Islam Darshan

माननीय अब्दुलाह बिन जुबैर(र.)

Published : Sunday, Mar 06, 2016

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडून स्थलांतराचा आदेश मिळताच वर्षानुवर्षे इस्लामद्रोह्यांच्याअत्याचारांना बळी पडलेले बरेचसे प्रेषितसोबती आपले घरदार आणि मातृभूमीचा त्याग करून मदीना शहरी स्थलांतरित झाले. नंतर काही काळ लोटताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हेसुद्धा मदीना शहरी स्थायिक झाले आणि अरब प्रदेशाचे हे प्राचीन शहर प्रेषितमय झाले. योगायोग असा झाला की, मुहाजिरीन(अर्थात स्थलांतररित) पैकी कोणालाच बर्याच दिवसांपर्यंत मूलबाळ झाले नाही. या शहरातील अतिशय नालायक असलेल्या यहूदी(‘ज्यू’) लोकांनी असा गवगवा केला की, आम्ही मुस्लिम समुदायावर जादू केल्याने त्यांना मुलबाळ होत नाही. ज्या वेळी यहूदी लोकांचा प्रोपगंडा जोर धरीत होता. नेमक्या त्याच वेळी माननीय जुबैर(र.)या मुहाजिर सोबत्यांच्या घरी एक गोंडस बाळ जन्मले. संपूर्ण मदीना शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि यहूदी लोकांचा प्रोपगंडा आणि उपद्रव शमला. हे बाळ आदरणीय प्रेषितांकडे आणण्यात आले. प्रेषितांनी त्यास आशीर्वाद दिला. हे ते सौभाग्यवान मूल आहे, ज्याच्या जन्मावर संपूर्ण मदीना शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आणि आदरणीय प्रेषितांनी आशीर्वाद दिला, याच मुलाचे नाव माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे होय.

माननीय इब्ने जुबैर अर्थात अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे इस्लामी इतिहासातील अतिशय मान्यवर आणि थोर व्यक्तिमत्व होय. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या स्वर्गवासानंतर त्यांचे वय केवळ दहा वर्षेच असले, तरी ज्ञान-विज्ञान, युद्धकौशल्य, उच्च नैतिकता, नेतृत्व आणि शौर्य यासारख्या इतर गुणांनी ते सर्वगुणसंपन्न होते. ते कुरैश परिवाराच्या ‘असद’ कुटुंबीयाचे सुपुत्र होत. माननीय इब्ने जुबैर(र.)हे माननीय जुबैर बिन अवाम(र.)यांचे सुपुत्र होते. त्यांचे पितावर्य माननीय जुबैर(र.)हे प्रेषितसोबत्यांच्या दशसोबत्यांपैकी एक होते, ज्यांना प्रेषितांनी स्वर्गप्राप्तीची खूशखबर आधीच दिली होती. तसेच ते आदरणीय प्रेषितांच्या भार्या सन्माननीय खदीजा(र.)यांचे सख्खे पुतणे होते. अशा प्रकारे माननीय जुबैर बिन अवाम(र.)हे आदरणीय प्रेषितांचे मावस भाऊसुद्धा होते.

अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे माननीय अबू बकर(र.)यांचे नातूदेखील आहेत. त्यांच्या आईचे नाव सन्माननीय अस्मा(र.)असून त्या अबू बकर(र.)यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. आदरणीय प्रेषितांची अंतिम भार्या सन्माननीय आयशा(र.)या अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांच्या मावशी आहेत. यावरून आई आणि वडील दोन्ही नात्याने ते प्रेषितांचे नातलग आहेत.

माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे हिजरी सन २ मध्ये जन्मले. ते आठ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी प्रेषित मुहम्मद(स.) यांना विनंती केली की, ‘‘हे प्रेषिता! माझ्या या सपुत्रास इस्लाम धर्माची दीक्षा द्यावी.’’ आदरणीय प्रेषितांनी अब्दुल्लाह या गोंडस कुमारास स्मितहास्य केले आणि मग मोठ्या प्रेमभावाने त्यांना इस्लामची दीक्षा दिली. माननीय इब्ने जुबैर अर्थात अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे आपली मावशी आणि प्रेषितभार्या आयशा(र.)यांचे लाडके भाचे असल्याने त्यांचा जास्त वेळ प्रेषितांच्याच घरी व्यतीत होत असे. म्हणूनच त्यांनी प्रत्यक्षपणे आदरणीय प्रेषितांकडे इस्लाम धर्माचे ज्ञानार्जन केले.

माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे लहानपणापासूनच अतिशय निर्भीड आणि शूर होते. भय वा भीती नावाचा गुणधर्मच जणू त्यांच्यात नव्हता. ‘खंदक’ च्या युद्धाच्या वेळी त्यांचे वय अगदीच कमी असतानासुद्धा ते एका अतिशय उंच असलेल्या पर्वताच्या शेंडीवर जाऊन बसले आणि पूर्ण युद्धाचे दृश्य डोळ्यांनी पाहिले.

एकदा ते आपल्या सवंगड्यांसोबत असताना कोणीतरी मस्करीने या मुलांना भयांकित करण्यासाठी भीतीदायक डरकाळी फोडली. त्या डरकाळीच्या आवाजाने सर्व मुले घाबरून पळून गेली, परंतु इब्ने जुबैर(र.)न घाबरता तेथेच उभे राहिले. मग त्यांनी आपल्या पळालेल्या सवंगड्यांना परत बोलावून सांगितले की, ‘मी तुमचे नेतृत्व करतो. आपण त्या डरकाळी देणार्या माणसास धडा शिकवू या. मग या कुमारवयीन इब्े जुबैर(र.)च्या नेतृत्वाखाली सर्वांनी त्यास त्यास झोडपून काढले.

माननीय उमर फारूक(र.)यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय वजनदार होते. शहरातील प्रत्येकजण त्यांना घाबरत असे. लहान मुले, तर त्यांना पाहताच पळ काढीत असत. एके दिवशी इब्ने जुबैर(र.)आपल्या सवंगड्यांसह खेळत होते. तेवढयात माननीय उमर फारुक(र.)रस्त्याने येऊ लागले. त्यांना पाहताच मुलांनी आपले खेळ जागीच सोडून पळ काढला. परंतु इब्ने जुबैर(र.)मात्र तेथेच थांबले. माननीय उमर फारूक(र.)यांनी त्यांना विचारले, ‘‘हे मुला! तू पळाला का नाहीस?’’

‘‘मी कशासाठी पळणार? मी कोणतीच खोडी केलेली नाही ,"तसेच जाण्यासाठी तुमचा रस्तादेखील अडविला नाही.’’ इब्ने जुबैर(र.)यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यांचे बालवयातले हे उत्तर ऐकून माननीय उमर फारुक(र.)यांना मनोमन आनंद झाला आणि ते त्या कोवळ्या मुलाच्या धैर्यशील वर्तनावर मनातल्या मनात हसतच तेथून चालते झाले.

माननीय इब्ने जुबैर(र.)हे प्रेषितकाळात व अबू बकर(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात वयाने लहान असल्याने युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु माननीय उमर फारुक(र.)यांच्या शासनकाळात आपले वडील जुबैर(र.)यांच्यासोबत ते ‘यरमूक’ च्या लढाईत सहभागी झाले.(हिजरी सन या वेळी त्यांचे वय केवळ पंधरा वर्षाचेच असल्याने आणि युद्धाचा व रणभूमीचा अनुभव नसल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना घोड्यावर स्वार केले आणि एका दणकट शिपायास त्यांच्या रक्षणास्तव नेमले.

हिजरी सन १९ मध्ये माननीय उमर फारुक(र.)यांनी माननीय इब्नुल आस(र.)यांच्या मदतीसाठी एक आगाऊ कुमक इजिप्तकडे रवाना केली. इब्ने जुबैर(र.)यांचे वडील माननीय जुबैर(र.)सुद्धा या फौजेत सामील होते. त्यांनी जाताजाता आपले पुत्र इब्ने जुबैर(र.)यांना देखील सोबत घेतले. यामुळे इजिप्तच्या बर्याच युद्धामध्ये इब्ने जुबैर(र.)हे सामील राहिले. इजिप्तहून परतल्यावर त्यांनी आपला वेळ ज्ञानार्जनात खर्च केला. हिजरी सन २४ मध्ये माननीय उमर फारुक(र.)यांची हत्या झाल्यावर माननीय उस्मान(र.)त्यांच्या ठिकाणी इस्लामी शासक झाले. हिजरी सन २६ मध्ये माननीय उस्मान गनी(र.)यांनी इब्ने साअद ‘तराबलस’ वर चढाई करण्यासाठी ‘आफ्रिकया’ ला पाठविले.(अफ्रिकया म्हणजे त्या काळात ‘लीबिया, ‘अलजझायर’ आणि ‘मोरॅक्को’ वर पसरलेल्या भागास म्हटले जात असे.)

