Islam Darshan

इस्लामी आचरणांचे प्रकार : सदाचार

Published : Saturday, Mar 05, 2016
असत्य

असत्य आणि खोटेपण म्हणजे सत्यविरोधी बोलणे, सत्यविरोधी आचरण करणे आणि त्यास मनात जागा देणे होय. ही गोष्ट प्रत्येकालाच माहीत आहे की यामुळे समाजास किती मोठे नुकसान सोसावे लागते. याचे माणसाने नेहमीच पथ्य पाळावे. त्याचा थोडासाही अंश आपल्याजवळ फटकू देता कामा नये. प्रेषितकाळात एक स्त्री आपल्या मुलाला बोलावत होती की, ‘‘चल तुला खाऊ देते.‘‘ मात्र ती केवळ मुलाला खाऊचे आमिष देत होती. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी याचीसुद्धा असे सांगून मनाई केली की, ‘‘हा खोटेपणा आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अबू दाऊद) असत्य आणि खोटेपणा हे अत्यंत घृणास्पद, निषिद्ध असल्याचे इस्लामने म्हटले आहे. कुरआनाने स्पष्ट शब्दांत बजावले आहे,

‘‘मूर्तीपूजेच्या गलिच्छतेपासून स्वतःचे रक्षण करा आणि खोट्या गोष्टींचे पथ्य पाळा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हज - ३०)

अप्रामाणिकता

इतरांचे अधिकार गिळंकृत करणे, इतरांकडून घेतलेल्या वस्तु परत न करणे, इतरांचे गुपित उघड करणे, जवाबदारी न निभावणे, कर्तव्य पूर्ण करण्यात हलगर्जीपणा करणे, अधिकारांचा गैरवापर करणे, शासकीय तिजोरीत भ्रष्टाचार करणे, या सर्व गोष्टी यामध्ये मोडतात. इस्लामने या गोष्टी निषिद्ध ठरवून या काळ्या कृत्यांवर जबर आळा बसविला आहे. ईश्वराने म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धावंतानो! प्रेषिताकरवी जी(सत्य शिकवणीची) अनामत तुम्हास मिळाली आहे, तिच्याप्रति गैरवर्तन करू नका आणि(लोकांच्या ज्या) अनामती(तुमच्याकडे आहेत,) त्यात अफरातफर करू नका.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनफाल - २७)

त्याचप्रमाणे इतरांना शब्द देऊन वचनभंग करणे वा ऐन संकटाच्या वेळी दगा करणेसुद्धा इस्लामने निषिद्ध ठरविले आहे. कुरआनात ईश्वराने अगदी स्पष्टपणे म्हटले आहे,

‘‘ज्यांच्याशी तुम्ही करार केला, मग त्यांनी प्रत्येक प्रसंगी तो करार भंग केला आणि त्यांना जराही ईश्वराच्या प्रकोपाचे भय वाटत नाही. म्हणून जर हे लोक तुम्हाला युद्धात सापडले तर त्यांचा असा समाचार घ्या की त्यांच्यानंतर जे लोक असे वर्तन करतील, त्यांना धडा मिळेल. अपेक्षा आहे की करार भंग करणार्यांच्या या अशा परिणतीने ते धडा घेतील. आणि जर तुम्हाला एखाद्या समूहाकडून दगलबाजीची भीती असेल तर त्यांचे करार जाहीरपणे त्यांच्या तोंडावर फेकून द्या. निश्चितच ईश्वर विश्वासघातकी लोकांना पसंत करीत नाही.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनफाल - ५६ ते ५८)
अर्थातच हे असे दुष्कर्म आहे की कोणत्याही धर्मात यालासुद्धा स्थान नाही. सर्वच प्रकारचे लोक याप्रति घृणा करतात.

खोटा आरोप लावणे

इस्लामी कायद्यामध्ये गुन्हा करणे जसे पातककर्म आहे, तसेच गुन्ह्याचा खोटा आरोप लावणे हेदेखील पातककर्म ठरविण्यात आले आहे. एखाद्या निष्पापावर अपराधाचे कलंक लावून त्याच्यावर अन्याय करणे हे घोर पाप आहे. आरोप छोटा असो की मोठा असो, आरोप लावणे मात्र सारख्याच स्वरुपाचा अपराध आहे. एखाद्या शालीन स्त्रीवर व्यभिचाराचा आळ घेणे, एखाद्यावर चोरीचा आळ घेणे अथवा इतर स्वरुपाच्या गुन्ह्याचे आरोप लावणे म्हणजे समाजात भयानक उपद्रव निर्माण करणे होय. यासारख्या खोट्या आरोपामुळे बरेचजण आत्महत्या करतात, काही सूडभावनेने पेटून आरोप लावणार्याचा वध करतात. अन्यायपीडितास आतोनात शारीरिक आणि मानसिक भोग भोगावे लागतात, नैतिक मूल्ये पायदळी तुडविणार्या या घृणास्पद अपराधाची शिक्षा मात्र इस्लामने खूप कठोर सुनावली आहे. यासंबंधी कुरआनात म्हटले आहे,

