Islam Darshan

मुस्लिमांची जबाबदारी - एक राष्ट्र या संदर्भात

Published : Saturday, Apr 16, 2016

इस्लामचे श्रेष्ठत्व: इस्लामच्या विशेष अशा अग्रगण्य स्थानाबद्दल आता आपण विचार करू या. इस्लामचा हा दावा आहे की तोच एकमेव परिपूर्ण असा धर्म आहे. तो सर्व मानवांसाठी आहे. इस्लाम एकमेव धर्म आहे आणि मानवाच्या मुक्तीसाठी इस्लामचे अनुकरण अनिवार्य आहे. इस्लाम हा सर्वोत्कृष्ट धर्म असल्यामुळे त्याच्या काही विशेष गरजा असणे स्वाभाविक आहे. या विशेष गरजांपैकी एक महत्त्वाची गरज ही आहे की इस्लामचा प्रसार-प्रचार जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावा. प्रत्येक राष्ट्रात इस्लामची शिकवण सर्वदूर पोहचवावी आणि जगातील प्रत्येक माणसाला इस्लामसंदेश प्राप्त होणे अत्यावश्यक आहे. हे एक नियमित चालणारे कृत्य आहे. जर हे कार्य सदोष असेल तर जग इस्लामसंदेश त्याच्या पूर्ण रूपात जाणून घेऊ शकत नाही. समस्त मानवजातीला जोपर्यंत इस्लामसंदेश पोहचत नाही तोपर्यंत हे जग इस्लामी संघ (आज्ञाधारक लोकांचा सघ) बनू शकत नाही. इस्लाम वर श्रध्दा ठेवणे हे समस्त मानव जातीसाठी अनिवार्य आहे आणि इस्लामवर अश्रध्दा ठेवणे हे मानवतेच्या विनाशाला कारणीभूत ठरते. अशा स्थितीत जगाला इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ ठेवणे हे अवैध आहे. इस्लामचे अनुकरण समस्त मानवजातीसाठी अनिवार्य आहे तर इस्लामची ओळख त्यांना करून देणे हेसुध्दा अनिवार्य आहे. हे कार्य पार पाडण्यात असफलता हा इस्लामवर घोर अन्याय आहे. ज्यामुळे इस्लाम जगाला अनभिज्ञ ठरतो आणि मानवतेसाठी अन्यायी कृत्य ठरते. कारण ईशकृपेला ते वंचित राहतात. जोपर्यंत इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) जिवंत होते त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण पाडली. आज त्यांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी तुम्हा-आम्हांवर आली आहे. जगाच्या अंतिम दिनापर्यंत ही जबाबदारी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अनुयायींवर आहे. कारण आता कोणी दुसरा प्रेषित या कामासाठी येणार नाही. इस्लामचे हे सर्वोत्कृष्ठ स्थान त्याच्या प्रचार-प्रसारकार्याला अत्यावश्यक कर्तव्य सिध्द करते. हे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. हे कार्य कसे पार पाडावे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी इस्लामने घालून दिलेल्या नियमानुसार व्यावहारिक उपाय शोधले पाहिजेत. इस्लाम
एक ईशधर्म आणि शाश्वत धर्म असून तो संपूर्ण मानवजातीसाठी असल्याने या प्रश्नाचे समर्पक उत्तर त्याच्याकडे असणारच.

मुस्लिमांची कर्तव्ये: जेव्हा आपण या प्रश्नाची उकल करण्यासाठी कुरआनचा संदर्भ घेतो तेव्हा आपणास उत्तर त्वरित मिळते. अगदी सविस्तर उत्तर! प्रश्नासारखेच प्रशस्त उत्तर! कुरआननुसार उत्तर खालीलप्रमाणे आहे,

‘‘अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगातील लोकांवर तुम्ही साक्षी व्हा. आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’ (कुरआन २: १४३)

हा दिव्य आदेश या प्रश्नाचे व्यावहारिक उपाय सुचवत आहे. ते खालीलप्रमाणे,

१) समस्त मानवजातीपर्यंत इस्लामसंदेश वहनकार्य प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत पार पाडले आणि त्यांच्यानंतर आता हे कार्य करण्यास त्यांचे अनुयायी जबाबदार आहेत. अनुयायी जोपर्यंत या जगात हयात आहेत तोपर्यंत त्यांना हे कार्य पार पाडावेच लागणार आहे.

