Islam Darshan

माननीय अबू हुरैरा दौसी(र.)

Published : Sunday, Mar 06, 2016

माननीय अबू हुरैरा(र.)हे प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या अशा महान त्यागी सोबत्यांपैकी एक होते ज्यांनी आदरणीय प्रेषितांचे सान्निध्य मिळविण्यासाठी आपले वतन, घरदार आणि संपत्तीचा त्याग केलेला होता. प्रेषितांचे शिष्यत्व त्यांना जगाच्या संपूर्ण संपत्तीपेक्षाही जास्त मौलिक होते. प्रत्यक्ष प्रेषितांकडून धर्मशिक्षण घेऊन त्यांनी लाखो विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा विझविली.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे वचन तोंडपाठ करून कथन करणार्या सात सोबत्यांपैकी ते एक होते. त्यांनी सर्वाधिक म्हणजे ‘पाच हजार तीनशे चौर्याहत्तर’ प्रेषितवचने कथन केली आहेत. आदरणीय प्रेषितांनी त्यांना प्रचंड स्मरणशक्ती प्रदान करण्याची ईश्वराकडे प्रार्थना केली होती. म्हणून त्यांची स्मरणशक्ती कमालीची होती.

माननीय अबू हुरैरा(र.)यांचे त्यांच्या माता-पित्यांनी ‘अब्देशम्स’ असे नांव ठेवले होते. परंतु इतिहासात ते ‘अबू हुरैरा’ या नावाने अजरामर झाले. ते ‘येमेन’च्या ‘दौस’ कबिल्याचे सुपुत्र होत. त्यांची वंशशृंखला अशी आहे -

‘अबू हुरैरा(र.)पिता हनिया पिता सआद पिता सआलबा पिता सलीम पिता फहम पिता गनम पिता दौस’. अबू हुरैरा(र.)यांच्याकडे एक मांजर होते. या मांजरावर त्यांचे खूप प्रेम होते. अरबी भाषेत मांजराला ‘हुरैरा’ असा शब्द आहे. मांजर नेहमीच जवळ ठेवणारे म्हणजेच ‘अबू हुरैरा’ असे त्यांचे टोपणनाव पडले.

माननीय अबू हुरैरा(र.)यांचे पिता त्यांच्या बालपणातच वारल्याने त्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे होते. ते दररोज आपल्या शेळ्या जंगलात चारण्यास घेऊन जात आणि संध्याकाळी परत घेऊन येत असत. परंतु हळूहळू त्यांच्या शेळीपालन व्यवसायात विकास झाला. मग त्यांनी आपल्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. त्यांनी साहित्य व कवनशास्त्रात प्राविण्य मिळविले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहरात प्रेषितत्वाची घोषणा केल्यावर ‘येमेन’ ‘दौस’ कबिल्यातील एका सुस्वभावी आणि श्रीमंत असलेल्या ‘‘तुफैल बिन अमरु(र.)’ यांनी प्रेषितदरबारी जाऊन इस्लामचा स्वीकार केला आणि ‘येमेन’ ला परत येऊन इस्लामचा प्रचार केला. त्यांच्या प्रचाराच्या परिणामस्वरुपी केवळ चारच जणांनी इस्लाम धर्म स्वीकारला. हे चार भाग्यवान म्हणजे ‘तुफैल(र.)’ यांचे आई, वडील, पत्नी आणि माननीय अबू हुरैरा(र.)हे होत. माननीय तुफैल(र.)यांनी ‘येमेन’ मध्ये इस्लामचा प्रचार करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ते निराश होऊन मक्का शहरात प्रेषितदरबारी हजर झाले आणि म्हणाले,

‘‘हे प्रेषित मुहम्मद(स.)! मी एकेश्वरवादाचा प्रचार व प्रसार करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या समाजाचे लोक याकडे दुर्लक्ष करण्याचे दुर्भाग्य ओढवून घेतात.’’ आदरणीय प्रेषितांनी ईश्वरदरबारी प्रार्थना केली,

‘‘हे ईश्वरा! ‘येमेन’वासियांना सत्यधर्म स्वीकारण्याची सुबुद्धी दे.’’

