Islam Darshan

आधुनिक मानसशास्त्र व गुन्हे

Published : Saturday, Mar 05, 2016

फ्राइड’ चा असा दावा होता, की गुन्हेगार वास्तविकपणे इच्छा वासनांच्या गुंतागुंतीचा व उद्रेकाचा बळी असतो. जेव्हा समाज धर्म, नीती व रुढी उपजत मानव प्रकृतीला दडपून ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशी गुंतागुंत व पेच निर्मांण होते. मानसशास्त्राशी संबंधित असलेल्या नंतरच्या सर्व मानसशास्त्रज्ञांनी फ्राइडच्या म्हणण्याचेच पालन केले, तरी त्यामधील अनेकजण त्याच्या या मतांशी सहमत नव्हते की कामवासना ही जीवनातील केंद्रबिदू आहे. या मानसशास्त्रज्ञांनी गुन्हेगार हा, तो ज्या परिस्थितींना आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात तोंड देत असतो त्या परिस्थितींचा केवळ एक बळी असल्याचे ठरविले. हे सर्व लोक मानसशास्त्रीय दैववाद मानणारे होते. मानसशास्त्राच्या शक्तीबाबत त्यांचा विचार असा होता की माणसाला विचारांचे तसेच कृतीचे कसलेही स्वातंत्र्य नसून तो तिच्यापुढे हतबल असतो व माणसाच्या हस्तक्षेपाविना ती शक्ती एका ठराविक व आखीव नियमानुसार कार्यान्वित असते.

या उलट कम्युनिस्ट देशांचा दृष्टिकोन असा असतो की, समाज व समूह हेच एकमेव पावित्र्याचे प्रतीक आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा कोणाही व्यक्तीला मुळातच कसलाही अधिकार नसतो. अशा देशात जर एखाद्या व्यक्तीने राज्याविरुद्ध उठाव केला तर त्याला मृत्यूदंडासह अनेक प्रकारच्या कठोर शिक्षा दिल्या जातात. फ्राइड व त्याचे समर्थक कम्युनिजमच्या अपराधांचे मूळ कारण मानसशास्त्रात शोधण्याऐवजी ते अर्थशास्त्रात शोधित आहेत. कम्युनिस्ट दृष्टिकोनातून तो समाज आर्थिक दुरावस्थेचा व विषमतेचा बळी असतो. त्यात कोणत्याही चांगल्या गुणांची वाढ होऊच शकत नाही, म्हणून अशा समाजात गुन्हेगारांना शिक्षा व्हावयास नको. हेच जर खरे असेल तर पूर्ण समानता असलेल्या रशियामध्ये गुन्हे का घडतात व न्यायालयाची तसेच तुरुंगाची गरज का भासते?

व्यक्तित्ववाद्यांचे व कम्युनिस्टांचे दृष्टिकोन काहीअंशी खरे आहेत. व्यक्तीवर वातावरणाचा मोठा प्रभाव पडतो व त्याच्या भावनांचा उद्रेक कधीकधी गुन्ह्याचे कारण बनते हे ठीक आहे. पण माणूस परिस्थितीमध्ये अगदीच असहाय्य नसतो. माणसाच्या अंतरंगात असलेल्या शिस्त लावणाऱ्या आत्मशक्तीला ते अगदी विसरुन जाऊन हे मानसशास्त्र व तज्ञ माणसाच्या प्रेरक शक्तीवरच सगळा भर देण्याची चूक करतात. खरे तर या शक्तीच्या सहाय्यानेच मूल एका विशिष्ट वयात ओलसरपणा निर्माण करणाऱ्या पेचावर मात करुन आपले अंथरुण ओले करीत नसते. या शक्तीच्या सहाय्यानेच तो आपल्या भावनांना व कृत्यांना आपल्या ताब्यात ठेवावयास शिकतो व आपल्या मोकाट इच्छा वासनांना लगाम घालतो.

त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीमुळे माणसाच्या भावना व कृत्ये प्रभावित होतात व कधीकधी उपासमार माणसाचा आत्मा विस्कटून टाकण्यास व समाजात तिरस्काराचे कारण होऊन गुन्ह्यांना तसेच नैतिक दोषांना कारणीभूत होत असते, हेही खरे आहे. तरीपण केवळ आर्थिक परिस्थितीच मानव जीवनातील एकमेव प्रभावशाली तत्त्व समजले जाऊ शकत नाही; काही अंशाने व एका मर्यादेपर्यंत ते खरे असू शकते. खुद्द रशियातील परिस्थिती व तेथील घडामोडीच या प्रतिपादनाचे खंडन करण्यास पुरेशा आहेत. परंतु रशियाचा असा दावा आहे की त्याने त्याच्या देशातून उपासमारीचे, दारिद्रयाचे संपूर्ण उच्चाटन केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगाराला शिक्षा व्हावी किवा नाही हे ठरविण्याआधी गुन्ह्यासंबंधी त्याच्या दोषाची व जबाबदारीची पात्रता व गुन्ह्याची मर्यादा ठरविली गेली पाहिजे. कारण गुन्हा व त्याची शिक्षा या दोन्ही बाबतीत, इस्लाम यातील काहीही नजरेआड करीत नाही.

