Islam Darshan

अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध मोहीम, इस्लाम आणि मुस्लिमांचा दृष्टिकोन

Published : Sunday, Mar 06, 2016

अकरा सप्टेंबर, २००१ ची भयंकर घटना
अकरा सप्टेंबर २००१ चा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता. या दिवशी अमेरिकेच्याच वेगवेगळ्या विमानतळावरुन चार विमानांनी उड्डाण केली. यांच्यापैकी एका विमानाने न्यूयॉर्कमधील अमेरिकेचेच नव्हे तर जगाचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एकशे दहा मजल्याच्या गगनचुंबी इमारतीला टक्कर मारली आणि तिला जमीनदोस्त करुन टाकले आणि दुसरे विमान अमेरिकेचे राजनीतिक केंद्र वॉशिग्टनमधील संरक्षण मंत्रालय पेन्टॅगॉनच्या किल्ल्यासारख्या शहरावर विजेप्रमाणे कोसळले आणि त्याला राख बनवून टाकले. हे सर्व काही केवळ ४५ मिनिटात घडले. या घटनेने केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हलवून सोडले.

कोणी अशी कल्पनादेखील करु शकत नव्हता की खुद्द अमेरिकेत त्याच्या सैनिक व सामरिक शक्तीला अशा प्रकारे कधी धोका होईल किवा तिला आव्हान दिले जाईल. या घटनेनंतर अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु आजदेखील हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. कोणतेही वर्तमानपत्र उचला ते या घटनेच्या वर्णनाने आणि तत्पश्चात अमेरिकेने उचललेल्या पावलांच्या अहवालाने भरलेले आढळेल. रेडिओ चालू करा तर यासंबंधी बातम्या ऐकावयास मिळतील, टी.व्ही. पाहा तर याची दृश्ये व अमेरिका आणि जगाच्या यासंबंधीच्या प्रतिक्रिया समोर येतील. परंतु आजतागायत ही गोष्ट स्पष्टपणे समोर आली नाही की ही कृती कोणाची आहे आणि तिच्यापाठीमागे कोणाचे डोके आहे आणि कोणत्या प्रेरणा कार्यरत आहेत? असा अंदाज आहे की या घटनेत पाच ते सात हजार लोक मृत्युमुखी पडले. त्यात पुरुष, स्त्रिया व बालके, तरुण व म्हातारे, सर्वांचाच समावेश होता. त्यांचा संबंध अमेरिकेशिवाय इतर देशाशीदेखील होता. त्यात सदाचारीही असतील व दुराचारीदेखील, त्यात उच्चतर उद्दिष्टे बाळगणारेही असतील व नीच उद्दिष्टे ठेवणारेदेखील, त्यात स्वार्थी व संधीसाधूदेखील असतील आणि तेदेखील असतील ज्यांच्याकडून मानवजातीच्या कल्याण आणि उन्नतीची अपेक्षा केली जाऊ शकत होती. कोणत्याही परिस्थितीत ही मानवी जीवांची एवढी प्रचंड हानी आहे की त्याची जितकी निदा केली जाईल ती थोडीच आहे.

प्रश्न असा आहे की अमेरिका जो आधिभौतिक व सैनिकशक्तीम्हणून वर्तमान युगातील सर्वांत मोठी शक्तीआहे जो आधुनिक साधने व माध्यमे आणि तांत्रिक ज्ञानाने पूर्णपणे सज्ज आहे ज्याच्यापाशी जगातील सर्वात बलिष्ठ सुरक्षा व्यवस्था आहे, जो आपल्या संरक्षणासाठी कोट्यवधी डॉलर्स, जे अनेक देशांच्या बजेट (आर्थिक अंदाजपत्रक) इतके आहे, खर्च करतो, ज्याच्यासंबंधी अशी कल्पना आढळते की तो शत्रूच्या क्षणाक्षणाच्या हालचालीसंबंधी माहिती बाळगतो आणि त्याला हवे तेव्हा आपल्या शत्रूला त्याच्या सुरक्षित ठिकाणातून उचलून नेऊ शकतो. त्याच्या घरात पाहता पाहता हा विनाश कसा घडला आणि त्याला अगोदर कशी बातमी लागली नाही? काय त्याच्या सुरक्षा व्यवस्थेतच काही चूक होती अथवा त्याच्यामागे एवढा प्रचंड गुप्त कट होता की ती व्यवस्था चालविणार्यांना याचा थांगपत्ता ही लागला नाही आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या दुर्घटनेमागे कोणाचा हात आहे? काय ही एखादी सूड उगविण्याची कार्यवाही आहे की हा त्या पूर्ण व्यवस्थेविरुद्ध विद्रोह आहे?

