप्पा अजून पुढेच आहे. तरीसुद्धा जग हळूहळू कम्युनिझमकडे वळत आहे. जेव्हा सर्व जग एकाच कम्युनिस्ट शासनाच्या अमलाखाली येईल व संपत्तीचे जगातील सर्व लोकांत समान वाटप केले जाईल, तेव्हा कोठे खरा कम्युनिझम स्थापन होईल. त्याच वेळी धनवान व निर्धन यामधील वर्गकलह कायमचा संपेल, कारण या संघर्षाचे मूळ कारणच आर्थिक विषमता आहे.

कम्युनिझमच्या या काल्पनिक स्वर्गाचा वास्तवतेशी एखादा दूरचाही संबंध नाही. सत्याच्या स्वरुपात त्याचा उदय होऊच शकत नाही. स्वःताची व समस्त जगाची घोर फसवणूक करण्यासारखे त्याचे स्वरुप आहे. ज्या कल्पनाविलासावर त्याचा डोलारा उभा आहे त्या सर्व खोट्या व बिन आधाराच्या आहेत. कारण माणसामध्ये कृत्रिम साधनाद्वारे समानता निर्माण केली जाऊ शकत नाही; तसेच संपत्तीचे समान वाटप केल्यानेही, माणसांच्या सर्व समस्या सुटून जाणार नाहीत. मानवतेच्या प्रगतीचे रहस्य वर्गकलहात दडलेले आहे ही गोष्टही खरी नाही. कम्युनिझम अशा एका आदर्शवादाचा ध्वजधारक आहे की ज्याची विचारशक्ती व आकलनशक्तीची क्षमता नष्ट झाली आहे, असे लोकच त्यापासून मोहित होऊ शकतात. या सिद्धान्ताचा अंकुरच मुळात भौतिकवादापासून फुटलेला आहे. तरीसुद्धा अतिवैज्ञानिक असल्याचा व जीवनातील तथ्याशी एकरुप असल्याचा त्यांचा दावा आहे.

संबंधित लेख

  • जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास विरोधकांचा विरोध तीव्र होत जातो

    या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
  • चाळीस वर्षांनंतर हे परिवर्तन का?

    वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत तो एक सर्वसाधारण अरब होता त्याकाळात या व्यक्तीला जगाने आश्चर्यकारक भाषणकर्ता म्हणून पाहिले नाही. कोणीही त्यास ज्ञानी, बुद्धीमत्तापूर्ण व तत्त्वदर्शितेच्या गोष्टी करताना ऐकले नव्हते. अध्यात्म, राजनीती, नैतिकता, अर्थकारण, समाजकारण व कायदेकानूविषयी बोलताना त्यास कोणीही ऐकले नव्हते. ईश्वर, देवदूत (फरिश्ते) ईशग्रंथ, प्राचीन जाती व प्रेषित, पारलौकिक जीवन, जन्नत व जहन्नमविषयी एक शब्दसुद्धा उच्चारताना ऐकले नव्हते.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]