Islam Darshan

इस्लामी विधिज्ञ माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)

Published : Sunday, Mar 06, 2016

सुफियान सुरी(र.)हे इमाम शैबी(र.)यांच्याद्वारे कथन करतात की,

एकदा कुरैश कबिल्याचे चार तरूण ‘पवित्र काबा’मध्ये एकत्र आले आणि चौघांनी निश्चय केला की, आपण ईश्वरदरबारी आपल्या जीवनाची सर्वांत मोठी महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करुन सर्वप्रथम एक तरूण उठला आणि त्याने प्रार्थना केली,
‘‘हे पालनकर्ता ईश्वरा! तू महान आहेस आणि तुझ्याकडून महान गोष्टींचीच मागणी करण्यात येते. म्हणून मी तुला तुझे महाआसन, तुझे पवित्र घर, तुझे प्रेषित आणि तुझ्या पावित्र्याची शपथ देऊन प्रार्थना करतो की, मला त्या वेळेपर्यंत जिवंत ठेव की, जोपर्यंत या संपूर्ण अरब प्रदेशावर माझ्या नेतृत्वाखालील ‘‘तुझे शासन प्रस्थापित होत नाही.’’

यानंतर दुसर्या तरुणाने प्रार्थना केली,
‘‘हे ईश्वरा! तू विश्वाच्या प्रत्येक वस्तूचा निर्माता आहेस. शेवटी प्रत्येक वस्तू तुझ्याकडेच परतणार आहे. तुझ्या प्रभुत्वाची शपथ, प्रत्येक बाब केवळ तुझ्याच ताब्यात आहे, मला तोपर्यंत जिवंत ठेव जोपर्यंत मी इराकचा इराकवरील तुझ्या शासनाचा प्रतिनिधी होत नाही.

यानंतर तिसरा तरूण उठला व त्याने प्रार्थना केली, ‘‘हे जमीन व आकाशाच्या स्वामी! मी तुझ्याकडे अशा गोष्टीची मागणी करतो की, ज्या गोष्टीची मागणी तुझ्या अज्ञाधारक दासांनी तुझ्याच आदेशावरून केली. मी तुला तुझी थोरवी व श्रेष्ठत्व, तुझी निर्मिती आणि हरम(ईश्वराचे घर काबा) वाल्यांची शपथ देऊन प्रार्थना करतो की, मला जगातून तोपर्यंत उठवू नकोस जोपर्यंत पूर्व-पश्चिमेवर माझे राज्य स्थापन होत नाही आणि माझ्याविरुद्ध उभा राहणार्यास ठेचून काढत नाही.’’
यानंतर चौथा तरूण उठला आणि प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा! तू परमदयाळू व कृपाळू आहेस. मी तुला तुझ्या दया आणि कृपेची शपथ देऊन प्रार्थना करतो की, अंतिम निवाड्याच्या दिवशी तू मला वंचित व अपमानित करू नये. आणि पारलौकिक जीवनात स्वर्ग प्रदान कर!’’

पहिले तरूण माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)हे होते. दुसरे त्यांचे धाकटे बंधु माननीय मुसअब बिन जुबैर(र.)होते, तिसरा तरुण हे अब्दुल मलिक बिन मरवान आणि चौथे तरुण की, ज्यांच्या जीवनाची सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा आणि मनोकामना केवळ परलोकाची भलाई होती, ते थोर इस्लामी विधिज्ञ ‘माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)होते.

अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची गणना मुस्लिम जणसमुदायाच्या धर्मगुरुंमध्ये होते. त्यांना सामान्यतः ‘इब्ने उमर(र.)(अर्थात उमरपुत्र) या नावाने संबोधित करण्यात येते. कारण ते माननीय उमर फारुक(र.)ज्यांच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी गौरवोद्गार काढले, ‘‘माझ्यानंतर कोणी जर प्रेषित असते, तर ते माननीय उमर फारूक(र.)असते, परंतु माझ्यानंतर कोणीही प्रेषित नाही.’’ इब्ने उमर(र.)यांच्या आईचे नाव ‘जैनब बिते मजऊन’(र.)होते. त्या ‘जमुह’ परिवारातील ‘मजऊन’ यांच्या कन्या होत्या. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या त्या सोबती श्रद्धावंतांच्या माता अर्थात प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या पत्नी सन्माननीय हफ्सा बिंन्ते उमर फारूक(र.)मा. अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची सख्खी बहीण होती. त्यांना प्रेषितांचे सोबती असण्याचे सौभाग्य लाभले होते.

प्रमाणसिद्ध कथनानुसार, माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)हे हिजरी सन पूर्व ११ मध्ये जन्मले आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. पिता माननीय उमर फारूक(र.)मुस्लिम झाल्याने ते देखील पित्याबरोबरच इस्लामच्या छत्रछायेत दाखल झाले. त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण शुद्ध इस्लामच्या वातावरणात झाले. हिजरी सन १ मध्ये माननीय उमर फारूक(र.)यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह मक्काहून मदीनेस स्थलांतर केले. या वेळी माननीय इब्ने उमर(र.)अकरा वर्षाचे होते. या कोवळ्या वयातच त्यांनी इस्लामरक्षणार्थ बदरच्या युद्धात सहभागी होण्याची प्रेषितांकडून परवानगी मागितली. परंतु वय लहान असल्याने त्यांना परवानगी नाकारण्यात आली. कारण आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) पंधरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना युद्धात सामील होण्याची परवानगी देत नसत. इब्ने उमर(र.)यांचे ‘बदर’च्या युद्धाच्या वेळी केवळ तेरा वर्षे वय होते. ‘ओहद’ च्या युद्धाच्या वेळीसुद्धा ते फक्त चौदा वर्षांचे असल्याने त्यांना धर्मयुद्धात सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांनी आपल्या जीवनात सर्वप्रथम गाजविलेले रणांगण म्हणजे ‘अखराब’ चे युद्ध होय. हे युद्ध हिजरी सन ५ मध्ये झाले आणि या वेळी जीवनातील पहिले युद्ध लढताना त्यांनी आपल्या युद्धकौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडविले. हिजरी सन ६ मध्ये त्यांना ‘बयअत-ए-रिझवान’ अर्थात हुदैबियाच्या तहापूर्वी घेण्यात आलेल्या प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले होते. अशा प्रकारे ईश्वराने स्पष्ट शब्दांत आपली प्रसन्नता ज्या सोबत्यांवर व्यक्त केली, त्या प्रेषितसोबत्यांत त्यांची गणना झाली. ‘सहीह बुखारी’ या हदीस संग्रहात आहे की, सौभाग्याने ‘बयअत-ए-रिझवान’मध्ये सामील होण्याचा पवित्रयोग त्यांना आपल्या वडिलांपूर्वीच प्राप्त झाला. त्याचे झाले असे की, माननीय उमर(र.)यांनी त्यांना एका अन्सारी मित्राकडून घोडा आणण्यासाठी पाठविले. ते बाहेर पडले तेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) सोबत्यांकडून प्रतिज्ञा(बयअत-ए-रिझवान) घेत होते. हे पाहताच त्यांनी प्रथम स्वतः प्रेषितांसमोर प्रतिज्ञा घेतली आणि मग पितावर्यांना कळविले. ते देखील तत्काळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि ‘बयअत-ए-रिझवान’ चे सौभाग्य मिळविले.

