Islam Darshan

ईश्वरावर श्रद्धा

Published : Saturday, Mar 05, 2016
ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा की, या समस्त सृष्टीचा ईश्वर हा एकटाच निर्माता व स्वामी आहे. त्याचा कोणीच भागीदार नाही. त्याला जे वाटेल, तेच तो करतो. त्याला भूत, वर्तमान आणि भविष्याचे पूर्ण ज्ञान आहे. यापैकी एकही वस्तु आणि घटना त्याच्या दृष्टीबाहेर नाही. पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पर्वत, जंगल, वनसृष्टी, प्राणीमात्र आणि सृष्टीतील प्रत्येक कण व मानव हे सर्वच त्याच्या ताब्यात आहेत. या सर्वांवर केवळ त्याचेच एकट्याचे राज्य आहे. प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य केवळ त्याच्याच जवळ आहे. तोच वाटेल त्यास अस्तित्व प्रदान करू शकतो आणि वाटेल त्याचे अस्तित्व नष्ट करू शकतो. तो चिरकाली व अनादी अस्तित्व असलेला व अविनाषी आहे. सर्व प्रकारच्या प्रशंसेस तोच एकटा पात्र आहे. त्याच्यासमान कोणीच नाही. कुरआनात त्याचे गुणधर्म अशा प्रकारे वर्णन करण्यात आले आहेत.

‘‘ईश्वर हा चिरंतनजिव आहे, जो संदर्भ विश्वाचा सांभाळ करतो. त्याच्याशिवाय कोणीच पूजनीय नाही, तो झोपतही नाही आणि त्याला डुलकीपण लागत नाही. जमीन आणि आकाशात जे काही आहे, ते सर्व त्याच्याच मालकीचे आहे. कोण आहे जो त्याच्या दरबारी त्याच्या परवानगीशिवाय शिफारस करू शकेल, जे काही त्यांना माहीत नाही, तेसुद्धा तो जाणतो आहे आणि त्याच्या माहितीमधून एखादी बाब त्यांच्या बुद्धीत येऊ शकत नाही. मात्र जर ईश्वराने काही गोष्टींचे ज्ञान स्वतःच त्यांना दिले तर ती गोष्ट वेगळी.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २५५)

प्रेषितत्वावर श्रद्धा

प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा आहे की, ईश्वराने मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी मानवांपैकीच काही लोकांना निवडून त्यांच्यावर आपला संदेश अवतरित केला, जेणेकरून मानवजातीने जीवनाचा खरा मार्ग अवलंबवावा. अशाप्रकारे प्रत्येक काळात आणि प्रत्येक भागात ईश्वराने प्रेषितांना पाठविले आणि प्रेषितत्वाची ही शृंखला अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर संपली. अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर अवतरित झालेला ईश्वराचा संदेश म्हणजेच कुरआन होय. हा ईश्वरी संदेश अर्थात कुरआन जगातील प्रत्येक मानवासाठी आणि जग अस्तित्वात असेपर्यंतच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शक ग्रंथ होय. म्हणून आता कोणत्याही प्रेषितांची आणि कोणत्याही ईश्वरी ग्रंथाची गरज राहिली नसल्याने कोणताही प्रेषित येणार नाही व कोणताही ग्रंथ अवतरित होणार नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,

‘‘मुहम्मद(स) हे केवळ ईश्वराचे प्रेषित आहेत, आणि त्यांच्या पूर्वीसुद्धा बरेच प्रेषित ईश्वराने पाठविले आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १४४)

ईश्वरी ग्रंथांवर श्रद्धा

ईश्वरी ग्रंथांवर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा की, ईश्वराने मानवाच्या मार्गदर्शनासाठी केवळ प्रेषितांनाच पाठविले नसून संदेश अर्थात ग्रंथसुद्धा जीवनविधानाच्या स्वरुपात पाठविले, जेणेकरून मानवजातीस सत्य-असत्य, वैध-अवैध किंवा चांगले-वाईट आणि पाप-पुण्य काय आहे, याचे ईश्वरी प्रमाण माहीत व्हावे. या ग्रंथांपैकी जे विविध प्रेषितांवर अवतरित करण्यात आले, ते प्रामुख्याने ‘तौरेत‘, ‘इंजील‘, ‘जुबुर‘ आणि अंतिम ग्रंथ ‘कुरआन‘ होय. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘ईश्वर तो चिरंतनजीवी अस्तित्व ज्याने सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे, खरोखरच त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. हे प्रेषिता(स)! त्याने तुमच्यावर हा ग्रंथ अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथाच्या सत्यतेची साथ देत आहे, जे पूर्वी अवतरले होते.‘‘(संदर्भ : सूरह-आलि इम्रान - २,३)