इस्लामशी जोडण्याचा प्रयत्न

अशा प्रकारचे आणखीदेखील प्रश्न निर्माण होतात परंतु अमेरिकेवर दुःख व क्रोध, चीड, नीचपणा व भय आणि निराशेची अशी स्थिती निर्माण झाली आहे की त्या सर्वांकडून डोळेझाक केली गेली आणि त्याला इस्लामशी जोडले गेले. असे दर्शविण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला की हा दोन दृष्टिकोनादरम्यानचा संघर्ष व दोन संस्कृतींचा सामना आहे. एकीकडे ती संस्कृती आहे जी मानवाची प्रतिष्ठा व त्याच्या उच्च जीवन मूल्यांची संरक्षक आहे जिचा अमेरिका ध्वजवाहक आहे. दुसरीकडे ती संस्कृती आहे जी पाशविकता, रानटीपणा, अत्याचार आणि दहशतवादाचे प्रचलन करु इच्छिते. एकीकडे आधुनिक युग आपल्या उच्च चितन आणि श्रेष्ठतर मानवी वैशिष्ट्यासह आहे आणि दुसरीकडे प्राचीन युगातील पाशवी व रानटी चारित्र्य आहे.

विरोधकांकडून दीर्घ काळापासून जगातील प्रत्येक बिघाड व उपद्रव आणि दंगे-धोपे इस्लामच्या शिकवणींचा परिणाम आहे असे ठरविले जाते. अमेरिकेतील अलीकडील घटनेनंतर हा कल प्रभावीपणे समोर आला आहे. विरोधकांकडून असे म्हटले जाते की इस्लाम हिसाचार व अत्याचाराचे शिक्षण देतो आणि युद्धपिपासु वृत्ती बनवितो आणि तिला खतपाणी घालतो, त्याचे विरोधक मानवाच्या मौलिक अधिकारापासून वंचित होतात. त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारच्या अत्याचारी व्यवहारांना चालू ठेवतो.

इस्लाम दहशतवादाविरुद्ध आहे

स्पष्टपणे हा इस्लामवर खोटा आरोप आहे. जो कोणी कुरआन व हदीसचे उघड्या डोळ्याने अध्ययन करील तो पाहील की इस्लाम उपद्रव व दंग्याचा शत्रू आहे. तो त्याला पावलोपावली आणि प्रत्येक आघाडीवर आव्हान देतो. तो प्रत्येक प्रकारची भांडणे मिटवून सामोपचराची प्रक्रिया अंमलात आणू इच्छितो. त्याने जगाला आवाहन केले,

’’आणि पृथ्वीवर (प्रेषितांच्याद्वारे) तिच्या सुधारणेनंतर भांडण करु नका आणि अल्लाहचे भय व आशा बाळगून धावा करीत राहा. निस्संशय अल्लाहची कृपा पुण्यशाली लोकांपासून जवळ आहे.’’ (सूरतुल अअराफ - ५६)

त्याने वारंवार म्हटले आहे की महान अल्लाहने प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा व सन्मान प्रदान केले आहे आणि त्याला जगण्याचा व जगात आपले कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार दिला आहे. हा सन्मान व हा जगण्याचा अधिकार तेव्हाच संपुष्टात येऊ शकतो जेव्हा एखादा मनुष्य स्वतः आपल्या एखाद्या कृती किवा व्यवहाराने तो समाप्त करतो आणि न्यायाने अशी ग्वाही देतो की त्याने जिवंत राहण्याचा अधिकार गमाविला आहे. किती स्पष्ट उपदेश आहे-

’’आणि कोणत्या माणसाला ज्याला अल्लाहने सन्माननीय ठरविले आहे, ठार करु नका पण अधिकारासह (सत्यानिशी)’’ (सूरतुल अनआम-१५१)

इस्लामने मानवप्राणाच्या सन्मानाची शिकवण जितक्या प्रभावी शब्दांत दिली आहे आणि जितकी प्रभावी वकिली केली आहे की त्याचे उदाहरण जगाच्या कोणत्याही कायद्यात पाहावयास मिळत नाही. त्याने एखाद्या माणसाच्या विनाकारण खुनाला संपूर्ण मानवजातीचा खून ठरविले आहे आणि म्हटले की अल्लाहच्या प्रेषितांची शिकवण सदैव हीच राहिली आहे.

’’जर एखाद्याने एखाद्या माणसाला, की जेव्हा त्याने कोणाचे प्राण घेतले नसतील किवा पृथ्वीवर उपद्रव माजविला नसेल, जर ठार केले तर जणू त्याने सर्व माणसांना ठार केले आणि जर एखाद्याने एखाद्याला जीवनदान केले जणू त्याने सर्व माणसांना जिवंत केले.’’ (सूरतुल माइदह-३२)

असा आहे इस्लामचा दृष्टिकोन. जर एखाद्याने विनाकारण खून केला नसेल आणि पृथ्वीवर रक्तपात आणि दंगे माजविले नसतील किवा अशाच एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत झाला नसेल की ज्यामुळे त्याला ठार करणे योग्य ठरावे, तर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. जो मनुष्य या अधिकाराची पायमल्ली करील आणि त्याचा अयोग्य रीतीने रक्त सांडील तो सर्व लोकांचे रक्त सांडतो. त्याला कारण असे की त्याने आपल्या कृतीने जगाला हा चुकीचा मार्ग दाखविला की मानवी प्राणाचे काहीही मूल्य नाही आणि कोणताही अपराध नसतादेखील त्याचा जीव घेतला जाऊ शकतो. या उलट जर एखादा विनाकारण खून करण्याविरुद्ध जीवाची पर्वा न करता उभा राहिला आणि एखाद्या निष्पाप माणसाचे प्राण वाचविले तर त्याने सर्व माणसांना जीवन प्रदान केले. त्याने सिद्ध केले की कोणत्याही माणसाचे प्राण विनाकारण घेतले जाऊ शकत नाही.

