Islam Darshan

अपराधांचे प्रकार

Published : Saturday, Mar 05, 2016

निश्चितच माणसाचे मौलिक हित विविध प्रकारचे आहेत. मात्र या विविध प्रकारांचासुद्धा विशिष्ट दर्जा ठरविण्यात आला आहे. म्हणून कोणत्या हिताला प्राथमिक महत्त्व द्यायचे आणि कोणत्या हितास दुय्यम स्थान द्यायचे, हे शरियतने अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीने ठरविले आहे. या प्रमाणानुसारच शरियतने अपराधांचासुद्धा दर्जा ठरविण्यात आला व प्रत्येक अपराधाची शिक्षा त्याच्या दर्जानुसार लागू केली. शरियतने अपराधांचे प्रामुख्याने तीन प्रकार केले ते असे.

 1. असे अपराध, ज्यांची शिक्षा स्वयं ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद(स) यांनी निश्चित केली असून या शिक्षेत कोणालाही परिवर्तन व किंचितही कमी-जास्त करण्याचा मुळीच अधिकार नाही. हे अपराध म्हणजे व्यभिचार, दारु पिणे, चोरी करणे, डकाईती आणि धर्मविमुख होणे व बंडखोरी करणे होय. या अपराधांची शिक्षा शरियतने निश्चित करून दिली असून त्यात किंचितही बदल करणे वा त्यात ढवळा-ढवळ करणे शक्य नाही.
 2. असे अपराध ज्यामुळे मृत्यूदंड, देहदंड अथवा खुनाच्या भरपाईची शिक्षा लागू करण्यात आली. हे अपराध म्हणजे जाणून बुजून हत्या करणे, चुकून हत्या घडणे, जाणूनबुजून हत्या घडण्याची शक्यता, हेतुपुरस्सर शारीरिक इजा पोचविणे, चुकून कोणास शारीरिक इजा पोचविणे होय.
 3. असे अपराध ज्यांची शिक्षा इस्लामी कायद्याने म्हणजे शरियतने स्वतः निश्चित न करता तत्कालीन शासक अगर न्यायाधीशाला निश्चित करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात तत्कालीन शासक आणि न्यायाधीश आपल्या परीने अपराध्यास शिक्षा तजवीज करील. मृत्यूदंडाची शिक्षा लागू करण्यात ज्या अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या शर्ती व अटींची पूर्तता होत असल्यास अपराध्यावर दंड आकारण्यात येईल. याव्यतिरिक्त लाचखोरी, भ्रष्टाचार, व्याजखोरी, शिवीगाळ, सामान्यजनांच्या हिताला बाधा पोचविणे, जाळपोळ, धोकेबाजी वगैरेसारख्या अपराधांमध्ये दंड आकारण्याची शिक्षा लागू करण्यात येईल.

अपराध सिद्ध होण्याच्या अटी व शर्ती

वरील मजकुरात अपराधांचे विविध प्रकार आपण पाहिले. आता आपण हे अपराध सिद्ध होण्याच्या अटी व शर्ती पाहू या, त्या निमलिखित आहेत.

 1. एखादे कर्म हे अपराध असल्याचे प्रमाण कुरआन आणि हदीस(प्रेषितवचने) नुसार सिद्ध असावे.
 2. ज्यावर अपराधाचा आरोप लावण्यात येत आहे, त्याने खरोखरच तो अपराध केलेला असावा. केवळ अपराध करण्याची इच्छा असण्यावर किंवा ही इच्छा बोलून दाखविण्यावर सदरील व्यक्तीस अपराधी ठरविता येणार नाही.
 3. आरोपी हा इस्लामी कायद्यात्मकरित्या जवाबदार असावा. त्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक वा मानसिक आजार, अल्पवय, वैफल्यग्रस्तता, अज्ञान, आत्मसंरक्षणात्मक परिस्थितीसारख्या बाबी नसाव्यात.

