Islam Darshan

अपराधव शिक्षेसंबंधी इस्लामी दृष्टिकोन

Published : Saturday, Mar 05, 2016
अपराधाची व्याख्या

इस्लामी दृष्टिकोनात अपराध म्हणजे असे कृत्य, जे इस्लामी कायद्यानुसार अवैध आहे, जी कृत्ये करण्यापासून अल्लाहने मनाई केलेली आहे, अर्थात या कर्मांपासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे यांपैकी काहींवर दंड आकारण्यात आला व काही कर्मांवर देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही अपराधाची कायद्यात्मक व्याख्या होय.

अपराधाची विस्तीर्ण कल्पना

इस्लामने अपराध आणि त्यावरील शिक्षेची जी कल्पना मांडली आहे, ती अत्यंत विस्तीर्ण आहे. यामध्ये अशी प्रत्येक बाब समाविष्ट आहे, जिच्यात ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद(स) यांच्या एखाद्या आदेशाची अवज्ञा करण्यात आली असेल, मग हा आदेश अगर नियम सामान्य असो अथवा असामान्य असो, ईमान म्हणजेच श्रद्धा शास्त्राशी संबंधित असो अथवा अधिकार आणि व्यवहार वा आचरणाशी संबंधित असो, नैतिकतेशी संबंधित असो किंवा जीवनाच्या इतर कोणत्याही बाबीशी असो, यांपैकी कोणत्याही आदेश अगर नियमाची अवज्ञा झाली तर समजा इस्लामी विधीनुसार ही अवज्ञा अपराध ठरते आणि त्यावर शिक्षा लागू करण्यात येते. मग ही शिक्षा गुन्हेगारास ऐहिक जीवनात मिळो की पारलौकिक जीवनात मिळो, ही शिक्षा ईश्वरातर्फे मिळो अथवा इस्लामी शासनातर्फे मिळो, शिक्षा ही मिळणारच. अल्लाहने कुरआनात म्हटले आहे,
‘‘वास्तविकता अशी आहे की, जो माणूस गुन्हेगार होऊन आपल्या पालनकर्त्यासमोर येईल त्याच्यासाठी नरकाग्नी आहे, जिच्यामध्ये तो जगणारही नाही व मरणारही नाही आणि जो माणूस श्रद्धावंताच्या स्वरुपात त्यासमोर येईल, त्याने सदाचार केले असतील, अशा लोकांसाठी उच्च दर्जे आहेत.‘‘(संदर्भ : कुरआन, सूरह-ए-ताहा, ७४,७५)

आणखीन एके ठिकाणी म्हटले आहे,

‘‘आता बहानेबाजी करू नका. तुम्ही श्रद्धा ठेवल्यानंतर ईशद्रोह केला आहे. आम्ही तुमच्यापैकी एका समुदायास माफ जरी केले तरी दुसर्याला आम्ही निश्चितच शिक्षा देणार. कारण तो समुदाय अपराधी होता.‘‘(संदर्भ : कुरआन, सूरह-ए-तौबा, ६६)

आंतरमनातील इच्छा व हेतुचे कायद्यातील स्थान

इस्लाम मानवासाठी ईश्वराने प्रदान केलेली जीवनपद्धतही आहे आणि जीवनविधान अर्थात एक कायदासुद्धा आहे. हा कायदा समाजातील मानवी संबंध आणि राज्यशासनातील प्रत्येक बाबींवर व्यापलेला असून प्रत्येक कार्य वा प्रत्येक कर्मासंबंधी मानवास नियम प्रदान करतो. एवढेच नव्हे तर माणसाच्या मनातील हेतु आणि इच्छा, आकांक्षा व कामनांवर तसेच भावनांवरसुद्धा नियम लागू करतो. अर्थातच मानवाचे आंतरिक आणि बाह्यात्मक कर्म म्हणजेच मनातील हेतु, इच्छा व आचरण योग्य की अयोग्य, वैध की अवैध, खरे की खोटे हे इस्लामच ठरवितो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीवर एखाद्या नैतिक न्यायालयात त्याच्या आंतरमनातील भावना आणि हेतुनुसारच निर्णय देण्यात येईल. जर त्याने पुण्यकर्म करण्याचा इरादा केला अगर हेतु बाळगला तर त्याचा निवाडासुद्धा त्याचप्रमाणे होईल आणि जर त्याने दुष्कर्माचा हेतु बाळगला तर त्याचा निर्णयसुद्धा दुष्कर्माच्या हेतुनुसारच लागेल. हा नियम पारलौकिकरित्या चांगल्या आणि वाईट कर्मफळाच्या स्वरुपात सर्वस्वीकृत आहे. मात्र कायद्यात्मक न्यायालयात इस्लामी कायदा माणसाच्या बाह्यकर्मावर लागू होतो. अर्थातच माणसाच्या दृष्य आचरणावर लागू होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एखादे श्वापद गोळी घालून ठार केले. मात्र गोळी त्या श्वापदास लागण्याऐवजी चुकून एखाद्या माणसास लागली आणि तो मृत्यूमुखी पडला. या अपराधावर ती व्यक्ती ईश्वराच्या दृष्टिकोनात गुन्हेगार ठरणार नाही. मात्र इस्लामी शासन त्यास खुनी ठरवून शिक्षा देईल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या स्त्रीशी व्यभिचार करण्याची जर इच्छा झाली आणि ती स्त्री त्याची पत्नी असल्याचे नंतर समजले(अंधारात असा प्रकार घडू शकतो.) तर मात्र त्या व्यक्तीवर व्यभिचार करण्याची शिक्षा लागू करण्यात येणार नाही. तरीसुद्धा मनामध्ये दुष्ट हेतु बाळगल्याच्या अपराधास्तव ती व्यक्ती ईश्वराच्या दृष्टिकोनात गुन्हेगार ठरेल. या दुष्ट हेतुसंबंधी ईश्वरदरबारी त्या व्यक्तीस जाब द्यावा लागेल. याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने अपराध केला आणि तो गुन्हा करताना त्या व्यक्तीस कोणीच पाहिले नाही, अर्थात याची खबर केवळ ईश्वरालाच असते. अशा परिस्थितीत इस्लामी शासन शिक्षा लागू करू शकणार नाही. ईश्वरासमोरच त्याला याचा जाब द्यावा लागेल.