फरिश्त्यांवर श्रद्धा

फरिश्त्यांवर श्रद्धा असण्याचा अर्थ असा की, ईश्वराने ज्याप्रमाणे मानव, जिन आणि इतर सृष्टी निर्माण केली, त्याचप्रमाणे फरिश्तेसुद्धा निर्माण केले. मात्र त्यांच्या अस्तित्वाचा भौतिक अर्थ मानवाच्या बुद्धीसामर्थ्याबाहेर आहे. त्यांचे कार्य हे प्रत्येकक्षणी ईश्वराचा आदेश बजावणे होय. काही फरिश्ते(देवदूत) ईश्वराच्या प्रशंसेसाठी नेमण्यात आले तर काही फरिश्ते ईश्वराचा संदेश पोचविण्याच्या कामावर नेमण्यात आले, काही फरिश्ते अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी तर काही फरिश्ते मानवांचे सदाचार आणि दुराचारांची नोंदणी करण्यासाठी नेमण्यात आले. म्हणजेच विविध कामांमध्ये ते प्रत्येक क्षणी मग्न असून प्रत्येक क्षणी ते ईश्वराच्या आदेशाचे पालन करीत आहेत. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘प्रशंसा ईश्वराचीच आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माता आहे आणि फरिश्त्यांना दूत म्हणून नियुक्त करणारा आहे, असे फरिश्ते, ज्यांना दोन-दोन, तीन-तीन, चार-चार बाहू आहेत. या निर्मितीची रुपे तो वाटेल तशी वाढवितो. निश्चितच ईश्वर प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्वशाली आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-फातिर - १)

परलोकावर श्रद्धा

परलोकावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा आहे की, ईश्वराने एका विशेष उद्दिष्टासाठी या विश्वाची निर्मिती केली असून या विश्वात मानवाची निर्मिती केली आहे. मग एके दिवशी हे विश्व नष्ट करण्यात येईल. या विश्वातील कोणतीच वस्तु शिल्लक राहणार नाही. अर्थातच या विश्वात जन्म घेणार्या प्रत्येक मानवाचा व सजीव सृष्टीचा मृत्यू व त्याचप्रमाणे प्रत्येक निर्जीव सृष्टीचा नाश अटळ आहे. या जगात जेवढ्या मानवांना ईश्वराने जन्मास घातले, त्या सर्वांना मृत्यूपश्चात परत जीवन प्रदान करण्यात येईल आणि त्यांच्या कर्माचा हिशेब घेण्यात येईल. यानंतर त्यांना चांगल्या कर्माचे फळ स्वर्गलोगप्राप्तीच्या स्वरुपात आणि दुष्कर्मांचे फळ नरकाग्नीच्या स्वरुपात देण्यात येईल. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्र फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील, त्या वेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अलइनफितार - १ ते ५)
कुरआनात वारंवार या घटनेसंबंधी खबरदार करण्यात आले असून या वास्तविकतेस नाकारणार्यांना सक्तीने त्याच्या वाईट परिणामाची जाणीव करून देण्यात आली. ईश्वराने म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धावंतांनो! श्रद्धा ठेवा ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांवर, त्याच्या ग्रंथावर, जो ईश्वराने आपल्या प्रेषितांवर अवतरित केला आहे, आणि प्रत्येक त्या ग्रंथावर, जे यापूर्वी अवतरित करण्यात आले आहेत. त्याच्या प्रेषितांवर आणि ज्यांनी अंतिम निवाड्याच्या दिवसाचा इन्कार केला, ते मार्ग भटकून खूप दूर गेलेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३६)

