Islam Darshan

गरिबी व दारिद्र्यावर इस्लामी उपाय

Published : Sunday, Mar 06, 2016

गरिबी आणि दारिद्र्याच्या जाचास कंटाळून एक सत्यवान आणि निरपराधी वृत्तीचा माणूससुद्धा आपले चारित्र्य, शालीनता व ईमानदारी दोन पैशात विकून आपल्या निष्पाप परिवारजनांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो, त्याचे पाय कशाप्रकारे गुन्हेगारीकडे वळतात. तेव्हा गुन्हेगारी संपवायची असेल तर गरिबी आणि दारिद्र्याचे समूळ उच्चाटन व्हावयास हवे, असे इस्लामचे प्रांजळ मत आणि स्पष्ट भूमिका असून यावर इस्लामने अत्यंत ठोस व यशस्वी उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे मानवास निश्चितच प्रतिष्ठेची भाकरी, परिपूर्ण पोषाख आणि तनावमुक्त जीवनाचा निवारा लाभून अवघे आयुष्य सार्थक होईल. गरिबी-श्रीमंतीतील वैरभाव आणि इर्श्या व द्वेषाचे धगधगणारे निखारे थंड होतील आणि सर्वत्र स्नेह, प्रेम व बंधुभावाची शीतल छाया आणि मंजूळ वारे वाहतील. आता आपण गरिबी व दारिद्र्य निर्मूलताकरिता इस्लामने योजलेली ठोस उपाय योजना कोणती आणि कशी आहे, ते पाहू या.

जकात आणि तिचा विनियोग

इस्लामी कायद्याने माणसाला आपल्या कष्टाची कमाई खाण्याची शिकवण दिली आहे आणि हा सर्वोत्तम उपजीविका-प्रकार असल्याचे म्हटले आहे. मात्र या ठिकाणी ही शक्यता नाकारता येत नाही की, कधी त्याच्या हाताला कामच मिळू शकत नाही किंवा काम उपलब्ध असले तरी त्याच्यात काम करण्याची पात्रता असू शकत नाही किंवा त्याच्या कमाईपेक्षाही त्याचा खर्च वाढीव असू शकतो, किंवा त्याच्या कमाईपेक्षाही त्याचा खर्च वाढीव असू शकतो, किंवा त्याच्या घरच्या एखाद्या सदस्यास महारोग जडला असल्याने त्याच्या उपचारार्य कमाईच्या प्रमाणात जास्त खर्च होऊ शकतो, शिवाय तो कर्जबाजारीसुद्धा होऊ शकतो, कधीकधी अत्यंत विवश होऊन त्यास एखाद्या सावकारास अगर भांडवलदारास वेठबिगाराच्या स्वरुपात विकणेही भाग पडू शकते आणि शेवटी गरिबी आणि दारिद्र्याच्या दलदलीत जाऊन पडतो. मात्र इस्लामी व्यवस्थेने मानवास असे वार्यावर सोडून दिलेले नाही. अशा अवस्थेत इस्लामने जकात-व्यवस्था स्थापन करून त्यास प्रतिष्ठापूर्ण जीवनाची साधनसामग्री करून दिली. जकातीची रक्कम कोठे आणि कोणासाठी आहे, याचे विश्लेषण करताना कुरआनात म्हटले आहे,

‘‘हे दान तर खर्या अर्थी फकीर आणि गोरगरिबांसाठी आहे, आणि दान वसुलीच्या कामावर नेमलेल्यांसाठी आहे, आणि त्या लोकांसाठी ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे, तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरुंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-तौबा - ६०)

उपरोक्त आयतीवरून स्पष्ट होते की जकातीची रक्कम सर्वप्रथम गोरगरिबांना देऊन गरिबी आणि दारिद्र्याचा समूळ नाश करण्यात यावा. अर्थात संपत्ती ही केवळ श्रीमंतांच्याच हातात न राहता गरिबांनाही मिळावी आणि त्यांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागून प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे. संपत्ती ही सर्व सामान्यांमध्ये भ्रमण करीत राहावी. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘जेणेकरून संपत्ती तुमच्या श्रीमंतांदरम्यान भ्रमण करीत राहू नये.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हश्र - ७)