तराबलसचा शासक हा ‘एक्सर्च ग्रेगोरी’ असून तो ख्रिश्चन धर्मिय होता. तो युद्धकौशल्यातही पारंगत होता. त्याने एक लाख वीस हजारांचे प्रचंड लष्कर मुस्लिम लष्कराचा सामना करण्यासाठी आणले. त्याची एक ‘फिल्पाना’ नावाची मुलगी अत्यंत सुंदर व देखणी होती. सौंदर्याबरोबरच ती युद्धकलेतही खूप पटाईत होती. ती आपल्या पित्याबरोबरच घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरली. बर्याच दिवसांपर्यंत दोन्ही लष्करादरम्यान युद्ध झाले. परंतु कोणत्याच पक्षाला निर्णायक यश मिळाले नाही. ग्रेगोरी बादशाहने जाहीर आवाहन केले होते की, ‘‘जो कोणी मुस्लिमांच्या लष्करप्रमुखाचे शीर कापून माझ्या समोर हजर करील, त्यास एक लाख दिरहम आणि आपली ही शूर मुलगी देईन.’’ या आवहानामुळे ख्रिश्चन लष्कराचे धैर्य वाढले आणि बरेचसे ख्रिश्चन लष्कराचे शिपाई मुस्लिम सेनापती ‘इब्ने साअद’ यांच्या मागावर असत. इतक्या दिवसांपासून युद्ध सुरु असूनसुद्धा लढाई कोणत्याच निर्णयावर पोहोचत नव्हती आणि तिकडे इस्लामी शासक माननीय उस्मान(र.)यांना देखील युद्ध परिस्थितीची कोणतीच माहिती मिळत नसल्याने तेदेखील काळजीत होते. शेवटी माननीय उस्मान(र.)यांनी माननीय इब्ने जुबैर(र.)या तरुण लष्करप्रमुखांच्या नेतृत्वाखाली एक कुमक ‘तराबलस’ कडे रवाना केली. इब्ने जुबैर(र.)हे रणभूमीवर पोहोचताच मुस्लिम लष्कराच्या शिपायात खूप जल्लोष निर्माण झाला. याची वार्ता ग्रेगोरी बादशाहलादेखील मिळाली. इब्ने जुबैर(र.)यांनी येताच सर्व प्रथम लढाईचे वेळापत्रक तयार केले. त्यांनी सकाळ ते दुपार ही वेळ युद्धाकरिता निश्चित केली. इब्ने जुबैर(र.)यांच्या सल्ल्याने इस्लामी लष्कराच्या प्रमुखाने जाहीर सूचना दिली की, जो माणूस ग्रेगोरी राजाचे मुंडके आणून देईल, त्यास एक लाख रोकड आणि सोबत ‘ग्रेगोरी’ ची कन्यादेखील देण्यात येईल. या जाहीर आवाहनामुळे इस्लामी लष्करात नवचैतन्य निर्माण आवश्य झाले, तरी देखील युद्धाचा निर्णयच लागत नव्हता.

माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी एक युक्ती ‘इब्ने साअद’ यांना सांगितली, ती अशी की, ‘दुसर्या दिवशी इस्लामी लष्कराचे काही तरूण आपण रणांगणातून आणा, त्यांच्याच तंबूमध्ये माघारी ठेवा. दुपारच्या वेळी युद्ध संपते वेळी जेव्हा शत्रुची फौज थकलेली असते. ऐन त्याच क्षणी हे ताजेतवाने तरुण शत्रू फौजेवर हल्ला चढवतील.’ लष्करप्रमुखास ही युक्ती आवडली आणि ठरल्याप्रमाणे लढतालढता ऐन शत्रूफौज थकून गेलेली असताना इब्ने जुबैर(र.)यांनी माघारी राखीव ठेवलेल्या लष्कराच्या तरूणांना घेऊन एक जोरदार हल्ला चढविला. शत्रूचे सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. या हल्ल्यात राजा ‘ग्रेगोरी’ यास इब्ने जुबैर(र.)यांनी ठार केले आणि त्याची कन्या इब्ने जुबैर(र.)यांच्या वाट्याला आली. त्यांनी तिच्याशी लग्न केले की नाही, या बाबतीत इतिहासात स्पष्ट संकेत मिळत नाही. परंतु माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्या युक्तीमुळे शत्रूचा भूभाग इस्लामी सीमांना जोडला गेला. यासंपूर्ण युद्धांत इब्ने जुबैर(र.)यांनी आपल्या युद्धकौशल्याचे दर्शन घडविले आणि आपल्या शौर्याची सर्वत्र धाक बसविली.(संदर्भ : दायरए मआरिफ-ए-इस्लामिया)

माननीय इब्ने जुबैर(र.)विजयाची वार्ता मदीना शहरी घेऊन आले व त्यांनी या मोहिमेचे वर्णन अतिशय व्यवस्थितपणे मांडले. हिजरी सन २९ ते ३० च्या दरम्यान माननीय सईद बिन आस(र.)यांच्या नेतृत्वाखाली इस्लामी लष्कराने तिब्रिस्तान(उत्तर ईराण) वर चढाई केली, तेव्हा इब्ने जुबैर हेसुद्धा त्या लष्करात सामील झाले व बर्याच लढायांमध्ये आपले शौर्य पणाला लावले. तिब्रिस्तानची मोहीम पार पाडून आल्यानंतर इस्लामी शासक माननीय उस्मान(र.)यांनी त्यांना कुरआन एकत्रीकरणाच्या परिषदेचे सभासद म्हणून नेमले. माननीय इब्ने जुबैर(र.)यांचे या वेळी केवळ तीस वर्षेच वय होते. तरी परंतु त्यांचा अभ्यास व अनुभव वरिष्ठांसारखा होता.

माननीय उस्मान(र.)या इस्लामी शासकाविरुद्ध जेव्हा काही बंडखोरांनी उपद्रव माजविला तेव्हा इब्ने जुबैर(र.)यांनी प्राण पणाला लावून त्यांचे रक्षण करण्याचा निर्धार केला. परंतु इस्लामी शासक माननीय उस्मान(र.)यांनी त्यांना ईश्वराची शपथ देऊन गप्प बसविले. तरी देखील यांनी गुपचूपपणे माननीय उस्मान(र.)यांच्या निवास्थानावर आपल्या काही सवंगड्यांना घेऊन पहारा दिला. चाळीसाव्या दिवशी बंडखोरांनी त्यांच्या घराच्या मागील भितीवरून येऊन त्यांना ठार केले. वयोवृद्ध असलेले इस्लामी शासक उस्मान(र.)यांनी स्वतःचे प्राण दिले, परंतु बंडखोरांचे बंड मोडीत काढण्याची आणि दोन समुदायांतील लोकांचे रक्त सांडण्याची मुळीच परवानगी दिली नाही. या थोर आणि महान इस्लामी शासकाच्या हौतात्म्यानंतर माननीय अली बिन अबुतालिब(र.)यांनी इस्लामी शासनाची धुरा सांभाळली.