‘बयअत-ए-रिझवान’ नंतर माननीय इब्ने उमर(र.)यांनी ‘खैबर’, ‘फतह’, ‘हुनैन’, ‘ताइफ’ आणि ‘तबूक’ या युद्धांत आदरणीय प्रेषितांच्या सोबत रणभूमी गाजविली.

इमाम बुखारी(र.)यांनी मक्का विजयाच्या वेळी एका विलक्षण घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, या वेळी माननीय इब्ने उमर(र.)हे वीस वर्षांचे तरूण होते. ते विजेप्रमाणे वेगवान असलेल्या घोड्यावर स्वार होते. त्यांच्या अंगावर लहानशी चादर होती आणि हातामध्ये मोठा भाला होता. एके ठिकाणी थांबून ते घोड्यासाठी गवत कापू लागले. योगायोगाने आदरणीय प्रेषितांची त्यांच्यावर दृष्टी पडली

प्रेषितांनी मोठ्या गौरवपूर्ण शैलीत त्यांना बोलावले, ‘‘हे अब्दुल्लाह! हे अब्दुल्लाह!!’’
प्रेषितांची हाक ऐकून ते त्यांच्या पाठोपाठ मक्का शहरात दाखल झाले. माननीय उसामा बिन झैद(र.)हे प्रेषितांसोबत स्वार होते. त्याचबरोबर माननीय बिलाल(र.)आणि माननीय उस्मान बिन तलहा(र.)हे देखील त्या मोर्चात सामील होते. पवित्र ‘काबागृहाच्या’ प्रांगणात उंट बांधून ‘काबागृहा’ची चावी मागविण्यात आली आणि पवित्र ‘काबागृहा’ चे द्वार उघडून तिघे जण आंत दाखल झाले. यानंतर पवित्र काबागृहात सर्व प्रथम प्रवेश करण्याचे सौभाग्य माननीय इब्ने उमर(र.)यांना मिळाले.
हिजरी सन ११ मध्ये आदरणीय प्रेषितांचा मृत्यू झाल्यावर ‘इब्ने उमर(र.)’ यांना अपार दुःख झाले. या विरह दुःखामुळे त्यांनी जीवनभर आपले घरही बांधले नाही आणि एकही बाग लावली नाही. आदरणीय प्रेषितांची आठवण येताच ते ओकसाबोकशी रडत असत.

माननीय इब्ने उमर(र.)यांच्या मनामध्ये धर्मयुद्धाची अतिशय तळमळ होती. माननीय अबू बकर(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात काही कारणास्तव ते मदीनाबाहेर पडले नाहीत. परंतु माननीय उमर फारूक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात त्यांनी ईराण, सीरिया आणि इजिप्तच्या विजयात आपला सहभाग नोंदविला. त्यांचे पिता माननीय उमर(र.)हे स्वतः इस्लामी शासक असतानादेखील ते एक सामान्य योद्ध्याप्रमाणे इस्लामी लष्करात भरती झाले. त्यांनी कधीच कोणत्याही शासकीय पदाची लालसा बाळगली नाही. ‘वाकदी’ या इतिहासतज्ञाने बर्याच ठिकाणी त्यांचे युद्धकौशल्य आणि प्राणपणाला लावून शत्रूंशी झुंज देण्याचा उल्लेख केला आहे.

हिजरी सन २३ च्या शेवटच्या काळात इस्लामी शासक उमर फारूक(र.)यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या जीवित राहण्याची आशा उरली नाही. तेव्हा त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याची जवाबदारी मुस्लिम समुदायाच्या स्वाधीन केली. या गटामध्ये प्रतिष्ठित, विवेकशील व ईशपरायण असलेले प्रेषितसोबती होते. माननीय इब्ने उमर(र.)हे इस्लामी शासक उमर फारूक(र.)यांचे पुत्र आणि हरतर्हेची शासनपात्रता व ईशपरायणता त्यांच्यात असूनसुद्धा माननीय उमर फारूक(र.)यांनी त्यांना इस्लामी शासनाची धुरा सोपविली नाही. त्यांना ‘पित्यानंतर पुत्र’ अशा प्रकारची घराणेशाही मुळीच पसंत नव्हती. म्हणून मृत्यूपूर्वीच त्यांनी कडक सूचना दिली की, ‘‘माझा पुत्र इब्ने उमर(र.)हा इस्लामी शासक निवडण्याच्या समितीस केवळ आपले मत व अभिप्रायच देऊ शकतो, परंतु इस्लामी शासन सांभाळण्याकरिता त्याचे नाव मुळीच सुचविता येणार नाही.’’ माननीय उस्मान(र.)यांनी आपल्या इस्लामी शासनकाळात माननीय इब्ने उमर(र.)यांच्यासमोर न्यायाधीशाचे पद स्वीकारण्याची विनंती केली, परंतु त्यांनी हे पद स्वीकारले नाही. ‘बलाजुरी(र.)’ या इतिहासकारांनी ‘फतहुल बलदान’ या ग्रंथात लिहिले की, हिजरी सन २७ मध्ये इस्लामी शासक उस्मान(र.)यांनी आफ्रिकेच्या ट्यूनेशिया, अलजझायर आणि मोरॅक्को या प्रदेशांवर स्वार्या केल्या, तेव्हा इब्ने उमर(र.)यांनी या युद्धात मोठ्या आवेशाने रणभूमी गाजविली. ‘इब्ने यसीर(र.)’ या इतिहासकाराने लिहिले आहे की, हिजरी सन ३० मध्ये त्यांनी खुरासान आणि तब्रिस्तानच्या धर्मयुद्धातही भाग घेतला.