मग आदरणीय प्रेषितांनी माननीय तुफैल(र.)यांना आदेश दिले की, परत येमेनला जाऊन इस्लामचा प्रचार करावा. माननीय तुफैल(र.)यांनी येमेनला जाऊन धर्मप्रचार सुरू केला आणि बघताबघता लोक मोठ्या संख्येने इस्लाम धर्म स्वीकारू लागले. हिजरी सन ७ मध्ये माननीय तुफैल(र.)आपल्या समाजाच्या८१परिवारांना(जवळपास एक हजार सदस्यांना) घेऊन मदीना शहरी प्रेषितांच्या सेवेत हजर झाले. त्यांच्यासोबत माननीय अबू हुरैरा(र.)हेसुद्धा आपल्या मातेसोबत होते. या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हे ‘खैबर’ च्या मोहिमेवर गेलले होते. म्हणून हा संपूर्ण काफला ‘खैबर’ स्थळी पोहोचला. या प्रवासात अबू हुरैरा(र.)यांचा गुलाम हरवला गेला. माननीय अबू हुरैरा(र.)प्रेषितदरबारी पोहोचताच त्यांचा गुलामसुद्धा तेथे पोहोचला होता. आदरणीय प्रेषितांची भेट घेऊन अबू हुरैरा(र.)यांनी आपल्या गुलामास आनंदाने स्वतंत्र केले. यानंतर माननीय अबू हुरैरा(र.)यांनी प्रेषितांकडेच आजीवन वास्तव्य केले.

मदीना शहरात स्थायिक झाल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या स्वर्गवासापर्यंत(अर्थात हिजरी सन ७ ते ११) चा हा काळ म्हणजे माननीय अबू हुरैरा(र.)यांच्या जीवनाचा अमूल्य ठेवा होय. हा संपूर्ण काळ त्यांनी आदरणीय प्रेषितांच्या सान्निध्यात व्यतीत केला. त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश होता, तो म्हणजे आदरणीय प्रेषितांच्या दिव्य ज्ञानाने आपली ओटी भरून घ्यावी. ‘मुस्नदे हम्बल’ या ग्रंथात आहे की, आदरणीय प्रेषितांना एकदा ते म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! आपल्या दिव्यज्ञानाचा अभ्यास माझ्या आत्म्यास शांती प्रदान करण्याचे साधन आहे.’’

माननीय अबू तलहा(र.)यांनी म्हटले की, ‘आम्ही व प्रेषितांचे इतर सोबती आपले घर-परिवार आणि व्यवसाय यासारख्या कामात व्यस्त असल्याने प्रेषितांजवळ जास्त वेळ देऊ शकत नसत. परंतु माननीय अबू हुरैरा(र.)हे रात्रंदिवस आणि प्रवास व युद्धांत सुद्धा आदरणीय प्रेषितांसोबतच असतात. अबू हुरैरा(र.)हे गरीब आणि दीन होते. त्यांच्याकडे धनसंपत्ती मुळीच नव्हती. त्यामुळे व्यवसायाची भानगडसुद्धा त्यांच्यामागे नसल्याने आपला पूर्ण वेळ ते प्रेषितांच्याच सोबत व्यतीत करीत असत. आणि आदरणीय प्रेषितांच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचन आणि एकन एक शब्द व एकन एक कर्म आणि क्रिया अर्थात संपूर्ण आचरणप्रणाली मुखपाठ करून ते काटेकोरपणे लिहून ठेवीत असत.’

स्वयं आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी देखील त्यांच्या ‘प्रेषित वचनसंग्रह शक्ती’ ची मुक्त कंठाने प्रशंसा केली. माननीय अबू हुरैरा(र.)यांनी ज्ञानार्जनास्तव आपले जीवन समर्पित केले. त्यामुळे त्यांनी व्यवसाय व इतर कामात वेळ मुळीच दिला नाही. त्यांनी उपासमार, तहान व अतिशय दारिद्रयपूर्ण जीवन व्यतीत करून इस्लामचे अपार ज्ञान मिळविले. स्वतः आदरणीय प्रेषितांनी त्यांच्या बाबतीत म्हटले की, ‘‘अबू हुरैरा’ हे ज्ञानाचे अधांग सागर आहेत!’’(संदर्भ : बुखारी)

एकदा एका युद्धानंतर धर्मयोद्धयांनी शत्रूकडून भरपूर संपत्ती आणली, तेव्हा प्रेषितांनी त्यांना विचारले, ‘अबू हुरैरा(र.)! बोला, तुम्हाला किती संपत्ती पाहिजे!’’ यावर अबू हुरैरा(र.)उत्तरले, ‘‘हे आदरणीय प्रेषित! ही धनसंपत्ती माझ्या काय कामी येईल! मला तर केवळ ‘ज्ञान’ पाहिजे!’’