मुस्लिम आणि दहशतवाद

वास्तविकता अशी आहे की ज्या माणसाला इस्लामच्या शिकवणींचा अजिबात गंध नसेल किवा ज्याचे मन इस्लामबद्दल भयंकर पूर्वग्रहदूषित असेल तोच दहशतवादाचा इस्लामशी संबंध जोडण्याचे धाडस करु शकतो. एखाद्या न्यायप्रिय व्यक्तीकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. वर्तमानकाळात प्रत्येक प्रश्न राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची लोकांना सवय झाली आहे. म्हणून या बाबतीतदेखील हेच दृष्टोत्पत्तीस येते. राजनीतिक गरजा व इस्लामी जगताचा कल पाहून आरोपांचा रोख मुस्लिमाकडे वळविला गेला आहे. असे म्हटले जाते की इस्लाम सुख-शांतीचा धर्म आहे. तो तर दहशतवादाची शिकवण देत नाही, तथापि मुस्लिमात असे लोक व गट आहेत जे दहशतवादाचा प्रसार करीत आहेत. जणू जगातील सर्व जाती व त्यांचे विभिन्न वर्ग या शापापासून सुरक्षित आहेत आणि इस्लामला मानणारे आणि मुस्लिम समाजाशी संबंधित असलेले लोक व वर्गच मानवशत्रुत्वाचे हे कर्तव्य पार पाडीत आहेत.

उसामा बिन लादेन, अफगाणिस्थान व अमेरिका

अमेरिकेत अलीकडे घडलेल्या घटनांच्या संदर्भात उसामा बिन लादेनचे नाव अगदी खात्रीपूर्वक घेतले जात आहे आणि ही गोष्ट ठसविण्याचा प्रयत्न केला जात आहे की अमेरिकेत जी घटना घडली आहे त्यात त्याचा हात आहे आणि जगातील सर्व देशांत एक गरीब, निर्धन व गृहयुद्धाने जर्जर अफगाणिस्थान देशाला, जेथे उसामा बिन लादेन निर्वासिताचे जीवन जगत होता, हल्ल्याचे लक्ष्य बनविले गेले - की तो देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे, तेथेच दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि तेथेच तो पल्लवित व पुष्पित होतो. अशा प्रकारे व्यवहाराने हा निर्णय ऐकविला गेला की जर अफगाणिस्थान व उसामा बिन लादेनला संपविले गेले तर जग दहशतवादापासून सुरक्षित होईल आणि विश्वशांतीला असलेल्या खर्या धोक्यापासून मुक्तता मिळेल.

अमेरिकेची अफगाणिस्थानकडून अशी मागणी आहे की त्याने दहशतवाद बंद करावा, उसामा बिन लादेनला त्याच्या हवाली करावे. त्याची संघटना अल-कायदाचे समूळ उच्चाटन करावे, दहशतवादाचे सर्व अड्डे नष्ट करावेत आणि त्याच्या निरीक्षणाची सवलत उपलब्ध करुन द्यावी जेणेकरुन अमेरिकेला ही खात्री पटावी की खरोखर त्याने हे अड्डे नष्ट केले आहेत.

एखाद्या स्वतंत्र देशाला अशा प्रकारे अटी घालणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी भाग पाडणेच मुळी एक अशोभनीय व अनैतिक कृत्य आहे. बिचार्या अफगाणिस्थानने उत्तर दिले की आमची स्थिती ही नाही आणि आमची साधनेही अशी नाहीत की आम्ही प्रशिक्षण द्यावे आणि त्यासाठी लोक तयार करावेत. अमेरिकेसारख्या जागतिक शक्तीच्या क्षेत्रात घुसून एवढा मोठा हल्ला चढविण्यासाठी कुणाला तयार करणे त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून हे काम करुन घेणे हे आमच्या कुवतीबाहेरचे आहे.
यावर म्हटले गेले की तुमच्याकडे जगातील सर्वांत मोठा दहशतवादी उसामा बिन लादेन आहे. हे कृत्य त्याचेच आहे. अफगाणिस्थानचे उत्तर असे होते की जेव्हा हे कृत्य आमच्या शक्तीच्या बाहेरचे आहे तेव्हा उसामा ते कसे करु शकेल? त्याला ही शक्तीकोठून प्राप्त झाली?

यावर अमेरिकेचे समाधान झाले नाही. त्याने सांगितले की आमची खात्री आहे की उसामा यात गुंतलेला आहे. आमच्याजवळ याचा पुरावा आहे. अफगाणिस्थानने पुराव्याची मागणी केली आणि म्हटले की पुरावा मिळाल्यास आम्ही त्याच्यावर खटला चालवू आणि त्याचा अपराध सिद्ध झाल्यास त्याला शिक्षा करु. जर आमच्यावर विश्वास नसेल तर पुरावा मिळाल्यावर एखाद्या अपक्ष देशातसुद्धा त्याच्यावर खटला चालविला जाऊ शकतो. तो आमचा अतिथी आहे. पुराव्या व साक्षीविना आम्ही त्याला कोणाच्याही हवाली करु शकत नाही. अशा प्रकारची कोणतीही योग्य गोष्ट अमेरिकेला मान्य करण्याजोगी नव्हती. तो प्रकोपाने भडकला आणि सांगितले की तुमच्यासाठी इतकी गोष्ट पुरेशी आहे की आमच्याजवळ पुरावा आहे. आम्ही तो आपल्या मित्रांना व सहकार्यांना दाखवूही शकतो. परंतु तुम्हाला अथवा उसामाला पुरावा उपलब्ध करुन देणे आमच्या हिताविरुद्ध आहे.

