Islam Darshan

व्याज निषिद्ध असण्याचे काय कारण आहे?

Published : Sunday, Mar 06, 2016

‘व्याज’ ही इतकी वाईट बाब व महापाप आहे की, अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी त्या महापापीविरुद्ध युद्ध पुकारले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले की, व्याजाचा व्यवहार करणे हे छत्तीस वेळा व्यभिचार करण्यासम पाप आहे. प्रश्न हा आहे की, इस्लाम धर्मास व्याजव्यवहाराचा एवढा तिरस्कार व घृणा असण्याचे मूळ कारण काय आहे? इतर पापांविषयी एवढा तिरस्कार नसून शेवटी याच पातककर्माशी एवढी तेढ असण्याचे काय कारण आहे? या प्रकरणात याच प्रश्नाचे समाधान करण्यात आले आहे.

इस्लामेतर धर्मांमध्ये व्याजाची निषिद्धता

येथे ही बाब समोर ठेवणे आवश्यक आहे की, व्याजावर केवळ इस्लामनेच सक्तीने प्रतिबंध लावले नसून हिदू धर्म, ज्यू धर्म आणि ख्रिश्चन धर्मसुद्धा व्याजास मुळीच पसंत करीत नाही. ‘ज्यू’ धर्मियांच्या धार्मिक ग्रंथ ‘तालमोद’मध्ये व्याजाच्या देवाणघेवाणीस मानववधासम पाप ठरविण्यात आले आहे. ख्रिश्चनांच्या ‘बायबल’मध्ये व्याज घेणार्यास अन्यायी व अत्याचारी घोषित केले आहे. त्यांच्या तिसर्या लँटरन काँसिल(Third lateran Council) मध्ये इ. स. ११७९ साली हा ठराव पास करण्यात आला की, व्याज घेणार्याचा ख्रिश्चन धर्मपद्धतीने दफनविधी करू नये. ही बाबसुद्धा लक्षणीय आहे की, व्याजाचा दर कमी असो वा जास्त असो, त्याच्या निषिद्धतेवर काहीच फरक पडत नाही. म्हणून ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची दिसते की, सर्वच धर्मांमध्ये व्याजाविषयी एवढी तिरस्काराची भावना असण्याचे कारण काय?

कर्जाची गरज ही केवळ गरिबांनाच पडते काय?

भांडवलशाहीने प्रभावित असलेले व्याजाचे समर्थक व्याज निषिद्ध असण्याचा विरोध या आधारे करतात की, या संपूर्ण धर्मांमध्ये व्याज निषिद्ध असण्याचे कारण असे होते की, गरीब व आर्थिक मागासलेल्यांचे व्याजामुळे अतोनात शोषण होत असे. कारण ते वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्याजावर कर्ज घेत असत आणि व्याजासह कर्जाची परतफेड करण्याची ऐपत नसल्यामुळे भांडवलदार आणि सावकार त्यांच्यावर अत्याचार करीत असत व कर्जाच्या मोबदल्यात त्यांना गुलाम बनविण्यात येत असे. या अत्याचारी व अन्यायी परिस्थितीच्या आधारावर व्याज निषिद्ध असल्याचे ते मत व्यक्त करतात. त्यांचे असेही मत आहे की, वर्तमान काळात कर्ज हे व्यावसायिक गरजेपोटी घेण्यात येत असल्यामुळे व्याज निषिद्ध असण्याचे कारणच नाही. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे शोषण होत नाही.

परंतु खरे पाहता या युक्तिवादाचे समर्थन इस्लामी शिकवण आणि इस्लामी इतिहास पाहता मुळीच होत नाही. व्याजाचे समर्थक इतिहासातील या तथ्यापासून अनभिज्ञ आहेत अथवा जाणूनबुजून या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करीत आहेत, की इस्लामने समस्त मानवजातीच्या आणि विशेषतः आर्थिक मागासवर्गाच्या आर्थिक समस्यांचे समाधान करण्यासाठी केवढी महान क्रांती आणली आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवनाच्या अंतिम काळात जेव्हा व्याजावर सक्तीने प्रतिबंध लावण्यात आले, त्यावेळी इस्लामची कल्याणकारी व्यवस्था पूर्णतः लागू झाली होती आणि गरिबांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊन भांडवलदारांच्या जोखडात अडकण्याची मुळीच गरज भासत नव्हती. त्यांच्या गरजा इस्लामने नेमून दिलेल्या व्यवस्थेनुसार जकात, दानधर्म आणि वेळप्रसंगी व्याजमुक्त कर्जामुळे पूर्ण होत असत.