‘‘जे लोक शालीन स्त्रीवर आरोप लावतात आणि चार साक्षीदारांच्या साक्षीने आरोप सिद्ध करू शकत नाही तर त्यांना एंशी कोरडे मारावेत आणि यापुढे त्यांची साक्ष अपात्र ठरविण्यात यावी. हेच लोक मुळात घोर अपराधी आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नूर - ४)

चुगलखोरी व चहाडी

एखाद्या व्यक्तीविषयी इतरांच्या मनात द्वेश निर्माण करण्यासाठी अगर प्रतिमा डागाळण्यासाठी त्याच्यातील एखादा दुर्गुण वर्णन करणे वा खोट्यानाट्या गोष्टी करणे म्हणजेच चुगली-चहाडी करणे होय. याचाच अर्थ स्नेह आणि बंधुभावासारख्या शुद्ध वातावरणात विष कालवणे होय. कधीकधी तर यामुळे अगदी दोन समाजांतच नव्हे तर दोन देशांत रक्तपात यामुळे होतो आणि याची इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. म्हणून इस्लामी कायद्यात या दुष्कर्मास घोर पाप ठरवून असे बजावण्यात आले की, जोपर्यंत कोणाच्या पापाची वा दुष्कर्माची पूर्ण पुराव्यानिशी व साक्षीदारानिशी सिद्धता स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आरोप लावणार्यावर अगर चुगली करणार्यावर विश्वास ठेवता कामा नये, जेणेकरून आपसामध्ये गैरसमज वाढू नयेत आणि विश्वासाला तडा जाऊ नये. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धावंतांनो! जर एखादा दुष्कर्मी(अगर चहाडीखोर) तुम्हास एखाद्या(वाईट) गोष्टीची खबर देत असेल तर, पूर्ण शहानिशा केल्याशिवाय त्याच्यावर विश्वास करू नका, असे न होवो की त्याच्या(खोट्या) वार्तेवर विश्वास ठेवून तुम्ही एखाद्या निष्पाप समुदायावर आक्रमण करावे आणि नंतर पश्चात्तापाची पाळी यावी.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - ६)

एके प्रसंगी प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की, ‘‘सर्वांत वाईट अगर दुष्कर्मी लोक ते आहेत, जे लोकांच्या चहाड्या करीत फिरतात आणि माणसांतील मैत्री व स्नेहामध्ये विष कालवितात.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

निंदा

निंदा म्हणजे एखाद्या माणसातील विकृती आणि वाईट कर्म त्याच्या अनुपस्थितीत इतरांसमोर बोलून दाखविणे होय. या गोष्टीमुळेसुद्धा ज्याची निंदा करण्यात येते, त्याला खूप मानसिक त्रास भोगावा तर लागतोच शिवाय दोन माणसांत व समाजांत दुही निर्माण होते. म्हणूनच इस्लाममध्ये इतरांची निंदा-नालस्ती करणे एक घोर पाप आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी कोणीही कोणाच्या पाठीमागे निंदा करू नका. बरे तुम्हाला आपल्या मयत भावाचे मांस खाणे कसे काय आवडेल? ईश्वराचे भय बाळगा. निश्चितच तो दयाळू आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १२)

गैरसमज

विनाकारणच आपल्या कोणत्याही बांधवाविषयी गैरसमज करून घेणे म्हणजे त्याच्यापासून दुरावा निर्माण करणे होय. कोणी जर पाणी पीत असेल तर तो दारू पीत असल्याचा गैरसमज करून घेता कामा नये. कोणतीही गोष्ट सिद्ध न होता विनाकारणच गैरसमज करून घेऊ नये अशी इस्लामने ताकीद केली आहे. ईश्वराने स्पष्टपणे म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतानो! गैरसमज करून घेऊ नका. निश्चितच काही गैरसमज घोर पातक असतात.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १२)

