Islam Darshan

माननीय खालिद बिन वलीद(र.) ‘सैफुल्लाह’

Published : Sunday, Mar 06, 2016

माननीय खालिद बिन वलीद(र.)इस्लामचे असे महान लढवय्ये, सरसेनापती आणि ध्वजवाहक आहेत की त्यांचे नाव ऐकताच छाती गर्वाने फुलते आणि नवचैतन्य निर्माण होते. खालिद बिन वलीद(र.)यांच्याकरीता स्वयं आदरणीय प्रेषितांनी ईश्वर दरबारी प्रार्थना केली होती की, ‘हे ईश्वरा! ‘खालिद’ यांना इस्लाम धर्माच्या स्वीकृतीचे भाग्य लाभू दे!’

माननीय खालिद बिन वलीद(र.)हे ‘अमरु बिन आस(र.)’ आणि ‘उस्मान बिन तलहा(र.)यांच्या सोबत प्रेषितदरबारी हजर झाले आणि आदरणीय प्रेषितांच्या हाती इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. आदरणीय प्रेषितांनी त्यांना ‘सैफुल्लाह’(अर्थात ‘ईश्वराची तलवार’) च्या उपाधीने सम्मानित केले आणि म्हटले, ‘‘खालिद(र.)हे ईश्वराने इस्लामद्रोह्यांसाठी उपसलेली एक तलवार आहे.’’

माननीय खालिद बिन वलीद(र.)यांची शौर्यगाथा आणि युद्धकौशल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणे केवळ कठीणच नव्हे तर अशक्य आणि अविस्मरणीय आहे.

निःसंदेह माननीय खालिद बिन वलीद(र.)इस्लामी इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे. इस्लाम धर्मासाठी जीवाची बाजी लढवून इस्लामद्रोही शक्तींचा नायनाट करणार्या माननीय खालिद बिन वलीद(र.)या शूरपुरुषाचे जीवनचरित्र आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय उदाहरण होय.

इस्लामपूर्व काळापासूनच प्रतिष्ठित असलेल्या ‘मख्जूम’ या परिवाराचे ते सुपुत्र असून मक्का शहरात स्थापन करण्यात आलेल्या नागरी शासनाचे नेतृत्व याच परिवाराकडे होते. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांच्या वडिलांचे नाव ‘वलीद बिन मुगैरा’ आणि आईचे नाव ‘लबाबतुस्सुगरा’ असे होते.

माननीय खालिद बिन वलीद(र.)यांचे वडील हे मख्जूम परिवाराचे सरदार आणि कुरैश परिवाराचे मोठे वजनदार आणि प्रतिष्ठित गर्भश्रीमंत व्यक्ती होते. समाजात यांचे खूप वजन होते. कुरैश परिवार सुद्धा त्यांचा खूप आदर करीत असे.

वलीद बिन मुगैरा हे केवळ श्रीमंत आणि शूरवीरच नसून त्यांच्यात कमालीची विद्या, ज्ञान आणि नेतृत्वकौशल्य, तसेच वक्तृत्वकौशल्यदेखील होते. लोकांच्या भांडणतंटयांची तडजोड आणि उभय पक्षांतील वादविवाद ते अत्यंत चाणाक्ष बुद्धीने आणि कौशल्यपूर्ण शैलीने संपुष्टात आणीत असत. म्हणूनच अरबजण त्यांना न्यायप्रिय, दृष्टे आणि पुढारी यासारख्या उपाधिनी संबोधित असत. श्रीमंती आणि वैभव त्यांच्या घरी सदैव नांदत असे. ‘ताईफ’ मध्ये त्यांच्या भरपूर बागा होत्या. हज यात्रेच्या वेळी ते एकटेच संपूर्ण हज यात्रेकरूंचा पाहुणचार करीत आणि त्यावर लाखोंचा खर्च करीत असत. अशा प्रकारे सर्व तर्हेच्या वैभवसंपन्न घराण्याचे खालिद बिन वलीद(र.)हे सपुत्र होत.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार सुरु केला तेव्हा अरबजणांचे एक शिष्टमंडळ प्रेषितांचे काका ‘अबू तालिब’ यांना येऊन भेटले आणि म्हणाले की, आपले पुतणे मुहम्मद(स.) यांना धर्मप्रचार करण्यापासून परावृत्त करावे अन्यथा त्यांचे समर्थन अथवा पाठराखण करू नये. या शिष्टमंडळात वलीद बिन मुगैरासुद्धा सामील होते. त्यांनी तर हे देखील सांगितले की, मुहम्मद(स.) यांना आमच्या स्वाधीन करावे आणि मोबदल्यात माझा तरूण पुत्र ‘अम्मारा’ घ्यावा. परंतु ‘अबुतालिब’ यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांचे कथन आहे की, या शिष्टमंडळाने आदरणीय प्रेषितांसमोरही प्रस्ताव ठेवला की, आपणास हवी तेवढी संपत्ती देऊ सरदारकी देऊत. अरब प्रदेशातील सर्वांत सुंदर असलेल्या तरुणीशी आपला विवाह करून देऊ, परंतु आपण इस्लामचा प्रचार करताना आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. तुमच्या तोंडून आमच्या विभूंतीविरुद्ध व आमच्या पारंपरिक धर्माविरुद्ध निघणारे शब्द मुळीच ऐकून घेतले जाणार नाही. आदरणीय प्रेषितांनी त्यांचा कोणताही प्रस्ताव न स्वीकारता इस्लाम धर्माचा प्रसार व प्रचार सुरुच ठेवला आणि त्यांना रोखठोख शब्दांत बजावले,

‘‘मी जो धर्म तुमच्यासमोर सादर करीत आहे, तो ईश्वरीय धर्म असून तो तुमच्यासमोर मी यासाठी सादर करीत नाही की, मला तुमची संपत्ती मिळावी, सुंदर व अतिसुंदर मुलींशी लग्न करून त्यांचा उपभोग घ्यावा आणि तुमच्यावर शासन करावे. माझा उद्देश या गोष्टींची प्राप्ती नसून मला स्वयं ईश्वरानेच दिव्य ज्ञान आणि आचरण, मार्गदर्शन देऊन तुमच्याकडे पाठविलेले आहे. तसेच मला एक दिव्य ग्रंथ देऊन तुमच्याकडे पाठविले आहे आणि असा आदेश दिला आहे की, मी तुम्हाला सत्यमार्गाचे दर्शन घडवावे, सदाचरणाचे मार्गदर्शन करावे. म्हणून मी ईश्वराचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविला आहे की, तोच एकमेव पूज्य असून मी तुमच्या व सर्व जगाच्या मार्गदर्शनासाठी पाठविलेला प्रेषित आहे आणि जगातला प्रत्येक माणूस आपल्या कर्मांचा हिशोब देईल. त्याच्या सदाचरणाचे त्यास उत्तम फळ मिळेल आणि दुष्कर्मांची शिक्षा त्यास भोगावीच लागल. मी सांगितलेल्या सत्य वचनाचा तुम्ही स्वीकार केल्यास तुम्हास ऐहिक आणि पारलौकिक यश मिळेल. जर तुम्ही हे सत्यवचन नाकारले. तर ईश्वरच तुमच्या आणि माझ्या विवादाचा अंतिम निर्णय करील!’’

काही इतिहासकारांचे मत असे आहे की, या अरब शिष्टमंडळाचे सरदार आणि नेते ‘वलीद बिन मुगैरा’ यांनी आदरणीय प्रेषितांवर अवतरित झालेल्या दिव्य कुरआनास ईश्वरीय ग्रंथ असण्याचा मनोमन स्वीकारदेखील केला आणि काही प्रसंगी दबलेल्या स्वरात या गोष्टीचा उल्लेखदेखील केला, परंतु ‘अबुजहल’ या इस्लामद्रोह्याने त्यांना स्वस्वाभिमान आणि पारंपरिक धर्मप्रथेची आन देऊन इस्लाम स्वीकारण्यापासून परावृत्त केले.

इस्लामद्रोह्यांनी सामान्यजणांना आदरणीय प्रेषितांनी सादर केलेल्या इस्लामपासून दूर ठेवण्याचा जीवापाड खटाटोप चालू ठेवला होता. इस्लामद्रोही चळवळीमध्ये सर्वांत पुढे ‘अबू जहल’ होता. परंतु ही चळवळ ‘वलीद बिन मुगैरा’ यांच्याच मार्गदर्शनात चालू होती. कारण या चळवळीत सर्वांत जास्त चतुर आणि बुद्धिमान हाच माणूस होता. अशा प्रकारे इस्लामद्रोही असणार्या, बुद्धिमान, धनाढ्य आणि बलाढ्य शक्ती आणि समाजात प्रतिष्ठापूर्ण वचक असलेल्या ‘वलीद बिन मुगैरा’ सारख्या व्यक्तीच्या पोटी ‘माननीय खालिद बिन वलीद(र.)हे हिजरी सन पूर्व ३५ मध्ये जन्मले.आदरणीय प्रेषितांच्या प्रेषितत्वाच्या वेळी ते २२ वर्षांचे देखणे तरुण होते. बालपणापासूनच त्यांना कुस्ती, घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि इतर शारीरिक पराक्रम करण्याचा कमालीचा छंद होता. कोणाचेही भय आणि भीती नावाची गोष्ट त्यांच्या जणू स्वभावातच नव्हती. ते खूप जोमाने व्यायाम करीत. युद्धकलेत नवनवीन तंत्राचा शोध लावीत. घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक आणि इतर युद्धकौशल्यांच्या स्पर्धेत ते नेहमीच बाजी मारीत असत. बुद्धिमत्ता, तरतरी, तापटपणा आणि चातुर्य यासारखे गुणधर्म त्यांच्या अंगी होते. कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याचे कमालीचे कौशल्य त्यांच्यात आढळून येते. परिवाराच्या पारंपरिक प्रशिक्षण आणि वातावरणामुळे त्यांचे कौशल्य आणखीनच वृद्धिगत झाले. पित्याच्या मृत्यूनंतर या बलाढ्य आणि धनाढ्य, बुद्धिमान आणि चतुर परिवारजणांच्या तसेच कबिल्यातील सर्वच लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन ठेपली. त्यांच्या वारसाहक्कात अमाप संपत्ती त्यांच्या हाती आली आणि ते एक यशस्वी व्यापारी सिद्ध झाले.