येथे कदाचित आपणास प्रश्न पडत असेल की, मग कर्जाची गरज गरिबांना भासत नव्हती, तर मग कोणाला भासत असे? याचे उत्तर अगदी सरळ व साधे आहे. कर्जांची गरज गरिबांना नव्हे तर व्यावसायिक व व्यापार्यांना भासत असे. कारण व्यवसायासाठी मालाची खरेदी, दळणवळणाची साधने वगैरेंसाठी पैशांची गरज भासत असे. माल या स्थानावरून त्या स्थानावर पोहोचविण्यासाठी चांगलीच मुदत लागत असे. या व्यवसायात नफ्याबरोबरच तोटा होण्याचीसुद्धा संभावना असे. इस्लामच्या कल्याणकारी व्यवस्थेत ही बाब मुळीच स्वीकारणीय नव्हती की, भांडवलदार वा सावकाराने केवळ भांडवलपुरवठा करून आणि कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता नफा आणि नुकसान या दोन्हीही परिस्थितीत एका ठराविक दराने व्याज घ्यावे आणि बिचार्या व्यावसायिकाने संपूर्ण प्रकारचे कष्ट करूनही पूर्ण नुकसान सहन करावे. म्हणूनच इस्लामने व्याजाचा समूळ नायनाट करून भांडवलपुरवठा करणार्यासाठी हे नियम सक्तीने लागू केले की, भांडवलपुरवठा केल्यास त्याने व्यावसायिकाच्या नफा आणि तोटा या दोन्हीत समानरीत्या सामील असावे.

यावरून हे स्पष्ट होते की, इस्लामने व्याज निषिद्ध ठरविण्याचे मूळ कारण हे केवळ गरिबांचे शोषण नसून सर्वच मानवजातीचे शोषण अन्याय व असंतुलन होय. गरिबांचे वैयक्तिक व आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी तर इस्लामने जी क्रांतिकारी भूमिका पार पाडली, ती बाब तर मानवकल्याणाच्या इतिहासात स्पष्टपणे दिसते. एवढेच नव्हे, तर इस्लामने आर्थिक प्रश्नांबरोबरच जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये न्याय प्रस्थापित केला. हीच गोष्ट प्रेषितांच्या अवतरणाचे सर्वात मोठे ध्येय आणि उद्दिष्ट असल्याचे दिव्य कुरआनने ‘सूरह-ए-अंबिया’ मध्ये म्हटले आहे. यावर वेगळी चर्चा केल्यास एका मोठ्या ग्रंथाची गरज आहे. येथे यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही.

व्याज आणि मानवकल्याण

इस्लाममध्ये न्यायाची जी अतिविस्तीर्ण आणि अत्युच्च कल्पना आहे ती केवळ गरिबांचे शोषण थांबविणे आणि भांडवलदार व व्यापार्यांदरम्यान न्याय प्रस्थापित करण्यापुरतीच मर्यादित नाही. न्याय प्रस्थापित होण्यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की, अल्लाहचा प्रतिनिधी असलेल्या मानवास अल्लाहने प्रदान केलेल्या सर्व साधनांचा वापरर समस्त मानवजातीच्या परिपूर्ण कल्याणासाठी करायला हवा आणि हे केवळ अशा परिस्थितीमध्येच शक्य आहे की, आपण या साधनांचा कौशल्यपूर्ण वापर योग्य गतीने आर्थिक प्रगतीसाठी करावा आणि कमीतकमी निम्नोल्लेखित चार हेतु जास्तीत जास्त एका संतुलित(Optimum) पद्धतीने साध्य व्हावेत.

  1. समस्त मानवजातीच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात.
  2. समस्त मानवांना त्यांच्या पात्रतेनुसार प्रतिष्ठित रोजगार त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी मिळावा.
  3. कमाई आणि संपत्तीमध्ये न्यायपूर्ण वाटणी व्हावी.
  4. सांपत्तिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे.