वास्तविकतः जगाचा एक सर्वमान्य कायदा आहे की जर एखाद्यावर आरोप केला जातो तेव्हा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार ठरविले जाऊ शकत नाही आणि त्याला शिक्षेस पात्र ठरविले जाऊ शकत नाही. एखाद्याला फाशी देण्यापूर्वी प्रथम न्यायालयाकडून त्याचा गुन्हा शाबित केला जातो. अफगाणिस्थान अथवा उसामाचा गुन्हा जगासमोर आलाही नाही आणि एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेतदेखील तो सिद्ध केला गेला नाही. इतकेच नव्हे तर तो प्रस्तुतदेखील केला गेला नाही आणि एका निर्बळ राष्ट्रावर एक महान शक्तीतुटून पडली आणि संपूर्ण जगाला दहशतवादाच्या निर्मूलनाच्या नावाने अफगाणिस्थानविरुद्ध एकत्र केलेही गेले आणि चोहीकडून बॉम्बचा वर्षाव सुरुही केला गेला.

असे म्हटले जात आहे की हे युद्ध अफगाणिस्थानच्या जनतेविरुद्ध नाही तर दहशतवादाविरुद्ध आहे. आमचे लक्ष्य दहशतवादाचे अड्डे आहेत. याच्या पाठीमागील कार्यरत बुद्धीच्या उसामा बिन लादेनला शोधून त्याला त्याच्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा देणे होय. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत समाप्त करण्याची घोषणा केली गेली आहे. परंतु प्रत्यक्षपणे आता हे युद्ध केवळ या उद्देशापर्यंत सीमित राहिले नाही तर अफगाणिस्थानची आम जनतादेखील अमेरिकेच्या हल्ल्यांच्या तडाख्यात सापडली आहे. निष्पाप प्राण घेतले जात आहेत, सैनिक अड्डेच नव्हे तर जनकल्याणच्या संस्था व प्रार्थना स्थळांना लक्ष्य बनविले जात आहे. हजारो-लाखो लोक ज्यात स्त्रिया, बालके, म्हातारे, आजारी व जखमीसुद्धा आहेत जे शेजारी देशाकडे पलायन करीत आहेत. परंतु त्या देशांच्या सीमा बंद आहेत. त्यांच्या आश्रयाची आणि भूक मिटविण्याची खर्या अर्थाने कोणतीही व्यवस्था नाही.

जगात अमेरिका मानव अधिकारांचा ध्वजवाहक आहे. मानवते प्रति सहानुभूती बाळगणारा असल्याचा डांगोरा पिटतो, कायद्याचे श्रेष्ठत्व व न्यायाला मानतो, कृती व विचार स्वातंत्र्य मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे मान्य करतो, कोणत्याही दुसर्या देशात हस्तक्षेप करण्यास तात्त्विकदृष्ट्या चुकीचे मानतो. परंतु प्रश्न असा आहे की तो या सुविचारांची किती अंमलबजावणी करतो? त्याचा इतिहासच मुळी असा आहे की त्याने पावलोपावली या तत्त्वांचा भंग केला आहे आणि आपल्या स्वार्थासाठी ते सर्व काही केले आहे जे एक तत्त्वहीन राष्ट्र करते अथवा करु शकते. अफगाणिस्थानात ज्या प्रकारे त्याने या तत्त्वांची पायमल्ली केली आहे त्यामुळे त्याने आपल्या काळ्याकुट्ट इतिहासात एक नवीन अध्याय जोडले आहे आणि जगात त्याची प्रतिष्ठा खालावली आहे.

जगाची प्रतिक्रिया

अकरा सप्टेंबरच्या घटनेनंतर अमेरिकेने दहशतवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली अफगाणिस्थानविरुद्ध जगातील सर्व मोठ्या राष्ट्रांना आपल्याबरोबर घेतले. आता असे वाटते की प्रत्येकाचे लक्ष्य अफगाणिस्थान आहे. परंतु त्याचबरोबर ही आनंदाची गोष्ट आहे की खुद्द अमेरिकेत आणि त्याच्या पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रात या अत्याचारपूर्ण व्यवहाराविरुद्ध आवाज उठत आहे. या घटनेमागे ज्या लोकांचा हात असण्याची शक्यता आहे त्या सर्वांना दुर्लक्षित करुन केवळ अफगाणिस्थानला लक्ष्य बनविले गेले आहे. याला न्यायाविरुद्ध समजले जात आहे. कोठे कोठे निदर्शनेदेखील होत आहेत. हा आवाज क्षीण आहे, परंतु हे दुरापास्त नव्हे की काळाच्या लोटण्याबरोबर हा शक्तीप्राप्त करील आणि अमेरिकेला आपल्या चुकीची उमज येईल.

