Islam Darshan

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.) दिव्य कुरआनाचे प्रवक्ते

Published : Sunday, Mar 06, 2016

श्रद्धावंतांची माता सन्माननीय मैमुना(र.)यांचे एक किशोरवयीन भाचे होते. त्या आपल्या या भाच्यावर जिवापाड प्रेम करीत असत. या भाच्याचेसुद्धा आपल्या मावशीवर आणि आपल्या मावसा असलेल्या आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच ते आपल्या मावशी मावसाच्या घरीच जास्त वेळ काढीत आणि त्यांची छोटी-मोठी कामेसुद्धा हसत-बागडत करीत असत. मोबदल्यात आदरणीय प्रेषितांचा आशीर्वाद घेत असत.

एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) रात्रीच्या शेवटच्या प्रहरी नमाज अदा करण्याकरिता उभे राहिले. एवढ्यात त्यांच्या मागे हे भाचेसुद्धा नमाजकरिता उभे राहिले. आदरणीय प्रेषितांनी त्यांना मोठ्या प्रेमाने गोंजारून आपल्यासोबत उभे केले. प्रेषितांनी नमाज सुरू करताच हे भाचे परत पाठीमागे येऊन उभे राहिले. नमाज अटोपल्यावर आदरणीय प्रेषितांनी त्यांना मागे जाऊन उभे राहण्याचे कारण विचारले तेव्हा ते उत्तरले, ‘‘हे आदरणीय प्रेषिता! आपल्याबरोबर उभे राहून नमाज पढण्याचे माझ्यातच काय, कोणातही कसे काय धैर्य असू शकते? कोणाची हिम्मत होईल बरे!’’ आदरणीय प्रेषित त्यांच्या कोवळ्या आणि निरागस उत्तराने खूप प्रभावित झाले. त्यांनी त्यांना पोटाशी धरून खूप प्रेमाने गोंजारले आणि ईश्वराशी प्रार्थना केली, ‘‘हे महान ईश्वरा! या मुलास प्रचंड ज्ञान आणि खूप विवेकशीलता प्रदान कर!’’ सन्माननीय मैमुना(र.)यांचे हे लाडके भाचे, ज्यांच्याखातर थोर ज्ञानी प्रेषितांनी त्यांना प्रचंड ज्ञान आणि आकलन शक्ती व विवेकशीलता प्रदान करण्याची ईशदरबारी प्रार्थना केली आणि त्यांच्या थोरांमोठ्यांबाबत असलेल्या आदरभावनांवर प्रसन्नता व्यक्त केली, ते निरागस कुमार म्हणजे ‘हाशमी’ परिवाराचे लाडके सुपुत्र माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)हे होय!

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)हे त्या प्रेषित सोबत्यांपैकी होते, ज्यांची विद्या, ज्ञान आणि धर्मशास्त्रांतील गुरुवर्यांत गणना होते. ते आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे लाडके काका माननीय अब्बास(र.)यांचे चिरंजीव होते. त्यांची माता ‘सन्माननीय उम्मुल फजल(र.)यांनी प्रेषित भार्या ‘सन्माननीय खदीजा(र.)’ यांच्यानंतर सर्वप्रथम इस्लाम स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविले. या नात्यांमुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) त्यांचे मावसे आणि चुलतभाऊदेखील होते.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांना ‘अल जिब्र(महान विद्वान)’, ‘अलजब्र(विद्यासागर)’, ‘तर्जुमानुल कुरआन(कुरआनचे प्रवक्ते), या इतर टोपणनावांनीदेखील संबोधित करण्यात येते. माननीय अब्बास(र.)यांना आणखीनही पुत्र होते. परंतु माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांना विशेषकरून ‘इब्ने अब्बास(र.)’(अर्थात अब्बास पुत्र) या नामविशेषणाने संबोधित करण्यात येते.