वर्तमानकाळातील अपराध : सामाजिक अपराध

अपराधाचा एक प्रकार तो आहे, ज्याचा कुप्रभाव लप्रत्यक्ष समाजावर पडतो. उदाहरणार्थ, स्पृश्यास्पृष्यता, लाच-लुचपत, हुंडा घेणे वे देणे, आत्महत्या, चोरी, अपहरण, इतरांची संपत्ती हडपणे वगैरे. हे सर्व सामाजिक अपराधच होत. या १५ वर्षांच्या काळात यासारख्या अपराधांमध्ये दहा पटीने वाढ झाली आहे. १९८३ साली हुंड्यासाठी नववधूंना जाळून ठार करण्याची केवळ ४२८ प्रकरणे होती. मात्र १९९८ साली हुंडाबळींची संख्या ६९१७ वर पोचली.(संदर्भ : दैनिक राष्ट्रीय-सहारा-दिल्ली, १६ जून २०००)

वर्तमानकाळातील अपराध : राजकीय अपराध

 

सर्वांनाच माहीत आहे की, राज्य काय असते, राज्य कसे चालविण्यात येते, सत्ता कशी मिळवावी लागते आणि मग यासाठी राजकारण कसे खेळण्यात येते. राजकारणात म्हणे सर्वकाही माफ असते. वैध-अवैधच्या भानगडीत पडायचे नसते. नैतिकता आणि चारित्र्याच्या नुसत्या गप्पा मारून आणि अश्वासनाची खिरापत वाटून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडून, अमाप काळा पैसा खर्च करून राजसिंहासन मिळते. सगळे राजकारणच गुंडांच्या व गुन्हेगारांच्या हाताचे बाहुले झाले. राजकारणाची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. जनतेचा नेत्यांवर विश्वास राहिला नाही. देशाच्या विकास आणि प्रगतीच्या नावावर सगळ्या देशालाच देशोधडीला लावण्यात येत आहे. ही अवस्था फक्त भारताचीच नव्हे तर समस्त जगालाच याची कीड लागलेली आहे.

परिस्थिती एवढ्यावरच थांबलेली नाही, तर राजकारणात डावपेच खेळणार्याची पाठ थोपटण्याचा रीतसर लाळघोटेपणा सुरू आहे. राजकारण्यांचा आज इतका वचक आहे की, कधीकधी कायद्यालासुद्धा त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागतेच, शिवाय बरेच नेते आपला स्वार्थ साधण्यासाठी कायदा खिशात घालून बिनधास्त वावरतात. ही समस्या आता इतकी गुंतागुंतीची झाली आहे की, आता हे ठरविणेदेखील अवघड झाले की नेता मोठा की, न्याय मोठा. एखादा अपराध सामान्याने केला की गुन्हा ठरावा आणि तोच अपराध एखाद्या नेत्याने केला की, गुन्हा ठरू नये, इतकी परिस्थिती बिकट होऊन बसली. साधारणतः एवढेच म्हणता येईल की, राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी कायद्याला धाब्यावर बसवून जे कृत्य करण्यात येते, त्यास आपण राजकीय अपराध म्हणावे. सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी वाट्टेल ते करण्याची जी मानसिकता राजकारण्यांची बळावली, त्याचाच भयानक परिणाम अवघ्या देशाला आज भोगावा लागत आहे. जो नेता सर्वांत जास्त घपले-घोटाळे करण्यात पटाईत आहे, तो सर्वांत जास्त मोठा नेता होत आहे. ही अवस्था आज केवळ भारतातच नव्हे तर अगदी जागतिक पातळीवर दिसून येत आहे. त्याचप्रमाणे राजकारण करण्यासाठी अगर राजकीय खेळी खेळण्यासाठी आजकाल सर्रासपणे जातीयवादाचे विषारी डाव खेळणे, धर्माचा राजकारणासाठी सर्रास वापर करणे, समाजात दूही पसरवून दंगली घडविणे आणि मग सत्ता हस्तगत करणे, या घटना मात्र आता रोजच्याच झाल्या आहेत.

सद्यस्थितीमध्ये राजकारणासाठी हा फॉर्म्यूला सगळ्यात सोपा झाला की, वंश-वर्ण, प्रांत आणि भाषावाद उभा करून जनतेचे शोषण करावे आणि सत्ता भोगावी. एवढेच नव्हे तर काही देशात तर वर्ण-वंशाच्या आधारांवर भीषण रक्तपात करण्यात आला. उदाहरणासाठी बोस्निया आणि चेचनियाचे उदाहरण देता येईल. काही देशांमध्ये धर्माच्या नावावर वारंवार दंगली घडवून हजारो निष्पापांच्या रक्ताने होळी खेळून सत्तेची असुरी तहाण भागविण्यात येते. भारतामध्ये मुस्लिम समुदायाबरोबर हेच होत आहे. याचप्रमाणे म्यानमारमध्ये मुस्लिमांविरुद्ध, पाकिस्तानात मुहाजिरीन(स्थलांतरित) विरुद्ध, अप्रिका आणि अमेरिकेत कृष्णवर्णीयांविरुद्ध जे काही होत आहे, ते राजकीय अपराधांमध्येच मोडते.