इस्लामी जगताची प्रतिक्रिया

काही मुस्लिम राष्ट्रांनीदेखील अमेरिकेच्या या पावलाचे समर्थन केले आहे आणि त्याला सहकार्य दिले आहे, परंतु अमेरिका जाणतो आणि जगालादेखील माहीत आहे की आम मुस्लिमांची सहानुभूती त्याला प्राप्त नाही. त्यांना वाटते की एका निर्बळ राष्ट्रावर विनाकारण आणि एखाद्या पुराव्याविना हल्ला केला गेला आहे. जे राष्ट्र अगोदरच उद्ध्वस्त झालेले आहे आणि जेथे लोक उपाशी मरतात. त्या देशाला अधिक उध्वस्त केले जात आहे. हा पूर्णतः अत्याचार आहे, अन्याय आहे, मानव अधिकार व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. मुस्लिमांच्या भावनांची कल्पना त्या निषेध व निदर्शनावरुन केली जाऊ शकते जे मुस्लिम राष्ट्रात निरंतर होत आहेत.

भारतीय मुस्लिमांच्या भावना

हिदुस्थानातील मुस्लिमांनीदेखील अमेरिकेच्या अत्याचार व अतिरेकाविरुद्ध आवाज उठविला आहे आणि अफगाणिस्थानशी सहानुभूती प्रकट केली आहे. भावनांच्या या शांततापूर्ण प्रकटनास काही लोक व क्षेत्र जातीय पक्षपातच नव्हे तर त्यापुढे जाऊन दहशतवादाचे समर्थन ठरवीत आहेत. वास्तविकतः अत्याचारपीडितांशी सहानुभूती व दहशतवादाचे समर्थन व पाठिब्यात आकाश व पाताळाचे अंतर आहे. याबाबतीत आम प्रसारमाध्यमांनी व बर्याचशा सुशिक्षित लोकांनीसुद्धा मुस्लिमांच्या भावना समजून घेण्याचा गंभीर प्रयत्न केला नाही. त्याबरोबर पाश्र्वभूमीत पाहण्याची व समजण्याची गरज आहे.

 1. मुस्लिम एकाच प्रेषितांचे अनुयायी आहेत

  जगाच्या कोणत्याही भागातील मुस्लिम समुदायावर अत्याचार होत असेल तर संपूर्ण उम्मतला (एकाच प्रेषितांचे अनुयायी) त्यांच्या दुःखाची जाणीव होणे इतके स्वाभाविक आहे जितके शरीराच्या एका अवयवाला इजा झाली तरी जाणीव पूर्ण शरीराला होते. तेंव्हा यावर टीका अगर आक्षेप निरर्थक आहे.

  ही एक वास्तविकता आहे आणि कोणत्याही प्रकारे त्याकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही की ज्या लोकांच्या व जातींदरम्यान समाईक दृष्टिकोन असतो अथवा धर्म व श्रद्धेची भागीदारी असते त्यात एक प्रकारचे प्रेम व आपुलकी आढळते. आणि सहानुभूतीच्या भावना कार्यरत असतात. एखाद्या ख्रिश्चनाला हानी पोचली तर दुसर्या ख्रिश्चनाला दुःख होते, एखाद्या ज्यूला मार जरी लागला तरी दुसर्या ज्यूला वेदना होतात. ज्या जाती व देशात निधर्मी दृष्टिकोन आढळतो त्यांचीदेखील अशीच स्थिती आहे. एका सच्चा कम्युनिस्टाला आपल्या समान दृष्टिकोनाच्या बंधुंशी प्रेम असते. भांडवलदार राष्ट्रे एकमेकांच्या समर्थनासाठी तत्पर असतात. हे सर्व प्राकृतिक वर्तुळात बरोबर आहे. गोष्ट चुकीची तेव्हा होते जेव्हा मनुष्य सत्य व असत्य आणि योग्य व अयोग्य काय आहे हे न पाहता आपल्या माणसाचे आपल्या वर्तुळाचे समर्थन करण्यासाठी उभा राहतो आणि असे समजू लागतो की सत्य ते आहे जे माझा सममार्गी व समविचारी अवलंबितो. त्याला अनुमोदन देणे माझे कर्तव्य आहे.

  इस्लाम अशा विचारसरणीविरुद्ध आहे. तो त्याला मानणार्या लोकांदरम्यान बंधुत्व व प्रेम आणि सहायता व समर्थनाच्या भावना उद्दीपित करतो आणि त्याला ईमानचा (धर्मावरील श्रद्धेचा) आवश्यक भाग ठरवितो. परंतु दुसर्याशी दूषित पूर्वग्रह, तिरस्कार, शत्रुत्व व निष्ठुरतेचे शिक्षण देत नाही. म्हणून अफगाणिस्थानवर जो असह्य जुलुम होत आहे आणि ज्या प्रकारे त्याला जुलुम व अत्याचाराचे लक्ष्य बनविले गेले आहे त्याबद्दल मुस्लिम दुःख व व्यथा प्रकट करीत आहेत त्याला पक्षपाताचे नाव दिले जाऊ शकत नाही. यात कोणतीही आश्चर्याची आणि विस्मयाची गोष्ट नाही. आश्चर्याची गोष्ट तर तेव्हा झाली असती जेव्हा मुस्लिम स्तब्ध राहिले असते आणि जातीय संवेदनहीनता सिद्ध केली असती.