माननीय इब्ने अब्बास(र.)हे प्रेषितांच्या मदीना स्थलांतराच्या ३ वर्षांपूर्वी अर्थात हिजरी सन पूर्व ३ मध्ये मक्का शहरात जन्मले. या काळात इस्लामद्रोह्यांनी हाशिम परिवार आणि मुतल्लिब परिवारास ‘शेअब-ए-अबुतालिब’ या स्थानी कैद केले होते. माननीय इब्ने अब्बास(र.)हे याच ठिकाणी जन्मले. मक्का विजयाच्या काही दिवसांपूर्वीच मदीना शहरी स्थलांतर केले. त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण इस्लामी वातावरणात झाले. आई-वडिलांसह स्थलांतरनाच्या वेळी त्यांचे वय जवळपास अकरा वर्षे होते. मदीना पोहोचताच ते आदरणीय प्रेषिातांच्या सेवेत हजर झाले आणि प्रेषित शिकवणींचा भरपूर लाभ घेतला. त्यांची प्रेषितांवर गाढ श्रद्धा आणि अपार प्रेम होते. वडिलांनीसुद्धा त्यांना प्रेषितांसोबत राहण्याची आणि शिकवण घेण्याची ताकीद दिली होती. एके दिवशी प्रेषितांकडून आल्यावर त्यांनी वडिलांना सांगितले की, आज मी प्रेषितांजवळ अशा माणसाला पाहिले, ज्याला मी ओळखत नाही. त्याच्या बाबतीत मला माहीत झाले असते, तर किती छान झाले असते.’ माननीय अब्बास(र.)यांनी याचा उल्लेख आदरणीय प्रेषितांसमोर केला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इब्ने अब्बास(र.)यांच्या चौकस बुद्धीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला व प्रार्थना केली की, ‘‘हे ईश्वरा! या मुलावर आपल्या ज्ञान अनुग्रहाचा वर्षाव कर आणि यास आपले ईश्वरीय ज्ञान जगात फैलावण्याचे माध्यम बनव!’’

माननीय इब्ने अब्बास(र.)हे अतिशय विनयशील आणि गंभीर वृत्तीचे होते, तरीसुद्धा बालपण असल्याने मदीना शहराच्या गल्ल्यांमध्ये खेळण्यासाठी निघत असत. याच काळातील एक घटना माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्या लक्षात राहिली. ती त्यांनी स्वतः अशा शब्दांत वर्णन केली.

‘‘मी मुलांबरोबर गल्ल्यांमध्ये खेळत असे. एकदा आदरणीय प्रेषितांना येताना पाहून मी पळून जाऊन एका घराच्या दरवाज्यामागे लपलो. परंतु प्रेषितांनी मला पाहिले होते. त्यांनी प्रेमाने माझा हात धरून ओढले. मग माझ्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले, ‘‘जा आणि मआविया(र.)यांना बोलावून आणा.’’ माननीय मआविया(र.)हे प्रेषितांवर अवतरीत होणार्या दिव्य बोधास तत्काळ लिहून घेत असत. मी त्यांना पळतच जाऊन बोलावून आणले.’’(संदर्भ : मुस्नद-ए-अहमद)

माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी आदरणीय प्रेषितांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणून पंधरा वर्षांखाली वय असलेल्यांना धर्मयुद्धात भाग घेता येत नसल्याने त्यांना युद्धाची संधी मिळाली नाही. माननीय अबू बकर(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात त्यांनी प्रगल्भित विद्वान असलेल्या प्रेषितसोबत्यांकडून इस्लामचा गाढा अभ्यास केला. माननीय उमर(र.)यांनीसुद्धा त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या शिक्षणाची विशेष सोय केली. माननीय उमर(र.)ज्ञानसंमेलनात इतर विद्वानांसोबत माननीय इब्ने अब्बास(र.)यांनादेखील निमंत्रित करीत असत. ‘सहीह बुखारी’ या ग्रंथात आहे की, एकदा विद्यापरिषदेत मोठमोठे विद्वान प्रेषितसोबती बसले होते. माननीय उमर(र.)यांनी या परिषदेत इब्ने अब्बास(र.)यांनासुद्धा निमंत्रित केले होते. इब्ने अब्बास(र.)यांचे वय खूप कमी असल्याने लोकांनी त्यांना आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले की, ‘‘यांचे इथे काय काम?’’ यावर माननीय उमर(र.)म्हणाले, ‘‘वय कमी असले तरी त्यांचे ज्ञान वयस्क असलेल्या विद्वानांसम आहे आणि याची कल्पनादेखील तुम्हा सर्वांना आहे.’’

माननीय उमर(र.)यांच्या चर्चासत्रामध्ये एखाद्या प्रकरणाविषयी गंभीर चर्चा होत असताना इब्ने अब्बास(र.)हे वय कमी असल्याने आपला अभिप्राय देण्यास दचकत असत. परंतु माननीय उमर(र.)त्यांना सांगत की, ‘हे इब्ने अब्बास(र.)! आपला अभिप्राय परखडपणे मांडत जा. वय कमी असल्याने ज्ञान कमी होत नसते. तुम्ही स्वतःस कमी लेखू नये.’’(संदर्भ : सहीह बुखारी)