पित्याप्रमाणेच ते इस्लाम स्वीकारण्यापूर्वी इस्लामचे कट्टर विरोधक होते. इस्लामविरोधी कारवायासुद्धा मोठ्या जोमाने करीत असत. परंतु चातुर्य आणि बुद्धिमत्तेसह त्यांच्यात विवेकपूर्ण विचार करण्याची पात्रतादेखील असल्याने ते इस्लामी शिकवणींनी खूप प्रभावित झाले. त्यांचे लहान बंधु इब्ने वलीद(र.)यांनी आपल्या सुस्वभावामुळे त्यांच्या पूर्वीच इस्लामचा स्वीकार केला होता. त्यांनी आपले बंधु खालिद बिन वलीद(र.)यांना मदीनाहून पत्र पाठविले की,

‘‘परम दयाळू व परम कृपाळू ईश्वराच्या नावाने’’
‘‘तुमच्यासारख्या चतुर, बुद्धिमान व विवेकशील माणसाने इस्लामचा एवढा विरोध करण्याचे मला खूपच आश्चर्य वाटते. खरे पाहता तुमच्यासारखा सूज्ञ माणूस इस्लामच्या सत्यनिष्ठ असण्यावरसुद्धा तुमचा विश्वास आहे. आदरणीय प्रेषितांनी मला विचारले, ‘‘खालिद यांचे काय चालले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘हे प्रेषिता! खालिद यांचे मनपरिवर्तन केवळ ईश्वराच्याच हाती आहे.’’ आदरणीय प्रेषित म्हणू लागले, ‘‘खालिद यांच्यासारखा माणूस इस्लामच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहुच शकत नाही. ते जर मुस्लिमांची साथ देऊन ईशद्रोह्यांशी सामना करतील, तर ते त्यांच्या हिताचे ठरेल. म्हणून हे बंधु! तुमच्या जीवनाचा बराच काळ मार्गभ्रष्टतेतच वाया गेला. आता तरी सत्य धर्माचा स्वीकार करा आणि इस्लामच्या छत्रचायेत या.’’

या पत्रामुळे माननीय खालिद बिन वलीद(र.)यांचे विचार बदलत गेले. काही दिवसांनंतर ते प्रेषितदरबारी हजर झाले आणि इस्लामचा स्वीकार केला. स्वतः खालिद बिन वलीद(र.)यांनी आपल्या इस्लाम स्वीकृतीचा वृत्तांत या शब्दांत मांडला -

‘‘माझा भाऊ इब्ने वलीद(र.)यांच्या पत्रामुळे माझ्या अंतःकरणावरील दाट तिमिर पार नष्ट झाले आणि मी इस्लामच्या देदिप्यमान प्रकाशित मार्गाकडे वळलो. आदरणीय ‘‘प्रेषित मुहम्मद(स.) यांनी स्वतः एवढ्या आपुलकी आणि आस्थेने माझी चौकशी केली. मी तर त्यांचा कट्टर विरोधक आणि शत्रू असूनही माझ्याविषयी त्यांची ही काळजी पाहून मलादेखील खूपच आनंद झाला आणि मी प्रेषितदरबारी हजर होण्याचा पक्का निश्चय केला. मी मदीना शहरी जाण्यास निघालो तेव्हा मला ‘सफवान’ आणि ‘अक्रमा’ भेटले आणि मी त्यांना म्हणालो, ‘‘मुहम्मद(स.) यांचे अरब आणि अजम(अरबेतर) वर प्रभुत्व वाढत आहे. आपणही त्यांची साथ दिल्यास त्यांना मिळणार्या प्रभुत्व आणि प्रतिष्ठेत आपणही सहभागी होऊ. परंतु माझा सल्ला त्यांनी स्पष्टपणे नाकारला. मग मी आपले मित्र ‘उस्मान बिन वलहा’ यांना भेटलो आणि म्हणालो, ‘‘हे उस्मान! मुस्लिमांचे प्रभुत्व दिवसेंदिवस वाढत आहे. एक वेळ अशी येईल की, ते आपले स्वामी व आपण त्यांचे गुलाम बनू. त्यापेक्षा ती वेळ येण्यापूर्वी आपणही इस्लामचा स्वीकार केला तर जास्त उत्तम ठरेल.’’ उस्मान बिन तलहा यांना ही गोष्ट मी भीतभीतच केली. कारण त्यांचे पिता आणि चार भाऊ मुस्लिमविरोधी युद्धात ठार झाले होते. त्यामुळे मला वाटत होते की, तेसुद्धा ‘सफवान’ आणि ‘अक्रमा’प्रमाणेच माझा प्रस्ताव नाकारतील. परंतु उस्मान बिन तलहा(र.)यांनी तर मला आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांनी माझा प्रस्ताव तत्काळ स्वीकारला. दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही दोघे ‘मदीना’ शहराकडे निघालो. ‘हुदा’ या स्थानावर अमरु बिन आस(र.)यांची भेट झाली. ते अॅबीसीनियाकडून येत होते. त्यांनी विचारले,

‘‘हे खालिद! कोठे निघालात?’’
‘‘ईश्वराची शपथ! आम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडे इस्लाम स्वीकारण्याकरिता निघालो आहोत. मग आम्ही एकत्रितपणे मदीना शहरी प्रेषितदरबारी हजर होण्याकरिता निघालो. आमच्या आगमनाची वार्ता प्रेषितांना लागताच त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सोबत्यांना संबोधून म्हटले की, ‘मक्का’ शहराचे लाडके आमच्या स्वाधीन होत आहेत.’ मी प्रेषितांना भेटण्यापूर्वी नवीन पोषाख अंगावर चढविला आणि प्रेषितांकडे निघालो. रस्त्यातच मला माझे बंधु इब्ने वलीद भेटले आणि म्हणाले, ‘‘चला! आदरणीय प्रेषित तुमच्या आगमनाने खूप आनंदीत झाले. ते तुमची अतूरतेने वाट पाहात आहेत.’’ आम्ही सर्वजण लगबगीने प्रेषितांकडे हजर झालो. प्रेषितांनी स्मित हास्याने आमचे स्वागत केले. आम्ही जवळ जाऊन प्रेषितांना सलाम केला. प्रेषितांनी आमच्या सलामचे उत्तर दिले. मी म्हणालो, ‘‘मी साक्ष देतो की, ईश्वर एक असून त्याचा कोणीच भागीदार नाही आणि मुहम्मद(स.) ईश्वराचे प्रेषित आहेत.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ईश्वराची कृपा आहे की, तुम्हाला ईश्वराने इस्लाम स्वीकृतीची सुबुद्धी दिली. मला देखील हीच आशा होती की, तुमच्या विवेकशील स्वभावामुळे तुम्ही या सत्याचा अवश्य स्वीकार कराल.’’

‘‘हे प्रेषित!’’ मी म्हणालो, ‘‘आजपर्यंत तुमच्याविरुद्ध बर्याच लढाया लढण्याचे पाप केले आहे. आपण ईशदरबारी मला या पापांतून मोक्ष मिळण्याची प्रार्थना करावी.’’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘इस्लामचा स्वीकार केल्याने माणसाचे सर्व पाप नष्ट होतात.’’ मी आश्चर्यचकित होऊन प्रेषितांकडे पाहिले, ‘‘हे प्रेषिता, खरोखरच?’’ यानंतर आदरणीय प्रेषितांनी ईशदरबारी प्रार्थना केली,

‘‘हे ईश्वरा! तुझ्या धर्माविरुद्ध केलेल्या खालिद बिन वलीद(र.)च्या कारवायांचे पाप क्षमा कर!’’
यानंतर ‘अमरु बिन आस(र.)’ आणि ‘उस्मान बिन तलहा(र.)’ यांनी इस्लाम स्वीकारला. मी(माननीय खालिद बिन वलीद(र.)) इस्लाम स्वीकारल्यावर मदीना शहरातच स्थायिक झालो. यासह मला मक्काहून मदीनास स्थलांतराच्या पुण्यकर्माचेही सौभाग्य लाभले. ही घटना मक्काच्या विजयाच्या सहा महीने पूर्वीची आहे. माननीय खालिद(र.)म्हणतात की, ‘‘आदरणीय प्रेषितांनी माझ्या निवासस्थानाचाही प्रबंध केला.’’

इस्लाम स्वीकारल्यावर माननीय खालिद बिन वलीद(र.)हे इस्लाम धर्माचे दोन मजबूत बाहू बनले आणि त्यांनी आपल्या धारदार तलवारीने इस्लामद्रोह्यांचा खरपूस समाचार घेतला. मोठमोठ्या इस्लामद्रोही बहादुरांना रणांगणात धूळ चारली. माननीय खालिद बिन वलीद(र.)इस्लाम स्वीकारल्यावर सर्व प्रथम ‘मौता’ च्या युद्धात आपली तलवार ईशद्रोह्यांवर चालवून शत्रूला धूळ चारली. त्यांच्या इस्लाम स्वीकारण्याच्या दोन महिन्यांनंतरच हे युद्ध झाले. मुस्लिम आणि ईशद्रोह्यांदरम्यान ‘मौता’ या स्थानावर घनघोर युद्ध झाले. या युद्धामध्ये माननीय झैद बिन हारिस(र.)माननीय जाफर बिन अबी तालिब(र.)आणि अब्दुल्लाह बिन रवाहा(र.)हे शत्रुंशी लढताना हुतात्मे झाले. म्हणून संपूर्ण लष्कराचे नेतृत्व माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी सांभाळले आणि शत्रूंच्या लष्करावर जोरदार हल्ला चढविला. खालिद बिन वलीद(र.)यांच्या हल्ल्यापुढे शत्रूंच्या लष्कराचे पाय डगमगले. शत्रूपक्षाच्या लष्कराचे शेकडो शिपाई मृत्यूमुखी पडले. अशा प्रकारे शत्रूपक्षाच्या हजारोंच्या लष्करास पराभूत करून माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी इस्लामी लष्करास विजय मिळवून दिला.