२) सर्वसाधारण उपदेश पध्दतीद्वारा हा इस्लामसंदेश देता येत नाही. त्याला साक्षीपूर्वक देणे आवश्यक आहे.

३) याचाच अर्थ असा आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत (जीवनात) इस्लामसंदेश जशा पध्दतीने सर्व दूर पोहचविला त्याच पध्दतीने त्यांच्या अनुयायींना प्रामाणिकपणे हा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहचवावा लागणार आहे.

इतिहास काळात लोकांना त्यांचा धर्म प्रामाणिकपणे पाळणे ही एकच जबाबदारी होती. तेव्हा मुस्लिमांची ही धार्मिक जबाबदारी आणखी वाढविण्यात आली. वाढीव जबाबदारी मुस्लिमांची ही आहे की त्यांनी इस्लामला जगापुढे उत्तमरीतीने प्रदर्शित करावे. यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. जसे प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहने सर्वांसाठी आणि सर्वकाळ प्रेषित नियुक्त केले, तसेच एक व्यावहारिक योजना कार्यान्वित केली की इस्लामसंदेश वहनकार्य सतत चालत राहावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपले साथीदार या कामासाठी प्रशिक्षित केले. ते सर्वजण या कामी उत्तम तरबेज झाले होते की त्यांनी वरील दिव्य आदेशाची साक्ष दिली जशी साक्ष स्वतः प्रेषितांनी दिली होती. त्या ‘उत्तम समाजात’ उत्तम प्रशिक्षित समाजाने आपल्या भावी पिढीला या कार्यासाठी प्रशिक्षित केले जेणेकरून त्यांनी इस्लामसंदेश कार्य पुढे न्यावे. अशा प्रकारे हे कार्य सतत जगाच्या अंतापर्यंत चालूच राहणार आहे. अरबी लोक टोळया टोळ्याने जेव्हा इस्लाम स्वीकारू लागले आणि एक ‘उत्तम समुदाय’ प्रेषितांच्या साथीदारांचा पूर्ण प्रशिक्षित झाला होता. तेव्हा अल्लाहने प्रेषितकार्य संपुष्टात आणले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मृत्युपश्चात हे कार्य त्या प्रशिक्षित सहकार्यानी जगभर पसरविले. ते जगातील लोकांवर साक्षी ठरले.

‘‘अशा प्रकारे आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे जेणेकरून तुम्ही जगातील लोकांवर साक्ष व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’ (कुरआन २: १४३)

अशा प्रकारे हे जगजाहीर झाले की प्रेषित मुहम्मद (स.) हे अरब लोकांमध्ये कार्यरत राहिले तर जगातील इतर लोकसमुदायांमध्ये ते त्यांच्या प्रशिक्षित सहकाऱ्यांकरवी कार्यरत होते. अशा रीतीने प्रत्येक काळात मुस्लिमातील एक समुदाय या कार्यासाठी प्रशिक्षित केला जात असे. म्हणूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मृत्युपश्चात हे कार्य (धर्मप्रचार) मुस्लिमांची जबाबदारी बनली की त्यांनी जगात या सत्याचे साक्षी बनावे. हे कार्य त्याच धैर्याने आणि सचोटीने पार पाडले जावे जसे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी पार पाडले होते. मुस्लिम समुदाय हा प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उत्तरदायी आहे आणि म्हणूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कार्याचासुध्दा तोच उत्तरदायी आहे. ही मुस्लिमांची जबाबदारी साधारण जबाबदारी नाही. ही अशी एकमेव श्रेष्ठ जबाबदारी आहे की त्यांच्या अस्तित्वाचा तो एकमेव हेतू आहे. खालील कुरआनोक्तीने हे सत्य आणखी स्पष्ट होते.

‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला मानवांच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता मैदानात आणले गेले आहे. तुम्ही सदाचारांचा आदेश देता आणि दुराचारांपासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रध्दा बाळगता.’’ (कुरआन ३: ११०)