हाफीज इब्ने अब्दुलबर(र.)यांनी आपल्या ‘अल इस्तिआब’ या इतिहास ग्रंथात लिहिले की, माननीय उमर(र.)अर्थात दुसरे इस्लामी शासक त्यांच्या विवेकशीलता आणि सखोल ज्ञानाची खूप कदर करीत असत.
‘दायरा-ए अल-मआरिफे-इस्लामिया’ ग्रंथात आहे की, माननीय उमर(र.)त्यांच्या सुस्वभाव, उच्च नीतिमत्ता, कुरआनची आकलन शक्ती या सद्गुणांमुळे त्यांचा खूप आदर करीत असत. ते त्यांच्या बाबतीत नेहमी म्हणत, ‘‘इब्ने अब्बास हे कमी वयातसुद्धा वयोवृद्ध विद्वानांपेक्षा खूप मोठे विद्वान आहेत. त्यांची जीभ नेहमी संशोधनात्मक प्रश्न विचारणारी असून त्यांची बुद्धी विवेकशील आहे.’’ माननीय उमर फारूक(र.)यांनी हिजरी सन १८ ते २१ च्या दरम्यान माननीय अमरु बिन आस(र.)यांना ‘इजिप्त’ च्या मोहिमेवर पाठविले, तेव्हा इब्ने अब्बास(र.)सुद्धा या धर्मयुद्धात त्यांच्या सोबत होते.

माननीय उस्मान(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात इब्ने उबै(र.)यांच्या नेतृत्वामध्ये हिजरी सन २७ मध्ये आफ्रिकेवर चढाई करण्यात आली. तेव्हा इब्ने अब्बास(र.)यांनीसुद्धा एका जमातीचे नेतृत्व करताना या धर्मयुद्धात भाग घेतला होता. एकदा इब्ने उमर(र.)यांना आफ्रिकेचा राजा ‘ग्रीगोरी’ याच्याकडे ‘इस्लामी शासन प्रतिनिधी’ या नात्याने पाठविण्यात आले होते. त्या वेळी प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने राजास इतके प्रभावित केले की, राजा ग्रीगोरीच्या तोंडून विनासायास हे शब्द बाहेर पडले.

‘‘आपण ‘जब्रे अरब’(म्हणजे अरबचे खूप मोठे विद्वान) आहात.(संदर्भ : इसाबा, लेखक, हाफीज इब्ने हजर(र.))

हिजरी सन २९, ३० मध्ये माननीय उस्मान(र.)यांच्या शासनकाळात कूफा येथील राज्यपाल माननीय सईद बिन आस(र.)यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ‘जिरजान’ आणि ‘तिब्रिस्तान’ वर हल्ला केला. या मोहिमेत माननीय इब्ने जुबैर(र.), माननीय हसन(र.)आणि माननीय हुसैन(र.)वगैरे तरूण मंडळी सामील होती.(संदर्भ : उसुदुल गाबा, लेखक : इब्ने असीर)

माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी माननीय अली(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात उठणार्या बंडांना ठेचून काढण्यात माननीय अली(र.)यांची मदत प्राणपणाला लावून केली. ‘जेहरवान’ च्या युद्धात बंडखोरांनी माननीय अली(र.)यांच्या लष्कराकडून अपमानजणक पराभव पत्करला आणि त्यांनी ईराणमध्ये पळ काढला. तेथेही गप्प न बसता या बंडखोरांनी काही लोकांना हाताशी धरून इस्लामी शासनाविरुद्ध उपद्रव माजविला. बंडखोरांच्या भूलथापांना बळी पडून ईराणी जनतेने इस्लामी शासनप्रतिनिधींना अथवा राजदूतांना देशाबाहेर काढले. अशा बिकट प्रसंगी माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी माननीय अली(र.)यांना सांगितले की, ‘‘मी ईराणचा उपद्रव आणि बंडखोरी नष्ट करतो. ही जवाबदारी आपण माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा!’’ ‘बसरा’ च्या सीमा ‘ईराणच्या’ सीमेशी मिळत होत्या आणि माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी ‘बसरा’ चे राज्य मोठ्या कुषलतेने हताळले होते. म्हणून माननीय अली(र.)यांनी ‘ईराण’ ची जवाबदारीदेखील त्यांच्यावर सोपविली.

माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी ‘बसरा’ येथे परत येऊन ‘झयाद’ नावाच्या शूर लष्करप्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक लष्कर ‘ईराण’ देशी पाठवून काही दिवसांतच बंडखोरांचा उपद्रव ठेचून काढला आणि संपूर्ण ई राणमध्ये शांती प्रस्थापित केली.