हिजरी सन ४० मध्ये रमजानच्या महिन्यात इस्लामचे चौथे शासक माननीय अली(र.)हेदेखील हुतात्मा झाले. माननीय अली(र.)यांच्यानंतर माननीय हसन(र.)हे इस्लामी शासक झाले. परंतु काही परिस्थितीस्तव त्यांनी इस्लामी शासनाची धुरा अमीर मआविया(र.)यांच्याकडे सोपविली. अमीर मआविया(र.)यांच्या शासनकाळात इब्ने जुबैर(र.)हे एकांतवासातच राहिले आणि राजकारणापासून अगदी अलिप्त राहिले. त्यांच्याकडे भरपूर वडिलोपार्जित संपत्ती होती. शिवाय त्यांचा व्यापारसुद्धा चांगला असल्याने त्यांना कोणतीच आर्थिक समस्या नव्हती. हिजरी सन ४९-५० मध्ये माननीय अमीर मआविया(र.)यांनी रोम सम्राटाची राजधानी असलेल्या ‘कॉन्स्टॅटिनोपल’ शहरावर लष्करी हल्ला केला. तेव्हा माननीय इब्ने जुबैर(र.)सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले. या मोहिमेवरून परत आल्यावर ते तटस्थ आणि राजकारणापासून अलिप्त राहिले. माननीय अमीर मआविया(र.)यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच आपला मुलगा ‘यजीद’ यास शासनाचा वारसदार निश्चित केले आणि जनतेस ‘यजीद’ चे शासन स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. परंतु माननीय इब्ने जुबैर(र.), माननीय अब्दुर्रहमान बिन अबू बकर(र.), अब्दुल्लाह बिन उमर(र.)आणि हुसैन बिन अली(र.)यांनी कडाडून विरोध केला. माननीय अमीर मआबिया(र.)या मंडळींचे मन वळविण्यासाठी स्वतःहून मदीना शहरी पोहोचले. माननीय अमीर मआविया(र.)यांच्याशी बोलणी करण्यासाठी या चारही जणांनी माननीय इब्ने जुबैर(र.)यांना आपले प्रतिनिधी बनविले. माननीय मआविया(र.)आणि इब्ने जुबैर(र.)यांच्यात झालेली बोलणी ही अशा प्रकारे झाली.

अमीर मआविया : तुम्ही माझे नातलग आहात व तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी तुमच्याशी नेहमी चांगला व्यवहार केला. ‘यजीद’(अर्थात भावी शासक) तुमचा नात्याने बंधुसुद्धा आहे. आपसातील भांडणतंट्यापासून मुस्लिमांना वाचविण्यास्तव मी हा निर्णय घेत असून तुम्हीसुद्धा ‘यजीद’च्या बाजूने अभिप्राय द्यावा. वाटल्यास शासनाचे अधिकार तुम्ही स्वतःच्या हातीच ठेवा.

इब्ने जुबैर : हे अमीर! आम्ही आपल्यासमोर तीन प्रस्ताव ठेवीत आहोत. या तिन्हींपैकी कोणताही एक प्रस्ताव आपण स्वीकारावा. पहिला प्रस्ताव असा की, आदरणीय प्रेषितांप्रमाणेच आपणही कोणाचेच नाव सुचवू नये. आपल्या मृत्यूनंतर जनता स्वतःच आपला शासक निवडील. दुसरा पर्याय हा की, माननीय अबू बकर(र.)यांच्याप्रमाणे आपल्या नातलगांपैकी नसलेला वारसदार निवडावा. तिसरा पर्याय हा की, माननीय उमर(र.)यांच्याप्रमाणे काही जणांची परिषद नेमून त्यांना इस्लामी शासनाचा उत्तराधिकारी निवडण्याचे अधिकार द्यावेत.

अमीर मआविया : आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यानंतर असे लोक होते की, ज्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार जनता करू शकत होती. म्हणूनच जनतेने माननीय अबू बकर(र.)यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. माननीय अबू बकर(र.)यांच्यानंतर माननीय उमर फारुक(र.)यांच्यासारखे मुत्सद्दी व कर्तबगार लोक होतेच, परंतु आता असे लोक बाकी राहिलेले नाहीत. तिसर्या स्वरुपाचा प्रस्ताव सद्यपरिस्थितीत लागू होण्यासारखा नाही. या प्रस्तावांव्यतिरिक्त चौथा प्रस्ताव असल्यास सांगा.

इब्ने जुबैर : नाही! चौथा प्रस्ताव कोणताच नाही.
अशा प्रकारच्या बोलणीनंतर अमीर मआविया(र.)यांनी त्यांच्या तिन्ही प्रस्तावांना न जुमानता ही बोलणी अनिर्णित ठेवली. सरतेशेवटी अमीर मआविया(र.)यांच्या मनात माननीय जुबैर(र.)यांच्याविषयी क्लेष निर्माण झाला आणि अखेर हिजरी सन ६० च्या रजब महिन्यात त्यांनी आपला सपुत्र ‘यजीद’ यास राजसत्तेचा वारसदार ठरविण्याचे मृत्यूपत्र तयार केले.

या मृत्यूपत्रात त्यांनी आपला सुपुत्र आणि भावी राजा ‘यजीद’ यास उद्देशून सूचना केली.

‘‘तुझ्या राज्यशासनात ‘कुरैश’ परिवाराच्या विधांकडून धोका असण्याची शक्यता आहे.

 1. माननीय हुसैन बिन अली(र.)
 2. अब्दुल्लाह बिन उमर(र.)आणि
 3. माननीय इब्ने जुबैर(र.).
 4. माननीय हुसैन(र.)यांना इराकवासी जनता एक ना एक दिवशी तुझ्याविरुद्ध बंड पुकारण्यास अवश्य भाग पाडतील. परंतु तू मात्र त्यांच्यावर(माननीय हुसैन(र.)यांच्यावर) ताबा मिळवून त्यांना अभय द्यावे. ते आदरणीय प्रेषितांचे लाडके नातू आणि आपलेदेखील नातलग असल्याने त्यांचे आपल्यावर अधिकार आहेत.

  अब्दुल्लाह बिन उमर(र.)हे राजकारणाच्या भानगडीत पडण्यासारखे नाहीत. मात्र इब्ने जुबैर(र.)यांच्याकडून तुला आणि तुझ्या राज्यास वास्तविक धोका आहे. हा माणूस कोल्ह्याची चाल चलून सिहासारखा तुझ्यावर हल्ला करेल. त्याच्यावर ताबा मिलविल्यावर त्यास जिवंत सोडू नकोस. मात्र त्याने तडजोड केली तर मुस्लिमांचे रक्त वाहू न देता तूसुद्धा त्यांच्याशी तडजोड करावी.’’

  अमीर मआविया(र.)मृत्यू पावले आणि त्यांचा मुलगा ‘यजीद’ हा राजसिहासनावर विराजमान झाला. ‘सीरिया’ च्या जनतेकडून आणि अरब देशातील बहुतेक जणांकडून अमीर मआविया(र.)यांनी आपल्या जीवनातच ‘यजीद’ च्या शासनाची स्वीकृती मिळविली होती. परंतु ‘यजीद’चे शासन नाकारणार्यांमध्ये माननीय हुसैन(र.)आणि माननीय इब्ने जुबैर(र.)हे दोघे होते. या दोघांकडे ‘यजीद’ला दुर्लक्ष करून चालण्यासारखे नव्हते. त्याने ‘मदीना’ शहराचा राज्यपाल ‘वलीद बिन उतबा’ यास आदेश पाठविला की, या दोघांची स्वीकृती घ्यावी. माननीय हुसैन(र.)यांनी मात्र या वेळेसही ठाम नकार दिला आणि माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी एका दिवसाची संधी मागितली आणि रातोरात आपल्या पूर्ण परिवारजणांस घेऊन मदीना शहरातून पलायन करून ‘मक्का’ शहरी दाखल झाले. मक्कावासियांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कारण मक्कावासी त्यांना खूप प्रेम करीत असत. तसेच ते इब्ने जुबैर(र.)यांच्या ईशपरायणता आणि पात्रतेने खूप प्रभावित होते. याच वेळी माननीय हुसैन(र.)हेसुद्धा ‘कूफा’ शहराकडे स्थलांतराच्या उद्देशाने मक्का शहरात दाखल झाले. माननीय इब्ने जुबैर(र.)यांना ही वार्ता मिळताच ते माननीय हुसैन(र.)यांच्याकडे आले व म्हणाले,

  ‘‘आपण याच शहरात स्थायिक व्हावे. येथूनच आपली नीती चालू ठेवावी. येथूनच आपले राजदूत इतर शहरात पाठवावेत आणि ‘कूफा’ व ‘इराक’ येथील समर्थकांनासुद्धा येथेच बोलवावे. अशा रितीने आपण आधी आपले समर्थन मजबूत करूनच ‘यजीद’ शासनाच्या राज्यपालास व राजदूतास बाहेर काढावे. मी आपली सर्वतोपरी मदत करीन. मला असे वाटते की आपण ‘मक्का’ शहरातच राहून ‘इस्लामी शासन’ घोषित करावे, कारण संपूर्ण जगातून मुस्लिम येथे ‘हज’ करण्यासाठी येतात. या प्रकारे काम केल्यास आपण अवश्य यशस्वी व्हाल.’’

