
तबूक युद्धावरून परतल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) काही महिण्यांसाठी मदीना शहरीच वास्तव्यास राहिले. यादरम्यान त्यांनी माननीय अबू बकर(र) यांच्या नेतृत्वाखाली तीनशे जणांना ‘हज’ यात्रेवर रवाना केले.
माननीय अबू बकर(र) हज यात्रेस रवाना झाल्यावर ‘सूरह-ए-बरात’ची आयत अवतरली, ज्यामध्ये इस्लाम विरोधकांसाठी वचनभंग करण्याबाबतीत वर्णन होते. तो संदेश ‘हज’ संमेलनात पोहोचविण्याकरिता आदरणीय प्रेषितांनी आपले व्यक्तिगत सचीव माननीय अली(र) यांना रवाना केले की, जेणेकरून ते ‘हज’च्या संमेलनात ‘सूरह-ए-बरात’ विरोधकांसमोर वाचून दाखवतील.
रस्त्यात ‘माननीय अली(र)’ हे जेव्हा ‘हज’ यात्रेकरूंच्या काफिल्यात पोहोचले तेव्हा नियमानुसार ‘माननीय अबू बकर सिद्दीक(र)’ यांनी त्यांना विचारले की, ‘‘आपण कबिलाप्रमुखाच्या नात्याने आलात की आणखीन इतर उद्देशाने आलात?’’ तेव्हा ‘माननीय अली(र)’ यांनी त्यांना सांगितले की, ‘‘मी काफिलाप्रमुखाच्या नात्याने आलेलो नसून ‘सूरह-ए-बरात’च्या विरोधकांसमोर प्रेषितांचा संदेश वाचून दाखविण्यासाठी आलो आहे!’’
हा पहिलाच प्रसंग होता की ‘हज’चा विधी ही प्रेषित इब्राहीम(अ) यांच्या मूळ प्रणालीनुसार अदा करण्यात आला. दिव्य कुरआनने ‘हजविधी’मध्ये ज्या सुधारणा केल्या, त्या खालीलप्रमाणे आहेत.
उपरोक्त उल्लेखण्यात आलेल्या सुधारणांवरून हे लक्षात येते की, कोणतेही सुधारणावादी शासन आणि विशेष करून ‘इस्लामी शासन’ हे विभिन्न तर्हेच्या संस्था आणि प्रकरणांना जशासतसे चालू ठेवू शकत नसून उलट ते उपासना वा प्रार्थनाविधी, परंपरा आणि मानवी संबंधाच्या रचना व बनावटी, तसेच मानवी मूल्यांच्या क्रमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अज्ञानता अथवा असत्य किवा चुकीच्या प्रथांचा प्रभाव पाहते, त्या त्या ठिकाणी त्या असत्य व चुकींच्या प्रथा आणि इतर सर्वच चुकीच्या बाबींचा प्रभाव नष्ट करते. ईश्वराने तर धर्मा (आचरणविधी अर्थात इस्लाम धर्म) चा मूळ उद्देशच स्पष्ट शब्दांत असा सांगितला आहे की, पावित्र्यास अपावित्र्यापासून विभक्त करण्यात यावे.
माननीय अबू बकर सिद्दीक(र) जेव्हा मदीना शहरी परतले तेव्हा आदरणीय प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषित! माझ्याविरुद्ध एखादा ईश्वरी आदेश आला आहे काय?’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘नाही! मुळीच नाही!!’’ कारण या प्रश्नाचा उद्देश प्रेषितांना चांगलाच माहीत असल्याने ते पुढे म्हणाले, ‘‘हे उचित नव्हते की, माझ्या परिवाराव्यतिरिक्त दुसर्याने ‘समझोत्या’च्या बाबतीत घोषणा करावी!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या या स्पष्टीकरणांमुळे माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांना खूप समाधान झाले. माननीय अली(र) यांनी आदरणीय प्रेषितांच्या आदेशानुसार ‘सूरह-ए-तौबा’तील ‘बरात’ची घोषणा (अर्थात मुक्तीची घोषणा) वाचून दाखविली. ही घोषणा अशा प्रकारे होती.
कुरआनाच्या या मूळ आदेशामध्ये एकूणरीत्या अनेकेश्वरवाद्यांच्या अस्तित्वास एकार्थाने अवैध किवा बेकायदेशीर आणि कायद्याविरुद्ध घोषित करून त्यांना चार महिन्यांची मुदत विचार करण्यासाठी देण्यात आली की, त्यांनी अनेकेश्वरवादावर कायम राहून प्रेषितांशी लढायचे आहे की देश सोडून जावयाचे आहे की इस्लाम स्वीकारून शांतीपूर्ण जीवन जगावयाचे आहे, ते ठरवावे.
‘मदीना’ शहरात लोकांच्या झुंडी येऊ लागल्या
ईश्वराची ही विलक्षण महिमा आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा मानवोपकारी प्रेषित मुहम्मद(स) हे एकेका माणसास शोधून इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करीत होते आणि या प्रयत्नात मोठी बाधा येत असे. आता मात्र वेळ अशी आली की, अरब समाजाचे विभिन्न क्षेत्रांचे प्रतिनिधी मंडळ मोठ्या संख्येत प्रेषितदरबारी हजर होऊ लागले आणि स्वतःहून इस्लामच्या मानवकल्याण आंदोलनात सहभागी होऊ लागले.