इसवी सन पूर्व सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राईली वंशातील प्रेषितांवर अवतरित झालेल्या ‘तौरेत’ या ईश्वरीय ग्रंथात एक भविष्यवाणी करण्यात आली होती ती अशी की,

‘‘ईश्वराचा प्रेषित ‘सीना’ पर्वताकडून येईल आणि ‘फारान’ च्या शिखरांकडून आपल्या दहा हजार पवित्र अनुयायांसोबत प्रकट होईल. त्याच्या उजव्या हाती दिव्य प्रकाश(दिव्य कुरआन) असेल.’’(संदर्भ : तौरेत प्रकरण इस्तिस्ना)

अर्थातच आदरणीय प्रेषितांनी मदीना शहरातून मक्कावर ताबा मिळविण्यासाठी निघताना इस्लामी लष्कराच्या ‘मौमिना’ या तुकडीचे सेनापती त्यांना बनविले. आपल्या लष्करास प्रेषितांनी आधीच सूचना दिल्या होत्या की, मक्काच्या लष्कराने हल्ला केला तरच तुम्ही त्यांच्यावर हल्ला करावा. मक्का शहरातील इस्लामद्रोह्यांचे सामुदायिकरीत्या मुस्लिम लष्करावर हल्ला करण्याचे धैर्य झाले नाही. परंतु अक्रमा बिन अबू जहल या ईशद्रोह्याने आपल्या काही सवंगड्यांना घेऊन इस्लामी लष्करावर बाणांचा वर्षाव केला. म्हणून माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जेर केले आणि शत्रूपक्षाचे बरेच शिपाई पळून गेले. या युद्धात शत्रूपक्षाचे २८ शिपाई ठार झाले.

‘बुखारी’ या ग्रंथात आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना या हल्ल्याबाबत जाब विचारला आणि खालिद बिन वलीद(र.)यांनी नम्रतेने प्रेषितांना सांगितले, ‘‘हे प्रेषिता! शत्रुपक्षाने हल्ला केल्यामुळेच विवश होऊन आम्ही त्यांच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले.’’ आदरणीय प्रेषित म्हणाले, ‘‘असो! ईश्वराची जशी इच्छा असेल, तेच होईल!’’

मक्का विजयाच्या पाच दिवसांनंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना तीस स्वारांची तुकडी देऊन ‘नखला’ पर्वतावरील ‘उज्जा’ या देवतेची मूर्ती तोडण्याकरिता रवाना केले. या ‘उज्जा’ नावाच्या विभूतीची त्या काळी पूजा करण्यात येत असे. २५ रमजान ८ हिजरी सनात तेथे पोहोचून माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी ती भव्य मूर्ती नष्ट केली.

‘काजमा’ च्या युद्धानंतर माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना वार्ता मिळाली की, ‘ईराण’ चे एक मोठे लष्कर इस्लामी राज्यावर हल्ल्याच्या तयारीत आहे. इस्लामी राज्यावर हल्ला करण्यासाठी हे लष्कर ईराणचा अग्निपूजक असलेला ‘सम्राट किसरा’ याने ‘कारिस’ या शूर लष्करप्रमुखाच्या नेतृत्वात पाठविले होते. इकडून माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी देखील युद्धाची जोरदार तयारी केली. या दोन्ही लष्कराची ‘मजार’ या ठिकाणी समोरसमोर भेट झाली. दोन्ही लष्करात तुंबळ युद्ध झाले. ईराणी फौजेचे तीस हजार शिपाई या युद्धात ठार झाले. बाकीचे सैन्य पळून जाताना ‘सनी’ या कालव्यात बुडून ठार झाले आणि काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

ईराणच्या सम्राटास या अपमानजणक पराभवाची खबर मिळताच तो भयंकर संतापला आणि बदला घेण्यासाठी त्याने आपल्या दुसर्या अतिबलाढ्य ‘जहगर’ आणि ‘बहमन’ सेनापतींच्या नेतृत्वात प्रचंड लष्कर इस्लामी राज्यावर चढाईसाठी पाठविले. या लष्कराच्या शिपायांची संख्या साठ हजार एवढी होती. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना या आक्रमणाची वार्ता कळताच त्यांनी माननीय सुवैद बिन मुकर्रिन(र.)यांच्या नेतृत्वात इस्लामी लष्कराचे काही दस्ते ‘मजार’ या ठिकाणी सोडून स्वतः बाकीचे लष्कर घेऊन शत्रूलष्कराचे ठिकाण ‘वलजा’ या स्थानाकडे कूच केले. ‘वलजा’ या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, सागरतटाचा भाग त्यांच्या अगदी जवळच आहे. त्या ठिकाणी लष्कराच्या तुकड्या लपून बसण्याची सोयीस्कर संधी होती. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी आपल्या युद्धकौशल्याचा भरपूर उपयोग घेताना काही तुकड्या येथेच लपवून ठेवल्या आणि लष्कराचा काही भाग घेऊन स्वतः पुढे रवाना झाले. शत्रूपक्षाबरोबर घनघोर युद्ध झाले. लढतालढता ईराणी सम्राटाची फौज थकून गेल्यावर खालिद बिन वलीद(र.)यांनी लपवून ठेवलेल्या फौजांना शत्रूवर हल्ला चढविण्याचा आदेश देताच इस्लामी लष्कर शत्रूवर अक्षरशः तुटून पडले आणि शत्रूपक्षास पळता भुई थोडी झाली. शत्रूपक्षाच्या फौजेत अगणित लोक ठार झाले आणि बाकीचे पळून गेले. या युद्धात ‘जहगर’ हा ईराणचा सरसेनापती ठार झाला व ‘बहमन’ हा सेनापती मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. या युद्धानंतर माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी येथील संपूर्ण भूभाग इस्लामी सीमांशी जोडून तेथे इस्लामी अंमल लागू केला आणि तेथील जनतेस संरक्षण बहाल केले.

या ‘जजला’ ठिकाणच्या युद्धामध्ये अरबवंशाचे बरेच ख्रिस्तीधर्मिय ईराणी सम्राटाच्या समर्थनार्थ ठार झाले असल्याने त्यांच्यात बदल्याची आग धुमसत होती. त्यांनी इस्लामी लष्करावर चढाई करण्याची जोरदार तयारी सुरु केली. इराकच्या सरहदीवरील ‘उलैयस’ या ठिकाणी त्यांनी लष्करांची जमवाजमव केली. तिकडे ईराणचा सरसेनापती ‘बहमन’ आपला जीव मुठीत धरून ईराणच्या सम्राटाकडे पळून गेला आणि ईराणहून एक प्रचंड लष्कर घेऊन ‘उलैयस’ या ठिकाणी पोहोचला. या भागाचा ईराणी राज्यपाल ‘जाबान’ याच्याकडे लष्कर ठेवून त्याने त्यास सांगितले की, ‘‘मी ईराणच्या सम्राटाकडे जाऊन येईपर्यंत इस्लामी लष्करावर आक्रमणाची कारवाई करू नये.’’ याच वेळी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी ‘उलैयस’ वरील शत्रूच्या लष्करावर हल्ला चढविला. या वेळी ‘जाबान’ चे लष्कर आरामशीर जेवण करण्यात मश्गूल होते. कारण त्यांना आदेशच मुळात असा होता की, ‘बहमन’ परत येईपर्यंत युद्ध छेडू नये. खालिद बिन वलीद(र.)यांनी शत्रूपक्षावर जोरदार हल्ला चढवून हा प्रदेश जिकून घेतला आणि ईराणी सम्राटाच्या लष्कराचे हजारो सैनिक मृत्युमुखी पडले.

या युद्धानंतर माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी ‘अमगैशीया’कडे कूच केली. इस्लामी लष्कर आपल्यावर चालून येत असल्याचे पाहून तेथील जनतेने खालिद बिन वलीद(र.)यांच्याशी युद्ध न करता स्वतःला इस्लामी राज्याशी जोडण्याची विनंती केली आणि माननीय खालिद(र.)यांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन ईराणच्या जुल्मी राज्याच्या जोखडातून त्यांना मुक्त करून इस्लामी संरक्षण बहाल केले.

या विजयाची वार्ता इस्लामचे सर्वेसर्वा शासक माननीय अबू बकर(र.)यांना लागताच ते खूप खुश झाले.

‘अमगैशिया’च्या जवळच ‘हैरा’ नावाचे एक प्राचीन शहर होते. तेथील ईराणी सम्राटाचा राज्यपाल ‘अराजबा’ यास शंका आली की, ‘अमगैशीया’ हातातून गेल्यावर ‘हैरा’ शहरदेखील इस्लामी लष्कर काबीज करील. म्हणून त्याने आपल्या धाडसी मुलाच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य देऊन इस्लामी लष्कराचे आक्रमण रोखण्यासाठी पुढे पाठविले आणि स्वतः शहराबाहेर पाडाव यास्तव टाकला की, इस्लामी लष्कराविरुद्ध लढणार्या आपल्या लष्करास मदतीची गरज पडली, तर तत्काळ मदतीस धावून जाता येईल. ‘अमगैशिया’ आणि ‘हैरा’ या दोन शहरांदरम्यान ‘फरात’ ही मोठी नदी वाहत असे. तिचे पात्रही खूप रुंद होते. ‘अराजबा’ च्या मुलाने या नदीचे पाणी कालव्यामार्फत दुसर्या दिशेला वळविले. यामुळे इस्लामी लष्कराची जहाजे चिखलात रुतू लागली. माननीय खालिद(र.)यांनी शिपायांना आपली जहाजे तेथेच सोडून घोड्यांवर स्वार होऊन हल्ला चढविण्याचा आदेश दिला. आदेशाप्रमाणेच इस्लामी लष्कराने घोड्यांवर स्वार होऊन ‘अराजबा’ आणि त्याच्या लष्करावर हल्ला चढविला. ‘अराजबा’ च्या मुलास या अकस्मात हल्ल्याची मुळीच कल्पना नसल्याने तो पार घाबरून गेला आणि आपल्या लष्कराच्या इतर बर्याच शिपायांसह ठार झाला. त्यांचा समाचार घेतल्यावर इस्लामी लष्कर ‘हैरा’ शहराकडे निघाले. नेमक्या याच वेळी येथील राज्यपाल ‘अराबजा’ याला आपल्या मुलाच्या वधाची आणि ईराणी सम्राट ‘उर्दुशेर’ च्या मृत्यूची एकाच वेळी वार्ता मिळाली. या वार्तेमुळे तो पार खचून गेला आणि आपले लष्कर घेऊन त्याने तेथून पळ काढला. ‘हैरा’ मधील लोक आपले रक्षणकर्ते असलेले ईराणी लष्कर पळून गेल्याचे आणि आपल्याला वार्यावर सोडून दिल्याचे पाहताच त्यांनी एका किल्ल्यात जाऊन आश्रय घेतला. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी जनतेस अभयपत्र पाठवून त्यात स्पष्टपणे लिहिले की, ‘‘तुम्हाला इस्लामी लष्करास घाबरण्यांचे कोणतेही कारण नाही. आम्ही तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेलो नसून तुमच्या रक्षणासाठी आलो आहोत. आम्ही तुम्हास ईराणी सम्राटाच्या जोखडातून व त्याच्या अन्यायी रहिवासी करातून मुक्त करीत आहोत व तुम्हास तुमच्या प्राण, वित्त आणि अब्रूच्या रक्षणाची संपूर्ण हमी देत आहोत.”

