Islam Darshan

इस्लामी राजकीय व्यवस्था

Published : Saturday, Apr 16, 2016

 

इस्लामची राजकीय व्यवस्था ही दोन मूळ सत्यांवर आधारीत आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

१) अल्लाहचे स्वतःचे स्थान आणि मानवी विश्व - अल्लाह मनुष्याचा आणि ह्या विश्वाचा फक्त निर्माता आणि नियंताच नाही तर खरा मालक व शासकसुध्दा आहे.

२) मनुष्याचे स्वतःचे स्थान - मनुष्याला ह्या विश्वात (पृथ्वीवर) अल्लाहने फक्त निर्माण केले आहे असे नाही तर मनुष्य अल्लाहचा नम्र दास आहे आणि अल्लाहचा या पृथ्वीवर प्रतिनिधी (खलिफा) आहे.

वरील दोन महत्त्वाच्या सत्यतेवर ‘‘इस्लामी राजकीय व्यवस्था’’ उभी आहे. इस्लामी राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,

१) सर्वोच्च अधिकार आणि सार्वभौमत्व अल्लाहकडे फक्त आहे. कोणीही व्यक्ती, समाज अथवा संपूर्ण मानवता त्यात एका अणुचाही भागीदार नाही. मनुष्य हा जन्मजात अल्लाहचा दास आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘शासनाची सत्ता अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याची आज्ञा आहे की त्याच्या स्वतःशिवाय तुम्ही इतर कोणाची ही भक्ती करू नका, हीच थेट सरळ जीवनपध्दती आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत.’’ (कुरआन १२:४०)

२) अल्लाह एकमेव खरा कायदे करणारा आहे. अल्लाहने दिलेली राज्यघटना ही मानवी जीवनाची राज्यघटना आहे. याच एकमेव ईशराज्यघटनेमुळे मानवी जीवनव्यवहार अनुशासित होते. कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला त्यांच्यासाठी अथवा इतरांसाठी राज्यघटना बनविण्याचा अधिकार नाही.

३) अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रतिनिधी आणि त्याच्या दिव्य प्रकटनांस स्पष्ट करून सांगणारे आणि अल्लाहच्या मर्जीचे विवरण करणारे आहेत. त्यांच्या या अधिकारीक स्थितीमुळे त्यांना द्वितीय असे स्थान कायदे करण्यासाठी प्राप्त झाले आहे. म्हणून त्यांचे आदेश हे मूळ कायदे करणाऱ्या (अल्लाह) चे आज्ञापालन करण्यासारखे आहे. हे स्पष्ट करताना अल्लाहने कुरआनमध्ये आदेश दिला आहे,

‘‘जे काही पैगंबर तुम्हाला देईल ते घ्या आणि ज्या गोष्टीची तो तुम्हाला मनाई करील त्यापासून अलिप्त राहा. अल्लाहच्या कोपचे भय बाळगा, अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.’’ (कुरआन ५७: ७)

पैगंबराचे आज्ञापालन दुसरे तिसरे काही नसून अल्लाहचेच आज्ञापालन आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘ज्याने पैगंबराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले.’’ (कुरआन ४: ८०)

४) ईशआदेशांचे तंतोतंत पालन होण्यासाठी एक सार्वजनिक शासनव्यवस्था असणे अनिवार्य आहे. इमाम (नेता) ची नियुक्ती यासाठी आवश्यक आहे. पारिभाषिक शब्दावलीत यास आपण ‘खिलाफत’,‘इमामत’ अथवा ‘अमारत’ म्हणून ओळखतो. या शासनसंस्थेत नेत्याला ‘इमाम’,‘खलीफा’ अथवा ‘अमीर’ म्हणून संबोधले जाते.