 2. न्यायाची ध्वजवाहक जमात
  ही वेळ अशी आहे की जेव्हा भारतीय मुस्लिमानाच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम जमातीला आपल्या वचनाने आणि कर्माने या गोष्टीचे प्रमाण दिले पाहिजे की मुस्लिम न्याय प्रिय आहे. न्यायाचा ध्वजवाहक आहे त्याचे अस्तित्व जगातून अत्याचाराला नामशेष करणे व न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी आहे. जुलुम कोठेही असो आणि कोणावरही होवो तो त्याच्याविरुद्ध आहे. त्याला त्याचे समर्थन प्राप्त होऊ शकत नाही. जुलुम व अत्याचार मग तो त्याच्या सख्ख्या भावाकडून अथवा त्याच्या रक्ताच्या संबंधियाकडून का होईना आणि त्याचा बंधु हे कृत्य का करेना, तो त्याला साथ देऊ शकत नाही. जुलुम कोणत्याही परिस्थितीत जुलुमच आहे. लोक बदलल्याने त्यातील वाईटपणा संपुष्टात येत नाही. इस्लामची स्पष्ट शिकवण व आदेश आहे की मुस्लिमाने कोणत्याही परिस्थितीत न्यायावर दृढ राहावे. शत्रूशीदेखील न्यायाचा व्यवहार करावा आणि कोणत्याही स्थितीत न्यायापासून दूर जाऊ नये. पवित्र कुरआनचे कथन आहे,

  ’’हे ईमानधारकानो! अल्लाहसाठी उभे राहणारे बना. न्यायाची साक्ष द्या. लक्षात ठेवा एखाद्या जातीच्या शत्रुत्वाने तुम्हाला यासाठी कदापि उत्तेजित करु नये की तुम्ही न्याय करु नये. न्याय करा, हेच अल्लाहच्या भयाच्या अधिक निकट आहे. अल्लाहचे भय बाळगत राहा. निस्संशय जे काही तुम्ही करता त्याची खबर अल्लाहला आहे.’’ (सूरतुल माइदह-८)

 3. प्रार्थनेची व्यवस्था करा
  अल्लाहशी प्रार्थना (विनवणी) मुस्लिमाचे फार मोठे शस्त्र आहे. संकट लहान असो की मोठे, व्यक्तीगत असो की सामूहिक, प्राणहानी असो की आर्थिक हानि, भय व धोक्याचे वातावरण असो अथवा दुष्काळ आणि दारिद्र्य व उपासमारीची स्थिती असो, या सर्वांद्वारे अल्लाह मुस्लिमांची परिक्षा घेतो. मुस्लिमासाठी ही स्थिती अजमावणे व परीक्षा आहे. अशी आज्ञा आहे की प्रत्येक प्रकारच्या कसोटीत व प्रत्येक नाजुकप्रसंगी त्याने अल्लाहकडे रुजू व्हावे आणि त्याच्याशीच आपले संबंध जोडावे. त्याची ही कृती महान अल्लाहजवळ प्रशंसनीय आहे आणि सेवक याद्वारेच त्याच्या कृपा व दयेस पात्र ठरेल.

  ’’शुभवार्ता ऐकवा संयम बाळगणार्यांना की जेंव्हा त्यांच्यावर संकट येते तेंव्हा ते म्हणतात (विचलीत न होता) की आम्ही अल्लाहचे दास आहोत आणि त्याच्याचकडे परत जाणार आहोत. अशाच संयमी लोकांवर अल्लाहची कृपा व दयेचा वर्षाव होतो आणि हेच लोक आहेत ज्यांना खरे ईशमार्गदर्शन प्राप्त झाले आहे.’’ (सूरतुल बकरह - १५५-१५७)

  आम्ही प्रार्थना केली पाहिजे की हे अल्लाह उसामा बिन लादेन व तालिबानवर दहशतवादाचा आरोप लावून अफगाणिस्थानचा विध्वंस केला जात आहे. त्याच्या नागरी वस्तीवर बॉम्बचा वर्षाव होत आहे. त्याच्या शेत जमिनी, शेते, खळे व बागांना आग लावली जात आहे. त्याच्या कल्याणकारी संस्था, हॉस्पिटल्स आणि शाळांना ध्वस्त केले जात आहे. हे अल्लाह! दहशतवादाचा हा आरोप प्रकटपणे चुकीचा आहे. त्याचा कोणताही पुरावा नाही सध्या ते तुझ्या विशेष कृपेला पात्र आहेत तर तू त्यांच्यावर दया कर. त्यांना सत्य मार्गावर दृढ ठेव, त्यांना सामर्थ्य दे की त्यांनी इस्लामी धर्म कायद्यावर दृढ राहावे, त्यांच्याकडून इस्लामी धर्मकायदा बदनाम होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये, ते ईशआज्ञेची नैतिकता व इस्लामी आदेशावर मनःपूर्वक कृती करीत राहावेत. मानवी अधिकारांची त्यांनी प्रतिष्ठा राखावी. न्यायावर दृढ राहावे. अत्याचार व अतिरेकापासून त्यांनी अलिप्त राहावे. हे अल्लाह! त्यांना अत्याचार व यातनांपासून सुरक्षित ठेव आणि अत्याचार्यांना आपल्या योजनामध्ये असफल कर.