या पत्राच्या उत्तरात किल्ल्यात आश्रय घेतलेल्या नागरिकांच्या नेत्यांनी माननीय खालिद(र.)यांना वाटाघाटीच्या बोलणीसाठी विनंती केली आणि खालिद बिन वलीद(र.)त्यांच्याशी रीतसर विनंती करून त्यांना हे अभयपत्र प्रदान केले. हे अभयपत्र १२ हिजरी सनात देण्यात आले.

हैराच्या तहानंतर जवळपासच्या सर्वच प्रदेशांच्या जनतेने ईराणी सम्राटाच्या जाचक कर आणि जुलमी कारभारास वैतागून इस्लामी संरक्षणाची विनंती माननीय खालिद(र.)यांना केली. खालिद बिन वलीद(र.)यांनी त्या सर्व भागावर इस्लामी अमल लागू करुन तेथील जनतेच्या रक्षणासाठी कआका(र.), जरार बिन अझूर(र.), मसना बिन हारिसा(र.)यांना लष्कर देऊन सीमा संरक्षणासाठी आणि रयतेच्या संरक्षणासाठी नियुक्त केले.

या शिवाय माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी इस्लामी राज्याच्या अधिपत्याखाली आलेल्या संपूर्ण प्रदेशात राज्यपाल नियुक्त करून राज्यकारभारास नियोजनबद्ध वळण दिले. याच वेळी ‘बानकयाद’ आणि ‘निस्तूना’ या भागातील पादरी खालिद बिन वलीद(र.)यांच्या सेवेत हजर झाले आणि त्यांनी त्यांचा प्रदेशही इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली घेण्याची विनंती केली आणि खालिद बिन वलीद(र.)यांनी त्यांनाही संरक्षणपत्र देऊन ते दोन्ही प्रदेश इस्लामी राज्याच्या सीमांशी जोडलेत.

ही मोहीम फत्ते झाल्यावर माननीय खालिद(र.)ईराणी साम्राज्याच्या अत्यंत मजबूत असलेल्या ‘अम्बार’ या ठिकाणाकडे वळले. अम्बारवासियांना खालिद(र.)यांच्या आक्रमणाची वार्ता समजताच त्यांनी किल्ल्यात आश्रय घेतला. इस्लामी लष्कर शहरात दाखल होताच त्यांनी किल्ल्यातून बाणांचा वर्षाव सुरु केला. खालिद बिन ‘वलीद’(र.)यांनी किल्ल्याच्या चारही बाजुंनी त्यांच्या रक्षणात्मक व्यवस्थेचा आढावा घेतला. ते या निष्कर्शावर पोहोचले की, अम्बारवासियांना युद्धकौशल्याचे मुळीच ज्ञान नाही. त्यांना सहज पराभूत करता येईल. म्हणून त्यांनी इस्लामी लष्करास आदेश दिला की, शत्रूपक्षाच्या शिपायांना लक्ष्य बनवून सलग बाणांचा वर्षाव करावा. अशा प्रकारे या युद्धात जवळपास एक हजार शत्रूचे सैनिक आंधळे झाले. ‘अम्बार’च्या सेनाप्रमुख ‘शेरबाद’ याने लष्कराचे धैर्य खचंताना पाहिले आणि त्याने खालिद बिन वलीद(र.)यांना बोलणीचा प्रस्ताव पाठविला खरा पण यामध्ये खूपच कठीण अटी त्याने प्रस्तावित केल्या. त्यामुळे खालिद बिन वलीद(र.)यांनी त्याचा प्रस्ताव नाकारून आपले लष्कर कमी रुंदी असलेल्या किल्याच्या खंदकाजवळ घेऊन गेले. किल्ल्याच्या खंदकावर त्यांनी तात्पुरता पूल बनवून लष्करास किल्यात घुसविले. किल्ल्यात दडी मारलेल्या शिपायांमध्ये युद्धाचे धैर्य नसल्याने सेनापती ‘शेरझाद’ याने बिनशर्त बोलणी करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि अखेर या युद्धाची सांगता बोलणीवर झाली. हा भाग इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आल्यावर माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी ‘जबर कान बिन बदर(र.)’ यांना ‘अम्बार’ येथे राज्यपाल नेमून ते ‘ऐतुल तमर’ या ठिकाणाकडे वळाले.

‘ऐनुल तमर’ येथील ईराणी साम्राज्याचा शूर सेनापती ‘मेहरान चोबीन’ इस्लामी लष्कराविरुद्ध लढण्यासाठी जंगी तयारी करीत होता. त्याच्या मदतीकरिता ‘तगलब’ ‘अयाद’ आणि ‘नमरद’ वगैर अरबी वंशाचे ख्रिस्तीधर्मिय कबिलेसुद्धा ‘अका बिन अका’च्या नेतृत्वात पोहोचले होते. ‘मेहरान’ याने एका विशिष्ट उद्दिष्टास्तव अरबी कबिल्यांना इस्लामी लष्करांसमोर केले. ‘अका बिन अका’ ‘किर्ख’ या ठिकाणावर आपल्या फौजेची बांधणी करीतच होता की, खालिद बिन वलीद(र.)यांच्या फौजेने त्याच्यावर हल्ला चढविला. खालिद बिन वलीद(र.)त्याच्या फौजांच्या रांगा भेदून त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याच्या हातापायांत बेड्या टाकल्या. प्रमुख सेनापती अटक झाल्याचे पाहून लष्कराने पळ काढला. इस्लामी लष्कराने त्यांचा पाठलाग करून बर्याच जणांना अटक केली आणि बाकीचे शिपाई पळून जाऊन त्यांनी ‘ऐनुल तमर’ या किल्यात आश्रय घेतला. मेहरान याने ख्रिस्तीधर्मिय अरबजणांचा अपमानजनक पराभव पाहून किल्ल्यातूनही पळून गेला. माननीय खालिद(र.)यांनी किल्ल्यास पूर्ण वेढा दिला. किल्ल्यातील शत्रूपक्षाने शेवटी खालिद बिन वलीद(र.)यांच्यापुढे आपला निभाव लागत नसल्याचे पाहून किल्ल्याचे द्वार उघडले. खालिद बिन वलीद(र.)यांनी सर्व अरबवंशीय ख्रिस्तीधर्मियांना अटक केली.

ज्या काळामध्ये खालिद बिन वलीद(र.)इराकच्या मोहिमेत व्यस्त होते, तेव्हा ‘दवामतुल जन्दल’ या ठिकाणी बंडाचे निषाण फडकले आणि ‘कलब’, ‘बेहरा’, ‘गुस्सान’, ‘तनुख’ आणि ‘झजाअम’ या कबिल्यांच्या ‘अकीदर आणि ‘जोदी’ यांना आपले प्रमुख नियुक्त करून इस्लामी शासनाविरुद्ध बंडाचे रणशिग फुंकले. इस्लामी शासक माननीय अबू बकर(र.)यांनी हे बंड मोडून काढण्यास्तव माननीय अयाज बिन गनम(र.)यांना खालिद बिन वलीद(र.)यांच्या मदतीस्तव बोलावले.

‘ऐनुल तमर’ ची मोहीम जिकल्यावर खालिद बिन वलीद(र.)यांनी लष्कर घेऊन ‘दवामतुल जंदल’ कडे कूच केली. खालिद बिन वलीद(र.)‘दवामतुल जंदल’ कडे कूच केले. खालिद बिन वलीद(र.)‘दवामतुल जंदल’ येथे पोहोचताच ‘अकीदर’ याने ‘जोदी’ ची साथ असे म्हणून सोडली की, ‘मी खालिद बिन वलीद(र.)यांच्याशी टक्कर घेऊ शकत नाही.’ खालिद बिन वलीद(र.)यांना त्याच्या फरार होण्याची वार्ता मिळताच त्यांनी लष्कराची एक तुकडी त्याच्या पाठलागास्तव पाठविली. तो अटक झाला. खालिद बिन वलीद(र.)यांनी त्यास बंडाळीच्या अपराधास्तव ठार केले. यानंतर खालिद बिन वलीद(र.)आणि अयाज(र.)यांनी ‘दवामतुल जन्दल’ ला दोन्हीकडून घेराव घातला. बंडखोरांच्या मदतीसाठी अरबवंशाचे ख्रिस्तीधर्मिय मोठ्या संख्येने तेथे जमले होते. हे सर्व जण ‘जोदी’ आणि इतर सेनापतींच्या नेतृत्वात खालिद बिन वलीद(र.)यांच्या लष्कराशी लढा देत होते. परंतु खालिद बिन वलीद(र.)आणि अयाज(र.)यांच्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. ‘जोदी’ आणि ‘वदीआ’ हे सेनाप्रमुख अटक झाले आणि लष्कराच्या इतर शिपायांनी किल्ल्याचा आश्रय घेतला. किल्ल्यात थांबण्यासाठी जागा उरली नसल्याने आतील लोकांनी किल्ल्याचे द्वार बंद करून घेतले आणि बाहेरील लोकांना किल्ल्यात प्रवेश करता आला नाही. हे बाहेर सुटलेले लोक अरब वंशाच्या ‘कल्ब’ परिवाराचे होते. त्यांनी खालिद बिन वलीद(र.)यांच्या एका तुकडीचे सेनापती असलेले आसिम बिन अमरु(र.)दयेची याचना केली. कारण ‘कलब’ परिवार ‘आसिम बिन अमरु(र.)यांच्या दुरून नात्यामध्ये होते. माननीय आसिम(र.)यांनी त्यांची याचना मंजूर करून त्यांना अभय दिले. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनीदेखील ‘कलब’ परिवारजणांना क्षमा दिली. यानंतर त्यांनी किल्ल्याचे फाटक उघडून आतील सर्व बंडखोरांना अटक केली आणि मग त्या सर्वांना आणि त्यांचा म्होरक्या असलेल्या ‘जोदी’ यास बंडाळीच्या अपराधास्तव ठार करण्यात आले.

