Islam Darshan

इस्लामी समाजाचा आदर्श काळ

Published : Saturday, Apr 16, 2016

माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) खलीफा असताना जो काळ होता, तो इस्लामी समाजाचा आदर्श काळ होता. त्या काळात लोकांच्या सुस्थितीची अवस्था अशी होती की जकात गोळा करणाऱ्या शासकवर्गाला गरजुंना हुडकण्यासाठी हिडावे लागत असे, तरीसुद्धा ते घेण्यास पात्र असलेला माणूस त्यांना सापडत नसे. माननीय उमरबिन अब्दुल अजीज (र) यांनी जकात वसुलीच्या कामावर नेमलेल्या याह्या बिन सईद नावाच्या एका कर्मचाऱ्याचे असे कथन आहे,

‘माननीय उमरबिन अब्दुल अजीज (र) यांनी मला जकात वसूल करण्यासाठी आफ्रिकेला धाडले, मी जकात गोळा करुन गरिबांचा शोध केला, पण मला कोणीही गरीब आढळला नाही व जकात घेणारा कोणी गरजूही आढळला नाही, कारण माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांनी लोकांना सुस्थितित आणून सोडले होते. प्रत्येक समाजात गरीब तसेच गरजू लोक निस्संशय असतातच म्हणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कायदे अस्तित्वात असणेही अनिवार्य गोष्ट आहे. इस्लामचा वेळोवेळी ज्या जातीसमुहांशी संबंध आला, त्यांची सांपत्तिक स्थितीही भिन्न भिन्न स्तरांची होती. म्हणूनच ज्या कायद्याचे परिणामस्वरुप माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांना एक आदर्श समाज निर्माण करता आला. असा कायदा इस्लामने निर्माण करणे, अगदी स्वाभाविक होते.

जकात व तिची वास्तवता अशी आहे. या उलट दान व खैरात हे असे द्रव्य असते, जे श्रीमंत व सुस्थितीत असलेले लोक स्वेच्छेने लोकांना देतात. इस्लामने दान-पुण्य, खैरात यांना पसंत ठरविले असून, त्यांना प्रोत्साहन दिले आहे. खैरात वेगवेगळ्या प्रकारे दिली जाऊ शकते. आपल्या माता-पित्यांचे, प्रियजनांचे, नातेवाईकांचे सहाय्य करण्याच्या स्वरुपातही असू शकते. तसेच इतर गरजूंच्या सर्वसाधारण गरजा भागविण्यासाठीही असू शकते, इतकेच नव्हे तर, सत्कर्म व गोड वाणीसुद्धा दान पुण्यात गणले जाऊ शकते.

आपल्या नातेवाईकांना सहानुभूतीच्या व कळवळ्याच्या पोटी जर आपण मदत केली, तर त्यांचा स्वाभिमान अगर भावना दुखावल्या जाऊ शकत नाही हे उघड आहे. आपल्या भाऊबंधाचे अशा प्रकारचे औदार्यपूर्ण वर्तन प्रेमाच्या सहानुभूतीचे फळ असते. अशाच तऱ्हेने आपल्या भावालाच जर कोणीतरी भेट वस्तू देतो अथवा आपल्या नातेवाईकांना भोजनाकरिता आमंत्रण देतो, तेव्हा नंतर ज्याचा तिरस्कार व विरोध करावा अशा प्रकारचा कसलाही अनादर अगर अपमान तो करत नसतो.
वस्तुंच्या रुपाने गरजूंना दिल्या जाणाऱ्या दानाच्या संदर्भात तोच नियम व कायदा त्याच्याकरिताही होता, जो इस्लामने आपल्या आरंभाच्या काळात जकातकरिता तयार केला होता. त्या काळी परिस्थिती अशी होती की गरजवंताच्या गरजा भागविण्यासाठी वस्तूंच्या रुपात देणग्या देणे, हेच उचित ठरविले गेले होते. दान केवळ अशाच स्वरुपात दिले जाऊ शकते, असे इस्लामने एखादे तत्त्व आहे, असा निष्कर्ष यावरुन काढला जाऊ शकत नाही. उलट असे दान समाजकल्याणाचे कार्य करणाऱ्या संस्था व संघटनाही वसूल करु शकतात. अशाच तऱ्हेने जकातची रक्कम निरनिराळ्या सार्वजनिक योजना पूर्ण करण्याकरिता इस्लामी शासनालाही दिली जाऊ शकते. इस्लामचा असा दृष्टिकोन आहे की जोवर समाजात गरीब लोक आहेत, तोवर प्रत्येक शासनाने आपली सर्व साधने वापरुन त्यांच्या जीवनास लागणाऱ्या जास्तीतजास्त सुविधा एकत्रित कराव्यात. परंतु समाजात कायमच्या दरिद्री व लाचार वर्ग व्हावा असे इस्लाम कदापिही इच्छित नाही. उलट इस्लामची अशी इच्छा असते की समाजात दरिद्री व लाचार कोणी राहू नये. म्हणूनच आदर्श इस्लामी समाजात जकात घेणारे लोक शोधूनही सापडत नव्हते. म्हणून माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांचा काळ इस्लामी समाजाचे असे वैशिष्ट्य उघड करुन दाखवितो की त्यामध्ये दरिद्री व लाचार माणूस शोधूनही सापडत नव्हता. जेव्हा अशी स्थिती निर्माण होईल तेव्हा जकात व दान यांची रक्कम स्वतःचे उदरनिर्वाह करण्यास कोणत्याही कारणामुळे अक्षम असणाऱ्या लोकाकरिता व सार्वजनिक कल्याणाच्या व हिताच्या कामाकरिता खर्च केली जाईल.