देशात वार्षिकरित्या ८० हजार कोटी रुपयांचा लाच-लुचपत भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची उलाढाल होते.(संदर्भ : राष्ट्रीय सहारा - दिल्ली १६ जून २०००) दरवर्षी ८० हजार लोक आत्महत्या करतात.(संदर्भ : राष्ट्रीय सहारा - दिल्ली २२ जुलै १९९१) दर दीड मिनिटाला एक चोरी, दर मिनिटाला एक वाटमारी, दर चौदा मिनिटांना एक दरोडा पडतो.(संदर्भ : दैनिक राष्ट्रीय सहारा, दिल्ली, २ नोव्हेंबर १९९०) त्याचप्रमाणे अपहरण आणि स्मगलिंग(काळा धंदा) धूमधडाक्यात चालू आहे.

भारतातील सरकारी बँकांमध्ये धोकेबाजीच्या आरोपांमध्ये या चार वर्षांच्या काळात ११४९ कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. याव्यतिरिक्त ३४७५ लोकांनाही लहानसहान शिक्षा आणि दंड देण्यात आले.(संदर्भ : तेहजीबुल अखलाक, डिसेंबर १९९२) त्याचप्रमाणे इतरांची संपत्ती अवैधरित्या बळकावून पचविणे करणे वगैरेसारखे अपराध शिगेला पोचले आहेत. उदाहरणार्थ, १९९२ पासून १९९६ पर्यंत भारतातील विविध विभागात जे घोटाळे झालेत, त्याचा तपशील असा आहे. १९९२ साली ५,००० कोटी रुपयांचा साखर घोटाळा, १९९४ साली ६५० कोटी रुपयांचा चारा घोटाळा, १९९५ साली ६०० कोटी रुपयांचा हाऊसिंग घोटाळा, १९९५ साली १७ कोटी ४० लाख रुपयांचा हवाला कांड आणि ६५ कोटी रुपयांचा झारखंडचा पक्षाला लाच देण्याचे कांड व तीन कोटींचा यूरिया घोटाळा, १९९६ साली एकूण ६,४६८ कोटी ४० लाख रुपयांच्या घोट्याळ्यांचा अजून तपास सुरू आहे. शिवाय आणखीन एकेक प्रकरण बाहेर येतच आहे.(संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, २१ जून १९९६)

 

 

वर्तमानकाळातील अपराध : सामरिक अपराध

निश्चितच युद्ध म्हणजे मानवीय प्राणांचा बळी जाणे, रक्ताचे पाट वाहणे, संपत्तीची राखरांगोळी होणे, मुले अनाथ आणि स्त्रीया विधवा होणे, या बाबी आल्याच, शिवाय कधीकधी युद्धाशिवाय पर्यायसुद्धा नसतो. मात्र यासाठीसुद्धा जागतिक पातळीवर काही नियम घालून देण्यात आलेले आहेत आणि या नियमांची पायमल्ली करणे म्हणजेच सामरिक अपराध होय. उदाहरणार्थ, युद्ध हा अगदी शेवटचा पर्याय आहे. समस्या या उभय पक्षातील समन्वय आणि संवादाने निश्चितच सुटू शकतात. मात्र जाणूनबुजून युद्धसदृश परीस्थिती निर्माण करणे आणि त्यात निष्पाप नागरिकांचा बळी घेणे, स्त्रियांच्या शरीरांचे लचके तोडणे, जैविक अस्त्रांचा वापर करून नागरिकांच्या प्राणांचा बळी घेणे, अनुशक्तीचा वापर करून शहरेच्या शहरे नष्ट करणे, युद्धकैद्यांचा अमानुष छळ करणे, हे सर्वकाही सामरिक अपराध होय. मागील शतकात घडलेल्या दोन महायुद्धांच्या परिणामांचे भोग आजही मानवता भोगत आहे. खरे पाहता ही युद्धे न करताही समस्या सोडविता आल्या असत्या. तरीसुद्धा सत्यद्वेषाने पिसाटलेल्यांनी मानवजातीवर भयानक युद्धे लादून जो घोर अपराध केला, त्याचे प्रायश्चित्त होणे कधीच शक्य नाही. आजही त्या महायुद्धांच्या आठवणी नागासाकी आणि हिरोशिमाचे नाव काढताच अंगावर शहारे आणतात. पराभूत सैन्यांच्या महिलांच्या अब्रूचे धिंडवडे कशा प्रकारे काढण्यात आले आणि किती भयानक रक्तपात करण्यात आला, याची कल्पना न केलेलीच बरी. बोस्निया आणि चेचनियात झालेल्या रक्तपाताची आणि तेथील निष्पाप स्त्रियांचा सामुदायिक बलात्कार करण्याची कल्पना न केलेलीच बरी.

