Islam Darshan

सार्वजनिक कल्याण आणि इस्लामी कायदा

Published : Saturday, Mar 05, 2016

 

 

या गोष्टीशी समस्त इस्लामी विद्वान आणि मोठमोठे टोकाचे विचारवंत पूर्णपणे सहमत आहेत की, इस्लामी कायद्याच्या म्हणजेच शरियतच्या समस्त नियम आणि कायद्यात मानवकल्याण आणि हित दडलेले आहे. आपण जर थोडा विचार केला तर हे स्पष्ट आणि सिद्ध होईल की, शरियत अर्थात इस्लामी कायद्याने ज्या ज्या गोष्टींचे आदेश दिले आहेत, त्या-त्या गोष्टींमध्ये मानवासाठी लाभ असून ज्या-ज्या कर्मांपासून रोखले गेले आहे, त्या कर्मात मानवाचे अक्षम्य नुकसान आणि तोटे आहेत. अर्थातच शरियतचे आदेश पालन करण्यातच मानवाचा सर्वांगीण विकास आणि कल्याण आहे. म्हणूनच एखादे कर्म हे गुन्हा वा अपराध असण्याचे मूळ कारण हे मानवकल्याणास बाधा आणणे किंवा मानवाच्या अस्तित्व आणि स्वातंत्र्यास नुकसान पोचविणे होय. अर्थातच मानवाचे अस्तित्व टिकण्यासाठी आणि त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी पाच गोष्टी अबाधित असणे आवश्यक आहेत.

 1. मानवाची धार्मिक श्रद्धा,
 2. मानवाचे प्राण,
 3. मानवाची शीलता,
 4. मानवाची संपत्ती आणि
 5. मानवाची बुद्धी.

या पाच गोष्टींवर अगर पाचपैकी कोणत्याही गोष्टींवर घाला घालणे म्हणजेच त्याच्या अस्तित्वास बाधा पोचविणे होय आणि म्हणूनच या पाचही बाबींना नुकसान पोचविण्याचे कर्म करणे हा गुन्हा अगर अपराध ठरविण्यात आला आहे. आता आपण या पाचही बाबींवर क्रमाक्रमाने इस्लामी दृष्टिकोनातून चर्चा करु या.

ईमान अथवा श्रद्धेचे रक्षण

इस्लामच्या दृष्टिकोनात मानवी जीवनाची परिपूर्ण कल्पना ही त्याच्या ईमान अथवा धार्मिक श्रद्धेशिवाय शक्य नाही. म्हणूनच असे घटक, जे त्यास त्याच्या श्रद्धेला बाधा पोचवितात किंवा त्यास त्याच्या श्रद्धेपासून परावृत्त करण्याचे पातक करतात, असे घटक शरियत(इस्लामी कायदा) च्या दृष्टिकोनात शिक्षापात्र अपराध ठरविण्यात आले आहेत. कारण या अपराधी कर्मामुळे लोक श्रद्धात्मक मार्गभ्रष्टतेस बळी पडून इतरांनाही मार्गभ्रष्ट करतील. म्हणूनच अशा गुन्हेगारांसाठी शरियतने गंभीर शिक्षा लागू करून लोकांना आपल्या ईमान वा श्रद्धा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे आदेश दिला आहे की,

‘‘तुम्हाला विचारतात की, निषिध्द महिन्यांत युद्ध करणे कसे आहे? तुम्ही सांगा की, हा मोठा अपराध आहे. परंतु ईश्वराच्या मार्गापासून अडविणे आणि ईश्वराला नाकारणे आणि काबागृहाच्या परिसरातील लोकांना तेथून बाहेर घालविणे ईश्वराजवळ यापेक्षाही वाईट आहे आणि अनाचार हा हत्येपेक्षाही वाईट आहे. ते सदैव तुमच्याशी युद्ध करीत राहतील, इथपर्यंत की, जर ते करु शकतील तर तुम्हाला तुमच्या धर्मापासून परावृत्त करतील आणि तुमच्यांपैकी जे लोक आपल्या धर्माकडे पाठ फिरवितील आणि नरकाच्याच परिस्थितीत मरेल, त्याचे भौतिक आणि मरणोत्तर दोन्ही जीवनातील आचरण व्यर्थ होईल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा, २१७)