  परंतु माननीय हुसैन(र.)यांनी ‘कूफा’ स स्थलांतराचा पक्का निश्चय केला होता. म्हणून त्यांनी इब्ने जुबैर(र.)यांचा सल्ला स्वीकारला नाही.

  त्याचप्रमाणे माननीय इब्ने अब्बास व इतर बर्याच जणांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपल्या परिवारजणांसह ‘कूफा’कडे स्थलांतराचा पक्का निर्धार केला. १० मोहर्रम हिजरी सन ६१ मध्ये माननीय हुसैन(र.)यांना ‘यजीद’च्या लष्कराने त्यांच्या परिवारजणांसमोर अत्यंत क्रूरतेने ठार केले. या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेची वार्ता माननीय इब्ने जुबैर(र.)यांना कळाली आणि ते खूपच व्यथित झाले. त्यांचे दुःख अनावर झाले. त्यांनी संपूर्ण मक्कावासियांना ‘मस्जिद-ए-हराम’ मध्ये गोळा करून आवेशपूर्ण शब्दांत भाषण दिले.

  ‘‘लोक हो! या जगाच्या पाठीवर ‘इराक’ पेक्षा दुर्दैवी आणि पूर्ण ‘इराक’मध्ये ‘कूफा’पेक्षा दुर्दैवी इतर कोणीच नसेल. कूफावासियांनी माननीय हुसैन यांना नेतृत्वाचा ध्वज हाती घेण्याची प्रेरणा देऊन ‘कूफा’ येथे बोलावले आणि ऐन वेळेवर त्यांनी माननीय हुसैन(र.)यांची साथ सोडून ‘यजीद’ च्या लष्कराची साथ दिली. ‘यजीद’च्या क्रूर आणि अविवेकी लष्कराने माननीय हुसैन(र.)यांना घेराव घालून मागणी केली की, ‘यजीद’ची सत्ता स्वीकारा आणि स्वतःला ‘इब्ने झियाद’ या लष्कर प्रमुखाच्या स्वाधीन करा, अन्यथा युद्धाकरिता तयार व्हा. ईश्वराची शपथ! माननीय हुसैन कडे शस्त्रेदेखील नव्हती. त्यांनी असत्याच्या नियमांवर आधारित असलेले ‘यजीद’ चे शासन ठोकरून लावले आणि त्याच्या असत्य शक्तीसमोर न झुकता त्यांनी वीरमरण पत्करले. मी तुम्हाला विचारतो की, माननीय हुसैन(र.)यांना ठार करणार्या जुलमी शासनास आपण कसे काय स्वीकारु शकाल? त्यांच्या राज्यप्रतिनिधींचा आदेश कसा स्वीकारता येईल?’’

  सर्वांनी एकमुखाने आवेशपूर्ण उत्तर दिले की,
  ‘‘मुळीच नाही!! कोणत्याही परिस्थितीत नाही!!!’’ यानंतर माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी पुन्हा समुदायास उद्देशून म्हटले,

  ‘‘लोक हो! ईश्वराची शपथ! या क्रूरकर्म्यांनी एका अशा महान व्यक्तीचा वध केला, जो दिवसा उपवास ठेवीत आणि रात्रीच्या वेळी नमाज अदा करीत असे. माननीय हुसैन(र.)हे मोठे ईशपरायण असून सर्वगुणसंपन्न होते. तेच इस्लामी शासनाची धुरा सांभाळण्यास पात्र होते. ईश्वराची शपथ! दारु पिणार्यापेक्षा उपवास ठेवणारे हुसैन(र.), नृत्याने मनोरंजन करणार्यांपेक्षा रात्रीच्या वेळी ईश्वरासमोर अश्रू ढाळणारे हुसैन(र.), मार्गभ्रष्टांपेक्षा दिव्य कुरआनचे मार्गदर्शन स्वीकारणारे हुसैन(र.), शिकारी कुत्र्यांच्या प्रशंसा करणांर्यापेक्षा ईशप्रशंसा करणारे हुसैन(र.)निश्चितच ईश्वरीय शासनाची धुरा सांभाळण्यास जास्त पात्र होते. ईश्वर त्या धोकेबाजांना कठोर शिक्षा देईल.’’

  भाषण देतादेताच इब्ने जुबैर(र.)यांना रडू कोसळले आणि सोबत सर्वच मक्कावासी दुःखाने विव्हळू लागले. ‘यजीद’ शासनाविरुद्ध संपूर्ण जनतेच्या मनात राग धुमसत होता. शेवटी आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी सर्वांनीच इब्ने जुबैर(र.)यांना म्हटले की,

  ‘‘माननीय हुसैन(र.)नंतर इस्लामी शासनाची धुरा सांभाळण्याची पात्रता केवळ आपणातच आहे. आपण हात पुढे करावा. आम्ही आपल्या शासनस्वीकृतीची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा करीत आहोत.’’

  सर्वांनी इब्ने जुबैर(र.)यांना इस्लामी शासनाची धुरा स्वाधीन केली.

  ‘यजीद’ ला जेव्हा या बंडखोरीची वार्ता मिळाली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला आणि त्याने मदीनाच्या राज्पालास इब्ने जुबैर(र.)यांच्या अटकेचे आदेश दिले. मदीनाच्या राज्यपालाने एक छोटीशी फौज इब्ने जुबैर(र.)यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठविली. परंतु इब्ने जुबैर(र.)यांनी त्यांना पिटाळून लावले आणि लष्कराच्या प्रमुखास अटक करून ठार कला. यानंतर माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी अधिकृतपणे ‘यजीद’ला पायउतार करण्याची शासकीय घोषणा केली. ही घोषणा ऐकताच मदीनावासीयांनीसुद्धा ‘यजीद’ च्या राजदूतास शहरातून काढून बाहेर केले, ‘इब्ने हन्जला(र.)’ आणि ‘इब्ने मलाइका’ यांना आपले स्थानिक प्रमुख बनविले. मदीना शहरातील बंड ठेचून काढण्यासाठी ‘यजीद’ याने ‘मुस्लिम बिन उतबा’ च्या नेतृत्वात लष्कर रवाना केले. या क्रूर लष्कराने तीन दिवस आणि तीन रात्रीपर्यंत मदीना शहरात रक्ताची आणि आगीची अक्षरशः होळी खेळली. यानंतर हे लष्कर घेऊन मक्काकडे इब्ने जुबैर(र.)यांना ताब्यात घेण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच मुस्लिम बिन उतबा मरण पावला आणि हसीन बिन नबीज हा लष्करप्रमुख झाला. त्याने मक्का शहराला वेढा देऊन ‘काबा’ वर दगडांचा वर्षाव केला. परंतु इब्ने जुबैर(र.)मोठ्या शौर्याने तोंड देत होते. स्वतः ‘हसीन बिन नबीज’ चे कथन आहे की, इब्ने जुबैर असे निघत होते, जसे झाडीतून सिह बाहेर येत आहे. दगडांच्या या वर्षावामध्येसुद्धा इब्ने जुबैर(र.)बाहेर येऊन शांतपणे नमाजसुद्धा अदा करीत असत.

  हे युद्ध चालू असतानाच हिजरी सना ६४ च्या रबिऊल अव्वल महिन्याच्या १४ तारखेस ‘यजीद’ मृत्यू पावला. ही वार्ता वार्यासारखी मक्का शहरात पोहोचली. ‘हसीन बिन नबीज’ ने युद्ध थांबवून इब्ने जुबैर(र.)यांना संदेश पाठविला की, ‘यजीद’च्या मृत्यूमुळे आता युद्ध चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आपण माझ्यासोबत सीरियाला यावे. मी तेथील जनतेस आपल्या हाती शासनाची धुरा सोपविण्याची विनंती करतो. निश्चितच तेथील जनता आपल्या शासनाचा स्वीकार करील. अशा रितीने संपूर्ण इस्लामी जगत आपल्या शासनाचा स्वीकार करील. आतापर्यंत तुमच्या आमच्या दरम्यान झालेल्या रक्तपातास्तव आम्हास क्षमा करावी.’’ परंतु माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि हसीन बिन नबीस आपले लष्कर परत घेऊन सीरियाला परतला.