सामरिक अपराध म्हणजे केवळ बळजबरीचे युद्ध लादणेच नव्हे, तर यासाठी जीवघेणे अस्त्र तयार करणे, सामरिक तयारी करणेसुद्धा अपराध आहे. वर्तमानकाळात प्रगत अगर अतिप्रगत देशात अस्त्रनिर्मितीची जी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे, हे याचे उत्तम उदाहरण होय. आज परीस्थितीत काही देशांजवळ इतके विनाशक अस्त्र आणि बॉम्ब आहेत की केवळ एकाच बाँबच्या वापरांमुळे समस्त जग नष्ट होऊ शकते. यदा-कदाचित असे घडले तर या अपराधाच्या परिणामाची कल्पना करणेही शक्य नाही.

आज अवघे विश्व नष्टतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. एका अहवालात म्हटले आहे की, आज पूर्ण जगामध्ये दहा कोटी दारूगोळ्यांची भुयारे तयार करून ठेवण्यात आलेली आहेत. अगदी एका इशार्यात कोट्यवधी प्राणाचा बळी जाऊ शकतो.(संदर्भ : कौमी आवाज, २३ सप्टेंबर १९९५)

रशियामध्ये स्टॅलीनच्या काळात कैद्यांवर विष-प्रयोग करण्यात येत असे. त्याच्या गुप्त पोलिसयंत्रणेच्या प्रयोगाशाळेत तयार करण्यात आलेल्या विषारी पदार्थांची तीपता पाहण्यासाठी त्याचा कैद्यांवर प्रयोग करून अभ्यास करण्यात येत, सामान्य कैद्यांना विषारी पदार्थांची इन्जेक्शन्स दिली जात आणि यावरून अनुमान लावण्यात येत असे की, कोणते विष जास्त तीप आहे.(संदर्भ : कौमी आवाज, २८ जुलै १९९५) त्याचप्रमाणे दुसर्या महायुद्धात चीनी नागरिकांवर शस्त्रक्रिया करण्याचे प्रयोगसुद्धा जपानमध्ये करण्यात आले.(संदर्भ : कौमी आवाज, २४ जुलै १९९५) ही सर्व उदाहरणे सामरिक अपराधांची आहेत. इराकमध्येसुद्धा मागील दहा-पंधरा वर्षांपासून आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी केल्यानंतर तेथील लाखो नागरिक अमेरिकेच्या अत्याचारास बळी पडले. लक्षावधी निष्पाप मुलांचा औषधाअभावी मृत्यू झाला आणि हे सर्वकाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्यायी व अत्याचारी निर्णयामुळे घडले.

 

 

 

वर्तमानकाळातील अपराध : नैतिक अपराध

नैतिक अपराध म्हणजे असे अपराध ज्यामुळे अपराध करणार्या व्यक्ती अगर तिच्या नातेवाइकांची नैतिकता प्रभावित होत असते किंवा जे अपराध नैतिकतेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, आत्महत्या, मद्यपान, मादक पदार्थांचा वापर करणे वगैरे होय.