खालिद बिन वलीद(र.)अजून ‘दवामतुल जन्दल’ येथेच होते की, इराकमध्ये ईराणी उपद्रव्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांनी ‘हसीद’ आणि ‘खनाफस’वर आक्रमण केले. ‘अम्बारचे राज्यपाल’ जबरकान बिन बदर(र.)यांना या उपद्रवाची वार्ता मिळताच त्यांनी ‘हैरा’चे राज्यपाल ‘कआकाअ बिन अमरु(र.)’ यांची मदत मागविली. ‘कआकाअ(र.)’ यांनी तत्काळ वेगवेगळे दोन लष्कर ‘अबद बिन फदकी’ आणि ‘उरवा बिन जाअदल’ यांच्या नेतृत्वात त्यांच्या मदतीस पाठविले. त्यांनी ‘रैफ’ या ठिकाणी बंडखोरांना रस्त्यातच रोखले. ऐन याच वेळी तिकडून खालिद बिन वलीद(र.)आणि ‘अयाज बिन गनम(र.)’ ‘दवामतुल जन्दलची मोहीम सर करून येत होते. त्यांना ही परिस्थिती समजताच त्यांनी शत्रूपक्षाचा विध्वंस सुरु केला आणि बंडखोरांना यमसदनी धाडले. अशा प्रकारे बर्याच लढाया आणि बंडखोर्या झाल्या आणि या संपूर्ण प्रकरणात खालिद बिन वलीद(र.)यांचे युद्धकौशल्य इस्लामी राज्याच्या सीमा विस्तारण्यास कारणीभूत ठरले.

माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी इराकमध्ये ‘मोहर्रम’ १२ हिजरी ते ‘सफर’ १३ हिजरी अर्थात चौदा महीने व्यतीत केले. यामध्ये त्यांनी पंधरा युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात यशस्वी झाले.

ज्या काळात माननीय खालिद बिन वलीद(र.)ईराणी साम्राज्याचा नायनाट करीत होते, त्याच काळात ‘रोम’शीसुद्धा संघर्ष चालू झाला होता. चार इस्लामी लष्करे माननीय अबू उबैदा बिन जर्राह(र.), माननीय उमर बिन आस(र.)माननीय यजीद बिन अबुसुफयान(र.)आणि माननीय शरजील बिन हसना(र.)यांच्या नेतृत्वाखाली रोमी साम्राज्याच्या विविध ठिकाणांवर चाल करून गेले. रोमी शत्रू पूर्ण पराकाष्ठेने इस्लामी लष्कराचा सामना करीत होते आणि इस्लामी लष्करास पुढे जाण्यास प्रतिकार करीत होते. अशा परिस्थितीमुळेच इस्लामी शासक माननीय अबू बकर सिद्दीक(र.)यांनी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना आदेश पाठविला की, ‘रोमी साम्राज्याविरुद्ध युद्ध करणार्या इस्लामी लष्कराच्या मदतीस जावे.’ हा आदेश मिळताच माननीय खालिद बिन वलीद(र.)आपले निम्मे लष्कर घेऊन इस्लामी लष्कराच्या मदतीसाठी सीरियाकडे निघाले.

माननीय खालिद(र.)यांनी ‘सीरिया’च्या युद्धमोहिमेवर जाण्यासाठी अत्यंत कठीण मार्ग निवडला. हा मार्ग अतिशय धोक्याचा होता. एव्हाना पाच-सहा दिवसांचा असलेला सरळ मार्ग सोडून ते ‘हूरान’ च्या पूर्वेस विस्तारलेल्या ‘हमाद’चा मार्ग निवडला. हे मार्गभ्रमण त्यांच्या युद्धकौशल्याचा एक भाग होता. तब्बल अठरा दिवसाच्या प्रवासानंतर ते ‘बुरसीबा’ या ठिकाणी पोहोचले. तेथील लोकांनी या गोष्टीची कधीच कल्पना देखील केली नसेल की, एखादे लष्कर ते भयानक वाळवंट पार करून आपल्यावर आक्रमण करेल. आपल्यावर अचानकच होणार्या या अकस्मात हल्ल्यामुळे ते पार खचून गेले. त्यांची तारांबळ उडाली आणि कसेबसे लढून त्यांनी अखेर माघार घेतली. ‘सवा’चा भाग ताब्यात घेतल्यावर खालिद बिन वलीद(र.)‘अर्क’, ‘पालमोरा’, ‘करीतैन’, ‘हवारैन’ आणि ‘कसम’ चा भाग ताब्यात घेत ते सरळ दक्षिणेकडे आपला मोर्चा घेऊन जात होते. ‘सीरियाच्या’ ‘दमास्कस’ ला सोडून ते ‘मरज राहत’ला पोहोचले. या ठिकाणी रोमन साम्राज्याच्या लष्कराने खालिद बिन वलीद(र.)यांना निकराची झुंज दिली. परंतु अखेर त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ‘मरज राहत’चा भाग जिकून खालिद बिन वलीद(र.)हे ‘यरमुक’ च्या भागात आपल्या विजयी सैन्याच्या ताफ्यासह दाखल झाले आणि ‘हूरान’च्या पर्वताच्या पायथ्याशी राखून ठेवलेल्या इस्लामी लष्करास जाऊन मिळाले. याच ठिकाणी एक प्रचंड रोमी लष्कराशी त्यांचा सामना झाला. परंतु या प्रचंड लष्कराने खालिद बिन वलीद(र.)समोर आत्मसमर्पण केले. याच ठिकाणी चारीही इस्लामी लष्कराचे सरसेनापती माननीय अबू उबैदा(र.)यांनी लष्कराचे नेतृत्व खालिद बिन वलीद(र.)यांना सोपविले. यानंतर खालिद बिन वलीद(र.)यांनी ‘बसरा’ शहरावर हल्ला चढविला. दोन्ही फौजांदरम्यान तुंबळ युद्ध झाल्यावर बसराचा रोमी राज्यपाल ‘बतरीक’ हा खालिद बिन वलीद(र.)यांना शरण आला व त्याने त्यांच्याशी तह केला.

तिकडे रोमन साम्राज्याचा सम्राट ‘हरकल’ यास इस्लामी लष्कराच्या विजयी घोडदौडीची वार्ता मिळाली. कधीच पराभवाचे तोंड न पाहणार्या या सम्राटास मुस्लिमांचा भयंकर संताप चढला. तो रोमी साम्राज्याच्या अपमान व नामुष्कीच्या ज्वराने अक्षरशः फणफणत होता. त्याने प्रचंड मोठमोठ्या लष्करी तुकड्या इस्लामी लष्करावर चोहीकडून जोरदार हल्ला चढविण्यासाठी पाठविल्या. या रोमी सैन्याचे नेतृत्व ‘कबकलार’ आणि ‘तझारिक’ या दोन बलाढ्य सेनापतींकडे होते. या दोघांनी पॅलेस्टाईनमध्ये ‘अजनादेन’ या ठिकाणी पडाव टाकला. माननीय अबू बकर सिद्दीक(र.)यांनी ‘पॅलेस्टाईन’ ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर अमरु बिन आस(र.)यांची नेमणूक केली होती. या प्रसंगी ते ‘गरबात’ मध्ये होते. त्यांना रोमी लष्कराची वार्ता मिळताच ते ‘अजनादैन’ कडे रवाना झाले. माननीय खालिद बिन वलीद(र.)सुद्धा ‘बसरा’ सर करून त्यांच्या मदतीस पोहोचले.

हिजरी सन १३ च्या जमादिल आखिरा महिन्यात या दोन्ही लष्करांदरम्यान तुंबळ लढाई झाली. दोन्ही फौजा एकमेकांवर हिस्त्र पशूप्रमाणे तुटून पडल्या. या भयंकर युद्धात रोमी लष्कराचे दोन्हीही सेनाप्रमुखांना ठार करण्यात आले आणि रोमच्या प्रचंड लष्करास अपमानजणक पराभव पत्करावा लागला.

‘अजनादैन’मध्ये रोमी लष्कराचा समाचार घेतल्यावर खालिद बिन वलीद(र.)आणखीन एका रोमी लष्कराकडे आपली दृष्टी वळविली. हे रोमी लष्कर ‘दरआ’ च्याजवळ असलेल्या ‘दरोज’ पर्वत आणि ‘यरमूक’ नदीच्या खाडीमध्ये स्थायिक होते. या लष्कराकडे दुर्लक्ष करून ‘दमास्कस’कडे वाटचाल करणे अशक्यप्राय होते. म्हणून माननीय खालिद(र.)यांनी उमर बिन आस(र.)यांना ‘बरशेबा’च्या स्थळावर सोडून काही लष्कराचा भाग घेऊन ‘दरआ’च्या स्थानावर पोहोचले. या ठिकाणीसुद्धा रोमी लष्करास इस्लामी लष्कराने धूळ चारली आणि अशा प्रकारे इस्लामी लष्करास ‘दमास्कस’चा मार्ग मोकळा झाला. येथून ‘दमास्कस’ केवळ पासष्ठ मैल दूर होते.

‘यरमूक’ चे हे पहिलेच युद्ध सुरु असताना तिकडे इस्लामी शासक माननीय अबू बकर(र.)यांचा स्वर्गवास झाला आणि इस्लामी शासनाची धुरा माननीय उमर फारुक(र.)यांच्या हाती आली. यरमूकची ही पहिली लढाई संपल्यावर इस्लामी लष्कर ‘दमास्कस’कडे निघाले आणि शहरास चारी बाजुंनी वेढा घातला. ‘दमास्कस’ येथे पडणारी थंडी इस्लामी लष्करासाठी असहनीय होती. तरी देखील इस्लामी फौजेने मोठ्या धैर्याने या नैसर्गिक आपत्तीस तोंड दिले. हा वेढा तीन महिने सहा दिवसांपर्यंत चालू होता. शहरवासियांनी किल्ल्यातून इस्लामी लष्करावर बाणांचा वर्षाव सुरू केला. परंतु एके दिवशी झाले असे की, शहरवासीयांकडून होणारा बाणांचा वर्षाव खूप कमी झाला. खालिद बिन वलीद(र.)यांच्या चाणाक्ष बुद्धीत वीज चमकल्यासारखे झाले. काही तरी गडबड असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांना वार्ता मिळाली की, तेथील शहरपालास मुलगा झाल्याने त्याने पूर्ण शहरवासियांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. जेवण आणि मद्याच्या मैफली रंगल्या होत्या. सर्वत्र बेधुंद वातावरण होते. इकडे खालिद बिन वलीद(र.)लष्कराची एक छोटीशी तुकडी सोबत घेऊन किल्ल्याच्या पहारेदारांवर हल्ले करीत त्यांना ठार करीत सुटले आणि आत जाऊन किल्ल्याचे मुख्य द्वार उघडून शहरात प्रवेश केला व जोरदार हल्ला चढविला. या अकस्मात हल्ल्यासमोर ‘दमास्कस’ च्या लोकांचा निभाव लागला नाही आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. अशा प्रकारे इस्लामी लष्कराने माननीय अबु उबैदा बिन जर्राह(र.)आणि माननीय खालिद बिन वलीद(र.)यांच्या नेतृत्वाकाली ‘दमास्कस’ फत्ते केले.