वरील उक्ती स्पष्ट निर्देश करते की मुस्लिम इतरांप्रमाणे लोकसमुदाय (राष्ट्र) नाही. हे राष्ट्र (लोकसमुदाय) आहे ज्याला समस्त मानवजातीचा मार्गदर्शक आणि सुधारक बनवून पाठविले आहे. हा त्याचा पहिला आणि शेवटचा उद्देश आहे ज्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून आहे. हे सर्वमान्य सत्य आहे की एका ध्येयप्राप्तीसाठी कार्यरत राहणे तोपर्यंतच शक्य आहे जोपर्यंत त्या कार्याचे महत्त्व आहे. परंतु जेव्हा त्या ध्येयप्राप्तीचे लक्ष आपण गमावून बसतो तेव्हा त्या गोष्टीचे (कार्याचे) महत्त्व राहात नाही. म्हणूनच मुस्लिम समुदायाचे महत्त्व हे समस्त मानवजातीसाठी साक्ष बनून राहण्यात आहे. ते हे कार्य (धर्मप्रचार) जोपर्यंत करीत राहतील तोपर्यंत त्यांची ओळख ‘उत्तम जनसमुदाय’ म्हणून असेल. हे कर्तव्य पारपाडण्यास मुस्लिम समुदाय अपयशी ठरेल तेव्हा त्याची उपाधी हिसकावून घेतली जाईल. अशा स्थितीत तो मुस्लिमसुध्दा राहात नाही कारण मुस्लिम हे फक्त नाव नाही तर ते विशेषण आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो, झुका व नतमस्तक व्हा, आपल्या पालनकर्त्यांची भक्ती करा आणि सत्कृत्ये करा. यामुळेच अपेक्षा केली जाऊ शकते की तुम्हाला यश लाभेल. अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करा जशी ती करायला हवी. त्याने तुम्हाला आपल्या कार्यासाठी निवडले आहे आणि धर्मामध्ये तुमच्यावर कोणतीही अडचण ठेवली नाही. दृढ व्हा आपल्या पिता इब्राहीम (अ.) च्या परंपरे (मिल्लत) वर, अल्लाहने पूर्वीसुध्दा तुमचे नाव मुस्लिम ठेवले होते आणि या (कुरआन) मध्येसुध्दा (तुमचे असेच नाव आहे.) जेणेकरून पैगंबराने तुमच्यावर साक्षी राहावे. आणि तुम्ही लोकांवर साक्षीदार. म्हणून नमाज कायम करा, जकात द्या आणि अल्लाहशी दृढनिष्ठ व्हा. तो आहे तुमचा वाली, फारच चांगला आहे तो वाली आणि फारच चांगला आहे तो सहायक.’’ (कुरआन २२: ७८)

मुस्लिमांचे अग्रगण्य स्थान आणि विशेष जबाबदारीचे वरील कुरआनोक्तीमध्ये स्पष्टीकरण आले आहे. ज्या शब्दाचा वापर ‘इज्तबकूम’ हा प्रेषित नियुक्तीसाठी कुरआनमध्ये आला आहे तोच शब्द मुस्लिम समुदायच्या नियुक्तीसाठीसुध्दा वापरला आहे. यावरून तो समुदाय हा उत्तम समुदाय सिध्द होतो. यानंतर खालील शब्दसमूहाचासुध्दा आपण विचार करू या. ‘‘अल्लाहने पूर्वीसुध्दा तुमचे नाव मुस्लिम ठेवले होते.’’ यावरून हे सिध्द होते की तो जनसमुदायाला (राष्ट्राला) मुस्लिम (आज्ञाधारक) म्हणून संबोधले आहे. ही उपाधी ऐतिहासिक काळात दिली गेली आहे. मुस्लिमांचे अग्रगण्य स्थान होण्याचा हा एक दुसरा महत्त्वाचा पुरावा आहे. याचाच अर्थ असा होतो की ऐतिहासिक काळात दिलेले नाव मुस्लिम आता प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाल्यानंतर पुन्हा दिले गेले. ही आनंदवार्ता कुरआन देत आहे. हा शब्द (मुस्लिम) आतुरतेने वाट पाहात बसला होता की त्याचे पुन्हा व्यावहारिक स्वरुप स्पष्ट व्हावे. त्याचे स्वरुप, विशेषता आणि कर्तव्य पुन्हा स्पष्ट केले गेले. ही एक आनंदवार्ता प्रसारित करण्याची साधारण घोषणा नव्हती. त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जगापुढे आणखी एक पुरावा सादर केला गेला की मुस्लिम समुदाय एक उत्तम जनसमुदाय आहे.