स्वतःच्या प्रशंसेची आस - आत्मश्लाघा

आपणच इतरांपेक्षा भारी, चांगले आणि इतर मात्र मूर्ख, नालायक, अशा प्रकारच्या भावना ठेवून ऐटीत मिरविणे, इतरांनी आपल्या तोंडावर आपली प्रशंसा केल्यास उल्हासित व आनंदीत होण्याचा बायकीपणा करणे, फुशारकी मारणे आणि विनाकारणचा गर्विष्ठपणा बाळगणे, तसेच इतरांचे सद्गुण नजरे आड करून त्यांना तुच्छ लेखणे व यासारखे दुर्गुण माणसात असल्याने समाजातून नैतिकतेचा र्हास होतो. गर्व, अहंकार, स्वश्रेष्ठत्वासारखे दुर्गुण फोफावतात. आत्मश्लाघांना बळी पडून माणूस हा विनाकारणच इतरांना तुच्छ लेखण्यामुळे समता व बंधुत्वाची राखरांगोळी होते. असत्य आणि दांभिकतेच्या निष्ठूर जबड्यात अवघा समाज याचे दुष्परिणाम भोगत असतो. म्हणूनच इस्लामने यावर जबर आळा आवळला. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘जे आपल्या कार्यांवर ऐट करतात आणि तुरा मिरवितात, इतरांनी केलेल्या प्रशंसेने आनंदीत होतात, त्यांना समजायला हवे की ते ईश्वराने निश्चित केलेल्या शिक्षेपासून वाचणार नाहीत. ईश्वराजवळ त्यांच्यासाठी यातनामय शिक्षा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १८८)

क्रोधाग्नी

मनासारखे न घडल्यास अथवा स्वार्थाला बाधा पोचल्यास किंवा अहं दुखावल्यास माणसाला संताप येतो. खरे पाहता राग येणे हे गरजेचेही आहे. कोणी जर आपल्यावर अन्याय करीत असेल अथवा हकनाक अत्याचार करीत असेल तर अन्याय व अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी तसेच आपले प्राण, संपत्ती आणि शालीनतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला राग येणे आवश्यकच आहे. मात्र हा राग किंवा संताप अनावर झाल्यास त्याचा क्रोधाग्नीच्या स्वरुपात भडका होतो आणि माणूस आपले भान व विवेकशक्ती हरवून बसतो. नको त्या ठिकाणी आपला क्रोधाग्नी शांत करण्याचा वाटेल तसा प्रयत्न करतो. यामुळे लहानसहान अपराधांपासून ते मोठमोठे अपराध आणि भयंकर रक्तपात व आत्महत्यासारखे प्रकार घडतात. म्हणूनच इस्लामने आपला राग ताब्यात ठेवण्याचा आणि संयम बाळगण्याचा आदेश दिला आहे. अशा संयमी आणि संतापावर ताबा ठेवणार्याची ईश्वराने अशा शब्दांत प्रशंसा केली आहे,

‘‘असे लोक जे प्रत्येक अवस्थेत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते गरिबीत असो की श्रीमंतीत असो, असे लोक जे आपल्या क्रोधावर ताबा ठेवतात आणि इतरांच्या चुका माफ करतात, ते सदाचारी लोक ईश्वराला खूप पसंत आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १३४)

प्रत्येक माणसाला संताप येतोच. मात्र त्यास ताब्यात ठेवण्याच्या पद्धतीं प्रेषित मुहम्मद(स.) यांनी दाखविल्या आहेत. उदाहरणार्थ, राग ही आग असून तिला पाण्याने विझवावी लागते. म्हणून राग आल्यावर पाणी पिणे, स्नान करणे, उभे असल्यास खाली बसणे, बसलेले असल्यास निजणे वगैरेसारख्या पद्धतीं प्रेषित मुहम्मद(स.) यांनी दाखविल्या आहेत. शिवाय या क्रोधाग्नीमुळे घडणार्या अनर्थापासून सुरक्षित राहण्याचीसुद्धा ताकीद प्रेषितांनी केली आहे.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - इब्ने हजर)

द्वेष - मत्सर

माणसाला आपला संताप तत्काळ कोणावरही काढता आला नाही तर त्याच्या मनात द्वेष आणि मत्सराची आग धुमसत असते. आपल्यावर झालेल्या अतिरेकाचा वचपा काढण्याची संधी मिळताच तो सूड उगवितो. परिणामी या आगीमुळे रक्तपात आणि यासारखे घोर पातक आणि अनर्थ घडतात. म्हणूनच इस्लामने यापासून स्वतःस सुरक्षित ठेवण्याची ताकीद केली आहे. कुरआनात म्हटले आहे,

(हे ईश्वरा!) ‘‘आमच्या मनामध्ये श्रद्धावंतांविषयी कोणताही द्वेष ठेवू नकोस. हे आमच्या पालनकर्त्या! तू मोठा मेहेरबान आणि दयावंत आहेस.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हश्र - १०)
एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अत्यंत सविस्तरपणे गैरसमज, ईर्ष्या बाळगणे, इतरांचे गुपित माहीत करण्याच्या मागावर राहणे, द्वेष, मत्सर बाळगणे आणि एकदुसर्यांविरुद्ध कुभांड रचण्यासारख्या गोष्टींची मनाई करताना म्हटले आहे,