या हेतुंची पूर्तता केवळ अशाच परिस्थितीत होऊ शकते की, जेव्हा संपूर्ण जीवनव्यवस्था आणि विशेषतः अर्थव्यवस्था व अर्थनीती वरील चार हेतुंशी समरूप असावी. याच अर्थनीतीचा पाया रोवण्यासाठी अल्लाहने व्याजाचा व्यवहार निषिद्ध ठरविला, त्याचप्रमाणे याच कारणास्तव समस्त धर्मात याचा तीव्र धिक्कार आणि निषेध करण्यात आला. या प्रकरणात प्रामुख्याने थोडक्यात हेच स्पष्ट करावयाचे आहे की, व्याजाच्या आधारावर प्रस्थापित असलेली, अर्थव्यवस्था कशा प्रकारे, वरील चार हेतु साध्य करण्याच्या मार्गात अडसर ठरते आणि व्याजमुक्त अर्थव्यवस्थेच्या पुनर्व्यवस्थापन व कर्जांवर कमी अवलंबून असणार्या अर्थव्यवस्था कशा प्रकारे या हेतुंच्या पूर्ततेत जास्तीत जास्त प्रभावी भूमिका पार पाडतात.

जीवनावश्यक गरजांची पूर्तता:

व्याजव्यवस्थेत सामान्यतः अशा लोकांनाच कर्ज मिळते, ज्यांच्याकडे पुरेशी संपत्ती(Collateral) जामीन ठेवण्यायोग्य असते. याशिवाय त्यांच्याकडे पैशांची एवढी आवक व रेलचेल(Cash Flow)असावी लागते की, त्यामुळे बँकेस या गोष्टीचे समाधान व्हावे की, कर्ज घेणारा व्याजासकट आपले कर्ज फेडू शकतो. कर्ज घेण्याच्या कारणाची मीमांसा होते. परंतु कर्जाची रक्कम कशापायी वापरण्यात येणार, याकडे पाहिजे तेवढे लक्ष देण्यात येत नाही. हेही खरे आहे की, जामीनयोग्य संपत्ती आणि भक्कम आर्थिक परिस्थिती कर्जफेडीसाठी आवश्यक आहे. परंतु केवळ याच दोन गोष्टींकडे जास्त लक्ष पुरविण्यात येत असल्याने कर्जाच्या रकमेच्या वास्तविक वापराकडे पार दुर्लक्ष होत असते. म्हणून कर्जपुरवठा सहसा श्रीमंतांनाच अथवा शासनांना होत असतो. कारण श्रीमंत अथवा शासन कर्ज फेडण्याइतपत पात्र असतात. त्यांच्याकडे पैशांची भरपूर आवकजावक आणि रेलचेल असते.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, श्रीमंत वर्ग आणि शासन कोणत्या हेतुसाठी कर्ज घेते? अर्थातच या कर्जाची रक्कम वैयक्तिक हेतुसाठी अथवा भांडवलनिर्मितीसाठी वापरण्यात येते आणि ही भांडवलनिर्मिती उद्योगात न लावता जुगार व सट्टा आणि याच प्रकारच्या धंद्यावर लावण्यात येते. अशा प्रकारे सामाजिक साधनांवर गरजेंपेक्षा जास्त बोजा वाढतो. आधीच तुटपुंजी असलेली साधने आणि त्यातल्यात्यात श्रीमंतवर्गाकडून पैशांची उधळपट्टी(Living beyond means)होत असल्याने जीवनावश्यक गरजा पूर्ण तर होत नाहीतच, शिवाय निर्मिती उद्योगात आवश्यक असलेले भांडवल कमी पडते. अर्थातच या गोष्टीचा दुष्परिणाम गरिबांनाच भोगावा लागतो.

श्रीमंतांच्या जीवनावश्यक गरजां तर आपोआप पूर्ण होतात, परंतु जीवनावश्यक वस्तुंच्या अपूर्ततेची झळ गरिबांना सोसावी लागते. यामुळेच आज अतिप्रगत असलेल्या अमेरिकासारख्या राष्ट्रालासुद्धा गरीब जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे अशक्य होऊन बसले आहे.