इतिहासात अगणित उदाहरणे साक्षी आहेत की, प्रत्येक धर्मप्रचार किवा धर्मांदोलन जर आपल्यामध्ये एक क्रांतिकारी प्रेरणा आणि स्पीरिट ठेवीत असेल, अर्थात मानवी चरित्र आणि समाजाच्या सामूहिक व्यवस्थेची जी रचना पहिल्यापासूनच अस्तित्वात असेल, तिला तोडायचे अथवा बदलायचे असेल, तर त्यास म्हणजेच धर्मप्रचार आंदोलणास परंपरागत असलेल्या स्वार्थी शक्तींचा मुकाबला करावा लागतो. पावलोपावली संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष दोन अल्पसंख्याक असलेल्या तत्त्वांच्या दरम्यान होतो. या संघर्षात परंपरागत असलेल्या नेतृत्वाचा विजय झाला, तर जनसाधारण समाज आपल्या जागेवर जशास तसा राहतो. परंतु परिवर्तनवादी शक्ती विकसित होत गेली, तर सर्वसामान्य जनतासुद्धा या शक्तीकडे आकर्षित होत राहते. विशेषकरून ज्या प्रसंगी सर्वसामान्यांच्या लक्षात येत राहिले की, जुनाट परंपरागत नेतृत्व कोलमडत असून आता नवीन शक्तीचे भविष्य उज्ज्वल आहे, तेव्हा ते नवीन शक्तीचे नेतृत्व स्वीकार करतात व या शक्तीभोवती जमा होत जातात.
अरब प्रदेशातसुद्धा नेमके असेच घडले. मक्कातील कुरैश सरदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनास चिरडण्याचा जो भयानक प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध संघर्षाची जी शृंखला सुरु केली, त्यात ते सतत पराभूत होत गेले आणि त्यांची शक्ती कमी होत जाऊन प्रेषितांचे मानवकल्याणकारी आंदोलन प्रगती पावत गेले. एवढेच नव्हे तर विरोधी शक्तींचे कंबरडे मोडले. परिणामी अरब समाजाचे सर्व स्तरांतील लोक प्रेषितांच्या हातावर इस्लामची प्रतिज्ञा घेण्यासाठी मोठ्या संख्येत हजर होऊ लागले. म्हणूनच ‘हिजरी सन दहा’ हे वर्षच ‘साले वफूद’ अर्थात प्रतिनिधी मंडळ वर्ष या नावाने नामांकित झाले. तसे पाहता हि. स. नऊ पासूनच लोकांचे प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितांना भेटू लागले होते. दोन तीन प्रतिनिधी मंडळांचा मागे उल्लेख आलेलाच आहे. आता आणखीन काही प्रतिनिधी मंडळांचा या ठिकाणी उल्लेख करू या. कारण सर्वच प्रतिनिधी मंडळांचा उल्लेख करणे या ठिकाणी अशक्य आहे.
‘सकीफ’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परत येत असताना ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ यांनी रस्त्यातच प्रेषितांच्या सेवेत हजर होऊन इस्लाम स्वीकारला आणि आपल्या कबिल्यात इस्लामचा प्रचार करण्याची परवानगी मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी शंका व्यक्त केली की, ‘तुमच्या कबिल्याचे अडाणी लोक तुम्हास ठार करतील’ झालेही तसेच. ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ हे आपल्या घराच्या छतावर जाऊन आपल्या कबिल्याच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देत होते. तेवढ्यात लोकांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करुन त्यांना ठार केले. यानंतर त्या कबिल्याच्या लोकांनी सतत महिनाभर विचार केला की, आता आपण काय करावे? शेवटी ‘अब्द’ हा कबिल्याचा सरदार पाचसदस्यीय प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितदरबारी हजर झाला आणि त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर तीन विलक्षण प्रकारच्या अटी ठेवल्या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सुरुवातीच्या दोन्ही अटी मान्य न करता तिसरी अट मान्य केली. मग सर्वांनी प्रेषितांसमोर इस्लामची दीक्षा घेतली. नंतर प्रेषितांनी सोबत्यांचा एक समूह पाठवून ‘लात’ या दैवताची भव्य मूर्ती नष्ट केली.
‘हनिफा’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘यमामा’ या ठिकाणाहून शमामा बिन असाल(र) यांच्या प्रचारकार्याने प्रभावित होऊन तेथील लोक इस्लाम धर्मात दाखल झाले. त्यांच्यात मुसैलमा बिन कज्जाब नावाचा एक दांभिकदेखील होता. त्याने प्रेषितांच्या इस्लामी शासनात निम्मा वाटा मागितला. त्याला इस्लामी आंदोलन हे स्वार्थसाधूपणा वाटत असे. त्याने प्रेषितांकडे मागणी केली की, ‘‘आपल्यानंतर आपल्या जागेवर मला स्थानापन्न करावे, तरच मी इस्लामची दीक्षा घेईन.’’ प्रेषितांनी आपल्या हातात असलेल्या खजुरीच्या एका डहाळीकडे इशारा करीत त्यास उत्तर दिले की, ‘‘तुला तर ही डहाळीसुद्धा मिळणार नाही. कारण तू दांभिक आणि खोटारडा आहेस.’’
‘आमिर’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
आमिर परिवाराकडून एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले. बोलताबोलताच या मंडळाच्या एका सदस्याने मदीना शहरावर हल्ल्याची धमकी दिली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘ईश्वर तुला याची शक्ती देणार नाही.’’ हे मंडळ परत जाताना धमकी देणार्या या सदस्यास ‘प्लेग’ झाला व तो ठार झाला. बाकीच्या इतर सदस्यांनी इस्लामचा मनःपूर्वक स्वीकार केला.
अशा प्रकारे ‘फजारा’, ‘अब्दुल कैस’, ‘मर्रा’, ‘तै’, ‘हमदान’, ‘असद’, ‘अबस’, नजरान येथील ‘ख्रिस्ती समाज’ आणि इतर शेकडो प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार करून मानवकल्याण आंदोलनात सहभाग घेतला.