Islam Darshan

धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न)

Published : Saturday, Apr 16, 2016

इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात. त्यामुळे मनुष्यजीवनावर राजकारणाचा स्वाभाविकपणे दूरगामी परिणाम होत आहे. डोळे उघडून पाहिल्यास कळून येते की सर्व तत्त्वज्ञान, आदर्श आणि श्रध्दा राजकारणाच्या एका फटक्यात नाहीसे होतात. दुसरीकडे असे मानले जाते की राजकारणाचा धर्माशी काहीएक संबंध नाही. या मान्यतेच्या समर्थनार्थ अनेक भ्रामक कल्पना पुढे आणल्या जात आहेत. अशी एक मान्यता (भ्रामक) आहे की धर्म हे एक माध्यम आहे देव आणि मानसामधील संबंध प्रस्थापित करण्याचे. हे एक अतिशय पवित्र आणि विनम्र कार्य आहे. या कार्याला (धर्माला, मजहबला) दुनियेच्या घाणेरड्या प्रकारात ओढू नये. पवित्र हे पवित्र स्थळीच राहिले पाहिजे. ही एक खोटी आणि भ्रामक कल्पना आहे. याच बनावट मानसिकतेच्या प्रभावामुळे लोक धर्माचा राजकारणाशी काही संबंध आहे हे मान्य करण्यास तयार नाहीत.

वरील चर्चेचा विचार न करता आपण या विरोधाभासाला स्पर्श न करता पुढे गेलो तर लक्षात येईल की या चुकीच्या धारणेला मुस्लिमांनी स्पर्श केलेला नाही. सद्यस्थिती ही आहे की अनेकजण असे आहेत की नावाने ते मुस्लिम नाहीत, परंतु ते खरे मुस्लिम आहेत. ते इस्लामचे खरे अनुयायी आहेत. त्यांच्यामते इस्लाममध्ये राजकारणाला दुय्यम महत्त्व आहे, किबहुना राजकारणाची इस्लाममध्ये गरज नाही. मुस्लिमाने त्यांच्यामते प्रयत्नांची पराकाष्ठा करून इस्लामी राष्ट्र स्थापन करणे, हे धार्मिक कर्तव्य नाही. ते राजसत्तेला अल्लाहची दैवी देणगी समजात आणि जो गांभीर्यपूर्वक धर्माचरण करतो त्याला अल्लाह ही देणगी आपोआप देतो. त्यांच्यामते इस्लामी राज्य हे इस्लामसाठी नव्हे तर त्यांच्या अनुयायींसाठी आवश्यक आहे.

वरील कारणांवरुन आजच्या या आधुनिक जगात इस्लाम आणि राजकारण यांच्या संबंधांचा उहापोह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर राजकारण इस्लामचे अंग आहे तर त्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये कोणती आहेत? या प्रश्नाचे खोलात जाऊन उत्तर प्राप्त करणे आवश्यक आहे. इस्लामला पूर्ण जाणून घेणे अशक्य आहे जोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित राहील. राजकारणाव्यतिरिक्त इस्लामचे चित्र भुरकट आणि अस्पष्ट होते.

वरील प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्व संबंधित घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच इस्लाम व राजकारण यांचा परस्पर संबंध योग्यरित्या आपण जाणून घेऊ शकतो.

अल्लाहवरील श्रध्दा आणि राजकारण

या कारणासाठी आपण सर्वप्रथम अल्लाहचे गुणधर्म पाहू या. अल्लाहचे हे स्वाभाविक आणि विशेष गुणधर्म मूळस्रोत आहेत ज्यातून सर्व धार्मिक संकल्पनांचा आणि दिव्य प्रकटनांचा उदय होतो. म्हणून धर्म आणि राजकारणाचा संबंध विषद करताना अल्लाहच्या विशेष गुणांना विशेष हक्क प्राप्त होतो.

या संदर्भातील कुरआनच्या काही आयती पाहू या.