नंतर हिजरी सन ३८ ते ४० च्या दरम्यान माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी ‘बसरा’ च्या राज्यपालपदाचा त्याग करून ‘मक्का’ शहरात येऊन एकांतवास स्वीकारला.(संदर्भ : दायरे मआरिफे इस्लामिया)

माननीय अली(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय इमाम हसन(र.)यांच्या हाती इस्लामी शासनाची धुरा आली. त्या वेळीसुद्धा माननीय इमाम हसन(र.)यांनी माननीय इब्ने अब्बास(र.)यांना इस्लामी लष्कराचे प्रमुख पद दिले. दुसरीकडे माननीय अमीर मआविया(र.)यांचे सीरियामध्ये इस्लामी शासन होते. माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी या दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचे महान कार्य केले.(संदर्भ : दायरे मआरिफे इस्लामिया)

हिजरी सन ५० मध्ये अमीर मआविया(र.)यांनी ‘रोम’ ची राजधानी ‘कॉन्स्टँटिनोपाल’ वर एक लष्कर पाठविले. तेव्हा या लष्करामध्ये माननीय इब्ने अब्बास(र.)यांनीदेखील हिरीरीने भाग घेतला आणि रोमी साम्राज्याविरुद्ध युद्धाचे सौभाग्य मिळविले.

हिजरी सन ६० मध्ये अमीर मआविया(र.)यांच्या स्वर्गवासानंतर ‘यजीद’ हा बादशाह झाला आणि माननीय इमाम हुसैन(र.)यांनी ‘कुफा’वासियांच्या आर्जव आणि कळकळीच्या विनंतीवर की, ‘आपण कूफा शहरी येऊन आमचे नेतृत्व करावे. आपल्या नेतृत्वाच्या स्वीकाराची आम्ही आपल्या हाती प्रतिज्ञा घेणार आहोत,’ मक्का शहरातून ‘कूफा’कडे रवाना होऊ लागले. त्या वेळी माननीय इब्ने अब्बास(र.)त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘हे हुसैन(र.)! आपण ‘कूफा’ ला जात असल्याची मला वार्ता मिळाली आहे.’’

‘‘होय! हे खरे आहे!’’ इमाम हुसैन उत्तरले.
‘‘हे हुसैन(र.)! मी ईशदरबारी आपल्या कुषलतेचा इच्छुक आहे. आपण आपली इच्छा बदलावी.’’ इब्ने अब्बास(र.)यांनी कळकळीने विनंती केली.

‘‘मी पक्का निश्चय केला आहे. मला जावेच लागेल.’’ इमाम हुसैन(र.)उत्तरले.
‘‘हे इमाम हुसैन(र.)तुम्ही अशा शहरी जात आहात जेथून तुमच्या राज्यप्रतीनिधींना हाकलून लावून ‘ज्यांनी तेथील शासनावर स्वतः ताबा मिळविला?’’ इब्ने अब्बास(र.)यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘हे इब्ने अब्बास(र.)आपण दिलेल्या सल्ल्यावर मी आणखीन एकदा विचार करीन!’’ माननीय हुसैन(र.)यांनी सांगितले. माननीय इब्ने अब्बास(र.)त्यांचे उत्तर ऐकून निघून गेले. परंतु त्यांना परत वार्ता मिळाली की, माननीय हुसैन(र.)हे ‘कूफा’ जाण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा परत तिसर्या दिवशी ते इमाम हुसैन(र.)यांना म्हणाले, ‘‘हे इमाम हुसैन(र.)माझी खूप इच्छा होती की, या प्रकरणात दखल देऊ नये. परंतु मी स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकलो नाही. मी परत आपणास विनंती करतो की, आपण ‘कूफा’ वासियांचे नेतृत्व करण्यास जाऊ नये. तेथील लोक तुमचा विश्वासघात करतील. तुम्ही याच शहरात राहावे. येथील लोक तुमचा खूप आदर करतात, अन्यथा ‘येमेन’ मध्ये स्थायिक व्हावे. तेथे भरपूर किल्ले, डोंगर-दर्या असून ते एक सुरक्षित स्थान आहे. तेथे तुमचे वडील माननीय अली(र.)यांचे समर्थकसुद्धा भरपूर आहेत. तेथून तुम्ही आपले प्रचारक तयार करून इतर ठिकाणी पाठवू शकता. तुम्ही जर ही पद्धत अवलंबिली तर, मला पूर्ण खात्री आहे की, तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल.’’ माननीय हुसैन(र.)यांनी उत्तर दिले, ‘‘हे इब्ने अब्बास(र.)! ईश्वराची शपथ! मला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की, तुम्ही माझे शुभचितक आहात. परंतु मी आता ‘कूफा’ जाण्याचा ठाम निश्चय केला आहे.’’