हीच गोष्ट प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अशारितीने स्पष्ट केली की,
‘‘त्यांना खबरदार करा की त्यांच्यावर जकात अनिवार्य करण्यात आली आहे, जी श्रीमंतांकडून वसूल करून गरिबांत वाटप करण्यात येईल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

यासंबंधी इस्लामी कायदा असा आहे की जी व्यक्ती आपल्या संपत्तीमधून ठराविक राशीत जकात देत नाही, इस्लामी शासन तिच्याकडून बलपूर्वक जकात वसूल करून पात्र व्यक्तींना अर्थात गोरगरिबांना देईल.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

वारसाहक्क संपत्तीचा विनियोग

एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संपत्ती स्थलांतरित करण्याचे आणखीन एक सशक्त माध्यम असे की मयत व्यक्तीच्या संपत्तीची त्याच्या वारसदारांमध्ये न्यायोचित वाटणी करणे होय. यासंबंधी इस्लामी कायद्यामध्ये काही ठराविक नियम घालून देण्यात आले आहेत. जर या नियमानुसार मयताच्या वारसदारांना संपत्ती मिळाली तर निश्चितच गरिबीला आळा बसून अपराधांचे अगर गुन्हेगारीचे उच्चाटन होईल. या वारसदारांमध्ये स्त्रियांचासुद्धा अधिकार आहे, हे विशेष यामुळे स्त्रियांनासुद्धा प्रतिष्ठेने जगण्याची संधी प्राप्त होते. कुरआनात म्हटले आहे,

‘‘पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे, जी आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली आहे आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे, जी आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल, मग ती कमी असो वा जास्त हा वाटा ईश्वराकडून ठरविलेला आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ७)

‘‘आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ आणि गोरगरीब आले तर त्यांनादेखील द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ८)

खूनभरपाई व गुन्हेगारीचे आर्थिक दंड

आजच्या या काळामध्ये माणूस गुन्हा करतो आणि शिक्षा होऊ नये म्हणून हजारो नव्हे तर लाखो रुपये खर्च करून तोंड लपवित फिरत असतो. मात्र इस्लामी कायद्याने म्हटले आहे की माणसाने एकतर अपराध करूच नये आणि यदाकदाचित त्याच्याकडून अपराध घडलाच तर त्याने अन्यायग्रस्ताची मनवळणी करून त्यास आर्थिक भरपाई द्यावी. कुरआनात म्हटले आहे,

‘‘कोणत्याही श्रद्धावंताचे(मुस्लिमाचे) हे काम नाही की त्याने इतर दुसर्या श्रद्धावंताची हकनाक हत्या करावी, आणि जर चुकून त्याकडून असे जर घडलेच तर याचे प्रायश्चित्त असे आहे की एका श्रद्धावंत गुलामास मुक्त करावे आणि मयताच्या वारसदारांना खून भरपाई द्यावी. मात्र अट अशी आहे की मयतांच्या वारसदारांनी(कोणत्याही दबावास बळी न पडता) खुन्यास माफ करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ९२)

अर्थातच जाणूनबुजून व हेतुपुरस्सर नव्हे तर चुकून जर कोणाची हत्या झाली तर हा ‘दैयत‘ म्हणजेच खूनभरपाईचा नियम आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे वारसदार जर खुन्यास संपत्ती वा पैशांच्या मोबदल्यात माफ करण्यास तयार असतील तर खुन्याने पैसा अगर संपत्ती खून भरपाईच्या स्वरुपात ते मागतील तेवढी देऊन स्वतःला मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचवावे. याशिवाय ‘दैयत‘ म्हणजेच गुन्ह्याचे आर्थिक प्रायश्चित्त करणे हे केवळ हत्येच्या अपराधास्तवच नव्हे तर एखाद्याने कोणी मारले वा जखमी केले किंवा एखादी शारीरिक इजा पोचविली किंवा हात तोडला, कानास इजा पोचविली अथवा डोळा फोडला तर यासाठीही ‘दैयत‘ अर्थात आर्थिक दंडाचे प्रायश्चित्त निश्चित करण्यात आले आहे. याच न्याय प्रक्रियेतून आर्थिक सुधारणाही होते आणि गुन्हेगारीला आळाही बसतो.