‘‘गैरसमज करुन घेऊ नका. कारण हा अत्यंत घृणास्पद खोटारडेपणा आहे, इतरांच्या गुप्त त्रुट्या आणि गुपिते माहीत करून घेण्याच्या प्रयत्नात राहू नका, इतरांचा हेवा करू नका, दलाली करू नका, कुभांड व कट रचू नका आणि आपसांत द्वेष, मत्सर ठेवू नका. ईश्वराच्या आदेशाचे प्रामाणिकपणे पालन करून इतरांशी बंधुभावाने वागा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद)

एके ठिकाणी तर प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की, ‘‘जी व्यक्ती मनामध्ये इतरांविषयी द्वेष आणि मत्सर बाळगते, तिला मोक्ष मिळणार नाही.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अदबुल मुफर्रद)
क्रोध, द्वेष व मत्सराबरोबरच माणसाजवळ थोडी शक्ती आणि सामर्थ्य असेल तर तो इतरांवर अन्याय व अत्याचारांची कुर्हाड उगारायला सुरुवात करतो. कुरआनामध्ये अन्यायाचे विभिन्न अर्थ अगर स्वरुप वर्णन करण्यात आले आहेत. मात्र मानवांवर होणार्या अन्याय व अत्याचारांचा अर्थ असा आहे की लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे. ज्याप्रमाणे लोकांच्या अधिकारांचे विविध स्वरुप आहेत, त्याचप्रमाणे अधिकार हिरावून घेण्याचेसुद्धा विविध प्रकार असू शकतात. प्राण, संपत्ती आणि शालीनतेवर हल्ला करणेसुद्धा अन्याय आहे. तसेच एखाद्याविरुद्ध कट-कारस्थान रचणे, याद्वारे प्राण, वित्त आणि शीलतेवर घाला घालणेसुद्धा घोर अन्याय होय. म्हणूनच इस्लामी कायदा अशा समस्त प्रकारांना निषिद्ध ठरवितो. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘हे प्रेषिता(स.)! त्यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने निषिद्ध केलेल्या वस्तु अशा आहेत की निर्लज्ज वर्तन, मग ते उघड असो की गुप्त आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आअराफ - ३३)
‘‘जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाचेच सहकार्य करू नका, ईश्वराचे भय बाळगा, अशा कर्माची शिक्षा फार कठोर आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - २)

अन्याय करतेवेळेस अन्यायी व अत्याचारींना असे वाटते की अन्याय व अत्याचारपीडित माणूस दुर्बल आणि सामर्थ्यहीन असून तो आपले काहीच वाकडे करू शकत नाही आणि मग अन्याय व अत्याचारांची जणू शृंखलाच सुरु असते, ती थांबता थांबत नाही. मात्र प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सडेतोडपणे म्हटले आहे की अंतिम निवाड्याच्या दिवशी अन्याय व अत्याचारपीडितास अन्यायी व अत्याचार्याकडून एकन्-एक अत्याचाराचा बदला मिळेल. पीडितास याची पूर्ण संधी असेल की त्याने आपल्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा बदला घ्यावा. ही बाब स्पष्ट करताना प्रेषित मुहम्मद(स.) यांनी असे शब्द वापरलेत,

‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी तुम्हाला लोकांचे अधिकार अवश्य चुकवावेच लागतील. एवढेच नव्हे तर शिंगे नसलेल्या शेळीलाही शिंगे असणार्या शेळीने जर मारलेले असेल तर शिंगे नसलेल्या शेळीस शिंगे प्रदान करून बदला घेण्याची पूर्ण संधी देण्यात येईल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)