भारतात दरवर्षी ८० हजार लोक आत्महत्या करतात. सिगारेट, बिडी आणि तंबाखू सेवनाने होणार्या रोगास दहा लाख लोक बळी पडतात. जागतिक आरोग्य संस्थेच्या एका अहवालानुसार हे स्पष्ट झाले की, जर मादक द्रव्याचा वापर करण्याची हीच अवस्था असली तर काही दशकांमध्ये दरवर्षी एक कोटी लोक मरण पावतील. अर्थातच दर तीन सेकंदास एका व्यक्तीचा मृत्यू होईल. दुसरीकडे मादक पदार्थांच्या सेवनास नवीन पिढीच बळी पडली आहे आणि ही समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. एका सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती बाहेर पडली की, पंधरा ते वीस वर्षे वयातील तरूण-तरूणी या समस्येच्या विळख्यात जास्त सापडलेले आहेत.(संदर्भ : कौमी आवाज २१ ऑक्टोबर १९९५, २४ एप्रिल १९९५)

संपूर्ण जगावर एड्स्सारख्या अत्यंत भयानक रोगाने आपला विळखा अवळला. हे तर झाले, शिवाय जे एड्स्च्या रोगाने पछाडलेले आहेत, ते जाणूनबुजून इतर लोकांना एड्स्चे भक्ष्य बनविण्याचे अमानुष पातक करीत आहेत. यामुळे ही समस्या अत्यंत भीषण स्वरूप धारण करीत आहे. उदाहरणार्थ, आयँर्लंडमध्ये एका एड्स्ग्रस्त महिलेने वैफल्यग्रस्त होऊन जाणूनबुजून इतर लोकांशी लैंगिक व्यभिचार केला, त्यांनाही एड्स्ग्रस्त करून आपली असुरी कामना पूर्ण केली. अशा मार्गाने तिने ८० जणांत एड्स्चे विषाणू स्थलांतरित केले. त्याचप्रमाणे एका एड्स्ग्रस्त तरूणाने तेरा मुलींशी लैंगिक समागम करून रोगाची लागण लावण्याचे नैतिक अपराध केले.

सारांश

अर्थातच अपराधांसंबंधी जे काही येथे लिहिण्यात आले, त्यावरून अपराधांचे केवळ एक ढोबळ स्वरूप समोर येते. नसता वस्तुस्थिती अशी आहे की अपराधांची आकडेवारी आणि भीषणता याहून कितीतरी पटीने जास्तच आहे. तिचे परिपूर्ण वर्णन करणे शक्यसुद्धा नाही. केवळ ढोबळ अनुमानासाठी ही आकडेवारी आणि वृत्तान्त आहे. वर्तमानकाळात फोफावलेल्या अपराधी वृत्तींची भीषणता यावरून स्पष्ट होते की, इलेक्ट्रानिक आणि वृत्त प्रसारमाध्यमाचा अधिकांश भाग हा गुन्हेगारी जगाच्या बातम्यांनी व्यापलेला आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयात दिवाणीपेक्षा फौजदारी प्रकरणेच जास्त दिसतात.

संबंधित लेख

 • भ्रष्टाचारापासून बचावाचा इस्लामी उपाय

  वर्तमानकाळात ईर्ष्या आणि लालसेने माणूस पार पिसाळून गेला आहे. जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल, यासाठी ना-ना काळ्या-पांढर्या पद्धतींचा तो अवलंब करीत आहे. यामुळेच आज सर्वच भ्रष्टाचार आणि काळ्या बाजाराचा वणवा पेटला आहे. मामुली चपराशापासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वच यात बरबटलेले आहे. जो जितका शासनकर्त्यांच्या जवळचा चमचेगिरी करणारा आहे, तितका जास्त भ्रष्ट आहे. याचे कारण असे आहे की, आज माणूस संपत्ती आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत आहे. पैसा असला की, वैभव, प्रतिष्ठा, समाजावर वचक, प्रसिद्धी आणि ऐशो- आरामाचे जीवन, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. यासाठी वाटेल त्याचा गळा चिरायचा, खिशावर डल्ला मारायचा आणि वाटेल ते कृष्णकृत्य करायचे, मात्र पैसा कमवायचाच, अशी सर्वत्र मानसिकता बळावली आहे. याउलट माणूस कितीही चारित्र्यवान असला, विचारवंत असला, ज्ञानी, सभ्य, आणि उच्चशिक्षित असला, मात्र जर त्याच्याकडे पैसाच नसेल, तर त्याच्या जगण्याला जणू काही अर्थच नाही.
 • इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या विरुध्द आहे

  इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या विरुध्द आहे आणि जगात बिघाड आणि विकृतीला कारणीभूतदेखील असते. म्हणून पवित्र कुरआनमध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये प्रचलित असलेल्या संन्यासाचे खंडण करून त्यास अस्वाभाविक आणि अप्रशंसनीय पध्दत म्हटले आहे. कुरआनमध्ये नमूद आहे,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]