Islam Darshan

माननीय झैद बिन साबित(र.) अन्सारी

Published : Sunday, Mar 06, 2016

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,

‘‘हे प्रेषित! हा मुलगा ‘नज्जार’ परिवाराचा सुपुत्र असून यास दिव्य कुरआनचा अभ्यास करण्याचा खूप छंद आहे. याने आतापर्यंत कुरआनाच्या एकूण सतरा ‘सूरती’ मुखपाठ केल्या आहेत.’’

विश्वकृपाळू प्रेषित मुहम्मद(स.) हे ऐकून खूप आनंदीत झाले. त्यांनी या मुलास दिव्य कुरआनच्या मुखपाठ असलेल्या सूरती वदन्याचा आदेश दिला. या सुकुमाराने तत्काळ आदेशाचे पालन केले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) खूप प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरविला, हेच बाळ ‘माननीय झैद बिन साबित अन्सारी(र.)होत.

धार्मिक ज्ञानसंपदा आणि शिक्षण-प्रशिक्षणात हाडाचे शिक्षक असलेल्या प्रेषितसोबत्यांपैकी एक असलेले माननीय झैद बिन साबित अन्सारी हे वयाच्या अकराव्या वर्षीच इस्लामचे खंदे समर्थक बनले. त्यांचा जन्म हिजरी सन पूर्व १२ मध्ये झाला. ते ‘अबू सईद’ या टोपणनावानेसुद्धा ओळखले जातात. ते इस्लामी धर्मशास्त्राचे अतिशय महान विद्वान होते. त्यांची वंशपरंपरा अशी,

झैद पिता साबित पिता जहाक पिता झैद पिता लजान पिता अमरु पिता अबद पिता ऑफ पिता गनम पिता मालिक पिता नज्जार.

माननीय झैद बिन साबित(र.)यांचे पिता प्रेषित स्थलांतराच्या पाच वर्षांपूर्वीच वारले होते. लहानपणीच त्यांची पितृछाया हरपल्याने ते माता ‘नवार बिन्त मालिक’ यांच्याच प्रेमळ मायेत वाढले. हिजरी सन पूर्व १ मध्ये इस्लाम धर्माचे प्रचारक व प्रसारक माननीय मुसअब बिन उमैर(र.)हे मदीना शहरी आले, त्याच वेळी त्यांच्या इस्लाम प्रचारकार्यामुळे ‘अवस’ आणि ‘खजरच’च्या घराण्यात इस्लाम धर्मावर चर्चा रंगल्या. याच काळात इस्लाम धर्म स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविणार्यांपैकी माननीय झैद बिन साबित(र.)सुद्धा आहेत. ईश्वराने त्यांना अत्यंत पवित्र आचरण आणि मनमिळाऊ स्वभावाने वरदानित केले होते. इस्लाम स्वीकारताच त्यांनी दिव्य कुरआनचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अभ्यासु वृत्तीमुळे ते सर्व अन्सारी सोबत्यांमध्ये प्रतिष्ठित होते. प्रचंड स्मरणशक्ती असल्याने आणि अभ्यासु वृत्तीमुळे सर्वांचे ते खूप लाडके होते. त्यांनी अगदीच अल्पकाळात अरबी भाषेव्यतिरिक्त इतर बर्याच भाषांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविले होते. त्यांना अरबी, इब्रानी, अॅबिसीनीयन, कब्ती, रोमन, पर्शियन आणि इतर अनेक भाषांतर उत्तम प्रभुत्व मिळविले होते. त्यांचे हस्ताक्षरदेखील अतिशय सुरेख होते. शिवाय कलाकुसरीच्या कामात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. अंकगणित आणि भूमिती शास्त्रात त्यांनी बरेच संशोधन केले होते.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) त्यांच्यातील या सर्व विषयांच्या प्राविण्यामुळे त्यांचा खूप लाड पुरवीत असत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांवर अवतरित होणारे दिव्य कुरआन लिहिण्याची कामगिरी देखील त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती.(संदर्भ : मुस्नदे अहमद)

‘बदर’च्या रणांगणावरील इस्लाम आणि इस्लामविरोधी शक्तीदरम्यान हिजरी सन २ मधील रमजान महिन्यात झाले. धर्मयुद्धात सहभागी होण्याकरिता वयार्ची पंधरा वर्षे पूर्ण होण्याची अट प्रेषितांनी लावली होती. परंतु धर्मयुद्धाने प्रेरित झालेले माननीय झैद(र.)हे आपल्या सवंगड्यांना घेऊन प्रेषितदरबारी हजर झाले आणि युद्धात सहभागी होण्याची परवानगी देण्याची विनंती केली. परंतु आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली नाही.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ओहदच्या धर्मयुद्धात आपल्या युद्धकौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याबरोबर बर्याच युद्धांत आपले कौशल्य दाखविले. तबूकच्या युद्धात त्यांनी अभूतपूर्व कौशल्य दाखविले. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वयात आदरणीय प्रेषितांनी त्यांना लष्कर प्रमुखपदसुद्धा दिले.

माननीय उमर फारुक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात ते मदीना शहराचे न्यायाधीश होते. एकदा इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)आणि ‘उबै बिनकआब(र.)’ यांच्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले. त्यांचे मतभेद प्रकरण माननीय झैद(र.)यांच्या न्यायालयात दाखल झाले. माननीय उमर फारुक(र.)हे इस्लामी शासक असल्याने माननीय झैद(र.)यांनी त्यांना विशेष आसनाची व्यवस्था केली आणि माननीय उबै बिन कआब(र.)हे सामान्य आसनावर बसले. ही विशेष व्यवस्था पाहून माननीय उमर(र.)खूप नाराज झाले आणि माननीय झैद(र.)यांना म्हणाले, ‘‘न्यायालयात राजा आणि प्रजेदरम्यान असा कोणताच भेद असेलला मी खपवून घेणार नाही आणि ते माननीय उबै बिन कआब(र.)यांच्या बाजूला जाऊन बसले.