ही केवळ कल्पना नसून एक अतिशय कडवे सत्य आहे.
पाश्चात्य देशांच्या प्रगतीच्या रहस्यांपैकी एक रहस्य हेसुद्धा आहे की, तेथील श्रीमंतवर्ग साधे जीवन जगत आहे. तेथील शासनांनी राष्ट्रीय साधनांवर जास्तीत जास्त विश्वास केला आणि कर्ज कमीतकमी प्रमाणात घेतले. या कारणांमुळे त्यांच्यावर कर्जांचे ओझे खूप कमी पडले, परिणामी प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या योजनांवर जास्तीत जास्त खर्च करणे शक्य झाले.

रोजगाराच्या संधी

व्याजावर आधारित व्यवस्थेमुळे लोकांमध्ये उधळपट्टीची जी मानसिकता निर्माण होते, त्यां मानसिकतेमुळे जगातील सर्वच राष्ट्रांतील बचतीमध्ये कमतरता येते. मागील शतकाच्या उत्तरार्धात जगातील सरासरी उत्पन्न आणि घरगुती बचतीचे प्रमाण २६.२*(इ.स.१९७१) इतके होते. परंतु हेच प्रमाण १९९८ मध्ये २२.३* इतके झाले. औद्योगिक देशांतील बचत २३.६* नी घसरून २१.६* वर येऊन पोहोचली. त्याचप्रमाणे वित्तवृद्धी आणि कर्जफेडीत उल्लेखणीय वृद्धी. शिवाय प्रगतीची गती वाढविण्यासाठी बचतीत वाढ करण्याची नितांत गरज असलेल्या देशांतसुद्धा या काळात बचतीचे प्रमाण ३४.२ टक्क्यांवरून घसरून २६ टक्क्यांवर येऊन पोचले आहे. बचतींच्या या चिताजनक घसरणींच्या कारणांपैकी एक मोठे कारण हे शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील अनिर्मित खर्चांत उल्लेखनीय वाढ होय. अर्थात ही वाढ व्याजव्यवस्थेमुळेच होत असते.

यामुळे वास्तविक व्याजदरात(Real rate of Interest) वाढ आणि सार्वजणिक भांडवल गुंतवणुकीत कमतरता निर्माण होते. याच बाबींमुळे इतर सामाजिक वित्तीय आणि राजकीय क्षेत्रात मरगळ(Structural Rigidities)निर्माण तर झालीच, परंतु त्यापेक्षाही जास्त म्हणजे रोजगाराच्या संधीत योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. अशाप्रकारे जगातील सर्वच देशांमध्ये सरसकट श्रीमंत व गरीबांमध्ये बेरोजगारीचे उग्र संकट भेडसाऊ लागले. यूरोपीय युनियनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १९९९ मध्ये ९.२ टक्के होते. १९७१ ते ७३ इ. सनातील प्रमाणापेक्षा हे प्रमाण तीनपटीने वाढले.(संदर्भ:Oecd, Economic Outlook, December 1991, Table 2, P-7, And June 2000, Table 22, P. 266) भविष्यातही या देशातील बेरोजगारीत उल्लेखणीय कमतरता येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण या देशात वित्त प्रगतीचा वास्तविक दर(Real)हे बेरोजगारी कमी करण्यासाठी आवश्यक दरापेक्षा सतत कमी होत आहे. यात सर्वांत जास्त चिताजनक बाब तरूणांच्या बेरोजगारीच्या दरात लक्षणीय वाढ ही होय. या बेरोजगारीमुळे तरूणांचा स्वाभिमान दुखावतो आणि भविष्यावरील विश्वास नष्ट होतो. त्याचबरोबर त्यांच्यात वैफल्य निर्माण होऊन समाजाशी द्वेष निर्माण तर होतोच, शिवाय त्यांच्यात निर्मिती व उद्योगाची पात्रतासुद्धा नष्ट पावते.

येथे प्रश्न असा निर्माण होतो की, अमेरिकेमध्ये गृहबचतीचे प्रमाण शुन्यापेक्षाही कमी असूनसुद्धा आर्थिक प्रगती जास्त असून बेरोजगारीचे प्रमाण एवढे कमी कसे काय आहे? याच्या बर्याच कारणांपैकी एक मोठे कारण असे आहे की, अमेरिकेत विदेशी बचतींचा प्रवाह(Inflow) होय. यामुळे तेथील भांडवलनिर्मितीत वाढ झाली. जर काही कारणास्तव ही विदेशी गुंतवणूक परत व्हायला लागली अथवा तिच्या आवकीमध्ये कमतरता निर्माण झाली, तर मात्र ही आर्थिक प्रगती आणि रोजगाराच्या संधी स्थिर ठेवणे कठीण होऊन बसेल. जर या कारणास्तव डॉलरच्या भावात(Exchange Rate) लक्षणीय घसरण निर्माण झाली अथवा जगातील डॉलरवरील विश्वास संपला, तर जगातील अर्थव्यवस्था(Finance System) सुद्धा इ. सन १९७१ प्रमाणेच कोलमडून जाईल.