अहंकार

इतरांकडे नसलेली गोष्ट अगर वैशिष्ट्ये अथवा शक्ती व सामर्थ्य एखाद्या माणसाकडे असेल, तर तो इतरांना तुच्छ समजतो, हिणवितो आणि याच भावनेला गर्व किंवा अहंकार म्हटले जाते. अहंकार आणि गर्वाचा माज चढला की मात्र उपद्रवी कर्मे व गुन्हेगारीचा उद्रेक होतो. एवढेच नव्हे तर हीच भावना अपराध वा गुन्हेगारींची जननी आहे. या जननीच्या भरपूर शाखा आणि पालेमुळे आहेत. माणूस अहंकारी भावनांच्या आहारी गेला की तो सैतानास शोभेल असे कर्म करू लागतो. या कर्मांना मग काहीच मर्यादा नसते. अहंकारामुळेच माणूस ईश्वराचा इन्कार आणि त्याची अवज्ञा करण्याइतपत मजल मारतो. सैतानानेसुद्धा हेच केले. गर्व आणि अहंकारामुळेच तो इतरांना पाण्यात पाहतो, ईर्ष्या बाळगतो. कारण आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल तर त्याला मुळीच खपत नाही. अहंकाराचा कोरडा सर्वांवरच उगारतो आणि लोक त्याच्या अन्याय व अत्याचारास बळी पडतात. यामुळे गर्विष्ठाला एक अघोरी शांती मिळत असते. अहंकाराच्या झिंगेत इतरांना पायदळी चिरडल्याशिवाय त्याचा आसुरी अहं सुखावत नाही. त्यामुळे गर्व अगर अहंकारामुळे बर्याच अपराधाचा जन्म होतो. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘त्यांच्या मनात गर्व भरलेला आहे, परंतु ते मोठेपणा व श्रेष्ठत्वास पोचणार नाहीत ज्याचा ते अभिमान बाळगतात. म्हणून ईश्वराचा आश्रय मागा. तो सर्वकाही पाहतो आणि ऐकतो.”(संदर्भ : सूरह-ए-मुअमिन - ५६)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की, ‘‘चांगले खाणे, चांगली वस्त्रे व पोषाख वापरणे हा गर्व मुळीच नसून इतरांना आपल्यापेक्षा तुच्छ लेखणे हा गर्व होय.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अबू दाऊद)
आणखीन एके ठिकाणी म्हटले आहे की ‘‘ज्याच्या मनात तिळमात्रसुद्धा गर्व असेल, तो स्वर्गात जाऊ शकणार नाही.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अबू दाऊद)

ईर्ष्या

अहंकार आणि गर्वाचीच अनौरस संतान ही ईर्ष्या होय. गर्व म्हणजे माणसाला इतरांच्या तुलनेत, शक्ती, संपत्ती, सौंदर्य, प्रसिद्धी वा एखाद्या गोष्टीचे सामर्थ्य किंवा कोणतीही वस्तु जास्त मिळाली तर याचा माज चढतो. मात्र ईर्ष्या याच्या अगदी उलट आहे. इतरांजवळ जे आहे ते जर आपल्या जवळ नसेल, तर माणसाच्या मनात ईर्ष्या अगर हेवा निर्माण होतो. आपल्याला प्राप्त नसलेल्या मात्र इतरांजवळ असलेल्या बाबी जर नष्ट होत असतील तर त्याला आनंद होतो. ईर्ष्येची आणखीनही बरीच कारणे असली तरी त्याचे मूळ कारण हे गर्व आणि अहंकारच होय. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘काय ते लोकांचा हेवा करतात अशा वस्तुंचा, ज्या त्यांना ईश्वराने आपल्या कृपेने जास्त प्रदान केल्या आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ५४)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी याचा असा विलाज दाखवला की,
‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणी आपल्यापेक्षा जास्त संपत्ती आणि संतती असलेला पाहील तेव्हा त्याने अशाजणांनासुद्धा पाहावे, ज्यांना या वस्तु तुमच्यापेक्षाही कमी मिळालेल्या आहेत.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

प्रसिद्धीची व्यर्थ लालसा

लोकांमध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण करण्याची आणि इतरांपेक्षा आपणच चांगले व श्रेष्ठ सिद्ध करण्याची लालसा म्हणजेच गर्विष्ठपणा आणि अहंकाराचाच परिणाम होय. याच अहंकारी भावनेमुळे माणूस गर्वाच्या झिंगेत वावरत असतो. आत्मश्लाघा आणि स्वश्रेष्ठत्वाच्या आसुरी भावनेने माणूस ऐहिक बाबतीतही पेटू शकतो आणि धार्मिक कर्मांच्या बाबतीतही पेटून उठू शकतो. धार्मिक कर्मांबाबतीत तर ही बाब आणखीनच गंभीर सिद्ध होते. कारण ईश्वराच्या प्रसन्नतेखातर जे कर्म करण्यात येते, तेच कर्म ईश्वर स्वीकारतो, तर याउलट जे कर्म ईश्वरेतराच्या प्रसन्नतेखातर करण्यात येते, ते कर्म पुण्य सिद्ध होण्याऐवजी पाप आणि अपराध सिद्ध होते. मोक्षप्राप्तीऐवजी ईश्वराचा कोप पदरी पडतो. याशिवाय स्वतःची ऐट मिरविण्याच्या अभिलाषेमुळे समाजावर अनिष्ट परिणाम होतो. स्पर्धेची भावना निर्माण होते, स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या अघोरी लालसेला बळी पडून सर्व वैध-अवैध आणि सत्य-असत्य मार्गांचा अवलंब माणूस करीत असतो. म्हणूनच इस्लामने या गर्विष्ठपणाचा धिक्कार केला.
ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘त्या लोकांसमान रंगढंग अंगिकारु नका, जे आपल्या घरातून ऐटीत आणि लोकांना आपली शान दाखवीत निघाले.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनफाल - ४७)