माननीय उमर फारुक(र.)यांना माननीय झैद(र.)यांच्या कार्यकौशल्यावर खूप विश्वास होता. ते मक्का शहरी पवित्र हज यात्रेस गेल्यावर माननीय झैद(र.)यांच्यावरच इस्लामी शासनाची जवाबदारी सोपवून गेले होते. शिवाय शासकीय कारभाराचे इस्लामी नियम आणि कायदेकानू तयार करण्यात त्यांनी खूप हातभार लावला. शासकीय वेतनश्रेणी आणि आर्थिक व्यवस्थेचे उत्तम नियम त्यांनी घालून देण्यास मदत केली.

हिजरी सन २४ मध्ये माननीय उमर(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय उस्मान(र.)यांनी इस्लामी शासनाची धुरा सांभाळली, तेव्हासुद्धा त्यांनी इस्लामी राज्यकारभारास भरपूर मदत केली. माननीय उस्मान(र.)सुद्धा त्यांचा खूप आदर करीत असत.

माननीय उस्मान(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय अली(र.)यांनी हाती इस्लामी शासनाची धुरा सांभाळली. त्यांच्या काळातही माननीय झैद बिन साबित(र.)यांनी इस्लामी शासनाची आजीवन सेवा केली.

माननीय झैद(र.)यांना असलेल्या धर्मज्ञानाच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हे स्वतः म्हणत की, इस्लामच्या अनिवार्य कर्माचे सर्वांत जास्त ज्ञान झैद(र.)यांना आहे. वारसाहक्क विधीतील अतिशय कठीण ज्ञानावर त्यांना कमालीचे प्रभुत्व होते. प्रेषितांच्या काळातसुद्धा ते धर्मविधीच्या विविध विषयांवर फतवे देत असत. माननीय उमर फारुक(र.)यांनी मदीना शहरात त्यांची उपस्थिती अगदी अनिवार्य समजली होती. त्याचप्रमाणे माननीय झैद(र.)यांना दिव्य कुरआन, प्रेषितवचने आणि धर्माविधी तत्त्वज्ञानातही पारंगत होते. एवढेच नव्हे तर कुरआनच्या पठनातील उच्चारशास्त्रातही ते कुशल हते. त्यांच्याकडून एकूण ९२ प्रेषितवचने कथन करण्यात आली आहेत.

माननीय झैद(र.)शुद्ध आचरणाचे व्यक्ती होते. त्यांच्या नीतिमत्ता ग्रंथाच्या पानावर इस्लाम स्वीकारण्यातील पुढाकार, ज्ञानार्जनाचा छंद, प्रेषितावरील अपार प्रेम, प्रेषित जीवनचरित्राचे अनुकरण, सत्यवचन आणि नम्रता हे विशेष गुणधर्म स्पष्टपणे आढळतात. त्यांनी जीवनाचा अधिकांश काळ प्रेषितांच्या सोबत व्यतीत केला. सकाळी उठून ते प्रेषितांकडे जात असत. आदरणीय प्रेषितसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करीत असत. त्यांना आपल्याजवळ बसवीत असत. ‘ज्यू’ लोकांकडून होणारा इब्रानी भाषेतील पत्रव्यवहार तेच हाताळत असत. आदरणीय प्रेषितांच्या आदेशामुळेच त्यांनी इब्रानीसह अनेक भाषा अवगत केल्या होत्या.

प्रेषित जीवनाच्या नियमांचा माननीय झैद(र.)अगदी काटेकोरपणे अनुकरण करीत आणि इतरांनाही याचे नियम शिकवीत असत. प्रेषित जीवनाच्या नियमांविरुद्ध कोणाचेही कर्म ते मुळीच खपवून घेत नसत. एके दिवशी आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तीन गोष्टी मुस्लिम माणसाच्या अंतःकरणास चैतन्य प्रदान करतात. प्रथम हे की, प्रत्येक कार्य ईशप्रसन्नतेखातरच करावे. द्वितीय हे की, शासकांना सत्यनिष्ठेचा आग्रह करावा, तृतीय हे की, संघटित राहावे.

माननीय झैद(र.)यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ते सर्वांनाच मोठ्या आनंदाने, प्रेमपूर्वक व आस्थेने भेटत असत. कोणत्याही लहान-मोठ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत असत. आपल्या ज्ञानावर कधीच गर्व करीत नसत. विद्येबरोबरच त्यांच्यात विनयशीलता होती. अशा या अत्यंत महान आणि सूज्ञ इस्लामी विद्वानाचे जीवनचरित्र आपल्यासाठी मोठाच बोधात्मक उपदेश आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी हिजरी सन ४६ मध्ये हे महान विद्वत्ता, ज्ञान-विज्ञानाचा अभूतपूर्व खजिना संपूर्ण मानवजातीस देऊन परलोकी प्रवासास निघाला.

संबंधित लेख

  • इस्लाम व महिलावर्ग

    इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो.
  • ‘‘लोकांनो! हिशोबाची वेळ जवळ आली आहे.’’

    ‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटिका आणि तरीसुध्दा ते गाफीलच आहेत. त्यांच्याजवळ जो उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि दुर्लक्ष करतात. त्यांचे मन जगाच्या खेळ-तमाशात दंग आहे. अत्याचारी आपापसात कानगोष्टी करतात की, ‘हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे. मग तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार काय?’ प्रेषितांनी उत्तरादाखल सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत आहे. तो ऐकणारा व जाणणारा आहे.’’(कुरआन २१:१-४)
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]