इब्ने अब्बास(र.)म्हणाले, ‘‘जर तुम्हाला जायचेच असेल तर ठीक आहे. परंतु आपल्यासोबत आपल्या परिवारजणांना घेऊन जाऊ नका. मला भीती आहे की, तुम्हालादेखील तसेच ठार करण्यात येईल जसे माननीय उस्मान(र.)यांना त्यांच्या पत्नीसमोर ठार करण्यात आले.’’ परंतु इमाम हुसैन(र.)म्हणाले, ‘‘हे इब्ने अब्बास(र.)! मी आपल्या परिवारजणांना सोबतच घेऊन जाईन!’’

आता मात्र इब्ने अब्बास(र.)निःशब्द झाले. किबहुना ईश्वराची हीच इच्छा होती की, ‘कर्बला’ ची घटना घडावी. शेवटी माननीय इब्ने उमर(र.)यांनी लावलेला अंदाज बरोबर निघाला आणि माननीय हुसैन(र.)यांना शत्रूंनी ‘कर्बला’ या ठिकाणी त्यांच्या परिवारजणांसमोर आणि मुलांबाळांसमोर ठार केले.

या घटनेची वार्ता माननीय इब्ने अब्बास(र.)यांना कळताच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. या घटनेमुळे ते आजीवन अश्रू ढाळत होते.

माननीय इमाम हुसैन(र.)यांच्या हौतात्म्यानंतर इब्ने अब्बास(र.)यांनी राजकारणापासून स्वतःस अलिप्त आणि तठस्थ ठेवले. त्यांनी कधीच मतदानसुद्धा केले नाही. जीवनाचे अंतिम क्षण त्यांनी ‘ताईफ’ शहरात व्यतीत केले. शेवटच्या काळात त्यांची दृष्टी गेलेली होती. हिजरी सन ६८(इसवी सन ६८७) मध्ये ते खूप आजारी पडले. जेव्हा त्यांना विश्वास झाला की, मृत्यू जवळ आहे, तेव्हा त्यांच्याजवळ जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना उद्देशून ते म्हणाले,

‘‘मी एका अशा समुदायातून(परलोकी) जात आहे की, जो समुदाय ईश्वराचा अत्यंत लाडका आहे. म्हणून मी जर तुमच्यामधून जात असेन, तर निश्चितच ईश्वराचा लाडका समुदाय तुमचाच आहे.’’
सात दिवसांच्या प्रदीर्घ आजारानंतर हा ज्ञानाचा प्रखर तारा मावळला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर दुःख सागरात बुडाला. माननीय इब्ने हनफिया(र.)यांनी त्यांच्या जनाज्याची(मृत्यूसमयीची) नमाज पढविली आणि दिव्य कुरआनच्या या थोर प्रवक्त्यास मातीच्या स्वाधीन करून म्हटले,

‘‘ईश्वराची शपथ! आज जगाचा थोर विद्वान या जगातून उठला!’’
माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्या जीवनाची सर्वांत जास्त प्रकाशमान बाजू ही त्यांचे इस्लाम धर्माचे ज्ञान व विद्या होय. या अर्थानेच ते वास्तविक ‘जब्र-ए-बहर’ अर्थात ज्ञानसागर होते. मोठमोठे प्रेषितसोबती, सोबत्यांचे शिष्य आणि सोबत्यांच्या शिष्यांचे शिष्य त्यांच्या विद्वत्तेचा मनःपूर्वक स्वीकार करीत असत. माननीय उमर फारुक(र.)यांच्या दृष्टीत त्यांचे जे स्थान होते, त्याचा वर उल्लेख आलेलाच आहे. माननीय अली(र.)त्यांच्या बाबतीत म्हणत असत,

‘‘माननीय इब्ने अब्बास(र.)जेव्हा कुरआनचे सविस्तर स्पष्टीकरण करतात, तेव्हा असे वाटते की, जणू ते एखाद्या पारदर्शक असलेल्या पडद्यातून परोक्षाचे दर्शन घडवित आहेत.’’

माननीय इब्ने मसऊद(र.)म्हणत असत, ‘‘माननीय इब्ने अब्बास(र.)हे दिव्य कुरआनचे उत्कृष्ट प्रवक्ते आहेत.’’ माननीय इब्ने उमर(र.)म्हणत असत, ‘‘आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर जो काही दिव्य बोध अवतरित झाला आहे, त्याचे सर्वांत जास्त ज्ञान माननीय इब्ने अब्बास(र.)यांनाच आहे.

माननीय उबैदुल्ला बिन अब्बास(र.)म्हणत असत, ‘‘मी माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्यापेक्षा मोठा प्रेषितप्रणालीचा जाणकार संशोधक आणि प्रगल्भित विद्वान पाहिलाच नाही.’’

