
सत्य हे आहे की प्रेषितांना जे कार्य सोपविण्यात आले होते ते व्यावहारिकदृष्ट्या दुसरे तिसरे काही नसून धार्मिक आणि इस्लामी शासन स्थापन करण्याचे कार्य होते. प्रेषितांना धार्मिक आणि इस्लामी शासनव्यवस्था कायम करण्याचे महत्कार्य यासाठी सुपूर्द करण्यात आलेले होते की त्याव्यतिरिक्त इस्लाम (अल्लाहचा धर्म) पूर्णरूपेन कार्यान्वित होऊ शकतच नाही. सत्तेशिवाय ईशधर्माचे तंतोतंत पालन अशक्य आहे. हे आज जितके सत्य आहे तितकेच प्रेषितकाळातसुध्दा होते. याच एकमेव कारणासाठी ईशधर्मांनी आपली सर्व ताकत शासन- सत्ता प्राप्त करण्यात खर्ची घातली होती. ही दुसरी गोष्ट आहे की आजची स्थिती अनुकूल नाही. अतोनात कष्ट करूनसुध्दा फलश्रुती नाही, हे चित्र आहे. स्वाभाविकपणे, कार्यप्रणालीची यशाचे शिखर गाठण्याची असमर्थता ही एक बाब आणि त्याचे आंतरिक पूर्णत्व दुसरी बाब आहे. निःसंशय, प्रेषितांच्या कार्यप्रणालींचा इतिहास साक्ष आहे की त्यांच्यापैकी बरेच प्रेषित राजकीय सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरले. परंतु हे कुठेच निदर्शनात येत नाही की त्यांना राजकीय सत्ता प्राप्त करावयाचीच नव्हती. हे खरे आहे की प्रत्येक प्रेषिताने ‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश्वर नाही’’ (अल्लाह एकमात्र ईश्वर आहे) हेच आवाहन केले आहे. ‘‘अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सार्वभौम नाही’’ असे कदापिही आवाहन केलेले नाही. परंतु हे खरे आहे की ‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश्वर नाही’’ या आवाहनामध्ये ‘‘अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सार्वभौम नाही’’चा समावेश आहे, कारण अल्लाहच्या स्वाभाविक मूलभूत गुणांमध्ये ‘सार्वभौमत्व’ एक गुण आहे. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा असे सांगितले जाते की ‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश्वर नाही’’ तेव्हा अर्थ असाही होतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सार्वभौम नाही. परंतु अल्लाहला फक्त आणि फक्त सार्वभौमच समजणे निश्चितच चुकीचे आहे. परंतु यापेक्षासुध्दा भयानक चूक ही आहे की, अल्लाहच्या स्वाभाविक मूलभूत गुणांमधून सार्वभौमत्वाला वगळून टाकणे. कोणत्याही प्रेषिताने असे आवाहन केले नाही की ‘‘हे लोकांनो! अल्लाहचे सार्वभौमत्व कायम करा, कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणीही सार्वभौम नाही.’’ हे खरे आहे, परंतु याऐवजी प्रत्येक प्रेषिताने खालीलप्रमाणे आवाहन केले होते,
‘‘अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही.’’ (कुरआन ७: ५९)
हे संकेतवचन (आयत) वाचून आणि त्यावर चितन मनन केल्यानंतर कोण असा दावा करील की आयतच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागाचा अर्थ आणि आशय दडलेला आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा भक्तीचा अर्थ फक्त उपासनापध्दतींनाच लागू करेल. प्रत्यक्षात असे नाही. भक्ती हा शब्द उपासनापध्दतींसाठी (नमाज, रोजा, जकात, हज इ.) सुध्दा वापरला जातो आणि आज्ञाधारकतेसाठीसुध्दा वापरला जातो. म्हणून धार्मिक आदेश जीवनाचे प्रत्येक क्षेत्र व्यापून आहेत आणि ज्यांचे शेवटचे टोक राजनीती आणि शासनाधिकार आहे. या सर्वांना आपण भक्तीच्या व्याख्येतून बाहेर काढूच शकत नाही. म्हणून सर्व ईशआदेशांचे पालन करणे आणि त्याला आचरणात आणणे ही भक्ती आहे. तर सर्व प्रेषितांची कार्यप्रणाली आणि जीवनउद्देश हा राजकीय ईशआदेशांना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाणे हाच होता.