इमाम हाकिम(र.)यांनी आपल्या ‘मुस्तदरक’ या ग्रंथात लिहिले आहे की, इब्ने उमर(र.)यांच्या वयाच्या शेवटच्या काळात उमैया परिवाराचे जुलमी शासन होते. अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांनी इस्लामी शासनाची मक्का शहरात धुरा सांभाळली होती. उमैया परिवाराचा कठोरहृदयी शासक ‘अब्दुल मलिक बिन मरवान’ याने अब्दुल्लाह बिन जुबैर यांचे बंड ठेचून काढण्यासाठी क्रूरकर्मा ‘हिज्जाज बिन यूसुफ’ यांची नियुक्ती केली होती. ‘अब्दुल मलिक बिन मरवान’ आणि प्रेषितसोबती ‘अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)’ यांच्या दरम्यान यादवीने उग्र स्वरुप धारण केले होते. ‘अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)’ यांना पराभूत करण्यासाठी हिज्जाज बिन यूसुफने पवित्र ‘काबागृहा’वर दगडांचा तीव्र वर्षाव केला. ही घटना माननीय इब्ने उमर(र.)यांना माहीत होताच त्यांनी ‘हिज्जाज बिन यूसुफचा’ खरपूस समाचार घेतला. समाजात प्रतिष्ठित असलेल्या इब्ने उमर(र.)यांचा उघडपणे वध करण्याची त्याची हिम्मत नसल्याने त्याने विषात भिजवलेला भाला देऊन हस्तकास सांगितले की, ‘हज’च्या वेळी हा विषारी भाला इब्ने उमर(र.)यांच्या पंज्यात मारून गर्दीचा फायदा घेऊन पसार व्हावे.’ ठरलेल्या कूटनीतीप्रमाणे त्या हस्तकाने ‘हज’च्या वेळी त्यांच्या पायात गुपचुपपणे भाला मारला व गुपचूप पसार झाला. शेवटी याच विषारी भाल्याच्या जखमेने ते काही काळानंतर स्वर्गवासी झाले.

माननीय इब्ने उमर(र.)यांच्या सत्यसमर्थक, सडेतोड भाषणशैलीने आणि परखड वागण्यामुळे ते उमैया परिवाराच्या ‘अब्दुल मलिक बिन मरवान’ या शासकास नकोसे झाले होते. त्याच्या अरेरावी राज्यकारभारात सत्यवचनी आणि सद्वर्तनी इब्ने उमर(र.)एक भलेमोठे अडसर होते. ‘हिज्जाज बिन यूसुफ’ या अतिक्रूर असलेल्या ‘अब्दुल मलिक बिन मरवान’च्या राज्यपालाच्या डोळ्यात ते एखाद्या विषारी काट्याप्रमाणे सलत. परंतु रयतेची नाराजी ओढवण्याच्या भीतीने इब्ने उमर(र.)यांच्यासमोर ‘ब्र’ काढण्याची त्याची हिमत होत नसे.

इब्ने यसीर(र.)या इतिहासकारांनी लिहिले आहे की, एकदा राज्यपाल हिज्जाज बिन यूसुफ हा जुमाच्या(शुक्रवारच्या) नमाजपूर्वी सरकारी भाषण देत होता. त्याचे भाषण इतके लांबलचक झाले की, जुमाच्या नमाजची विधीवृत वेळ संपण्याच्या मार्गावर होती. समोर बसलेल्या माणसांपैकी कोणाचीच हिमत त्याला थांबविण्याची नव्हती. परंतु इब्ने उमर(र.)यांना राहवले नाही आणि त्यांनी उभे राहून त्यास दरडावले, ‘‘भाषण बंद कर! सूर्य हा मावळण्याकरिता तुझ्या आदेशाची वाट पाहणार नाही!’’ आधीच संतापी वृत्तीचा पाषाणहृदयी असलेला क्रूरकर्मा ‘हिज्जाज बिन यूसुफ’ संतापाने लाल भडक झाला आणि इब्ने उमर(र.)यांच्याशी वैर घेतले. शेवटी हिज्जाज बिन यूसुफने त्यांचा काटा काढूनच टाकला.

माननीय इब्ने उमर(र.)यांची मनोकामना होती की, त्यांचा स्वर्गवास मदीना शहरी व्हावा. परंतु दैवाने त्यांच्या जीवनाचा अंत मक्का शहरात केला. मृत्युपूर्वी त्यांनी आपले पुत्र सालिम(र.)यांना सूचना केली की, ‘‘मला पवित्र काबागृहाच्या हद्दीच्या बाहेर दफन करण्यात यावे. त्यांच्या पुत्राने पित्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु हिज्जाज बिन यूसुफने ती पूर्ण होऊ दिली नाही. त्याने ‘फतह-ए-मुहाजिरीन’च्या कब्रस्तानात त्यांना दफन केले.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)हे इस्लामी विधीशास्त्रात आणि इस्लामी ज्ञान संशोधनात पारंगत असलेल्या प्रेषितांच्या थोर विद्वान सोबत्यांपैकी होते. त्यांना वर्षानुवर्षे प्रत्यक्षपणे आदरणीय प्रेषितांकडून शिक्षण-प्रशिक्षण तर मिळालेच, शिवाय माननीय उमर(र.)त्यांचे पिता असल्याने त्यांच्यात इस्लामी स्वभाव आणि सद्वर्तनाचे वडिलांकडूनही धडे मिळाले. यामुळे ते ज्ञानविद्येच्या एवढ्या उंच शिखरावर विराजमान झाले की, इतर सर्व प्रेषितसोबतीसुद्धा त्यांच्या ज्ञानास प्रमाण समजत असत. दिव्य कुरआनचा गंभीरपणे अभ्यास करण्यात त्यांच्या जीवनाचा मोठा भाग खर्च झाला. इमाम मालिक(र.)यांनी आपल्या जगप्रसिद्ध ‘मौत्ता’ या ग्रंथात लिहिले आहे की, त्यांनी दिव्य कुरआनच्या ‘सूरह-ए-बकरा’च्या संशोधनात्मक अभ्यासावर जीवनाची चौदा वर्षे खर्च केली. आदरणीय प्रेषितांच्या काळात त्यांना प्रेषितांच्या थोर ज्ञानी सोबत्यांच्या ज्ञानसभेत भाग घेण्याचे सौभाग्य लाभत असे. अशा प्रकारे त्यांना दिव्य कुरआनचे अर्थ स्पष्ट करण्याच्या कौशल्यात असामान्य पात्रता लाभली होती.