जुगार, सट्टा, अनावश्यक खर्च किवा पैशांचा अपव्यय व उधळपट्टी कमी आणि बचतींमध्ये वाढ झाल्यास वित्तवृद्धी चांगल्यारीतीने होऊ शकते. परंतु हे मात्र केवळ अशा परिस्थितीतच शक्य आहे की, जेव्हा शासकीय आणि खाजगी क्षेत्रांत अनिर्मिती साधनांपेक्षा निर्मिती व उद्योगकार्यांना जास्त प्रोत्साहन देण्यात येत असेल. परंतु हे केवळ व्याजमुक्त अर्थव्यवस्थेतच शक्य आहे. कारण व्याजव्यवस्थेमध्ये निर्मितीसाधानांवर नव्हे, तर जुगार व सट्टा यासारख्या अनिर्मित साधनांनाच जास्त प्रोत्साहन मिळते. याऐवजी निर्मितीउद्योग क्षेत्रांत बँक भांडवल गुंतवून मिळणार्या नफा व तोट्यात सहभागी झाले व कर्जपुरवठा केवळ आवश्यक वस्तु आणि सेवा(Real Goods and Servcies) यांच्या निर्मितीसाठी केला तर याचा परिणाम असा होईल की, कर्ज देण्यात बँका दक्षता तर बाळगतीलच, शिवाय अर्थ-प्रगतीच्या प्रमाणात कर्जात वाढ होईल. अनिर्मित वा जुगार व सट्टयांत अर्थोपयोगाचे प्रमाण कमी होऊन निर्मितीउद्योग व जीवनावश्क गरजपूर्तीसाठी जास्तीत-जास्त साधने निर्माण होतील. याच व्याजमुक्त व्यवस्थेला इस्लामी अर्थव्यवस्था असे म्हणतात. यामुळे प्रगतीमध्ये लक्षणीय वाढ तर होईलच शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आपोआपच बेरोजगारी दूर होईल.

संपत्तीची न्यायपूर्ण वाटणी

व्याजावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थेतील वित्तसाधनांची होत असलेली असमान वाटणी आता सर्वांनाच चांगल्याप्रकारे लक्षात येत आहे. ‘आर्नी बिग्स्टन’(Arne Bigsten) नुसार, भांडवलवाटणी ही जमीनवाटणीपेक्षाही जास्त असमान असून वर्तमान बँक व्यवस्था ही या असमान वाटणीस आणखीनच जास्त स्थैर्य प्रदान करीत आहे. याचे एक मोठे कारण तेच आहे जे आपण मागे पाहिले, अर्थात व्याजावर आधारित अर्थव्यवस्था ही परतफेडीच्या जामीन व हमी(Collateral) वर जास्त अवलंबून आहे. बँकांमध्ये बचत म्हणून ठेवलेल्या ठेवी समाजातील असंख्य सामान्यजणांच्या असूनदेखील या ठेवींचा लाभ मात्र केवळ श्रीमंतांनाच होतो. ‘मीशान’(Mishan) याने खरे म्हटले आहे की, ‘संपत्तीच्या वाटणीत मुळीच समानता नसल्यामुळे कर्ज देणार्यासाठी ही बाब अत्यंत अन्यायी व बुद्धीला न पटणारी आहे ते गरीबांना कर्ज देण्याऐवजी श्रीमंतांनाच कर्ज देतात. खरे पाहता बँकेत जमा असलेले भांडवल हे गरिबांच्या व सामान्यांच्या ठेवीमुळेच जमा झालेले असते. परंतु त्याचा लाभ गरिबांना न मिळता श्रीमंतांना मिळतो. ही बाबच मुळात न्यायास अनुसरून नाही. ‘मार्गन गॅरंटी ट्रस्ट कंपनी’(Morgan Guarantee Trust Company) ही अमेरीकेतील मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. या बँकेने हे स्वीकार केले आहे की, आजपर्यंत लघुउद्योगांना भांडवलपुरवठा तिने तिच्याकडे फाजील भांडवल उपलब्ध असूनसुद्धा केला नाही. ती केवळ मोठमोठ्या व्यावसायिक व श्रीमंतांनाच व्याजावर कर्जपुरवठा करते.