  ‘यजीद’ ने पाठविलेल्या लष्कराने ‘पवित्र काबा’ वर दगडांच्या वर्षाव केल्यामुळे त्याची बरीच नासधूस झाली होती आणि ‘पवित्र काबा’ चा पूर्णपणे जीर्णोद्धार करणे आवश्यक होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या सुचनेनुसार इब्ने जुबैर(र.)यांनी ‘हतीम’चा भागसुद्धा ‘पवित्र काबास’ जोडला. या कामासाठी माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी खूप संपत्ती खर्च केली. यानंतर त्यांनी इमारतीच्या आतील व बाहेरील भितींना सुगंधित केल्या आणि पवित्र काबास उंची वस्त्राचा ‘गिलाफ’ चढविला. अशा प्रकारे पवित्र काबाची आदरणीय प्रेषितांच्या इच्छेनुसार त्यांनी पुनर्बांधणी केली.

  तिकडे ‘सीरिया’मध्ये ‘यजीद’च्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ‘मआविया’ राज- सिहासनावर आरूढ झाला. तो अतिशय मृदू स्वभावी आणि धार्मिक नीतीचा असल्याने त्यास उमैया परिवाराची अरेरावी राजनीती भोवली आणि लवकरच त्याने राजत्याग केला. यामुळे माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्या एकछत्री शासनाखाली संपूर्ण इस्लामी जगत आले. या काळात मात्र इब्ने जुबैर(र.)यांनी एक चूक केली. त्यांनी ‘यजीद’च्या शासनकाळातील शासनप्रतिनिधी आणि राजदूतास मदीना शहरातून पदभ्रष्ट घोषित करताना बाहेर काढते वेळेस ‘यजीद’च्या उमैया परिवाराचे सदस्य ‘मरवान बिन हकम’ आणि त्याचा मुलगा ‘अब्दुल मलिक बिन मरवान’ यांना देखील शहराबाहेर काढले. हे दोन्ही बापलेक मदीनाहून अपमानित होऊन सीरियाला आले आणि तेथील आपल्या परिवाराच्या प्रतिष्ठितांसमोर आपली व्यथा सांगून त्यांची सहानुभूती मिळविली. या सर्वांनी मिळून बदल्याच्या भावनेने पेटून इब्ने जुबैर(र.)यांच्या राजदूतास देशाबाहेर काढले आणि ‘मरवान बिन हकम’ यास आपला ‘राजा’ बनविले. शेवटी ‘मरवान बिन हकम’ हा एक हजार शिपायांचे सशस्त्र लष्कर घेऊन ‘मर्जे राहत’ या ठिकाणी असलेल्या ‘इब्ने जुबैर(र.)’ यांच्या लष्करी छावणीवर चाल करून आला. दोन्ही लष्करात काट्याची लढत झाली. परंतु अकस्मात होणार्या या हल्ल्यामध्ये इब्ने जुबैर(र.)यांच्या लष्कराला पराभव पत्करावा लागला आणि ‘मरवान बिन हकम’ या बंडखोराचे राज्य सीरियामध्ये प्रस्थापित झाले. लागलीच ‘मरवान बिन हकम’ याने इब्ने जुबैर(र.)यांच्या अधिपत्याखाली असलेला ‘इजिप्त’सुद्धा जिकून घेतला. अशा प्रकारे सीरिया व इजिप्तवर ‘मरवान बिन हकम’चे आणि अरब प्रदेश व इराक वर माननीय इब्ने जुबैर(र.)यांचे शासन प्रस्थापित झाले. ‘मरवान बिन हकम’ लवकरच मरण पावला व त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र अब्दुल मलिक बिन मरवान हिजरी सन ६५ मध्ये राजसिहासनावर आरूढ झाला.

  याच काळामध्ये माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ‘इराक’मध्ये ‘मुख्तार सख्फी’ याने इराकवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्याने माननीय हुसैन(र.)यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या नावावर जनतेस संघटित केले आणि या आंदोलनाचे ‘केंद्र’ कूफा शहरास बनविले. माननीय हुसैन(र.)यांच्या खुनाचा संताप जनतेमध्ये आधीपासूनच खदखदत होता. शिवाय उमैया परिवाराच्या शासक असलेल्या ‘यजीद’च्या लष्कराने त्यांचा निर्दयीपणे वध केला असल्याने जनता उमैया परिवाराचा तीव्र द्वेष करीत होती. याचा ‘मुख्तार सख्फी’ ने पुरेपूर फायदा उचलून लोकांना संघटित केले. अशा रितीने इराकमध्ये ‘मुख्तार सख्फी’च्या नेतृत्वाखाली इब्ने जुबैर(र.)यांच्याविरुद्ध जनतेने बंड केले आणि इब्ने जुबैर(र.)यांनी इराकमध्ये नेमलेल्या राज्यपालास हाकलून लावले. अशा प्रकारे ‘बसरा’ सोडून संपूर्ण इराक ‘मुख्तार सख्फी’ च्या नेतृत्वाखाली आले. यानंतर मुख्तार सख्फीने कर्बलाच्या ठिकाणी माननीय हुसैन(र.)यांना ठार मारणार्यांना यमसदनी धाडले. यानंतर त्याने एक मोठे लष्कर ‘उबैदुल्लाह इब्ने जयाद’ला ठेचून काढण्यासाठी ‘मोसुल’ या ठिकाणी रवाना केले. ‘उबैदुल्लाह’ हा माननीय हुसैन(र.)विरुद्ध लढणार्या लष्कराचा प्रमुख होता. यानेच माननीय हुसैन(र.)यांच्यावर लष्करी कारवाई केली होती. या युद्धात ‘मुख्तार सख्फी’ने पाठविलेल्या लष्कराने उबैदुल्लाह ‘बिन जयाद’चा दारूण पराभव केला आणि त्यास ठार केले.

  ‘मुख्तार सख्फी’ने जर माननीय हुसैन यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच या चळवळीस मर्यादित ठेवले असते, तर कदाचित योग्य ठरले असते. परंतु त्याने एकाच वेळी सीरियाच्या ‘अब्दुल मलिक बिन मरवान’ आणि मदीनाच्या इस्लामी शासक माननीय इब्ने जुबैर(र.)या दोघांविरुद्ध सशस्त्र युद्ध छेडले. ‘उबैदुल्लाह इब्ने जयाद’ या माननीय हुसैन(र.)यांच्या खुन्यास ठार मारल्यानंतर ‘मुख्तार सख्फीने’ उमवी शासनास प्रत्यक्ष टक्कर दिली नव्हती. परंतु त्याने माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्याशी तीव्र युद्ध सुरु केले. मुख्तार सख्फी याने तब्बल अठरा महीने दोन्ही शासनांना सशस्त्र लढा दिला. त्याचप्रमाणे त्याने तेथील रहिवासी अरबजणांचाही रोष ओढवून घेतला. त्यामुळे तेथील अरब रहिवाशी ‘बसरा’कडे पलायन करून स्थायिक झाले. या ठिकाणी इब्ने जुबैर(र.)यांचे भाऊ ‘मुसैब बिन जुबैर(र.)राज्यपाल होते. इस्लामी शासनाचे राज्यपाल मुसैब(र.)यांनी मुख्वारचा उपद्रव मोडीत काढण्यासाठी एक लष्कर घेऊन ‘कूफा’कडे निघाले. दोन्ही लष्करात घनघोर युद्ध झाले. या वेळी ‘मुसैब बिन जुबैर(र.)यांनी लढताना बंडखोर ‘मुख्तार सख्फी’चा शीरच्छेद करुन एका मोठ्या शक्तिशाली शत्रूचा खातमा केला.

  ‘मुख्तार सख्फी’ हा दोन्ही शासनांच्या रस्त्यातील काटा होता. तो निघाल्यानंतर आता या दोन्ही शासकांदरम्यान अटीतटीची लढाई सुरु झाली. अब्दुल मलिक आणि इब्ने जुबैर(र.)समोरासमोर आले. अब्दुल मलिक एक जबरदस्त फौज घेऊन माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्यावर चाल करून आला. दोन्ही फौजांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि शेवटी माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी समझोता करून आपल्या कन्येचा विवाह अब्दुल मलिक बिन मरवानच्या मुलाशी केला. यानंतर पुन्हा एकदा अब्दुल मलिकने मोठे सैन्य घेऊन इराक वर हल्ला चढविला. या ठिकाणी मुसैब बिन जुबैर(र.)हे इराकचे राज्यपाल होते. त्यांनी आपले लष्कर खुरासान मोहिमेवर पाठविलेले असल्याने त्यांच्याकडे लष्करी बळ कमी पडले व त्यांना अब्दुल मलिकच्या लष्करांसमोर पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रणभूमीवर लढताना वीरमरण आले. माननीय मुसैब(र.)यांना ठार केल्यानंतर संपूर्ण इराकवर अब्दुल मलिक बिन मरवानचे शासन प्रस्थापित झाले. आता केवळ अरबचा प्रदेशच तेवढा अपवाद होता. इराक जिकल्यावर अब्दुल मलिकने अरब प्रदेशाकडे आपले लक्ष केले. त्याने ‘मक्का’ जिकण्याची तयारी सुरु केली. ‘मुस्तदरक हाकिम’ या ग्रंथात आहे की, एके दिवशी त्याने बनु उमय्या परिवाराच्या मोठमोठ्या शूरांना जमा करून विचारले की, ‘‘तुमच्यापैकी कोण इब्ने जुबैर(र.)यांचा वध करण्यास तयार आहे?’’ त्याच्या प्रश्नावर ‘हिज्जाज बिन यूसुफ’ उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘हे काम आपण माझ्या स्वाधीन करावे!’’