आता या ठिकाणी एक प्रश्न असा उभा राहतो की, माणसाच्या प्रत्येक अपराधावर या जगात शिक्षा होणे शक्य आहे काय? तर याचे उत्तर असे की अपराधांचे दोन प्रकार आहेत. प्रथम प्रकारच्या अपराधांमध्ये असे अपराध मोडतात, जे सिद्ध करता येऊ शकतात आणि दुसर्या प्रकारातील अपराध हे सिद्ध करता येऊ शकत नाहीत. सिद्ध न होऊ शकणारे अपराध म्हणजे पाखंड, हेवा, अहंकार, दिखाऊपणा, द्वेष, मत्सर वगैरे होय. हे इस्लामच्या दृष्टिकोनात फार मोठे अपराध आहेत. मात्र हे अपराध माणसाच्या आंतरमनासंबंधी असल्याने सिद्ध करता येऊ शकत नाहीत. म्हणून या जगात त्यावर शिक्षा लागू करणे शक्य नाही. याव्यतिरिक्त चोरी, खून, व्यभिचार आणि यासारख्या अपराधांचा संबंध साक्षीदार आणि पुराव्यांशी असल्याने पुरावे व साक्षीदार न्यायालयात सादर करुन शिक्षा देण्यात येऊ शकते. म्हणजेच याचा अर्थ असा की, इस्लामी कायदा जगामध्ये अशा अपराधांवर शिक्षा लागू करतो, जो अपराध सर्वांना दिसतो, त्याची साक्ष व पुरावा असतो आणि न्यायालयात तो सिद्ध होतो. या शिवाय साक्षी आणि पुरावे नसलेल्या अपराधांवर कोणतीही शिक्षा लागू करता येणार नाही. या अपराधांवर पारलौकिक जीवनात मात्र कठोर शिक्षा होईल. हेच कारण आहे की, इस्लामने ज्या अपराधांवर या ऐहिक जीवनात शिक्षा निश्चित केली आहे, ते अपराध जास्त संख्येत नाहीत, याउलट या अपराधांपेक्षा भयानक अपराध म्हणजेच अनेकेश्वरवाद, मूर्तीपूजा, ईशद्रोह, नास्तिकता वगैरे, ज्यांना कुरआनात भयंकर अन्याय व अत्याचार म्हटले गेले आहे, अशा भयंकर अपराधांवर या जगात कोणत्याही प्रकारची शिक्षा इस्लामने लागू केली नाही. इस्लामने कोणावरच धर्माच्या बाबतीत बळजबरी केली नाही, कोणत्याही बळावर आणि कोणत्याही प्रकारचे आमिष देऊन इस्लाम स्वीकारणे भाग पाडले नाही. मात्र या गोष्टीवर विशेष लक्ष इस्लामने पुरविले आहे की, ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती अगर समुदायाकडून इतरांचे वैध अधिकार पायदळी तुडविण्यात येतात, समाजाची शांती भंग पावते, इतरांना त्रास होतो, इतरांच्या प्राण, वित्त आणि इभ्रतीस इजा पोचविण्यात येते, इतरांवर अन्याय वा अत्याचार करण्यात येतो, अशा सर्वच अन्यायी बाबींवर आळा बसावा, कायमस्वरुपी वेसण बसावी अगर अशा कोणत्याही प्रकारच्या अपराधाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि यासाठी इस्लामने एक अत्यंत परिपूर्ण आणि यशस्वी जीवन-विधान प्रदान केले आहे. म्हणजेच अपराधावर शिक्षा लागू करणे हे जनकल्याणासाठीच होय. सार्वजनिक कल्याणास इस्लामने खूप महत्त्व दिले आहे, हेच यावरून सिद्ध होते.

संबंधित लेख

  • इस्लामी कायदे आणि राजकारण

    साधारणतः खालील बाबींचा समावेश राजकारण म्हणून होतो आणि त्यामुळे मनुष्याच्या राजकीय जीवनाचा साचा तयार होतो. सामाजिक शिस्त कशासाठी आवश्यक आहे? समाज सार्वभौमत्व कोणाला बहाल करते? मनुष्याचे खरे स्थान काय आहे? नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते? शासनाचे अधिकार कोणते आणि मर्यादा काय आहे? राज्यघटना कोण तयार करतो? कोणती राज्यघटना कार्यान्वित आहे? आपण आता पाहू या की या प्रश्नांची उकल कुरआन आणि हदीसमध्ये झालेली आहे का? या प्रश्नांचे उत्तर ‘इस्लामची राजकीय व्यवस्था’ या प्रकरणात देण्यात आले आहे.
  • ज्ञान-प्रतिष्ठा

    इस्लामने धार्मिक ज्ञानाची मोठी महत्ता वर्णिली आहे. ते शिकणे व शिकवण्याची खूप प्रेरणा दिली आहे आणि त्याला हर प्रकारे प्रोत्साहन ही दिले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लवकरच धार्मिक ज्ञानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि फार मोठे ज्ञानी व्यक्ती उठून समोर आले. त्यात पुरुषही होते व स्त्रियासुद्धा होत्या. येथे काही विशेष महत्त्वाच्या महिलांचा उल्लेख केला जात आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]