Islam Darshan

इस्लामी उपासनांसंबंधी एक लक्षणीय बाब

Published : Saturday, Mar 05, 2016

इस्लामी उपासनांसंबंधी एक बाब येथे लक्षणीय होय की ‘नमाज‘ ही अश्लीलता आणि दुष्कर्मांपासून रोखते, रोजासंबंधी म्हटले गेले की त्यामुळे ईशपरायणता येते व आत्मशुद्धी होते. जकात दिल्याने पावित्र्य तसेच हजमुळे मोक्ष प्राप्त होतो. अर्थात सर्व पाप धुतले जातात. यावरून स्पष्ट होते की या सर्वच बाबी गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यास सहाय्यक ठरतात. येथे ही बाबसुद्धा लक्षणीय आहे की, नमाज ज्या बाबींपासून रोखते, इतर माध्यमांनी त्यापासून मानवास रोखता येत नाही, रोजामुळे जी ईशपरायणता येते, ती इतर कोणत्याही गोष्टीमुळे येत नाही. जकातमुळे जे पावित्र्य लाभते, ते इतर कशानेच शक्य नाही. हजमुळे जे पाप नष्ट होतात, इतर कोणत्याच गोष्टीने होत नाहीत. म्हणून या सर्वच उपासनांचे एक आपले महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी निर्मूलनासाठी या सर्वच उपासनांची गरज आहे. कोणतीही एकच उपासना अगर काही निवडक उपासना करून ते सर्वकाही साध्य होऊ शकत नाही जे या सर्व उपासनांमुळे साध्य होते.

इस्लामची नैतिक शिकवण

इस्लामी उपासनांमुळे गुन्हेगारीचे कशाप्रकारे निर्मूलन होते, ते आपण उपरोक्त मजकुरात पाहिलेच आहे. याशिवाय इस्लामने प्रत्यक्षात काही अशा नैतिक शिकवणी दिल्या आहेत, ज्यामुळे माणसाच्या शिरावर केवळ नैतिकतेचे सुंदर मुकुटच येत नसून पूर्णपणे गुन्हेगारीचा समूळ नायनाटसुद्धा होतो. ज्या समाजात उच्च नीतीमूल्यांची जोपासना होते, तो समाज गुन्हेगारीपासून मुक्त होतो आणि तेथे शांती, समृद्धी आणि वैभवाचे शीतल वारे वाहू लागतात. वर्तमानकाळात नैतिकतेचा जो किळसवाणा र्हास होऊन आणि मानवी मूल्ये पायदळी तुडवून समाज अपराधी वृत्तीच्या जुलमी जबड्यात जसा आवळला गेला आहे, त्यातून इस्लामी नैतिक शिकवणी निश्चितच समाजास मुक्त करू शकते, हेच आपण या प्रकरणात पाहणार आहोत.

इस्लाममध्ये नैतिकतेचे महत्त्व

इस्लाममध्ये नैतिकतेचे जे महत्त्व आहे, त्याचा अनुमान या गोष्टीवरून लावता येईल की प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या प्रेषितत्त्वाचा एक हेतुच मुळात नैतिकतेची पूर्णता आहे. स्वतः प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘निश्चित मी चांगल्या नैतिकतेचे पूर्णत्व करण्यासाठी आलो आहे!‘‘(संदर्भ : प्रेषितवचन ग्रंथ-मुस्नदे अहमद)
एकदा माननीय आयशा(र.) यांना विचारण्यात आले, ‘‘प्रेषित मुहम्मद(स.) यांचे नैतिक आचरण कसे होते?‘‘ उत्तरादाखल प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या भार्या माननीय आयशा म्हणाल्या, ‘‘तुम्ही कुरआन वाचले नाही काय? प्रेषित मुहम्मद(स.) यांचे नैतिक आचरण म्हणजेच पूर्णपणे कुरआनाच्या शिकवणी आहेत.‘‘ कुरआनानेसुद्धा या गोष्टीची साक्ष दिली की प्रेषित मुहम्मद(स.) हे अत्यंत उच्च नैतिक आचरणांच्या सिंहासनावर विराजमान होते. स्वयं ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘निश्चितच(हे मुहम्मद(स.)!) तुम्ही नैतिकतेच्या अत्युच्च दर्जावर विराजमान आहात.‘‘(संदर्भ : सूरह-ए-कलम - ४)

इस्लाममध्ये ईशपरायणता व नैतिक आचरणांना एवढे अनन्यसाधारण महत्त्व आहे की केवळ याच्याच आधारावर माणूस हा इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरू शकतो. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘वस्तुतः ईश्वराच्या दृष्टीमध्ये सर्वांत जास्त श्रेष्ठ माणूस तो आहे, जो सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)

प्रेषितकाळातील दोन स्त्रियांची एक घटना आहे. एक स्त्री खूप जास्त नमाज आणि रोजे नित्यनेमाने करीत असे. मात्र आपल्या शेजार्या-पाजार्यांना वाटेल तसे बोलून त्यांना त्रास देत असे. तिच्यासंबंधी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की ‘‘तिच्या नमाज पढण्याचा आणि रोजे ठेवण्याचा तिला काहीच लाभ होणार नाही.‘‘ याव्यतिरिक्त द्वितीयोल्लेखित स्त्री ही जास्त नमाज आणि रोजे व यांसारख्या उपासना करीत नव्हती आणि केवळ अनिवार्य असलेलीच नमाज पढत होती व अनिवार्य रोजे करीत होती, मात्र ती कधीच कोणालाही त्रास देत नव्हती. या स्त्रीबाबत प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले, ‘‘ही स्त्री मोक्षप्राप्तीकरिता पात्र आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन ग्रंथ-बुखारी)

अशा प्रकारच्या आणखीनही असंख्य शिकवणी आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की, इस्लामने उपासनांना जे महत्त्व दिले आहे, नैतिक आचरणांनासुद्धा तेवढेच महत्त्व दिले आहे. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! रुकुअ करा, सजदे करा,(अर्थात नमाज अदा करा) आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करा, तसेच सदाचाराने वागा, आशा आहे की तुम्ही यशस्वी व्हाल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हज ७७)

संबंधित लेख

  • माननीय झैद बिन साबित(र.) अन्सारी

    प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,
  • प्रेषित / संदेश वाहक

    ईश्वराने मानवाला जे आचार-विचारांचे स्वातंत्र दिले आहे, त्याचा गैरवापर करुन मानव ईश्वराची अवज्ञा करुन बंडाचा मार्ग अनुसरु शकतो. परंतु मानवाकरिता योग्य, वैध, नैतिक आणि इहलोक व परलोक जीवनामध्ये यशाचा व चांगल्या साफल्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ईश्वराला प्रसन्न करणे, त्याची भक्ती करणे आणि त्याच्याच कायदे-कानून व आदेशपालनाचा मार्ग स्वीकारणे होय.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]