प्राणाचे रक्षण

ही अत्यंत सुंदर आणि रमणीय सृष्टी, विविध सौंदर्यांनी नटलेली मनमोहक आणि विलोभणीय सृष्टी, मात्र या अथांग आणि अनंत सृष्टीत जर मानवच नसेल, तर तिचे काय महत्त्व? मानवाच्या अस्तित्वामुळेच या सृष्टीचे आणि तिच्या मनोरम अस्तित्वाचे महत्त्व आहे. म्हणूनच मानवाचे प्राण अगर जीवन या विश्वात सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. इस्लामची भूमिका अशी आहे की, ईश्वराने ही समस्त सृष्टी मानवासाठीच निर्माण केली आहे. या सृष्टीतील प्रत्येक वस्तु आणि प्रत्येक घटक हे मानवाच्या सेवेसाठीच आहे. म्हणून मानवाचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्याच्या प्राणाचे रक्षण होणे हे गरजचे आहे. म्हणूनच इस्लामने एका माणसाची हत्या करण्याला इतका मोठा आणि घोर अपराध ठरविला आहे की, एका माणसाच्या हत्येस पूर्ण मानवजातीचीच हत्या ठरविण्यात आली. जी व्यक्ती हकनाक कोणाचा वध करते, त्या व्यक्तीच्या अंतःकरणात मानव-प्राणाचा आदरच नसतो. म्हणून एका माणसाची हत्या करणे म्हणजे पूर्ण मानवतेचीच हत्या करण्यासम घोर पाप ठरविण्यात आले आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,

‘‘ज्या कोण्या व्यक्तीने हकनाक एखाद्या निष्पाप मानवाची हत्या केली असेल, त्याने समस्त मानवतेची हत्या केली आणि ज्याने एखाद्या मानवाचे प्राण वाचविले, त्याने समस्त मानवजातीचे प्राण वाचविले.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ३२)
केवळ हे विश्व मानवांनी भरलेले असावे, केवळ एवढ्याकरिताच मानवांच्या प्राणाचे महत्त्व नसून मानवाचे अस्तित्व हे ईश्वराची एक महान देणगी आहे. याकरितासुद्धा मानवप्राणाचे रक्षण आवश्यक होय आणि म्हणूनच इस्लाममध्ये आत्महत्या करणेसुद्धा भयंकर महापाप आहे. कारण यामुळे ईश्वराच्या अनमोल देणगीची कदर न करण्यासारखे होते. म्हणूनच स्वतः माणसाला पण या गोष्टीचा अधिकार नाही की, त्याने आपली जीवनलीला संपवावी. आत्महत्या करणेसुद्धा दुसर्याची हत्या करण्यासम अपराध ठरविण्यात आला आहे. कुरआनात म्हटले की,

‘‘आत्महत्या करु नका. विश्वास करा की ईश्वर तुमच्यावर मेहेरबान आहे. जो माणूस अन्याय व अत्याचारासह असे करील, त्यास आम्ही अवश्य भयानक आगीत झोकून देऊ आणि हे ईश्वरासाठी काही अवघड काम नाही.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - २९,३०)

मानव प्राणाच्या रक्षणासाठीच इस्लाममध्ये खुन्यास देहदंडाची शिक्षा लागू केली आहे. कारण खून करणारा नष्ट झाला तर पूर्ण मानवता सुरक्षित राहील आणि यानंतर इतर कोणीही कोणाची हत्या करण्याचे धैर्य करणार नाही. अर्थातच एखाद्या खुन्याला, जो इतरांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतो, त्यास जगण्याचा अधिकारच काय? ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,
‘‘आम्ही त्यांच्यावर लिहिले होते की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्व जखमांच्या बदल्यात जशास-तसा बदला.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)

मानवाच्या शीलतेचे रक्षण

इभ्रत आणि शीलतेचे रक्षण म्हणजे मानवजातीचे रक्षण होय. अन्यथा समाजात उपद्रवांचे भयानक वादळ उठते. कारण आपण बर्याच वेळा वृत्तपत्रात वाचतो किंवा बातम्यांमध्ये पाहतो की, अमक्या स्त्रीची इज्जत लुटण्यात आल्यामुळे तिने हा बलात्कार झालेला आणि शीलतेची लक्तरे उडालेली पाहून तिचा संताप अनावर झाला, आपण कोणाला तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलो नाही असे समजून तिने स्वतःस जाळून घेतले. शेवटी माणूस हा ज्याप्रमाणे आपल्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढतो, त्याचप्रमाणे शीलतेच्या रक्षणासाठीसुद्धा अंतिम श्वासापर्यंत लढतो. शीलता नष्ट झाली आणि अपमान सोसावा लागला की, मग जगण्यातच काय अर्थ, हाच विचार त्यास आत्महत्येसाठी प्रेरित करतो. यावरून हे लक्षात येते की माणसाला आपले प्राण जसा प्रिय आहे, तशीच आपली अब्रू आणि शीलतादेखील खूप प्रिय आहे. त्याचप्रमाणे इस्लामने मानवाची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी ना-ना उपाय योजिले आहेत. अब्रू आणि शीलतेस बाधा आणणार्या कर्मांवर शिक्षा लागू केली आहे. इस्लामने विवाहबाह्य लैंगिक संबंधाची सक्तीने मनाई करून आणि या पातकाची कठोर शिक्षा तजवीज करून स्त्री-पुरुषांच्या इभ्रतींचे रक्षण करण्याचे ठोस पाऊल उचलले आहे. शिवाय या अवैध लैंगिक संबंधांचे दुष्परिणामही भयानक आहेत. अर्थातच शरियतच्या दृष्टिकोनानुसार हे आवश्यक आहे की, मूल जन्मल्यावर त्याचे पालनपोषण दयाळू आणि मायाळू माता-पित्यांच्याच देखरेखीत व्हावे. तेच या मुलाचे पालक असावेत. हा हेतु साध्य करण्यासाठी वैवाहिक जीवन अनिवार्य असल्याने इस्लामने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे निषिद्ध ठरवून या कर्मास महापाप ठरविले. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘व्यभिचाराच्या जवळही फटकू नका. हे खूपच निर्लज्जतेचे वर्तन आणि मोठी मार्गभ्रष्टता आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बनी-इस्त्राईल - ३२)