  अब्दुल मलिकने तीनदा आपला हाच प्रश्न उच्चारला आणि तिन्ही वेळा ‘हिज्जाज बिन यूसुफ’ याने स्वतःस पुढे केले. अखेर अब्दुल मलिकने ‘हिज्जाज बिन यूसुफ’ ची या पातकासाठी निवड केली. तसेच त्याला असादेखील आदेश दिला की, मदीनावासीयांना सध्यातरी त्रास देऊ नये. येथून सरळ ‘ताईफ’ या शहरात जावे आणि तेथून लहान लहान तुकड्या मक्का शहरावर हल्ल्यासाठी पाठवून इब्ने जुबैर(र.)यांची शक्ती कमी करावी. जास्त लष्कराची गरज पडल्यास मला पत्र धाडावे.

  हिज्जाज बिन यूसुफ या मोहिमेसाठी तीन हजार जवानांचे लष्कर घेऊन ‘ताईफ’मध्ये येऊन थांबला. इकडे माननीय इब्ने जुबैर(र.)यांनीसुद्धा मक्का शहराच्या रक्षणाची पूर्ण तयारी केलेली होती. हिज्जाज बिन यूसुफचे लष्कर मक्का शहरावर सतत हल्ले चढवीत आणि इब्ने जुबैर(र.)यांचे संरक्षण दस्ते त्यांना पिटाळून लावीत असत. असे बरेच महिने लोटल्यानंतरही यश मिळत नसल्याने हिज्जाज बिन यूसुफने अब्दुल मलिकला परिस्थितीचा वृत्तांत पाठविला आणि सोबतच मक्का शहराला वेढा देण्याची परवानगी मागितली. अब्दुल मलिक बिन मरवान याने ताबडतोब पाच हजाराचे बलाढ्य सैनिक हिज्जाज बिन यूसुफच्या मदतीस पाठविले. लष्कर पोहचताच हिज्जाजने मक्का शहरास वेढा दिला. त्याने पवित्र काबागृहावर आगीच्या गोळ्यांचा आणि दगडांचा वर्षाव सुरु केला. हा वेढा हिजरी सन ७२ च्या जीकादा महिन्यात(अर्थात २५ मार्च इ. स. ६९२ मध्ये) सुरु झाला आणि तब्बल सात महिन्यांपर्यंत राहिला. या पूर्ण काळामध्ये पवित्र काबा आणि पूर्ण शहरावर आगीचा आणि दगडांचा वर्षाव होत राहिला.

  माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी मोठ्या धैर्याने या संकटास तोंड दिले. परंतु या वेढ्यामुळे शहरातील रसद संपत आली आणि लोकांवर उपासमाराची पाळी आली इब्ने जुबैर(र.)यांचे सवंगडी व साथीदार ‘मक्का’ सोडण्यास विवश होत होते. याच काळात माननीय इब्ने जुबैर(र.)आपल्या अत्यंत वृद्ध असलेल्या मातेच्या अर्थात सन्माननीय अस्मा(र.)यांच्या सेवेत हजर झाले आणि विचारले,

  ‘‘माता! आपण कुशल आहात ना?’’
  ‘‘माझी कुशलता काय विचारतोस? मला तर डोळ्यांनी दिसतदेखील नाही!’’ त्या उत्तरल्या.
  ‘‘माता! मृत्यूमध्ये खूप गोडवा आणि विश्रांती आहे!’’ इब्ने जुबैर(र.)म्हणाले.

  ‘‘हे लाडक्या! मी तुझी परिणती पाहिल्यावरच मरण पत्करू इच्छिते, जेणेकरून तुला हौतात्म्य आल्यास आपल्या हाताने कफन पांघरीन आणि विजय प्राप्त झाल्यास आनंद व्यक्त करीन!’’ माता उत्तरल्या. मातेचे हे उत्तर ऐकून इब्ने जुबैर(र.)हसले आणि आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला. दहा दिवसांनंतर अंतिम सलाम करण्यासाठी ते मातेच्या सेवेत हजर झाले. इब्ने जुबैर(र.)यांनी विचारले,

  ‘‘मातावर्य! माझे सर्व साथी माझी साथ सोडून हिज्जाज बिन यूसुफला जाऊन भेटले. तो मलादेखील अभय देण्यास तयार आहे. अब्दुल मलिक बादशाहने वचन दिले की, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करील. अशा अवस्थेत आपणच मला आदेश द्यावा की, मी काय करावे?’’

  ‘‘लाडक्या! या गोष्टीचा निर्णय तूच चांगल्याप्रकारे घेऊ शकतोस. जर तू सत्याच्या समर्थनार्थ आणि मानवजातीच्या कल्याणास्तव युद्ध करीत आहेस, तर जीवाची पर्वा न करता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत युद्ध सुरु ठेव आणि जर तू केवळ निरर्थक लढत असशील, तर खूप वाईट करशील. कित्येक निरपराधांचे प्राण वाया घालण्याचे पाप तुझ्या डोक्यावर असेल.’’ माननीय अस्मा(र.)यांनी उत्तर दिले.

  इब्ने जुबैर म्हणाले, ‘‘मातावर्य! मला मृत्यूची मुळीच भीती वाटत नाही. मी केवळ सत्यासाठीच जगलो आणि सत्यासाठीच मरण पत्करणार! मला केवळ एवढेच भय आहे की, माझ्या मृत्यूनंतर ते माझ्या शरीराचे तुकडे करून सुळावर टांगतील.’’

  माननीय अस्मा(र.)म्हणाल्या, ‘‘हे शूर बाळा! शेळीला कापल्यावर तिची चामडी ओढली काय आणि तिचे तुकडे केले काय, त्याने काय होणार? तू ईश्वराचे नाव घेऊन युद्ध कर! मृत्यूच्या भयाने असत्याची साथ देण्याची नामुष्की पत्करू नकोस. ईश्वराची शपथ! प्रतिष्ठापूर्ण मृत्यू अपमानजनक सत्तेपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. सत्य मार्गात लढताना शत्रूच्या तलवारींच्या घावांनी तुकडे तुकडे होणे हे पथभ्रष्टांच्या गुलामगिरीपेक्षा हज्जार पटीने श्रेष्ठ आहे!’’

  आपल्या मातेच्या या सत्यसमर्थक शब्दांनी माननीय इब्ने जुबैर(र.)खूप भावनावश झाले. त्यांनी आपल्या मातेस कवटाळले आणि म्हणाले,

  ‘‘मातावर्य! मीदेखील असाच निश्चय केला आहे की, सत्यमार्गात प्राणपणाला लावून शत्रूंचा सामना करावा. परंतु मी केवळ आपला सल्ला घेऊ इच्छित होतो, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर आपणास दुःख होऊ नये. सर्व प्रशंसा ईश्वरासाठीच आहे. आपण माझ्यापेक्षाही जास्त धैर्यशील आणि संयमी आहात. आपल्या आदेशाने माझ्या श्रद्धेमध्ये बळ आणि निश्चयामध्ये शक्ती निर्माण केली. मी आज अवश्य हुतात्मा होईन. मला पूर्ण विश्वास आहे की, माझ्या हौतात्म्यानंतरही आपण अशाच धैर्य व संयमी स्वभावाचे दर्शन घडवाल. ईश्वराची शपथ! मी कधीच वाईट आणि ईश्वरास न आवडणारी बाब पसंत केली नाही. कोणावरही अत्याचार केले नाहीत. दिलेला शब्द कधी मोडला नाही. आता केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेशिवाय मला काहीच नको!’’ मग त्यांनी आकाशाकडे पाहून म्हटले, ‘‘हे ईश्वरा! या सर्व गोष्टी मी गर्वाने नव्हे तर आपल्या मातेच्या मनःशांतीस्तव केल्या आहेत.’’