 4. क्रोध प्रकट करणे योग्य नव्हे
  याबाबतीत विनाकारण उत्साह व क्रोधाची अभिव्यक्तीयोग्य नव्हे. यामुळे तुमच्या सहानुभूतीचा चुकीचा अर्थ काढला जाईल आणि त्याला दहशतवादाचे समर्थन समजले जाईल. तुम्ही हे स्पष्ट शब्दांत सांगितले पाहिजे की आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध आहोत. मग तो लोक करोत की राष्ट्रे करोत. याबरोबर राज्यघटनेच्या मर्यादेत राहून हे समजावून देण्याची गरज आहे की अफगाणिस्थान वर जे युद्ध लादले गेले आहे त्याला सनदशीरपणा नाही. तो पूर्णपणे अत्याचार व अन्याय आहे.

याच अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला जात आहे. याबाबतीत तुम्हाला भारतातील सर्व न्यायप्रिय लोकांचे समर्थन प्राप्त होईल. त्याचबरोबर तुम्ही या गरीब व उद्ध्वस्त देशासाठी अन्न, पोषाख, औषधासारख्या गरजेच्या वस्तु संबंधित एजन्सी व संस्थाद्वारे पोचवू शकता. ही धार्मिक बंधुत्व व मानवी सहानुभूतीची एक आवश्यक निकड आहे.

खबरदार हे अत्याचार्यांनो!

ही गोष्ट कोणत्याही व्यक्ती, टोळी, जात आणि देशाने, मग ती कितीही मोठी शक्तीकां असेना, विसरता कामा नये की या जगाचा एक निर्माता व स्वामी आहे. त्याची शक्तीसर्वांत मोठी आहे. त्याच्या प्रकोप-शक्तीचा कोणीही सामना करु शकत नाही. त्याच्याविरुद्ध बंड व विद्रोह, त्याच्याविरुद्ध गुन्हा व अवज्ञा, त्याच्या गुलामांवर अत्याचार व अतिरेक आणि त्यांच्या अधिकारांची पायमल्ली, लोक व जातींना विध्वंस व विनाशाप्रत घेऊन जाते. जे राष्ट्र या मार्गाचा अवलंब करते ते अल्लाहच्या प्रकोपाचे लक्ष्य बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याने थांबून आपल्या शेवटाचा विचार केला पाहिजे व आपल्या वर्तनाचे परीक्षण केले पाहिजे. या वास्तविकतेकडे पवित्र कुरआनने वारंवार लक्ष वेधले आहे. म्हणून ’सूरह अनकबूत’मध्ये काही अशा जातींचा उल्लेख आहे ज्यांनी महान अल्लाहच्या आज्ञेची पायमल्ली करून प्रेषितांच्या विरोधात दंड थोपटले आणि अवज्ञा व पातकाचा मार्ग अवलंबिला, भोग विलासात मग्न राहिले, गुन्हे व व्यभिचारात बुडत गेले आणि हा विचार करण्यासदेखील तयार झाले नाही की ते आपल्या या चालीमुळे महान अल्लाहच्या प्रकोपाच्या समीप जात आहेत आणि त्याचा कोप त्यांच्यावर होणार आहे. अंततः अल्लाहने त्यांना पकडले आणि पृथ्वीतलावरुन नामशेष केले.

’’मग आम्ही त्या सर्वांना त्यांच्या पापासाठी पकडले. त्यांच्यापैकी काहीजण ते होते ज्यांच्यावर आम्ही खडे व दगडाचे वादळ पाठविले. त्यापैकी काहींना एका भयंकर किकाळीने पकडले आणि काहीजण ते होते ज्यांना जमिनीत रुतविले आणि त्यांच्यापैकी काहींना आम्ही बुडविले. अल्लाह असा नव्हे की त्याने त्यांच्यावर जुलुम करावा तर ते स्वतः आपल्यावर जुलुम करीत होते.’’ (सूरतुल अनकबूत-४०)

आयतचा प्रारंभच अर्थपूर्ण व डोळे उघडणारा आहे. महान अल्लाहने फर्माविले की ज्या कोणा जातीला पकडले ते तिच्या पापासाठी पकडले. अल्लाहची पकड विनाकारण नव्हती. तो जेव्हा एखाद्याला पकडतो तेव्हा तिच्या कुकर्मासाठी पकडतो. महान अल्लाहने कुकर्मासाठी दिलेली शिक्षा एक प्रकारची नव्हती. ती विभिन्न रुपात येत राहिली. कधी असले वादळ आले की संपूर्ण बस्तीला आपल्या जागेपासून उखडून टाकले आणि ती मातीचा ढीग बनली. कधी भयंकर आवाजासह भूकंप आला की काळीज फाटले आणि संपूर्ण राष्ट्र मातीत मिसळले. इतिहासाने असे ही पाहिले की जमीन दुभंगली आणि अवज्ञा करणार्यांची वस्ती त्यात सामावली. याच गुन्ह्यासाठी फिरऔन (Pharaoh) व त्याच्या जातीला नाईल नदीत बुडविले.