‘सहीह बुखारी’ या हदीस(प्रेषितवचने) ग्रंथात आहे की, एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) आपल्या सोबत्यांना इस्लामी शिकवणी समजावीत हते. माननीय इब्ने उमर(र.)हे देखील या सभेत बसले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी दिव्य कुरआनची ही आयत पठण केली,

‘‘तुम्ही पाहत नाही काय की, ईश्वराने कशा प्रकारचे उदाहरण देऊन वर्णन केले आहे की, जसे एक पवित्र झाड, ज्याचे मूळ अतिशय मजबूत आणि ज्याच्या फांद्या आकाशास भिडलेल्या आहेत. जो आपल्या ईश्वराच्या आदेशावर प्रत्येक समयी फळे आणि मेवे देत असतो.’’(सूरह-ए-इब्राहीम)

यानंतर आदरणीय प्रेषितांनी सोबत्यांना विचारले, ‘‘यामध्ये कोणत्या झाडाचे उदाहरण देण्यात आले आहे? सगळेच सोबती गुपचुप बसले. नंतर स्वतः प्रेषितांनीच म्हटले, ‘‘यामध्ये खजुरीच्या झाडाचे उदाहरण देण्यात आले आहे!’’ हे ऐकून माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)आपल्या पित्या(माननीय उमर फारुक(र.)) कडे येऊन म्हणाले की, ‘माझ्या लक्षात आलेच होते की हे खजुरीच्या झाडाचे उदाहरण आहे. परंतु थोर, बुजुर्ग व वडीलधारी सोबती सभागृहात उपस्थित असल्याने त्यांच्यासमोर उत्तर देण्याचे माझे धाडस झाले नाही.’ माननीय उमर फारुक(र.)उत्तरले की, ‘‘बाळा! तू जर उत्तर दिले असते, तर मला खूप आनंद झाला असता!’’

दिव्य कुरआनप्रमाणेच हदीसशास्त्रात(प्रेषितवचन शास्त्रात) ते कमालीचे पारंगत होते. त्यांच्याकडून ‘१६३०’ एवढ्या प्रचंड संख्येत प्रेषितवचने कथन करण्यात आली आहेत. यापैकी १७० प्रेषितवचने(हदीस) ‘बुखारी’ आणि ‘तिर्मिजी’ या दोन्ही हदीसग्रंथात, तसेच ८१ एकट्या ‘सहीह बुखारी’ ग्रंथात, ३१ वचने ‘सहीह मुस्लिम’ या हदीस ग्रंथात, तर बाकीची वचने इतर हदीस ग्रंथात संग्रहित करण्यात आली आहेत. अशा रितीने ‘हदीस’च्या मुखपाठकांत ते अग्र स्थानावर विराजमान होते. या शिवाय त्यांना माननीय अली(र.), माननीय आयशा(र.)(प्रेषितांच्या सौभाग्यवती पत्नी), माननीय हफ्सा(र.)(प्रेषितांच्या सौभाग्यवती पत्नी), माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद(र.)माननीय बिलाल(र.), माननीय सुहैब रुमी(र.), माननीय झैद बिन साबित(र.)आणि माननीय राफेअ बिन खदीज(र.)सारखे थोर आणि हाडाचे शिक्षक असलेल्या विद्वान ‘प्रेषितसोबत्यांकडून’ इस्लामचे शिक्षण व प्रशिक्षण मिळाले होते. त्याचप्रमाणे सालिम(र.), उबैदुल्लाह(र.), मुहम्मद(र.)जाफेअ(र.), हफ्स(र.)उरवा बिन जुबैर(र.), मूसा बिन तलहा(र.), अबु सलमा बिन अब्दुर्रहमान(र.), सईद बिन मुसैअब(र.), कासिम(र.), अबु दरदा(र.), सईद बिन यसार(र.), अक्रमा(र.), मुजाहिद(र.), सईद बिन जबीर(र.), ताऊस(र.), अता(र.), अबू जबैर(र.)आणि अबी मलिका(र.)सारख्या प्रगल्भित विद्वानांचा त्यांच्या शिष्यगणांत समावेश आहे.

फक्ह(इस्लामी विधी) ज्याच्यावर इस्लामी धर्मशास्त्राची भिस्त आहे, माननीय इब्ने उमर(र.)यामध्येसुद्धा खूप पारंगत होते. माननीय इब्ने उमर(र.)यांचा बराच वेळ विधीशास्त्राच्या अभ्यासात, तसेच लोकांना धार्मिक शिकवण देण्यात व इस्लामी विधीनुसार फतवे देण्यात व्यतीत होत असे. ‘हाफज कय्यिम(र.)’ यांचे कथन आहे की, त्यांचे फतवे जमा केल्यास एक मोठा ग्रंथच तयार होईल. इमाम मालिकी यांच्या विधीशास्त्रात इब्ने उमर(र.)यांचेच जास्त पुरावे आणि प्रेषितकथने आहेत. आपल्या विधीशास्त्रातील पारंगततेमुळे त्यांना ‘फकीहुल उम्मत’(मुस्लिम समुदायाचे विधिज्ञ) म्हटले जाते.

धार्मिक विद्यांशिवाय माननीय इब्ने उमर(र.)हे अरबजणांतील इतर विद्यांमध्येसुद्धा पारंगत होते. अरबी साहित्य, भाषणकौशल्य आणि शिक्षणशास्त्रात त्यांना विशेष प्राविण्य होते. इब्ने साअद(र.)म्हणत असत की, त्या काळचे लोक प्रार्थना करीत असत की, ‘‘ईश्वरा! आमचे जीवन असेपर्यंत इब्ने उमर(र.)यांना जिवंत ठेव, जेणेकरून आम्हास त्यांचे मार्गदर्शन लाभावे. आज त्यांच्यापेक्षा जास्त प्रेषितकाळाचा जाणकार इतर कोणीच नाही.’’

माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)हे प्रेषितप्रेमी, प्रेषित जीवनचरित्रानुसार आचरण करणारे, ईशपरायण, धर्मयुद्धात रणभूमी गाजविण्याची मनोकामना, त्यागभावना, दानशूरता, नम्रता, विनयशीलता, निस्पृहता, साधेपणा आणि परखड भाषणशैली व यासारख्या अनेक गुणधर्मांचे स्वामी होते.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर इतके प्रेम होते की, ते आपल्या जीवनाचा बराच वेळ प्रेषितांच्या संगतीमध्येच व्यतीत करीत असत. आदरणीय प्रेषितांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांना अपार दुःख झाले. प्रेषितांची आठवण येताच त्यांचे अश्रू अनावर होत असत. प्रेषितकाळातील युद्धभूमीवरून गुजरताना त्यांना प्रेषितकाळ आठवत असे आणि त्यांच्या दुःखास पारावार राहत नसे. यह्या बिन यह्या(र.)म्हणतात की, ‘‘मी आपल्या धर्मशिक्षकांकडून ऐकले की, काही लोक इब्ने उमर(र.)यांचे प्रेषितप्रेम पाहून असे समजत असत की जणू ते प्रेषितप्रेमात वेडे झाले आहेत.’’ खरे पाहता माननीय इब्ने उमर(र.)यांचे जीवन प्रेषितप्रेमामुळे प्रेषितमय झाले होते. त्यांनी जीवनाचे प्रत्येक पाऊल प्रेषितांच्या पाऊलखुणांवर टाकले व प्रेषित जीवन चरित्रानुसारच आपले जीवन व्यतीत केले. प्रवासामध्येसुद्धा प्रेषितांनी नमाज अदा केलेल्या ठिकाणी नमाज अदा करीत असत. प्रेषितांनी आराम केलेल्या ठिकाणी आराम करीत असत. ज्या ठिकाणी प्रेषितांनी थोडा वेळ व्यतीत केला असेल, त्या ठिकाणी मुद्दाम थांबत असत. ज्या ज्या झाडाखाली प्रेषितांनी थंड सावलीत विश्रांती घेतली असेल, त्या झाडांना पाणी देत असत. प्रवासातून परतल्यावर सर्वप्रथम प्रेषितांच्या दफनस्थळी सलाम करीत असत. मदीना शहरावर एवढे प्रेम होते की, कोणत्याही परिस्थितीत ते शहर सोडायला तयार नसत. एकदा त्यांच्या गुलामाने आर्थिक तंगीमुळे मदीना शहर सोडण्याची परवानगी मागितली, तेव्हा इब्ने उमर(र.)म्हणाले, ‘आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की,
‘‘जो माणूस मदीना शहरात राहून येणार्या समस्यांना धैर्याने तोंड देईल, अंतिम निवाड्याच्या दिवशी मी त्यांची(मोक्ष मिळण्यास्तव ईशदरबारी) शिफारस करेन!’’

आदरणी प्रेषितांच्या संतती व नातलगांवरही त्यांचे खूप प्रेम होते. ते सर्वांना नेहमीच ‘प्रेषितसंतती’च्या श्रेष्ठत्वाची जाण करून देत असत. ही बाब सर्वमान्य आहे की, माननीय इब्ने उमर(र.)हे ‘हज’ विधीचे ज्ञाते होते. याचे कारणदेखील हेच आहे की, ते ‘हज’ ची विधी आदरणीय प्रेषितांच्या प्रणालीवर अगदी तंतोतंत पूर्ण करीत असत. एवढेच नव्हे तर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) ज्या मार्गाने हज यात्रा करीत, इब्ने उमर(र.)सुद्धा त्याच मार्गाने हज यात्रा करीत असत. आदरणीय प्रेषित ‘जुल हलीफा’ या ठिकाणी थांबून नमाज अदा करीत असल्याने इब्ने उमर(र.)सुद्धा त्याच ठिकाणी थांबून नमाज अदा करीत असत. प्रवासात ज्या ज्या ठिकाणी प्रेषितांनी पडाव टाकला, त्या ठिकाणी पडाव टाकत असत. ‘सहीद बुखारी’ या ग्रंथात आहे की, आदरणीय प्रेषित कधी घोड्यावर व कधी पायी मस्जिद-ए-कुबामध्ये दाखल होत असत, इब्ने उमर(र.)सुद्धा तसेच करीत असत. ‘बतहा’ या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी आदरणीय प्रेषित थोडा वेळ झोपत असत, इब्ने उमर(र.)सुद्धा असेच करीत असत. आदरणीय प्रेषित आपल्या लाडक्या सोबत्यांचे जेवणाचे निमंत्रण नेहमी स्वीकारत असत. इब्ने उमर(र.)सुद्धा कोणाच्याही निमंत्रणास नाकारत नसत. जीवनाच्या सर्वच कामात व कार्यात ते आदरणीय प्रेषितांच्या जीवनशैलीचे तंतोतंत पालन करीत असत.

माननीय इब्ने उमर(र.)यांचे अंतःकरण अतिशय मृदु आणि नाजुक होते. ईशपरायणता आणि अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या काळजीने ते थरथर कापत असत. अंतिम निवाड्यासंबंधी आणि ईश्वराच्या जाब विचारण्यासंबंधीचा कुरआनात आलेल्या उल्लेखावर ते चितित होऊन अश्रू ढाळत असत. एके दिवशी माननीय उबैद बिन उमर(र.)यांच्या तोंडून दिव्य कुरआनची ही आयत ऐकली,

‘‘हे प्रेषित! परलोक च्या या दिवशी काय अवस्था होईल, जेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून एक साक्षीदार उभा करू आणि आपणास या सर्वांसाठी साक्षीदार ठरवू.’’