स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याची भावना आणि आपल्या चांगल्या कामांची व शौर्याची प्रशंसा लोकांकडून मिळविण्याची लालसा, हासुद्धा अनेकेश्वरवादासम घोर अपराध असून प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले की,
‘‘मला या गोष्टीचे भय वाटते तुम्ही अनेकेश्वरवाद अगर मूर्तीपूजासारखा अपराध कराल. अनेकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा म्हणजे केवळ एवढेच नव्हे की तुम्ही चंद्र, सूर्य अगर मूतर्चिी पूजा करावी, तर अनेकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा म्हणजे असे कोणतेही पुण्यकर्म जे ईश्वराऐवजी लोकांना प्रसन्न करण्यासाठी अगर लोकांची प्रशंसा मिळविण्यासाठी अथवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येते.”(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - इब्ने माजा)

स्वार्थ

इतरांपेक्षा स्वतःलाच महत्त्व देणे, इतरांच्या हितांची मुळीच पर्वा न करता स्वतःचेच हित जोपासणे, ही एक किळसवाणी भावना माणसाच्या मनात निर्माण होते. जर त्याच्यात एखादी खुबी अगर कौशल्य अथवा कसब किंवा सौंदर्य अथवा संपत्ती, हुद्दा असेल तर त्याला त्यावर बायकी नखरे सुचतात. स्त्रियांमध्ये हा गुणधर्म जरा जास्तच असतो. आपल्या सौंदर्यावर लटकण्या-मटकण्याची भावना पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त असते. कोणी जर त्यांच्या सौंदर्याची लटकी प्रशंसा जरी केली की त्यांचा आनंद गगनात मावत नसतो. स्त्रिया कधीच आपले वय सांगत नसतात अथवा दहा वर्षांनी कमी करून सांगतात. त्यांना भीती वाटते की आपले मूळ वय सांगितल्यामुळे इतरांच्या तुलनेत कमी तरुण अगर सौंदर्यहीन दिसू. अर्थातच आपल्या सौंदर्य अथवा कौशल्य आणि शौर्य व संपत्तीवर इतरांची प्रशंसा मिळविण्याची भावना हा मुळात बायकीपणा होय. यामुळे इतरांचे अधिकार पायाखाली चिरडण्यात येतात. इतरांना तुच्छ लेखले जाते. हा प्रकार स्वतःलाच धोका देण्यासारखा आहे. म्हणूनच कुरआनामध्ये याची सक्तीने मनाई करण्यात आली आहे. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘तु स्वतःला पवित्र(आणि श्रेष्ठ) असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करु नकोस. ईश्वरच उत्तमरित्या जाणतो की खरा ईशपरायण कोण आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नजम - ३२)

अर्थातच आपल्या ईशपरायणता अगर धर्मश्रेष्ठत्व आणि पुण्यकर्माची लोकांकडून प्रशंसा मिळविणे घोर पाप आहे. प्रसिद्धीचे भूत मानगुटीवर बसले की, माणूस चांगले वा पुण्यकर्म करतो मात्र त्याचा लोकांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. समाजावर याचे अनिष्ट परिणाम होतात. आजकाल राजकारण्यांना हा बायकीपणा करण्याचा भलताच छंद लागलेला आहे.

लालसा व हव्यास

हव्यास आणि लालसा ही एक अशी घृणास्पद भावना आहे की, माणूस यामुळे नैतिक पतनाच्या रसातळाला जाऊन पोचतो, इतरांचे अधिकार पायदळी तुडविले जातात, इतरांची निंदा-नालस्ती आणि द्वेष व मत्सरसारखे अपराध घडतात. लालसेमुळेच माणूस चोर्याचकार्या, खून, हत्या व बलात्कारांसारखे गंभीर अपराध करतो. लाच घेतो, मटका, जुगार आणि देहविक्रीसारख्या अवैध मार्गाने पैसा कमावितो, व्याजखोरी करतो. अर्थातच लालसेमुळे माणूस असे सर्वकाही करतो, जे धार्मिक आणि नैतिक दृष्टिकोनातून अत्यंत घृणास्पद होय. एवढेच नव्हे तर माणूस बर्याच वेळा केवळ लालसा आणि हव्यासाला बळी पडूनच नष्टतेच्या खोल गर्ततेत पडतो. म्हणूनच इस्लाममध्ये ही बाब अत्यंत घृणास्पद आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले गेले आहे. कुरआनात ईश्वराने म्हटले आहे,