येमेनहून मदीना शहरी स्थलांतर केल्यानंतर माननीय अबू हुरैरा(र.)हे आपल्या मातेस सोबत घेऊन आले होते. ते आपल्या आईचा खूप आदर करीत असत. परंतु त्यांच्या आईने बर्याच दिवसांनंतर इस्लामचा स्वीकार केला. माननीय अबू हुरैरा(र.)घरी येताच आपल्या आईस सलाम करीत असत. त्यांची आई मोठ्या प्रेमाने त्यांच्या सलामचे उत्तर देत असे. अबू हुरैरा(र.)यांनी कोणतीच वस्तू आपल्या मातेला सोडून खाल्ली नाही. त्यांनी आपल्या मातेची खूप सेवा केली.

माननीय अबू हुरैरा(र.)यांनी प्रेषितांच्या सोबत राहून केवळ ज्ञानच मिळविले नसून बर्याच युद्धांत ते सहभागी झाले. ‘खैबर’, ‘मक्का विजय’, ‘हुनैन’ आणि ‘तबूक’च्या युद्धात ते आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या खांद्याला खांदा लावून शत्रूशी लढले. आदरणीय प्रेषितांनी त्यांना काही ठिकाणी विशेष लष्करी मोहिमेवरसुद्धा पाठविले.

माननीय अबू हुरैरा(र.)हे ‘यरमूक’ च्या युद्धात जातीने लढले. हे युद्ध अतिशय रक्तरंजित होते. याच युद्धामुळे ख्रिस्ती धर्मिय सत्तेचा अंत झाला आणि इस्लामी लष्कराने एका बलाढ्य सत्तेचा गर्व धुळीस मिळविला. रोमन लष्कराने एकदा इस्लामी लष्करावर जोरदार हल्ला चढविला तेव्हा माननीय अबू हुरैरा(र.)यांनी इस्लामी लष्करास उद्देशून एक आवेशपूर्ण भाषण केले.

‘‘हे मुस्लिम शिपायांनो! आपल्यापैकी कोणीच नेहमीसाठी जिवंत राहणार नाही. या जगात कोणीच अमृताचा घोट पिऊन आलेला नाही. मृत्यू हा अटळ आहे. म्हणून मृत्यूशय्येवर पाय रगडून अपमानजणक मरण पत्करण्यापेक्षा शत्रूशी मुकाबला करताना वीरमरण पत्करावे. स्वर्गातील अप्सरा तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या भेटीची तयारी करा. ईश्वराची प्रसन्नता मिळविण्यासाठी कंबर कसा. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ती जागा आणि ती अवस्था ईश्वरास खूप प्रिय आहे.’’

माननीय अबू हुरैरा(र.)यांच्या भाषणाने इस्लामी लष्करात नवचैतन्य निर्माण झाले आणि मग सर्वांनी एकजूट होऊन शत्रूशी निकराचा लढा दिला. इस्लामी लष्कराने शत्रूचा पराभव केला. ‘इब्ने यसीर’ या इतिहासकाराने लिहिले की, माननीय उमर फारुक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळातील ‘आजरबायजान’ लष्करी कारवाईत माननीय अबू हुरैरा(र.)यांनी प्राणपणाला लावून शत्रूशी झुंज दिली.

माननीय उमर फारुक(र.)यांच्या शासनकाळात पौर्वात्य देशांवरील लष्करी कारवाईत भाग घेतल्यानंतर माननीय अबू हुरैरा(र.)मदीना शहरात परतले आणि त्यांनी प्रेषितवचनांचे शिक्षण देण्यात आपले उर्वरित जीवन समर्पित केले. इब्ने हजर(र.)आणि इब्ने कसीर(र.)यांनी आपल्या इतिहास ग्रंथात लिहिले की, जेव्हा इस्लामचे तिसरे शासक माननीय उस्मान(र.)यांच्याविरुद्ध काही बंडखोरांनी उपद्रव माजविला तेव्हा, त्यांच्या रक्षणार्थ माननीय अबू हुरैरा(र.)यांनी लोकांना भाषण दिले,

‘‘आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की, माझ्या मृत्यूनंतर उपद्रव माजेल आणि तुमच्यात फूट पडेल.’’