‘‘सांगा, मी शरण मागतो मानवांच्या पालनकर्त्यापाशी, मानवांच्या बादशाहपाशी, मानवांच्या खऱ्या ईश्वरापाशी.’’ (कुरआन ११४: १-३)

‘‘वस्तुतः तुमचा पालनकर्ता अल्लाहच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग आपल्या सिहासनावर (अर्श) विराजमान झाला. जो रात्रीला दिवसावर झाकतो व परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो. ज्याने सूर्य, चंद्र व तारे निर्माण केले, सर्व त्याच्या आदेशाच्या अधीन आहेत. सावध राहा, त्याचीच सृष्टी आहे व त्याचाच हुकूम आहे. फार समृध्दशाली आहे अल्लाह, सर्व विश्वांचा मालक व पालनकर्ता.’’ (कुरआन ७: ५४-५५)

‘‘शासनाची सत्ता (सार्वभौमत्व) अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याचा आदेश आहे की त्याच्याशिवाय तुम्ही इतर कोणाचीही भक्ती करू नका.’’ (कुरआन १२: ४०)

वरील आयतींनुसार कळून येते की अल्लाह मानवांचा फक्त प्रभु आणि ईश्वर नाही, तर अल्लाह सर्व विश्वांचा आणि मानवांचा शासनकर्ता आणि राज्याध्यक्ष आहे. अल्लाह असा ईश्वर आणि प्रभु आहे ज्याच्या प्रभुत्व आणि ईशत्वामध्ये मालकत्व, पालकत्व आणि शासकत्व यांचासुध्दा समावेश आहे. याचाच अर्थ आहे की अल्लाहच खरा शासनकर्ता, पालनकर्ता, आदेशकर्ता असा सार्वभौम राज्याध्यक्ष (बादशाह) आहे. ही सर्व त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. जोपर्यंत व्यक्तीची अल्लाहच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांत दृढ आणि परिपूर्ण विश्वास व श्रध्दा नाही तोपर्यंत तो श्रध्दावान ठरत नाही.

अल्लाह मालक, पालक, शासक, आदेशक आहे तर मनुष्याचे राजकीय जीवन पूर्णतः अविभाजित अशा अल्लाहच्या सार्वभौमत्वावर आधारित आहे. राजकारणाचा मूलाधार राजसत्तेचे सार्वभौमत्व आहे आणि हा राजकारणाचा मूळ प्रश्न आहे. अल्लाहचे सार्वभौमत्व या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे.

संबंधित लेख

  • मानवतेचा आदर्श

    मानव-जीवनाला कल्याण व सदाचाराच्या मार्गावर चालविण्यासाठी एखाद्या आदर्शाची आवश्यकता असते. आदर्श खरे पाहता मापदंडाचे काम करतो. यावर मापून तोलून हे कळते की एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा किती भाग खरा व किती भाग खोटा आहे. मापदंड अथवा आदर्श काल्पनिक देखील असतात, जे कथा-गोष्टीच्या रूपाने उपदेशांत सांगितले जातात व ते ऐकून लोक आनंदित होतात. परंतु त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक किवा सामाजिक जीवनात होत नाही. आदर्श बनण्यासाठी केवळ इतकेच आवश्यक नाही की ते शक्य व व्यावहारिक असावे, तर हे देखील गरजेचे आहे की तो आदर्श एखाद्याचे जीवन बनलेले असावे व त्याने त्यावर चालून आदर्शाचा प्रत्यक्ष नमुना प्रस्तुत केला असावा.
  • राजकीय अपराधापासून बचावाचा इस्लामी उपाय

    शासन, सत्ता आणि अधिकार हाती आले की राजकारण्यांना अपराध आणि गुन्हेगारीचे रान मोकळे झाले समजा. कारण त्यांच्या हाती सत्ता असते. शिवाय त्यांच्यापैकी बरेचजण गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे शिक्षण नसताना आणि कोणतीही योग्यता व पात्रता नसताना भविष्य बनविण्याचा सर्वांत सोपा आणि सरळ उपाय म्हणजे राजकारणच.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]