‘‘आणि नजरदेखील टाकू नकोस त्या लौकिक जीवनामधील वैभवाकडे, जे आम्ही विविध जणांना दिले आहे, ते तर आम्ही त्यांची परीक्षा घेण्यासाठी दिले आहे, आणि तुझ्या पालनकर्त्याने दिलेली वैध उपजीविकाच उत्तम व चिरस्थायी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-ताहा - १३१)

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ज्याप्रमाणे दोन भुकेले लांडगे शेळ्यांसाठी हानीकारक सिद्ध होतात, अगदी यापेक्षाही जास्त माणसासाठी संपत्तीलोलुपता, धार्मिक श्रेष्ठत्व आणि प्रसिद्धीची लालसा हानीकारक सिद्ध होतात.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद - ३/४५६)

म्हणजेच माणसाने संपत्तीच्या लालसेपोटी इतके आंधळे होता कामा नये की त्यास नैतिकता आणि अनैतिकतामधील फरकच समजू नये, पैशांचा इतकाही हव्यास असू नये की त्यासाठी वाटेल ते करावे, खून, रक्तपात, देहव्यापार, चोर्या-मार्या व इतर अन्याय व अत्याचार करता कामा नये. त्याचप्रमाणे कोणतेही पुण्यकर्म आणि कला- कौशल्य तसेच शौर्य हे लोकप्रसिद्धीसाठी करू नये. प्रशंसा मिळविण्यासाठी प्राणांचा बळी देण्यासारखे कर्मसुद्धा ईश्वर स्वीकारीत नाही. लोकांनी आपल्याला दानशूर, धर्मात्मा, महात्मा, साधू-संत, शूरवीर, शहीद वगैरे म्हणावे, आपली खूप प्रसिद्धी व्हावी, जागोजागी आपले नाव व्हावे, पुतळे उभे राहावेत, इतिहासात अगर प्रसारमाध्यमात नाव झळकावे. या भावनेपोटी केलेले कोणतेही पुण्यकर्म ईश्वर स्वीकारणार नाही. कारण अशा भावनांनी पछाडलेली व्यक्ती कधीच कोणाचे भले करू शकणार नाही. याउलट केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेखातर एखाद्या भुकेल्यास जेवण दिले, तहाणलेल्यास पाणी पाजले, पीडिताचे अश्रु पुसले, तर हे कर्म निश्चितच ईश्वर स्वीकारणार, समाजाचेही भले होणार व त्या व्यक्तीला मोक्षही प्राप्त होईल. म्हणूनच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे अनेकेश्वरवाद आणि मूर्तीपूजेपेक्षा कमी दर्जाचे पाप नाही. म्हणून या पापापासून दूर राहणेच बरे.

कंजूशपणा

लालसा आणि हव्यासाचेचे एक प्रतीक हे कंजूसी आहे. माणसाच्या मानगुटीवर एकदा का लालसा आणि संपत्तीलोलुपतेचे भूत बसले की मग तो इतका कंजूस होतो की, जेवणातल्या थाळीत पडलेली माशीसुद्धा चाखून खातो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या भल्यासाठीसुद्धा पैसा खर्च करीत नाही. स्वतःच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठीसुद्धा खिशातली दमडी खर्च करण्याचे धाडस त्याला होत नाही. परिणामी स्वतःलाच याचे भयंकर भोग भोगावे लागतात. असा माणूस ना-ना प्रकारच्या संकट आणि समस्यांच्या विळख्यात सापडतो. म्हणूनच इस्लामी कायद्याच्या दृष्टिकोनात ही बाब अतिशय दुर्दैवी आणि घोर अपराध आहे. एवढेच नव्हे तर श्रद्धा आणि कंजूशपणा या दोहोंचा संबंध पाणी आणि अग्नीसारखा आहे. म्हणूच ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,

‘‘ज्या लोकांना ईश्वराने आपल्या अनुग्रहाने उपकृत केले आहे,(अर्थात भरपूर संपत्ती प्रदान केली) आणि ते कंजूसी करतात, त्यांनी असे समजू नये की, ही कंजूशपणा त्यांच्यासाठी चांगला आहे. हा तर त्यांच्यासाठी अत्यंत घातक आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १८०)