आता आपण तिसऱ्या वैशिष्ट्यांकडे वळू या. वरील कुरआनोक्तीत ‘या कुरआनमध्ये’ हे शब्द त्या लोक समुदायाचे महत्त्व दर्शवितात ज्याला उत्तम समुदाय म्हटले आहे. ही एकमेव जबाबदारी त्यांच्यावर पुन्हा टाकण्यात आली आहे. या राष्ट्राची उभारणी अशा प्रकारे केली आहे की त्यामुळे हे महत्तम कार्य पार पाडण्यास सहज जावे. ज्यासाठी ‘‘प्रेषित तुमच्यावर साक्षी राहतील.’’ या वाक्यामुळे प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळते की या लोक समुदायाचे (राष्ट्राचे) हेतु काय आहे ज्यासाठी यांची नियुक्ती झाली आहे आणि तो हेतु कसा प्राप्त केला जाईल? अशा प्रकारे वरील कुरआनोक्ती फक्त मुस्लिम लोकसमुदायाचे वैशिष्ट्ये, महत्त्व आणि स्थितीचाच उल्लेख करीत नाही तर त्याचे समर्थनसुध्दा करीत आहे. त्यांनी जर त्यांचे कर्तव्य पार पाडले तर ते एक आज्ञाधारक (मुस्लिम) राष्ट्र ठरते अन्यथा ते फक्त इतरांसारखेच सामान्य राष्ट्र असते.

म्हणून खऱ्या धर्माचे अस्तित्व हे त्या राष्ट्राचा हेतु आणि ध्येय आहे तर ते अल्लाहसमोर त्याबद्दल जबाबदार आहेत. मुस्लिम हा व्यक्तिशः अल्लाहसमोर त्याच्या कृत्यांबद्दल जबाबदार आहे, तसेच एक मुस्लिम राष्ट्र सामुदायिक जबाबदारीला उत्तरदायी आहे. हे काही शुल्लक उत्तरदायित्व नाही. ही प्रेषितांसारखी जबाबदारी आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘म्हणून खचितच हे होणार आहे की आम्ही त्या लोकांना जाब विचारावे ज्यांच्याकडे आम्ही प्रेषित पाठविले आहेत. आणि प्रेषितांनादेखील विचारू (की त्यांनी संदेश पोहचविण्याचे कर्तव्य कितपत पार पाडले व त्यांना त्याचे काय उत्तर मिळाले.)’’

अशा प्रकारे सामान्य माणसाला जसे विचारले जाईल की त्यांनी प्रेषितांच्या आमंत्रणाला कसे उत्तर दिले आहे? तसेच प्रेषितांना विचारले जाईल की त्यांनी संदेश पोहचविण्याचे कर्तव्य कितपत पार पाडले व त्यांना त्याचे काय उत्तर मिळाले? हा जाब देणे अवघड जाईल जेव्हा त्यांनी इस्लामसंदेश पोहचविण्याचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडले नसेल आणि त्याला जगातील लोकांपासून लपवून ठेवले असेल. अल्लाहने या गुन्ह्याबाबत कुरआनमध्ये स्पष्ट समज दिलेली आहे,

‘‘त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल की ज्याने ती साक्ष लपविली जी अल्लाहकडून त्याच्याकडे आली होती, आणि अल्लाह अनभिज्ञ नाही.’’ (कुरआन २: १४०)

संबंधित लेख

  • मानवी स्वभाव निकृष्ठ दर्जाचा नाही

    इस्लामसमोर मानवी स्वभाव खाजगी संपत्तीचे फल निश्चितपणे अन्याय व अत्याचाराच्या रुपानेच मिळावे इतका निकृष्ठ दर्जाचा नाही. माणसांच्या शिक्षणाच्या व संस्कृतीच्या संदर्भात इस्लामला अपूर्व सफलता प्राप्त झालेली आहे. म्हणून धन व संपत्तीचे मालक असतानाही मुस्लिमांची अशी अवस्था होती की -
  • इस्लामी शासन

    इस्लामी शासनामध्ये हुकूमशहा असत नाहीत. कारण इस्लाम उदंडता, उन्मत्तपणा व हुकूमशाही सहन करण्याविरुद्ध आहे. तसेच तो आपल्याचप्रमाणे असलेल्या इतर माणसावर, अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या इच्छेला सोडून त्यावर आपण निर्माण केलेले कायदे लादण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी देत नाही. इस्लामी शासनामध्ये, शासक ईश्वर व जनता या दोहोंना जबाबदार असतो. या जबाबदारीच्या कर्तव्याची ही निकड आहे की त्याने माणसामध्ये ईश्वरनिर्मित कायदे लागू करावे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]