यासाठीच इस्लामने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणार्यांना अत्यंत कठोर शिक्षा ठोठावली आहे.
त्याचप्रमाणे शरियत म्हणजेच इस्लामी कायद्यात शीलतेवर घाला घालणेच पाप नसून एखाद्याच्या इभ्रतीवर आरोप करणेसुद्धा भयंकर पाप आहे. यामुळे माणूस खचून जातो आणि चारचौघात त्याची बदनामी होते. कधी-कधी तो बदनामीच्या भयाने आत्महत्यासुद्धा करतो. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,

‘‘जे लोक शीलवान स्त्रियांवर व्यभिचाराचा आळ घेतात, तेव्हा त्यांनी जर आरोप सिद्ध करण्यास्तव चार साक्षीदार सादर कले नाहीत, तर त्यांना एशी कोरडे मारण्यात यावे आणि यानंतर त्यांची साक्ष कधीच विश्वासपात्र समजली जाणार नाही.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नूर - ४)

माणसाच्या संपत्तीचे रक्षण

संपत्ती हे लोकांच्या जीवनाचे माध्यम आणि समाजाच्या सामर्थ्य आणि स्थैर्याचे साधन होय. संपत्तीच्याच माध्यमाने माणूस आपल्या गरजा भागवू शकतो आणि यामुळे समाज आनंदी व वैभवसंपन्न होतो. संपत्ती नसली की माणूस दारिद्र्य आणि गरिबीच्या आगीत होरपळत असतो आणि वैफल्यग्रस्त होऊन तो गुन्हेगारी प्रवृत्तीस बळी पडतो. मग त्याच्या हातून चोर्या, वाटमार्या, डकाइती, जुगार, देहव्यापार वगैरेसारखे घोर अपराध घडत असतात. म्हणूनच संपत्तीचे रक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी इस्लामने कोणाच्याही संपत्तीवर डल्ला मारणे आणि कोणत्याही अवैध प्रकारे लुटणे, हा मोठा अपराध ठरविला आहे. कुरआनात ईश्वराने म्हटले आहे,

‘‘हे श्रद्धाधारकांनो! एक-दुसर्यांचा माल(अगर संपत्ती) चुकीच्या मार्गाने हस्तगत करु नका.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा, २९)

चुकीच्या मार्गाने संपत्ती हस्तगत करणे म्हणजे संपत्ती मिळविण्याची अशी प्रत्येक पद्धत, जी इस्लामी कायद्याने निषिद्ध ठरविली आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी स्पष्टपणे म्हटले आहे,
‘‘ज्याने चोरीचा माल खरेदी केला, आणि हा माल चोरीचा असल्याचे माहीत असूनसुद्धा, तर तो चोरी करण्याच्या अपराधामध्येच सामील असेल.‘‘(संदर्भ : फैजलु कदीर, सहावा खंड, पृष्ठ ६४)

माणसाच्या विवेक आणि बुद्धीचे रक्षण

बुद्धीचे रक्षण म्हणजे त्याला अशा बाबींपासून संरक्षण देण्यात यावे, ज्यामुळे त्याचे बौद्धिकसामर्थ्य संकटात येत असेल, बुद्धी भ्रष्ट होत असेल. याच कारणास्तव शरियतमध्ये दारू आणि इतर सर्वच मादक पदार्थांच्या सेवनावर सक्तीने बंदी घातली आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षा निश्चित केली आहे, जेणेकरून समाज या भयानक शापापासून मुक्त व्हावा. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे की,

‘‘हे श्रद्धावंतांनो, ही दारू, जुगार आणि हे शकून पाहणे, हे सर्व अमंगल सैतानी कामे आहेत, यापासून दूर राहा. अशा आहे की, तुम्ही यशस्वी व्हाल. सैतान तर हेच इच्छितो की, या कुकर्मांच्या माध्यमाने तुमच्यात वैर आणि द्वेष निर्माण व्हावा आणि तुम्हास ईशस्मरण आणि नमाज पढण्यापासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून परावृत्त राहाल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ९०,९१)