माननीय उबई बिन कआब(र.)यांचे सुपुत्र माननीय इब्ने उबई(र.)यांनी कथन केले की, एकदा माननीय इब्ने अब्बास(र.)हे माझ्या वडिलांजवळ बसले होते. ते उठून गेल्यावर माझे वडील म्हणाले, ‘‘इब्ने अब्बास(र.)हे मुस्लिमांचे ‘हिब्र’(विद्वान) होतील.’’

इमाम जहबी(र.)यांनी आपल्या ‘दायरे मआरिफे इस्लामिया’ या ग्रंथात लिहिले आहे की, माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्या थोर विद्वान होण्यामागे पाच कारणे आहेत.

 1. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी प्रार्थना केली होती की, ‘हे ईश्वरा! यांना दिव्य ग्रंथाचे आकलन, धर्मज्ञान आणि कुरआनाच्या स्पष्टीकरणाची शक्ती प्रदान कर.’
 2. आदरणीय प्रेषितांच्या परिवारात धार्मिक शिक्षण मिळाले.
 3. मोठमोठ्या सोबत्यांकडून ज्ञान मिळाले.
 4. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड होती.
 5. साकल्यपूर्ण विचार करण्याची त्यांच्यात क्षमता होती.

माननीय इब्ने अब्बास(र.)यांना धार्मिक ज्ञानाबरोबरच इतर विषयांचेही भरपूर ज्ञान होते. ते साहित्य आणि कवनशास्त्रात तसेच भाषाशास्त्राच्या सर्वच विषयांत तरबेज होते. त्याचप्रमाणे गणित विषयात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. शिवाय अरबी शब्दकोश प्रेषित जीवनचरित्र वगैरे विषय यशस्वीपणे हाताळले.

प्रेषितकाळातील सर्वच विद्वानांची या गोष्टीवर सहमती आहे की, माननीय इब्ने अब्बास(र.)यांना दिव्य कुरआनच्या एकन् एक बाबीचे प्रगल्भ ज्ञान आहे. माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी दिव्य कुरआनच्या स्पष्टीकरणावर एक महान ग्रंथ लिहिला, ज्याचे नाव आहे, ‘तन्वीरुल मुकबास मिन तफसीर इब्ने अब्बास(र.)’.

माननीय इब्ने अब्बास(र.)यांना प्रेषितवचन शास्त्राची कमालीची आवड होती. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या मुखातून निघालेले एकन् एक शब्द ते जशास तसे लिहून ठेवीत असत व त्यांना मुखपाठ करीत असत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांनी प्रेषितसोबत्यांची भेट घेऊन प्रेषितवचने गोळा केली. अशा प्रकारे त्यांना हजारो ‘प्रेषित वचने’ मुखपाठ होती.

माननीय इब्ने अब्बास(र.)यांना ‘इस्लामी विधीशास्त्रा’ वर कमालीचे प्रभुत्व होते. त्याचे विधीशास्त्रावरील वीस खंडाचा एक ग्रंथ देखील आहे.(संदर्भ : तहेजीबुल तहेजीब)

याशिवाय साहित्य, कवनशास्त्र, भाषाशास्त्र आणि व्याकरणात त्यांना विशेष प्राविण्य होते. ते कवी मनाचे आणि मृदूस्वभावी असल्यामुळे त्यांच्या साहित्य आणि कवितासंग्रहात कमालीची भावुकता जाणवते. त्यांची भावुकता, मृदुता त्यांच्या लेखणी आणि रसनातून साखरेप्रमाणे पाझरत असे. यामुळे त्यांचे भाषण आणि वक्तृत्व अत्यंत प्रभावी व मनाला भुरळ पाडणारे व पाषाणहृदयी लोकांच्या थेट भावनांना हात घालणारे होते.