गोष्ट यावर संपते की महान अल्लाहने त्यांच्यावर अत्याचार केला नाही तर ते स्वतःच आपल्यावर जुलुम करीत होते, अर्थ असा की महान अल्लाह अत्याचारी नाही. तो कुणावर कणमात्रसुद्धा अत्याचार करीत नाही. त्याचे अस्तित्व जुलुम व अन्यायापासून अलिप्त आहे. लोक अत्याचार करतात, राष्ट्रे व जाती अत्याचार करतात आणि मग आपण केलेल्या कृत्याच्या परिणामांशी त्यांची गाठ पडते. अल्लाहचा नियम असा आहे की जी टोळी जुलुम व शत्रुत्वाचा मार्ग अवलंबील ती नष्ट होईल. त्याने ती वाचू शकत नाही अगदी तशी जसे विष खाणारा मृत्यूला आमंत्रण देतो. कोणीही त्याला वाचवू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, आणि त्याचा नैतिक नियम असा आहे की जी टोळी अत्याचार व शत्रुत्वाचा मार्ग अवलंबील ती नष्ट होईल. त्याच्यापासून ती सुरक्षित राहू शकत नाही. अल्लाहच्या नैसर्गिक नियमाप्रमाणे त्याचा नैतिक कायदादेखील अपरिवर्तनीय आहे. म्हणून कुरआन म्हणतो आणि प्रभावीपणे म्हणतो की त्याला भूतकाळातील कथा समजले जाऊ नये, तर हा एक दैवी नियम आहे, जो कोणी अल्लाहची अवज्ञा करील, पृथ्वी तलावर गर्वाचे प्रदर्शन करील आणि त्याच्या दासावर अत्याचार करील आणि त्यापासून पराङमुख होणार नाही. तर त्याला आपल्या परिणांमाना सामोरे जावे लागेल.

’’काय निर्भय बनले आहेत ते लोक जे वाईट चालीने चालत आहेत की अल्लाहने त्यांना जमिनीत रुतवावे किवा त्यांच्यावर प्रकोप तिकडून यावा ज्याची कल्पना त्यांना नसावी अथवा त्याने त्यांना चालता फिरता पकडावे ते अल्लाहला असहाय करु शकत नाहीत अथवा त्यांना भयग्रस्त स्थितीत पकडील म्हणून निस्संशय तुमचा पालनकर्ता मोठा मेहरबान व कृपाळू आहे.’’ (सूरतुन्नहल - ४५-४७)

पवित्र कुरआनच्या या कथनात जगातील सर्व राष्ट्रे व सरकारासाठी विशेषतः हल्लीच्या शक्तीमान जाती व देशासाठी तंबी व चितन आहे. किती चांगले झाले असते जर त्यांनी यावरुन धडा व उपदेश प्राप्त केला असता व आपण उचललेल्या पावलापासून पराङमुख झाले असते.

संबंधित लेख

 • जकातचे वाटप व इस्लाम

  इस्लामने आपल्या आरंभीच्या काळात त्या वेळची विशिष्ट परिस्थिती नजरेसमोर ठेवून जकात वसूल करण्याची रोखीच्या अगर इतर स्वरुपात कायदेशीर पद्धत ठरविली होती. परंतु याचा असा अर्थ होऊ शकत नाही की जकात वाटपाची एवढी एकच पद्धत होती की गरजुंनी स्वतःच जाऊन जकात गोळा करीत फिरावे व दुसरी कसलीही पद्धत अवलंबली जाऊच शकत नाही. इस्लामी कायद्यात अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, ज्यामुळे असा निष्कर्ष काढणे शक्य व्हावे. इस्लाम जकातच्या रकमेतून शाळा, इस्पितळे वगैरे जनकल्याणाच्या संस्था स्थापन करण्यास रोखत नाही. तसेच अशा रकमेतून सहकारी संस्था व कारखाने निर्मांण करण्यातही अडचण असू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जकातची रक्कम सामाजिक कल्याणाच्या सर्व हितकर कामाकरिता खर्च केली जाऊ शकते. जकातच्या मालातून रोख रकमेचे सहाय्य फक्त वृद्धांना, बालकांना व रुग्णांना दिले जाते आणि इतरांना निर्वाहाची साधने उपलब्ध करण्यासाठी अगर त्यांना हितावह असणाऱ्या योजनाच्या पूर्ततेसाठी असे सहाय्य दिले जाऊ शकते, कारण इस्लामी समाज एक असा समाज आहे ज्यामध्ये निव्वळ जकातीच्या सहाय्यावर सतत निर्वाह करणारा दरिद्री वर्ग आढळून येत नाही.
 • माननीय अमरु बिन आस(र.) - इजिप्तजेते

  एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याचे आदेश दिले. माननीय अमरु बिन आस(र.)आदेश मिळताच प्रेषितदरबारी हजर झाले. आदरणीय प्रेषितांनी म्हटले,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]