दमास्कस मुस्लिमांच्या ताब्यात गेल्याने रोमी साम्राज्य पार हादरून गेले आणि सम्राट ‘हरकल’ चा संताप अनावर झाला. पराभवाची कल्पनाही न करणार्या रोमी सम्राटास अतिशय अपमानजणक पराभव आणि तोही मुस्लिमांच्या छोट्याशा लष्करशक्तीसमोर! या विचाराने त्याची पार झोप उडाली. केवळ एकच विचार त्याच्या डोक्यात थैमान घालत होता. पराभवाचा वचपा काढायचा कसा? अतिसंतापाने तो अक्षरशः वेडा झाला होता. इस्लामी लष्कराचा वचपा काढण्यासाठी ‘बसयान’ या ठिकाणी पन्नास हजाराचे बलाढ्य लष्कर जमा करण्यात आले. माननीय अबू उबैदा बिन जर्राह(र.)यांना या लष्करी तयारीची वार्ता मिळताच ते माननीय खालिद बिन वलीद(र.)यांना घेऊन जार्डनच्या ‘बसयान’ स्थानाकडे निघाले आणि त्याच्या जवळच असलेल्या ‘फहल’ या ठिकाणी तळ ठोकला. इस्लामी लष्कराचे हे धैर्य पाहून रोमी लष्कराच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी इस्लामी लष्कराकडे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. माननीय ‘अबू उबैदा(र.)’ यांनी ‘मआज बिन जबल(र.)’ यांना रोमी लष्कराशी बोलणी करण्यास्तव पाठविले. रोमी लष्कराने त्यांच्याकडील युद्धसामग्री आणि सैन्याच्या प्रचंड संख्येचा उल्लेख करून ‘मआज बिन जबल(र.)यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मआज बिन जबल(र.)’ मुळीच प्रभावित न होता त्यांना सांगितले की,

‘‘जर तुम्ही इस्लामचा स्वीकार कराल तर तुम्ही आमचे बांधव आहात. जर हे मान्य नसेल तर ‘जिझिया’(कर) द्यावे. त्याच्या मोबदल्यात आम्ही तुमच्या सर्व अधिकारांचे रक्षण करू आणि हेसुद्धा मान्य नसेल, तर तुमच्या आमच्या दरम्यान ही तलवारच अंतिम निर्णय करील. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रचंड लष्कर संख्येचे भय दाखवीत आहात. परंतु आम्ही मुळीच घाबरत नाहीत. तुमची संख्या आकाशातील तार्यांएवढी जरी असली, तरी आम्ही काळजी करणार नाही. ईश्वराने म्हटले आहे की, कधी कधी थोडे संख्याबळ असलेले लष्करसुद्धा विजय प्राप्त करते.’’

उभय पक्षांत कोणताच समझोता झाला नाही आणि त्यांच्यात घनघोर युद्ध सुरु झाले. पहिल्या दिवशी रोमन लष्कराने आपली हत्यारे सोडून पळ काढला. दुसर्या दिवशीही रक्तरंजित युद्ध झाले आणि खालिद बिन वलीद(र.)यांनी रोमी लष्कराच्या मोठमोठ्या अकरा सेनापतींना कंठस्नान घातले. हे युद्ध इतके तीव्र झाले की, रणांगणात रक्ताच्या नद्या वाहत होत्या. भयंकर रक्तपात झाला आणि रोमी लष्कर अखेर इस्लामी लष्करास शरण आले.

या शानदार विजयप्राप्तीनंतर इस्लामी लष्कराने ‘हमस’ या शहराकडे कूच केली. हे सीरियाचे एक अति महत्त्वाचे शहर होते. रोमन सम्राट ‘हरकल’ या पराभवाची वार्ता ऐकून अस्वस्थ झाला. त्याने या वेळेस खूपच मोठे लष्कर इस्लामी फौजेचा, रस्ता रोखण्यासाठी पाठविले. या रोमन लष्कराचा सरसेनापती ‘तोजर’ हा होता. ‘तोजर’च्या लष्कराला इस्लामी लष्कराने मागून व समोरून, दोन्ही दिशेने चिरडले. या युद्धामध्ये प्रचंड संख्येत रोमन सैन्य ठार झाले. ‘हमस’ शहराकडे जाताना इस्लामी लष्करावर बरेच हल्ले झाले, परंतु शत्रूचा निभाव लागला नाही. इस्लामी लष्कर ‘हमस’ शहराचे मुख्य द्वार असलेल्या ‘रस्तन’ समोर डेरेदाखल झाले आणि शहराच्या चोहोबाजुंनी वेढा दिला.

तिकडून ‘हरकल’ ने आणखीन एक मोठी कुमक रोमन लष्कराच्या मदतीस पाठविली. परंतु खालिद बिन वलीद(र.)यांनी ते लष्कर ‘हमास’ शहरात दाखल होण्यापूर्वीच त्यास रस्त्यातच अडविले. ज्या काळात हे युद्ध चालू होते, त्या काळात खूप कडाक्याची थंडी पडलेली होती. उष्ण हवामानात जगण्याची सवय असलेल्या इस्लामी लष्करास एवढी थंडी सहन करणे कठीण असूनही त्याने शहराचा वेढा निरंतर चालूच ठेवला. अखेर रोमन लष्कराने अभय देण्याची याचना केली. ही याचना स्वीकारण्यात आली आणि ‘हमस’ शहरावर इस्लामी लष्कराने ताबा मिळविला. माननीय अबू उबैदा बिनुल जर्राह(र.)तेथेच थांबले आणि खालिद बिन वलीद(र.)‘दमास्कस’ कडे रवाना झाले.

रोमन साम्राज्यावर इस्लामी लष्कराच्या सततच्या विजयांनी रोमन सम्राट ‘हरकल’ अतिशय क्षुब्ध झाला. त्याचा संताप अनावर झाल्याने बदल्याच्या भावनेने तो पेटून उठला. त्याने आपल्या साम्राज्यातून इस्लामी लष्कराचा चुराडा करण्याची प्रतिज्ञाच केली. यासाठी त्याने ‘अर्मेनिया’, ‘कॉन्स्टॅटिनोपाल’, ‘अलजझायर’ या ठिकाणांहून प्रचंड लष्कर गोळा केले. या लष्कराचे बळ अभूतपूर्व होते. या लष्करामध्ये अत्यंत कुशल आणि नावाजलेले शूरवीर सेनापती होते. एवढेच नव्हे तर चर्चमधील पादरी आणि मठात वास्तव्य करणारे ख्रिश्चन संन्यासीसुद्धा रणभूमीवर इस्लामी लष्कराच्या विरुद्ध उतरले होते. ते धर्माची आन देऊन रोमन लष्करात युद्धप्रेरणा निर्माण करीत होते. या लष्करातील सैनिकांची संख्या दोन लाखांपेक्षाही जास्त होती. इस्लामी लष्करास याची खबर मिळताच इस्लामी लष्करास ताब्यात घेतलेल्या शहरातून बोलावून एका ठिकाणी गोळा करण्याचे आदेश इस्लामी सेनापतीने दिले. याबरोबरच इस्लामच्या केंद्रीय सत्तेची मदत मागविण्यात आली. शहरवासियांना त्यांच्यावर लागू करण्यात आलेल्या कराची रक्कम परत करण्यात आली. इस्लामी लष्कराच्या या सहिष्णुतापूर्ण कार्यामुळे शहराचे ख्रिश्चन आणि ज्यू रहिवासी अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी इस्लामी लष्कराच्या विजयाची प्रार्थना केली.

संपूर्ण इस्लामी लष्कर एकत्र येऊन यरमूकमध्ये रोमन लष्कराचा सामना करण्यास सज्ज झाले. नेहमीच विजयाची कल्पना करणारे आणि कधीच पराभव न पत्करण्याच्या तंद्रीत असलेले रोमन सैनिक यरमुक आणि जॉर्डनच्या नद्यांच्या अशा संगम असलेल्या मैदानात उतरले की तिन्ही बाजूला अफाट पाण्याचा घेराव होता. समोरून फक्त अतिशय कमी रुंदीचा रस्ता होता. इस्लामी लष्करास पराभूत करण्याच्या उन्मादात झिगलेल्या या रोमन लष्कराने कल्पनासुद्धा केली नाही की, एवढी हत्यारे, प्रचंड संख्याबळ आणि रणांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यांना इस्लामी लष्करासमोर पराभवाची नामुष्की पत्करावी लागेल. चारही बाजुंनी नदीच्या अफाट पाण्याने वेढलेले रोमन लष्कर पाहून माननीय अमरु बिन आस(र.)यांच्या तोंडून विनासयास शब्द बाहेर पडले,

‘‘मुस्लिमांनो! तुम्हाला खूशखबर आणि आनंदाची वार्ता आहे की, रोमन लष्कर आपोआपच कैद झाले आहे.’’