लोकांनी अबू हुरैरा(र.)यांना विचारले,
‘‘अशा प्रसंगी आम्ही काय करावे?’’
माननीय अबू हुरैरा(र.)यांनी उत्तर दिले,

‘‘अशा प्रसंगी या शांतीप्रेमी माननीय उस्मान(र.)यांची साथ द्यावी.’’ हे उत्तर ऐकून लोकांनी माननीय उस्मान(र.)यांना आपली मदत घेण्याची कळकळींची विनंती केली. परंतु माननीय उस्मान(र.)यांनी असे सांगून की, ‘मी ठार झालो तर चालेल, परंतु मुस्लिमांचा आपसात लढून होणारा रक्तपात मुळीच सहन करणार नाही,’ ही विनंती नाकारली. अखेर उपद्रव्यांनी माननीय उस्मान(र.)यांना ठार केले. अबू हुरैरा(र.)यांना या घटनेचा जबर धक्का बसला.

हिजरी सन ५८ मध्ये माननीय अबू हुरैरा(र.)खूप आजारी पडले आणि त्यांच्या जगण्याच्या आशा मावळल्या. माननीय अब्दुर्रहमान(र.)आणि अबू सलमा(र.)हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले, तेव्हा अबू हुरैरा(र.)म्हणाले,

‘‘हे ईश्वरा! आता मी पार थकलो. मला या जगाचा खूप कंटाळा आला.’’ हे वाक्य दोनदा म्हटल्यावर ते अबू सलमा(र.)यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हे अबू सलमा! ईश्वराची शपथ, ज्याच्या ताब्यात माझे जीवन आहे, तो काळ जास्त दूर नाही जेव्हा लोक खर्या सोन्यापेक्षाही जास्त आवडीने मृत्यूस कवटाळतील. तुम्ही जिवंत राहाल तर अवश्य पाहाल की, लोक कब्रस्तानातून जाताना कबरीकडे पाहून कामना करतील की, याच्या ठिकाणी मी असतो तर किती चांगले झाले असते.’’

मृत्यूशय्येवर असताना एकदा त्यांना रडू कोसळले, लोकांनी याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘परलोकी प्रवास खूप मोठा आहे आणि शिदोरी खूप कमी आहे. मी सध्या स्वर्ग व नरकाग्नीच्या वळणरस्त्यावर आहे. मला माहीत नाही मी कोणीकडे जात आहे. हे ईश्वरा! मी तुझ्या भेटीसाठी आतुर आहे. मला तुझी प्रसन्नता हवी आहे. अशा प्रसन्नावस्थेत मी तुला भेटू इच्छितो.’’

जीवनाच्या अगदी अंतिम क्षणामध्ये उपदेश करताना ते म्हणाले,
‘‘माझ्या कबरीवर छत टाकू नये. माझ्या दफनाविधीत उशीर करू नये. मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे की, ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा म्हणतो की, माझा दफनविधी लवकर उरकून घ्या आणि ईशद्रोही म्हणतो की, मला कोठे घेऊन जात आहात?’’

यानंतर त्यांनी इहलोकाचा त्याग करून परलोकांकडे कूच केले. या वेळी त्यांचे वय ७८ वर्षाचे होते. माननीय अबू हुरैरा(र.)हे ५८ हिजरी सनात मृत्यू पावले. मृत्यूसमयी त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले व एक मुलगी होती.

माननीय अबू हुरैरा(र.)यांच्याकडे आदरणीय प्रेषितांचा खूप मोठा म्हणजे ५३७४ प्रेषितवचनांचा संग्रह होता. प्रेषितांच्या सोबत्यांपैकी सर्वांत मोठा संग्रह त्यांच्याकडे होता. मुस्लिम समुदाय त्यांच्या उपकाराचे ऋण कधीच फेडू शकणार नाही. ज्ञान आणि विद्येच्या या अतिमहान व्यक्तीच्या स्वभावात शौर्य, दानशूरता आणि सडेतोड भाष्याचेही विशेष गुण होते. सत्यवचन, परखड भाषण व सूचना देण्यात ते कोणासही घाबरत नसत. माननीय अबू हुरैरा(र.)यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत हलाखीचा होता, तर दुसरा काळ सुखसमृद्धीचा होता. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संकटे झेलली परंतु त्यांचा संयम आणि धैर्य कधीच डगमगले नाही. त्यांच्या स्वभावात खूप साधेपणा आणि विनयशीलता होती. त्यांच्या समृद्धीच्या काळातसुद्धा त्यांनी आपली साधी जीवनशैली सोडली नाही. ते जेव्हा अतिशय श्रीमंत झाले, तेव्हा गाढवावर बसून ते फिरायचे. खजुरींचा पाला त्यांच्या गाढवाच्या पाठीशी बांधलेला असायचा आणि खजुरीच्या फांदीला सोलून त्याची लगाम गाढवास लावलेली असे. रस्त्यावरून जाताना ते लोकांना हसत हसत म्हणत,