माननीय इब्ने अब्बास यांच्याकडे ज्ञान व विद्येची अमर्याद संपत्ती होती. ही संपत्ती त्यांनी केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या सहस्त्रावधी शिष्यांमध्ये सढळ हाताने लुटविली. ज्ञान प्रसारात विशेष रस असलेल्या या प्रगल्भित विद्वानाने हरतर्हेचे विषय आपल्या शिष्यांना शिकवून विद्येचा भरपूर विकास केला. अबू स्वालेह(र.)यांनी इब्ने अब्बास(र.)यांच्या पाठशालेत हजारो विद्यार्थ्यांचा जणसमुदाय पाहिला. त्यांच्या विद्यार्थीसंख्येच्या वाढीमुळे अक्षरशः रस्ता जाम होत असे.(संदर्भ : मुस्तदरक-ए-हाकिम) एकदा त्यांच्या घराबाहेर जमलेल्या प्रचंड विद्यार्थी जनसमुदायाची सूचना ‘अबू स्वालेह(र.)यांनी इब्ने अब्बास यांना दिली. तेव्हा त्यांनी वुजू करून(चेहरा, हात, पाय धुवून) आदेश दिला की, ‘दिव्य कुरआनचे स्पष्टीकरण आणि त्यातील रहस्यबोध जाणून घेऊ इच्छिणार्या लोकांनी आत यावे.’ अशा विद्यार्थ्यांना आत येण्याची सूचना ‘अबू स्वालेह(र.)’ यांनी करताच प्रचंड संख्येत विद्यार्थी घरात घुसले. यामुळे इब्ने अब्बास(र.)यांचा संपूर्ण वाडाच गच्च भरला. मग त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानपूर्वक उत्तर देऊन पाठविले. यानंतर त्यांनी विधीशास्त्र आणि प्रेषितवचन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना आंत येण्याची सूचना केली. यासाठीसुद्धा बरेच विद्यार्थी घरात दाखल झाले आणि त्यांचा भलामोठा वाडा गच्च भरला. यांनाही माननीय इब्ने अब्बास यांनी त्यांच्याही सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन रवाना केले. अशा प्रकारे ते प्रत्येक विषयाच्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे समाधान करीत असत. ‘अबू स्वालेह(र.)’ यांनी लिहिले की, एकाच गुरुवर्याकडे इतक्या विभिन्न विषयांचे एवढ्या प्रचंड संख्येत पहिल्यांदाच विद्यार्थी पाहिले.

इब्ने यसीर(र.)या इतिहासकारांनी लिहिले आहे की, इब्ने अब्बास(र.)यांना कोणत्याही विषयाबाबत प्रश्न विचारला तरी, ते त्याचे समाधानकारक उत्तर देत असत.

माननीय इब्ने अब्बास(र.)कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चासत्र भरविण्याकरिता आठवड्याचा एक दिवस निश्चित करीत असत. या चर्चासत्रामध्ये दिव्य कुरआन, प्रेषितवचन शास्त्र, इस्लामी विधीशास्त्र, इतिहासशास्त्र, साहित्य वगैरे विषय चर्चेसाठी घेण्यात येत असत.

या शिवाय नमाज झाल्यानंतरसुद्धा आपल्या अनुयायांना घेऊन धार्मिक प्रवचने देत असत. एवढेच नव्हे तर प्रवासात सुद्धा विद्यार्थी त्यांची आतुरतेने वाट पाहत असत आणि आपल्या समस्यांचे समाधान करून घेत असत. ते मदीना, कूफा, बसरा, ताईफ, दमास्कस अथवा कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रचंड समुदाय त्यांच्याकडे तुटून पडत असे.

‘सहीह मुस्लिम’ या ग्रंथात आहे की, जेव्हा इस्लामी शासनाच्या सीमा वाढून विस्तारित झाल्या आणि अरबी भाषा न जाणणार्यांचे देश इस्लामी शासनसीमेच्या प्रभावाखाली आले, तेव्हा अरबेतर जणांना कुरआनची अरबी भाषा समजत नव्हती. म्हणून इब्ने अब्बास(र.)यांनी त्यांच्या सवलतीसाठी कुरआनाचे प्रवक्ते आणि भाषांतरकार तयार केले आणि त्यांच्या मायबोलीमध्ये कुरआनाचा प्रचार व प्रसार केला.

माननीय इब्ने अब्बास(र.)हे विद्येचे सागर होते. तसेच विनयशीलतेचे पर्वतसुद्धा होते. त्यांच्या स्वभावात अतिशय नम्रता आणि मृदुता होती. ते इतरांचा खूप आदर व सन्मान करीत असत. ते मोठ्यांचा आदर आणि धाकट्यांवर दया करीत असत. आर्थिक दुर्बलांवर ते विशेष दयापूर्ण वर्तन करीत असत. ज्या काळात ते ‘बसरा’ चे राज्यपाल होते, तेव्हा त्यांच्याकडे एकदा माननीय अबू अय्युब अन्सारी(र.)आले आणि आपल्या आर्थिक अडचणीची व्यथा सांगितली. यावर इब्ने अब्बास(र.)यांचे अंतःकरण खूप पाणावले आणि त्यांनी त्यांना चाळीस हजार दिरहम(आजचे जवळपास सहा लाख रुपये), वीस नोकरचाकर आणि इतरही भरपूर वस्तू देऊ केल्या. कारण माननीय अबू अय्युब अन्सारी(र.)यांनी प्रेषित मुहम्मद(स.) यांचा मदीना स्थलांतर केल्यावर पाहुणाचार करण्याचे सौभाग्य मिळविले होते.(संदर्भ : सैर एअलानुल नबला, लेखक : हाफज जहबी(र.))