इस्लामी लष्कराने पाडाव टाकण्याकरिता निवडलेली जागा युद्धासाठी खूप अनुकूल होती. त्या ठिकाणी ते रसद आणि मदतसुद्धा मागवू शकत होते. पराभव झाल्यास इतरस्त्र पळण्यास जागा देखील खूप मोकळी होती. या उलट पराभवाच्या परिस्थितीत रोमन लष्करास नदीच्या अथांग पाण्यात बुडून मरण्याशिवाय दुसरा पर्यायदेखील नव्हता. दोन-अडीच लाख रोमन लष्कराच्या मुकाबल्यात इस्लामी लष्कराची संख्या केवळ ४६ हजार एवढीच होती. परंतु त्यांच्या स्वभावात लढवय्यी वृत्ती आणि रणभूमीवर लढताना हुतात्मा होण्याची तीव्र तहान होती. या उलट रोमन लष्करास मृत्यूचे भय भेडसावत होते. पूर्वीप्रमाणेच या वेळीही त्यांची इच्छा होती की, इस्लामी लष्करास संपत्तीची देवाणघेवाण करून हे प्रकरण येथेच संपवावे. या उद्दिष्टपूर्तीस्तव रोमन लष्कराचा सेनापती ‘बाहान’ याने इस्लामी लष्करापुढे प्रस्ताव ठेवला की संपत्ती घेऊन त्यांनी ‘रोम’चा जिकलेला भाग सोडून जावे. परंतु इस्लामी लष्कराने हा प्रस्ताव नाकारला आणि तडजोडीची शक्यता मावळली.

उभय पक्षांत तुंबळ युद्ध सुरु झाले. या युद्धात इस्लामी लष्कराचे दहा शिपाई हुतात्मे झाले आणि शत्रूंचे हजारो सैनिक ठार झाले. माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. रोमन लष्करसुद्धा मोठ्या धैर्याने इस्लामी लष्कराचा सामना करीत होते. त्यांच्या लष्कराच्या तीस हजार सैन्याच्या पायात बेड्या या कारणास्तव होत्या की, त्यांनी माघार घेऊ नये. त्यांना युद्धाने घाबरून मागे सरकण्याचा विचारदेखील येता कामा नये. त्यांचे शेकडो पादरी क्रूस घेऊन त्यांना युद्धाची प्रेरणा देत होते.

रोमन लष्कराचा सरसेनापती ‘बाहान’ याने इस्लामी लष्करप्रमुख अबू उबैदा(र.)यांना प्रस्ताव पाठविला की, तडजोडीच्या बोलणीसाठी आपला एक दूत पाठवावा. हा संदेश घेऊन ‘जरजा’ इस्लामी लष्कराच्या स्थळी आला. संध्याकाळची वेळ असल्याने इस्लामी लष्कर नमाज पढण्यात मश्गूल होते. ‘जरजा’ इस्लामी लष्कराचे हे दृश्य पाहून खूप प्रभावीत झाला. मुस्लिम शिपायी नमाज पढल्यानंतर तो सरसेनापती ‘अबू उबैदा बिन जर्राह(र.)यांच्या सेवेत हजर झाला आणि त्याने प्रश्न केला की,

‘‘आदरणीय प्रेषित येशू मसीह(अ.) यांच्या बाबतीत तुमची काय श्रद्धा आहे?’’ माननीय अबू उबैदा(र.)म्हणाले, ‘‘हे ग्रंथधारका! ज्याप्रमाणे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर ईश्वराने दिव्य कुरआन अवतरित केले, त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषित येशू मसीह(अ.) यांच्यावरसुद्धा ‘बायबल’ हा ग्रंथ अवतरित केला. येशू मसीह(अ.) हेसुद्धा ईश्वराचे प्रेषित होते. म्हणून तुम्ही आपल्या धर्माच्या मूळ विचारसरणीस न बदलता त्यात अतिशयोक्ती करू नये. येशू मसीह(अ.) हे केवळ ईश्वराचे प्रेषित आहेत. ईश्वराने आपला आदेश येशू(अ.), माता मरयम(मेरी)(अ.) यांच्याकडे पाठविला आणि ईश्वरीय आदेशाने ते विनापित्याचे जन्मले. म्हणून तुम्ही तीन ईश्वर(स्वयं ईश्वर, येशू मसीह आणि मेरी) असण्याची श्रद्धा न बाळगता एकमेव ईश्वरालाच सार्वभौम उपास्य समजावे आणि आदरणीय येशू मसीह(अ.) यांना ईश्वराचे प्रेषित समजावे. ईश्वर हा मानवासारखा मुळीच नाही. त्याने मानवीय गुणधर्माप्रमाणे कोणत्याच स्त्रीशी संगत केली नाही आणि त्याच्या मेरी(अ.) शी शारीरिक संबंधांमुळे येशू(अ.) जन्माला आले नाही. कारण हा गुणधर्मच मुळात ईश्वरामध्ये नाही. जे काही या अथांग विश्वात आहे ते सर्व त्याचेच आहे. हीच शिकवण येशू प्रेषितांनी दिली आहे. म्हणून तुम्ही येशू मसीह(अ.) यांनी सांगितलेल्या सत्याचा स्वीकार करा. अंतिम निवाड्याच्या दिवशी संपूर्ण मानवजातीस आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल.’’

अबू उबैदा(र.)यांचे हे उत्तर ऐकून विनासायास त्याच्या तोंडून हे शब्द निघाले,
‘‘खरोखरच आदरणीय येशू मसीह(अ.) असेच होते, जसे तुमच्या प्रेषित मुहम्मद(स.) यांनी वर्णन केले.’’ असे म्हणून त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. आता तो आपल्या लष्कराकडे परत जाऊ इच्छित नव्हता. परंतु अबू उबैदा(र.)यांनी त्यास इस्लामी लष्कराच्या दूतासोबत अर्थात माननीय खालिद बिन वलीद(र.)सोबत त्यास रोमन सेनापती ‘बाहान’कडे पाठविले. ‘बाहान’ने त्यांचा विशेष सत्कार करून बसण्याची विनंती केली. मग ‘बाहान’ खालिद बिन वलीद(र.)यांना येशू मसीह(अ.) यांची प्रशंसा करून म्हणाला,

‘‘आमचा बादशाह जगाच्या संपूर्ण बादशाहांचा सम्राट आणि आमचे राष्ट्र जगाच्या सर्व राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ आहे.’’ माननीय खालिद बिन वलीद(र.)त्याचे वाक्य न संपताच म्हणाले,

‘‘तुम्ही तुमच्या जागी आपल्या राजाला काहीही समजा, परंतु आम्ही ज्याला आपला प्रमुख नेमला आहे, त्याच्या मनात स्वतः बादशाह असण्याचा थोडा जरी विचार आला, तर आम्ही त्यास तत्काळ पदच्युत करु.’’ ‘बहान’ परत म्हणाला, ‘‘आमच्या या सुखी आणि समृद्ध देशात तुमचे अरब लोक खूप शांती व समृद्धतेने नांदत आहेत. आम्ही त्यांच्याशी नेहमीच बंधुभाव आणि कृपापूर्ण वर्तन केले. त्यांना कधीच दुखावले नाही. म्हणून तुम्ही आमचे आभार मानावयास हवे होते. परंतु तुम्ही उलट आमच्यावरच हल्ले चढवून आमचे उपकार आणि सौजन्य धुळीस मिळविले. कदाचित तुम्हाला कल्पना नाही की, तुमच्या पूर्वीसुद्धा बर्याच लोकांनी आमच्या देशावर हल्ले केले, परंतु त्यांना आमच्या अतिप्रबळ शक्तीसमोर नामुष्की पत्करावी लागली. मग शेवटी तुमच्यासारखे दुर्बल आणि तुटपुंजे हत्यार व कमी संख्याबळ असलेले लोक आमच्यावर कसा विजय मिळवू शकतील? ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही आमच्यावर जी आक्रमणे केली, ती तुमची दुर्बल परिस्थिती पाहून आम्ही तुम्हाला माफ करतो. झाले गेले विसरून जा. तुम्ही आमचा देश रिकामा करा. आम्ही तुम्हास आणि तुमच्या प्रत्येक सेनापतीस प्रत्येकी दहा हजार दिरहम आणि प्रत्येक अधिकार्यास प्रत्येकी एक हजार दिरहम आणि प्रत्येक शिपायास शंभर शंभर दिरहम देऊ.’’

बाहानचे भाषण संपल्यावर माननीय खालिद बिन वलीद(र.)म्हणाले,
‘‘परम दयाळू आणि कृपाळू ईश्वराच्या नावे,
तुम्ही आपल्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे जे वर्णन केले आहे, ते आम्हास चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. तुम्ही आपल्या शेजारील अरब राष्ट्राशी जे वर्तन केले तेदेखील आम्हास चांगले ठाऊक आहे. परंतु तुमचे हे वर्तन त्यांच्यावर उपकारासाठी नसून ते तुमच्या राज्याच्या स्थैर्य आणि धर्मप्रचारासाठी होते. याचाच परिणाम आहे की, त्यांच्यापैकी बर्याच लोकांनी तुमचा धर्म स्वीकारला आणि ते तुमच्याबरोबर येऊन आमच्या विरोधात उतरले.

हे खरे आहे की, आमच्याजवळ परिपूर्ण हत्यारे नाहीत आणि आर्थिकरीत्या आम्ही दुर्बल आहोत. इस्लामपूर्व काळात आम्ही भ्रष्ट वर्तनाचे होतो. एका ईश्वरास सोडून अनेक विभूतींची पूजा करीत होतो. आपसात खूप भांडत होतो आणि रक्तपात करीत होतो. परंतु शेवटी ईश्वरास आमची दया आली आणि त्याने आमच्यापैकीच एक प्रेषित(आदरणीय मुहम्मद(स.)) आमच्याकडे पाठविला. तो आमच्यापैकी सर्वांत जास्त प्रामाणिक, दानशूर आणि सद्वर्तनी आणि पवित्र चारित्र्याचा होता. त्याने आम्हास केवळ एकमेव ईश्वराच्या दासत्वाकडे हाक दिली. तसेच त्याने असादेखील आदेश दिला की, आम्ही त्याच्या धर्माचा सर्वत्र प्रचार करावा. ज्याने हा धर्म स्वीकारला, तो आमचा बंधु झाला, ज्याने धर्म स्वीकारला नाही आणि ‘जिझिया’(कर) दिला, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर असेल आणि ज्याने या दोन्ही प्रस्तावांचा इन्कार केला, त्याने असे समजण्यास हरकत नाही की, त्याचा संबंध अशा लोकांशी आला, जे मृत्यूवर एवढे प्रेम करतात, जेवढे तुम्ही जीवनाशी प्रेम करता.

अवघे विश्व ईश्वराचे आहे. तो वाटेल त्यास देतो, परंतु खबरदार! शेवटी तेच लोक यशस्वी होतात जे ईशपरायण असतात.’’