येथे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुरआनमध्ये प्रेषितांचे कार्य आणि कार्यप्रणालीचा उल्लेख आहे. त्यामध्ये कुठेही राजकीय आदेशांचा समावेश नाही. त्यांची कार्यश्रध्दा, नैतिकता आणि भक्ती त्या एकमेव ईश्वराची (अल्लाहची) फक्त याच बाबींवर केंद्रित आहे. ‘‘अल्लाहची भक्ती करा’’ हा ईशआदेश फक्त भक्ती करण्यासाठीच मर्यादित आहे असे वाटते. काही प्रेषित आवाहन करतात की ‘‘अल्लाहशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही’’ आणि आदेश देतात की ‘‘अल्लाहचीच भक्ती करा.’’ असे आवाहन करताना ते आपले आवाहन आणि आदेशांना त्यांच्या कथनी आणि करणीद्वारे व्यावहारिक रूप देतात. हे आपणास कुरआनमध्ये पाहावयास मिळते. वरील आवाहनात जर राजनीतीचा समावेश आहे तर त्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख का आलेला नाही? त्यांनी राजकीय ईशआदेशांबाबत स्पष्ट खुलासा त्यांच्या अनुयायींना केलेला दिसत नाही, तरीपण प्रेषितांनी आपल्या अनुयायींना हे तर स्पष्ट सांगितलेच असते की ईशआदेशांनुसार पवित्र शासनव्यवस्था स्थापन करणे हे त्यांच्या कार्याचे अंतिम ध्येय होते. थोडक्यात राजनीती हे धर्माचे मूलभूत अंग आहे तर प्रत्येक प्रेषिताने ‘‘अल्लाहची भक्ती करा’’ या आवाहनाचे स्पष्टीकरण तसे का केलेले नाही की जेणेकरून आज धर्मात राजनीतीचे स्थान निश्चित झाले असते?
वरील प्रश्न तेव्हाच मनात येतो जेव्हा आपण ईशनियमांच्या सर्वांत महत्त्वाच्या दोन मूलतत्त्वांना विसरून जातो. प्रथम तत्त्व हे आहे की इस्लामी विधीनियमांचा कोणताही घटक अथवा भाग त्याच्या निश्चित वेळेपूर्वी अवतरित झालेला नाही. जेव्हा व्यावहारिक गरज भासली तेव्हाच संदर्भित ईशआदेश अवतरित झाला आहे. अल्लाहने दिव्य प्रकटन तेव्हाच अवतरित केले जेव्हा त्याची समाजाला गरज भासली आणि समाज त्या आदेशाचे पालन करण्यास समर्थ होता. हे प्रथम मूलभूत तत्त्व आहे दिव्य प्रकटनाबाबतचे आणि त्याच्या अवतरणाबाबतचे. दुसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे हा गैरसमज आहे की या प्रथम तत्त्वानुसार नंतर अवतरित झालेले ईशआदेश (दिव्य प्रकटन) हे दुय्यम महत्त्वाचे आहेत. या तत्त्वानुसार धार्मिक विधीनियम जीवनव्यवहाराच्या काही बाबींबद्दलचे अवतरित झालेले नाहीत. याचा अर्थ असे विधीनियम हे महत्त्वाचे नाहीत. याचमुळे त्यांना ईशनियम म्हणताच येणार नाही, असा निष्कर्ष काढणे अगदी चुकीचे आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शब्दांत- ‘‘अल्लाहच्या मार्गातील युध्द (जिहाद) हे इस्लामचे शिखर आहे आणि उच्चतम आचरण आहे.’’ परंतु हिजरी सन २ पूर्वी हे असे संबोधन नव्हते आणि त्यास मनाई होती. असे का? कारण परिस्थिती आणि अटी धार्मिक युध्दासाठी पूरक नव्हत्या. तसेच व्याज निषिध्द आहे. हे अत्यंत हीन दर्ज्याचे पाप आहे. त्याचे वर्णन ‘‘अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताविरुध्द बंड’’ असे आले आहे आणि या कृत्यात (व्याज) जो अडकला त्याला अश्रध्दावंतांसारखी शिक्षा परलोकात मिळेल. परंतु व्याज हे नंतरच्या काळात निषिध्द करण्यात आले. (हिजरी सन ९ मध्ये) यापूर्वी व्याज निषिध्द नव्हते. कारण हेच होते की यापूर्वीचा (हिजरी सन ९ पूर्वी) समाज या आदेशाचे पालन करण्यास सक्षम नव्हता. त्यापूर्वीच हा आदेश कार्यान्वित झाला असता तर तात्कालीन संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असती. हेच उदाहरण मद्यपान (दारू) चे आहे. याला सर्व पापांची जननी म्हणून संबोधले आहे. तरी मद्यपानाला नंतर निषिध्द घोषित करण्यात आले. ही सर्व उदाहरणे ईशआदेशांचे समर्थनार्थ पुरेपूर आहेत.