इस्लाम अनाठायी व अंदाधुंद शिक्षेची तरतूद करीत नाही व अविचाराने त्याची अंमलबजावणीही करीत नाही. इस्लामचा दृष्टिकोन हा व्यक्तित्ववाद्यांच्या व साम्यवाद्यांच्या (कम्युनिस्टांच्या) दृष्टिकोनातील इष्ट गुणाचा मिलाफ असून त्यांच्या दोषापासून मात्र मुक्त आहे. गुन्ह्याची शिक्षा देण्यापूर्वी, गुन्हेगाराशी संबंधित असलेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला जावा, अशी इस्लामची इच्छा आहे. गुन्हेगाराला शिक्षा देण्यापूर्वी गुन्हेगाराचा दृष्टिकोन व ज्या समाजाचा अपराध केला गेला आहे त्याचा दृष्टिकोन, या दोन्ही गोष्टी इस्लाम एकाच वेळी आपल्या डोळ्यांपुढे ठेवतो. या दोन्ही गोष्टींच्या उजेडातच इस्लाम योग्य शिक्षेची तरतूद करतो. अशी शिक्षा बुद्धी व तर्क यावर अधिष्ठित असून चुकीच्या व्यक्तित्व व राष्ट्रीय सिद्धान्ताचा त्यावर कसलाही अनिष्ट प्रभाव अगर परिणाम असत नाही.

इस्लामी दंडविधान

इस्लामच्या काही शिक्षा दिसायला अन्यायपूर्वक व अनुचित वाटणे संभवनीय आहे. पण थोडा विचार केल्यास या शिक्षा अन्यायकारक व चुकीच्या नाहीत हे कळून येते. कारण इस्लाम अशा शिक्षांची अंमलबजावणी अशाच वेळी करीत असतो जेव्हा त्याची खात्री पटते, की गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी कसलीही विवशता नव्हती किवा कसलेही उचित कारण नव्हते. उदाहरण द्यायचे झाले तर इस्लाम चोराचे हात तोडण्याची शिक्षा देतो; पण चोरीचे कारण उपासमार होते असा थोडासा जरी संशय असला तरी चोराला हात तोडण्याची शिक्षा दिली जात नाही.

त्याचप्रमाणे इस्लाम व्यभिचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांना दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेचा हुकूम देतो. पण ही शिक्षा फक्त विवाहित स्त्री पुरुषांनाच व तीसुद्धा घटना डोळ्यांनी पाहिलेले चार साक्षीदार असतानाच दिली जाते. इतर शिक्षांच्या बाबतीतही इस्लाम असाच सावधपणा बाळगतो.

माननीय उमर (र) यांची पद्धत

इस्लामी इतिहासातील प्रमुख असलेले दुसरे खलिफा माननीय उमर बिन खताब (र) यांनी दाखवून दिलेल्या एका सिद्धान्तानेही या सत्यावर प्रकाश पडतो. शरिअतच्या हुकुमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यांत माननीय उमर (र) प्रसिद्ध आहेत. त्या आधाराने त्यांचे हे तत्त्व एक मृदु तत्त्व मानले जाऊ शकत नाही. माननीय उमर (र) यांच्या काळात जेव्हा एकदा दुष्काळ पडला होता तेव्हा चोरीच्या गुन्ह्यासाठी कोणालाही हात तोडण्याची शिक्षा दिली गेली नाही. कारण उपासमारीमुळे लोक असाहाय्यपणे चोरी करण्याची शक्यता आढळून येत होती. खालील घटनेवरून इस्लामी कायद्याचा हा पैलू चांगल्या रितीने समजून येईल.

एक ऐतिहासिक घटना

हातिब बिन अबी बलतअच्या काही गुलामांनी मुजना येथील एका माणसाची सांडणी (उंटाची मादी) चोरुन आणली आहे, अशी बातमी माननीय उमर (र) यांना मिळाली. माननीय उमर (र) यांनी विचारल्यावर त्या तरुणांनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना हात तोडण्याची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु नंतर थोडा विचार करुन त्यांनी सांगितले, ‘अल्लाहची शपथ, तुम्ही या तरुणांना चाकरीला ठेवल्यावर त्यांना उपाशी ठेवता व त्यामुळे ते हरामचे खाण्यास तयार होतात. हे मला जर समजले नसते तर मी त्यांचे हात तोडायला लावले असते. हे सांगून त्यांनी त्यांचे हात तोडण्याची शिक्षा रद्द करून टाकली. मग त्यांचा धनी हातिब बिन अबी बलतअला उद्देशून म्हटले, ‘अल्लाहची शपथ’ मी यांचे हात तोडायला लावले नाहीत. परंतु तुम्हाला मात्र त्रास होईल असा कडक दंड केल्याशिवाय राहाणार नाही. असे म्हणून त्यांनी हातिब बिन अबी बलतअने सांडणीच्या मालकाला दोन सांडणीची किमत दंड म्हणून देण्याची शिक्षा सुनावली.