हे इस्लामी श्रद्धांचे आधारभूत घटक आहेत. या घटकांवर श्रद्धा ठेवल्यानंतर मानवाचे पूर्ण व्यक्तीमत्त्व, त्याची विचारसरणी, नीतीमत्ता व भूमिकेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडते. तो जीवनाची प्रत्येक बाब याच ईमान अगर श्रद्धेच्या कसोटीवर पारखतो. जर त्याचे कोणतेही कर्म या कसोटीवर खरे सिद्ध झाले तर ईश्वर स्वीकार करतो नसता धिक्कारतो. मोमिन अर्थात श्रद्धावंत म्हणजेच मुस्लिम हा आपले प्रत्येक पाऊल याच श्रद्धेच्या प्रकाशात पुढे टाकतो आणि प्रत्येक क्षणी याच श्रद्धेचा प्रकाश सोबत ठेवतो. तो आपले जगणे आणि मरणेसुद्धा याच श्रद्धेच्या मर्यादेत ठेवतो. एका श्रद्धावनाच्या जगण्यास जर काही अर्थ असेल तर याच श्रद्धेमुळे असेल आणि याच श्रद्धेमुळे त्याचे मरणसुद्धा सार्थक असते. तो आपली श्रद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आणि प्राणाचीसुद्धा आहुती देतो. याच श्रद्धेच्या असामान्य शक्ती व सामर्थ्यांमुळे तो अमानवी आणि निष्ठूर व सत्यविरोधी शक्तींचा सामना करतो. ज्या अमानवी आणि निष्ठूर व सत्यविरोधी शक्तीमुळे आज समस्त विश्वांमध्ये अपराध आणि गुन्हेगारीसारख्या दुष्कर्मांचे भयंकर वादळ उठले आहे, ते शमविण्याची पूर्ण शक्ती आणि सामर्थ्य याच श्रद्धेमध्ये आहे.
या ठिकाणी ईमान अर्थात श्रद्धांच्या सर्वच घटकांवर चर्चा करण्याऐवजी आपण ‘ईश्वरावरील श्रद्धा‘ या घटकावरच चर्चा करु या.