५) जो कोणी इस्लामवर श्रध्दा ठेवतो ती व्यक्ती इस्लामी राज्यव्यवस्थेची नागरिक ठरते. जे जन्मापासूनच श्रध्दावंत आहेत. त्यांच्याचसाठी नव्हे तर प्रत्येक श्रध्दावंत जो इस्लामवर श्रध्दा ठेवू लागतो (मुस्लिम बनतो) असे सर्व श्रध्दावंतसुध्दा इस्लामी शासनव्यवस्थेचे घटक बनतात. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘श्रध्दावंत पुरुष व श्रध्दावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच.’’ (कुरआन ९: ७१-७२)

६) अश्रध्दांवत इस्लामी राज्यव्यवस्था अथवा शासनव्यवस्थेचे खरे नागरिक बनू शकत नाही. त्यांची स्थिती दुय्यम नागरिकाची असते. इस्लामी पारिभाषिक शब्दावलीत त्यांना ‘‘झीम्मी’’ असे म्हणतात. ते अशासाठी की इस्लामी राज्य (शासन) अश्रध्दावंतांच्या जिवाचे, वित्ताचे आणि इज्जतीचे रक्षण करण्यास जबाबदार आहे. त्यांचे हक्क खलीफाच्या (राजाध्यक्ष्याच्या) मर्जीवर अवलंबून नाहीत तर अल्लाहने आणि त्याच्या प्रेषिताने अशा अश्रध्दावंतांचे हक्क अगोदरच निश्चित केलेले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे इस्लामी शासनव्यवस्थेचे कर्तव्य आहे.

७) खलीफा (राजाध्यक्ष) चे हे परम कर्तव्य आहे की त्याने राज्यशासन दिव्य प्रकटनांनुसार चालवावे, राज्यात न्याय प्रस्थापित करावा, राज्याचे रक्षण करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अल्लाहने घालून दिलेले कार्य तडीस न्यावे. ज्याच्यासाठी पैगंबरांना पृथ्वीवर पाठविण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एक आज्ञाधारक श्रध्दाशील समाज अल्लाहच्या आदेशानुसार उभा केला होता. खलीफा (राजाध्यक्ष) हा अल्लाहशी बांधील आहे. त्याला अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या जगात प्रजेसमोर त्याला त्याच्या कामाचा जाब द्यावा लागेल.

८) खलीफाला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ असते. त्याला ‘शुरा’ असे म्हणतात. राजाध्यक्षाला सल्लागार मंडळाच्या साह्याने शासन चालवावे लागते. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना आदेश दिला आहे की त्यांनी महत्त्वाच्या बाबींवर आपल्या सहकार्यांशी सल्लामसलत करावी. कुरआनोक्ती आहे,

‘‘आणि धर्म-कार्यात यांनासुध्दा सल्लामसलतीत सहभागी ठेवा, मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोकप्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.’’ (कुरआन ३: १५९)

९) अशा व्यक्तीची खलीफा म्हणून नियुक्ती केली जाते जो सर्वात जास्त त्या योग्यतेचा आहे आणि ज्याची नियुक्ती बहुमताने मान्य केली जाते. खलीफा निवडणुकीने सत्तेवर येतो आणि आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरला तर पदावरून निष्काशित केला जातो. त्याला पदावरून हाकलून दिले जाते.

१०) इस्लामने खलीफा निवडीसाठी विशिष्ट निवडणूक पध्दतीचा स्वीकार केलेला नाही. उद्देश आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत. त्यानुसार कोणतीही निवडणूक पध्दत स्वीकारण्यास परवानगी आहे. निवडणूक उद्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वीकारलेली निवडणूक पध्दतीलाच इस्लामी निवडणूक पध्दत म्हटले जाते. जो लोकांमध्ये सर्वांत जास्त विश्वासु प्रामाणिक, ईशपरायण, सदाचरणी, ज्ञानी आणि कर्तव्यनिष्ठ आहे अशा व्यक्तीला निवडून देणे हाच निवडणुकीचा उद्देश आहे. मार्गदर्शक तत्त्वे निवडणुकीचा उद्देश प्राप्त करण्यासाठी आहेत. उमेदवार हुशार, धर्मनिष्ठ आणि योग्य निर्णयक्षमता असलेला असावा इ. मार्गदर्शक तत्त्वांपैकी आहेत.

११) ज्याला खलीफा बनण्याची इच्छा आहे अथवा शासनात अधिकारपद प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगतो अशांना ही पदे देवू नयेत.

‘‘अल्लाह शपथ! आम्ही पद मागणाऱ्याला ते पद बहाल करणार नाही किवा त्या पदाची इच्छा बाळगणाऱ्यालासुध्दा पदग्रहण करता येणार नाही.’’ (बुखारी)

हे अशासाठी की इस्लामी शासनव्यवस्थेची व्याख्या सर्वसाधारण राज्यशासनाच्या व्याख्येपेक्षा अगदी वेगळी आहे. ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे हक्क नव्हे. अल्लाहला ते शासन आणि शासनाध्याक्ष जबाबदार राहतात.