  ‘‘जा मुला! ईश्वराच्या मार्गात आपल्या प्राणाचा बळी दे. मी मुळीच धैर्य सोडणार नाही!’’ आणि त्यांनी माननीय इब्ने जुबैर(र.)यांना उराशी कवटाळले. परंतु मातेच्या हाताला माननीय इब्ने जुबैर यांनी अंगावर घातलेल्या लोखंडी चिलखताचा स्पर्ष होताच त्यांनी विचारले,

  ‘‘बेटा हे काय आहे?’’
  ‘‘हे शत्रूच्या वारांपासून आपला बचाव करण्यासाठी चिलखत आहे!’’
  ‘‘बेटा! हुतात्मा होण्यासाठी जात आहेस आणि अशा वस्तुंचा आधार घेतोस?’’ मातेने विचारले. माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी तत्काळ लोखंडी चिलखत काढून टाकले आणि डोक्यावर पांढरा रूमाल गुंडाळून आईस म्हणाले,

  ‘‘हे मातावर्य! आता तर आपण प्रसन्न आहात ना?’’
  ‘‘होय, आता मी खूप समाधानी आहे. जा! ईशमार्गात लढ आणि याच पोषाखात ईश्वरासमोर हजर हो!’’

  आपल्या धैर्यशील मातेचा निरोप घेऊन माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी आपल्या बाह्या चढविल्या आणि तलवार उचलून रणभूमीत उतरले. या वेळी त्यांची फौज अगदीच थोडीशी होती. त्यांच्या सोबत त्यांचे दोन सुपूत्र आणि काही जीवलग साथीदार होते. ते मोठ्या शौर्याने शत्रुंवर हल्ले करीत होते. ते जिकडे तोंड फिरवित तिकडे त्यांचे शत्रू पळ काढीत असत. ते ७२ वर्षांचे असूनदेखील एखाद्या तरुण दमाच्या शिपायाप्रमाणे लढा देत होते. आपल्या दोन्ही हातांनी तलवार चालवीत ते दूरपर्यंत शत्रूंच्या जमावात घुसले आणि परत लढत लढत येऊन आपल्या साथीदारांपर्यंत आले. त्यांचे साथीदार शिपाई एकेक करून हुतात्मे झाले. मागून कोणीतरी सांगितले, ‘‘आज्ञा असेल तर मी पवित्र काबाचा दरवाजा उघडतो. आपण आत जाऊन सुरक्षित व्हाल. परंतु माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी आवेशाने उत्तर दिले, ‘‘मी अपमान पत्करून जीवन स्वीकारणारा आणि मृत्यूच्या भीतीने स्वसंरक्षणास्तव पायर्या चढणारा नाही. मला अशा बाणाचे आकर्षण वाटते, जो माझी भेट मृत्यूशी करून देणारा आहे.’’

  यानंतर ते सिहाप्रमाणे तुटून पडले आणि दुपारपर्यंत अत्यंत शौर्याने लढत राहिले. इथपर्यंत त्यांना खूप जखमा झाल्या. परंतु त्यांच्या माथ्यावर थकवा जाणवत नव्हता. एवढ्यात एका काळ्यावर्णीय माणसाने त्यांना शिवी दिली. त्यांनी तलवारीच्या एकाच घावात त्याचे दोन तुकडे केले. शेवटी शत्रूफौजेच्या एका शिपायाने त्यांच्या डोक्यावर दगडाचा प्रहार केला आणि त्यांच्या मस्तकातून रक्त वाहू लागले. खूप रक्त वाहिल्याने त्यांची शुद्ध हरवत होती. याच संधीचा फायदा उचलून शत्रूंनी त्यांच्या शरीरावर तलवारींचा वर्षाव केला आणि माननीय इब्ने जुबैर(र.)धारातिर्थी कोसळले. शत्रूंनी तत्काळ त्यांचे शीर धडावेगळे केले.

  हिज्जाज बिन यूसुफला इब्ने जुबैर(र.)यांच्या हौतात्म्याची वार्ता मिळताच त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने त्यांचे डोके अब्दुल मलिक बिन मरवानकडे ‘दमास्कस’ला पाठविले आणि त्यांचे शरीर उंच सुळावर लटकविले. माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)तेथून जात असताना. माननीय इब्ने जुबैर(र.)यांचे शव त्यांच्या नजरेस पडले आणि त्यांना एक जोरदार झटका बसला. त्यांना दुःख अनावर झाले. त्यांनी इब्ने जुबैर(र.)यांचे शव पाहून म्हटले,

  ‘‘अबू खबीब! अस्सलामुअलैकुम, ईश्वराची शपथ! आपण नमाजी आणि रोजेदार(उपवास ठेवणारे) सज्जन व्यक्ती होता.’’

  इब्ने जुबैर(र.)यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या माता सन्माननीय अस्मा(र.)ह्या ‘हजून’च्या स्थळावर गेल्या. याच स्थळावर इब्ने जुबैर(र.)यांचे शव टांगले गेले होते. योगायोगाने हिज्जाज बिन यूसुफसुद्धा तेथेच होता. सन्माननीय अस्मा(र.)यांना सांगण्यात आले की, हिज्जाज तुमच्या बाजूला उभा आहे. तेव्हा त्यांनी त्यास उद्देशून म्हटले,

  ‘‘घोड्यावर स्वार झालेला हा स्वार कधी पायउतार होणार?’’
  ‘‘तो नास्तिक होता. त्याची हीच शिक्षा आहे.’’ हिज्जाज ने उत्तर दिले.
  माननीय अस्मा म्हणाल्या, ‘‘ईश्वराची शपथ! तो तर(अर्थात माननीय इब्ने जुबैर(र.)) नमाज पढणारा आणि रोजे धरणारा सज्जन आणि ईशपरायण होता. नास्तिक मुळीच नव्हता.’’

  ‘‘हे म्हातारे! येथून निघून जा. तुझी अक्कल ठिकाणी नाही!’’
  ‘‘अक्कल तर तुझी ठिकाणावर नाही. मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना हे म्हणाताना ऐकले की, सकीफ परिवारात एक खोटारडा आणि एक निर्दयी व निष्ठूर माणुस जन्माला येईल. म्हणजे खोटारड्या माणसाला(अर्थात मुख्तार सख्फील) आम्ही पाहिले आणि तो निर्दयी व निष्ठूर माणूस तूच आहेस.’’

  आणखीन एका इतिहासकथनात आहे की, ज्या वेळेस माननीय इब्ने उमर(र.)यांनी इब्ने जुबैर(र.)यांचे टांगलेले शव पाहून त्यांची प्रशंसा केली, तेव्हा हिज्जाज बिन यूसुफने त्यांचे शव यहूदींच्या(‘ज्यू’ लोकांच्या) कब्रस्तानमध्ये फेकून दिले आणि त्यांच्या माता सन्माननीय अस्मा(र.)यांना बोलावले. परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. हिज्जाज भयंकर संतापला आणि निरोप पाठविला की, ‘‘ताबडतोब या अन्यथा डोक्याचे केस धरून खेचून आणण्यात येईल.’’ हा निरोप ऐकताच अस्मा(र.)म्हणाल्या, ‘‘ईश्वराची शपथ! जोपर्यंत तू केस धरून फरफटत ओढून घेऊन जात नाही, तोपर्यंत येणार नाही.’’ हे उत्तर ऐकून स्वतः हिज्जाज बिन यूसुफ त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,

  ‘‘खरोखर सांग, ईश्वराच्या शत्रूची काय परिणती झाली? त्याने किती भयानक परिणाम भोगला?’’
  माननीय अस्मा(र.)उत्तरल्या, ‘‘तू तर केवळ त्यांचे ऐहिक जीवन बरबाद करू शकलास, परंतु त्याने तुझे पारलौकिक जीवन पार नष्ट करून टाकले. मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडून ऐकले की, ‘सकीफ’ परिवारामध्ये एक खोटारडा आणि एक क्रूर व निर्दयी जन्माला येईल. खोटारडा(मुख्तार सख्फी) आम्ही पाहिला आणि क्रूर व निर्दयी मात्र तू आहेस.’’