‘‘ए सरका रे! रस्ता मोकळा करा. श्रीमंताची स्वारी येत आहे!’’
मग अशाच अवस्थेत जंगलात जाऊन लाकडाची मोळी घेऊन येत असत. एके दिवशी अशाच अवस्थेत ते बाजारातून जात होते. रस्त्यात ‘सआलबा बिन मालिक’ भेटले आणि अबू हुरैरा(र.)त्यांना म्हणाले, ‘‘रस्ता मोकळा करा!’’ यावर ‘सआलबा बिन मालिक’ म्हणाले, ‘‘आहो एवढा मोकळा रस्ता आहे की तुमच्यासाठी!’’ होय, खरे आहे पण मी एवढी मोठी लाकडांची मोळी घेऊन येत आहे. म्हणून रस्ता द्या म्हणालो!’’

दानधर्म आणि दीनदलितांची मदत करण्याचा अबू हुरैरा यांच्यात विशेष गुणधर्म होता. ते आपली संपत्ती गरिबांवर पाण्यासारखी खर्च करीत असत. ते पाहुणाचारदेखील खूप जोरदार करीत असत. काही जण त्यांच्याकडे कित्येक आठवडे वास्तव्य करीत असत आणि अबू हुरैरा(र.)सुद्धा मोठ्या आनंदाने त्यांचा सत्कार आणि पाहुणाचार करीत असत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची सर्वांत जास्त संख्येत अर्थात ५३७४ वचने सुरक्षित ठेवणारे, रणांगणात युद्ध कौशल्याने शत्रुंना धूळ चारणारे, अन्याय व अत्याचारी शासनाची कानउघाडणी करणारे आणि अत्यंत दानशूर माननीय अबू हुरैरा(र.)यांनी इस्लाम धर्माची आजीवन सेवा केली. त्यांच्या महान कार्याचे ऋण जगातील संपूर्ण मानवजातीवर राहील.

संबंधित लेख

  • इस्लाममध्ये अनाथ आणि विधवांचे अधिकार

    अनाथ मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची सर्वस्वी जवाबदारी ही समाजावरच असते. इस्लामने त्यांच्याप्रति आपले काय कर्तव्य आहेत, ते कुरआनात अशाप्रकारे स्पष्ट केले आहेत. 1. ‘‘त्यांच्याशी चांगला व्यवहार करावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ३६) 2. ‘‘त्यांच्या भल्यासाठी आपली संपत्ती खर्च करावी.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१५) 3. ‘‘त्यांना कोणत्याही गोष्टीवर झिडकारु नये.‘‘(संदर्भ : सूरह-ए-जुहा - ९) 4. ‘‘त्यांच्या संपत्तीचे रक्षण करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनआम - १५२) 5. ‘‘त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १२७) 6. ‘‘त्यांच्याशी असा व्यवहार करावा, जसा आपण आपल्या पोटच्या मुलाशी करतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
  • नवजात मुलीचे कलेवर आणि कुत्रा

    होय, त्या दृश्याने तेथील चहा पिणाऱ्यांना निव्वळ स्तब्धच केले नाही तर अंतर्बाह्य हलवून सोडले. सुरुवातीला कोणाचाही विश्वासच बसला नाही की कुत्र्याच्या तोंडामध्ये एका नवजात बालिकेचे कलेवर आहे. ही घटना कुरुक्षेत्रातील एस.टी. स्टँड जवळील ‘‘ज्योतिसर टूरिस्ट कॉम्प्लेक्स’’ समोरील कचरा कुंडीतील आहे, जेथे कुत्र्याने त्या नवजात बालिकेच्या शरीरामध्ये आपले दात रोवले ते हेच ज्योतिसर आहे जिथे गीता सांगितली गेली अशा विश्वास आहे. पोलिसांना सूचीत केल्यानंतर उप-अधीक्षक कमलदीप तेथे पोहोचले व नेहमीप्रमाणे सामान्य प्रक्रिये (?) द्वारे कारवाई सुरु केली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]