‘‘खलीफा अथवा इमाम (अमीर) बनण्याची (शासनाध्यक्ष बनण्याची) अभिलाषा बाळगणे हा कलंक आणि मानहानी आहे, शिवाय त्या व्यक्तीव्यतिरिक्त ज्याने न्यायहक्काने ते पद ग्रहण केले आणि त्या पदाला न्याय दिला.’’ (मुस्लिम)

याच कारणासाठी कोणताच विवेकी श्रध्दावंत ही जबाबदारी घेण्यास इच्छुक नसतो. अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी त्याला अल्लाहसमोर उभे केले जाईल तेव्हा त्याला लोकांच्या हक्कांबद्दल जाब द्यावा लागेल. प्रेषितकथन आहे,

‘‘यासाठी सर्वांत उत्तम व्यक्ती ती आहे ज्याला या पदाचा सर्वांत जास्त तिरस्कार वाटतो.’’ (मुस्लिम)

एखादा मुस्लिम (श्रध्दावंत) या पदाला प्रयत्न करून प्राप्त करून घेतो आणि त्याला पदाच्या वरील जबाबदारींची जाणीव नसेल तर ती व्यक्ती आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडूच शकणार नाही. त्याला त्या इस्लामी शासनाध्यक्षाच्या (इमामच्या) जबाबदाऱ्यांची आणि कर्तव्यांची मुळीच जाणीव व ज्ञान नसते.

१२) हे योग्य नाही की एखाद्याला नियमानुसार खिलाफतसाठी (शासन व्यवस्था चालवण्यासाठी) निवडून देण्यात आले तरीसुध्दा त्याने ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार द्यावा. अशी व्यक्ती इस्लामचा नव्हे तर अज्ञानाचा मार्ग स्वीकार करते, प्रेषित कथन आहे,

‘‘जी व्यक्ती अशा स्थितीत मरण पावली की इमाम (नेता) ची आज्ञापालन करण्याची प्रतिज्ञा (बैत) त्याने घेतली नाही तर ती व्यक्ती अज्ञान (अंधकारमय) मृत्युला सामोरे गेली.’’ (मुस्लिम)

त्याची ती अवज्ञा फक्त त्या एका इमाम, खलीफा अथवा अमीरपर्यंतच मर्यादित राहात नाही तर त्याने संपूर्ण इस्लामी शासनव्यवस्थेला धुडकावून दिले हे सिध्द होते. त्याच्याविरुध्द युध्द पुकारले जाते कारण त्याने आपल्या अमीरची अवज्ञा करून इस्लामी शासनव्यवस्थेविरुध्द युध्द अगोदर पुकारले.

१३) प्रत्येक नागरिकाचे हे आद्य कर्तव्य आहे की त्याने आपल्या खलीफाच्या आदेशांचे पालन करावे. कुरआनमध्ये अल्लाहने स्पष्ट आदेश दिला आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! आज्ञापालन करा अल्लाहचे, आज्ञापालन करा पैगंबराचे आणि त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी (अमीर) असतील. मग तुमच्या दरम्यान जर एखाद्याच्या बाबतीत वाद निर्माण झाला तर त्याला अल्लाह व पैगंबराकडे न्या. जर तुम्ही खरोखरच अल्लाह व अंतिम दिनावर श्रध्दा बाळगत असाल. हीच एक योग्य कार्यपध्दती आहे आणि शेवटाच्या दृष्टीनेदेखील अधिक चांगली आहे.’’ (कुरआन ४:५९)

खलीफा किवा अमीरचे आज्ञापालन न करणे म्हणजे अल्लाहच्या आदेशांचे पालन न करण्यासारखे आहे आणि त्याच्या प्रेषिताचे आज्ञापालन न करण्यासारखे आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,

‘‘जो कोणी आपल्या अमीरची अवज्ञा करील त्याने माझी अवज्ञा केली.’’ (मुस्लिम)

खलीफा अथवा अमीर जर पाफत्ये करण्याचे आदेश देत असेल तर त्याचे आज्ञापालन मुळीच करू नका. प्रेषितांनी स्पष्ट सांगितले आहे,

