Islam Darshan

महिला सहाबी

Published : Monday, Apr 18, 2016

 

उम्मुद्दरदा अल हुजैमा

(माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते. त्यांच्यापैकी ज्या थोरल्या होत्या त्या (महिला) सहाबी होत्या आणि धाकट्या सहाबींच्या शिष्या. थोरल्या पत्नीचे नाव खैरा व धाकट्या पत्नीचे हुजैमा होते. तहजीबुल असमाइवल्लुगात - २ : ३५९-३६०.) उस्मान बिन अबुल आतिका आणि उम्मे जाबिर म्हणतात की, उम्मे दरदांचे संगोपन अबू दरदांनी केले होते. त्या लहानशा होत्या तेव्हा बुर्नस (लांब सदरा, ज्याने डोकेदेखील झाकले जाते.) परिधान करून माननीय अबू दरदांच्या समवेत येत-जात असत. पुरुषांच्य रांगेत नमाज अदा करण्यासाठी उभ्या राहत असत. पवित्र कुरआनचे पठन करणाऱ्या मंडळीत बसत. जेव्हा वयात आल्या तेव्हा माननीय अबू दरदां त्यांना म्हणाले की, ‘‘तुम्ही स्त्रियांच्या रांगेत सामील व्हा.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६६)

त्यांच्या ज्ञानाच्या आवडीची कल्पना औफ बिन अब्दुल्लाह यांच्या एका निवेदनावरून येते. ते म्हणतात, ‘‘आम्ही माननीय उम्मे दरदांच्या जवळ बसलो होतो.
जेव्हा बरीच वेळ झाली, तेव्हा आम्ही सांगितले की, आम्ही आपल्याला खूप त्रास दिला. आपल्याला कंटाळा आला असेल नाही का ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘माझा प्रत्येक कामात अल्लाहची उपासना हा उद्देश्य राहिलेला आहे. परंतु ज्ञानी मंडळींच्या संगतीत बसल्याने व त्यांच्याशी चर्चा व संभाषण केल्याने जितके संतोष व समाधान प्राप्त होते तितके कोणत्याही अन्य गोष्टीने प्राप्त होत नाही.’’ मग त्या पडद्याआड गेल्या आणि एका व्यक्तीला कुरआनचे पठन करावयास सांगितले. त्याने ‘व लकद वस्सलना लहुमुल कौलु’ या आयतींचे पठन केले. त्या म्हणाल्या, ‘‘सर्वश्रेष्ठ ज्ञान तर अल्लाहला ओळखणे होय.’’

अबु रब्बह त्यांच्याजवळ शिकत होते. ते म्हणतात, एके दिवशी पाटीवर त्यांनी असे लिहिले -

‘‘बालपणातच विवेक व शहाणपण शिका. मोठे होऊन इतरांना शिकवाल.’’

‘‘प्रत्येक शेतकरी जे काही त्याने चांगले किवा वाईट पेरले आहे ते तो अवश्य कापील.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०-३६१)

त्यांनी माननीय अबू दरदा, सलमान फारसी (र), फुजाला बिन उबैद (र), अबू हुरैरा (र), कअब बिन आसिम (र) आणि आयेशा (र) कडून हदीसचे कथन केले आहे. हाफज इब्ने हजर (र) यांनी त्यांच्याकडून हदीस ऐकणारे व कथन करणाऱ्या १९ धर्मपरायण व्यक्तींच्या उल्लेखानंतर लिहिले आहे की, त्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीसुद्धा त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६५-४६६)

इमाम नबवींचे कथन आहे -

‘‘त्यांच्याकडून महान ताबिईनच्या एका मोठ्या संख्येने हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०)

इमाम जहबी (र) यांनी त्यांचा उल्लेख या शब्दांत केला आहे -

‘‘त्या धर्मशास्त्रपंडित, विद्वान, उपासिका, रूपवान, लावण्यवती, विस्तृत ज्ञानी आणि मोठ्या बुद्धिमान होत्या.’’ (तज्किरतुल हुफ्फाज - १ : ५०)

आयेशा बिन्ते तलहा

यांच्या माता, माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री उम्मे कुलसूम होत्या. त्यांनी माननीय आयेशा (र) द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्याकडून त्यांचे पुत्र तलहा बिन अब्दुल्लाह, हबीब बिन अम्र, त्यांचे पुतणे तला बिन यहया, एक अन्य पुतणे मुआबिया बिन इसहाक, मूसाबिन उबैदुल्लाह, मिनहाल बिन अम्र, अता बिन अबी रिबाह आणि अम्र बिन सईद यांनी कथन केली आहेत.

इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात की, त्या विश्वसनीय व पुराव्यास पात्र आहेत. अजली व इब्ने हिब्बान यांनीसुद्धा त्यांची विश्वसनीय विद्वानांस गणना केलेली आहे. अबू जुआर् दमिश्कीसारख्या हदीसतज्ज्ञांचे म्हटले आहे -

‘‘लोकांनी त्यांच्या ज्ञान, प्रतिष्ठा, विनम्रता व सदाचारामुळे त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६ - ४३७)

आयेशा बिन्ते साद बिन अबी वक्कास (र)

यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी सहा पवित्र पत्नींना पाहिले होते. त्या म्हणतात, ‘‘बालपणात मी जेव्हा त्यांच्यापैकी कोणाकडे जात असे तेव्हा त्या मला मांडीवर बसवीत असत आणि उत्कर्षाचा आशीर्वाद देत असत.’’ असे दिसते की लोकांत त्यांच्याविषयी फार श्रद्धा होती. हबीब बिन मर्जूक म्हणतात की, ‘‘मी मस्जिदच्या बाहेर एका महिलेला पाहिले. त्यांच्याबरोबर आणखी काही स्त्रिया होत्या आणि दिवा जळत होता. चौकशी केल्यावर असे कळले की त्या माननीय साद बिन अबी वक्कास यांच्या सुकन्या आयेशा (र) आहेत.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४६७-४६८)