हा अन्याय आहे व्याजव्यवस्थेमध्ये, परंतु याच्या अगदी उलट इस्लामी अर्थव्यवस्था आहे. या व्यवस्थेत नफा व तोट्यात सहभागी होण्याच्या पद्धतीवर भांडवलपुरवठा करण्याची योजना आहे आणि ही योजना निश्चितच न्यायसंमत आहे. या पद्धतीमध्ये भांडवलपुरवठा करणारा हा व्यवसाय योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांतील पात्र व्यापार्यांसाठीसुद्धा त्यांच्याकडे जर एखादी फायदेशीर योजना असेल, तर आपली योजना तडीस नेण्यासाठी आवश्यक भांडवल मिळवता येणे शक्य होईल. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब, परंतु पात्र आणि होतकरू जणांचा समाजाससुद्धा योग्य लाभ होईल आणि अशा व्यापार्यांमुळे समाजाच्या आवश्यक गरजा पूर्ण होतील.

व्याजमुक्त अर्थव्यवस्थेत कर्जफेडीबाबत चिता करण्याची मुळीच गरज नाही. कारण की, सगळ्या जगात याबाबत जे अनुभव येत आहेत, ते समाधानकारक आहेत. तसेच मध्यमवर्गीय लोक श्रीमंतांसारखे संधीसाधू नसतात. कारण श्रीमंतासारखी लाच देऊन आणि राजकीय दबाव आणून कर्ज बुडविण्याची त्यांच्यात मानसिकता नसते.

आर्थिक स्थैर्य

बर्याच कारणांमुळे मानवीय आर्थिक इतिहासाने भरपूर उतार-चढाव येत असतात. या कारणांपैकी एक कारण हे नैसर्गिक आपत्ती(Natural Phenomena) होय. उदाहरणार्थ, दुष्काळ, महापूर, भुकंप वगैरे अशा आपत्तींवर मात करणे आजपर्यंतसुद्धा मानवासाठी शक्य झालेले नाही. मागील तीन दशकांत वित्तमंडी(Financial Market) वर आलेले आणखीन एक संकट असून, यामुळे अविश्वासाची स्थिती निर्माण झाली आहे. याचीसुद्धा बरीच कारणे आहेत. परंतु नोबल पारितोषिक विजेता ‘मिलटॉन फ्रेडमन’(Milton Friedman) नुसार, याचे एक मोठे कारण वित्तदरातील असामान्य उतार-चढाव(Volatility) हे होय.(संदर्भ:Friedman: P-4; 1982) यामुळे निर्माण झालेल्या उत्तार-चढावाच्या परिणामस्वरुपी अविश्वासाची जबरदस्त भयानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व्यापारी दीर्घ मुदतीवर भांडवली गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाहीत. त्याचप्रमाणे कर्जाच्या देवाणघेवाणीची मुदतसुद्धा अत्यल्प असते. म्हणूनच वैयक्तिक भांडवलाच्या आधारावरच भांडवलनिर्मिती(Equity) च्या तुलणेत अल्प मुदतीच्या कर्जांचे प्रमाण(Leverage) बरेच वाढले आहे. परंतु या परिस्थितीपासून सुटका शक्य नाही. कारण ‘लेव्हरेज’ जितका वाढत जाईल, तेवढयाच जास्त प्रमाणात भांडवल दर कमी होत असल्याने कर्जांची फेड करणे अवघड होत जाते आणि परिणामी वित्तव्यवस्था संकटात येते.

येथे कदाचित असा प्रश्न पडेल की, अल्पमुदतींच्या कर्जांमुळे वित्त बाजारात अस्थैर्य निर्माण होण्याचे कारण असे की, अल्प मुदतींची कर्ज वसुली सोपी असली तरी परतफेड करणे अवघड असते. कारण कर्ज घेणार्यांनी हे भांडवल दीर्घ मुदतीच्या व्यवसायात गुंतविलेले असते. अशा परिस्थितीचा परिणाम विदेशी चलन, वस्तु व व्यवसायांवर होतो आणि शेयर बाजारातील सट्ट्यांचे प्रमाण वाढते आणि म्हणूनच वित्त क्षेत्रात अस्थैर्य वाढते.