‘‘जर अमीर अल्लाहची अवज्ञा करण्यास सांगत असेल तर त्याचे ऐकूही नका आणि त्याची आज्ञा धुडकावून द्या.’’ (मुस्लिम)

प्रत्येक नागरिकाने खलीफाचे यश चितावे त्याचे भले होवो ही मनापासूनची सदिच्छा ठेवावी आणि त्याचे त्याचबरोबर आज्ञापालन करावे. हे धर्म कर्तव्य आहे. इस्लामचा एक अंग आहे. ही एक धर्मनिष्ठा आहे प्रेषितवचन आहे,

‘‘दीन-धर्म हे एकनिष्ठतेचे दुसरे नाव आहे. विचारण्यात आले की एकनिष्ठा कोणासाठी? त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी उत्तर दिले की एकनिष्ठा अल्लाहशी, त्याच्या प्रेषिताशी आणि खलीफाशी (शासनाध्यक्षाशी).’’ (मुस्लिम)

१४) हे प्रत्येक श्रध्दावंताचे कर्तव्य आहे की त्याने शासनाध्यक्षावर (खलीफा) कडक नजर ठेवावी. तो आणि त्याचे अधिकारी जिथे चूक करतील तेथे त्यांना धरावे. ते जर चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्यांना सरळ मार्गावर आणावे. अबु बकर (र.) यांनी आपल्या प्रजेला स्पष्ट आदेश दिला,

‘‘मी जर चुकत असेल तर मला सरळ मार्गावर आणा.’’ (तबारी)

१५) जर एखाद्या बाबतीत दिव्य प्रकटन नसेल तरच कायदा बनवता येतो. असे आदेश खलीफा आपल्या सल्लागार मंडळाबरोबर सल्लामसलत करूनच बनवतो.

१६) इस्लामी राज्यशासन प्रत्येक नागरिकाच्या वित्त, जीव आणि इज्जतीच्या संरक्षणाला जबाबदार राहाते मग तो नागरिक कोणत्याही धर्माचा असो. प्रत्येक धर्माच्या नागरिकाला धर्मस्वातंत्र्य असते आणि विचारस्वातंत्र्य राहाते. हे स्वातंत्र्य एका अटीवर आहे की कोणीही राज्यशासनाविरुध्द बंड करू नये. राष्ट्रद्रोह करू नये. नैतिक अधःपतन आणि समाजात शांतता भंग होईल असे कृत्य करणे धर्मद्रोह आहे. कोणाचेही स्वातंत्र्य विनाकारण हिरावून घेतले जात नाही.

१७) इस्लामी शासनव्यवस्था स्थापन करण्यामागचा हेतु अत्यंत उदार आहे आणि विस्तीर्ण आहे. इस्लामी शासनव्यवस्थेचे मूलतत्त्वांबद्दल आपणास आकलन खालील कुरआन संकेतवचनांवर चितन केल्यास होईल.

‘‘आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट संकेतचिन्हे व सूचनेसहित पाठविले, आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरविली जेणेकरून लोकांनी न्यायधिष्ठित व्हावे, आणि लोखंड उतरविले ज्यात मोठे बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत, हे अशासाठी केले गेले आहे की अल्लाहला माहीत व्हावे की कोण न पाहता त्याला व त्याच्या पैगंबरांना मदत करतो, निश्चितच अल्लाह मोठा बलवान आणि जबरदस्त आहे.’’ (कुरआन ५७ : २५)

‘‘हे दाऊद! आम्ही तुला पृथ्वीवर खलीफा (ईश्वराचा उत्तराधिकारी) बनविले आहे, म्हणून तू लोकांच्या दरम्यान सत्यानिशी राज्य कर आणि मनोवसानेच्या आहारी जाऊ नकोस. ती तुला अल्लाहच्या मार्गापासून दूर करील. जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात, निश्चितच त्यांच्याकरिता कठोर शिक्षा आहे. कारण न्यायानिवाड्याचा (हिशोबाचा) दिवस ते विसरून गेले.’’ (कुरआन ३८: २५-२६)