ईश्वराचे पालकत्व

वर्तमानकाळात अपराध घडण्याच्या विविध कारणांपैकी सर्वांत मोठे कारण हे आर्थिक परिस्थिती होय. माणसाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी अर्थार्जन कमी पडत असेल तर माणूस अवैध मार्गाने पैसा मिळविण्याचा आटापिटा करतो. अपूरे अर्थार्जन, वाजवीपेक्षा, जास्त महागाई आणि तुटपुंज्या कमाईतून जीवनावश्यक गरजा न भागणे, या सगळ्या ओढातानीत माणूस विवेक हरवून बसतो. याशिवाय कोणाच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत असल्या तरी, इतरांचे वैभव आणि समृद्धी पाहून त्याच्याही मनात संपत्ती आणि सुखसाधनांची तीप लालसा निर्माण होते. त्याच्या स्वभावातच असलेल्या वासना आणि स्वैर अभिलाषांनी प्रेरित होऊन असेल त्यावर समाधान न मानता कमीतकमी प्रयत्नांतून जास्तीतजास्त संपत्ती मिळविण्याच्या मागे लागतो. या स्पर्धात्मक युगामध्ये ज्या ठिकाणी जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला जीवाचे रान करावे लागते. अशा ठिकाणी जास्त संपत्ती मिळविण्यासाठी काय करावे लागेल आणि किती कष्ट सोसावे लागतील याची कल्पना न केलेलीच बरी. तेव्हा अल्प श्रमामध्ये जास्त संपत्ती मिळविण्यासाठी निश्चितच अवैध मार्गाचा अवलंब करून वाटेल ते करतो. त्याला वाटते की, आपण जास्तीतजास्त चांगल्या रितीने जीवन जगावे, सर्वांवर आपले वर्चस्व असावे, सर्वप्रकारे आपण सुरक्षित असावे. यासाठी सर्वांत जास्त आवश्यकता असते ती पैशांची, संपत्तीची आणि धार्मिक सामर्थ्यांची. पैसा असेल तर दहाजण मागेपुढे फिरतात, गरीबाला कोण विचारतो. पैसा असला तर कितीही मोठा रोग जडला तरी महागडा उपचार करता येतो. गरीबांसारखे जमिनीवर पाय घासून मरण्याची पाळी येत नाही. पैसा असला तर कायदा आणि न्यायसुद्धा खरेदी करता येतो, प्रसिद्धी मिळते, सत्ता खरेदी करता येते, एवढी शक्ती या पैशांमध्ये बळावली आहे. म्हणूनच माणूस अवैध मार्गाने ना-ना प्रकारे पैसा मिळविण्याचा आटापिटा करतो. यासाठी अन्याय, अत्याचार, उपद्रव, देहव्यापार, मादक पदार्थांचा व्यापार, खून, चोरी, दरोडे, दहशत वगैरे समस्त बाबींचा सर्रास अवलंब करतो. कारण त्याला वाटते की, याशिवाय आपले आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत, एवढेच नव्हे तर या अवैध आणि वाममार्गानेही जर पैसा मिळाला नाही तर, तो आत्महत्यासुद्धा करतो. मात्र माणसाची जर अशी श्रद्धा असली,(आणि ही श्रद्धाच नव्हे तर वास्तविकता आहे की, ईश्वर हा समस्त सृष्टीचा पालनकर्ता आणि स्वामी आहे,) तर तो आर्थिक शक्तीसमोर नतमस्तक होणार नाही. भौतिक संपत्तीच्या क्रूर देवतेसमोर नैतिकता आणि चारित्र्याचा बळी देणार नाही. गरीब आणि दीनदलितांच्या अधिकारांची अंजली या देवतेस वाहणार नाही. त्याला जर ही वास्तविकता समजली की, ज्या ईश्वराने आपल्याला जन्मास घालण्यापूर्वीच आपल्या उपजीविकेसाठी आपल्या मातेच्या छातीत दूध निर्माण केले, तो ईश्वर आपल्याला कधीच उपाशी ठेवणार नाही. कारण तोच सर्व सृष्टीचा स्वामी आणि पालनकर्ता आहे. म्हणून त्याची अवज्ञा करता कामा नये. दोन पैशांसाठी कोणाचाही गळा कापता कामा नये, कोणासही त्रास देता कामा नये, वैध मार्गाने जे मिळेल, त्यातच समाधान मानावे आणि याच समाधानामुळे त्यास कधीच वैफल्य येत नाही, तो कधीच आत्महत्या करीत नाही, त्याचे जीवन सुखाने व्यतीत होते. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘भूतलावरील प्रत्येक सजीवास उपजीविका केवळ ईश्वरच पुरवितो आणि त्यास हे चांगले माहीत आहे की, कोणास कोणत्या ठिकाणी उपजीविका पुरवायची आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हूद - ६)

प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले आहे की, प्रत्येक मानवाची निर्मिती अशा प्रकारे होत असते की, तो आपल्या मातेच्या गर्भात चाळीस दिवस वीर्याच्या स्वरुपात असतो, त्यानंतर चाळीस दिवस रक्ताच्या गोळ्यात रुपांतरित होऊन राहतो, मग चाळीस दिवस मांसाच्या गोळ्यात रुपांतरित होऊन राहतो. मग ईश्वर चार गोष्टींसह एक फरिश्ता पाठवितो, जो त्याच्या जीवनात कर्म, वय, उपजीविका, सौभाग्य आणि दुर्भाग्य लिहितो. मग त्याच्यात आत्मा प्रविष्ट करण्यात येतो.(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह, मुस्नदे अहमद - ३०)

याचाच अर्थ असा की, मानवाच्या जन्मापूर्वीच त्याची उपजीविका प्रदान करण्यात आली आणि ती त्यास किती प्रमाणात मिळेल, हेसुद्धा निश्चित करण्यात आले. आणखीन एके ठिकाणी प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले आहे,
‘‘जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवाल तर ईश्वर तुम्हांस अशी उपजीविका प्रदान करील, जशी चिमणीला प्रदान करतो, जी सकाळी आपल्या घरट्यांतून उपाशीपोटी निघते आणि संध्याकाळी पोटभरून आपल्या घरट्यात पोचते.‘‘(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह)