  माननीय अस्मा(र.)यांचे सडेतोड उत्तर ऐकून हिज्जाज बिन यूसुफला काही सुचत नव्हते. तो तेथून गुपचूप चालता झाला. माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्या हौतात्म्याच्या काही काळानंतरच माननीय अस्मा(र.)या स्वर्गवासी झाल्या.

  माननीय इब्ने जुबैर(र.)यांची गणना प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या अशा सोबत्यांमध्ये होते, जे ज्ञान आणि धर्म विद्येत पारंगत होते. माननीय इब्ने जुबैर(र.)यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणात त्यांचे आजोबा आणि प्रेषितांचे सासरे माननीय अबू बकर(र.), त्यांच्या माता सन्माननीय अस्मा(र.), सन्माननीय आयशा(र.)त्यांच्या मावशी व प्रेषितभार्या यासारख्या महान सोबत्यांचा मोलाचा वाटा आहे.

  इस्लाम धर्मशास्त्राचा मूळ स्त्रोत असलेले दिव्य कुरआनचे ते प्रगल्भित विद्वान आणि पाठक होते. कधीकधी ते दिव्य कुरआनचे स्पष्टीकरण करीत असत. त्यांचे कुरआनचे स्पष्टीकरणाचा काही अंश ‘सहीह बुखारी’ या हदीसग्रंथातदेखील आहे. दिव्य कुरआनाच्या पठणाचा त्यांना विशेष छंद होता, म्हणून त्यांना ‘कारीउल कुरआन’ अर्थात कुरआनपाठक म्हटले जात असे.

  माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी आदरणीय प्रेषितांकडून तेहतीस ‘प्रेषितवचने’ कथन केली आहेत. धर्मविधीशास्त्रात त्यांना विशेष प्राविण्य लाभलेले होते. तसेच त्यांना अरबी भाषेशिवाय इतर बर्याच भाषा अवगत होत्या. त्यांच्याकडे विविध भाषा बोलणारी नोकरचाकर मंडळी होती.(संदर्भ : मुस्तदरक हाकिम) माननीय इब्ने जुबैर हे कुशल वक्ते देखील होते. तसेच त्यांना कवन आणि साहित्याचेदेखील विशेष ज्ञान होते.

  माननीय इब्ने जुबैर(र.)हे उच्चनीतिमत्तेचे मूर्त उदाहरण होते. उपासना, भक्ती, परखड भाषणशैली, धैर्य व संयम, प्रेषित जीवनचरित्राचा अंगीकार आणि शौर्य व युद्धकला यासारखे विशेष गुणधर्म त्यांच्यात होते. नमाज अदा करते वेळेस ईशस्मरणात एवढे तल्लीन होत असत की, नमाजसाठी उभे राहिल्यास एखाद्या तठस्थ खांबाप्रमाणे दिसत. अगदी थोडे देखील हलत डुलत नसत. पक्षी व कबुतरे त्यांच्या डोक्यावर व खांद्यावर बसत असत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)म्हणत असत की, इब्ने जुबैर(र.)यांची नमाज आदरणीय प्रेषितांच्या नमाजीचे मूर्त उदाहरण आहे.

  माननीय इब्ने जुबैर(र.)हे स्पष्टवक्ता होते. जी गोष्ट मनात असेल ती बोलून दाखवीत असत आणि कोणत्याही परिस्थितीस न जुमानता परखडपणे सत्य समोर ठेवीत असत. अमीर मआविया(र.)हे सामर्थ्यशाली शासक होते. परंतु ‘यजीद’च्या राज्याभिषेकावेळी माननीय इब्ने जुबैर(र.)यांनी त्यांच्या सामर्थ्य व शक्तीस झुगारून देऊन त्यांचा तीव्र विरोध केला. कारण हा राज्याभिषेक लोकतंत्रविरोधी होता.

  ‘यजीद’ याने पाठविलेल्या लष्कराचा सरसेनापती ‘हसीन बिन नबीज’ याने सीरियाला येऊन आपले शासन घोषित करण्याचे निमंत्रण दिले व त्यात एक अट अशी ठेवली की, लष्कराने केलेल्या जनतेच्या कत्तलीस माफ करावे. परंतु इब्ने जुबैर(र.)यांनी त्याची ही अन्यायी व अमानुष अट झुगारुन दिली आणि स्पष्ट शब्दांत खडसावले की, जनतेच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

  इस्लामी नियमांवर आधारित शासनाच्या या इस्लामी शासकाच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना एकही दिवस विश्रांती मिळाली नाही. उमैया परिवाराशी कलह, मुख्तार सख्फीचे बंड, खारिजीन नावाच्या धर्मभ्रष्ट पंथाचे बंड आणि इतर प्रकारचे उपद्रव मोडीत काढण्यात त्यांचा संपूर्ण कार्यकाळ खर्ची झाला. या संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मोठ्या धैर्य आणि संयमाने परिस्थितीचा सामना केला. अगदीच शेवटच्या काळातील मक्का शहराच्या वेढ्याच्या वेळीसुद्धा अर्थात यशाची कोणतीही आशा नसताना त्यांनी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सत्य समर्थनार्थ अविश्रांत लढा दिला. त्यांनी आपल्या शासनकाळात पूर्णतः इस्लामी घटना व इस्लामी संविधान लागू केले. यासाठी त्यांनी बळाचा वापर करण्यासही मागे पुढे पाहिले नाही.

  युद्धकला आणि शौर्याच्या व रणभूमी गाजविण्याच्या बाबतीत अरब प्रदेशातील सर्वच शूरवीर त्यांना आपले आदर्श मानीत असत. अरब प्रदेशाच्या एका अत्यंत शूर असलेल्या आणि युद्धकलेत पारंगत असलेल्या ‘मुहल्लब’ यास एकाने विचारले की,

  ‘‘या काळात ‘अरब प्रदेशाचे शूरवीर’ कोणास म्हणता येईल?’’ त्याने उत्तर दिले की,

  ‘‘मुसैब .बिन जुबैर(र.), उमर बिन उबैदुल्लाह आणि ‘इबाद बिन हसीन’ हे अरब प्रदेशाचे शूरवीर आहेत.’’ प्रश्न कर्त्याने विचारले,
  ‘‘आणि ‘इब्ने जुबैर’?’’ त्याने ताडकन उत्तर दिले, ‘‘ते तर युद्धाचे ‘राक्षस’ आहेत. मी मानवांबाबतीत बोलत होतो.’’

संबंधित लेख

 • हर्षशक्ती, तसे प्रियजीवन

  इस्लाम मानवतेची एकमात्र आशा आहे आणि इस्लामशीच मानवतेचे भवितव्य निगडीत आहे. वर्तमान सिद्धान्तातील संघर्षामध्ये इस्लामी दृष्टिकोनाला यश प्राप्त होणे, हे मानवाच्या मुक्तीची शाश्वती होऊ शकते. इस्लामचे यश इतके महत्त्वाचे असूनसुद्धा ते प्राप्त होणे म्हणजेच हे असंभवनीय नाही. जशी गतकाळात होती तशीच इस्लामी व्यवस्था स्थापित करणे आजही शक्य आहे. फक्त अट अशी की त्याच्या सीमारेषेत सामील झालेल्या सर्व लोकांनी आजच जर अशी प्रतिज्ञा केली की ते इस्लामला सबंध जगावर प्रभावी व यशस्वी केल्याविना स्वस्थ बसणार नाहीत,
 • शरीअतमध्ये गुन्हेगारीवरील उपायाची स्वरुपे

  शरीअत अर्थात इस्लामी कायद्याने गुन्हेगारीवरील उपायाची तीन स्वरुपे दाखविली आहेत. पहिले स्वरुप हे अपराधाची ‘हद‘ लागू करणे होय. अर्थातच गुन्हेगाराने पूर्ण शर्तीने गुन्हा केलेला असेल तर स्वतः ईश्वराने ही शिक्षा निश्चित केलेली आहे. यात मुळीच बदल करता येत नाही. म्हणूनच या प्रकारच्या शिक्षा-उपायास शरीअतच्या परिभाषेत ‘हद‘ जारी करणे असे म्हणतात. दुसर्या उपायाचे स्वरुप म्हणजे ‘कसास‘ होय. कसास म्हणजे बदल्याची शिक्षा होय. अर्थात गुन्हेगाराने कोणास शारीरिक हानी पोचविली असेल तर जेवढी हानी पोचविली तेवढाच बदला घेण्याची शिक्षा देणे होय.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]