याच त्या जनकल्याणकारी बाबी आहेत, ज्यांचे रक्षण शरियत अर्थात इस्लामी कायद्यांत अनिवार्य ठरविण्यात आले आहे आणि या पाच बाबींवर घाला घालणार्याविरुद्ध कठोर शिक्षा लागू करण्यात आली आहे. इस्लामचे थोर तत्त्वज्ञानी इमाम गझाली(र) यांनी लिहिले आहे,

‘‘लाभ मिळविणे आणि नुकसान होऊ न देणे हेच लोकांचे उद्दिष्ट असते. शिवाय हीच उद्दिष्टे पूर्ण करणे म्हणजे लोकसुधारणा होय. या ठिकाणी लोकसुधारणा म्हणजे अशी सुधारणा जी शरियतमान्य आहे. तसेच लोकांच्या हितामध्ये पाच बाबी आहेत. त्या अशा १) धर्माचे रक्षण, २) प्राणाचे रक्षण, ३) बुद्धीसामर्थ्याचे रक्षण, ४) पिढीचे रक्षण आणि ५) संपत्तीचे रक्षण. त्यामुळे या पाच बाबींची जामीन देणारा प्रत्येक कायदाच मुळात जनकल्याण आणि लोकसुधारणा असेल. त्याचप्रमाणे ज्यामुळे हे नियम भंग होत असतील, ती पद्धत उपद्रवी असेल आणि प्रत्येक उपद्रवाचा नाश करणे अनिवार्य असते. या पाच नियमांचे रक्षण जीवनावश्यक गरजांमध्ये समाविष्ट असेल, तसेच जनकल्याणाचा हा उच्चतम दर्जा आहे. म्हणूनच शरियतमध्ये खुन्यास देहदंडाची शिक्षा इतरांच्या प्राण रक्षणासाठी, दारू पिण्यार्यास शिक्षा ही बुद्धीसामर्थ्य सुरक्षित ठेवण्यासाठी, व्यभिचाराची शिक्षा ही मानववंश चालविण्यासाठी, चोरीची शिक्षा ही आर्थिक माध्यम अबाधित ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या आहेत त्या जनहितवादी पाच बाबीं, ज्यांच्या रक्षणार्थ जगातील प्रत्येक धर्म आणि समाज सहमत आहे.‘‘(संदर्भ : अल मुस्तस्फियुल इमाम गझाली, पृष्ठ - २५१)

जनहिताचा खरा अर्थ

जनहितासंबंधी दोन बाबी लक्षात घेणे आवश्यक आहेत. प्रथम असे की, जनहित म्हणजे माणसाला हवी ती वस्तु आणि वाटेल ती गोष्ट प्राप्त होणे म्हणजे जनहित नव्हे, असा शरियतचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. अर्थातच एखादी व्यक्ती आपली स्वैर अभिलाषा आणि स्वैरकामना पूर्ण करण्यास जनहित म्हणू शकत नाही. कारण की आशा-आकांक्षा आणि अभिलाषा अमर्याद असतात. त्या कधीच संपत नसतात, पूर्णहीहोत नसतात. कधीकधी तर फायदा होण्याऐवजी यामुळे भयानक उपद्रवसुद्धा जन्म घेऊ शकतो आणि उपद्रव हा जनहित असू शकत नाही. म्हणूनच मानवाच्या सर्वच आशा आणि अभिलाषा पूर्ण करणे हे जनहिताच्या परिभाषेत बसत नाही. दुसरी गोष्ट अशी की, इस्लाममध्ये केवळ अशाच हितांची जोपासना करण्यास जनहित म्हटले गेले, जे इस्लामी शिकवण आणि सार्वजनिक हितानुसार असतील. मात्र जे हित इस्लामी शिकवणी अगर नियमांच्या विरुद्ध अथवा सार्वजनिक हितांच्या विरुद्ध असेल, त्यास जनहित म्हणता येणार नाही.

संबंधित लेख

 • ‘बद्र’ची लढाई ते ‘उहुद’ची लढाई

  ‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
 • मानवी स्वभाव निकृष्ठ दर्जाचा नाही

  इस्लामसमोर मानवी स्वभाव खाजगी संपत्तीचे फल निश्चितपणे अन्याय व अत्याचाराच्या रुपानेच मिळावे इतका निकृष्ठ दर्जाचा नाही. माणसांच्या शिक्षणाच्या व संस्कृतीच्या संदर्भात इस्लामला अपूर्व सफलता प्राप्त झालेली आहे. म्हणून धन व संपत्तीचे मालक असतानाही मुस्लिमांची अशी अवस्था होती की -
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]