मग प्रश्न असा निर्माण होतो की, ज्याअर्थी परम दयाळू ईश्वराने सर्वांनाच उपजीविका पुरविण्याची व्यवस्था केली, तर या जगात असंख्य लोक उपासमारीस का बळी पडतात? का त्यांना दोन घास मिळविण्यासाठी वन-वन फिरावे लागते? आपल्या दोन निष्पाप मुलांना दोन घास भरविण्यासाठी असंख्य स्त्रिया का बरे इतरांच्या वासनांना बळी पडाव्यात? याचे उत्तर कुरआनाने अशा प्रकारे दिले आहे,

‘‘जर ईश्वर आपल्या सर्वच दासांना उघड उपजीविका देत असता तर त्यांनी भूतलावर बंडाचे वादळ माजविले असते, मात्र तो योग्य प्रमाणात जेवढे इच्छितो तेवढे प्रदान करतो. निश्चितच त्याला आपल्या दासाची पूर्ण खबर आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-शूरा - २७)

संपत्तीच्या उद्रेकामुळेच भूतलावर उपद्रव माजण्याची संभावना असेल तर ईश्वर काहींना का जास्त संपत्ती देतो आणि काहींच्या माथी का दारिद्रयाचा कलंक लावतो? तर निश्चितच्या परिस्थितीतसुद्धा जगात तेच होत आहे, जे होण्याची संभावना वरील आयतीमध्ये व्यक्त करण्यात आली. याचे उत्तर कुरआनात अशाप्रकारे देण्यात आले आहे,
‘‘तुमच्यापैकी काहीना काहींच्या तुलनेत अधिक उच्च दर्जे बहाल केले की ज्यायोगे जे काही तुम्हाला दिले आहे, त्यात तुमची परिक्षा घ्यावी, निःसंशय तुमचा पालनकर्ता शिक्षा देण्यातही अत्यंत सत्वर आहे आणि फार क्षमाशील व दया करणारदेखील आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनआम - १६५)

‘‘जर का ईश्वराने लोकांना त्यांच्या केलेल्या कृत्यांवर पकडले असते, तर पृथ्वीवर कोणत्याही सजीवाला जीवंत सोडले नसते. परंतु तो त्यांना एका निश्चित वेळेपर्यंत अवधी देतो. मग जेव्हा त्यांची घटका भरेल, तेव्हा ईश्वर आपल्या दासांना बघून घेईल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-फातिर - ४५)

 

संबंधित लेख

  • परिवाराचे धार्मिक आणि नैतिक प्रशिक्षण

    पत्नी-मुलंबाळ आणि कुटूंबावाल्यांच्या भौतिक आणि आर्थिक आवश्यकताच्या पुर्तिच्या सोबतच त्यांची धार्मिक आणि नैतिक परिस्थिती चांगले करणे आणि त्यास उत्तोम-उत्तम बनविण्याचा प्रयत्न करायला हवा. ही मनुष्याच्या आपल्या धर्म आणि आस्था आणि कुटूंबावाल्यांशी शुभ-चितनाची अपराहार्य अपेक्षा आहे. यापासून निष्काळजीपणा (बेपरवाही) संसार आणि परलोक यांच्या विनाशाचे कारण बनेल कुरआनने स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले आहे
  • मुस्लिमांची जबाबदारी - एक राष्ट्र या संदर्भात

    इस्लामचे श्रेष्ठत्व: इस्लामच्या विशेष अशा अग्रगण्य स्थानाबद्दल आता आपण विचार करू या. इस्लामचा हा दावा आहे की तोच एकमेव परिपूर्ण असा धर्म आहे. तो सर्व मानवांसाठी आहे. इस्लाम एकमेव धर्म आहे आणि मानवाच्या मुक्तीसाठी इस्लामचे अनुकरण अनिवार्य आहे. इस्लाम हा सर्वोत्कृष्ट धर्म असल्यामुळे त्याच्या काही विशेष गरजा असणे स्वाभाविक आहे. या विशेष गरजांपैकी एक महत्त्वाची गरज ही आहे की इस्लामचा प्रसार-प्रचार जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावा. प्रत्येक राष्ट्रात इस्लामची शिकवण सर्वदूर पोहचवावी आणि जगातील प्रत्येक माणसाला इस्लामसंदेश प्राप्त होणे अत्यावश्यक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]