ही आयत ऐकताच इब्ने उमर(र.)हे पारलौकिक चितेने रडू लागले. त्यांच्या अश्रूमुळे त्यांची दाढी आणि अंगरखा भिजून गेला.
त्यांच्या मनात धर्मयुद्धाची तीव्र मनोकामना होती. वयाच्या पंधरा वर्षापासून शेवटच्या काळात धर्मयुद्धात मोठ्या हिरीरीने सहभागी होत असत. त्यांचे राहणीमानही खूप साधे होते. ते नेहमी स्वतःची कामे स्वतःच करीत असत. अगदी साधा पोषाख वापरत असत. कधी कधी उंची पोषाख देखील वापरत, कारण त्यांनी दोन वेळा आदरणीय प्रेषितांना उंची पोषाख वापरताना पाहिले होते.

‘सहीह बुखारी’ ग्रंथात आहे की, त्यांच्याकडे बरीच शेती होती. त्यातून मिळणारे उत्पन्न ते रंजल्यागांजल्यांवर सढळ हाताने खर्च करीत. दीनदुबळे आणि पददलितांना पाहून त्यांचा आत्मा खूप तळमळत असत. कोणत्याही याचकास ते दारावरून परत करीत नसत. कित्येक गोरगरिबांचा उदरनिर्वाह त्यांच्या कमाईवर चालत असत. सामान्यतः एकटे कधीच जेवत नसत. एखादातरी गरीब पामर सोबत घेऊनच जेवत असत कधीकधी तर स्वतः उपाशी राहून दुसर्यांना पोटभर जेऊ घालत असत.
एकदा आजारी पडले. एका दिरहमचे काही द्राक्षे खाण्यासाठी घेतले. एवढ्यात एक याचक दारावर आला. त्यांनी ते द्राक्षे त्या याचकास दान करून टाकले. घरच्यांनी सांगितले की, द्राक्षे कशाला दिले, दुसरे काहीही खाद्यान्न त्यास दिले असते, परंतु त्यांनी घरच्यांचे न ऐकता त्यास द्राक्षे देऊन टाकले.

‘तबकात इब्ने साअद’ या ग्रंथात आहे की, एकदा त्यांच्याकडे एक हजार दिरहम(जवळपास एक लाख रुपये) आले. त्यांनी दोन्ही हातांनी लोकांना दान करून टाकले. दिरहम संपल्यावर त्यांनी लोकांकडून कर्ज घेऊन दान केले.
ते बर्याच वेळा उपवास धरीत असत. परंतु घरी पाहुणे आल्यास ते(ऐच्छिक) उपवास तोडून टाकत असत. आणि म्हणत की, ‘पाहुण्यासमोर उपवास ठेवणे पाहुणाचाराच्या शिष्टाचाराविरुद्ध आहे.

हाफीज इब्ने हजर अस्कलानी(र.)यांनी ‘इसाबा’ या ग्रंथात लिहिले आहे की, माननीय इब्ने उमर(र.)हे दररोज दोनदोन-तीनतीन हजार दिरहम दान करीत असत.(सध्याचे तीन ते चार लाख रुपये) आणि कधीकधी तर वीस ते तीस हजार दिरहम एकाच वेळी दान करीत असत.

त्यांना एखादा गुलाम अथवा दासी ईशपरायण दिसली की, ते त्यांना त्यांची खरेदी किमत देऊन मुक्त करीत असत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनात एक हजारपेक्षा जास्त गुलाम आणि दास्यांना खरेदी किमत देऊन मुक्त केले.
एकदा इब्ने उमर(र.)आपल्या मित्रांसह शहराबाहेर फिरायला गेले. दुपारी जेवणाची वेळ झाली. एवढ्यात एक गुराखी शेळ्या घेऊन जाताना दिसला. इब्ने उमर(र.)यांनी त्यास जेवणाचे निमंत्रण दिले. त्यावर गुराखी म्हणाला, ‘मला उपवास आहे.’ इब्ने उमर(र.)यांनी सांगितले, ‘एवढ्या रखरखत्या उन्हात तू उपवासही धरतो आणि बकर्यादेखील चारतोस. बरे एक सांग, तू दोन-चार शेळ्या आम्हाला विकून टाक.’ गुराखी म्हणाला, ‘‘या शेळ्या माझ्या मालकाच्या आहेत. मी चोरी कशी काय करू?’’ इब्ने उमर म्हणाले, ‘‘तुझ्या मालकाला सांगून दे की लांडगा घेऊन गेला.’ गुराख्याने आकाशाकडे बोट दाखवून सांगितले, ‘‘ईश्वरास काय उत्तर देऊ?’’ असे म्हणून तो लगबगीने आपल्या शेळ्या घेऊन निघून गेला. माननीय इब्ने उमर(र.)यांना त्याचे सद्वर्तन खूप आवडले. त्यांनी थेट त्याच्या मालकाचे घर गाठले व त्या ईशपरायण गुराख्यास मुक्त करून, पूर्ण शेळ्या खरेदी केल्या व गुराख्याच्या स्वाधीन केल्या.

एकदा प्रवासात असताना त्यांना एक खेडूत भेटले. इब्ने उमर(र.)यांनी पटकन घोड्यावरून उतरून त्यांना आलिगन दिले आणि आपल्या डोक्यावरील फेटा आणि घोडा त्यांना भेट म्हणून दिला. सहप्रवाशाने विचारले की, ‘इतक्या महागड्या वस्तू देण्याची काय गरज होती, खेडूत लोक तर हलक्याशा भेटवस्तूंनीसुद्धा आनंदीत होत असतात’. इब्ने उमर(र.)म्हणाले, ‘‘ते माझ्या स्वर्गवासी वडिलांचे मित्र आहेत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना असे म्हणताना मी ऐकले की, सर्वांत मोठे पुण्य हे आपल्या पित्याच्या मित्रांशी सद्वर्तन करणे होय!’’

माननीय इब्ने उमर(र.)यांच्याकडील गुलाम मुक्त होण्यासाठी ईशपरायणतेचा आव आणत असे आणि इब्ने उमर(र.)त्यांना मुक्त करीत असत. एकाने त्यांना जाणीव करून दिली की, हे गुलाम खरे ईशपरायण नसून आपण मुक्त करावे म्हणून ईशपरायणतेचा आव आणून आपणास धोका देत आहेत. इब्ने उमर(र.)म्हणाले, ‘‘यातच मी स्वतःस धन्य समजतो. जे लोक उपासनेच्या मार्गाने आम्हास धोका देतात, आम्हीदेखील हा धोका आनंदाने स्वीकारतो.’’