याचप्रमाणे इतर बर्याच चुकांसाठी प्रायश्चित्ताची व्यवस्था इस्लामने केली आहे. उदाहरणार्थ, रोजा(उपवासाच्या) च्या अवस्थेत पत्नीशी समागम केले, उपवास तोडला, शपथ तुटली तर यासारख्या चुकांवरसुद्धा गरिबांना आर्थिक मदत करून प्रायश्चित्त करणे भाग आहे. इस्लामी कायद्यात म्हटले आहे की, जर कोणी रोजाच्या(उपवासाच्या) अवस्थेत पत्नीशी समागम केले तर त्याने सतत दोन महिने रोजे ठेवून अगर साठ गरिबांना भोजन करवून आपल्या पापाचे प्रायश्चित्त करावे. अर्थातच या प्रकारांमुळे गरिबांचाच आर्थिक लाभ होय. कुरआनात म्हटले आहे,

‘‘हे लोक आपल्या पत्नींशी ‘जिहार‘ करतील आणि मग त्या आपल्या शब्दांपासून परत फिरतील जे त्यांनी उच्चारले होते, तर यापूर्वी की उभयतांनी एकमेकांस स्पर्श करावे, एक गुलाम मुक्त करावा लागेल. याद्वारे तुम्हाला उपदेश केल जात आहे, आणि जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे आणि ज्या व्यक्तीला गुलाम उपलब्ध होत नसेल, तिने दोन महिने उपवास करावेत, यापूर्वी की उभयतांनी एकमेकास स्पर्ष करावा आणि ज्याव्यक्तीस हे सामर्थ्यही नसेल, तिने साठ गरिबांना जेवण घालावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-मुजादिला - ३,४)

शपथ तोडण्याच्या प्रायश्चित्ताविषयी कुरआनात म्हटले आहे,

‘‘शपथ मोडण्याचे प्रायश्चित्त हे की, दहा गरिबांना जेवण घालावे, अथवा वस्त्र द्यावीत किंवा एका गुलामास मुक्त करावे आणि ज्याची ऐपत नसेल, त्याने तीन दिवस उपवास करावेत. हे तुमच्या शपथ मोडण्याचे प्रायश्चित आहे, आपल्या शपथांचे पालन करीत जा. अशा प्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करीत आहे. कदाचित तुम्ही कृतज्ञता दाखवाल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ८९)

याचप्रमाणे शरियतचे इतर नियम भंग झाले तर विविध प्रकारचे प्रायश्चित्त करण्याच्या पद्धती घालून दिल्या आहेत.

संबंधित लेख

  • अल्लाहवर श्रध्दा

    अल्लाहवर श्रध्दा ठेवण्याचा अर्थ- १. अल्लाहवर श्रध्दा ठेवणे म्हणजे त्याच्या अस्तित्वावर श्रध्दा ठेवणे. २. दिव्य कुरआनने नमूद केलेले आणि प्रेषित (स.) यांनी स्पष्ट केलेले सर्व ईश गुणविशेषांची साक्ष देणे. ३. अल्लाहच्या प्रभुत्वावर विश्वास ठेवणे. ४. अल्लाहच्या सर्व अधिकारांचा स्वीकार आणि अल्लाहच्या गुणविशेषांना अर्थहीन सिध्द करणाऱ्या कृत्यांचा अथवा विचारांचा अस्वीकार करणे.
  • पूर्व आशियातील आर्थिक अस्थैर्य

    पूर्व आशियातील काही राष्ट्रांनी जबरदस्त आर्थिक प्रगती केली असल्याने त्यांना पौर्वात्य वाघ(Eastern Tigers) म्हटले जाते. परंतु इ. स. १९९७ मध्ये त्यांच्यावर आर्थिक अस्थैर्याचे संकट आले. त्यांच्या शासनाची अर्थनीती अतिशय पोकळ नसूनसुद्धा या परिस्थितीचे काय कारण आहे? एवढेच नव्हे तर तेथील बजेटमध्ये सामान्यतः कोणतीच घसरण(Deficit) नसून उलट बचतच(Surplus) होती. शिवाय या देशातील एकूण बचती राष्ट्रीय उत्पन्नाच्या पस्तीस टक्के होती. ही बाब बर्याच प्रगत देशांसाठी अभिमानास्पद होती.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]