हा उपकार नसून कर्तव्यपूर्ती आहे

इस्लाम लोकांना दान पुण्य व खैरात यावर अवलंबून राहण्याची शिकवण देत नाही. आपल्या राज्यातील असे नागरिक जे स्वतःचे उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत, अशा नागरिकांना सन्मानजनक आयुष्य कंठण्याकरिता लागणाऱ्या सुखसोई व सवलती गोळा करण्याची जबाबदारी इस्लामी शासनावर टाकण्यात आली आहे. हे खरे आहे. अशा लोकांना सहाय्य करुन इस्लामी शासन त्यांच्यावर उपकार अथवा मेहबरबानी करते असे नसून उलट आपले कर्तव्य पार पाडीत असते.
या शिवाय, उद्योग करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व व्यक्तींना उद्योग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही इस्लामी राज्यावर येते. इस्लामी शासनावरील या जबाबदारीचे स्पष्टीकरण इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या खालील हदीसने सुलभ रितीने होते. त्यात असे सांगितले गेले आहे,
‘‘एक माणूस प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे आला व निर्वाहाकरिता मदत मागितली. प्रेषितांनी त्याला एक कुऱ्हाड व एक दोरी देऊन असा आदेश दिला की त्याने जंगलातून लाकडे तोडून व ती विकून आपला उदरनिर्वाह करावा आणि काही दिवसानंतर आपल्या स्थितीविषयी खबर द्यावी.’’
काही शंकेखोर माणसे या हदीसला केवळ वैयक्तिक बाब म्हणून टाळतील, हे शक्य आहे. कारण वर्तमान शतकाशी तिचा कसलाही संबंध नाही. कारण या हदीसमध्ये कुऱ्हाड, दोरी व एक अगदी बेकार माणूस यांचा उल्लेख आहे. या उलट वर्तमान युगात आमचा संफ व संबंध मोठमोठ्या कारखानदारांशी, लाखावर बेकार मजुरांशी, संघटित शासनांशी व त्यांच्या विभागांशी आहे. अशा प्रकारच्या गोष्टी केवळ मूर्खपणाच्या आहेत, कारण हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा कारखानदारीचे जगात अस्तित्वही नव्हते, तेव्हा इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी या विषयाबाबत गोष्टीं सांगून त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, नियम व कायदे करणे, हे त्यांचे कामच नव्हते. तसे त्यांनी केले असते, तर त्या काळातील कोणीही माणूस त्यांची गोष्ट समजला नसता.

अशी पद्धत अवलंबण्याऐवजी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी मानवी जीवनातील मूलतत्त्वे ठरविणे पुरेसे मानले व ती तत्त्वे जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांची सोडवणूक करताना प्रत्यक्ष व्यवहारात कशी आणावीत हे भविष्य काळातील पिढ्यावर सोडून दिले. जेणेकरुन त्यांनी या मूलतत्त्वाच्या मार्गदर्शनाने जीवनातील बाबींचा तपशीलवार स्वतःच निर्णय ठरवावा.

संबंधित लेख

  • स्त्री-स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना व त्याचे परिणाम

    अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत.. तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती. ग्रीस, रोम, इजिप्त, इराक, भारत, चीन व अरब देशांत प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय होत होता. बाजारात आणि उत्सवांमध्ये तिची खरेदी विक्री होत असे. जनावरापेक्षाही वाईट वर्तणूक तिच्या बरोबर करण्यात येइ असे ‘ग्रीस’ मध्ये तर बऱ्याच काळापर्यंत यावरच चर्चा होत होती की स्त्रिच्या शरीरात आत्मा आहे किवा नाही? अरबी जनता स्त्रिच्या अस्तित्वास अडसर समजत असे. काही पाषाण हृदयी तर आपल्या मुलींना जन्मताच जिवंत पुरत असत.
  • इस्लामचा चौथा आधारस्तंभ सौम (रोजा) - उपवास

    सौम अथवा सियाम याचा अर्थ होतो आराम करणे. मनुष्य उपवासाच्या कालावधीत खाणे, पिणे आणि समागम करणे यास पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत आराम देतो. रोजाची वैशिष्ट्ये: कुरआनने रोजाविषयीचे अनेक फायदे आणि लाभदायक गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्यातील काही मौलिक महत्त्वाच्या आहेत. रोजाचे महत्त्व समजण्यासाठी त्याची सुधारणात्मक वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]