त्यांच्या हातून निघालेला पैसा ते परत कधी घेत नसत. माननीय अता(र.)कथन करतात की, ‘‘एकदा मी त्यांना दोन हजार दिरहम कर्ज दिले होते. त्यांनी ते परत केल्यावर वजन करून पाहिल्यास त्यांचे वजन दोन हजार दिरहमच्या प्रमाणित वजनापेक्षा जास्त निघाले. मी त्यांना याची कल्पना देऊन त्यांना अगाऊ वजनाचे जास्त आलेले दिरहम परत घेण्यास सांगितले. यावर ते म्हणाले, ‘‘आता मी हे परत घेणार नाही. जी अगाऊ रक्कम तुम्हास मिळाली ती तुमचीच आहे.’’
बर्याच वेळा ते आपल्यासाठी तयार केलेले जेवण गरिबांना देत असत. म्हणून त्यांची प्रकृती क्षीण झाली होती. लोकांनी त्यांच्या पत्नीस सांगितले की, ‘‘तुम्ही त्यांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही’’. यावर त्यांची पत्नी म्हणाली, ‘मी तरी काय करू! त्यांच्यासाठी मी चांगल्या प्रतीचा स्वयंपाक करून देते, परंतु ते स्वतः न खाता गरिबांना देऊन टाकतात.’ त्यांची ही सवय पाहून जेव्हा ते मस्जिदीच्या बाहेर निघत, तेव्हा त्यांच्या वाटेत बरेच दीनदलित रांग लावून उभे राहत असत. ते या सर्वांना आपल्याबरोबर घरी घेऊन जात आणि पोटभर जेवण करवूनच परत पाठवीत असत. एके दिवशी त्यांच्या पत्नीने जेवणाचे डबे तयार करून याचकांच्या घरी पाठविले आणि बजावले की, ‘‘आता यापुढे त्यांच्या रस्त्यात उभे राहात जाऊ नका. त्यांनी बोलावले तरी येऊ नका.’’ माननीय इब्ने उमर(र.)जेव्हा दुसर्या दिवशी मस्जिदमधून बाहेर पडले, तर रस्त्यात नित्यनेमाप्रमाणे त्यांना गरीब व अनाथांची अनुपस्थीती दिसली. ते खूप व्यथित झाले. घरी आल्यावर त्यांना सर्व हकीकत कळाली. ते पत्नीवर खूप संतापले आणि म्हणाले, ‘‘तुला काय वाटते की माझ्या भोजणपत्रावर गरीब व अनाथांनी जेऊ नये आणि त्यामुळे मीदेखील उपाशी राहावे?’’ त्यांनी त्या दिवशी अन्नपाणी न घेताच रात्र काढली.

विद्या, ज्ञान, प्रतिष्ठा, संपत्ती व समृद्धी असतानासुद्धा त्यांच्यात खूप नम्रता आणि विनयशीलता होती. ज्ञान, प्रतिष्ठा, संपत्ती आणि दानशूरतेचा त्यांना मुळीच गर्व नव्हता. ते नम्रता आणि उच्च नैतिकतेचे मूर्त स्वरूप होते. ते स्वतःहून लोकांना सलाम करण्यात पुढाकार घेत असत. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत व मालक-नोकर यांच्यात ते कोणताच भेदभाव पाळत नसत. ते म्हणत असत की, ‘मी बाजारात यासाठी निघत असतो की, मी लोकांना सलाम करावे आणि बदल्यात त्यांनी मला सलामाचे उत्तर द्यावे. अर्थात माझ्यासाठी सलामती व सुरक्षेची प्रार्थना करावी.

‘मुसनद अहमद’ या ग्रंथात आहे की, त्यांना स्वतःची प्रशंसा मुळीच आवडत नसे. एकदा एका माणसाने त्यांची प्रशंसा त्यांच्या तोंडावर केली. त्यांचा राग अनावर झाला व जमिनीची माती उचलून त्याच्या तोंडावर मारली आणि म्हणाले की, ‘‘आदरणीय प्रेषितांनी म्हटले की, तोंडावर प्रशंसा करणार्या लाळघोट्यांच्या तोंडावर माती फेकून मारावी.’’

एकदा त्यांच्या एका चाहत्याने त्यांना उंची पोषाख भेट म्हणून दिला. परंतु इब्ने उमर(र.)यांनी असे सांगून स्वीकारला नाही की, ‘‘यामुळे आमच्या स्वभावात फाजील अभिमान आणि इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होण्याची भीती आहे.’’
आपले गुलाम आणि नोकरचाकरांची ते परिवारजणांप्रमाणेच काळजी घेत असत. त्यांच्याशी गुलाम व नोकरांसारखा कधीच व्यवहार करीत नसत. प्रत्येक वस्तू सोबत घेऊन खात असत आणि आपल्या प्रत्येक सुखात त्यांना सहभागी करून घेत व त्यांच्या प्रत्येक दुःखात स्वतः सहभागी होत. एकदा त्यांच्या गुलामांना जेवण वाढण्यासाठी घरच्यांकडून उशीर झाला. यावर ते खूप नाराज झाले आणि म्हणाले, ‘नोकर व गुलामांना उपाशी ठेवणे हे खूप मोठे पाप आहे.’

भोजण करतेवेळेस दुसर्याचा गुलाम जरी आला तर त्यास भोजण करवूनच पाठवित असत. तसेच आपल्या गुलामांना सूचना देऊन ठेवल्या की, मला पत्र लिहितेवेळेस माझ्या नावापूर्वी तुम्ही स्वतःचे नाव लिहावे. त्या काळी परंपरा अशी होती की, आधी स्वामीचे व नंतर गुलामाचे नांव लिहिण्यात येई. (संदर्भ : सहीह मुस्लिम)