याचा असा अर्थ मुळीच नाही की, अल्प मुदतीचे कर्ज घेऊच नये. वस्तु आणि सेवा(Real Goods and servises) खरेदी करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्यास काहीच हरकत नाही. या हेतुपूर्तीसाठी इस्लामच्या आर्थिक व्यवस्थेत व्याजमुक्त पद्धत आहे. परंतु अशा अल्प मुदतींच्या कर्जाचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढल्यास(जसेआजकाल बर्याच देशांमध्ये याचे प्रमाण बेफाम वाढत आहे.) बरीच रक्कम सट्ट्यात(Speculation) वापरली जाते आणि परिणामी वित्त बाजारात कमालीचे अस्थैर्य निर्माण होते. ही बाब आणखीन जास्त स्पष्ट होण्यासाठी तीन उदाहरणे आपल्या समोर आहेत. पैकी पहिले उदाहरण पूर्व आशियातील आर्थिक अस्थैर्य, दुसरे अमेरिकेतील ‘एल.टी.सी.एम.’ अर्थात ‘दीर्घमुदत भांडवल व्यवस्था’(Long Term Capital Management) या कंपणीची व्यवस्था कोलमडणे आणि तिसरे उदाहरण विदेशी रोखे बाजारातील सततचे अस्थैर्य होय.

संबंधित लेख

  • इस्लामी राजकीय जीवन व्यवस्था

    बादशहा, हुकुमशहा, पक्ष, समाजाचे घटक, संपूर्ण मानवजात यापैकी कोणालाही सत्ताधीश बनण्याचा, शासनाचा आदेश देण्याचा, कायदे-नियम, संविधान बनविण्याचा अधिकार नाही. हा सर्वाधिकार केवळ ईश्वरालाच आहे, जो या विश्वाचा आणि संपूर्ण मानवजातीचा निर्माता आहे. मानव सत्ताधीश वा शासक नाही, परंतु तो ईश्वराचा प्रतिनिधी आहे. अल्लाहचे कायदे, शासन या विश्वामध्ये अंमलात आणले जातात. वैध, योग्य व खरे कायदे-नियम फक्त अल्लाहचेच आहेत, जे त्याने आपल्या प्रेषितांद्वारे या विश्वामध्ये पाठविले व अंमलात आणले. हे कायदे, नियम सर्व मानवांस समान न्याय, उत्कर्ष, विकासाची हमी देतात. त्याच्या सामुदायिक समस्येच्या प्रश्नांचा ठोस व समाधानकारक निर्णय करतात. या आदेशांचे पालन, कायद्यांची अंमलबजावणी आणि ईश्वराच्या जमिनीवर ते प्रस्थापित करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. अल्लाहचे श्रद्धाळू, एकनिष्ठ मोमीन-दास या नियमांच्या चौकटीत राहून इतर कायदे बनवू शकतात.
  • इस्लामचे आवाहन आणि शासन

    संपूर्ण जगाला माहीत आहे की इस्लाम एक यशस्वी कार्यप्रणाली आहे. याचमुळे इस्लामचे धार्मिक कायद्यांमध्ये राजनीती आणि शासनाच्या तत्त्वांचा खुलासेवार तपशील आलेला आहे. इस्लामचे प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांनी फक्त सत्ता प्राप्त केली नाही आणि शासनव्यवस्थेबाबत नियम फक्त घालून दिले नाहीत तर त्यांनी राजसत्तेचे नेतृत्वसुध्दा केले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनव्यवस्थेचे कार्य हे धार्मिक कार्य मानून या कार्याला महत्त्व दिले होते. म्हणून इस्लामचा विचार केला तर आपण असे म्हणूच शकत नाही की ईशकायद्याचे राज्य (इस्लाम) स्थापन करण्याचा आदेश व मूळ दिव्य प्रकटन ‘‘तुम्ही अल्लाहचीच भक्ती करा’’ वेगळे आहेत. तसेच राजकारण हा धर्माचा भाग नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]