इस्लामी धर्मशास्त्राचे एक महत्त्वाचे तत्त्व

हतबल व विवश करणाऱ्या परिस्थितीच्या गांजणुकीने जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असल्यास त्याला गुन्ह्याबद्दल शिक्षा केली जाऊ नये, हे इस्लामी कायद्याचे स्पष्ट तत्त्व आहे हे वरील घटनेने आमच्या समोर येते. या तत्त्वाच्या समर्थनार्थ इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे हे कथनही सादर केले जाऊ शकते,

‘संशयास्पद अवस्थांमध्ये इस्लामची शिक्षा लागू करु नका.’ अर्थात कायद्याची शिक्षा देऊ नका.

इस्लामी दंडविधान व समाजाची सुधारणा

शिक्षेच्या बाबतीतील इस्लामी धोरणाचा आढावा घेताना हे कळून येते, की गुन्ह्यांना कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीपासून तो आधी मुक्त करतो. असे केल्यावरही जे कोणी गुन्हे करतात त्यांना न्यायपूर्ण रीतीने धडा शिकवण्यासारखी शिक्षा देतो. परंतु गुन्ह्याला कारणीभूत ठरणारी परिस्थिती आस्तित्वात असेल व तशा परिस्थितीच्या निकडीमुळे विवश होऊन अपराध्याने गुन्हा केला असल्याचा किचितही संशय असेल तर त्याला शिक्षा दिली जात नाही. उलट त्याला गुन्ह्याच्या बाबतीत इतर कोणतीही शिक्षा दिली जाईल अथवा त्याला दोषमुक्त करून सोडून दिले जाईल.

गुन्ह्यांच्या कारणांना प्रतिबंध

गुन्ह्यांना कारणीभूत होणाऱ्या परिस्थितींना नष्ट करण्यासाठी इस्लाम निरनिराळ्या साधनांनिशी प्रयत्न करतो. त्याचबरोबर इस्लाम संपत्तीचे उचित विकें्रदीकरण करण्यावरही भर देतो. माननीय उमर बिन अब्दुल अजिज (र) यांच्या कारकिर्दीत दारिद्रय संपूर्णपणे नष्ट झाल्याचे आम्हाला दिसेल. धर्म, वंश, भाषा, वर्ण अथवा सामाजिक दर्जाकरिता कोणताही भेदभाव अगर पक्षपात न करता, आपल्या राज्यातील सर्व लोकांना लागणाऱ्या मूलभूत जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याची जबाबदारी इस्लामी राजावर असते. त्याचप्रमाणे राज्य सर्व नागरिकांना उचित रोजगार मिळण्याची संधीही उपलब्ध करते. एखाद्याला रोजगार मिळू शकला नाही अथवा एखादा नागरिक काम करुन आपले पोट भरण्यास अक्षम असेल तर राज्याच्या कोषागारातून त्याला सहाय्य दिले जाते.

संबंधित लेख

  • इस्लाम एक सरळ व खरा धर्म

    युरोपमध्ये धर्माविरुद्ध जी प्रतिक्रिया झाली ती वास्तविकपणे तेथील चर्चच्या व्यवस्थेतील दोषांचे स्वाभाविक फळ होते, हे यावरुन स्पष्ट होते. इस्लाममध्ये अशा तऱ्हेची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच त्यात ख्रिश्चन धर्माप्रमाणे कसलेही कूट प्रश्न नाहीत ज्यायोगे माणसांत धर्मविन्मुखतेची भावना निर्मांण होऊन त्यांचा कल निरिश्वरवादाकडे झुकतो. इस्लाममध्ये कसलेही चर्च आढळत नाही. केवळ अल्लाह आहे जो समस्त जिवांचा व सृष्टीचा एकमेव निर्माता आहे. मृत्यूनंतर सर्व लोक त्याच्याच समोर हजर केले जातात. ही इतकी स्पष्ट व उघड श्रद्धा आहे की निसर्गवादी व नास्तिक मंडळींनी ती आहे असे सिद्ध करण्याचे ठरविले तरी विनासायास (व प्रामाणिकपणे) तसे सिद्ध करु शकत नाहीत.
  • इस्लाम व संस्कृती

    सर्वधर्म समभाव कल्पना - आजकाल ‘सर्व धर्म समभाव’ हा विचार फार लोकप्रिय झाला आहे. या विचारामागे एक तत्त्व कार्यरत आहे की सर्व धर्म खरे आहेत. सर्व धर्म देवाकडेच नेतात आणि सर्व धर्म मनुष्याचे कल्याण करण्यास आणि त्याला मुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या विचाराने पुढे ही धारणा निर्माण केली की प्रार्थनेचे स्वरुप वेगवेगळे असू शकते, तसेच मार्ग वेगवेगळे आहेत. ईश्वरावर श्रध्दा बाळगणाऱ्यांची पध्दत व मार्ग वेगवेगळे असले तरी ते सारखेच महत्त्वाचे आहेत. बाह्याकार भक्तीचा महत्त्वाचा नसून भाव महत्त्वाचा आहे. म्हणून भक्तीचे अनेकानेक मार्ग असू शकतात. भक्तीचा हेतु महत्त्वाचा आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]