‘‘जर अल्लाह लोकांना एक दुसऱ्याकरवी हटवीत नसता तर मठ आणि चर्च व ‘सिनेगॉग’ आणि मस्जिदी ज्यात अल्लाहचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्व उद्ध्वस्त केली गेली असती. अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. हे ते लोक आहेत ज्यांना आम्ही पृथ्वीवर सत्ता बहाल केली तर ते नमाज कायम करतील, जकात देतील, सत्कर्माचा आदेश देतील आणि वाईटाला प्रतिबंध करतील, आणि सर्व बाबींचा अंतिम परिणाम अल्लाहच्या अखत्यारित आहे.’’ (कुरआन २२ : ४०-४१)

वरील दोन आयती साधारणतः आणि तिसरी आयत विशेषकरून इस्लामी शासनव्यवस्था स्थापनेमागील हेतु स्पष्ट करतात. अगोदरच्या दोन आयती स्पष्ट करतात की शासन व्यवस्थेचे महत्कार्य समाजात न्याय प्रस्थापित करणे आहे (कायद्याचे राज्य) प्रत्येक शासनाचे कर्तव्य आहे. किवा तसा ते दावा तरी करु शकतात. म्हणून शासनव्यवस्था आवश्यक आहे. या सर्वसाधारण हेतुमध्ये तिसरी आयत विशेष हेतुची भर घालत आहे. इस्लामी शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे ते नमाज कायम करतात, जकात देतात, सत्कर्माचा आदेश देतात आणि वाईटाला प्रतिबंध करतात. ते धर्मनिष्ठ बनतात हे शासनाध्यक्ष स्वतः आचरणात आणतो आणि प्रजेला हे सर्व करायला लावतो. याच विशेष हेतुमुळे इस्लामी राज्य हे इतर राज्यापेक्षा वेगळेपण राखून आहे. हे शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य कुठेही दुसरीकडे सापडणार नाही. बनावटी धर्म प्रदर्शन करून सुध्दा हे उद्देस साध्य होत नाही. इस्लामी राज्यशासनाच्या या विशेष उद्देशाचे एकूण चार वैशिष्ट्ये आहेत नमाज कायम करणे, जकात देणे, सत्कर्माचा आदेश देणे व दुष्कर्माचा प्रतिबंध करणे. या आयतीवर चितन केल्यास कळून येईल की हा उद्देश साध्य करणे म्हणजे धर्मस्थापना (अकामते दिन) पूर्णत्वाने करण्यासारखे आहे. तसेच अथक प्रयत्नांती धर्माच्या उदारतेचे क्षेत्र विस्तारित करून इस्लामच्या रंगात पूर्ण समाजाला रंगवून सोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करीत राहाणे इस्लामी शासनव्यवस्थेचे अंतिम ध्येय आहे.

संबंधित लेख

  • ‘बद्र’ची लढाई ते ‘उहुद’ची लढाई

    ‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
  • इस्लामचे आधारस्तंभ

    इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था मनुष्याच्या आत्म्याला ईश्वराच्या प्रेमाने, आज्ञाधारकतेने आणि त्यांच्या प्रसन्नतेने भरभरून टाकते. व्यक्ती जेव्हा त्याच्या आवडीनिवडींना अल्लाहच्या आवडी निवडीशीं जुळवून घेते तेव्हा ती व्यक्ती इच्छा-आकांक्षांबाबत पावित्र्य प्राप्त करते. अल्लाहच्या आदेशानुसार ती आपले आचरण ठेवते. जणूकाही ती अल्लाहला आपल्या डोळ्यांसमोर पाहत आहे. त्याच्या नाराज होण्याला आणि अप्रसन्नतेला अशा प्रकारे भीत असते जणूकाही अल्लाह त्या व्यक्तीच्या सोबत आहे, प्रत्यक्षात अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी अतिदक्ष राहते. तहानलेला पाण्याला पाहून त्याकडे धाव घेतो, तसा मनुष्य आपले तन, मन, धन अल्लाहसाठी त्यागून देण्यासाठी सतत तयार राहतो. अशा प्रकारच्या उच्चतर आध्यात्मिकतेला ‘इहसान’ असे म्हटले जाते. या प्रकारच्या पवित्र आणि ईशप्रसन्नतेच्या आध्यात्मिक स्थितीला प्राप्त करण्यासाठी जी पध्दत वापरली जाते त्यास ‘इस्लामचे आधारस्तंभ’ असे म्हणतात.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]