आपण ही दोन तत्त्वे लक्षात ठेवली तर प्रश्नांचा गुंता आपोआप उलगडत जातो. अल्लाहने काही प्रेषितांना राजकीय आदेश दिलेले नाहीत आणि त्यांचा व त्यांच्या अनुयायींना ईशआदेश (शासनसत्ता) पालन करण्यास सांगितले नाही. याचा अर्थ हा मुळीच नाही की अशी दिव्य प्रकटने गौण आहेत आणि ती ईशआदेशांचा भाग होऊ शकत नाहीत. वस्तुस्थिती ही आहे की तात्कालीन प्रेषितांची सामाजिक स्थिती राजकीय सत्ता स्थापन करण्यास अनुकूल नव्हती म्हणून त्या प्रकारचे आदेश त्या त्या काळी आलेले नव्हते. आपल्याला हे माहीत आहे की काही गोष्टी राजकीय व्यवस्था स्थापन करण्यासाठी अनिवार्य आहेत. त्यासाठी सामाजिक व्यवस्था, एकत्रितपणा आणि त्या प्रकारचे वातावरण लोकांमध्ये असणे आवश्यक आहे. प्रेषितांच्या काळात अशा प्रकारचे वातावरण नव्हते तर त्यांना आणि त्यांच्या अनुयायींना राजनीतीबद्दलचे आदेश देण्यात आलेले नव्हते. ईशआदेशांच्या या प्रशस्त महालात या राजकीय ईशआदेशांचे स्थान हे छतावरचे प्लास्टरसारखे आहे. जोपर्यंत पाया भरला जात नाही, भिती उभ्या राहत नाही आणि छत बांधले जात नाही. तोपर्यंत छताचे प्लास्टर करण्याची ऑर्डर (आदेश) दिलाच जाऊ शकत नाही किवा त्याबद्दलची काही क्रिया होऊ शकत नाही. जर महालाच्या वरील बाबींची पूर्तता झालेली नाही म्हणून छताचे प्लास्टर करण्याचा आदेश देण्यात आला नाही आणि तशी कार्यवाहीसुध्दा झाली नाही म्हणून काय त्या महालाचा मूळ प्लॅन हा बिगर प्लॅस्टर छताचा होता काय? साहजिकच असा विचार मनात आणणेसुध्दा मूर्खपणाचे लक्षण आहे. कोणीही शहाणा मनुष्य हेच सांगेल की मूळ प्लॅन बिगर प्लॅस्टरच्या छताचा असूच शकत नाही. छताचे प्लॅस्टर प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. परंतु जेव्हा छताचे प्लॅस्टर करण्याची वेळ येईल तेव्हाच प्लॅस्टर करण्याची ऑर्डर दिली जाईल आणि त्याप्रमाणे प्लॅस्टर करण्याची कार्यवाही होईल. म्हणजेच जेव्हा छत प्लॅस्टर करण्याची परिस्थिती उद्भवेल त्याचवेळी छत प्लॅस्टर केले जाईल अगोदर मुळीच नाही. हीच अट आणि स्थिती प्रेषितांच्या कार्यप्रणालीबाबत आहे. अशा कार्यप्रणाली ज्यांच्या काळात राजकीय सत्ता स्थापन करण्याची स्थिती उद्भवलेली नव्हती त्या त्या वेळी त्या प्रकारचे (राजनीती) आदेश अवतरित झालेले नाहीत म्हणूनच ते प्रेषित आणि त्यांचे अनुयायी हे ‘ईश्वरी शासनव्यवस्था’ स्थापन करण्यापासून मुक्त होते. ‘ईश्वरी शासनव्यवस्था’ स्थापन करण्यासाठीचा आदेश ‘‘अल्लाहची भक्ती करा’’ यात समाविष्ट आहे. याचा अर्थ असा आपण काढूच शकत नाही की शासन सत्ता प्राप्त करण्याबद्दलचा समावेश ‘‘अल्लाहची भक्ती करा’’ यात करणे गैर आहे. त्या त्या काळात तशी परिस्थिती नव्हती म्हणूनच शासनाधिकार प्राप्त करण्याचा समावेश ‘अल्लाहची भक्ती करा’ यात झाला नव्हता. ज्या ज्या प्रेषितांच्या कार्यप्रणालीमध्ये राजकीय सत्ता स्थापन करण्यासारखी परिस्थिती होती त्या वेळी राजकीय ईशआदेश विनाविलंब अवतरित झालेले आहेत. शासनव्यवस्था स्थापन करण्याचे आदेश आणि राजकीय नियमांचे पालन करण्याच्या व्यवस्थेसंबंधीचे दिव्य प्रकटन त्या वेळी या ईशआदेशात ‘‘अल्लाहची भक्ती करा’’ समाविष्ट होती. इतर धार्मिक विधी आणि उपासनाबद्दलचा त्यात समावेश आलेलाच आहे. म्हणून ‘‘ईश्वरी शासन व्यवस्था’’ (इस्लाम) ची प्रस्थापना करणे हे तितकेच अनिवार्य कृत्य आहे जितके इतर धार्मिक कृत्ये आणि ईशआदेश अनिवार्य आहेत.