एकदा इस्लामचे थोर विद्वान माननीय झैद बिन साबित(र.)माननीय इब्ने अब्बास(र.)यांच्याकडे आले. जाताना माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी माननीय झैद बिन साबित(र.)यांच्या घोड्याचा लगाम पकडला. यावर माननीय झैद बिन साबित(र.)म्हणाले,

‘‘हे प्रेषितांच्या चुलत बंधु! असे करू नका. हे योग्य नाही. मी एवढा महान मानव नाही की, आपण माझ्या स्वारीची लगाम पकडावी.’’ यावर इब्ने अब्बास(र.)म्हणाले, ‘‘आपल्या विद्वान गुरुवर्यांचा अशाच प्रकारे आदर करावयास पाहिजे.’’ त्यांचे उत्तर ऐकून माननीय झैद बिन साबित(र.)त्यांच्या आदरातिथ्य व नम्रतेवर खूप प्रसन्न झाले आणि त्यांच्या हाताला धरून म्हटले,

‘‘मलासुद्धा प्रेषितांच्या नातलगांचा आदर करणे आवश्यक आहे.’’(संदर्भ : मुस्तदरक-ए-हाकिम)

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या स्वर्गवासानंतर माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी एका अन्सारी प्रेषितसोबत्यास म्हटले, ‘‘चला आपण प्रेषितसोबत्यांकडे ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी जाऊ या!’’ यावर ते अन्सारी म्हणाले, ‘‘हे इब्ने अब्बास(र.)! लोक आपल्याकडून ज्ञानार्जनाचे इच्छुक असताना आपणच त्यांच्याकडे कशासाठी निघाल?’’ माननीय इब्ने अब्बास(र.)यांनी त्यांच्या प्रश्नास कानाडोळा केला आणि यानंतर ते स्वतः लोकांकडे जाऊन त्यांना धर्मज्ञान देऊ लागले. ते या कामासाठी प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन घरावर थाप देऊन लोकांना बोलावीत असत व त्यांना ज्ञान शिकवीत असत. लोक त्यांना म्हणत की, ‘आपण कशाला एवढी तसदी घेता? आम्ही स्वतः आपल्याकडे आलो असतो.’ यावर ते म्हणत की, ‘‘हे तर माझे कर्तव्य आहे!’’

माननीय इब्ने अब्बास(र.)यांची आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर दृढ श्रद्धा होती. प्रेषितांच्या काळात त्यांचा पूर्ण वेळ अथवा जास्तीत जास्त वेळ प्रेषितांच्याच सान्निध्यात व्यतीत होत असे. ते आदरणीय प्रेषितांच्या प्रत्येक आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करीत असत. त्यांच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करीत असत. प्रेषितांच्या आज्ञेशिवायसुद्धा ते बरीच अशी कामे करीत असत, ज्यामुळे प्रेषितांना खूप आनंद व्हायचा आणि ते इब्ने अब्बास(र.)यांना आशीर्वाद देत.

ते मुस्लिम जनसमुदायाच्या माता अर्थात प्रेषितांच्या भार्यांचा अत्यंत आदर करीत असत. ते त्यांच्याकडून प्रेषितवचने ऐकत. प्रेषितभार्या सन्माननीय मैमुना(र.), ज्या इब्ने अब्बास(र.)यांच्या मावशीदेखील होत्या, यांचा स्वर्गवास झाल्यावर त्यांच्या मृत्यूसमयीची नमाज त्यांनीच पढविली.

संबंधित लेख

 • परलोकवरील श्रद्धेचा महत्त्वाचा पैलू

  जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच श्रद्धा मानवतेला वास्तविक व सुदृढ देणग्यांनी व सुखांनी अलंकृत करु शकते आणि भविष्यातील समृद्धी व उन्नतीचे आधार बनू शकते. या विश्वासाचा गाभा ईश्वरावर श्रद्धा व त्याच्याशी मनःपूर्वक प्रेम होय.
 • समृद्धी आणि धर्म

  इस्लामने त्याच्या अनुयायींना भौतिक समृध्दी विपुल प्रमाणात दिली. परंतु ही समृध्दी कोणत्या मार्गाने आणि कशी आली हे पाहणे आवश्यक आहे. जर धर्म फक्त आणि फक्त पारलौकिक जीवनासाठीच प्रशिक्षित करीत असेल आणि या जगाशी संबंध तोडत असेल तर या जगात यशप्राप्ती कशी होणार? एक व्यक्ती धर्मांवर पूर्ण आचरण करतो आणि त्याच वेळी या जगाच्या सुखांचासुध्दा उपभोग घेतो हे कसे शक्य आहे? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आणि या जटीलतेची उकल करण्यासाठी आपणास इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांचाच आधार घ्यावा लागेल.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]