त्यांनी आपले वडील माननीय साद बिन अबी वक्कास (र) आणि उम्मे जर द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्या उल्लेखावरून कथन करणाऱ्यांत जईद बिन अब्दुर्रहमान, अय्यूब सुख्तियानी, हकम बिन उतैबा, खुजैमा, अबुज्जिनाद, मुहाजिर बिन मिस्मार, उबैदा बिन्ते नाबिल आणि इमाम मालिकसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. खलील म्हणतात, ‘‘इमाम मालिक (र) यांनी त्यांच्याशिवाय कोणत्याही अन्य महिलेकडून कथन केले नाही. इब्ने हिब्बान यांनी ‘सिकात’ नामक पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आहे. ‘आजली’ यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय मानले आहे. हिजरी सन ११७ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६)

हफ्सा बिन्ते सीरीन

बारा वर्षांच्या वयात त्यांनी पवित्र कुरआनचे शिक्षण पूर्ण केले. यहया बिन सीरीन, अनस बिन मालिक (र), उम्मे अतिया अन्सारिया (र), उम्मुर्राइह, अबुल आलिया, अबू जुबियान, रबीअ बिन जयाद आणि माननीय हसन बसरी यांच्या मातोश्री खीरह यांच्याकडून त्यांनी हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून मुहम्मद बिन सीरीन, कतादा, आसिमुल अहवल, अयुब सख्तयानी, खालिदुल खुदाअ, इब्ने औन, हिश्शाम बिन हयानसारख्या विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे.
इमाम इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात,

‘‘त्या विश्वसनीय व युक्तिपूर्ण आहेत.’’ इब्ने हिब्बाननेसुद्धा त्यांना ‘सिकात’ अर्थात - विश्वसनीय - विद्वानांच्या पंक्तीत बसविले आहे.

अयास बिन मुआविया म्हणतात,‘‘मी कोणत्याही अशा व्यक्तीस पाहिले नाही जिला हफ्सा बिन्ते सीरीनपेक्षा श्रेष्ठ म्हणावे.’’ हिजरी सन १०१ मध्ये त्या स्वर्गवासी झाल्या. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४०९ - ४१०)

अमरा बिन्ते अब्दुर्रहमान

माननीय आयेशा (र) यांनी त्यांचे पालनपोषण केले होते आणि त्यांच्या खास शिष्यांपैकी होत्या. हिजरी सन ९८ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. त्यांनी माननीय आयेशा (र) यांच्याशिवाय उम्मे हिशाम बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते सहल आणि माननीय उम्मे हबीबा, हिम्ना बिन्ते जहशकडूनसुद्धा हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून तत्कालीन महान विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे. त्या मंडळींत इमाम जुहरी, अब्दुल्लाह बिन अबू बकर बिन हज्म, यहया बिन सईद अन्सारी, उर्वा बिन जुबैर, सुलैमान बिन यसार आणि उमरु बिन दीनार यांसारख्या इमामांचा (धर्माचार्यांचा) समावेश होता.
त्यांच्या ज्ञानविषयक महानतेची कल्पना त्या मतावरून येते जी मोठमोठ्या मुहद्दिसीननी (महान हदीसतज्ज्ञ) त्यांच्यासंबंधी व्यक्त केली आहेत. इब्ने मुईन म्हणतात,

‘‘त्या विश्वसनीय व सयुक्तिक आहेत.’’ (ही हदीसच्या कलेची एक परिभाषा आहे. अशा प्रकारच्या परिभाषेचा पूर्ण अर्थ भाषांतराने देणे शक्य नाही.)

अहमद बिन मुहम्मद म्हणतात की, मी इब्ने मुईन यांना फारच चांगल्या शब्दांत त्यांचा उल्लेख करताना ऐकले आहे. ते म्हणाले की, माननीय आयेशाकडून कथन करणारे भरवशास योग्य व विश्वसनीय लोकांत त्यांची गणना होते. इब्ने हिब्बान आणि अजली यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय म्हटले आहे. इब्ने हिब्बान म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्या हदीस कथनाचे सर्वांत अधिक ज्ञान त्यांनाच होते. माननीय सुफियान सौरी म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्याकडून कथन करणाऱ्यांत अमरा बिन्ते अब्दुर्रहमान, कासिम बिन मुहम्मद आणि उर्वा बिन जुबैर सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत. अब्दुर्रहमान बिन कासिम यांच्यासंबंधी उल्लेख आहे की, ते माननीय आयेशा (र) यांची कथने त्यांना विचारीत असत. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी मुहम्मद बिन अब्दुर्रहमान यांना लिहून कळविले की, माननीय आयेशा (र) यांच्या कथनांचे त्यांच्यापेक्षा अधिक ज्ञान असणारा कोणीही नाही. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३८-४३९)

इब्ने साद म्हणतात, ‘‘त्या विद्वान स्त्री होत्या. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी अबू बकर बिन मुहम्मद बिन हज्म यांना त्यांच्या हदीसी लिहिण्याची आज्ञा दिली होती.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४८०)

संबंधित लेख

  • इस्लामचा दुसरा स्तंभ नमाज

    नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत.
  • लैंगिक अपराधांवर इस्लामी उपाय

    भूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]