खालिद बिन वलीद(र.)यांचे भाषण ऐकून ‘बाहान’ म्हणाला,
‘‘आम्ही तुमचा धर्म स्वीकारणार नाही व तुम्हीदेखील आमचा धर्म स्वीकारू नका. आम्ही ‘जिझिया’ देखील देणार नाही. कारण आम्ही ‘जिझिया’ घेत असतो, देत नाही.’’

एकूणरीत्या ही तडजोडीची बोलणी फिस्कटली आणि दोन्ही फौजांत तुबळ युद्धाची सुरुवात झाली. या रक्तरंजित युद्धात हजारो रोमन सैनिक ठार झाले. इस्लामी लष्कराचेही शेकडो सैनिक हुतात्मे झाले. रोमन साम्राज्याविरुद्ध हे एक निर्णायक युद्ध होते. इस्लामी लष्कराने आपले प्राण पणाला लावून रोमन साम्राज्याचा दणदणीत पराभव केला. या युद्धात रोमचे निम्मे सैनिक ठार झाले आणि यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच सैन्य गोळा होऊ शकले नाहीत. रोमन सम्राटास पराभवाची वार्ता मिळताच त्याने तत्काळ ‘सीरिया’ देश सोडून ‘कॉन्स्टॅटिनोपाल’कडे पळ काढला आणि हा संपूर्ण भाग इस्लामी राज्याच्या अंमलाखाली आला.

‘यरमूक’च्या या निर्णायक युद्धानंतर इस्लामी लष्कराचे सरसेनापती माननीय अबू उबैदा बिन जर्राह(र.)यांनी खालिद बिन वलीद(र.)यांना ‘कन्सरीन’ चा भाग जिकण्याच्या मोहिमेवर रवाना केले. वाटेत त्यांना एका रोमन लष्कराचा सामना करावा लागला. खालिद बिन वलीद(र.)त्या लष्करास पराभूत करून पुढे निघाले. ‘कन्सरीन’ च्या लष्कराने किल्ल्यात आश्रय घेऊन काही दिवस इस्लामी लष्कराचा सामना केला. परंतु अखेर त्यांनी तडजोडीची विनंती करून हे शहर इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आले. याबरोबरच इस्लामी लष्कराने हलब, अन्ताकिया, मिनबज, मरअश, हिस्नहरीस आणि इतर बरेच प्रदेश बळकावले. यानंतर इस्लामी लष्कराने आपले सर्वांत महत्त्वाचे आणि अंतिम उद्दिष्ट अर्थात ‘बैतुल मुकद्दस’(पवित्र स्थळ) अर्थात ‘मस्जिद-ए-अक्सा’ वर विजय मिळविण्याकडे आपले लक्ष वळविले. ही मस्जिद ‘यरुशलेम’ या शहरात होती आणि आजही आहे. इस्लामी लष्कराने यरुशलेम शहरास पूर्ण वेढा घातला. ख्रिश्चन धर्मियांनी इस्लामी लष्कराशी सामना करण्याचा मूर्खपणा केला नाही. त्यांनी पूर्वी पत्करलेल्या पराभवांची नामुष्की चांगलीच भोगली होती. ते मानसिकरीत्या आधीच खचलेले असल्याने त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव सादर केला. परंतु त्यांनी अशी अट घातली की, इस्लामी राज्याचे शासक स्वतः बोलणीकरिता यावेत. त्यामुळे सरसेनापती अबू उबैदा(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांना या अटीचे सविस्तर पत्र धाडले. हे स्थळ मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचे आणि पवित्र आहे. याच ठिकाणाहून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना ईश्वराने आपल्या भेटीकरिता बोलाविले होते. ख्रिश्चन लोकांकडून कोणताच प्रतिकार न होता हे स्थळ इस्लामी शासनाच्या स्वाधीन होत असल्याने माननीय उमर फारुक(र.)येथे येण्यास स्वखुशीने राजी झाले. हिजरी सन १६ च्या ‘रजब’ महिन्यात आपल्यासोबत काही प्रेषित सोबत्यांना घेऊन ते इस्लामी राजधानी ‘मदीना’ येथून निघाले. ‘जाबिया’ या ठिकाणी पोहोचताच माननीय खालिद बिन वलीद(र.), यजीद बिन अबुसुफयान(र.)आणि इतर दुसरे लष्करी अधिकारी त्यांच्या आगमनाची वाट पाहातच होते. त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते ‘बैतुल मुकद्दस’ येथे पोहोचले आणि त्यांनी तहाच्या करारावर सही केली व ख्रिश्चन धर्मियांच्या स्वाधीन केले. ख्रिश्चन धर्मियांनी हे सुरक्षापत्र घेऊन मोठ्या आनंदाने ‘यरुशलेम’ शहर मुस्लिमांच्या स्वाधीन केले. हिजरी सन १७ मध्ये रोमन सम्राट ‘हरकल’ याने ‘हमस’ या शहरावर परत एकदा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु इस्लामी लष्कराने मोठ्या कौशल्याने हे युद्ध जिकले आणि यानंतर कधीच रोमन लष्कराने स्वतःहून इस्लामी लष्कराशी भिडण्याचा विचारही मनात येऊ दिला नाही. हा त्यांचा शेवटचा हल्ला होता.

माननीय खालिद बिन वलीद(र.)हे केवळ एक शूर योद्धेच नसून ते अतिशय अभ्यासु वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची बरीच वचने त्यांनी कथन केली आहेत. तसेच त्यांच्यात इस्लामी विधीचीसुद्धा प्रचंड जाण होती. खालिद बिन वलीद(र.)यांच्यात उच्चनीतिमत्ता, धर्मयुद्धाची अतिप्रचंड प्रेरणा, आदरणीय प्रेषितांवर असीम श्रद्धा व प्रेम आणि त्यांचा अपार आदर, शौर्य, सत्यनिष्ठा आणि दानशूरता यासारखे अगणित गुणधर्म होते. ते अतिशय शूर योद्धे आणि अतिशय कोमल हृदयी, दयाळू आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्यात उत्तम वक्तृत्व कला होती. लष्करासमोर आवेशपूर्ण भाषणामुळे लष्कराच्या अंगात नवीन स्फूर्ती निर्माण करण्याचे त्याचे कसब अप्रतिम होते. आपल्यापेक्षा दुर्बलावर ते कधीच हल्ला करीत नसत. सत्य प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवसमाजास मानवीय बंधनाच्या अत्याचारी जोखडातून मुक्त करून शांती व समृद्धीची हमी देणार्या इस्लामी छत्रछायेत आणण्याकरिता त्यांनी धर्मयुद्धासाठी आपले अवघे जीवन समर्पित केले. यासाठी त्यांनी आपल्या जीवनात तीनशे लढाया लढल्या. यापैकी एकाही लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला नाही. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमांचे व्रण होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक रात्र त्यांनी मानवजातीस अन्याय व अत्याचारातून मुक्त करण्याच्या काळजीत खर्च केली. रणांगणांवर वीरमरण पत्करण्याची त्यांची अतितीव्र इच्छा होती. परंतु जगात असे हत्यारच मुळी निर्माण झाले नव्हते, जे ‘सैफुल्लाह’(ईश्वराची तलवार) अर्थात खालिद बिन वलीद(र.)यांना ठार करील.

खालिद बिन वलीद(र.)यांनी विजय मिळविलेल्या शहराच्या रहिवाशांशी ते अत्यंत प्रेमळ वर्तन करीत. त्यांची दानशूरता आणि मृदुस्वभाव पाहून पराभूत जनता तोंडात बोटे घालीत असे आणि ईशदरबारी प्रार्थना करीत की, ‘ईश्वरा! यासारखा सेनापती आम्हास आजीवन लाभू दे!’ खालिद बिन वलीद(र.)हे दुर्बल, याचक, अनाथ, वृद्ध, अपंग, गरीब, दीन, लाचार आणि विधवा यांच्यावर विशेष कृपा व दयचे वर्तन करीत आणि त्यांना सढळ हाताने मदत करीत.

खालिद बिन वलीद(र.)यांच्या शौर्याची व दानशूरतेची प्रशंसा स्वतः आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) करीत आणि ही खालिद बिन वलीद(र.)यांच्याकरिता मोठीच सौभाग्याची बाब होय. आदरणीय प्रेषितांनीच त्यांना ‘सैफुल्लाह’(ईश्वराची तलवार) चा किताब बहाल केला होता.

त्यामुळे आपण ईशदरबारी प्रार्थना करू या की, या थोर आणि अतिबलाढ्य, मृदुस्वभावी, सत्यनिष्ठ, दानशूर, अन्याय व असत्यावर तलवार खेचणारा परमवीर धर्मयोद्धा की ज्याचा ऐतिहासिक कारनामा सूर्याप्रमाणे संपूर्ण विश्वास प्रकाशित करणारा आहे. त्यांच्यावर ईश्वरीय कृपांचा वर्षाव होवो आणि त्याचे गुणधर्म अंगीकारण्याची आपणां सर्वांना सद्बुद्धी मिळो!

संबंधित लेख

  • इस्लामचा क्रांतिकारी अर्थ

    मानवतेच्या विकासामध्ये अडसर बनणाऱ्या व त्याला सन्मार्गांपासून रोखणाऱ्या, हरप्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन स्वातंत्र्य देण्याचे नाव इस्लाम आहे, असे एका वाक्यात आम्ही म्हणून शकतो. माणसांचे प्राण, संपत्ती, अब्रू, स्वाभिमान तसेच आत्मविश्वास या सर्वांची लूट करणाऱ्या हुकूमशहापासून तसेच अन्याय व अत्याचार करणाऱ्यापासून मुक्तीचा हा संदेश आहे. इस्लाम मानवाला शिकवितो की सत्तेचा खराखुरा स्वामी अल्लाह आणि अल्लाहच आहे. तोच मानवाचा खराखुरा शासक आहे, सारी प्रजा त्यानेच निर्माण केलेली आहे.
  • इस्लामी शिक्षांवरील आक्षेपांचा आढावा

    इस्लामी कायद्याने निश्चित केलेल्या शिक्षा या अत्यंत निष्ठूर, निर्दयी, क्रूर स्वरुपाच्या आहेत. त्यात दया-माया नावाची बाबच नाही. अशा ना-ना प्रकारचे आक्षेप घेऊन विरोधकांनी रान उठविले. मात्र विरोधकांच्या आक्षेपांमध्ये किती तथ्य आहे, याचा आपण अगदी निष्पक्षपणे आढावा घेणार आहोत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]