ते आपल्या विनयशील आणि नम्र स्वभावामुळे व उच्च नीतिमत्तेमुळे सामान्यजणांमध्ये इतके प्रिय झाले होते की, लोक त्यांची येण्याची अक्षरशः वाट पाहात असत. एकदा त्यांच्यासोबत मुजाहिद(र.)होते. त्यांना उद्देशून म्हणाले की, ‘लोकांचे माझ्यावर एवढे प्रेम आहे की, माझ्या जवळील सोन्या-चांदीच्या संपत्तीच्या बदल्यातही मी एवढे प्रेम खरेदी करू शकणार नाही.
माननीय इब्ने उमर(र.)यांच्यात निस्पृहतेचा मोठा गुणधर्म आढळतो. प्रेषित जीवनचरित्रानुसार जीवन जगण्यासाठी ते इतरांची भेट अवश्य स्वीकार करीत असे. परंतु आपल्या गरजेस्तव कोणासमोर हात देखील पसरवीत नसत. माननीय इब्ने साअद(र.)यांनी त्यांचे कथन कथित केले आहे की, ‘‘मी कोणालाही काहीच मागत नाही. परंतु कोणी काही दिलेच तर परतही करीत नाही.’’ एकदा त्यांची आत्या सन्माननीय रमला(र.)यांनी त्यांना दोनशे दिरहम पाठविले. त्यांनी त्यांचा साभार स्वीकार केला व त्यांना आशीर्वाद दिले.

एकदा अब्दुल अजीज बिन रशीद याने त्यांना पत्रात लिहिले की, ‘तुमची एखादी गरज असेल तर मला कळवावी मी तुमची अडचण दूर करीन.’ यावर त्यांनी पत्राच्या उत्तरात लिहिले की, ‘मी आदरणीय प्रेषितांकडून ऐकले की, ‘आपल्या परिवारजणांपासून(देवाणघेवाणीची) सुरुवात करावी आणि देणारा हात घेणार्या हातापेक्षा श्रेष्ठ असतो. मी तुमच्यासमोर मागणीही करणार नाही आणि आपण काही दिल्यास नाकारणारदेखील नाही.

एकदा माननीय अमीर मआविया(र.)यांनी त्यांना एक लाखाची रक्कम एका विशेष उद्दिष्टासाठी पाठविली परंतु त्यांनी स्वीकारली नाही.

धनदौलत आणि संपत्तीची त्यांच्या नजरेत कवडी किमत नव्हती. त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये त्यांना थोडी जरी शंका आली की, या भेटकार्यात प्रामाणिकता नसून स्वार्थ लपलेला आहे, तर ते भेटीचा वापर मुळीच करीत नसत.
माननीय इब्ने उमर(र.)यांनी मुस्लिम समुदायाच्या अंतर्गत कलहांमध्ये कधीच भाग घेतला नाही. सरकार विरोधातही कोणती भूमिका घेतली नाही. सत्यसमर्थनात कुठलेही भय न बाळगता सडेतोडपणे आपली भूमिका मांडत असत. ते बादशाहचीसुद्धा कानउघाडणी करीत असत. यामुळेच तर त्यांना प्राण गमवावे लागले.

माननीय इब्ने उमर(र.)हे मोठे विद्वान आणि विचारवंत होते. इतिहासकारनी त्यांचे काही सुविचारदेखील ग्रंथामध्ये कथन केले आहेत, ते याप्रमाणे,

 1. सर्वांत सोपे पुण्यकर्म हे माणसांशी आनंदाने भेटणे आणि त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करणार्या पद्धतीने बोलणे होय.
 2. विद्या व ज्ञान मिळवा मग शत्रूकडूनही का असेना.
 3. दुसर्यांच्यातील दुर्गुण शोधण्यापूर्वी स्वतःमधील दुर्गुण शोधावे.
 4. आपला संताप असा गिळावा जसे आपण मधुर रस पितो.
 5. एखादा माणूस ईश्वराच्या दृष्टीत कितीही श्रेष्ठ का असेना, परंतु त्यास जर ऐहिक संपत्तीचा थोडा भाग जरी मिळाला, तर ईश्वराजवळील त्याचा दर्जा खालावतो.
 6. माणूस केवळ अशा प्रसंगीच विद्वानांच्या रांगेत उभा असण्याच्या लायकीचा होतो की, जेव्हा तो आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असणार्याचा द्वेष करीत नाही व आपल्यापेक्षा कमी ज्ञान असलेल्यास कमी लेखत नाही. तसेच आपली विद्या इतरांना विकत नाही.
 7. नीतिमत्ता दूषित होणे हे श्रद्धा दूषित होण्याचाच परिणाम होय.
 8. अपराधच करायचा असेल, तर अशा ठिकाणी करावा की ज्या ठिकाणी ईश्वरच नाही.
 9. आराधनेचा गोडवा केवळ एकांतातच जाणवतो. मित्र आणि सवंगड्यांपासून दूर राहा, परंतु आधी आपल्या परिवारजणांसाठी रोजीरोटी कमवून त्यांना सुखाने खाऊ घाला आणि शांतपणे झोपवा.
 10. आदरणीय प्रेषितांच्या वचनावर प्रथम मी स्वतः कर्म करतो आणि नंतर लोकांना त्याची शिकवण देतो.

संबंधित लेख

 • इस्लाममध्ये व्यक्तीचे महत्त्व

  इस्लामी दृष्टिकोनानुसार मूळ महत्त्व समाजाला नसून व्यक्तीला आहे. याच कारणामुळे आपले उद्दिष्ट साधण्याकरिता, समाजापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व देतो. इस्लाम माणसाच्या अंतरात्म्याला इतका ज्ञानपूर्ण व सभ्य करु इच्छितो की, त्याने स्वेच्छेने आपल्या सर्व सामाजिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत. आपला व्यवसाय त्याने निवडावा, कारण कोणताही व्यवसाय सोडण्यासही त्याच्यावर काही बंधन नसते.
 • विश्वस्वामी

  याच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्त्वपूर्ण प्रसंगापैकी आहे. पृथ्वीचा खरा स्वामी एखाद्या देशात एखादी व्यवस्था संपुष्टात आणून दुसर्या व्यवस्थेचा निर्णय घेत असतो. सकृद्दर्शनी ज्याप्रकारे अधिकारसूत्राच्या हस्तांतरणाची बाब पूर्ण होत असल्याचे दिसत आहे, परंतु देशाची व्यवस्था खुद्द देशवासीयांच्या स्वाधीन केली जाण्याचे हे निर्णायक पाऊल आहे, अशी कुणाची फसगत होऊ नये. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत होते ते परत जात आहेत म्हणून देशव्यवस्था खुद्द देशवासीयांच्या हातात आली पाहिजे हे अगदी स्वाभाविक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]