बेईमानी

माणसाच्या मानगुटीवर लालसेचे भूत बसले की, तो कंजूशपणा तर करतोच, शिवाय आपली संपत्ती वाढविण्याचा शक्य त्या पद्धतीने प्रयत्न करतो. यासाठी चोरी, रक्तपात, लाचलुचपत, भ्रष्टाचार, व्याजखोरी, देहव्यापार आणि जुगार व सट्टा अशा ना-ना प्रकारचे अवैध धंदे करतो. यासाठी कोणतीच संधी हातातून जाऊ देत नाही. म्हणूनच याची अर्थात बेईमानीची इस्लामने सक्तीने मनाई केली आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धावंतांनो! एकमेकांची संपत्ती खोट्या पद्धतीने खाऊ नका.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - २९)
‘‘विनाश आहे काटा मारणार्यांसाठी, ज्याची स्थिती अशी आहे की जेव्हा लोकांकडून घेतात तेव्हा पुरेपूर घेतात आणि जेव्हा त्यास मापून किंवा तोलून देतात, तेव्हा त्यांना कमी देतात.‘‘(संदर्भ : सूरह-ए-मुतफ्फि फीन - १ ते ३)

दारु आणि मादक पदार्थांचे सेवन

अगदी प्राचीन काळापासूनच माणसाला दारु आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनाची घातक सवय असल्याचे इतिहासात नमूद आहे. शिवाय आजच्या तथाकथित सुसंस्कृत काळात तर ही सवय अगदी शिगेला पोचली आहे. नेहमीच वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.च्या बातम्यांतून आपल्याला याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. शिवाय आपण हे सर्वकाही डोळ्यांनीसुद्धा पाहतो आहोत. मात्र दारू आणि मादक पदार्थांचे व्यसन हे केवळ जीवावरच बेतते असे नाही, तर यामुळे माणूस असंख्य अपराध करतो. म्हणूनच दारू ही अपराधांची आणि अवैध कामांची जननी होय. याबाबतीत कुरआनात ईश्वराने म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल. सैतानाची तर हीच इच्छा आहे की दारू व जुगारामुळे तुमच्यात कपट निर्माण करावे आणि नमाजपासून रोखावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ९०)

या ठिकाणी केवळ दारुच नव्हे तर प्रत्येक पेय आणि पदार्थ, ज्यामुळे माणसाला झिंग येते, विवेकशक्ती हरवते, ते सर्व निषिद्ध ठरविण्यात आले आहे, असे प्रेषित मुहम्मद(स.) यांनीही म्हटले आहे.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

संबंधित लेख

  • इस्लामच्या पुनरुज्जीवनाच्या आंदोलनाची शक्यता

    इस्लामचे पुनरुज्जीवन होणे आता संभवनीय नाही व तसा प्रयत्न करणेही व्यर्थ आहे, असे काही लोक या गोष्टी ऐकून करणे संभवनीय आहे. पण या लोकांना कळायला पाहिजे की ज्याप्रमाणे गतकाळात इस्लामी जीवनपद्धतीच्या व्यावहारिक स्थापनेनंतर असे सिद्ध झाले आहे की त्याच्या मार्गदर्शनात, मानवजात आपल्या पाशवी गुणधर्माचे दमन करु शकते. त्याचप्रमाणे आजसुद्धा या ऐतिहासिक सत्याचा पुनरुच्चार होणे संभवनीय आहे, कारण मानवी स्वभावधर्मात मूलगामी काही फरक झालेला नाही. ज्याप्रमाणे पूर्वी होता तसाच आजही आहे. इस्लामच्या उदयकाळी जगाची नैतिक तसेच धार्मिक अवस्था त्याचप्रमाणे अधःपतीत होती, जशी वर्तमानकाळाची दृष्टीस पडते.
  • इस्लामचे फायदे

    इस्लामी जीवनपद्धती स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत? ते आता आपण पाहू या. आपणास हे कळून चुकले आहे की या जगात चहुकडे ईशप्रभुत्वाच्या निशाण्या पसरलेल्या आहेत. विश्वाच्या एका परिपूर्ण व्यवस्थेनुसार व एका अनिवार्य नियमानुसार चालणारा हा विराट कारखाना खुद्द याच गोष्टीचा साक्षात पुरावा आहे की त्याच्या निर्माणकर्ता व त्याला कार्यान्वित करणारा एक अमर्याद शक्तिमान शासक आहे. त्याच्या शासनाविरुद्ध कोणतीही वस्तू डोके वर करू शकत नाही. संपूर्ण विश्वाप्रमाणेच मनुष्याची प्राकृतिक अवस्थाही अशीच आहे की ईश्वराच्या आज्ञेचे पालन व्हावे तद्नुसार नकळत ते रात्रंदिवस त्याचे आज्ञापालन करीतच आहे. कारण त्याच्या प्राकृतिक नियमांचे उल्लंघन करून तो जिवंत राहूच शकत नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]